অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विज्ञान व अंधश्रद्धा

विज्ञान व अंधश्रद्धा

विज्ञान अनुभवावर आधारीत आहे तसेच ते अनुमानालाही महत्व देते. एका उदाहरणाने हे स्पष्ट करता येईल. 'इलेक्ट्रॉन' हा दिसत नाही पण त्याचे अस्तित्व वैज्ञानिक मानतात. ते कसे? इलेक्ट्रॉन्सच्या गतीचे परिणाम आपल्याला दृश्य स्वरुपात पहाता येतात. टेलिव्हिजनच्या पडद्यावर इलेक्ट्राँसचा नाच चालू असतो. त्याचा परिणाम म्हणून पदडद्यावर चित्र उमटते. अणुच्या अंतरंगातील इलेक्ट्रान, प्रोटान्स वा न्यूट्रान्स दिसत नाहीत. पण त्यांचे अस्तित्व अप्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होते. म्हणून तर न्यूट्रान्स कणांच्या माऱ्यामुळे किरणोत्सारी द्रव्याचे जड अणू फुटतात व प्रचंड उर्जा प्राप्त होते.

विज्ञानात अदृश्याचे अस्तित्व गृहीत धरतात. त्यांच्या वर्तणुकीचे काही सिद्धांत मांडले जातात. त्यातून अनुमान काढले जाते. अखेरीस तपासण्याजोगा परिणाम मिळविला जातो. विज्ञानाची गृहिते ह्या श्रद्धा नव्हेत. श्रद्धा तपासायची नसते असे श्रद्धावादी म्हणतात. विज्ञानाचा आग्रह असतो श्रद्धा तपासण्याचा. गृहितावरुन काढलेले अनुमान वा निष्कर्ष चुकीचा ठरला तर गृहीत नाकारले जाते. न्यूटनची काही गृहिते चुकली. ती आज आपण मानत नाही. न्यूटन कितीही थोर असला तरी! श्रद्धा तपासून ती सिद्ध झाली तर त्याला आपण विश्वास म्हणू या. विज्ञान विश्वासावर आधारीत आहे. बटण दाबले की दिवा लागतो हा विश्वास म्हणजे विज्ञान.

श्रद्धा (म्हणजेच गृहिते) तपासून विज्ञानाने मानवी दु:खाचा परिहार करण्यात अनमोल कामगिरी बजावली आहे. एके काळी देवीच्या कोपामुळे देवीचा आजार(अंगावर फोड येणे) होतो ही श्रद्धा होती. देवी, कांजिण्या, गोवर, मलेरिया, कॉलरा इ. संसर्गजन्य आजार विषाणू व जंतुंमुळे होतात हे विज्ञानाने तपासले देवीचा कोप ही श्रद्धा विज्ञानाने झुगारुन दिली. त्याचा परिणाम म्हणून देवीचा रोगी कळवा व 1 हजार रु. मिळवा ही सरकारी घोषणा आली.

एकेकाळी पृथ्वी स्थिर आहे व सूर्य फिरतो ही श्रद्धा होती. ही श्रद्धा हा भ्रम होता हे कोपर्निकस-गॅलिलिओच्या संशोधनातून सिद्ध झाले. अशा विविध भ्रमांचे निराकरण विज्ञान करीत आले आहे. आजही करीत आहे. पहावे, तपासावे, प्रयोग करावेत, कल्पना लढवाव्यात व पुन्हा तपासावे या पद्धतीने निसर्गाची असंख्य गुपिते विज्ञानाने उलगडली. ह्या कार्यात अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तरी त्यांनी आपले जीवित कार्य चालूच ठेवले. हे वैज्ञानिक खरे आध्यात्मिक.

अध्यात्माचा अगदी साधा आणि सोपा आशय आहे. अध्यात्माचा एक मात्र निकष म्हणजे ज्यामुळे प्रेम, परोपकार करुणा, बंधुता, सहनशीलता अशा मूल्यांची जोपासना होते ते खरे अध्यात्म. विविध आजारावर विज्ञानाने केलेली मात, भौतिक गरजा भागविण्यासाठी निर्माण केलेल्या विविध वस्तू, विश्वाच्या रचनेचे उलगडत ठेवलेले रहस्य यातून सौंदर्य, कला व समृद्धी यांचा लाभ आपणास होत आहे. तथाकथीत अध्यात्मवाद्यांचा आत्मा ज्या शरीरात वास करतो त्या शरीराच्या अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण या मूलभूत गरजा भागविणे हे एक प्रकारचे अध्यात्माचेच कार्य होय. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा अध्यात्मवाद्यांची प्रवचने भागवतील काय? ते वापरत असलेल्या कार, संगणक, ध्वनीयंत्रणा, दूरदर्शनची चॅनेल्स कशी निर्माण झाली? अध्यात्मवाद्यांनी विज्ञानाचे आभार मानले पाहिजेत. तसे न करणे हा कृतघ्नपणा होईल. तात्पर्य वैज्ञानिक दृष्टिकोन हा ज्ञानाचा पाया असावा. अंधश्रद्धा निर्मूलन हे दिशाभूलीपासून समाजाला वाचविण्याचे साधन आहे. श्रद्धेचा निकष ज्ञान असावे अज्ञान नव्हे. श्रद्धा तपासाव्यात, चुकीच्या श्रद्धांचा त्याग करावा असे सांगण्यात गैर काय?

संकलन - अनिल बाप्ते

अंतिम सुधारित : 8/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate