অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अर्धमागधी साहित्य

अर्धमागधी साहित्य

अर्धमागधी साहित्यात श्वेतांबर जैनांच्या पंचेचाळीस आगम-ग्रंथांचा अंतर्भाव होतो. त्यांपैकी बारा अंगग्रंथांची रचना महावीराच्या गणधरांनी केलेली असून बाकीचे आगम-ग्रंथ श्रुतज्ञानी व दशपूर्वी स्थविरांनी रचलेले आहेत. महावीराच्या निर्वाणानंतर ९८० वर्षांनी वल्लभी येथे देवर्द्धिगणींच्या अध्यक्षतेखाली त्याचा धर्मोपदेश लेखननिविष्ट करण्यात आला. तत्पूर्वीच्या काळात गुरुशिष्य-परंपरेने तो धर्मोपदेश मुखपाठाद्वारे संक्रमित करण्यात आला. दिगंबरपंथीय लोक या आगम-ग्रंथांना प्रमाण मानत नाहीत.

पहिल्या तीर्थंकराच्या वेळेपासून दोन प्रकारचे आगम-ग्रंथ होते, असे श्वेतांबरपंथीय लोक मानतात : (१) चौदा पूर्वग्रंथ व (२) अकरा अंग-ग्रंथ. यांपैकी चौदा पूर्वग्रंथ नंतर दिट्ठिवाय (दृष्टिवाद) नामक बाराव्या अंग-ग्रंथांत समाविष्ट करण्यात आले होते. महावीरानंतर चौदा पूर्वग्रंथांचे ज्ञान स्थूलभद्र ह्या आठव्या आचार्यापर्यंत चालत आले. पण पुढील वज्रापर्यंतच्या सात आचार्यांना दहा पूर्वग्रंथांचेच ज्ञान होते. त्यानंतरच्या काळात ते अधिकाधिक कमी होत जाऊन वल्लभीवाचनेच्या काळी ते पूर्णपणे लुप्त झाले. अशा रीतीने बारावा अंग-ग्रंथ नष्ट झाला.

वल्लभीवाचनेच्या वेळी तयार केलेल्या ग्रंथांच्या संहिता नंतरच्या काळात विकृत होत गेल्या व काही नष्टही झाल्या. नंदीवरून (नंदीसूत्रावरून) ह्याची कल्पना येऊ शकते. आज फक्त पंचेचाळीस आगमग्रंथ उपलब्ध असले, तरी नंदीसूत्रात अठ्ठ्याहत्तर आगम-ग्रंथांची माहिती सापडते. आगम-ग्रंथांत सर्वप्राचीन असलेल्या अकरा अंग-ग्रंथांतील अनेक आर्ष प्रयोगांच्या जागी नंतरच्या काळात माहाराष्ट्री रूपे आलेली आढळतात. असे असले, तरी नंतरच्या ग्रंथांतून महावीरांचे जीवन व तत्त्वज्ञान यांच्या मूळ स्वरूपाला मात्र फारसा धक्का लागलेला नाही, असे आधुनिक पंडितांचे मत आहे.

नंदीसूत्राप्रमाणे १२ अंगप्रविष्ट व ६६ अंगबाह्य ग्रंथ असून अंगबाह्य ग्रंथांत ६ आवश्यक, ३१ कालिक व २९ उत्कालिक असे तीन विभाग आहेत. उपलब्ध ४५ आगम-ग्रंथांत ११ अंग-ग्रंथ, १२ उपांगग्रंथ, १० प्रकीर्णके, ६ छेदसूत्रे, ४ मूलसूत्रे व २ वर्गनाव नसलेले ग्रंथ असे विभाग आहेत. हे उपलब्ध आगम-ग्रंथ भिन्नकर्तृक व भिन्नकालीन असून गद्य, पद्य व गद्यपद्यमिश्र अशा सर्व स्वरूपांत आढळतात. काहींत पृथक पृथक लेखनाचे संकलन दिसते. काहींत विस्तृतता व पुनरावृत्ती आढळते. काहींत संक्षिप्त विधाने आहेत. सांप्रदायिक गोष्टींचे पद्धतशीर निरूपण काहींत आढळते. साधू व साध्वी यांचे आचारधर्म सांगण्यावर या ग्रंथांचा भर आहे. त्यांत वाङ्मयगुण आढळत नाहीत.

आगम-ग्रंथांवरील टीका प्राकृतात व संस्कृत भाषेतही लिहिण्यात आल्या. प्राकृत टीकांत ⇨निज्‍जुत्ति(निर्युक्ती), भाष्य व चुण्णि (चूर्णी) असे तीन प्रकार आढळतात. पहिले दोन प्रकार पद्यात व तिसरा गद्यात आहे. निर्युक्ती श्रुतकेवली भद्रबाहूने (इ. स. पू. सु. ३२२) रचिल्या असून त्यांना सध्याचे स्वरूप द्वितीय भद्रबाहूने (सहावे शतक) दिले, असे आधुनिक विद्वान मानतात. त्यात त्याने जैनदर्शनाची भूमिका स्थिर केली. जिनभद्राने (सातवे शतक) विशेषावश्यक भाष्यात त्या वेळेपर्यंतच्या दार्शनिक चर्चेचे सर्व विषय सुंदर रीतीने हाताळले आहेत. संघदासाच्या (सातवे शतक) बृहत्कल्पभाष्यात साधूंच्या आहारविहाराची दार्शनिक पद्धतीची चर्चा आहे. उपलब्ध भाष्यग्रंथांची संख्या दहा असून चूर्णिग्रंथ अठरा आहेत. जिनदास महत्तराच्या (सातवे

–आठवे शतक) चूर्णीत सर्व भाष्यविषय संक्षेपाने आढळतात.⇨हरिभद्र (आठवे शतक) शीलांकसूरी (दहावे शतक), शांत्याचार्य, अभयदेव (अकरावे-बारावे शतक), मलधारी हेमचंद्र व आचार्य मलयगिरी (बारावे शतक) यांनी आगम-ग्रंथांवर संस्कृत टीका लिहिल्या. त्यांपैकी सर्वांत प्राचीन टीका हरिभद्राची असून मलयगिरीची टीका सर्वश्रेष्ठ मानली जाते. आगम-ग्रंथ सुलभपणे समजण्यासाठी प्राचीन गुजरातीत ‘बालावबोध टीका’ लिहिल्या गेल्या त्यांना ‘टबा’ असेही म्हणतात.

अंग-ग्रंथ : (१) आयारंग (आचारांग) :अंग-ग्रंथांतील पहिला व अत्यंत प्राचीन असा हा आगम-ग्रंथ आहे. त्यास सामायिक असेही म्हणतात. त्यात साधु-साध्वींच्या आचारां-संबंधी उपदेश आहे. त्याचे श्रुतस्कंध असून पहिला श्रुतस्कंध इ. स. पू. तिसऱ्या   शतकातील आहे. गद्यपद्यमिश्र शैलीत तो लिहिलेला आहे. त्यात महावीराचे चरित्रही आलेले आहे.

(२) सूयगडंग (सूत्रकृतांग) : यास सूचाकृतांग असेही नाव आहे. हा ग्रंथ पद्यात असून त्यातील दुसरा परिशिष्टवजा विभाग मागून जोडल्यासारखा वाटतो. नवदीक्षित साधूला मार्गदर्शन करण्याचा प्रमुख हेतू या ग्रंथामागे आहे. त्यात भूतवाद, ब्रह्मवाद, तत्कालीन क्रियावाद, अक्रियावाद, विनयवाद व अज्ञानवाद यांचे खंडन केलेले आढळते. आत्म्याचे पृथक अस्तित्व, नानात्मवाद व कर्मवाद यांचे विवेचन व समर्थनही त्यात आढळते. स्त्रियांच्या मोहजालात अडकलेली माणसे व नरकातील शिक्षा यांची वर्णनेही त्यात आहेत.

(३) ठाणांग (स्थानांग) : या सूत्रात स्थानाच्या म्हणजे संख्येच्या क्रमाने लोकांत प्रचलित असलेल्या एक ते दहापर्यंत वस्तूंची परिगणना आढळते. लुप्त झालेल्या दिट्ठिवायाचे विषयही त्यात नमूद केलेले आहेत.

(४) समवायांग : या सूत्रात स्थानांगाप्रमाणे १ ते १०,००,००,००,००,००,००० वस्तूंची परिगणना आढळते.

(५) भगवई वियाहपण्णत्ति (भगवती व्याख्याप्रज्ञप्ति) :ज्ञेय पदार्थाच्या व्याख्यांचे निरूपण ह्यात असल्यामुळे ह्यासविहायपण्णत्ति किंवा व्याख्याप्रज्ञप्ति हे नाव प्राप्त झाले आहे. ‘भगवई’ हे विशेषण पूज्यभावनिदर्शक आहे. या सूत्रात ४१ शतके (प्रकरणे) आहेत. प्रत्येक शतकात उद्देशक अथवा वर्ग आहेत. महावीराने अनेक प्रश्नांना दिलेली उत्तरे यात संगृहीत केली आहेत. त्यांतून महावीराच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

(६) णायाधम्मकहाओ (ज्ञातृधर्मकथा) : या आगम-ग्रंथाच्या शीर्षकाचा अर्थ वादग्रस्त आहे. यात दोन श्रुतस्कंध आहेत. पहिल्या श्रुतस्कंधात १९ अध्ययने असून प्रत्येकात एक कथा आढळते. कथांतून दृष्टांत दिलेले आहेत. दुसऱ्या श्रुतस्कंधात एकाच धर्मकथेची तपशील बदलून केलेली २०६ रूपांतरे आहेत.

(७) उवासगदसाओ (उपासकदशा) : यातील दहा अध्ययनांत (अध्यायांत) श्रावकांच्या धर्माचे निरूपण आहे. त्यात श्रावकधर्माचे कथारूप विवेचन आढळते. यातील कथा साचेबंद वाटतात.

(८) अंतगडदसाओ (अंतःकृद्दशा) : संसारत्याग केलेल्या अनेक धर्मशील साधु-साध्वींचे जीवन यात वर्णन केले आहे. द्वारकेच्या कृष्णवासुदेवाच्या जीवनातील काही घटनांते वर्णनही त्यात आहे.

(९) अणुत्तरोववाइयदसाओ (अनुत्तरौपपातिक) : स्वर्गातील उच्चतम स्थानी पोहोचलेल्या धर्मशील साधूंचे यात वर्णन आहे.

(१०) पण्हवागरण (प्रश्नव्याकरण) : यात प्रश्नोत्तरे नाहीत. सध्याचा ग्रंथ मुळातील नसून अन्य कोणी नंतर, पण बाराव्या शतकापूर्वी, रचलेला वाटतो. हिंसादी पाच आस्रव व अहिंसादी पाच संवर यांचे विवेचन त्यात प्रामुख्याने आढळते.

(११) विवागसुय (विपाकसूत्र) : स्वकर्माची शुभाशुभ फळे भोगणार्‍या व्यक्तींच्या कथा यात आहेत.

(१२) दिट्ठिवाय (दृष्टिवाद) : वेगवेगळ्या संप्रदायांची मते या नष्ट झालेल्या ग्रंथात असावीत. इतर ग्रंथांधारे या अंगाचे पुढीलप्रमाणे पाच विभाग होते, असे दिसते : (१) परिकर्माणि, (२) सूत्राणि, (३) पूर्वगतम्, (४) अनुयोग व (५) चूलिका.

उपांगग्रंथ : प्रत्येक अंगाचे एक उपांग आहे, अशी पारंपरिक समजूत आहे. तथापि उपलब्ध ग्रंथावरून तसे वाटत नाही. अंग-ग्रंथांची रचना गणधरांनी केली असून उपांगग्रंथ स्थविरांनी रचिले. तेव्हा दोहोंत आंतरिक संबंध नसला तर ती आश्चर्याची बाब नव्हे. १२ अंगे व १२ उपांगे ही जी संगती दिसते ती निव्वळ बाह्य स्वरूपाची आहे.

(१) ओववाइय/उववाइय (औपपातिक) : यास औपपादिक असेही म्हणतात. देव

म्हणून जन्म, नैरयिक (नरकवासी) म्हणून जन्म सिद्धिगमन अशा उपपातांसंबंधी (किंवा उपपादांसंबंधी) रचलेली सूत्र यात आढळतात. यातील पुष्कळशी वर्णने नावे बदलून आगम-ग्रंथांत घेतलेली आढळतात. पहिल्या भागात महावीराने कूणिकाला निरूपण केलेले निर्ग्रंथ प्रवचन व दुसर्‍या भागात इंद्रभूती गौतमाला सांगितलेले उपपातांचे वर्णन आढळते.

(२) रायपसेणइय (राजप्रश्नीय) : एकत्त जीव अनेक जन्मांनंतर मोक्ष कसा मिळवितो, याचे वर्णने प्रस्तुत उपांगात आहे. यातील प्रदेशी राजा व केशी कुमारश्रमण यांच्यातील आत्म्यासंबंधीचा संवाद महत्त्वाचा आहे.

(३) जीवाजीवाभिगम किंवा जीवाभिगम : यात गौतम व महावीर यांच्यातील प्रश्नोत्तरे

असून त्यात जीव-अजीवातील भेद-प्रभेगांचे व सागर, द्वीपे इत्यादींचे वर्णन आहे.

(४) पन्नवणा (प्रज्ञापना) : याचा कर्ता आर्यश्याम स्थविर होय. यातही गौतम व महावीर यांच्या प्रश्नोत्तरांतून छत्तीस पदांचे (विषयांचे) आणि आर्य व म्‍लेच्छ जातींचे वर्णन आढळते.

(५) सूरपन्नत्ति (सूर्यप्रज्ञप्ति) : यात सूर्य, चंद्र व नक्षत्रे यांच्या गतींचे वर्णन आहे.

(६) जंबुद्दीवपन्नत्ति (जंबुद्दीपप्रज्ञाप्ति) : यात जैनमताप्रमाणे भूगोलवर्णन आहे. ते पौराणिक स्वरूपाचे वाटते.

(७) चंदपन्नत्ति (चंद्रप्रज्ञप्ति) : यात चंद्राच्या परिभ्रमणाचे वर्णन असून, हा विषय सूर्य-प्रज्ञप्तीत समाविष्ट झालेला आहे.

आठ ते बारा ही पाच उपांगे निरयावलिसुत्तात (निरयावलिसूत्रात) एकत्रच देतात. ही उपांगे खालील-प्रमाणे :

(८) निरयावलियाओ (नरकांची श्रेणी) : प्रस्तुत उपांगात कूणिकाची कथा विस्तृतपणे वर्णन केली आहे. या उपांगास कप्पिया (कल्पिका) असेही म्हणतात.

(९) कप्पवडिंसियाओ (कल्पावतंसिका) : श्रेणिक राजाचे दहा नातू श्रामण्याचा स्वीकार करून मृत्यूनंतर वेगवेगळ्या स्वर्गलोकांत कसे जन्मले, ह्याचे वर्णन यात आहे.

(१०) पुप्फिया (पुष्पिका) : यात स्वर्गातील दहा देवदेवींच्या पूर्वजन्मांचा वृत्तांत महावीराने गौतमाला सांगितला आहे.

(११) पुप्फचूलिआओ (पुष्पचूडा) :पुष्फियातील कथांप्रमाणेच यातील कथा असून त्या खुणेच्या शब्दांनी सुचविलेल्या आहेत.

(१२) वण्हिदसाओ (वृष्णिदशा) : वृष्णिवंशीय बारा पुत्रांना अरिष्टनेमीने दिलेल्या दीक्षेचे वर्णन यात आहे. अरिष्टनेमी व कृष्ण-वासुदेव यांच्या भेटीचा वृत्तांतही त्यात आढळतो.

प्रकीर्णके : तीर्थंकरांच्या उपदेशाच्या आधारे श्रमणांनी यांची रचना केली. त्यांची संख्या बरीच असली, तरी सर्वसाधारणपणे त्यांपैकी दहाच प्रकीर्णके महत्त्वाची मानली जातात. ती सामान्यतः पुढीलप्रमाणे होत :

(१) चउसरण (चतुःशरण) : यात ६३ गाथा असून अर्हत्, सिद्ध, साधू व जिनधर्म हे चौघे शरणीय मानले आहेत. वीरभद्र हा याचा कर्ता असावा.

(२)भत्तपरिन्ना (भक्तपरिज्ञा) : यात १७२ गाथा आहेत. त्यात भक्ताच्या त्यागाविषयी प्रतिपादन आढळते. याचाही कर्ता वीरभद्र असावा.

(३)संथार (संस्तार) : यात १२३ गाथा असून अंतसमयी मुनी ध्यानाराधना कशीकरतो त्याचे निरूपण आहे.

(४) आउरपच्चक्खाण (आतुरप्रत्याख्यान) : यातील ७० गाथांतून बालमरण व पंडितमरण यांचे विवेचन आहे. आतुर (रुग्ण) साधूने उपभोगपरिभोगाच्या वस्तूंचा त्याग केला पाहिजे, हे तत्त्व येथे मुख्यतः सांगितले आहे.

(५) महापच्चक्खाण (महाप्रत्याख्यान) : यात १४२ गाथा आहेत. त्यांत एकत्वभावना, संसारपरिभ्रमण, पंडितमरण, पाच महाव्रते व दुष्कृतनिंदा इत्यादींवरील निरूपण आढळते.

(६) तंदुलवेयालिय (तंदुलवैचारिक) : यात ५८६ गाथा असून महावीर व गौतम यांची प्रश्नोत्तरे आहेत. त्यांत गर्भकाल, गर्भावस्थेतील आहार, जीवाच्या दहा दशा, कालविभाग, शरीरवर्णन व स्त्रीस्वभाव यांवरील निरूपण आढळते. शंभर वर्षांत शतायू व्यक्ती किती तांदूळ खाते या विचारावरून प्रस्तुत प्रकीर्णकनाम रूढ झाले असावे.

(७) चंदवेज्झय (चंद्रकवेध्यक) : यातील १७४ गाथांतून गुरुशिष्यगुण व विनयाचे स्वरूप इत्यादींचे वर्णन आढळते.

(८) देविंदत्थय (देवेन्द्रस्तव) : यात ३०२ गाथा आहेत. त्यांत भवनवासी, व्यानमन्तर, ज्योतिषिक व वैमानिक या देवेंद्रांची माहिती आढळते.

(९) गणिविज्जा (गणिविद्या) : यात ८२ गाथा असून त्यांत तिथी, नक्षत्र, शकुनबल वगैरे ज्योतिषविषयक माहिती आहे.

(१०) वीरत्थय (वीरस्तव) : यात ४३ गाथा असून त्यांत महावीराच्या अनेक नावांची मालिका दिलेली आहे.

यांखेरीज गच्छायार (गच्छाचार) ह्याचा उल्लेख सातवे किंवा आठवे प्रकीर्णक म्हणून काही ठिकाणी केलेला आढळतो. त्यात आचार्य, साधु-साध्वी यांच्या आचारांचे वर्णन आहे. मरणसमाही (मरणसमाधी) हे दहावे प्रकीर्णक म्हणून कुठेकुठे उल्लेखिले गेले आहे. त्यात ६६३ गाथा असून समाधिपूर्वक मरण, आचार्यगुण, अनशनतप, ज्ञानमहिमा, संलेखना व बारा भावना इ. विवेचन आढळते. ह्यांशिवाय तित्थोगाली (तीर्थोद्गार) वआराहणापडागा (आराधनापताका) वगैरेंचीही प्रकीर्णके म्हणून गणना केलेली आढळते.

छेदसूत्रे : छेद म्हणजे गुन्हेगार. जैन साधु-साध्वींच्या आचारभंगाचे प्रायश्चित्त व शासन यांविषयी या सूत्रांत प्रतिपादन आहे. खालील छेदसूत्रांपैकी तीन ते पाच या छेदसूत्रांचा एक श्रुतस्कंध होतो.दसा-कप्पववहार असे त्याचे नाव आहे.

(१)निसीह (निशीथ) : हे छेदसूत्र आचारांगाचाच भाग समजला जाई. त्याचे कर्तृत्व वादग्रस्त आहे. त्यात साधु-साध्वींच्या आचारविचारविषयक उत्सर्ग व अपवादविधिंचे वर्णन आहे. हा विषय गोपनीय मानला जातो

(२)महानिसीह (महानिशीथ) : यास पुष्कळदा सहावे छेदसूत्र मानतात. मूळचे महानिशीथलुप्त झाले असावे. उपलब्ध महानिशीथाची भाषा व विषय उत्तरकालीन वाटतात. पश्चात्ताप, तप, कर्मसिद्धांत, प्राण्यांची सुखदुःखे, व्रतभंगाचे पाप, साधूंचा आचार व काही कथा यांचे निरूपण त्यात आढळते.

(३) ववहार (व्यवहार) : यास बारा अंगांचे नवनीत मानण्यात येते. श्रुतकेवली भद्रबाहू हा याचा कर्ता होय. जैन साधु-साध्वींच्याकार्याकार्याचे, प्रायश्चित्तांचे व नवदीक्षित साधूंच्या वीस वर्षांच्या अभ्यासक्रमाचे वर्णन यात केलेले आहे.

(४) दसाओ (दशाश्रुतस्कंध) : आयारदसाओ असेही याचे नाव आहे. यात असमाधीची वीस कारणे, मुनींच्या उत्साहभंगाची एकवीस कारणे, आशातनेचे तेवीस प्रकार, उपासकाच्या अकरा व भिक्षूच्या बारा प्रतिमा, नऊ प्रकारची निदाने व महावीरचरित्र यांसारखे विषय आलेले आहेत.

(५) पज्जोसणाकप्प (पर्युषणकल्पसूत्र) : दसाओचा आठवा अध्याय म्हणजेच हे छेदसूत्र होय. ‘जिनचरित’, 'स्थविरावलि' व 'सामाचारी' असे याचे विभाग आहेत. पहिल्या भागातील महावीरचरित्र काव्यात्म पण अतिशयोक्तिपूर्ण आहे. दुसऱ्‍या विभागात गणांच्या शाखा, याद्या व गणधर यांची माहिती आहे. तिस‍ऱ्या विभागात साधूंसाठी नियम आढळतात. पर्युषणपर्वात साधू याचे पठण करतात. भद्रबाहूला या सूत्रांचा कर्ता मानण्यात येते, पण ऐतिहासिक दृष्टीने या छेदसूत्राचे तिन्ही भाग त्याचेच असतील हे असंभवनीय वाटते.

(६)कप्प (कल्प) : यास बृहत्कल्पसूत्र असेही म्हणतात. जैन साधु-साध्वींच्या संयमाला पोषक किंवा बाधक ठरणाऱ्‍या आहारादी अनेक गोष्टींचे व प्रायश्चित्तांचे विवेचन यात आढळते.

यांशिवाय जीयकप्पसुत्त (जीतकल्पसूत्र) याची सहावे छेदसूत्र म्हणून गणना केल्याचे काही ठिकाणी आढळते. त्यात १०३ गाथा आहेत. त्यात प्रायश्चित्तमाहात्म्याचे वर्णन केलेले असून दहा प्रायश्चित्तांचे विवेचन आढळते. जिनभद्रगणी क्षमाश्रमण हा त्याचा कर्ता होय, असे म्हणतात.

मूलसूत्रे : यात महावीराची वचने असून ती श्रामण्याच्या प्रारंभकालात उपयोगी पडतात. साधुजीवनाच्या मूलभूत नियमांचा त्यांत उपदेश असतो. या सर्व कारणांनी या विभागास 'मूलसूत्रे' म्हणतात.

(१) उत्तरज्झयण (उत्तराध्ययन) : इ. स. पू. दुस‍ऱ्या वा तिस‍ऱ्या शतकात याची रचना झाली. धर्मकाव्य म्हणून यास महत्त्व आहे. त्यात आपल्या अंतकाळी महावीराने गौतमाला निरूपण केलेली छत्तीस प्रश्नांची उत्तरे आहेत. श्रमणधर्म व जैन सिद्धांत या व यांसारख्या अनेक विषयांवरील विवेचन त्यात आढळते. ते मुख्यतः पद्यात रचलेले आहे.

(२) आवस्सय किंवा आवस्सयनिज्जुत्ति (आवश्यकनिर्युक्ति) : नित्यकर्मातील सहा आवश्यक गोष्टींचे निरूपण यात आहे. त्यात सामायिक, चतुर्विंशतिस्तव (चोवीस तीर्थंकरांचे स्तवन), प्रतिक्रमण किंवा पश्चात्ताप, कायोत्सर्ग म्हणजे ध्यानार्थ शरीर निश्चल ठेवणे, प्रत्याख्यान म्हणजे पापकर्मापासून निवृत्ती यांचा समावेश होतो.

(३) दसवेयालिय (दशवैकालिक) : इ. स. पू. ३७९ मध्ये शय्यंभवाने आपल्या मुलासाठी याची रचना केली. यात दहा अध्ययने व दोन चूलिका आहेत. आदर्श साधुजीवनाचे वर्णन यात आढळते .

(४) पिंडनिज्जुत्ति (पिण्डनिर्युक्ति) : यात ६७१ गाथा असून याचा कर्ता भद्रबाहू आहे.दशवैकालिकातील पिंडेषणा या पाचव्या अध्ययनावरील ही वेगळी केलेली विस्तृत निर्युक्ती होय. साधूंच्या आहारविधींचे वर्णन यात आहे.

वर्गनाव नसलेली चूलिकासूत्रे : यांत नंदी  व अणुओगदार ही सूत्रे येतात.

(१) नंदी : दूष्यगणीचा शिष्य देववाचक हा या सूत्राचा कर्ता असावा. देववाचक हाच देवर्द्धिगणी क्षमाश्रमण होय, हे काही विद्वानांचे मत ग्राह्य धरल्यास त्याची रचना पाचव्या शतकात झाली असावी. त्यात गद्यपद्यरचना आढळते. आगम-ग्रंथांची माहिती त्यात दिलेली आहे. जैनांच्या दृष्टीने ज्ञानस्वरूपाचे व भेदप्रभेदांचे विवेचन त्यात आढळते. जैन धर्माची ऐतिहासिक माहितीही त्यात आहे. म्हणून या सूत्राला फार महत्त्व दिले जाते.

(२) अणुओगदार (अनुयोगद्वार) : अनुयोग म्हणजे परीक्षण व त्याची द्वारे नाम, स्थापना, द्रव्य व भाव ही होत. त्यांच्या वर्णनाबरोबरच जैनधर्मीयांस आवश्यक असणाऱ्‍या सर्व धार्मिक व अन्य विषयांची माहिती या सूत्रात आहे. ते विस्तृत असून प्रायः गद्यात आहे.

संदर्भ : 1. Winternitz, M. A History of Indian Literature,-Vol. II, Calcutta, 1933.

२. जैन, जगदीशचंद्र, प्राकृत साहित्य का इतिहास, वाराणसी, १९६१.

लेखक: वा. म. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate