অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इटालियन साहित्य तेरावे शतक

इटालियन साहित्यनिर्मितीचा आरंभ

इटालियन साहित्यनिर्मितीचा आरंभ तेराव्या शतकात झाला. तत्पूर्वीची ग्रंथरचना लॅटिन भाषेत केली जात असे. अभिजात लॅटिन साहित्याचे अध्ययन परंपरेने चालत आले होते. युरोपातील इतर देशांच्या मानाने इटलीत स्वभाषेतील साहित्यनिर्मिती आरंभी तरी मंदगतीनेच झाली. ह्याची मुख्य कारणे दोन : अकराव्या-बाराव्या शतकांत पोपसत्ता आणि यूरोपातील राजसत्ता ह्यांची इटली ही एक युद्धभूमीच झाली होती; दुसरे म्हणजे वाङ्मयनिर्मितिक्षमता नसलेली एक क्षुद्र भाषा, असाच तिच्याकडे पाहण्याचा इटलीतील सुशिक्षित वर्गाचा दृष्टिकोण होता. अनेक कायदेशीर कागदपत्रांत मात्र इटालियन भाषेचा वापर केला गेल्याचे दिसते. बाराव्या शतकात इटलीतील राजदरबारांतून वावरणारे कवी प्रॉव्हांसाल भाषेत आपल्या कविता रचित. प्रॉव्हांसाल ही एके काळी दक्षिण फ्रान्समध्ये प्रचलित असलेली साहित्यभाषा. तेराव्या शतकातही सोरदेल्लोसारखा श्रेष्ठ इटालियन कवी आपली प्रेमगीत या भाषेतच रचित होता.

मौखिक परंपरा

मौखिक परंपरेने इटालियन लोकसाहित्य मात्र पूर्वीपासून जतन केले होते. त्यात ‘स्त्राबोतो’ आणि ‘बाल्लाता’ हे गीतप्रकार उल्लेखनीय आहेत. स्रांबोतोमध्ये मुख्यतः प्रेमगीते रचलेली आहेत. श्रमपरिहारार्थ ही गीते खेड्यापाड्यांतून गायिली जात. ‘बाल्लाता’ म्हणजे एक प्रकारचे नृत्यगीत. याशिवाय ‘मे’ गीते (वसंतगीते) अंत्यसंस्कारगीते, अंगाईगीते, बालगीते आणि कथनकाव्येही रचलेली आढळतात. सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींच्या अतिमानवी शक्तींवर आधारलेल्या बऱ्याच कथा आहेत. काही कथा अद्‌भुतरम्य धाडसाच्या आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या जीवनाभोवती विणलेल्या आहेत. कूटप्रश्न, उखाणे, म्हणी इत्यादीही आढळतात.

तेरावे शतक

तेराव्या शतकातील इटालियन गद्य बव्हंशी लॅटिन व फ्रेंच गद्याचा आदर्श पुढे ठेवून लिहिले गेले आहे. फ्रेंच आणि लॅटिन भाषांतील अनेक ग्रंथांची भाषांतरे ह्या काळात झालेली दिसतात. फ्रेंचवरून केलेली भाषांतरे मुखतः कथात्मक साहित्याची होती. राजा आर्थरवरील Tristano riccardiano हा ⇨रोमान्स  कोणा अज्ञात लेखकाने इटालियन भाषेत लिहिला. तत्पूर्वी चारणांच्या द्वारे आर्थर राजाच्या कथा इटलीत प्रसृत होऊन लोकप्रिय झाल्या होत्याच. हा रोमान्स उत्कृष्ट निवेदनशैलीने नटलेला आहे. राजा आर्थरवरील इटालियन भाषेतील हा पहिलाच रोमान्स. Novellino हा छोट्या कथांचा संग्रह म्हणजे इटालियन कथात्मक साहित्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होय. हा संग्रह लहान आणि मोठ्या अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध आहे व त्यात अनुक्रमे सु. शंभर व सु. दीडशे कथा आहेत.Le cento novelle antiche (लहान) आणि Libro di novelle et di bel parlare gientile (मोठा) अशा नावांनी ते ओळखले जातात. हर्क्युलीझ, नार्सिसस, हेक्टर, अलेक्झांडर, अ‍ॅरिस्टॉटल, सॉक्रेटीस इ. अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तींवरील कथा त्यात आहेत. तसेच धर्मगुरू, बिशप, जोगिणी, खगोलशास्त्रज्ञ, जादूगार, शेतकरी, सावकार इ. समाजातील विविध व्यावसायिकही कथांचा विषय झालेले आहेत. बहुधा १२८१ ते १३०० ह्या कालखंडात ह्या कथा लिहिल्या गेल्या असाव्यात. मार्को पोलोने पौर्वात्य देशांतील आपल्या प्रवासाचे वृत्त इटालियन भाषेच्याच व्हिनीशियन बोलीत लिहून ठेवले असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. तथापि त्या प्रवासवृत्ताची आज उपलब्ध असलेली प्राचीनतम प्रत फ्रेंचमध्ये आहे.

जाणीवपूर्वक वाङ्‌मयीन स्वरूपाचे लेखन करण्याचा पहिला प्रयत्न म्हणून Gemma Purpurea चा उल्लेख करावा लागेल. ह्या छोट्याशा पुस्तकात विविध प्रकारच्या पत्रलेखनासाठी उपयुक्त असे प्रत्येकी पंधरा वाक्यांचे नमुने आहेत. त्याचा कर्ता ग्वीदो फाबा हा बोलोन्या विद्यापीठात वक्तृत्वशास्त्राचा प्राध्यापक होता. बहुधा त्यानेच लिहिलेल्या Parlamenta et epistole (सु. १२४२) ह्या ग्रंथातही पत्रलेखन, वक्तृत्वकला इत्यादींचे नमुने दिले आहेत. ग्वीत्तोने दा रेत्सो (सु. १२२५–?) ह्या इटालियन कवीनेही नैतिक व धार्मिक आशयाची सु. पस्तीस पत्रे लिहून ठेवलेली आहेत. ह्यांतील काही पत्रे मात्र पद्यरूप आहेत.

सिसिली हे इटालियन कवितेच्या परंपरेचे उगमस्थान. पवित्र रोमन साम्राज्याचा जर्मन सम्राट दुसरा फ्रीड्रिख (११९४–१२५०) ह्याच्या आश्रयाने इटालियन कवितेचा पहिला संप्रदाय निर्माण झाला. विद्याकलांना त्याच्या दरबारात मुक्त प्रवेश होता. कवितालेखनाला त्याने फार मोठे उत्तेजन दिले. इटालियन काव्यपरंपरेतील पहिल्या सु. तीस कवींचा फ्रीड्रिखच्या दरबाराशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध होता. फ्रीड्रिखच्या आश्रयाने निर्माण झालेल्या संप्रदायातील सु. १२५ कविता आज उपलब्ध आहेत. तथापि ह्या संप्रदायातील सगळेच कवी सिसिलियन नव्हते; तसेच काव्यरचनेसाठी त्यांनी वापरलेल्या इटालियनच्या बोलीभाषाही समान नव्हत्या. प्रॉव्हांसाल भाषेतील भावगीतरचनेचा त्यांच्यावर निश्चितपणे प्रभाव होता. त्या भाषेतील काव्यप्रकारच त्यांनी उपयोगात आणले, पण नव्या जोमाने. सिसिलियन संप्रदायातील कवींनी मुख्यतः प्रेमगीते लिहिली. ‘कांझोने’ (भावकवितेचा एक प्रकार) आणि सुनीत हे काव्यप्रकार ह्याच संप्रदायाने इटालियन कवितेला दिले आहेत. सुनीतांपैकी सु. पंचवीस जाकोमो दा लेंतीनो (सु. ११९५–सु. १२४०) ह्याने रचिलेली आहेत. सुनीत ह्या काव्यप्रकाराचा लंतीनो हाच जनक असावा, असे मानले जाते. हा काव्य प्रकार त्याने अतिशय सफाईने हाताळून त्याचे तंत्र पूर्णत्वास नेले.

सम्राट दुसरा फ्रीड्रिख हा निव्वळ रसिक नसून कवीही होता, असे दिसते. त्याच्या नावावर चार कविता मोडतात. त्याचे दोन पुत्रही काव्यरचना करीत. प्येअत्रो देल्ला व्हीन्या ह्या सम्राट फ्रीड्रिखच्या मुख्य प्रधानानेही काव्यरचना केलेली आहे.

सिसिलीयन संप्रदायाचे इतर उल्लेखनीय कवी असे : रीनाल्दो दाक्वीनो, ग्वीदो देल्ले कोलोन्ने, याकोपो मोस्ताच्ची आणि मात्सेओ दी रीत्‌चो. Rosa Fresca aulentissima (फ्रेश अँड मोस्ट फ्रँग्रंट रोझ) अशा ओळीने प्रारंभ होणारे एक सुंदर संवादगीत आढळते; पण ते सिसिलियन पंथाचे नसावे.

सिसिलियन पंथाच्या अनुकरणाने कविता लिहिणाऱ्या तस्कन कवींत ग्वीत्तोने दा रेत्‌सो हा विशेष उल्लेखनीय. त्याने काही कांझोने आणि सुनीते लिहिली. बाल्लाता ह्या लोकगीतप्रकारात गीते लिहिणारा हा पहिला इटालियन कवी.

फ्रीड्रिखच्या मृत्यूनंतरही सिसिलियन संप्रदायाची कविता लिहिली जात होती; तथापि तिचा प्रभाव कमी होत होता आणि त्याच्यानंतर सिंहासनावर आलेल्या मॅनफ्रेडच्या निधनानंतर (१२६६) तर उत्तर इटली हे वाङ्‌मयनिर्मितीचे केंद्र बनले. लाँबर्डी येथे फ्रान्सिस्कन पंथायांनी धार्मिक आणि बोधवादी कवितेचा एक संप्रदाय सुरू केला होता. इटलीतील पो नदीच्या खोऱ्यातील बोलीभाषांवर आधारलेली एक वाङ्‌मयीन भाषा निर्माण करण्याचा ह्या संप्रदायाचा प्रयत्न होता; तसेच प्रॉव्हांसाल काव्य हे ह्या संप्रदायाचे स्फूर्तिस्थान नव्हते. स्वतः सेंट फ्रान्सिसचे Cantico di frate sole (इं. शी. कँटिकल ऑफ द सन) हे सूर्यसूक्त उल्लेखनीय आहे. याकोपोने दा तॉदी (सु. १२३०–१३०६) हा ह्या संप्रदायातील प्रमुख कवी. त्याने अनेक स्तोत्रे रचिली आहेत. ख्रिस्तावरील त्याची कविता विशेष प्रसिद्ध आहे. याकोपोनेची बहुसंख्य स्तोत्रे संवादरूप असून त्यांतील नाट्यात्मकता लक्षणीय आहे. इटालियन काव्यातील हा पंथही फार काळ टिकला नाही. त्यानंतरची कविता तस्कन कवींची.

तेराव्या शतकाच्या सुमारास तस्कन शहरातील नागर संस्कृतीचा चांगला विकास झाला होता. बोलोन्या येथे कायदा, तत्त्वज्ञान, वक्तृशास्त्र– ह्यांसारख्या विषयांचे ज्ञान देणारे विद्यापीठ अस्तित्वात होते. शहरीशहरी कलेची केंद्रे होती. अशा सांस्कृतिक वातावरणात तस्कन कवी वाढले होते आणि त्रूबदूरांचा (बाराव्या-तेराव्या शतकांत प्रॉव्हांसाल भाषेत प्रेमकविता रचून त्या स्वतःच संगीतबद्ध करणारे कवी) प्रभाव ह्या शहरांवर पूर्णांशाने नव्हता. सिसिलियन काव्यसंप्रदायालाच ह्या कवींनी एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आणि त्याचा विकास घडवून आणला. ग्वीदो ग्वीनीत्सेल्ली (१२४० ?–१२७६) आणि ग्वीदो काव्हालकांती (सु. १२५०–१३००) हे ह्या काव्यप्रवाहाचे प्रवर्तक. त्यास दान्तेने Dolce stil nuovo (नवी सुमधुर शैली) असे संबोधले आहे. प्रेम आणि उदात्तता ह्यांतील अपरिहार्य दुवा प्रस्थापित करणारा ग्वीनीत्सेल्ली हा बहुधा पहिलाच कवी. स्त्रीच्या रूपाऐवजी तिच्या आत्मिक गुणांचे मोल त्याच्या काव्यात महत्त्वाचे ठरले. काव्हालकांतीने तस्कन कवितेच्या तंत्रकौशल्यात कमालीची सफाई आणली. त्याची काही कविता दुर्बोध असली, तरी अरबी तत्त्वज्ञानाचा निकटचा परिचय असलेल्या एका विचारवंताचे मन तीतून प्रकर्षाने प्रत्ययास येते.

आंजोल्येअरी चेक्को (सु. १२६०–सु. १३१२) ह्या कवीची आत्मविडंबनात्मक कविता आतापर्यंतच्या गंभीर काव्यरचनेच्या पार्श्वभूमीवर वेगळी उठून दिसते. त्याच्या सुनीतांत वैफल्य, दारिद्र्य इत्यादींविषयीच्या तीव्र कडवटपणा असला, तरी त्याला विनोदाची धार आहे. प्रेमाचे वर्णन तो ‘गुलाबविरहित काटा’ असे करतो. सर्वसामान्यांच्या जीवनातील वास्तवता त्याच्या कवितेत अवतरते. इटालियन साहित्यातील वास्तववादी आणि विनोदगर्भ कवितेचा तो जनक होय. काही टीकाकार त्याला बोकाचीओचा पूर्वसूरी मानतात.

लेखक : अ. र.कुलकर्णी, ; राजेंद्र सिंह आहलूवालिया, (इं.) द. स. शिरोडकर,  (म.)

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate