অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वायुवीजन

वायुवीजन

(संवातन) बंदिस्त जागेच्या आतील हवा बाहेर जाऊन त्या ठिकाणी बाहेरील हवा आत येण्याची म्हणजे तेथे हवा खेळती रहाण्याची क्रिया. ही क्रिया नैसर्गिक वा यांत्रिक रीत्या प्रवर्तित केलेली असते. बंदिस्त जागेला हवेचा पुरवठा करण्याच्या क्रियेत तितक्याच घनफळाची उच्छ्‌वासित हवा बाहेर घालवून देण्याचा समावेश होतो. ही हवा औद्योगिक प्रक्रियेला निर्माण झालेले वास, उष्णता, अपायकारक वायू अथवा धूळ यांनीही भरलेली असण्याची शक्यता आहे. घरातील जागेचे वायुवीजन केले नाही, तर तेथील हवा कुबट होऊन तेथील तापमान व आर्द्रता ही प्रतिकूल होतात. घरातील माणसांच्या अंगातील उष्णता बाहेर जाण्यास अडथळा होतो, तसे च माणसांना अस्वस्थ वाटू लागते आणि काम करण्यास उत्साह वाटत नाही. जागा फारच कोंदट असली, तर खाण्याचे पदार्थ नासतात व त्यांना दुर्गंधी येऊ लागते. हवेत असलेल्या सूक्ष्मजंतूंची वाढ होते व त्यामुळे काही माणसांना ओकारी होते व काहींचे डोके दुखू लागते. मोठाल्या जहाजांतील पाण्याखाली असणाऱ्या भागात काम करणारे कर्मचारी व खोल खाणीत उतरून अंगमेहनतीचे काम करणारे मजूर यांच्यासाठी वायुवीजन अगदी अत्यावश्यक असते. कारखाने, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांसारख्या बंदिस्त जागांचे वायुवीजन करणेही आवश्यक असते. खाणीतील कोंदट जागेचे वायुवीजन करण्यासाठी १५५३ साली जॉर्जिअस ॲग्रिकोला यांनी फिरणाऱ्या पंख्याचा उपयोग सुरू केला. पुढे अठराव्या शतकात फ्रेंच, इंग्रज व स्वीडिश तंत्रज्ञानी खाणी आणि जहाजातील वायुवीजनाचा पंखा सुधारण्याचे प्रयत्न केले; परंतु वायुवीजन केल्याने प्रत्यक्ष काय घडते याबद्दल मात्र त्यांचे एकमत झाले नाही. विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत अपुऱ्या वायुवीजनातील धोके स्पष्टपणे समजलेले नव्हते. सर्वसाधारण समज असा होता की, हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड व इतर विषारी वायू माणसाच्या प्रकृतीला फार अपायकारक असतात व ते बाहेर घालविणे हाच वायुवीजनाचा मुख्य उद्देश असतो. पुढे १९०५ साली कार्ल फ्ल्यूगे यांनी केलेल्या प्रयोगावरून आणि १९०७ मधील एफ. जी. बेनेडिक्ट व जे. एस्. हॉल्डेन यांच्या स्वतंत्र प्रयोगांवरून असे दिसून आले की, आसपासच्या वातावरणात रासायनिक किंवा इतर प्रकारचे वायू अल्प प्रमाणात असले किंवा ऑक्सिजनाचे प्रमाण थोडे कमी झाले, तरी त्यामुळे माणसाच्या प्रकृतीवर म्हणण्यासारखा वाईट परिणाम होत नाही. साचलेला कार्बन डाय-ऑक्साइड वायू हेच अपुऱ्या वायुवीजनामुळे उद्‍भवणाऱ्या आजाराचे प्रमुख कारण पूर्वी समजण्यात येत असे; परंतु बहुतेक परिस्थितीत याचा फारच थोडा परिणाम होतो, असे दिसून आले आहे. यापेक्षा अधिक निकडीची समस्या माणसांची शारीरिक उष्णता व उच्छ्‌वास यांनी वाढलेले तापमान व आर्द्रता यांमुळे उद्‍भवते. वायुवीजन केल्याने माणसांच्या अंगातून निघणारी उष्णता लवकर बाहेर जाते, हवेतील आर्द्रता कमी होते, वाईट वास निघून जातो व त्यामुळे माणसाचा उत्साह वाढतो. माणशी प्रती मिनिट ०.३० घ. मी. बाहेरची हवा मिळाली, तर उत्तम वायुवीजन होते, असेही बेनेडिक्ट व हॉल्डेन यांना दिसून आले. वायुवीजनांचे नैसर्गिक व कृत्रिम अथवा यांत्रिक असे दोन प्रकार आहेत.

नैसर्गिक वायुवीजन

नैसर्गिक वायुवीजन धुराड्यासारख्या साधनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णता संनयनामुळे (गरम झालेली हवा वर जाऊन तिची जागा थंड हवेने घेतल्याने होणाऱ्या उष्णता संक्रमणामुळे) अथवा वाऱ्यामुळे किंवा या दोन्हींमुळे घडून येते. या दोन्ही प्रेरणा लहान व बऱ्याचदा बदलत्या असतात. खिडक्या उघडून अथवा बंद करून या प्रेरणांच्या परिणामकारकतेला मदत होते. नैसर्गिक वायुवीजनाची जागा मोठ्या प्रमाणात यांत्रिक वायुवीजनाने व वाता नुकूलनाने घेतलेली असली, तरी अद्यापही घरे, शाळा आणि व्यापारी व औद्योगिक इमारती यात नैसर्गिक वायुवीजनाचा बऱ्याच प्रमाणात उपयोग करण्यात येतो. प्रचलीत वारे असलेल्या प्रदेशांत आणि ज्या उंच औद्योगिक इमारतीत उपयुक्त संनयन प्रेरणा पुरविणारी उष्ण उपकरणसामग्री आहे तेथे नैसर्गिक वायुवीजन परिणामकारक व काटकसरीचे ठरते. नैसर्गिक वायुवीजन करावयाच्या जागेला हवा आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी असे दोन निरनिराळे मार्ग ठेवतात. उदा., एखाद्या खोलीला एका भिंतीत दरवाजा व समोरच्या किंवा आडव्या भिंतीत खिडकी ठेवतात. दरवाजा बंद केला, तर तेथे हवा खेळणार नाही म्हणून दरवाजाच्या शेजारीही खिडकी ठेवावी लागते. तसेच खोलीला फक्त दरवाजा असून खिडक्या मुळीच नाहीत असे असेल, तरी दरवाजा उघडा असूनही तेथे वायुवीजन साधले जाणार नाही. बहुतेक सर्व घरांत दारे व खिडक्यांच्या फटीतून झिरपून आत येणारी हवा नेहमीच्या माणसांना पुरेशी होते. तरी पण दरवाजा आणि खिडक्या यांच्यावर वातमार्ग (झरोके) ठेवतातच. अतिशय कडक हिवाळा असणाऱ्या प्रदेशात (उदा., उत्तर भारतात) रात्री खोल्यांतून शेगड्या ठेवाव्या लागतात. त्यांतून निघणारा धूर व वायू हे माणासाला अपायकारक असतात. त्यांचा निचरा करण्यासाठी या प्रदेशांत खोल्यांच्या भिंतींना वरच्या कडेला ठिकठिकाणी भोके ठेवतात.

आ. २. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे तोंड फिरविणारा वातमार्ग (१) छपराचा भाग, (२) वाऱ्याची दिशा (३) टोपीच्या वर जोडलेले वाऱ्याच्या दिशेप्रमाणे फिरणारे पाते, (४) सबंध टोपी फिरण्याचा आस.धातुकामाच्या ओतशाळा वगैरेंच्या इमारतींमधील वायुजीवन नैसर्गिक रीत्याच पण थोड्या निराळ्या प्रकारे करतात व ही पद्धत जास्त फलदायी असते. या पद्धतीची कल्पना आ. १ वरून येईल. अशा ठिकाणी बाहेरच्या हवेचे तापमान कमी आणि इमारतीच्या आतील तापमान जास्त असते. त्यामुळे बाहेरची हवा आतल्यापेक्षा जड असते. बाहेरची थंड हवा इमारतीच्या खालच्या भागातील आम मार्गाने आत येते व आतील गरम हवेला वर उचलते. गरम हलकी हवा वर उचलणारे थंड हवेचे एकूण उपयुक्त संनयन शीर्ष (उंची) आकृतीत ३ या आकड्याने दाखविले आहे. वर जाणारी उचललेली गरम हवा इमारतीच्या छपरातील वातमार्गातून (निर्गम मार्गातून) बाहेर जाते. अशा रीतीने इमारतीमध्ये ताज्या हवेचा प्रवाह चालू राहतो. आ. १ मध्ये दाखविलेला छपरातील वातमार्ग स्थिर राहणारा आहे. ज्या ठिकाणी जोराचे वारे वाहतात तेथे वाऱ्याचा उपयोग करून घेण्यासाठी विशेष प्रकारचा फिरणारा वातमार्ग बसवितात. त्यातील वरची टोपी एका सुकाणूवजा पात्याच्या मदतीने वाऱ्याच्या दिशेप्रमाणे वळते व त्यामुळे आतून बाहेर जाणारी हवा बाहेरच्या हवेच्या वेगामुळे बाहेर जास्त वेगाने ओढली जाते. हा प्रकार आ. २ मध्ये दाखविला आहे.

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate