অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रजी साहित्य- विसावे शतक

इंग्रजी साहित्य- विसावे शतक

या शतकातील इंग्रजी साहित्यनिर्मितीचा विचार दोन टप्प्यांनी करता येऊल : पहिला कालखंड १९०१ ते १९३९ म्हणजे व्हिक्टोरिया राणीच्या मृत्यूपासून दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभापर्यंतचा. दुसरा कालखंड १९३९ नंतरचा. प्रस्तुत लेखात सामान्यत: १९५० पर्यंतच्या इंग्रजी साहित्याचा आढावा घेण्यात आला आहे.

पहिला कालखंड : विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून काही नवीन प्रवृत्ती दिसू लागला.

आर्नल्ड बेनेट (१८६७–१९३१), जॉन गॉल्झवर्दी (१८६७–१९३३), एच्. जी. वेल्स (१८६६–१९४६) ह्या कादंबरीकारांनी व्यापक सामाजिक पार्श्वभूमीवर व्यक्तींच्या भावनांचे नाट्य चित्रित केले. बेनेटने प्रादेशिक परिसर साकार केला, तर गॉल्झवर्दीने मध्यम वर्गीयांच्या सत्ता-संपत्तिपूजनाच्या प्रवृत्तीवर फॉरसाइट सागा ह्या कादंबरीमालिकेत टीका केली. वेल्सने आपल्या दीर्घ वाङ्‍मयीन जीवनात बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा आणि समाजवादी दृष्टिकोण ह्यांच्या आधारावर विद्यमान आणि संभाव्य अशा समाजजीवनाचे चित्रण केले. मानवी स्वभावात सुधारणा घडवून आणणे शक्य आहे, ही श्रद्धा त्यामागे होती. त्याच संदर्भात  जोसेफ कॉनरॅड (१८५७–१९२४) ह्याचाही उल्लेख केला पाहिजे. सागरावरील साहसाच्या त्याच्या कादंबऱ्या स्टीव्हन्सन आणि किपलिंगची परंपरा पुढे चालवतात. मूळच्या पोलिश मातृभाषी कॉनरॅडने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून इंग्रजी कादंबरीवाङ्‍मयाचे क्षेत्र अधिक विस्तृत केले आहे. त्याची पात्रे आणि घटना वास्तवातून घेतलेल्या असतात; पण कादंबऱ्यांत अवतरताना त्यांना स्वच्छंदतावादी छटा लाभलेली असते.

परंतु पहिल्या दशकाच्या शेवटीच ह्याविरुद्ध प्रवृत्तीही दिसू लागल्या. परंपरावादी जॉर्जियन काव्याने १९१० पासून पुढे काव्यमाध्यमाला विशुद्ध रूप देण्याचे प्रयोग केले. अनुभूतींची शुद्धता जोपासण्याचे यत्‍न केले. निसर्गवस्तू व दृश्ये ह्यांचा गौरव केला. सर्जमूर, डब्ल्यू. बी. येट्स (१८६५–१९३९), अ‍ॅबरक्राँबी (१८८१–१९३८), जेम्स एल्‍रॉय फ्‍लेकर (१८८४–१९१५), वॉल्टर द ला मेअर (१८७३–१९५६), विल्फ्रिड विल्सन गिब्सन (१८७८–१९६२), जॉन मेस्‌फील्ड (१८७८–१९६७), हॅरल्ड मन्‍रो (१८७९–१९३२) ह्यांसारख्या कवींनी परंपरावादी व काही प्रमाणात वैशिष्ट्यपूर्ण काव्य लिहिले.

साम्राज्य वाद व त्याचे गोडवे गाण्याची प्रवृत्ती‌ अॅरड्‌यर्ड किपलिंग (१८६५–१९३६) आणि विल्यम अर्नेस्ट हेन्ली (१८४९–१९०३) ह्यांसारख्या कवींमध्ये दिसली, तरी अन्य परिसर, संस्कृती समजावून घेऊन त्यांना कलेत सामावण्याची प्रवृत्ती, व्यक्तीबद्दल एक प्रकारची सहानुभूती व जिव्हाळा इ. गुण किपलिंगच्या वाङ्‍मयात दिसून येतात. संकुचित राष्ट्रीय सीमा ओलांडण्याच्या दृष्टीने अशा गुणांची इंग्रजी साहित्याला मदत झाली. अमेरिकन संस्कृती, तसेच भारताची आणि इतर पौर्वात्य देशांची संस्कृती ह्यांचा प्रभाव वाङ्‍मयावर पडू लागला. कवितेविषयी वाचकांच्या मनात आस्था निर्माण व्हावी ह्या उद्देशाने काही कवींनी मिळूनजॉर्जिअन पोएट्री ह्या नावाचा एक संग्रह १९१२ च्या अखेरीस प्रसिद्ध केला. १९२२ पर्यंत असे एकंदर पाच संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांत चाळीस कवींच्या कविता समाविष्ट होत्या. त्यांपैकी बहुतेक पुढे चांगले प्रसिद्धीला आले.

लॉरेन्ससारख्या कवींनी एलिझाबेथकालीन कवींप्रमाणेच भावोत्कट कविता लिहिली व रचनेत हॉपकिन्झप्रमाणेच नादमाधुर्य आणले.

ह्याबरोबरच फ्रॉइड व युंग यांच्या मानसशास्त्रीय संशोधनाने व्यक्तीबद्दलच्या पूर्वकल्पनांना तडे गेले. डी. एच्. लॉरेन्स (१८८५–१९३०), इ. एम्.फॉर्स्टर (१८७९–१९७०), जेम्स जॉइस (१८८२–१९४१), व्हर्जिनिया वुल्फ (१८८२–१९४१) ह्या कादंबरीकारांनी दुभंगलेली व्यक्तिमत्त्वे चित्रित करण्याचा प्रयत्‍न केला. व्यक्तीचे मन हे एकसंध नसून भिन्नभिन्न प्रवृत्ती, वासना व प्रेरणा यांनी गतिमान, प्रवाही आणि चैतन्यशील बनले आहे; त्याच्या पाठीमागे कोठलीही राजकीय, सामाजिक व मूल्यविषयक स्थिर बैठक असू शकत नाही, अशा गृहीतावर आधारलेली नवी कादंबरी निर्माण झाली. लॉरेन्स किंवा फॉर्स्टर हे जुन्याच तंत्राचा वापर करतात व जुन्याच पद्धतीने कथानक सांगतात; परंतु जॉइस व वुल्फ मानवी मनाच्या अंत:प्रवाहांवर भर देतात; संज्ञाप्रवाहाचे नवे तंत्र अवलंबतात. जॉइसने तर भाषेची रूढ रचना मोडून विचारांची अस्फुट वा अर्धस्फुट मूस घडविण्याचा प्रयत्‍न केला. फॉर्स्टर आपल्या व्याजोक्तिपूर्ण काव्यमय शैलीने व्यक्तींच्या परस्परसंबंधांवर भर देऊन आकर्षक रचना करतो.

ह्या कालखंडात कथेने नवे रूप घेतले आणि तिला लघुकथा ह्या स्वतंत्र वाङ्‍मयप्रकाराची प्रतिष्ठा प्राप्त झाली. टोकदारपणा हे तिचे वैशिष्ट्य होते. थोड्याशा विस्तारात एखादी घटना, एखादे जीवनविषयक सत्य, एखादा भावानुभव चित्रित करणे हे तिचे प्रयोजन होते. किपलिंग, वेल्स, गॉल्झवर्दी, समरसेट मॉम (१८७४–१९६५), लॉरेन्स, फॉर्स्टर वगैरे प्रमुख कादंबरीकारांनी लघुकथेला प्रतिष्ठा मिळवून दिली. ह्यांखेरीज कॅथरिन मॅन्सफील्ड (१८८८–१९२३), एच. ई. वेट्स (१९०५–१९७४) वगैरेंचा लौकिक मुख्यत: कथालेखक म्हणून आहे. घटनाप्रधान आणि भावप्रधान अशा दोन्ही प्रकारच्या कथा लिहिल्या गेल्या. एकीकडे मोपासां आणि दुसरीकडे चेकॉव्ह ह्या दोघांशीही ह्या कथांचे नाते आहे.

लँब, हॅझ्‌‌‌‌लिट वगैरेंच्या नंतर एकोणिसाव्या शतकाच्या मधल्या काही दशकांत लुप्तप्राय झालेल्या ललितनिबंधाचे शतकाच्या अखेरीअखेरीस पुनरुज्‍जीवन झाले. रॉबर्ट लूई स्टीव्हन्सनने ललितनिबंध लिहिण्याला आरंभ केल्यानंतर जवळजवळ अर्धशतकापर्यंत अनेक लेखकांनी ह्या वाङ्‍मयप्रकारात मोलाची भर घातली. त्यांत मॅक्स बीअरबोम (१८७२–१९५६), रॉबर्ट लिंड (१८७९–१९४९), इ. व्ही. ल्यूकस (१८६८–१९३८), जी. के चेस्टर्‌टन (१८७४–१९३६), हिलरी बेलॉक (१८७०–१९५३), ए. जी. गार्डनर (१८६५–१९४६) ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. एखादा सामन्य विषय किंवा अनुभव घेऊन त्याच्याभोवती कल्पना आणि विचार ह्यांचा विलास करीत त्याचे लालित्यपूर्ण दर्शन घडविणारे हे निबंध लँब, ‌ हॅझ्‌‌‌‌लिटच्या काळातील ललितनिबंधांपेक्षा अधिक खेळकर आणि हलकेफुलके होते.

विसाव्या शतकाच्या आरंभी नाट्यलेखनाला नवे वळण मिळाले ते हेन्‍रिक इब्सेन (१८२८–१९०६) ह्या नॉर्वेजियन नाटककाराच्या समस्याप्रधान, वास्तववादी नाटकांनी. जॉर्ज बर्नार्ड शॉने (१८५६–१९५०) त्यातील आधुनिकता पकडली व बुद्धिवादाच्या पायावर व्हिक्टोरियन कल्पनांचा उपहास करणारी समस्याप्रधान नाटके लिहिली. बौद्धिक कल्पनांना व विवाद्य विषयांना नाट्यरूप देण्यात तो यशस्वी ठरला. ध्येय व मूल्ये यांबद्दलची त्याची तळमळ, त्याचे आवेशी सत्यान्वेषण, मर्मभेदी विनोद यांनी रंगभूमीला व नाट्यभिरुचीला एक वेगळे वळण दिले. परंतु अनेक वेळा त्याच्या नाटकांतील ही बौद्धिकता लादलेली वाटते व पात्रे स्वत:चे जीवन न जगता नाटककाराची मते बोलून दाखविण्यासाठी निर्माण झाल्यासारखी वाटतात. शॉच्या समकालीन प्रभावी नाटककारांत जॉन गॉल्झवर्दी यानेही सामाजिक नाटके लिहून सामाजिक संघर्षाना वाचा फोडली. समरसेट मॉम ह्याने तत्कालीन उच्च वर्गीय समाजाच्या चालीरीतींचा उपहास करणाऱ्या सुखात्मिका लिहिल्या. त्यांतील चमकदार संवाद, रेखीव रचना आणि सूक्ष्म उपरोधउपहास ह्यांमुळे त्याची नाटके रेस्टोरेशनकालीन काँग्रीव्हच्या परंपरेत बसतात. हलकीफुलकी कल्पनाप्रधान अद्‌भुतरम्य नाटके जेम्स बॅरीसारख्यांनी (१८६०–१९३७) लिहिली, तर आयर्लंडमधील जॉन मिलिंग्टन सिंगसारख्या (१८७१–१९०९) नाटककाराने आयरिश लोककथा व परंपरा ह्यांच्या आधारे मानवाच्या मूलभूत भावना व प्रेरणा यांवर कधी विनोदी, तर कधी करुणरम्य श्रेष्ठ शोकात्मिकांच्या पातळीला पोहोचणारी नाट्यरचना केली. रायडर्स टू द सी (१९०४), प्‍लेबॉय ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड (१९०७), दियर्द्री ऑफ द सॉरोज (१९१०) यांसारख्या त्याच्या नाट्यकृती श्रेष्ठ आहेत.

ह्या काळातील गद्य अत्यंत अर्थवाही, सुगम आणि लवचिक आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉसारख्या नाटककारांनी त्याला प्रवाही बनविले; तर बर्ट्रंड रसेल, विन्स्टन चर्चिल, चेस्टर्‌टन, वेल्स ह्यांसारख्यांनी त्याचा उपयोग कधी तत्त्वविचार, सामान्यांपर्यंत आणण्यास, कधी देशभक्तिपर भावना उठावदारपणे मांडण्यासाठी, तर कधी सामाजिक कल्पना लोकप्रिय करण्यासाठी यशस्वीपणे केला. विसाव्या शतकातील एडमंड गॉस (१८४९–१९२८), लिटन स्ट्रेची (१८८०–१९३२) आणि फिलिप ग्विडॅला यांसारख्या चरित्रकारांनी उपहास, व्याजोक्ती यांचा वापर चरित्रलेखनासाठी केला. विसाव्या शतकातील समीक्षावाङ्‍मयाने कलाक्षेत्रातील संज्ञांना निश्चिती दिली व पारंपरिक संज्ञा अधिक सखोल केल्या. टी. एस्. एलियट (१८८८–१९६५), आय्. ए. रिचर्ड्‌स (१८९३–), जॉन मिड्लटन मरी (१८८९–१९५७),विल्यम एम्प्‌‌‌सन (१९०६–    ) यांसारख्यांनी समीक्षेचे नवे संप्रदाय निर्माण केले. आर्. जी. कॉलिंगवुड (१८८९–१९४३), हर्बर्ट रीड(१८९३– ), रॉजर फ्राय (१८६६–१९३४) यांनी कलासमीक्षेत नवी भर घातली; तर सर्जन, जी. बी. हॅरिसन, विल्सन नाइट, डोव्हर विल्सन यांनी शेक्सपिअरसमीक्षेचे दालन समृद्ध केले.

दुसरा कालखंड : विसाव्या शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकांत साहित्यात विविध नव्या प्रवाहांची जी खळबळ निर्माण झाली होती ती या काळात क्षीण झाली. सामान्यत: तिसरे दशक हे अश्रद्ध आणि प्रयोगवादी, चौथे अस्वस्थ पण प्रामाणिक आणि पाचवे उद्योगी पण संत्रस्त असे मानले, तर १९५० नंतरचे म्हणजे सहावे दशक हे सुरक्षिततेच्या ध्यासाने पछाडलेले दिसते. दुसऱ्या महायुद्धानंतर एका नव्या दृष्टिकोणाचा उदय झाला; पण तो पहिल्या महायुद्धानंतर घडलेल्या परिवर्तनाच्या तुलनेने लक्षणीय ठरला नाही. या काळात आविष्कारतंत्राचे महत्त्व ओसरले, कलावंताची एकाकी अवस्था व स्वच्छंदी भटकेगिरी या भूमिकेचे आकर्षण कमी झाले. कलावंत म्हणून त्याचे स्थान व निष्ठा यांवर लक्ष केंद्रित झाले. तंत्रविषयक नवनवे प्रयोग ज्या काळात सुरू होते (१९१४–१९३५), त्या काळात वाङ्‍मयीन मासिकांनी जी कामगिरी बजावली, तशी कामगिरी करण्याची गरज या काळातील वाङ्‍मयीन मासिकांना उरली नाही. विशिष्ट लेखकवाचकांच्या मर्यादित संख्येसाठीच ही मासिके अस्तित्वात राहिली. अभिरुचीचे विभक्तीकरण झाले. निरनिराळ्या प्रकारच्या साहित्याची आवड असणारा वेगवेगळा वाचकवर्ग तयार झाला.

नव्या समाजकल्याणकारी व्यवस्थेत, जुन्या सांस्कृतिक व आर्थिक परंपरांवर आधारलेले हक्क हळूहळू लोप पावले व सामाजिक वर्गविग्रहाचा एक मोठा विषय साहित्यातून हरपला. १९४० च्या सुमारास बुद्धिजीवी वर्गाचे साम्यवादाबद्दलचे आकर्षण जवळजवळ इतिहासजमा झाले. त्यांची दृष्टी वैयक्तिक, नैतिक अथवा धार्मिक प्रश्नांकडे वळली. एका संदिग्ध स्वरूपात धार्मिक ऊर्मीचा उगम साहित्यात दिसू लागला. ईश्वराची आज्ञा उल्लंघिण्याचे मानवाचे (आदमचे) पहिले पाप व नंतरचा त्याचा अध:पात या कल्पना पुढे आल्या. १९४५ साली टाकला गेलेला अणुबाँब ही विशाल, धक्का देणारी घटना; पण तिचे विध्वंसक सामर्थ्य इतके अवाढव्य होते, की तिची तीव्रता वैयक्तिक जीवनात जूण भासलीच नाही. शास्त्रज्ञांची नीतिमूल्ये हा गंभीर वाङ्‍मयाचा विषय बनला; पण त्यातून श्रेष्ठ कलाकृती निर्माण होऊ शकली नाही. कोणत्याही संघटित व्यवस्थेवरचा भरवसा उडाल्याने, व्यक्तिमनाचेच अधिक कसोशीने अवगाहन व मंथन होऊ लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्‍लंडने पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात अलिप्ततेचे धोरण स्वीकारले व त्यामुळे साहित्यक्षेत्रातही परंपरेचे मोल वाढले. या काळातील इंग्‍लंडमधील बुद्धिजीवी वर्ग पूर्वीइतका बंडखोर उरला नाही.

टी. एस्. एलियट हा १९२०–१९४० या कालखंडातील काव्याचा श्रेष्ठ प्रवर्तक व प्रतिनिधी. आपल्या अभिनव रचनाकौशल्याने त्याने काव्यशैलीत क्रांती घडवून आणली. या शैलीचे कमीजास्त अनुकरण नंतरच्या कवींनी केले. आधिभौतिक व्यवहारात कष्टी व लुप्त झालेल्या आत्म्याचे भेदक व अनेकविध चित्रण हा या काव्याचा प्रमुख विषय बनला. एलियटच्या द वेस्ट लँड (१९२२) या प्रातिनिधिक काव्यकृतीचा सार्वत्रिक प्रभाव दिसू लागला. विश्वास, करुणा व प्रेम यांचा अभाव ही या काव्याची मर्यादा. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काव्यात एलियट, हॉपकिन्झ यांच्या काव्यातील वैराणतेच्या छटा उमटत असल्या व ते त्यांचे वारसदार असले, तरी त्यात एका सामाजिक साफल्याकडे धावण्याचा यत्‍न होता आणि हे साफल्य व्यक्तिसंबंधांवर आधारभूत असले, अशी धारणा होती. विस्टन ह्यू ऑडन (१९०७–१९७३) हा या काळातील प्रमुख कवी. त्याच्या काव्यात केवळ वैराणपणाचा प्रतीकात्मक आशय नाही, तर एक ठसठशीत वास्तवता आहे. विविध अनुभवक्षेत्रांतील प्रतिमांच्या संकराने त्याने एक नवी अर्थपूर्ण शैली निर्माण केली. स्टीव्हन स्पेंडर (१९०९– ) याचे नाव ऑडनच्या बरोबरीने घेतले जाते; पण स्पेंडरची काव्यप्रतिभा तुलनेने अधिक सौम्य व भावपूर्ण तसेच काहीशी निष्पाप व बाळबोध आहे. सेसिल डे ल्यूइस (१९०४–) व लूइस मॅक्‍नीस यांनीही याच काळात लक्षणीय काव्यनिर्मिती केली.

पहिल्या महायुद्धानंतर कडवट उपहासाने भरलेले काव्य निर्माण झाले, तसे दुसऱ्या महायुद्धानंतर झाले नाही. अविरत आत्मसंशोधन करणारे काव्यच लिहिले गेले. ही नव्या सौंदर्यवादाची सुरुवात तर नव्हे, अशी शंका येऊ लागली. डिलन टॉमस (१९१४–१९५३) व जॉर्ज बार्कर (१९१३– ) हे अगदी अलीकडच्या काळातील प्रातिनिधिक कवी. जीवनाच्या अखंड प्रवाहाचे व सर्जक शक्तीचे महोत्सवी सूक्त, असे टॉमसच्या काव्याचे स्वरूप आहे. त्याच्या काव्याचा अन्वयार्थ नेहमी लागतो असे नाही; पण त्यातील आशयाचे स्पंदन मात्र जाणवते. बार्करचे काव्य नव्या पिढीच्या जीवनावस्थेचा प्रत्यक्ष आकार शोधणारे आहे.

डिलन टॉमस, जॉर्ज बार्कर, इडिथ सिटवेल (१८८७–१९६४), जॉन बेट्यमन, रिचर्ड चर्च (१८९३–), कॅथलिन रेन, डेव्हिड गॅस्कॉइन यांच्या काव्यामुळे एलियटचा प्रभाव ओसरला नाही. त्याच्या काव्यातील बौद्धिक धिटाई आणि शिस्त नवीन कवींच्या भावनावेगाने ढिसूळ झाली नाही. हे कवी परत शेली व टेनिसन यांच्या कडे वळले नाहीत. मात्र काव्यक्षेत्रातले चैतन्य ओसरून, चिंतन व आत्मनिरीक्षण यांच्या ओझ्याखाली ते दबले आहेत, असे दिसू लागले.

समाजसुधारणेचे साधन, ही कादंबरीची भूमिका या काळात नष्ट होत होती. वैयक्तिक जीवनातील एकाकीपणा व वासनांचा खेळ हाच नव्या कादंबरीचा स्थूल विषय बनू पाहत होता. या विषयाला एक नैतिक व दुसरी मानसशास्त्रीय अशा दोन बाजू आहेत. नैतिकदृष्ट्या जीवनातील अनुभवाचे मोल अजमावण्याचे निकष काय, याचा शोध व मानसशास्त्रीयदृष्ट्या जाणीवेचे स्वरूप काय व तिचे कालप्रवाहाशी नाते कोणते याचा शोध अशा या दोन बाजू होत. या शोधांसाठी निर्माण झालेले संज्ञाप्रवाहाचे तंत्र जेव्हा काव्यमय झाले तेव्हा कादंबरीलेखनाचे ते एक स्वतंत्र मूल्यच ठरू लागले. सर्व घटनांचे व प्रेरणांचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्‍नात आधुनिक कादंबरीकाराजवळ कोणतीच नैतिक भूमिका शिल्लक उरली नाही. त्यामुळे त्याच्या कलाकृतींना आशयपूर्ण मानवी प्रयत्‍नांची प्रतिष्ठा अथवा अस्सल शोकात्मिकेची सखोलता प्राप्त होत नाही. व्यक्तिजीवनाचे मूल्यमापन त्यात होऊ शकत नाही. जगत असताना संवेदनांचा क्षण तेवढा खरा भासू लागतो. या संवेदनक्षणांचे अनंतत्व भाषेच्या असंख्य क्‍लृप्त्या, लयी व प्रतिमा यांच्या साहाय्याने कवटाळू पाहणे, हीच साहित्याची सार्थकता ठरू लागते. ही प्रवृत्ती इंग्रजी कादंबरीतच नव्हे, तर ह्या काळातील अमेरिकन आणि यूरोपीय कादंबरीतही दिसते.

जीवनमूल्यांची विस्मृती झाली, की शरीरप्रक्रियांची जाणीव तेवढी बाकी उरते. हा दृष्टिकोण ऑल्डस हक्सलीच्या (१८९४–१९६३) कादंबऱ्यांत दिसतो. बदलत्या परिस्थितीशी एकसारखी तडजोडच करीत राहिले, की जीवनातील नाट्य व सामर्थ्य हरपते. आजच्या कादंबऱ्यांतील नायक हा अँटीहीरो किंवा प्रतिनायक ठरला, तो यामुळेच. या नायकांच्या संबंधी अनुकंपा न वाटता तुच्छताच वाटते. एव्हेलिन वॉ (१९०३–) या कादंबरीकाराचे नायक याच साच्यातील आहेत. मानसशास्त्रीय समर्थनामुळे खलपुरुषाचे खलत्वदेखील निष्प्रभ होते आणि उरतो तो हतबल व विदूषकी जीव. अँगस विल्सन (१९१३–) याच्या कादंबऱ्यांतून याचा प्रत्यय येतो. ग्रेअम ग्रीन (१९०४–) हा ह्या काळातील आणखी एक कादंबरीकार. ह्याच्या लेखनात कॅथलिक दृष्टिकोणाचा प्रभाव दिसतो. व्हर्जिनिया वुल्फ या लेखिकेने कादंबरीला एक नवी संवेदनाक्षमता दिली. एलिझाबेथ बोएन (१८९९–), आयरिस मर्‌डॉक (१९१९–), रोझमंड लेमन (१९०३– ) या लेखिकांनी ती समर्थपणे पेलली, तर आयव्ही कॉम्टन बर्नेट (१८९२—) या लेखिकेने मानवी क्रौर्य व स्वार्थ यांचे भयवाह दर्शन घडविणाऱ्या कथानकांची एक वेगळी जात निर्माण केली. तंत्रदृष्ट्या सराईत व कुशल अशा लेखकांच्या हाती सापडलेली या काळातील कादंबरी काही आवर्तांतच घोटाळताना दिसली, तरी एक साहित्यप्रकार म्हणून कादंबरीचा प्रवास संपला, असे मानणे सयुक्तिक वाटत नाही.

अगोदरच्या दशकात ज्यांनी कथालेखनास सुरुवात केली होती अशा रीस डेव्हिस, टी. एफ्. पोइस (१८७५–१९५३), जेम्स हॅन्ली (१९०१–), केट रॉबर्ट्स या कथाकारांनी या कालखंडात आपले स्थान अधिक निश्चित केले. नवीन कथाकारांत डेंटन वेल्स याचे नाव घ्यावे लागते. व्यक्तीच्या अंतर्यामीचे ताण व आर्तता आणि बाह्य जगाचे तरल, संवेदनाशील चित्रण हे त्याच्या कथालेखनाचे विशेष होत. या काळातील कथालेखकांसमोर नामवंत अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे (१८९९–१९६१) याचा आदर्श होता.

या काळातील इंग्रजी रंगभूमीवर विल्यम बटलर येट्स, टी. एस्. एलियट, ऑडन, क्रिस्टोफर इशरवुड (१९०४–), क्रिस्टोफर फ्राय (१९०७–) या नाटककारांच्या काव्यमय नाटकांनी महत्त्वाचा बदल घडवून आणला. जपानी ‘नो’ नाट्याचा प्रभाव येट्सच्या नाटकांवर होता. नृत्य, शिल्पमुद्रा, वास्तववाद, काव्यात्म प्रतिमा आणि लोकभाषा यांच्या साहाय्याने त्याने एक संमिश्र नाट्यप्रकार साकार करण्याचा प्रयत्‍न केला. एलियटने आपल्या मर्डर इन द कॅथीड्रल (१९३५) या नाटकासाठी धार्मिक व्रतोत्सवाचा आधार घेतला. प्रार्थनासदृश सांघिक भाषणे व गद्याची संथ लय यांतून परिणामकारक गंभीर वातावरण त्याने उभे केले. त्यानंतरचे त्याचे नाट्यविषय धार्मिक नसल्याने या तंत्राचा तितका यशस्वी उपयोग त्याच्या इतर नाटकांतून झाला नाही. ऑडनने दोन नाटके स्वतंत्रपणे व तीन इशरवुडच्या समवेत लिहिली. फ्रॉइड आणि मार्क्स यांचे तत्त्वज्ञान व लोकप्रिय संगीतिका यांचे मिश्रण या नाटकांत दिसते. द डान्स ऑफ डेथ (१९३३) या त्याच्या नाटकाने खळबळ उडविली; पण द असेंट ऑफ एफ् ६ (१९३६) हे प्रतीकात्मक नाटक त्या मानाने अधिक महत्त्वाचे आहे. फ्रायच्या नाटकांनी विषयाच्या व रचनेच्या नावीन्याने काव्यमयतेचे वेगळे स्वरूप दाखविले. एलियटप्रमाणे त्याची पहिली नाटके धार्मिक स्वरूपाची होती; पण त्यानंतर ए फीनिक्स टू फ्रीक्‍वंट (१९४६) व द लेडी इज नॉट फॉर बर्निंग (१९४९) या गाजलेल्या नाट्यकृतींतून प्रसन्न कल्पकतेचा व शब्दकळेचा अभिनव आविष्कार त्याने दाखविला.

आर्थर मिलर, टेनेसी विल्यम्स, एडवर्ड अल्बी यांसारखे अमेरिकन नाटककार, यानेस्को, ब्रेंडन वेहन, बेर्टोल्ट ब्रेक्ट, बेकेट यांसारखे यूरोपीय नाटककार व जॉन ऑस्बर्न (१९२९– ) व आर्नल्ड वेस्कर (१९३२–) यांसारखे इंग्रजी नाटककार यांनी अलीकडच्या इंग्रजी रंगभूमीची लक्षणीय सेवा केली.

ऑस्बर्नचे लुक बॅक इन अँगर (१९५६), आर्नल्ड वेस्करचेरूट्स (१९५९), शेलाह डेलोने (१९३८–) हिचे ए टेस्ट ऑफ हनी  ही नाटके महत्त्वाची आहेत. या तरुण नाटकाकारांनी अनीती, ढोंग आणि भ्रष्टाचार यांच्यावर स्थिर झालेल्या सद्य:स्थितीवर कडाडून हल्ला केला. या नाटककारांनी रंगभूमीच्या परंपरागत रसिकांना व टिकाकारांना गोंधळात टाकले, तरी एका वेगळ्या सामर्थ्याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला यात शंका नाही.

मानसशास्त्रीय संशोधन व सिद्धांत यांचा मोठा प्रभाव आधुनिक टीकेवर झाला. साहित्यभाषा व शास्त्रीय भाषा यांचे वेगळे अर्थ असून शकतात, याची कल्पना आल्याने आय्. ए. रिचर्ड्‌ससारख्या टीकाकारांनी वाङ्‍‌मयीन मूल्यांची फेरमांडणी करण्याचा प्रयत्‍न केला. संस्कारवादी (इंप्रेशनिस्टिक) व मानवतावादी टीका मागे पडली. काटेकोर विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब करणारे गंभीर टीकावाङ्‍‌मय व सर्वसामान्य लोकाभिमुख टीकावाङ्‍‌मय अशी स्पष्ट विभागणी दिसू लागली. पांडित्यप्रदर्शन व टीकालेखन हे दोन वेगळे लेखनप्रकार आहेत, याची जाणीव झाली. आकृतिबंध व कलेचे अमूर्त स्वरूप या विचाराला टीकेत अधिक महत्त्व आले. कलावंताच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा कलेच्या माध्यमावर लक्ष केंद्रित झाले व कलाप्रक्रिया अधिक मोलाची ठरली. काव्यातील अनुभव व भावना या व्यक्तिनिरपेक्ष असतात, या एलियटच्या अभिप्रायाचा व भाषेच्या सुप्त सामर्थ्याचे चिंतन व आर्जव हेच कलेचे खरे स्वरूप, या ऑडनच्या अभिप्रायाचा रोख हाच आहे. या भूमिकेमुळे कलेतील सूक्ष्म तंत्रस्वरूपाची महती वाढली व टीकालेखन हे प्रशिक्षित तज्ञांचे कार्यक्षेत्र बनले. कलेची प्रक्रिया हेच श्रेष्ठ कलामूल्य होऊ लागले.स्क्रूटिनी (१९३२–१९५३) हे या काळातील समीक्षेला वाहिलेले महत्त्वाचे नियतकालिक होते.

सारांश, आधुनिक टीका ही अधिकाधिक शब्दार्थवेधी व विश्लेषणात्मक झाली. तसेच ती चरित्रात्मक न राहता जननवेधी झाली. ज्या वृत्तीतून कलाकृतीचे बीजारोपण झाले, त्या वृत्तीचे जननरहस्य समजावून घेणे अगत्याचे ठरू लागले. त्याचप्रमाणे जनमानसात रुजलेल्या पुरातन प्रतिमा व दंतकथा यांच्या संदर्भांची उकल करणेही अगत्याचे वाटू लागले. टीका ही विविधरूपी झाली व प्रत्येक रूपाचे स्वतंत्र प्रामाण्य मान्य करण्याची वृत्ती बळावली.

सामान्यपणे असे दिसते, की या काळातील साहित्यात जरी अनेक दोष दाखविता आले, तरी या साहित्याचा जिवंतपणा नाकबूल करता येत नाही. हे साहित्य स्वच्छंदी, आत्मरत, बंडखोर, भावसंकुल व संत्रस्त, सांकेतिक तंत्रनियमांबद्दल बेफिकीर, दुर्बोध वाटले; तरी या साहित्याची धिटाई व रसरशीतपणा मान्य करावा लागतो. हे साहित्य भीती व भ्रामक कल्पना यांना बांधले गेले नाही व कोणत्याही मर्यादा ते ओळखीत नाही. ते सर्वस्वी नव्या पिढीचे साहित्य आहे.

उपसंहार : सातव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या सु. तेराशे वर्षांच्या दीर्घ कालावधीत इंग्रजी साहित्याने खूपच मजल मारली आहे. मुळात जर्मानिक स्फूर्तिस्रोत घेऊन आलेल्या ह्या साहित्यात कालांतराने लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, इटालियन इ. यूरोपीय भाषांतील साहित्यांचाही प्रभाव पडला. काहींपासून त्याने स्फूर्ती घेतली, काहींपासून वाङ्‍‌मयप्रकार घेतले, काहींपासून विचारधन घेतले व ते यूरोपीय साहित्याचा एक महत्त्वाचा भाग झाले. जसजसा इंग्रज समाज राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक घडामोडींना, क्रांत्यांना तोंड देत बळकट होत गेला, समृद्ध होत गेला, त्याच्या व्यापाराचा, उद्योगधंद्यांचा, राजकीय सत्तेचा विस्तार होत गेला; तसतसा इंग्रजी साहित्याचा जोम आणि भरदारपणाही वाढत गेला. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी साहित्य ह्यांचा जगाच्या मोठ्या भागावर प्रभाव पडला. अनेक राष्ट्रांतील भाषांच्या आणि साहित्याच्या अभिवृद्धीला, त्यांच्यातील नवीन प्रवृत्तींना ते प्रेरक आणि सहायक झाले.

इंग्रजी साहित्याच्या काही साहित्यप्रकारांना कधी अधिक अनुकूल दिवस आले, तर कधी थोडे प्रतिकूल; पण त्यांचा प्रवाह पुढे जात राहिला आणि सर्वच स्थित्यंतरांतून त्यांची काही वैशिष्ट्ये कायम राहिली. त्यांपैकी चिंतनशीलता, निसर्गाविषयी तसेच घर आणि देश ह्यांविषयी प्रेम, रचनेच्या बाह्यरूपाविषयी काहीशी बेफिकिरी अशा काहीचा उल्लेख करता येईल.

संदर्भ- विसावे शतक :

1. Bathos, E.; Dobree, Bonamy, The Victorians and After 1830-1914. London, 1938.

2. Beach, J. W. The Twentieth Century Novel, Now York, 1932.

3. Brooks, C. Modern Poetry and the Tradition, Chapel Hill, 1939.

4. Daiches, D. Poetry and the Modern World, Chicago, 1940.

5. Daiches, D. The Novel and the Modern World, Cambridge, 1960.

6. Daiches, D. The Present Age after 1920, London, 1938.

7. Edel, L. Psychological Novel 190-1950, London, 1955.

8. Fraser, G. S. The Modern Writer and His World, London, 1953.

9. Frierson, W. C. The English Novel in Transition, 1885-1940, Norman, Oklahama, 1942.

10. Humphrey, R. The Stream of Consciousness in Modern Novel, London, 1954.

11. Isacs, J. An Assessment of Twentieth Century Literature, London, 1951.

12. Leavis, F. R. New Bearings in English Poetry, London, 1950.

13. Lumley, F. Trends in Twentieth Century Dramas, London, 1956.

14. MacNeice, Louis, Modern Poetry, Oxford, 1938.

15. Manly, J. M.; Rickert, E. Contemporary British Literature, London, 1935.

16. Muir, Edwin, The Present Age from 1914, London, 1939.

17. Reynolds, D. Modern English Drama, London, 1949.

18. Scarfe, F. Auden and After : The Liberation of Poetry 1930-1941, London. 1942.

19. Shorer, Mark, Ed. Modern British Fiction : Essays in Criticism, London, 1962.

20. Tinall, W. Y. Forces in Modern British Literature 1885-1946, New York, 1947.

21. Vines, S. A. A Hundred Years of English Literature, 1830-1940, London, 1950.

लेखक: रा. भि. जोशी ; अ. के. भागवत ; म. द. हातकणंगलेकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate