অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इटालियन साहित्य चौदावे शतक

इटालियन साहित्य चौदावे शतक

 

या शतकातील इटालियन साहित्य  दान्ते (१२६५–१३२१), पीत्रार्क (१३०४–१३७४) आणि  बोकाचीओ (१३१३–१३७५) ह्या तीन साहित्यश्रेष्ठींच्या प्रभावाने भारलेले आहे.
दान्तेचे  दिव्हीना कोम्मेदीआ (इं. शी. डिव्हाइन कॉमेडी) हे जगद्‌विख्यात महाकाव्य. हे रूपकात्मक असून त्यात कवीचा नरकापासून (इन्फेर्नो) स्वर्गापर्यंतचा (पारादीसो) प्रवास वर्णिला आहे. ह्या काव्यकृतीनेच इटालियन भाषासाहित्याला यूरीपीय साहित्यात मानाचे स्थान प्राप्त झाले. ही काव्यकृती इटालियन भाषेच्या तस्कन बोलीत रचिली गेली असल्यामुळे ह्या बोलीलाही वाङ्‌मयीन महत्त्व प्राप्त झाले. Vita nuova मध्ये (सु. १२९३) त्याच्या भावकविता असून त्यांच्याशी संबद्ध अशी गद्य निवेदनेही आहेत. साहित्याप्रमाणेच तत्त्वज्ञान, राजकारण आदी क्षेत्रांतुनही दान्तेचे मन जिवंतपणे वावरत होते. ज्ञानाची मेजवानी देण्याच्या हेतूने लिहिला गेलेला Convivio (सु. १३०४–१३०७ स इं. शी. बँक्विट) आणि राजकीय स्वरूपाचा De Monarchia (१३१०–१३१२ , इं. शी. ऑन मॉनर्की) ह्या गद्यग्रंथांवरून ह्याची प्रचीती येऊ शकेल. तथापि उच्च वाङ्‌मयीन आविष्कारासाठी इटालियन भाषेचा उपयोग शक्य आणि इष्ट आहे, ह्या मताचा त्याने सैद्धांतिक दृष्ट्या केलेला पाठपुरावा आणि त्यासाठी त्याने व्यक्तिशः केलेले परिश्रम ही त्याची विशेष मोलाची कामगिरी होय. De vulgari eloquentia (इं. शी. ऑन द इलस्ट्रियस व्हर्‌नॅक्यूलर) हा ग्रंथ त्या दृष्टीने लक्षणीय आहे. इटालियन भाषेच्या समर्थनाखेरीज ह्यात भाषा आणि साहित्यशैलीविषयक मोलाचे विचार आले आहेत. ह्या गद्यग्रंथांचे आवाहन मुख्यतः इटलीतील अल्पसंख्य सुशिक्षितांना असल्यामुळे तो लॅटिनमध्ये लिहिलेला आहे. दान्तेच्या साहित्याने इटालियन साहित्यिकांच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती दिलीच; शिवाय एकूण यूरीपीय साहित्यावरही दान्तेने लक्षणीय परिणाम घडवून आणला. टी. एस्. एलियटसारख्या जागतिक कीर्तीच्या आधुनिक साहित्यश्रेष्टींनाही त्याने प्रभावित केले.
पीत्रार्क हा जसा श्रेष्ठ कवी,  तसाच एक मान्यवर विद्वनही होता. प्राचीन अभिजात साहित्याची ग्रीक-लॅटिन हस्तलिखिते जमविण्याच्या उद्देशाने त्याने यूरीपभर प्रवास केला. खंडित झालेल्या अभिजात साहित्यपरंपरेचे पुनरुज्जीवन करणे, ही पीत्रार्कची भूमिका होती, त्यामुळे लॅटिन भाषेसंबंधी त्याला आस्था होती; परंतु तिच्याकडे पाहण्याचा त्याचा हा दृष्टिकोणही नवा होता. काहीशा जिद्दीनेच त्याने लॅटिनमध्ये ग्रंथरचना केली आणि लॅटिनच्या सखोल अभ्यासामुळेच इटालियन साहित्यातही तो नवचैतन्य आणू शकला. त्याच्या काळातील इतर कोणत्याही साहित्यिकापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणि साहित्यात भावी प्रबोधनाची मानवतावादी बाजू जास्त ठळकपणे उमटलेली दिसते. पीत्रार्कने कवितेतील आत्मपरतेस प्राधान्य दिले. कवीचे अंतजीवन आणि भाववृत्ती यांचा उत्कट आविष्कार त्यात आढळतो. दान्तेच्या काव्यातून अवतरणारी बीआट्रिस ही आदरणीय देवता वाटते, तर पीत्रार्कच्या प्रेमकाव्यातील लॉरा ही हाडामांसाची मानवी स्त्री वाटते, हा फरक लक्षणीय आहे. पहिला आधुनिक कवी, असाही पीत्रार्कचा उल्लेख केला जातो. Canzoniere मध्ये (इं. शी. अ कलेक्शन ऑफ लिरिक्स) त्याची सुनीते, कांझोने इ. प्रकारांतील रचना अंतर्भूत आहे. सुनीत आणि कांझोने ह्यांच्या रचनेतील पूर्णत्वाची एक नवीच पातळी पीत्रार्कने गाठली. विशेषतः सुनीतरचनेच्या संदर्भात त्याचे अनुकरण इटलीत आणि इटलीबाहेरही फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे. इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड आदी देशांतील पीत्रार्कच्या अनुकरणाची ही प्रवृत्ती ‘पीत्रार्किझम’ ह्या नावाने ओळखली जाते.
चौदाव्या शतकातच जागतिक कथासाहित्यात मोलाची भर घालणारा देकामेरॉन (Decameron) हा ग्रंथ लिहिला गेला. ह्याचा कर्ता बोकाचीओ. ह्या कथाग्रंथात शंभर कथा आहेत. फ्लॉरेन्स शहरावर प्लेगच्या साथीमुळे मृत्यूची छाया पसरलेली असताना तीन तरूण आणि सात तरुण स्त्रिया ते शहर सोडून एका सुरक्षित ठिकाणी जातात आणि तेथे असताना दहा दिवस एकमेकांना गोष्टी सांगून आपले मन रिझवतात, अशी ह्या कथांमागची पार्श्वभूमी बोकाचीओने दाखविली आहे. पीत्रार्कप्रमाणेच ग्रीक आणि लॅटिन साहित्याबद्दल त्याला आदर होता आणि देकामेरॉननंतर तर त्याने केवळ लॅटिनमध्येच लेखन केले. तथापि त्याच्या या ग्रंथाने इटालियन गद्याला दिलेले वळण महत्त्वपूर्ण आहे. तस्कन बोलीला वाङ्‌मयीन मोल प्राप्त करून देण्यात बोकाचीओचा वाटाही मोठा आहे. बोकाचीओपूर्वीची इटालियन गद्यशैली सर्वसाधारणतः कृत्रिम आणि अलंकारप्रचुर होती. बोकाचीओने ती सहजसुंदर आणि कलात्मक केली व उत्कृष्ट गद्यशैलीचा एक आदर्शच निर्माण केला. मध्ययुगातील कथाकथनाची आणि मिथ्यकथांची संपन्न परंपरा इटालियन साहित्यात त्याने जिवंत ठेवली. तसेच साहित्य आणि सर्वसामान्य माणसांचे दैनंदिन जीवन ह्यांच्यात निकटचे नाते निर्माण केले. इटालियन वाङ्‌मयातील वास्तववादी प्रवृत्ती जोपासून बळकट केली. कवी म्हणून तो श्रेष्ठ नव्हता; तथापि ‘ओतावा रिमा’ ह्या छंदात त्याने काही सफाईदार काव्यरचना केली आहे. हा छंद शोधून काढण्याचे श्रेयही त्याला काही अभ्यासक देतात. फात्स्यो देल्यी ऊबेर्ती (सु. १३०७–सु. १३७०), चीनो दा पीसतोया (सु. १२६५–सु. १३३६), आंतॉन्यो पूत्‌ची (सु. १३१०–१३८८), जोव्हान्नी फ्योरेंतीनो, फ्रांको साक्केत्ती (सु. १३३०–१४००), आंद्रेआ दा बार्बेरीनो (सु. १३७०–सु. १४३१), याकोपो पास्साव्हांती (सु. १३०२–१३५७), दीनो कोमपान्यी (सु. १२५५–१३२४), जोव्हान्नी व्हिल्लानी (सु. १२७०–१३४८) हे या शतकातील काही उल्लेखनीय साहित्यिक. ऊबेर्तीने Dittamondo हे काव्य लिहिले, तर चीनो दा पीसतोयाने 'नूतन सुमधुर शैली'त काही उत्कृष्ट प्रेमगीते रचिली. आंतॉन्यो पूत्‌ची याने आत्मचरित्रात्मक सुनीते लिहिली. बोकाचीओच्या धर्तीवर फ्रांको साक्केत्ती ह्याने Trecentonovelle (इं. शी. थ्री हंड्रेड टेल्स) लिहिल्या. फ्योरेंतीनोनेही अशाच कथा लिहिल्या आहेत (Pecorone). आंद्रेआ दा बार्बेरीनो ह्याने काही रीमान्स लिहिले. सार्वजनिक चौकांतून त्याचे रीमान्स वाचले जात. धार्मिक गद्याच्या संदर्भात याकोपो पास्साव्हांती हे नाव विशेष उल्लेखनीय. त्याच्या Specchio di vera penitenza मध्ये (इं.शी.द. मिरर ऑफ ट्रू पेनिटन्स) त्याने १३५४ मध्ये दिलेली प्रवचने संगृहीत केलेली आहेत. त्यांतील धर्मभावनेची उत्कटता आणि उदात्त नीत्युपदेश लक्षणीय आहे. दीनो कोमपान्यी आणि जोव्हान्नी व्हिल्लानी हे दोघे इतिवृत्तकार फ्लॉरेन्सचे रहिवासी. इतिहास. इतिवृत्तलेखनाचे फ्लॉरेन्स हे केंद्रच झालेले होते. Cronica delle cose occorrenti ne tempi suoi (१३१०–१३१२) ह्या कोमपान्यीच्या इतिवृत्तात त्याने फ्लॉरेन्समधील काही तत्कालीन राजकीय घटना नमूद केल्या आहेत. निवेदनातील जिवंतपणामुळे आणि नाट्यात्मतेमुळे ते वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे. व्हिल्लानीच्या Cronica ची व्याप्ती फार मोठी आहे. इतिवृत्तलेखनाच्या मध्ययुगीन शैलीस अनुसरून ते लिहिले आहे. या इतिवृत्तात कोमपान्यीची नाट्यात्मकता आढळत नसली, तरी ऐतिहासिक तपशील सर्वसाधारणतः विश्वासार्ह असून इतिहासकारांना उपयुक्त असा आहे.

 

लेखक : अ. र.कुलकर्णी, ; राजेंद्र सिंह आहलूवालिया (इं.) ,द. स. शिरोडकर (म.)

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate