অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नालंदा विद्यापीठ

नालंदा विद्यापीठ

प्राचीन भारतातील एक आदर्श विद्यापीठ. बिहार राज्यातील राजगीरच्या उत्तरेस ११·२७ किमी. अंतरावर हे विद्यापीठ होते. त्याची स्थापना इ. स. पाचव्या शतकाच्या सुरुवातीस झाली असावी. विद्यापीठाच्या स्थापनेचे व संवर्धनाचे श्रेय गुप्तवंशाच्या सहा राजांकडे जाते. काही अभ्यासक हे श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन याचा शिष्य आर्यदेव यास देतात. उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर ‘श्रीनालंदा महाविहार- आर्यभिक्षुसंघस्य’ असे लिहिलेले आहे व तिच्या दोन्ही बाजूंवर सारनाथचे धर्मचक्र आहे.

नालंदा विद्यापीठाच्या सु. दीड किमी. लांब व सु. पाऊण किमी. रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत व वसतिगृह होते. याशिवाय सुसज्ज ग्रंथालयासाठी रत्नसागर, रत्नोदय व रत्नरंजक अशा आणखी तीन सुंदर इमारती होत्या. या ग्रंथालयाच्या विभागात धर्मगंज म्हणत. निवासासाठी ४,००० व अभ्यासासाठी १,००० खोल्या होत्या. ८,५०० विद्यार्थी व १,५०० शिक्षक होते. प्रत्येक दिवशी शंभर व्याख्याने होत. येथे राहणाऱ्यांना निवास, भोजन, कपडालत्ता, औषधोपचार व शिक्षण विनामूल्य असे. हा सर्व खर्च दान दिलेल्या १०० खेड्यांच्या उत्पन्नातून व इतर देणग्यांतून चाले.

नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्रगत, उदार आणि बहुव्यापक होता. त्यात सांप्रदायिकतेस स्थान नव्हते. बौद्ध धर्माचे भिन्न संप्रदाय, जैन धर्म, ब्राह्मणी धर्म व इतर धर्म त्याचप्रमाणे योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या, गणित, ज्योतिष, चित्रकला, शिल्पशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेदविद्या इ. विषय शिकविण्याची व्यवस्था होती. सत्याच्या शोधाची पहिली अट स्वातंत्र्य आहे, असे मानण्यात येई. विद्यापीठाच्या कीर्तीमुळे देशातील कानाकोपऱ्यांतून व चीन, कोरिया, तिबेट इ. परदेशांतूनही तेथे विद्यार्थी येत. द्वारपंडित घेत असलेली प्रवेशपरीक्षा अत्यंत कडक असे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शेकडा २० ते ३० टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळे. विद्यापीठाने आर्यदेव, सिलभद्र, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीर्ती, शांतरक्षित, कमलशील इ. विद्वानांची मालिका निर्माण केली. न्यायशास्त्र ही या विद्यापीठाची मोठी देणगी आहे.

चरित्र्यसंपन्न व बुद्धिवान शिक्षक, अभ्यासू व होतकरू विद्यार्थी, कुशल प्रशासन, राज्यकर्त्यांचा सतत लाभलेला आश्रय यांमुळे नालंदा विद्यापीठाची उत्तरोत्तर सतत आठ शतके भरभराट होत गेली. भारतातील अध्ययन-अध्यापनाच्या श्रेष्ठ परंपरेला सातत्य व समृद्धी लाभवून देण्यात या विद्यापीठाचा वाटा फार मोठा आहे. परंतु विक्रमशीला विद्यापीठाच्या प्रगतीबरोबर नालंदा विद्यापीठास उतरती कळा लागली आणि शेवटी तेराव्या शतकाच्या शेवटी बख्तीयार खल्जीने मोडतोड करून व जाळून त्याचा विध्वंस केला. नालंदा विद्यापीठाची आठवण म्हणून त्याच ठिकाणी बिहार सरकारच्या सहकार्याने १९५१ साली नव नालंदा महाविहार (नालंदा पाली प्रतिष्ठान) स्थापन करण्यात आले आहे.

 

लेखक : अच्युत खोडवे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate