অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रकाशन व्यवसायात एक सुवर्णसंधी !

प्रकाशन व्यवसायात एक सुवर्णसंधी !

राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) या अग्रगण्य संस्थेशी जुळण्याची एक सुवर्ण संधी आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधीन असलेल्या या अग्रगण्य संस्थेने एनबीटी प्रकाशनाचे अधिकृत वितरक आणि पुस्तक विक्रेता करिता अर्ज आमंत्रित केले आहेत. २५०० रूपये सुरक्षा ठेवीच्या आधारावर बेरोजगार युवक युवतींना आकर्षक मानधन दिले जाणार असून मागासभाग, अनुसूचित जमाती व ईशान्य भारतातील तरूणांसाठी ही सुरक्षा ठेव फक्त २००० रूपये एवढी आहे.

परिचय



इंग्रजी तसेच विविध भारतीय साहित्याचा विकास व्हावा यासाठी मोलाचे काम करणारी शासकीय संस्था म्हणजे राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी). उच्च शिक्षण विभाग मानव संसाधन मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या राष्ट्रीय पुस्तक न्यास या संस्थेची स्थापना १९८७ मध्ये झाली. इंग्रजी, हिंदी तसेच विविध भारतीय भाषा मधील साहित्य निर्मिती करीता प्रोत्साहन देऊन या भाषांमधील साहित्य वाजवी दरात जनतेला उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य एनबीटी करते. तसेच सदर साहित्य सुलभतेने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी देशाच्या विविध भागात प्रदर्शन भरविणे, पुस्तक कार्यशाळा आयोजित करणे, सुचीचे प्रकाशन करणे व लोकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

प्रकाशन



वाचन संस्कृती रुजविणे तसेच विविध भाषांमधील साहित्य निर्मिती होणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत त्यादृष्टीने विशिष्ट प्रकारच्या साहित्याचे प्रकाशन एनबीटी करत असते. त्यामध्ये भारतातील प्राचीन श्रेष्ठ साहित्य, भारतीय भाषांमध्ये भारतीय लेखकांच्या उत्कृष्ट साहित्याचे एका भारतीय भाषेमधून दुसऱ्या भारतीय भाषेमध्ये अनुवाद करणे, विदेशी भाषांमधील श्रेष्ठ पुस्तकांचे भारतीय भाषांमधील अनुवादीत साहित्य यांचा समावेश आहे. मुख्यत्वे गैर पाठ्यपुस्तक प्रकाशन तसेच समाजातील सर्व वयोगटातील वाचकांसाठी सामाजिक विज्ञान, युवा साहित्य प्रदर्शनात सहभाग नोंदवून भारतीय साहित्याचा प्रचार प्रसार करण्याचे महत्त्वाचे काम एनबीटी करते. गैर सरकारी संस्थांना प्रकाशनासाठी अर्थसहाय्य देणे प्रकाशनासंदर्भात प्रशिक्षण देखील एनबीटी देत असते. इंग्रजीबरोबर सर्व प्रमुख भारतीय भाषा जसे की, हिंदी, असामी, पंजाबी, मराठी, गुजराथी, मणिपुरी, तामिळ, तेलगू, बांग्ला, कन्नड, काश्मिरी, कोकणी, नेपाळी, ओरिसा, राजस्थानी, भोजपुरी, सिंधी, उर्दू, नेपाळी, या भाषांमध्ये प्रकाशित करते. लहान मुलांसाठी प्रकाशित होणारी भिल्ल, गोंड, संथाली व काही ईशान्य भारतात बोलल्या जाणाऱ्या बोरो, गारो, खासी, कोकबोरीक, लेपचा लिरीम्ब सिली, मुझो व नेवारी ह्या भाषांमधील पुस्तके हे एनबीटीचे वैशिष्ट आहे. विज्ञान, पर्यावरण यासारख्या विविध विषयावरील साहित्याचे ब्रेल लिपीत प्रकाशन करण्याला एनबीटी विशेष प्राधान्य देते.

पुस्तके आणि वाचनासाठी प्रोत्साहन



नवीन पिढीत वाचण्याची गोडी निर्माण व्हावी हा एनबीटीचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी देशभरात साहित्य प्रदर्शन व माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात वाचकांचा दारापर्यंत पुस्तक उपलब्ध व्हावे यासाठी ऑनलाईन पुस्तके विकत घेण्याची सुविधा देखील एनबीटीने उपलब्ध करून दिली आहे. एनबीटीमध्ये देशभरातील ८०,००० अधिक सदस्याने बुक क्लबसाठी नोंदणी केली आहे. नवोदीत लेखकांना व प्रकाशकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची भरीव कामगिरी देखील एनबीटीने केली आहे. ईशान्य भारतातील साहित्य परंपरा टिकून रहावी यासाठी ईशान्य भारतीय भाषांमधील साहित्याचे प्रदर्शने एनबीटी आयोजित करत असते.

नवी दिल्ली येथे पुस्तक प्रदर्शन



एशियातील सर्वात मोठ्या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन एनबीटीतर्फे दरवर्षी नवी दिल्ली येथे करण्यात येते. गेल्या चार दशकापासून या पुस्तक प्रदर्शनाची चर्चा संपूर्ण जगात होत आहे.

मोबाईल पुस्तक प्रदर्शन



पुस्तक प्रदर्शनाच्या लाभ ग्रामीण भागातील लोकांना देता यावा यासाठी मोबाईल व्हॅनची सुविधा एनबीटी मार्फत दिली जाते. ही मोबाईल व्हॅन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचून वाचकांना विविध पुस्तके त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देते. १९९२ ला हा उपक्रम सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत १०००० पेक्षा अधिक प्रदर्शनाचे आयोजन एनबीटी मार्फत करण्यात आले आहे.

मुलांकरिता साहित्य प्रोत्साहन



मुलांच्या सर्वांगीण विकासात पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि म्हणूनच लहानवयातच पुस्तकाची गोडी लागावी या हेतूने एनबीटीने खास बालसाहित्याचा प्रसारासाठी १९९७ मध्ये राष्ट्रीय बाल साहित्य केंद्राची स्थापना केली. विविध भारतीय भाषांमधील बालसाहित्याचा प्रसार करण्याचे कार्य केंद्रामार्फत केले जाते. बालकांना वाचनामध्ये स्वारस्य निर्माण व्हावे म्हणून वाचक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. आज देशाच्या विविध ३५,००० हून अधिक वाचक मंचाची स्थापना झाली आहे. सदर मंचाच्या वतीने बालसाहित्याचे सर्व्हेक्षण तसेच संशोधनाचे महत्त्वाचे कार्य केले जाते. वाचक मंचातर्फे द्विभाषिक मासिक देखील प्रकाशित केले जाते. राष्ट्रीय बाल साहित्य केंद्राचे बाल साहित्य ग्रंथालय व प्रलेखन केंद्र आता देशभरातील ग्रंथालयाच्या जाळ्याने विणले गेले असून केंद्रातील सदस्यांना एका क्लिकवर ऑनलाईन कोणतेही पुस्तक उपलब्ध होते. ह्या ग्रंथालयाचा लाभ संशोधक सामान्य वाचक व बालके घेत असतात.

परदेशात भारतीय साहित्याला प्रोत्साहन



भारतीय साहित्य समृद्ध आहे त्याचे माहात्म्य सातासमुद्रापार कळावे याकरिता एनबीटीमार्फत विविध आंतरराष्ट्रीय साहित्य प्रदर्शनात सहभाग नोंदविला गेला आहे. सन १९७० पासून आतापर्यंत एनबीटी ने विविध आंतरराष्ट्रीय साहित्य प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. तसेच एनबीटीने विविध देशात प्रस्तुतीकरणात सहभाग नोंदविला आहे. ज्यामध्ये फँक्रफ्रुट, मॉस्को, बिजिंग तथा सियॉलमध्ये आयोजित प्रस्तुतीकरण करण्यात आले. प्रस्तुतीकरणाचा (सादरीकरणाचा) एक भाग म्हणून एनबीटीतर्फे चर्चासत्रे, परिसंवाद, मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. विशेष पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले.

एनबीटीतर्फे अनुवादनासाठी आर्थिक सहाय्य



एनबीटीद्वारे एनबीटी अर्थ सहाय्यता कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत न्यास व अशा विदेशी प्रकाशकांना वित्तीय सहाय्यता देते जे भारतीय पुस्तके विदेशी भाषेत अनुवादीत करतात.

अनुदान योजना



भारत सरकारने एनबीटीला साहित्य संस्थाना अर्थसहाय्य योजनांचे व्यवस्थापन करण्याचे कार्य सोपविले आहे. पुस्तकांचा प्रचार प्रसार करण्याचा हेतूने सदर सहाय्यता योजना राबविल्या जातात. योग्य दरात उच्च शिक्षणाची पुस्तके प्रकाशित व्हावी या हेतूने एनबीटी लेखकांना तसेच पाठ्यपुस्तक प्रकाशकांना आर्थिक सहाय्य प्रदान करत असते. 

स्थापना दिवस व्याख्यानमाला


एनबीटीतर्फे दरवर्षी १ ऑगस्टला स्थापना दिवस साजरा केला जातो, व त्या प्रित्यर्थ साहित्यिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. २०१३ ला एनबीटीला ५६ वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने एनबीटीतर्फे दुसऱ्या वार्षिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य क्षेत्रातील विविध नामांकित लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.

पुस्तक प्रकाशन प्रशिक्षण



प्रकाशन क्षेत्रात प्रशिक्षिताचा सहभाग वाढावा या हेतुने एनबीटीतर्फे दरवर्षी दिल्ली येथे प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. या व्यतिरिक्त अल्पकालीन प्रशिक्षणाचे आयोजन देखील केले जाते. चांगले प्रकाशक घडावेत या हेतूने एनबीटीने काही विद्यापीठांसोबत करार देखील केले आहेत. एनबीटीने प्रकाशनासंदर्भात पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्याकरिता कलकत्ता विद्यापीठ व दिल्ली मधील आंबेडकर विद्यापीठ यांच्याशी करार देखील केले आहेत.

राष्ट्रीय रिडरशीप सर्व्हे



२०२५ पर्यंत १५ ते २५ या वयोगटातील तरूणांमध्ये वाचनाची गोडी लागावी यासाठी एनबीटी हे भारतभर राष्ट्रीय कृती योजना अंतर्गत तरूणांमध्ये ‘राष्ट्रीय रिडरशीप सर्व्हे’ हा कार्यक्रम राबविते. नॅशनल कॉन्सील अंतर्गत संपूर्ण देशात ग्रामीण आणि शहरी भागात सर्व्हेक्षण घेण्यात आले. याचा नुकताच अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय पुस्तक सप्ताह



वाचनसंस्कृती जोपासली जावी या उद्देशाने सन १९८२ पासून नॅशनल पुस्तक सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान देशभर पुस्तक सप्ताहानिमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये पुस्तक प्रदर्शन, सेमीनार, चर्चासत्र, लेखकांना भेटा आदी कार्यक्रमांचा समावेश असतो. 

संपर्क-
पुस्तक विक्रेता अथवा डिलरशीपसाठी खालील ई-मेल आयडीवर संपर्क साधावा
dhmrizvi.nbt@nic.in, Imranulhaque.nbt@gmail.com, nro.nbt@nic.in, ro.ero@nbtindian.gov.in, ero.nbt@nic.in ro.sro@nbt.gov.in, sro.nbt@nic.in, ro.wro@nbtindia.gov.in, wro.nbt@nic.in, mohannbtindian@gmail.com, mathanrajnbt@gmail.com, rubindcruz@gmail.com, rubindcruznbt@gmail.com, kamalahmad26@gmail.com, bpc.patna@nbtindia.gov.in, kkgupta.nbt@nic.in, nro.nbt@nic.in 

संकलन- धीरज खडसे.

माहिती स्त्रोत : महान्युज


अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate