অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तक्षशिला विद्यापीठ

तक्षशिला विद्यापीठ

प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध विद्यापीठ. तक्षशिला ही नगरी प्राचीन गांधार देशाची राजधानी होती. पूर्वी भारतात असलेले  हे ठिकाण सध्या पाकिस्तानात रावळपिंडीपासून वायव्येस सु. ३५ किमी. अंतरावर आधुनिक सराईकल या रेल्वे स्थानकाजवळ आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाचे  प्रमुख संचालक सर जॉन मार्शल यांनी या भागात उत्खनन केले, परंतु प्राचीन विद्यापीठाचे असे फारसे अवशेष तेथे सापडले नाहीत. तक्षशिला नगरी व विद्यापीठ यांचे उल्लेख रामायण, महाभारत  आणि जातकांत आढळतात. काही ग्रीक व चिनी परदेशी प्रवाशांनीही आपल्या प्रवासवृत्तांतात या विद्यापीठाचा उल्लेख केला आहे.

कैकेयीपुत्र भरताने तक्षशिला नगर वसविले व त्याला तक्ष या आपल्या मुलाचे नाव दिले, असे मानले जाते. इ. स. पू. आठव्या शतकापासून इ. स. चौथ्या शतकापर्यंत सु. १,२०० वर्षे हे विद्यापीठ अस्तित्वात होते. या कालखंडात त्या प्रदेशावर ग्रीक, इराणी, मौर्य, इंडो–बॅक्ट्रियन, सिथियन, कुशाण वगैरे अनेक राज्यकर्त्यांच्या राजकारणाचा, संस्कृतींचा आणि भाषांचा प्रभाव पडला व त्याचा परिणाम विद्यापीठातील भाषा आणि अभ्यासक्रम यांवरही झाला. इ. स. पाचव्या शतकात हूणांनी तक्षशिलेचा पूर्ण विध्वंस केला व तेव्हापासून हे विद्यापीठ बंद पडले.

तक्षशिला विद्यापीठाची रचना ही आधुनिक विद्यापीठांप्रमाणे नव्हती. तेथे अनेक विद्यार्थी उच्च अध्ययनाकरिता भारतातील कोनाकोपऱ्यांतून व आशिया–यूरोपमधील देशांतूनही येत. प्रत्येक शिक्षक म्हणजे एक स्वतंत्र संस्थाच असे. त्याला त्याचे प्रौढ विद्यार्थी मदत करीत. एका शिक्षकाच्या हाताखाली सु. ५०० विद्यार्थी असत, असा उल्लेख जातकांत आहे. विद्यार्थ्यांच्या भोजन–निवासाची सोय विद्यापीठाच्या वसतिगृहात असे. सधन वर्गातील विद्यार्थी संपूर्ण शिक्षणाकरिता सामान्यतः एक हजार सुवर्णनाणी शुल्क म्हणून देत. निर्धन विद्यार्थी गुरूगृही राहून नेमलेली कामे दिवसा करीत आणि रात्री अध्ययन करीत. काही विद्यार्थी अध्ययन पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळवून गुरुदक्षिणा देत.

प्रवेशपरीक्षेनंतर १६–१७ वर्षे वयाचे विद्यार्थी घेतले जात. शिक्षणाचा कालावधी सामान्यपणे ७–८ वर्षांचा असे. इ. स. पू. सहाव्या शतकात या ठिकाणी बनारस, राजगृह, मिथीला, उज्जयिनी इ. नगरांतून व कुरू, कोसल इ. राज्यांतून विद्यार्थी येत. कोसलचा प्रसेनजीत राजा व जीवक राजपुत्र (बिंबीसारचा अनौरस पुत्र) यांनी येथेच शिक्षण घेतले. पाणिनी व कौटिल्य यांनीही येथेच विद्यार्जन केले, असे मानले जाते. अध्यापकांच्या श्रेणीत धौम्य ऋषी, आयुर्वेदाचार्य जीवक इत्यादींचे उल्लेख येतात.

तक्षशिलेत फक्त उच्च शिक्षणाची व्यवस्था होती. सखोल अभ्यासावर भर दिला जाई. वैद्यक, धनुर्विद्या, वेदत्रयी, व्याकरण, तत्त्वज्ञान, वास्तुशास्त्र इ. प्रमुख विषय शिकविले जात. याशिवाय शल्यक्रिया, युद्धतंत्र, ज्योतिष, कृषिविज्ञान, फलज्योतिष, वाणिज्य, सांख्यिकी, विज्ञान, लेखाशास्त्र, संगीत, नृत्य, चित्रकला असे विषयही शिकविले जात. विद्यापीठात विद्यार्थ्यांना धर्मजातिकुलनिरपेक्ष प्रवेश असे. हजार–बाराशे वर्षांच्या कालखंडात ज्या ज्या राजवटींनी तक्षशिलेवर आधिराज्य केले, त्यांचा तेथील अभ्यासक्रमावर व भाषेवरही कमीअधिक परिणाम झाला. इराणी व ग्रीक संस्कृतींचे अनेक इतर विषय व संकल्पना शिक्षणक्रमात समाविष्ट झाल्या. ब्राम्ही लिपीऐवजी खरोष्ठी लिपीचा वापर अधिक होऊ लागला. ग्रीक तत्त्वज्ञान व भाषा याचाही अभ्यासक्रमात समावेश झाला असावा, असे अ‍ॅपोलोनिअसच्या वृत्तांतावरून दिसते.

हजार–बाराशे वर्षे अव्याहत शिक्षणकार्य करीत असलेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकमेव प्राचीन विद्यापीठ होते. तथापि इ. स. पाचव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी फाहियान याला तेथे शैक्षणिक दृष्ट्या काहीच महत्त्वाचे दिसले नाही, असे त्याच्या प्रवासवृत्तांतावरून दिसते.

 

लेखक : मु. मा. घाणेकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate