অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अथर्ववेद

अथर्ववेद

चार वेदांपैकी एक. या वेदात विविध प्रकारचे अभिचारमंत्र (जारणमारणमंत्र) आणि इतर जादूचे मंत्र मोठ्या प्रमाणावर संगृहीत केले आहेत. ह्यातील बहुसंख्य ऋचांचा साक्षात्कार अथर्वन् नामक ऋषीला झाल्यामुळे ह्या वेदास अथर्ववेद हे नाव प्राप्त झाले, असे म्हटले जाते. अथर्वन् हे एका वैदिक आचार्याचे नाव असले, तरी त्याच्या वंशात उत्पन्न झालेला ऋषिसमुदायही त्याच नावाने ओळखला जातो. अथर्वन् ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ, ‘अग्नी आणि सोम यांना पूजणारा’ असा आहे. प्राचीन काळी अग्निहोत्री पुरोहित अथर्वन् या नावाने ओळखला जाई. अवेस्ता या पारश्यांच्या धर्मग्रंथातील ‘अथ्रवन’ या शब्दाचा अर्थ अग्निपूजक असाच आहे. हे अग्निपूजक ऋषी यातुविद्येतही प्रवीण होते. अशा ऋषींची मंत्ररचना अथर्ववेदात आहे.अर्थर्वांगिरसवेद, भृग्वंगिरसवेद, ब्रह्मवेद, क्षत्रवेद, भैषज्यवेद अशा विविध नावांनीही हा वेद ओळखला जातो.अर्थर्वांगिरसवेद हे या वेदाचे सर्वप्राचीन नाव होय. त्यात अथर्वन् आणि अंगिरस् अशी दोन नावे आली आहेत. ही नावे अथर्ववेदातील जादूच्या मंत्रांचे दोन वेगवेगळे प्रकारही सूचित करतात, असे विंटरनिट्‌ससारख्या विद्वानांचे मत आहे. अथर्वन् म्हणजे मनुष्यजातीस उपकारक ठरणाऱ्या पवित्र जादूचे मंत्र. उदा.,अथर्ववेदातील विविध रोगनिवारक मंत्र. अंगिरस् म्हणजे शत्रुत्वापोटी एखाद्याला त्रास देण्यासाठी उपयोगी पडणारे अभिचारमंत्र अथवा काळी जादू. अथर्वन् आणि अंगिरस् हे मुळात दोन वेद असून कालौघात ते एक झाले असावेत, असा तर्कही काही अभ्यासक करतात. भृग्वंगिरसवेद या नावाचे समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही. तथापि मॉरिस ब्लूमफील्ड यांच्या मते अथर्वन्, अंगिरस् आणि भृगु ही तिन्ही नावे अग्निपूजा किंवा अग्न्योत्पादनाच्या संदर्भात एकमेकांशी निगडीत झालेली आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, बाह्मणे इत्यादींत या नावांचा काही वेळा एकत्रच उल्लेख होतो. त्यांतही भृगु आणि अंगिरस् ही नावे अधिक प्रमाणावर एकत्र आलेली दिसतात. भृगु आणि अंगिरस् या दोन नावांचा विशेष निकटपणा लक्षात घेऊनच भृग्वंगिरसवेद हे नवे नाव अथर्ववेदीयांनी अथर्ववेदास दिले असावे. ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान करून देऊन मोक्षाप्रत नेणारा वेद, म्हणून हाब्रह्मवेद होय. असे अथर्ववेदाचे अभिमानी आणि अनुयायी मानतात. या वेदाला ब्रह्मवेद का म्हणावे, याचे आणखी एक स्पष्टीकरण देण्यात येते. होता, अध्वर्यू, आणि उद्गाता या तीन ऋत्विजांसाठी अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या वेदांतील मंत्र होते. ब्रह्मा या चौथ्या ऋत्विजासाठी मात्र स्वतंत्र असे मंत्र नव्हते.अथर्ववेदाने ते उपलब्ध करून दिले आणि तो बह्मवेद, म्हणजे ब्रह्‌म्याचा वेद ठरला. क्षत्रियाला आत्मरक्षण आणि राज्यरक्षण करता यावे यासाठी वापरावयाचे मंत्रही या वेदात असल्यामुळे त्यास क्षत्रवेद असेही म्हणतात. राजपुरोहित हा अथर्ववेदज्ञ असावा, असे राजधर्मविषयक धर्मशास्त्रात म्हटले आहे ते का, याचे उत्तर यामुळे मिळते. भैषज्यवेद म्हणजे रोगांवर उपचार सांगणारा वेद.

अथर्ववेदाच्या नऊ शाखा उल्लेखिल्या जातात. त्या अशा : (१) पैप्पलाद, (२) तौद किंवा तौदायन, (३) मौद किंवा मौदायन, (४) शौनक, (५) जाजल, (६) जलद, (७) ब्रह्मवद, (८) देवदर्श, (९) चारणवैद्य. या शाखांपैकी पैप्पलाद आणि शौनक या दोन शाखांच्या संहिताच आज उपलब्ध आहेत. पैप्पलाद हे नाव पिप्पलाद नामक ऋषीच्या नावावरून आले आहे. पैप्पलाद शाखेचा प्रवर्तक हाच असावा. पैप्पलाद शाखेच्याअथर्ववेदसंहितेत एकूण वीस कांडे आहेत. ‘शं नो देवी:...’ या मंत्राने या संहितेचा प्रारंभ होतो. ब्लूमफील्ड आणि आर्. गार्बे यांनी या संहितेच्या हस्तलिखिताचे संपादन केले आहे (१९०१). सत्तर वर्षांपूर्वी पैप्पलाद संहितेची एक प्रत काश्मीरमध्ये उपलब्ध झाली. तीत फार अशुद्धे आहेत. उत्कलात (ओरिसात) पैप्पलाद शाखेचे ब्राह्मण आहेत. त्यांच्यापाशी असलेल्या अथर्ववेदसंहितेच्या पोथ्या गोळा करून कलकत्ता येथील प्राध्यापक कै. दुर्गामोहन भट्टाचार्य यांनी ती शुद्ध स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते निवर्तल्यामुळे तो अपूर्णच राहिला. डॉ. रघुवीर यांनी पैप्पलाद शाखेची आवृत्ती तीन खंडांत काढली आहे (१९३६). ही आवृत्तीही आज दुर्मिळ आहे. शौनकसंहितेचे संपादन रोट आणि व्हिटनी या दोन पाश्चिमात्य विद्वानांनी केले आहे (१८५५-५६). कै. पंडित श्री. दा. सातवळेकर यांनीही शौनकसंहिता प्रसिद्ध केली आहे (१९३८). कै. शंकर पांडुरंग पंडित  यांनी  शौनकसंहिता सायणभाष्यासह चार खंडांत प्रसिद्ध केली आहे (१८९५-९८). तसेच अगदी अलीकडच्या काळात श्री विश्वबंधू ह्यांनी अथर्ववेदाची शौनकसंहितासायणभाष्यासह एकूण चार खंडांत संपादिली आहे (१९६०-६४). प्रस्तुत लेखात शौनकसंहिताच विचारात घेतली आहे.

गोपथ ब्राह्मण हे अथर्ववेदाचे एकमेव ब्राह्मण होय. कौशिकसूत्र आणि वैतानसूत्र ही अथर्ववेदाची सूत्रे होत.नक्षत्रकल्प, शांतिकल्प आणि अंगिरसकल्प ही त्याची कल्पे आहेत. हॅटफील्ड यांच्या मताप्रमाणे अथर्ववेदाची एकूण ७२ परिशिष्टे आहेत. अथर्ववेदाची म्हणून परंपरेने मानली जाणारी उपनिषदे अनेक आहेत. तथापिअथर्ववेदाच्या चरणव्यूहनामक ४९ व्या परिशिष्टात एकूण २७ उपनिषदांची यादी दिली असून ती अधिकृत मानवयास हरकत नाही, असे ब्लूमफील्डसारख्या विद्वानांचे मत आहे. ही उपनिषदे पुढीलप्रमाणे आहेत: (१) मुंडक, (२) प्रश्न, (३) ब्रह्मविद्या, (४) क्षुरिका, (५) चुलिका, (६) अथर्वशिरस्, (७) अथर्वशिखा, (८) गर्भ, (९) महा, (१०) ब्रह्म, (११) प्राणाग्निहोत्र, (१२) माण्डूक्य, (१३) नादबिंदू, (१४) ब्रह्मबिंदू, (१५) अमृतबिंदू, (१६) ध्यानबिंदू, (१७) तेजोबिंदु, (१८) योगशिखा, (१९) योगत्त्व, (२०) नीलरुद्र, (२१) पञ्चतापिनी किंवा पञ्चतापनीय, (२२) एकदण्डिसंन्यास, (२३) अरुणि, (२४) हंस, (२५) परमहंस, (२६) नारायण आणि (२७) वैतथ्य. या वेदाचे प्रातिशाख्य सूर्यकांतशास्त्री यांनी प्रसिद्ध केले आहे (१९६८).

शौनकसंहितेत पैप्पलादसंहितेप्रमाणेच एकूण वीस कांडे आहेत. या संहितेत मुळात अठराच कांडे असावीत आणि १९ वे व २० वे कांड त्यांस नंतर जोडले गेले असावे, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. या संहितेत ७३१ सूक्ते असून सु. ६,००० ऋचा आहेत. विसाव्या कांडातील बहुतेक सूक्ते ऋग्वेदातून घेतलेली आहेत. यांशिवाय सु. एक सप्तमांश ऋचा अथर्ववेदसंहितेने ऋग्वेदातूनच घेतल्या आहेत. ऋग्वेद आणिअथर्ववेद यांना समान असलेल्या ऋचांपैकी अध्याहून अधिक ऋचा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आढळतात आणि उरलेल्या ऋचांपैकी बहुतेक ऋचा ऋग्वेदाच्या पहिल्या व आठव्या मंडलांत आढळतात. अथर्ववेदाच्या पहिल्या अठरा कांडांचा रचनेत काहीसा पद्धतशीरपणा दिसून येतो. पहिल्या सात कांडांतील सूक्तांपैकी बरीचशी सूक्ते लहान आहेत. प्रत्येक सूक्तात किती ऋचा याव्यात, यासंबंधानेही काही पद्धत अवलंबिलेली दिसते. एक ते पाच या कांडातील बरीचशी सूक्ते अनुक्रमे चार, पाच, सहा, सात आणि आठ ऋचांची आहेत. हा क्रम चढता आहे. सहाव्या कांडातील बहुसंख्य सूक्ते तीन ऋचांची असून सातव्यातील एक ते दोन ऋचांची आहेत. हा क्रम उतरता आहे. पंधराव्या व सोळाव्या कांडांचा अपवाद वगळता, आठ ते अठरा ह्या कांडांतील सूक्ते प्राय: दीर्घ आहेत. त्यांतील ऋचांची संख्या एकवीस ते एकूणनव्वदपर्यंत गेलेली आढळते. ह्या कांडांतील सर्वांत लहान असलेल्या एकवीस मोठ्या ऋचांच्या सूक्ताने आठव्या कांडाचा आरंभ होतो, तर त्यांतील सर्वांत मोठ्या असलेल्या एकूणनव्वद ऋचांच्या सूक्ताने अठराव्या कांडाची अखेर होते. आणखी एक लक्षणीय गोष्ट अशी, की आठ ते अठरा या कांडांतील सर्वांत लहान सूक्त पहिल्या सात कांडांतील कोणत्याही सूक्ताहून मोठेच आहे. पहिल्या सात कांडांतील सर्वांत मोठे सूक्त पाचव्या कांडांतील सतरावे असून त्यात एकूण अठरा ऋचा आहेत.अथर्ववेदाचे पंधरावे कांड पूर्णतः गद्यमय असून सोळाव्या कांडाचा बराचसा भाग गद्य आहे. इतर कांडांमधूनही अधूनमधून काही गद्य भाग आलेला आढळतो. ही गद्यशैली ब्राह्मणग्रंथांच्या गद्यशैलीशी मिळतीजुळती आहे. या वेदात मुख्यतः वैदिक छंदच वापरण्यात आले आहेत. उदा., गायत्री, अनुष्टुभ, पंक्ती, जगती इत्यादि. तथापि ऋग्वेदातील छंदांप्रमाणे ते विशेष काटेकोरपणे हाताळले गेलेले दिसत नाहीत. अथर्ववेदाची भाषा सर्वसाधारणतः ऋग्वेदसारखीच असली, तरी काही ठिकाणी भाषेचे रूप ऋग्वेदा कालानंतरचे वाटते. लोकभाषेतील शब्दांचा वापरही ऋग्वेदापेक्षा अधिक दिसतो. अथर्ववेदाचा काळ काटेकोरपणे सांगणे अवघड आहे. तथापि तो ऋग्वेदकालानंतरचा आहे, ह्याची प्रमाणेअथर्ववेदात आलेल्या विविध विषयांच्या वर्णनांवरून मिळतात. आर्य गंगेच्या प्रदेशात स्थायिक झालेले दिसतात. भारताच्या पूर्व आणि आग्नेय दिशेकडे ते बरेच सरकलेले दिसतात. यमुना आणि वारणावती या नद्यांचे उल्लेख येतात. बंगालमधील दलदलीच्या प्रदेशात वावरणारा वाघ अथर्ववेदात प्रथमच दिसतो. आर्य आणि दस्यू यांच्यामधील भेदभाव तीव्रतर झाल्याचे आढळते. ब्राह्मणांचे महत्त्व वाढल्याचा प्रत्यय येतो. चातुर्वर्ण्य स्थिरावलेले दिसते. ऋग्वेदातील अग्नी, इंद्र इ. देवता येथेही दिसतात; परंतु राक्षसांचा नाश करणे एवढेच त्यांचे मुख्य कार्य झालेले दिसते. अथर्ववेदातील तत्त्वज्ञानपरिभाषाही बरीच विकसित झालेली आहे. मात्र अथर्ववेदातील सर्वच सूक्तेऋग्वेदसंहितेनंतरची नाहीत. अथर्ववेदातील काही भाग ऋग्वेदाइतकाच जुना आहे.

अथर्ववेदातील विविध विषय सर्वसाधारणपणे दहा वर्गात विभागले जातात. हे वर्ग पुढीलप्रमाणे: (१) भैषज्यकर्मे, (२) आयुष्यकर्मे, (३) अभिचारकर्मे किंवा कृत्याप्रतिहरणकर्मे, (४) स्त्रीकर्मे, (५) सांमनस्यकर्मे, (६) राजकर्मे, (७) ब्राह्मणमाहात्म्य, (८) पौष्टिककर्मे, (९) शांतिकर्मे आणि (१०) विश्वोत्पती व अध्यात्म.

भैषज्यकर्मे : विविध रोगांच्या निर्मूलनासाठी वापरावयाचे मंत्र यात आहेत. ज्वर, अतिसार, मूत्ररोध, नेत्ररोग, वातपित्तकफादी दोष, हृद्रोग, कावीळ, कोड, यक्ष्मा, जलोदर इ. रोगांसाठी रचिलेल्या या मंत्रांत भारतीय आयुर्वेदाची प्रारंभीची अवस्था दिसते. बऱ्याचशा रोगांची निदाने अथर्ववेदात आणि आयुर्वेदात जवळजवळ सारखीच दिलेली आढळतात. जेष्ठीमध, दूर्वा, अपामार्ग (आघाडा), पिंपळी, रोहिणी इ. रोगनाशक आणि आरोग्यकारक वनस्पतींचे उल्लेख अथर्ववेदात येतात. रोगनाशक वनस्पतींची स्तुती काही मंत्रांत आहे. काही मंत्रांतून दिसणारी रोगनाशक उपाययोजना प्रतीकात्मक आहे. उदा., कावीळ बरी होण्याच्या दृष्टीने रोग्याच्या कायेवर आलेला पिवळा रंग पीतवर्णी सूर्यामध्ये मिसळून जावा, अशी कल्पना एका मंत्रात दिसते (१·२२). रोग हटविण्यासाठी ताइतांचा वापरही सुचविला आहे. अस्थिभंगावर आणि जखमांवर काही मंत्र आहेत (४·१२; ५·५). त्यात अरुंधती, लाक्षा (लाख) आणि सिलाची यांचा उल्लेख येतो. जंतू, राक्षस, गंधर्व, अप्सरा ही रोगांची कारणे म्हणून दाखविली जातात. जंतूंना मारून टाकण्यासाठी इंद्रासारख्या देवतेला आवाहन केले जाते (५·२३). राक्षसांना पळवून लावण्यासाठी अग्नीची प्रर्थना केली जाते. कधीकधी ज्वर हा कोणी राक्षस आहे अशी कल्पना करून त्याला उद्देशून मंत्र रचिले आहेत (५·२२). गंधर्व आणि अप्सरा यांचे निवारण करण्यासाठी अजशृंगी नावाची वनस्पती उल्लेखिली आहे. केशवर्धनासाठी अत्यंत चित्रमय भाषेत तीन मंत्र रचिले आहेत (६·२१, १३६, १३७). भैषज्यसूक्तांतील मंत्रांत आलेल्या अनेक कल्पना प्राचीन जर्मन काव्यातील मेर्सेबर्गमंत्र, तार्तरशामान यांचे मंत्र आणि अमेरिकन इंडियन लोकांतील वैदूंचे मंत्र यांत आलेल्या कल्पनांशी मिळत्या-जुळत्या आहेत.

आयुष्यकर्मे : आयुर्वर्धनाचा प्रश्न विविध व्याधींच्या प्रतिकाराशी निगडित असल्यामुळे हे मंत्र भैषज्यसूक्तांपासून काटेकोरपणे वेगळे करता येत नाहीत. उदा., एकोणिसाव्या कांडातील ४४ वे सूक्त आयुर्वर्धनासाठी असले, तरी त्यात काही रोगांची यादी आलेली असून त्यांपासून मुक्तता व्हावी म्हणून आंजन या विशिष्ट औषधीला आवाहन केले आहे. हे आयुष्यमंत्र उपनयन, गोदान इ. गृह्यसंस्कारांच्या वेळी म्हटले जातात. मृत्यूच्या १०० किंवा १०१ प्रकारांपासून संरक्षण मिळण्यासाठी केलेल्या प्रार्थना येथे आढळतात (२·२८·१; ८·२·२७). या सर्व मंत्रांत अग्नीचे महत्त्व प्रकर्षाने आढळते. अग्नी जिवंतपणाचे प्रतीक आहेच. जीवनसंरक्षक ताइतांनाही येथे स्थान आहे. सोन्याचा ताईत, मेखला, शंखमणी यांचे उल्लेख आहेत.

अभिचार किंवा कृत्याप्रतिहरणकर्मे : शत्रू, राक्षस आणि कृत्या (चेटूक) यांचा प्रतिबंध करण्यासाठी हे मंत्र आहेत. अभिचार आणि यातुविद्या या मंत्रांतून दिसते. या मंत्रांच्या भाषेतूनही निष्टुरपणा व्यक्त होतो. या मंत्रांना ‘अंगिरस्’ असे म्हटले जाते. या मंत्रांतील काहींचा संबंध इतर वर्गांतील विषयांशीही पोहोचतो. उदा., राक्षसांविरूद्ध असलेले मंत्र. भैषज्यसूक्तांतही राक्षसांविरूद्ध मंत्रयोजना आहेच. ‘यातुधान’ (राक्षस), ‘किमीदिन्’ (दुष्ट पिशाचांचा एक प्रकार) यांच्याविरुद्ध अग्नी आणि इंद्र यांना आवाहन केले आहे (१·७). राक्षसांविरुद्ध शिशाचा उपयोग सांगितला आहे (१·१६·४). येथेही ताइतांचा उपयोग सांगितला आहेच. उदा., अश्वत्थ आणि खदिर यांसारख्या वृक्षांच्या लाकडापासून तयार केलेले ताईत (३·६; १०·६). वज्र नावाच्या आयुधाचाही वापर दिसतो (६·१३४). दोन मंत्र थोडे दुर्बोध आहेत (७·९५, ७·९६). शत्रूला मूत्रावरोधाची व्याधी व्हावी या दृष्टीने त्याच्या मूत्राशयावर परिणाम घडवून आणणारे हे मंत्र दिसतात. यांपैकी दुसरा मंत्र मात्र मुळात एक वैद्यकीय उपाय म्हणून असावा. या विभागात येणारे वरूणसूक्त (४·१६) मात्र उत्कृष्ट काव्याचा नमुना आहे. त्यात वरुणाचे सर्वसाक्षित्व दाखविले आहे आणि असत्यवाद्यांना शासन कर अशी त्यास प्रार्थना केली आहे. पवित्र कर्मांत अडथळे आणणाऱ्या शत्रूविरुद्ध केलेली मंत्ररचनाही आहे (२·१२). तसेच शत्रूच्या यज्ञात अर्पण केलेल्या आहुतीचा नाश करण्यासाठी मृत्यू आणि निऋती यांस आवाहन आहे. चेटूक करणाऱ्यांचा प्रतिकार करण्यासाठीही मंत्र आहेत. उदा., ५·१४, ५·३१. ‘चेटक्यांचा नाश होवो. चेटक्याचे चेटूक त्याचे त्यालाच बाधो’ असे आवाहन या प्रकारच्या मंत्रांतून अनेक वेळा केलेले आढळते.

स्त्रीकर्मे : या वर्गातील मंत्र मुख्यतः स्त्रीजीवनाशी निगडित झालेले आहेत. स्त्रीचे विवाहपूर्व आणि विवाहोत्तर जीवन हा त्यांचा एक महत्वाचा विषय आहे. कुमारिकेस वरप्राप्ती, नवदांपत्यासाठी आशीर्वचने, गर्भसंभव, गर्भवती स्त्रीचे व तिच्या गर्भाचे संरक्षण, पुत्रप्राप्ती, नवजात बालकाचे संरक्षण इत्यादींसाठी रचलेले मंत्र लक्षणीय आहेत. अथर्ववेदाच्या १४ व्या कांडातील विवाहमंत्र याच वर्गातले होत. स्त्रीपुरूषांचे प्रणयमंत्र हाही या वर्गातील सूक्तांचा एक प्रधान भाग आहे. या मंत्रांस ‘वशीकरण मंत्र’ असेही म्हणतात. इच्छित स्त्री अथवा पुरूष लाभावा म्हणून पुरूषाने अथवा स्त्रीने वापरावयाचे हे मंत्र आहेत. (३·२५; ६·१३०; ६·१३१). प्रेमात स्पर्धा करणाऱ्यांचा नाश करण्यासाठीही काही मंत्र दिले आहेत. या मंत्रांत दिसणारी असूया आणि चीड अत्यंत तीव्र आहे (१·१४; ३·१८). मत्सरग्रस्तांच्या हृदयातील मत्सर नाहीसा व्हावा म्हणूनही काही मंत्र आहेत (६·१८; ७·४५; ७·७४). स्त्रीचे कुलक्षण निवारणारे मंत्रही या वर्गात येतात. पापनक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या बाबतीत करायची शांतिक्रमे सुचविणारी मंत्ररचनाही येथे आढळते.

सांमनस्यकर्मे : कुटुंबात सलोखा नांदावा, व्यक्तिव्यक्तींमधील कलह नष्ट व्हावे, सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, सभाजय साधता यावा इ. हेतूंसाठी ही सूक्ते आहेत (३·३०; ३·८; २·२७; ७·१२).

राजकर्मे : प्राचीन भारतात राजाला पुरोहिताची नेमणूक करणे आवश्यक असे. राजपुरोहितास राजाला हितकारक असे मंत्र ठाऊक असावे लागत. या वर्गात येणारे मंत्र अशा प्रकारचे आहेत : राज्यभिषेक, राजाची निवड, हद्दपार केलेल्या राजाचे पुनःस्थापन, शत्रूंवर वर्चस्व संपादन करणे, राजाला युद्धात जय मिळवून देणे, शत्रुसेनासंमोहन, स्वीयसेनेचे उत्साहवर्धन, शत्रूच्या बाणांपासून करावयाचे संरक्षण असे अनेक विषय या मंत्रांतून येतात. वेदकालीन राजनीतीची काही कल्पना त्यांतून येते (४·८; ३·४; ३·३; ४·२२; ३·१; ३·२; ४·३१; १·१९).

ब्राह्मणमाहात्म्य : या वर्गात ब्राह्मणांना हितकारक अशा प्रार्थना आणि ब्राह्मणांचे अहित करू पहाणारांचे अनिष्ट चिंतणारे मंत्र येतात. ब्राह्मणांना ‘देव’ ही उपाधी प्राप्त झाल्याचे येथे दिसते. तसेच राजाचे पुरोहित या नात्याने आपले महत्व त्यांना पूर्णतः जाणवलेले दिसते. ब्राह्मणाचा छळ करणे वा ब्राह्मणहत्या करणे ही दोन्ही कृत्ये महापापांत गणलेली आहेत. ब्राह्मणांना दक्षिणा दिल्याने मिळणाऱ्या पुण्यावर बराच भर देण्यात आला आहे. दक्षिणेला गूढ आणि गहन अर्थ देण्यात आला आहे. दक्षिणा म्हणून देण्यात येणाऱ्या अजाची (बकऱ्याची) तुलना अज एकपादाशी (ऋग्वेदात निर्देशिलेली एक अंतरिक्षीय देवता) केलेली दिसते. ब्राह्मणाची पत्नी आणि मालमत्ता यांना धक्का लावणाऱ्यांना उद्देशून अनेक शाप दिले आहेत (५·१७; ५·१८; ५·१९; १२·५). यशःप्राप्ती, वर्चःप्राप्ती आणि मेधावर्धन (बुद्धीचा विकास) यांसाठी ब्राह्मणांच्या प्रार्थना आहेत (६·५८; ६·६९; ६·१०८). तथापि या विशिष्ट अशा ऋचांचा काळ बराच पुढचा असावा, असे विंटरनिट्स यांचे मत आहे.

पोष्टिककर्मे : समृद्धिप्राप्ती आणि संकटमुक्ती या हेतूने केलेली काही मंत्ररचना अथर्ववेदात आढळते. शेतकरी, पशुपाल, व्यापारी यांसारख्या व्यावसायिकांना आपापल्या व्यवसायांत उत्कर्ष मिळावा हे यातील काही मंत्रांचे प्रयोजन. जमीन नांगरणे, बी पेरणे इ. कृषिकर्मे करताना म्हणण्यासाठी, शेतातील उंदरांचा आणि किड्यांचा नाश करण्यासाठी तसेच भरपूर पाऊस पडण्यासाठी केलेली मंत्ररचना या दृष्टीने उल्लेखनीय आहे. गाईबैलांचे संरक्षण व्हावे, त्यांची उपयुक्तता वाढावी, व्यापाऱ्यांचा प्रवास सुरक्षितपणे व्हावा, द्युतकर्मात जय मिळावा, अग्नीपासून होणारे धोके टळावेत, वास्तू सुरक्षित रहावी, गाईला वासराबद्दल प्रेम निर्माण व्हावे इ. गोष्टी साधण्यासाठी असलेले मंत्र आणि प्रार्थनाही याच वर्गात मोडतात (३·१७; ६·१४२; ६·५०; ४·१५; ६·५९; ३·१५; ४·३८; १·४; ३·२१; ६·७०).

शांतिकर्मे : या वर्गातील मंत्रांमागे दुःखनाश आणि पापरिमार्जन ही प्रेरणा आहे. दु:खस्वप्ने, अपशकुन, पापनक्षत्रावर झालेला जन्म, कपोत आणि घुबड यांसारख्या अशुभ पक्ष्यांचे दर्शन इत्यादींमधून होणारी दुःखे टळावीत म्हणून शांतिकर्मे सांगितली आहेत (६·४६; ६·११०; ६·२७ - २९). कळत-नकळत झालेल्या पापांसाठीही शांतिकर्मे आहेत. उदा., कर्जफेड (विशेषतः जुगारात झालेल्या कर्जाची फेड) न करणे (६·११८), थोरल्या भावाच्या आधी विवाह करणे (६·११२), धर्मकृत्यांत काही चूक होणे (७·१०६) इ. पापे. पापाला सहस्त्राक्ष म्हटले असून पापी मनुष्य राक्षसाने झपाटलेला असतो अशीही कल्पना दिसते. अथर्ववेदाच्या चौथ्या कांडातील २३ ते २९ या मृगारसूक्तांचा अंतर्भावही याच वर्गात करता येईल. त्यांत दुःखनाशासाठी अग्नी, इंद्र, वायू आणि सविता, द्यावा-पृथिवी, मरूत, भव आणि शर्व, मित्र आणि वरूण या देवतांच्या प्रार्थना सांगितलेल्या आहेत.

विश्वोत्पत्ती आणि अध्यात्म : वेद म्हणून प्रतिष्ठा मिळावी म्हणूनही ही सूक्ते अथर्ववेदात अंतर्भूत केली गेली असावीत. ऋग्वेदादी संहिता आणि उपनिषदे यांतील तत्त्वचिंतनाहून मात्र या सूक्तांतील तत्त्वचिंतनाचे स्वरूप थोडे वेगळे आहे. प्रायः अंतिम सत्याचा पाठपुरावा करण्याची खरी तळमळ त्यांत दिसून येत नाही, त्यांच्यामागील हेतूही मुख्यतः व्यावहारिकच आहेत, त्यांतील तात्त्विक कल्पनाही अत्यंत यांत्रिकपणे हाताळलेल्या आहेत. असे विचार अनेक विद्वानांनी व्यक्त केले आहेत. या वर्गातील सूक्तांत गणले जाणारे भूमिसूक्त मात्र तत्त्वज्ञानाचा नाही, तरी काव्यसौंदर्याचा उत्कृष्ट प्रत्यय देते (१२·१). या सूक्तातील काही ऋचा पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी आहेत.

संकीर्ण : यांशिवाय यज्ञासाठी केलेल्या प्रार्थना आणि मंत्र या वेदात आढळतात. दोन आप्रीसूक्ते या दृष्टीने लक्षणीय आहेत (५·१२; ५·२७). यजुर्वेदातील मंत्रांशी मिळते-जुळते असे गद्यमंत्र १६ व्या कांडात दिसतात. एक ऋचा (७·२८) तर काही विवक्षित यज्ञसाधनांना उद्देशून रचिलेली दिसते. हवी अर्पण करताना म्हणावयाची विविध सूक्ते आहेत (१·१५; २·२६; १९·१; ६·३९; ६·४०). विसाव्या कांडात सोमयागविषयक सूक्ते पहावयास मिळतात. या कांडातील बहुतेक सूक्ते ऋग्वेदातून घेतलेली असली, तरी त्यांतील कुंतापसूक्ते हा सूक्तांचा एक नवाच प्रकार लक्ष वेधून घेतो (२०·१२७-१३६). या सूक्तांपैकी काहींतून कूटप्रश्न आणि त्यांची उत्तरे येतात  (२०·१३५·१-३). काहींत थोडी ग्राम्यताही  आढळते (२०·१२८·८-९). दानस्तुती हा काही कुंतापसूक्तांचा विषय आहे (२०·१२७· १-३). काही विवक्षित विषयांचा विशेष परामर्श घेणारी सूक्तेही उल्लेखनीय आहेत. उदा., रोहित या देवाला उद्देशून लिहिलेली चार दीर्घ सूक्ते (कांड १३ वे ), विवाहसूक्ते (कांड १४ वे), व्रात्यविषयक सूक्ते (कांड १५ वे), अभिषेकमंत्र व दु:स्वप्ननाशनमंत्र (कांड १६ वे), एका संपूर्ण कांडाच्या स्वरूपात असलेले एक दीर्घ आयुष्यसूक्त (कांड १७ वे) आणि अंत्यविधीचे मंत्र (कांड १८ वे). रोहित ही देवता सूर्यदेवतेचेच एक रूप असून तिच्या सामर्थ्याचे वर्णन विस्ताराने केले आहे. विवाहसूक्ते ऋग्वेदातील सूर्यसूक्तांशी मिळती-जुळती आहेत. ब्रह्माचे एक रूप आणि एक भटकी जमात या दोन्ही अर्थांनी ‘व्रात्य’ हा शब्द येथे आलेला दिसतो. या जमातीतील लोक ब्राह्मणधर्मीय नव्हते; परंतु त्यांना व्रात्यस्तोम ह्या विधीने त्या धर्मात येता येई, असे व्रात्यकांडावरून अनुमान होते. अभिषेकमंत्रांत उदकमाहात्म्य वर्णिले आहे. या एका आयुष्यसूक्ताला संपूर्ण कांडाचा (१७ वे कांड) दर्जा का मिळावा, हे समजत नाही.

अथर्ववेदातील अभिचारमंत्रांच्या प्राधान्यामुळे त्या वेदास बराच काळ प्रतिष्ठा नव्हती. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांचा उल्लेख ‘त्रयी’ अथवा ‘त्रयी विद्या’ असा करून त्यांच्या नंतर अथर्ववेदाचा वेगळा उल्लेख केल्याची उदाहरणे आढळतात. कधीकधी तर त्याचा उल्लेखही टाळला गेल्याचे दिसते; परंतु अथर्ववेदातील निरनिराळे विषय पाहिले, तर त्यांत मानवी संबंध आणि भावभावना यांचा वैविध्यपूर्ण प्रत्यय येतो. वैदिक काळातील आर्यांच्या सर्वसामान्य जीवनाचे प्रतिबिंब त्यांत दिसते. लोकसमजुती आणि लोकाचार यांचे दर्शन येथे होते. अथर्ववेदातून मिळणारी ही माहिती मानवशास्त्र आणि देवविषयक कल्पनांचा इतिहास यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहे, असे अनेक विद्वानांचे मत आहे. गोपथ ब्राह्मणातील उल्लेखानुसार (१·१०) सर्पवेद, पिशाचवेद, असुरवेद, इतिहासवेद आणि पुराणवेद हे अथर्ववेदाचे पाच उपवेद मानले जातात.

संदर्भ : 1. Bloomfield, M. The Atharva Veda, Strassburg, 1899.

2. Griffith, Ralph T. H. Hymns of the Atharva Veda, 2 vols., Varanasi, 1968.

3. Whitney, D. W.; Trans. Athrva veda Samhita, 2 Vols.,Delhi, 1962.

4. Winternitz, M. A history of Indian Literature, Calcutta, 1927.

लेखक: लक्ष्मणशास्त्री जोशी ; अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate