অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अँग्लो-इंडियन साहित्य

अँग्लो-इंडियन साहित्य

भारतात कमीअधिक काळ वास्तव्य केलेल्या किंवा स्थायिक झालेल्या इंग्रजांनी आणि अँग्‍लोइंडियन मानल्या गेलेल्या भारतीय समाजातील व्यक्तींनी भारतासंबंधी किंवा भारतीय पार्श्वभूमीवर केलेले इंग्रजी लेखन म्हणजे अँग्‍लोइंडियन साहित्य होय, असे स्थूल मानाने म्हणता येईल. भारतीय संविधानाच्या ३६६(२) या अनुच्छेदाखाली ‘अँग्‍लो-इंडियन’ या संज्ञेची व्याख्या दिलेली असली, तरी प्रत्यक्षात मात्र या संज्ञेचा उपयोग भिन्न भिन्न प्रकारे केला जातो. इंग्रजांबरोबरच इतरही यूरोपीय समाजातील इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांचा व अधूनमधून इंग्‍लंडमधीलच काही प्रसिद्ध लेखककवींचाही निर्देश अँग्‍लो-इंडियन साहित्यिकांत करण्यात येतो. अँग्‍लो-इंडियन लेखकांनी इंग्रजीप्रमाणेच फार्सी व उर्दू भाषांतही लेखन केलेले आढळते. अँग्‍लो-इंडियन साहित्यिक व साहित्य यांसंबंधी निश्चित व काटेकोर मर्यादा घालणे अशक्य नसले, तरी तसे केल्याने या विषयासंबंधीचे प्रचलित ज्ञान मर्यादित करणे भाग पडेल. शिवाय स्वतंत्र भारतात अँग्‍लो-इंडियन साहित्याला केवळ ऐतिहासिक दृष्टीनेच महत्त्व उरलेले आहे. म्हणून काहीशा स्थूल व रूढ अर्थानेच त्या साहित्याचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.

सोळाव्या शतकापासून निर्माण होऊ लागलेल्या अँग्‍लो-इंडियन साहित्यात भारतविषयक वृत्तांत, इतिहासग्रंथ, भारतविद्या, कथासाहित्य, काव्य, आठवणी इ. प्रकारांतील लेखन अंतर्भूत होते. मुख्यत: इंग्‍लंडमधील वाचकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेले हे साहित्य बहुधा इंग्‍लंडमध्येच प्रकाशित झाल्याचे दिसते. या साहित्याला दीर्घकालीन इतिहास असला, तरी कॅनडातील व ऑस्ट्रेलियातील इंग्रजी साहित्या-सारखी अतूट वाङ्‌मयीन परंपरा नाही. याची कारणे राजकीय व विशेषतः सांस्कृतिक स्वरूपाची आहेत. भारतीय पार्श्वभूमीवर, पण इंग्रजी मनोवृत्तीने हे साहित्य निर्माण झाले; त्यामुळे दोन भिन्न संस्कृतींच्या परस्परसंबंधाचा ठसा त्यावर कमी-अधिक प्रमाणात उमटला. त्यात कुतूहलजनक नावीन्य आहे; त्याबरोबरच लेखकांच्या पूर्वग्रहांचा भलाबुरा परिणामही त्यावर झालेला दिसतो.

भारतविषय वृत्तांत : मराठी ⇨क्रिस्तपुराण रचणारा गोव्यातील प्रसिद्ध जेझुइट धर्मप्रचारक ⇨फादर स्टीफन्स (१५४९?–१६१९) याने इंग्लडमधील आपल्या वडिलांनी जी माहितीपर पत्रे पाठविली, ती अँग्लो-इंडियन साहित्याची सुरुवात होय. तेव्हापासून सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जे अँग्लो-इंडियन साहित्य निर्माण झाले, ते मुख्यत: प्रवासवर्णनात्मक असून त्यात भारतासंबंधी वृत्तांतकथनही आढळते. जहांगीरच्या दरबारातील इंग्लंडचा वकील सर टॉमस रो याने आपल्या जर्नलमध्ये वैभवशाली मोगलकाळाचे वर्णन केलेले आहे. भारतीय सुवर्णभूमीची चित्तवेधक वर्णने रेव्हरंड एडवर्ड टेरी (रिलेशन ऑफ ए व्हॉयेज टू द ईस्टर्न इंडिया), विल्यम ब्रटन (न्यूज फ्रॉम द ईस्ट इंडीज), विल्यम मिथोल्ड (रिलेशन्स ऑफ द किंगडम ऑफ द गोलकोंडा), जॉन फ्रायर (न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शिया) वगैरे प्रवाशांनी लिहिलेली आहेत. इंग्लंडमधील लोकांत भारताविषयी विलक्षण कुतूहल निर्माण करण्याचे कार्य अशा लेखनाने केले.

इतिहासग्रंथ : राजकीय दृष्टीने अठरावे शतक अत्यंत धामधुमीचे होते. या शतकाच्या अखेरीस यशापयशांच्या चक्रातून बाहेर पडून इंग्रजी सत्ता भारतातील विस्तृत प्रदेशावर स्थापन झाली. देशात जो नवा इतिहास घडत होता, तो ग्रंथरूपाने नोंदवून ठेवण्याचा प्रयत्न अनेकांच्या लेखनात दिसतो. अशा लेखनात रॉबर्ट ऑर्मच्या हिस्टरी ऑफ द मिलिटरी ट्रँझॅक्शन्स ऑफ द ब्रिटिश नेशन इन इंदोस्तान (१७६३-७८) व हिस्टॉरिकल फ्रॅग्मेंट्स ऑफ द मोगल एंपायर ऑफ द मराठाज अँड ऑफ द इंग्लिश कन्सर्न्स इन इंदोस्तान फ्रॉम द इयर १६५९ या दोन पुस्तकांचा समावेश होतो. यांखेरीज जॉन, हॉल्वेल (इंडिया ट्रॅक्ट्स), चार्ल्स हॅमिल्टन (रोहिले-अफगाणांचा इतिहास), रेमंड ऊर्फ हाजी मुस्तफा (गुलाम हुसेनच्या सियर-उल्‌-मुतअख्खिरीनचे भाषांतर), फ्रॅन्सिस हॅमिल्टन (अ‍ॅन अकाउंट ऑफ द किंगडम ऑफ नेपाळ) इ. आरंभीचे इतिहासकार वृत्तांतकथनावर अधिक भर देणारे आहेत.

एकोणिसाव्या शतकातील अँग्लो-इंडियन इतिहासकारांची पार्श्वभूमी बदललेली होती. साम्राज्य मिळविण्यापेक्षा ते टिकविण्याकडे इंग्रजी राज्यकर्त्यांचे अधिक लक्ष होते. भारतीय राज्यकर्त्यांचा सशस्त्र विरोध नाममात्रच उरला होता. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर तो विरोधही पूर्णपणे नाहीसा झाला. इतिहासाच्या विशुद्ध जिज्ञासेने, उपलब्ध पुराव्याच्या आधाराने, शक्य तितक्या आपुलकीने इतिहास लिहिणारे अनेक लेखक या शतकात होऊन गेले. त्यांत  ग्रँट डफ (हिस्टरी ऑफ द मऱ्हाठाज, १८२६), जेम्स टॉड (अ‍ॅनल्स अँड अ‍ॅटिक्विटीज ऑफ राजस्थान,१८२९),  माउंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन (हिस्टरी ऑफ इंडिया, १८४१), फिलिप मेडोज टेलर (ए स्टूडंटस मॅन्युअल ऑफ द हिस्टरी ऑफ इंडिया, १८७०), चार्ल्स किंकेड (हिस्टरी ऑफ द मराठा पीपल, द. ब. पारसनीस यांच्या सहकार्याने; तीन खंड १९१८, १९२३, १९२५) व डेनिस किंकेड (द ग्रँड रिबेल) या व इतर इतिहासकारांचा समावेश होतो. या इतिहासकारांच्या लेखनातील गुणदोष तत्कालीन ऐतिहासिक साधनांच्या मर्यादित स्वरूपामुळे जसे निर्माण झाले आहेत, तसेच ते क्वचित पक्षपाती भूमिकेमुळेही उत्पन्न झाले आहेत.

अठराशे सत्तावनच्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धासंबंधी बरेचसे ऐतिहासिक लेखन उपलब्ध आहे. त्यात सर रसेल यांचा माय डायरी इन इंडिया इन द इयर १८५८-५९, दोन खंड (१८६०), सर जेकब यांचा वेस्टर्न इंडिया बिफोर अँड ड्यूरिंग द म्यूटिनीज  (१८७२), जॉर्स मॅलेसनचा हिस्टरी ऑफ द इंडियन म्यूटिनी, तीन खंड (१८७८–80), आणि सर जॉन के यांचा ए हिस्टरी ऑफ द सिपॉय वॉर इन इंडिया, तीन खंड (१८६४-७६) यांचा अंतर्भाव होतो.

जॉन डाउसनने संपादित केलेला सर हेन्‍री एलियटचा आठ खंडांतील इतिहासग्रंथ (१८६९-७७) वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिस्टरी ऑफ इंडिया अ‍ॅज टोल्ड वाय इट्स ओन हिस्टोरिअन्स हे त्याचे नाव होय. त्यात मुस्लिम इतिहासकारांनी लिहून ठेवलेल्या तवारीखांचा अनुवाद केलेला आहे. एकोणिसाव्या शतकातील अन्य इतिहासकारांत सर अ‍ॅल्फ्रेड लायल, जॉग ब्रिग्झ, जेम्स व्हीलर, जॉन मार्शमन, एडवर्ड थॉर्नटन, एल्‌. जे. ट्रॉटर, मार्टिन माँटगोमेरी, एच. टी प्रिन्सेप, सॅम्युएल स्मिथ, जॉन मॅक्‌क्रिंडल, चार्ल्स विल्सन, हेन्‍री कीन, सर विल्यम मुर, विल्क्स व हेन्‍री बस्टीड इत्यादींचा समावेश होतो. सर विल्यम हंटर यांची रूलर्स ऑफ इंडिया-सीरीज (१८९२-१९०१) उल्लेखनीय आहे. व्हिन्सेंट स्मिथ व जॉन डाउसन यांचे इतिहासग्रंथ काहीसे एकांगी व पक्षपाती दृष्टीने लिहिलेले आहेत, असे काही अभ्यासक मानतात.

भारतविद्या : इतिहासाप्रमाणेच भारतविद्या (इंडॉलाजी) अँग्लो-इंडियन साहित्याची महत्त्वाची शाखा आहे. या शाखेतील सुरुवातीचे अनुवादित व स्वतंत्र लेखन पाँडिचेरीच्या फ्रेंच धर्मप्रचारकांनी केल्याचे आढळून येते. वॉरन हेस्टिंग्जने भारतविद्येसंबंधी भाषांतरात्मक लेखनास उत्तेजन दिले. सर चार्ल्स विल्किन्झने १७८५ मध्ये भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केला. कालिदासाच्या शाकुंतलाचा इंग्रजी अनुवाद (१७८९) करणार्‍या ⇨ सर विल्यम जोन्सने (१७४६-१७९४) मनुस्मृतीचे भाषांतर (१७९४) केले. भारतीय देवतांना उद्देशून काही स्तोत्ररचनाही त्याने केली आहे. जोन्सनंतर  हेन्‍री टॉमस कोलबुक (१७६५-१८३७) या अभ्यासकाने आपल्या एशियाटिक रिसर्चेस या ग्रंथात हिंदू कायदा, तत्त्वज्ञान व धर्म यासंबंधीचे आपले संशोधन प्रसिद्ध केले. १८०५ मध्ये वेदवाङ्‌मयावरील त्याचा प्रबंध प्रकाशित झाला. या संदर्भात पूरक माहिती म्हणून मॅक्स न्यूलरच्या (१८२३-१९००) ऋग्वेदाच्या सायणभाष्यासह संपादित केलेल्या आवृत्तीचा (१८७३), सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या ५१ खंडात संपादित केलेल्या ग्रंथमालेचा आणि हिस्टरी ऑफ एन्शंट संस्कृत लिटरेचर (१८५९) व इंडिया, व्हॉट कॅन इट टीच अस ? (१८८३) या ग्रंथांचा निर्देश करता येईल. अ‍ॅनी बेझंट (१८४७-१९३३) यांचे काही ग्रंथ उल्लेखनीय आहेत. त्यांत कर्म (१८९५), एन्शंट विज्डम (१८९७) व द विज्डम ऑफ द उपनिषद्स (१९०७) यांचा अंतर्भाव होतो. भगिनी निवेदिता (१८६७-१९११) या विवेकानंदांच्या शिष्येचे काली द मदर (१९००) हे पुस्तकही उल्लेखनीय आहे. सर जॉन वुड्रॉफ (आर्थर अ‍ॅव्हालॉन) यांची तंत्रमार्गावरील सु. वीस पुस्तके प्रसिद्ध असून, त्यांत द ग्रेट लिबरेशन, द गार्लंड ऑफ लेटर्स, द सर्पंट पॉवर, प्रिन्सिपल्स ऑफ तंत्र व शक्ति अँड शाक्त वगैरेंचा अंतर्भाव होतो.

काव्य : एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच अँग्‍लो-इंडियन ललित साहित्याच्या निर्मितीस आरंभ झाला. जॉन लेडन हा कवी १८०३ ते १८११ या काळात भारतात होता. त्याच्या काव्यात इंग्रजांच्या लष्करी सामर्थ्याचा अभिमान व मातृभूमीच्या भेटीची तळमळ व्यक्त झालेली आहे. ओड टू अ‍ॅन इंडियन गोल्ड कॉइन ही त्याची कविता प्रसिद्ध आहे. हेन्‍री डेरोझिओ (१८०९–१८३१) हा भारतीय अँग्‍लो-इंडियन समाजातील प्रसिद्ध कवी होय. त्याची द फकीर ऑफ जंजिरा ही दीर्घ कथात्मक कविता वर्णनसौंदर्याने नटलेली आहे. हेन्‍री पार्कर या कवीचे द ड्राफ्ट ऑफ इम्मॉर्‌टॅलिटी हे कथाकाव्य उल्लेखनीय आहे. १८५७ नंतरच्या अँग्‍लो-इंडियन कवींत विल्यम वॉटरफील्ड, मेरी लेस्ली, हेन्‍री जॉर्ज कीन व चार्ल्स केली यांचा समावेश होतो. या कवींच्या कवितांत भारतीय पुराणकथा, निसर्ग व इतिहास यांसंबंधीचा भावनाविष्कार आढळतो. सर एडविन आर्नल्ड (१८३२-१९०४) यांच्या द लाइट ऑफ एशिया (१८७९) या सुप्रसिद्ध काव्याने पाश्चात्त्य जगाला गौतम बुद्धाचा पहिला परिचय करून दिला. भगवद्गीता व जयदेवकृत गीतगोविंद यांची रूपांतरेही त्यांनी प्रसिद्ध केली. सर अ‍ॅल्फ्रेड लायल यांचा व्हर्सेस रिटन इन इंडिया हा काव्यसंग्रह उल्लेखनीय आहे. त्यातील द लँड ऑफ रिग्रेट्स ही कविता विशेष प्रसिद्ध आहे. विनोदी काव्यरचना वॉल्टर येल्डॅमच्या लेज ऑफ इंद व टॉमस बिग्नोल्डच्या लेव्हायोरा या संग्रहांत आढळते. ⇨रड्‌यर्ड किपलिंगच्या (१८६५-१९३६) डिपार्टमेंटल डिटीज (१८८६) या संग्रहातील कवितांत ब्रिटिश सनदी अधिकार्‍यांचे विडंबन केले आहे. बरॅक रूम बॅलड्‌स(१८९२) या त्याच्या दुसर्‍या काव्यसंग्रहातील द बॅलड ऑफ ईस्ट अँड वेस्ट ही कविता टीकाविषय झालेली आहे.

कथासाहित्य : अँग्‍लो-इंडियन कथासाहित्याचा आरंभही अठराव्या शतकाच्या अखेरीस झालेला दिसतो. मेरी शरवुड या लेखिकेने बालवाचकांसाठी लिट्ल हेन्‍री अँड हिज बेअरर हे पुस्तक प्रसिद्ध केले. विल्यम हॉक्‌लीच्या पांडुरंग हरी ऑर मेम्वार्स ऑफ ए हिंदू (१८२६) या नावाच्या कादंबरीत एका महाराष्ट्रीय व्यक्तीचे चित्रण केले आहे. अरेबियन नाइट्सची आठवण करून देणार्‍या ऐतिहासिक कथाही (टेल्स ऑफ द जनाना ऑर ए नवाब्ज लेझर आवर्स) या लेखकाने लिहिल्या. या काळातील विशेष प्रसिद्ध कांदबरीकार फिलिप मेडोज टेलर (१८०८-१८७६) हा होय. भारताविषयी विशेष आस्थेने त्याने कादंबरीलेखन केले. द कन्फेशन्स ऑफ ए ठग, तारा—ए मराठा टेल, राल्फ डार्नेल व सीता ह्यांसारख्या त्याच्या कादंबर्‍या आजही वाचनीय आहेत. प्रसिद्ध इंग्रजी कवी मॅथ्यू आर्नल्ड याचा भाऊ विल्यम आर्नल्ड याने आपल्या प्रसिद्ध कादंबरीत (ओकफील्ड ऑर फेलोशिप इन द ईस्ट) भारतातील इंग्रज लोकांच्या मनोवृत्तीवर टीका केलेली आहे. जॉन लाँग या कादंबरीकारानेही आपल्या कादंबर्‍यांतून भारतवासी इंग्रजांचे उपहासगर्भ दर्शन घडविले आहे. अलेक्झांडर अ‍ॅलर्डाइसची द सिटी ऑफ सन्‌शाइन, सर जार्ज चिसनी याची द बॅटल ऑफ डॉर्किंग व जेसी कॅड्‌लची इडा क्रॅव्हेन या कादंबर्‍या उल्लेखनीय आहेत. अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्ययुद्धावर सर जॉर्ज चिसनी याने द डायलेमा नावाची कांदबरी लिहिली आहे. राजकीय दृष्टीने जागृत झालेल्या क्रांतिकारक भारतीय समाजाचे चित्रण एडमंड कँडलरच्या श्रीराम रेव्होल्यूशनिस्ट व डेनिस किंकेडच्या देअर वेज डिव्हाइड या कादंबर्‍यांत केलेले आढळते. पाश्चात्त्य व पौर्वात्य संस्कृतींमधील संघर्षाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्‍न काही अँग्‍लो-इंडियन लेखकांनी केला. एडवर्ड टॉमसनची नाइट डान्स ऑन शिवाज टेंपल ही या प्रकारची कांदबरी आहे.

भारतीय पार्श्वभूमीवरील स्वतंत्र कथा रड्‌यर्ड किपलिंगने लिहिल्या. प्‍लेन टेल्स फ्रॉम द हिल्स (१८८७) व द जंगल बुक या मुलांच्या आवडत्या दीर्घकथेचे दोन खंड (१८९४-९५) ही त्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत. भारतीय प्रदेश व व्यक्ती यांची अनेक प्रकारची वर्णने त्याच्या किम (१९०१) या कादंबरीत आढळतात. यांखेरीज अनेक लेखकांनी भारतीय कथांची रूपांतरे केल्याचे आढळून येते. पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे एकेकाळचे प्राचार्य एफ्. डब्ल्यू. बेन यांच्या डिजिट ऑफ द मून अँड अदर हिंदू स्टोरीज या संग्रहातील कथा कथासरित्सागराच्या आधारे रचलेल्या आहेत. भगिनी निवेदिता यांचा क्रेडल टेल्स ऑफ हिंदुइझम (१९०७) हा कथासंग्रहही उल्लेखनीय आहे. चार्ल्स किंकेड यांनी अनेक कथासंग्रह प्रकाशित केले. त्यांत डेक्कन नर्सरी टेल्स, टेल्स फ्रॉम इंडियन एपिक्स व टेल्स ऑफ द सेंटस ऑफ पंढरपूर या संग्रहांचा समावेश होतो.

संकीर्ण गद्य : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात संकीर्ण स्वरूपाचे अँग्‍लो-इंडियन गद्यलेखन निर्माण होऊ लागले. जेम्स हिकीने हिकीज बेंगॉल गॅझेट नावाचे इंग्रजी वृत्तपत्र १७८० मध्ये कलकत्ता येथे सुरू केले. त्यातील लेखन मात्र हीन दर्जाचे होते. या सुमाराची एलिझा फे हिची प्रवासवर्णनपर पत्रे (ओरिजिनल लेटर्स फ्रॉम कलकत्ता), जेम्स फॉर्ब्‌झ याच्या आठवणी (ओरिएंटल मेम्वार्स) व ह्यू बॉइड यांचे वाङ्‌मयीन व नीतिविषयक निबंध उल्लेखनीय आहेत. चित्रमय शैली, मार्मिक निरीक्षण व निःपक्षपातीपणा या गुणांनी संपन्न असलेली सर विल्यम हंटरची दोन ललित पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे द थॅकरीज इन इंडिया व द ओल्ड मिशनरी अशी आहेत. मेजर डेव्हिड रिचर्ड्‌सन याचे टीकात्मक लेखन लिटररी लीव्ह्‌ज व लिटररी चिट्‌चॅट वगैरे पुस्तकांत संगृहीत केले आहे. हेन्‍री बस्टीड याचे एकोज फ्रॉम ओल्ड कलकत्ता (१९०८) हे आठवणीवजा पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. विनोदी लेखनात इल्टडस प्रिचर्डचे द क्रॉनिकल ऑफ बजपूर व जॉर्ज अ‍ॅबेराय-मॅकेचे ट्‌वेंटीवन डेज इन इंडिया बिइंग द टूर ऑफ सर अलिबाबा ही पुस्तके विशेष गाजली. प्रिचर्डच्या पुस्तकात पौर्वात्य संस्कृतीवरील पाश्चात्त्य संस्कृतीचे कलम कसे विपरीत ठरते, याचे उपहासपूर्ण वर्णन आहे. अ‍ॅबेराय-मॅकेच्या पुस्तकात ब्रिटिश नोकरशाहीचे विडंबन आहे. सॅम्युएल फुट याचे द नबाब नावाचे नाटक अफाट पैसा मिळविलेल्या ब्रिटिश सनदी अधिकार्‍यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे आहे. भारतीय पशुपक्षी, फुलेफळे व ग्रामीण परिसर यांची वर्णने फिलिप रॉबिन्सन (इन माय इंडियन गार्डन), एडवर्ड एटकेन (बिहाइंड द बंगलो) व लॉकवुड किपलिंग (बीस्ट अँड मॅन इन इंडिया) वगैरेंनी केली आहेत. टॉमस डॅन्येल व त्याचा पुतण्या विल्यम डॅन्येल यांनी १७८६ ते ९४ या काळात भारतात प्रवास केला. त्यांचे ओरिएंटल सीनरी हे पुस्तक उल्लेखनीय आहे. कलाविषयक अन्य लेखनात जेम्स फर्ग्युसनच्या मोनोग्राफ ऑन रॉक-कट टेंपल्स ऑफ इंडिया (१८४५) या पुस्तिकेचा अंतर्भाव होतो. हीच पुस्तिका पुढे १८७६ मध्ये विस्तृत ग्रंथरूपाने हिस्टरी ऑफ इंडियन अँड ईस्टर्न आर्किटेक्चर प्रसिद्ध झाली. कोशसाहित्यात यूलच्या हॉब्सन जॉब्सन (१९०३) या शब्दकोशाचा निर्देश केला पाहिजे. त्यात बंगलो, चिट्, डॅम यांसारख्या नवीन अँग्‍लो-इंडियन शब्दांचा संग्रह केलेला आहे. डेनिस किंकेड याची मरणोत्तर प्रकाशित झालेली दोन पुस्तके ऐतिहासिक व सामाजिक दृष्टींनी महत्त्वाची आहेत. ब्रिटिश सोशल लाइफ इन इंडिया व द फायनल इमेज ही ती पुस्तके होत. यांशिवाय भारतीय अर्थव्यवस्था, समाजरचना, भाषा, शिक्षण, वैद्यकादी विज्ञाने आणि खेळ यांसारख्या कितीतरी विषयांवर ब्रिटिश लेखकांनी ग्रंथरूप लेखन केलेले आढळते. अशा लेखनाची सूची भारतातील ब्रिटिश कौन्सिलने ब्रिटिश बुक्स ऑन इंडिया (१९६१) या पुस्तकात दिलेली आहे.

विसाव्या शतकात अनेक प्रकारच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कारणांनी अँग्‍लो-इंडियन साहित्यामागील मूळची प्रेरणा नष्ट होत गेली. भारतासंबंधी किंवा भारतीय पार्श्वभूमीवर इंग्रजी लेखन आजही केले जात आहे. भारतात कधीही न आलेल्या जॉन ड्रायडन व लॉर्ड अ‍ॅल्फ्रेड टेनिसन यांसारख्या इंग्रजी साहित्यिकांनीही असे लेखन केले आहे. ए. ई. (जॉर्ज विल्यम रसेल) व डब्ल्यू. बी. येट्स यांच्या काही कविता भारतीय विषयांवर आहेत. ई. एम्. फॉर्स्टरची ए पॅसेज टू इंडिया (१९२४) व समरसेट मॉमची द रेझर्स एज (१९४४) या कादंबर्‍यांत भारतीय पार्श्वभूमी आहे; परंतु वरील सर्व लेखक-कवी अँग्‍लो-इंडियन नव्हेत, हे उघडच आहे. अँग्‍लो-इंडियन लेखकांचा भारताशी असणारा संबंध काहीसा अपरिहार्य होता. तो संबंध अधिक जवळचा व जिव्हाळ्याचा होता. केवळ नावीन्य म्हणून भारतीय विषय त्यांनी निवडले नाहीत. या प्रकारचा संबंध १९४७ नंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर नष्ट झाला. म्हणून अँग्‍लो-इंडियन साहित्याला केवळ ऐतिहासिक महत्त्व आहे

संदर्भ : 1. Anthony, Frank, Britain's Betrayal in India, Delhi, 1969.

2. Majumdar, R. C., Ed. The History and Culture of the Indian People, Vol. IX, Part I, Bombay, 1963.

3. O'Malley, L. S. S. Ed. Modern India and the West, London, 1968.

4. Saksena, Babu Ram, European and Indo-European Poets of Urdu and Persian, Lucknow, 1941.

5.Ward, A. W.; Waller, A. R. Cambridge History of English Literature-Vol. XIV, Part III, Cambridge, 1961.

लेखक: रा. ग. जाधव

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate