অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाचक चळवळ

वाचक चळवळ

'माध्‍यम क्षेत्रात आलेल्‍या आणि टिकलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा पाया हा वाचनाची आवड हाच असतो', असं एका माध्‍यमतज्ञानं म्‍हटलं आहे. या क्षेत्रात यशस्‍वी झालेल्‍या व्‍यक्‍तींवर नजर टाकली तर यातील सत्‍यता लक्षात येते. आज-काल वाचनाची आवड कमी होत आहे, दूरचित्रवाहिन्‍यांमुळं वाचनसंस्‍कृती लयास जात आहे, असं अनेकदा म्‍हटलं जातं. तरुणांमध्‍ये वाचनाची आवड निर्माण व्‍हावी म्‍हणून 'ग्रंथ तुमच्‍या दारी', 'पुस्‍तक भेट योजना', 'ग्रंथ प्रदर्शन', 'लेखक तुमच्‍या भेटीला', 'अक्षर भेट कुपन' असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळामार्फत नवलेखकांना पुस्‍तक प्रकाशनासाठी अनुदान देणं, सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाच्‍यावतीनं शासकीय वाड्.मय पुरस्‍कार प्रदान करणं, ग्रंथालय संचालनालयाच्‍यावतीनं ग्रंथालयांना अनुदान देणं आदी महाराष्‍ट्र शासनाच्‍या योजना वाचन संस्‍कृतीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठीच आहेत. परभणीला शहरातून फेरफटका मारताना बी. रघुनाथ सभागृहाजवळ एक पाटी दिसली- जनशक्‍ती वाचक चळवळ. उत्‍सुकता म्‍हणून दालनात प्रवेश केला. तिथं अनेक पुस्‍तकं ओळीनं मांडून ठेवलेली होती.

पुण्‍या-मुंबईमध्‍ये कायमस्‍वरुपी प्रदर्शनं असतात. त्‍यांना वाचकांचा प्रतिसादही उत्‍तम मिळतो. वाचक चळवळीविषयी अधिक जाणून घेण्‍यासाठी मी चौकशी केली. काऊंटरवर संभाजी वाघमारे बसलेले होते. ते म्‍हणाले, ' सन 2002 पासून हा उपक्रम श्रीकांत उमरीकर यांनी सुरु केला. विद्यार्थ्‍यांमध्‍ये वाचनाची आवड निर्माण व्‍हावी, या त्‍यामागचा मूळ हेतू. महात्‍मा गांधीजींच्‍या जयंतीपासून हा उपक्रम सुरु झाला. पहिलं प्रदर्शन परभणीच्‍या बाल विद्या मंदीर या शाळेमध्‍ये भरवलं. तिथं उत्‍तम प्रतिसाद मिळाल्‍यानंतर जिल्‍हयातील आणि नंतर राज्‍यभरातील शाळांमध्‍ये प्रदर्शन भरवलं. गुजराथमधील बडोद्याच्‍या तसंच आंध्रप्रदेशातील हैद्राबाद्रच्‍या मराठी शाळेतही प्रदर्शन भरवण्‍याची संधी मिळाली. प्रदर्शनामध्‍ये साधारण 15 हजार पुस्‍तकं मांडली जातात. यापूर्वी एप्रिल-मे या काळात 'मराठवाडा ग्रंथ यात्रा' आयोजित केली होती. राज्‍यातील कोणत्‍याही शाळेनं आम्‍हाला पुस्‍तक प्रदर्शन भरवण्‍यास कधी मनाई केलेली नाही, हे विशेष!' 'विद्यार्थ्‍यांमध्‍ये वाचनाची आवड असतेच. फक्‍त नेमकं काय वाचावं, काय वाचू नये, याचं मार्गदर्शन होण्‍याची गरज आहे.

पुस्‍तक प्रदर्शनात अनेक विद्यार्थी पुस्‍तकं चाळतात. हाताळतांना पुस्‍तकं फाटतात. पण आम्‍ही कधी चिडत नाही किंवा भरपाई मागत नाही. एकदा एक विद्यार्थी पुस्‍तक चोरताना पकडल्‍या गेला. त्‍याला पुस्‍तक आवडलं होतं, पण विकत घेण्‍यासाठी पैसे नव्‍हते. त्‍याला पुन्‍हा पुस्‍तक चोरी न करण्‍याविषयी समजावलं आणि चोरलेलं पुस्‍तक भेट म्‍हणून दिलं.' विविध कार्यक्रमांमध्‍ये मोठं-मोठे पुष्‍पगुच्‍छ भेट देण्‍यापेक्षा एक गुलाबाचं फुल आणि पुस्‍तकं देण्‍याचा आमचा पायंडा असल्‍याचंही त्‍यांनी सांगितलं. शालेय जीवनातच वाचनाचे संस्‍कार झाले तर ते निश्‍चितच आयुष्‍यभर पुरतात. हे स्‍वानुभवावरुन सांगता येईल. मला वाचनाची आवड साधारण इयत्‍ता दुसरी-तिसरी पासूनच लागली. प्रारंभी चांदोबा, जादूच्‍या गोष्‍टी वाचायचो. दररोज वृत्‍तपत्र घेण्‍यासारखी आर्थिक परिस्‍थिती नसली तरी वडील रविवारी लोकसत्‍ता आणि महाराष्‍ट्र टाइम्‍स ही वृत्‍तपत्र विकत घेत.

बालकांसाठीच्‍या 'कुमारकुंज'मधील गोष्‍टी शाळेत सांगायचो. राष्‍ट्र पुरुषांच्‍या जयंती-पुण्‍यतीथीला भाषण करायला नेहमीच पुढं असायचो. श्रावण महिन्‍यात आमच्‍या चाळीत भगवद् गीता, नवनाथ कथासार, हरि कथा आदींचं पारायण व्‍हायचं. त्‍यातून धार्मिक कथांचं वाचन वाढलं. वडलांच्‍या मागं लागून मध्‍य रेल्‍वेच्‍या ग्रंथालयाचा सभासद झालो. रत्‍नपारखी नावाचा ग्रंथपाल केवळ लहान मुलांची किंवा धार्मिक पुस्‍तकंच द्यायचा. त्‍यामुळं विष्‍णू पुराणापासून स्‍कंदपुराण, गरुडपुराणापर्यंत सगळी पुराणं वाचून झाली. धार्मिक ग्रंथांमध्‍ये 'झोपून कथा ऐकणारा पुढच्‍या जन्‍मी साप होतो', 'उंच आसनावर बसून ऐकणारा माकड होतो', 'मनुष्‍य जन्‍म मिळण्‍यापूर्वी आपण पोपट होतो, मृत्‍यूनंतर कावळयाचा जन्‍म मिळतो

', (म्‍हणून पितृपक्षात कावळयांना जेऊ घालतात) 'चौ-याऐंशी लक्ष जन्‍मानंतर मानव जातीत जन्‍म मिळतो', या सारख्‍या वाक्‍यांनी डोक्‍याचा भुगा व्‍हायचा. सत्‍यनारायणाच्‍या कथेतील बुडालेलं जहाज, शेषनागावरील पृथ्‍वी, भक्‍ताला वाचविण्‍यासाठी होणारी आकाशवाणी या गोष्‍टी एकीकडं आणि शाळेत शिकविण्‍यात येणारा इतिहास-भूगोल-विज्ञान दुसरीकडं. अशा कात्रीत सापडल्‍यामुळंच प्रत्‍येक गोष्‍ट विज्ञानाच्‍या कसोटीवर तपासून पाहण्‍याची सवय लागली. धार्मिक बाबी केवळ कर्मकांड न समजता त्‍यामागचं विज्ञान समजून घेऊ लागलो. 'ग्रंथ हेच गुरु' किंवा 'पुस्‍तक हाच खरा मित्र' ही उक्‍ती खरीच म्‍हणता येईल. पुस्‍तकं म्‍हणजे केवळ कथा, कादंबरी, कविता नव्‍हे तर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं कोणतंही लेखन साहित्‍य होय. भले मग ते इंटरनेटवरील असो की सीडीच्‍या स्‍वरुपात. ते लेखन आपली गुणवत्‍ता, क्षमता वाढविणारं असणं महत्‍त्‍वाचं आहे. पुस्‍तकांमुळं आयुष्‍याला नवी दिशा मिळाल्‍याची अनेक उदाहरणं आहेत. म्‍हणूनच शालेय जीवनात वाचन संस्‍कृती रुजविणा-या उपक्रमांचं कौतुक व्‍हायला हवं.

लेखक  - राजेंद्र सरग, परभणी

स्त्रोत - http://rajendrasarag.blogspot.in/2011/04/blog-post_6864.html

अंतिम सुधारित : 8/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate