অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इटालियन साहित्य एकोणिसावे शतक

इटालियन साहित्य एकोणिसावे शतक

 

या शतकारंभी सबंध इटली नेपोलियनच्या वर्चस्वाखाली आला. परकीय दास्याच्या जाणिवेतून प्रखर राष्ट्रवादी प्रेरणा वाढीस लागल्या. फ्रेंच राज्यक्रांचीने प्रसृत केलेल्या तत्त्वज्ञानाने त्यांची जोपासना केली. परिणामतः ह्या शतकातील एकंदर वातावरण राजकीय जागृतीने भारलेले आढळते. हा काळ 'Risorgimento' किंवा नवजागृतीचा काळ म्हणून ओळखला जातो. ह्या नवजागृतीचे प्रतिबिंब साहित्यातही अपरिहार्यपणे पडलेले दिसते. ह्या काळात राजकीय हेतूंनी लिहिले गेलेले बरेचसे साहित्य म्हणजे इटलीचा राजकीय वारसाच ठरला. हे साहित्य केवळ इटालियनांनाच नव्हे, तर स्वातंत्र्यमूल्यांचा आदर करणाऱ्या कोणत्याही राष्ट्रातील जनतेला आवाहन करणारे आहे. एकोणिसाव्या शतकात इटलीत प्रभावी ठरलेल्या स्वच्छंदतावादाची राष्ट्रवाद ही एक प्रमुख प्रेरणा होती आणि ह्या शतकाच्या आरंभी नव-अभिजाततावादाचे वातावरण असूनही राष्ट्रवादाच्या अनुषंगाने येणाऱ्या स्वच्छंदतावादी प्रेरणाही त्यात मिसळून गेल्यासारख्या दिसतात.  ऊगो फॉस्कोलो  (१७७८–१८२७) ह्या श्रेष्ठ इटालियन लेखकाचे उदाहरण ह्या संदर्भात विशेष लक्षणीय आहे. त्याच्यापुढील नव-अभिजाततावादी वाङ्‌मयीन आदर्श त्याच्या साहित्यकृतींतून प्रतीत होत असले, तरी त्याचा देशभक्तिविषयक आविष्कार स्वाभाविकपणेच स्वच्छंदतावादी स्वरूप धारण करतो. फॉस्कोलो हा केवळ साहित्यिक नव्हता. नवजागृतीच्या चळवळीमागील ती एक चैतन्यदायी शक्ती होती. ह्या दृष्टीने नव-अभिजाततावादी भूमिकेतून संस्कारिलेल्या त्याच्या उद्देशिका आणि स्वच्छंदतावादी प्रवृत्तींची जाणीव करून देणारी त्याची Ultime lettere di Jacopo Ortis (१८०२) ही कादंबरी उल्लेखनीय आहे. I sepolcri (१८०७) ही त्याची सर्वश्रेष्ठ काव्यकृती होय. व्हींचेत्सो मोंती (१७५४—१८२८) ह्याने नव-अभिजाततावादाचा पुरस्कार केला. तत्कालीन विषयांवर त्याने प्रासादिक काव्यरचना केली, इलिअडचा इटालियन भाषेत अनुवाद केला आणि काही शोकात्मिकाही लिहिल्या. ⇨ जाकोमो लेओपार्दी (१७९८–१८३७) हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी. साहित्यकृतीच्या घाटाविषयीची नव-अभिजाततावादी शिस्त आणि स्वच्छंदतावादी प्रवृत्ती त्याच्या काव्यात एकजीव झालेल्या आढळतात. अस्वस्थता आणि नैराश्य ह्या दोन भाववृत्तींची त्याच्या काव्यावर गडद छाया आहे. हेतुशून्य आणि कंटाळवाणे आयुष्य सुसह्य करण्यासाठी बालपणीची सुखस्मरणे आपल्या काव्यातून पुनरुज्‍जीवित करण्याचा ध्यास त्यातून उत्कटपणे प्रतीत होतो. कमालीची आत्मपरता आणि समुचित शब्दयोजना ही त्याच्या कवितेची वैशिष्ट्ये. I canti (१८३१) ह्या काव्यसंग्रहात त्याच्या उत्कृष्ट कविता समाविष्ट केलेल्या आहेत.  आलेस्सांद्रो मांझोनीने (१७८५–१८७३) लिहिलेल्या I promessi sposi (१८२७, इं. भा. द बिट्रोद्ड, १९५१) ह्या त्याच्या ऐतिहासिक कादंबरीने इटालियन साहित्याची क्षितिजे ओलांडून एकूण यूरोपीय साहित्यात मानाचे स्थान मिळविले. इटालियन कथात्मक साहित्यापुरतेच बोलावयाचे, तर बोकाचीओच्या देकामेरॉननंतर एवढी श्रेष्ठ साहित्यकृती त्यात अवतरलेली दिसत नाही. सतराव्या शतकात स्पॅनिश वर्चस्वाखाली इटालियनांना भोगाव्या लागलेल्या व्याथा-वेदनांचे अत्यंत परिणामकारक चित्रण ह्या कादंबरीत केलेले आहे. Il conte di Carmagnola (१८२०) आणि Adelchi (१८२२) ह्या शोकात्मिकांत त्याने अभिजाततावादी लेखनपरंपरांचा त्याग केलेला आढळतो.
मांझोनी आणि लेओपार्दी ह्यांनी इटालियन साहित्याला नवे वैभव प्राप्त करून दिले. ह्या थोर साहित्यिकांच्या अवतीभोवती आपापल्या मगदुराप्रमाणे साहित्यनिर्मिती करून नवजागृतीच्या चळवळीस हातभार लावणारे अनेक लेखक होते. मांझोनीच्या I promessi sposi ह्या कादंबरीनंतर ऐतिहासिक कादंबऱ्यांची एक लाटच आली. ह्या कादंबऱ्यांची पार्श्वभूमी भूतकालीन असली, तरी त्यांतून वर्तमानकालीन राजकीय वातावरणाचे– विशेषतः स्वतंत्र आणि एकात्म इटलीच्या स्वप्नाचे– पडसाद उमटलेले दिसून येतात. तोम्माझो ग्रॉस्सी (१७९०–१८५३), मास्सीमो आद्झेअल्यो (१७९८–१८६६), फ्रांचेस्को दोमेनीको ग्वेर्रात्सी (१८०४–१८७३) आणि ईप्पॉलीतो न्येव्हो (१८३१–१८६१) हे अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिणारे काही उल्लेखनीय लेखक. ईप्पॉलीतोची Le confessioni di un Italiano (१८५८) ही एक श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरी होय. इटलीतील राष्ट्रीय जाणीव अठराव्या शतकापासून ऐकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कशी विकसित होत गेली, याचा आलेख तीत दिसून येतो.
राजकीय श्रद्धा, प्रखर देशाभिमान आणि जोमदार गद्यशैली ही ⇨ जोसेफ मॅझिनी (१८०५–१८७२) याच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. त्याच्या राजकीय ग्रंथांत Doveri dell' Uomo (१८६०, इं. भा. द ड्यूटीज ऑफ मॅन, १८६२) हा विशेष उल्लेखनीय आहे. त्यात ईश्वर, त्याचा कायदा, स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि मानवजातीच्या संदर्भात माणसाची कोणकेणती कर्तव्ये असू शकतात, ह्यांचे विवेचन साध्या पण परिणामकारक भाषेत त्याने केले आहे.
कार्लो पॉर्ता (१७७६–१८२१), जूझेप्पे बेल्ली (१७९१–१८६३), जूझेप्पे जूस्ती (१८०९–१८५०) इत्यादींनी कवितालेखन केले. पॉर्तने आपल्या उपरीधपूर्ण कवितेतून फ्रेंचांवर आणि ऑस्ट्रियनांवर हल्ला केला. बेल्लीच्या कवितेचे सामाजिक अंग अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक संस्थांचे आणि समाजातील विविध थरांतील व्यक्तींचे त्यात चित्रण आहे. जूस्तीती कविता पॉर्ताप्रमाणेच उपरीधप्रधान आहे.
साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात फ्रांचेस्को दे सांत्तीस (१८१७–१८८३) ह्याने Storia della letteratura italiana (२ खंड, १८७०–१८७१, इं. भा. अ हिस्टरी ऑफ इटालियन लिटरेचर) हा इटालियन साहित्याविषयक चिकित्सक ग्रंथ लिहून मोलाची भर घातली. इटलीतील साहित्यनिर्मितीमागील प्रेरणांचे सखोल विश्लेषण करून लिहिलेला इतक्या व्यापक स्वरूपाचा इटालियन साहित्येतिहासावरील ग्रंथ तोपर्यंत लिहिला गेला नव्हता.
सिल्व्ह्यो पेल्लीको (१७८९–१८५४) ह्या देशभक्त साहित्यिकाने तुरुंगवासातील आपले अनुभव Le mie prigioni मध्ये (१८३२, इं. शी. माय प्रिझनमस) सोप्या परंतु वेधक शैलीत मांडले आहेत. तत्कालीन तुरुंगांतील हालअपेष्टांची त्यामुळे कल्पना येऊ शकते. त्याने काही नाटकेही लिहिली आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीतील स्वच्छंदतावादास ओहोटी लागली. नव-अभिजाततावादाची बाजू खंबीरपणे उचलून धरणारा जोझ्वे कार्दूत्‌ची (१८३५–१९०७) उदयास आला. उत्कट निसर्गप्रेम, पेगन जीवनमूल्यांचा उद्‌घोष, प्राचीन अभिजात साहित्यकृतींसंबंधीचा आदर ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये. निसर्गाविषयीचे त्याचे प्रेम मात्र काहीसे स्वच्छंदतावाद्यासारखेच आहे. त्याच्या उत्कृष्ट भावकवितांतून त्याने प्राचीन रीमचे वैभव, इटलीतील रम्य वनश्री, स्मृतिकोषात दडलेली शैशवातील स्मरणे आणि आपली पेगन जीवनदृष्टी समर्थपणे व्यक्त केली. इटालियन काव्यरचनेसाठी लॅटिनमधील छंद प्रचारात आणण्याचाही त्याने प्रयत्‍न केला. Odi barbare (इं. शी. बार्‌बॅरिक ओड्स) आणि Rime nuove हे त्याचे विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रह. कार्दूत्‌ची हा केवळ कवी नव्हता, तर एक विद्वान आणि इटालियन साहित्येतिहासाचा साक्षेपी अभ्यासक होता. त्याच्या वाङ्‌मयीन निबंधांचे मोल काळाच्या ओघातही टिकून राहिले आहे. कार्दूत्‌चीला १९०६ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
कार्दूत्‌चीच्या हयातीतच जोव्हान्नी पास्कोली (१८५५–१९१२) श्रेष्ठ कवी म्हणून ख्याती पावला. इटालियनप्रमाणेच लॅटिनमध्येही त्याने काव्यरचना केली. पास्कोलीही अभिजाततावादी होता. कार्दूत्‌ची त्याला गुरुस्थानी होता. तथापि त्याच्या काव्यातील नैराश्याचे आणि कारुण्याचे सूर त्याला लेओपार्दीच्या जवळपास घेऊन जातात. जीवनमृत्यूच्या द्वंद्वातून उद्‌भवणाऱ्या समस्यांचे चित्रण त्याच्या अनेक कवितांत आढळते. निसर्गप्रेमाचा उत्कट आविष्कार हे त्याच्या कवितेचे एक विलोभनीय वैशिष्ट्य. Myricae (१८९१), Canti di Castel-vecchio (१९०३), Poemi oncviviali (१९०४) व Poemi conviviali (१९१३) हे त्याचे काही विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रह.
जुझेप्पे जाकोसा (१८४७–१९०६) आणि पाओली फेर्रारी (१८२२–१८८९) हे ह्या शतकाच्या उत्तरार्धातील दोन महत्त्वपूर्ण नाटककार. Una partita a scacchi (१८७२, इं. शी. अ गेम ऑफ चेस) आणि I Tristi amori (१८८८, इं. शी. हॅप्लेस लव्ह्‌ज) आणि Come le foglie (१९००, इं. शी. अ‍ॅज द लीव्ह्ज फॉल) ह्या जाकोसाच्या काही विशेष महत्त्वाच्या नाट्यकृती. फेर्रारीच्या नाटकांत Il Goldoni e le sue sedici commedie nuove (१८५१) ही कार्लो गोल्दोनीच्या जीवनावरील सुखात्मिका सर्वश्रेष्ठ गणली जाते. मानवी कृतींमागे दडलेल्या प्रेरणांचा वेध घेण्याची प्रवृत्ती ह्या दोन्ही नाटककारांत दिसते.
प्रवासवर्णने आणि शिक्षणविषयक लेखनाच्या संदर्भात एदमोंदो दे आभीचिस (१८४६–१९०८) ह्याचे नाव उल्लेखनीय आहे. उत्साहाने ओसंडणारी आकर्षक शैली हे त्याच्या प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य. त्याने खास मुलांसाठी लिहिलेल्या शिक्षणविषयक ग्रंथांत Cuore (१८८६, इं. शी. हार्ट) हा अत्यंत लोकप्रिय झाला. शिक्षणातील नैतिक बाजूंवर विशेष भर देण्याविषयीची त्याची भूमिका त्यात प्रत्ययास येते.
आलफ्रेदो ओर्यानी (१८५२–१९०९) ह्याने कादंबऱ्या, नाटके, सामाजिक आणि राजकीय विषयांवरील पुस्तके असे बरेच लेखन केले. Fino a Dogali (१८८९, इं. शी. ईव्हन टू दोगाली), La lotta politica in Italia (१८९२, इं. शी. द पोलिटिकल स्ट्रगल इन इटली) आणि La rivolta ideale(१९०८, इं. शी. द आयडिअल रिव्होल्ट) हे तीन राजकीय ग्रंथ आणि La disfatta (१८९६, इं. शी. द डिफीट) व Olocausto(१९०२) ह्या कादंबऱ्या ह्यांसाठी तो आज मुख्यतः ओळखला जातो. फॅसिझमचा तो प्रेषित मानला जातो. La rivolta ideale मध्ये त्याच्या राजकीय तत्त्वज्ञानाचे स्वरूप व्यक्त होते. त्याचा प्रस्थापित समाजव्यवस्थाविरोधी कटाक्ष Olocausto ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीत आढळतो.
ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार ⇨ जोव्हान्नी व्हेर्गा (१८४०–१९२२) हा होय. इटालियन कादंबरीला त्याने वास्तववादी बनविले. सिसिलीतील शेतकरी आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय ह्यांच्या जीवनाभोवती त्याने आपल्या कादंबऱ्यांची कथानके गुंफली आहेत. सिसिली हे त्याचे स्फूर्तिस्थान होते. आपल्या कादंबऱ्यांत सिसिलियन बोलीचा उपयोग त्याने अनेकदा करून घेतलेला आहे. I malavoglia (१८८१) आणि Mastro Don Gesualdo(१८८९) ह्या त्याच्या विशेष महत्त्वाच्या कादंबऱ्या होत. व्हेर्गाने उत्कृष्ट कथालेखनही केले.
लूईजी काप्वाना (१८३९–१९१५) हाही ह्याच वास्तववादी संप्रदायातील. सहा कादंबऱ्या, सं. पंधरा कथासंग्रह आणि सुंदर परीकथा त्याने लिहिल्या. त्याच्या बहुतेक श्रेष्ठ कादंबऱ्या आणि कथा सिसिलीच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या आहेत. Giacinta (१८७९), Profumo (१८९०) ह्या त्याच्या काही विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. Le appassionate (१८९३) ह्या त्याच्या कथासंग्रहात त्याच्या अनेक उत्तम कथा अंतर्भूत आहेत. काप्वानाची मनोविश्लेषणाकडे असलेली प्रवृत्ती त्याच्या लेखनातून प्रतीत होते. C'era una Volta (१८८२, इं. भा. वन्स अपॉन अ टाइम........, १८९२) हा त्याच्या परीकथांचा संग्रह.
जीवनाचे वास्तववादी दर्शन घडविण्याच्या प्रेरणेने अनेक इटालियन लेखकांनी आपला नजीकचा आसमंत न्याहाळण्यास सुरुवात केली आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडू लागेल. प्रादेशिक साहित्याचाच हा एक प्रकार. आंतॉन्यो फोगात्सारो (१८४२–१९११) ह्याच्या कादंबऱ्यातून आढळणारे मनोविश्लेषण लक्षणीय आहे. तसेच त्यांत विज्ञानाने प्रभावित झालेल्या नव्या सामाजिक जाणिवांच्या प्रकाशात रोमन कॅथलिक चर्चचा धार्मिक द्दष्टिकोण संस्कारण्याची तळमळही दिसून येते. व्हेर्गाची उंची तो गाठू शकला नसला, तरी एकोणिसाव्या शतकातील तो एक महत्त्वाचा कादंबरीकार आहे. II piccolo mondo antico(१८९५, इं. भा. द लिट्ल वर्ल्ड ऑफ द पास्ट, १९६२), II piccolo mondo moderno (१९००, इं. शी. द स्मॉल मॉडर्न वर्ल्ड) आणि II Santo (१९०५, इं. भा. द सेंट, १९०६) ह्या त्याच्या कादंबऱ्या विशेष ख्याती पावल्या आहेत.

 

 

लेखक : अ. र.कुलकर्णी, ; राजेंद्र सिंह आहलूवालिया (इं.) ,द. स.शिरोडकर (म.)

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate