অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इटालियन साहित्य पंधरावे शतक

इटालियन साहित्य पंधरावे शतक

पश्चिमी प्रबोधनाच्या ऐन प्रभावाचे हे शतक.त्यात दान्ते, बोकाचीओ आणि पीत्रार्क ह्यांच्या तोलाचे साहित्यिक झाले नाहीतच; परंतु  त्याच्या पहिल्या साठ वर्षात इटालियनमध्ये लिहिणारे साहित्यिकही अगदी थोडे आणि तेही सामान्य प्रतिभेचे असे होते. याउलट प्राचीन ग्रीक आणि लॅटिन साहित्याविषयीची आस्था पराकोटीस गेली होती. ह्या भाषांतील अभिजात साहित्यकृतींच्या हस्तलिखितांचे संशोधन करणे, त्यांचा साक्षेपी अभ्यास करणे अशांसारख्या कामांत इटालियन विद्वान गढून गेले होते. अशा प्रकारच्या आकादमिक कार्यासाठी त्यांना भक्कम राजाश्रय मिळत होता. फ्लॉरेन्स, मिलान, नेपल्स अशा राज्यांतून अनेक विद्वान सन्मानाने वावरत होते. मुख्यतः लॅटिन भाषेतच लेखन करण्याकडे ह्या विद्वानांचा कल होता. प्‍लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल ह्या ग्रीक तत्त्वज्ञांच्या ग्रंथांची लॅटिनमध्ये भाषांतरे करण्यात आली. फ्लॉरेन्स येथे प्लेटॉनिक अकादमीची स्थापना झाली. इटलीत प्रभावी असलेल्या मानवतावादाचीच ही वाङ्‌मयीन बाजू होय. ह्या काळातील लॅटिनच्या वर्चस्वामुळे इटालियन वाङ्‌मयावर अर्थातच प्रतिकूल परिणाम झाला. लिओनार्दो ब्रूनी (१३७४–१४४४), पॉद्‌जो ब्रात्‌चोलीनी (१३८०–१४५९), जोव्हान्नी आउरीस्पा (१३६९ ?–१४५९), लोरेंत्सो व्हाल्ला (१४०७–१४५७), फ्रांचेस्को फिलेल्फो (१३९८–१४८१) ही अशा मानवतावादी आणि लॅटिनप्रेमी विद्वानांची काही नावे. अशा विद्वानांनीही इटालियनमध्ये काही थोडेसे लेखन केले. उदा., ब्रूनोने दान्ते आणि पीत्रार्क ह्यांची चरित्रे लिहिली. फ्रांचेस्को फिलेल्फो ह्याने पीत्रार्कच्या Canzoniere वर भाष्य (अपूर्ण) लिहिले.  तथापि ह्या लेखनाने इटालियन साहित्याला फारशी गती मिळाली नाही.
लॅटिनविषयी प्रेम असूनही इटालियन भाषेचा अभिमान बाळगणारे काही मानवतावादी विद्वानही होते. त्यांत लेओन बात्तीस्ता आल्बेर्ती (१४०४–१४७२), पोलित्स्यानो (आंजेलो आंब्रोजीनी, (१४५४–१४९४) आणि याकोपो सान्नाद्झारो (१४५८ ?–१५३०) ह्यांचा समावेश होतो. आल्बोर्ती हा जसा साहित्यिक, तसा श्रेष्ठ वास्तुकार, शिल्पकार, चित्रकार, संगीतकार, वैज्ञानिक आणि गणितज्ञ होता. एका अर्थाने लिओनार्दो दा व्हींचीचा हा पूर्वावतार होय. त्याच्या इटालियनमधील लेखनात Della famiglia (इं. शी. ऑफ द फॅमिली) हा चार भागांत रचिलेला ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ म्हणजे आल्बेर्ती कुटुंबातील मंडळींचे विविध विषयांवरील संभाषण आहे. पहिल्या खंडात शिक्षणविषयक मौलिक विचार आले असून दुसऱ्यात विवाहविषयक चर्चा आहे. गृहकृत्ये आणि गृहव्यवस्था ह्या विषयास तिसरा खंड वाहिलेला आहे आणि चौथ्यात मैत्रीसंबंधीचे विचार आहेत. चित्रकला आणि शिल्पकला ह्यांवरही त्याने लेखन केले असून त्यांतील दृष्टिकोण खास प्रबोधनकालीन असा आहे. आल्बेर्तीने इटालियन काव्यरचनेची एक स्पर्धा आयोजित केली होती. तिला 'Certame coronario' (काँटेस्ट फॉर द क्राउन) असे म्हणत. दर्जेदार विषय पेलण्याची ताकद इटालियन भाषेत खासच आहे, हे सिद्ध करणे हा ह्यामागील हेतू होता. ह्या स्पर्धेतील कविता फार मोलाच्या नव्हत्या; तथापि अभिजात लॅटिन छंदांत इटालियन कविता रचण्याचा प्रयत्‍न तीत दिसून आला.
पोलित्स्यानोने काही उत्कृष्ट प्रेमगीते लिहिली; तसेच ऑर्फीअस आणि यूरिडिसी ह्या युगुलावर आधारित असे Orfeo हे इटालियनमधील पहिले लौकिक नाटक लिहिले (१४८०) त्याचा गाभा संपूर्णतः पेगन (प्राचीन ग्रीक-रोमनांचा बहुदेवतावादी धर्म) आहे. जूल्यानो मेदीचीच्या सन्मानार्थ लिहिलेले Stanze per la giostra (इं. शी. स्टँझाज फॉर द टूर्नामेंट) हे काव्यही श्रेष्ठ दर्जाचे आहे. पोलित्स्यानो हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी होय.
पोलित्स्यानोला राजाश्रय देणारा फ्लॉरेन्सचा राजा लोरेंझो दे मेदीची (१४४९–१४९२) हा स्वतः कवी होता. दान्ते आणि पीत्रार्क ह्यांच्या अनुकरणाने त्याने काही प्रेमकविता लिहिल्या. शारीरिक प्रीती, निसर्गप्रेम आणि पुराणकथांशी निगडित असलेली प्रतिमासृष्टी ही त्याच्या काव्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. त्याने धार्मिक विषयावरील एक नाटकही लिहिले होते. त्याच्या साहित्यसेवेच्या तुलनेने इटालियन लेखकांना त्याने दिलेला आश्रय आणि इटालियन साहित्य-संस्कृतिविषयक त्याची आस्था विशेष मोलाची आहे.
याकोपो सान्नाद्झारोने पीत्रार्कच्या धर्तीवर काही सुनीते, तसेच काही विनोदी एकभाषिते लिहिले. तथापि त्याची ख्याती मुख्यतः Arcadia (१५०४) ह्या त्याच्या रोमान्सवर अधिष्ठित आहे. संपन्न गद्यशैलीत लिहिलेल्या ह्या रोमान्समध्ये मेंढपाळांचे जीवन चित्रित केले आहे. त्यात काही गीतेही आहेत. पुढील शतकातील अनेकांना हा रोमान्स आदर्शवत ठरला. सुप्रसिद्ध इंग्रज कवी एडमंड स्पेन्सर (१५५२?–१५९९) आणि फिलिप सिडनी (१५५४–१५८६) ह्यांच्यावर त्याचा फार मोठा प्रभाव आढळून येतो.
ह्याच शतकात लूईजी पूल्‌ची (१४३२–१४८४) आणि मात्तेओ बोयार्दो (१४४१–१४९४) ह्या दोन कवींनी अनुक्रमे Morgante (१४८२) आणि Orlando Innamorato (१५२६, १५३१) ही शिलेदारी साहसांवर आधारलेली महाकाव्ये लिहून रम्याद्‌भुत महाकाव्यांचा एक नवाच प्रकार उदयास आणला. त्याशिवाय बोयार्दोने लिहिलेल्या काही गीतांचा समावेश ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ गीतांत केला जातो. लिओनार्दो दा व्हींची ह्याने वैज्ञानिक विषयांवर केलेले लेखनही उल्लेखनीय आहे.

पंधरावे शतक : पश्चिमी प्रबोधनाच्या ऐन प्रभावाचे हे शतक.त्यात दान्ते, बोकाचीओ आणि पीत्रार्क ह्यांच्या तोलाचे साहित्यिक झाले नाहीतच; परंतु  त्याच्या पहिल्या साठ वर्षात इटालियनमध्ये लिहिणारे साहित्यिकही अगदी थोडे आणि तेही सामान्य प्रतिभेचे असे होते. याउलट प्राचीन ग्रीक आणि लॅटिन साहित्याविषयीची आस्था पराकोटीस गेली होती. ह्या भाषांतील अभिजात साहित्यकृतींच्या हस्तलिखितांचे संशोधन करणे, त्यांचा साक्षेपी अभ्यास करणे अशांसारख्या कामांत इटालियन विद्वान गढून गेले होते. अशा प्रकारच्या आकादमिक कार्यासाठी त्यांना भक्कम राजाश्रय मिळत होता. फ्लॉरेन्स, मिलान, नेपल्स अशा राज्यांतून अनेक विद्वान सन्मानाने वावरत होते. मुख्यतः लॅटिन भाषेतच लेखन करण्याकडे ह्या विद्वानांचा कल होता. प्‍लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल ह्या ग्रीक तत्त्वज्ञांच्या ग्रंथांची लॅटिनमध्ये भाषांतरे करण्यात आली. फ्लॉरेन्स येथे प्लेटॉनिक अकादमीची स्थापना झाली. इटलीत प्रभावी असलेल्या मानवतावादाचीच ही वाङ्‌मयीन बाजू होय. ह्या काळातील लॅटिनच्या वर्चस्वामुळे इटालियन वाङ्‌मयावर अर्थातच प्रतिकूल परिणाम झाला. लिओनार्दो ब्रूनी (१३७४–१४४४), पॉद्‌जो ब्रात्‌चोलीनी (१३८०–१४५९), जोव्हान्नी आउरीस्पा (१३६९ ?–१४५९), लोरेंत्सो व्हाल्ला (१४०७–१४५७), फ्रांचेस्को फिलेल्फो (१३९८–१४८१) ही अशा मानवतावादी आणि लॅटिनप्रेमी विद्वानांची काही नावे. अशा विद्वानांनीही इटालियनमध्ये काही थोडेसे लेखन केले. उदा., ब्रूनोने दान्ते आणि पीत्रार्क ह्यांची चरित्रे लिहिली. फ्रांचेस्को फिलेल्फो ह्याने पीत्रार्कच्या Canzoniere वर भाष्य (अपूर्ण) लिहिले.  तथापि ह्या लेखनाने इटालियन साहित्याला फारशी गती मिळाली नाही.

लॅटिनविषयी प्रेम असूनही इटालियन भाषेचा अभिमान बाळगणारे काही मानवतावादी विद्वानही होते. त्यांत ⇨ लेओन बात्तीस्ता आल्बेर्ती (१४०४–१४७२), पोलित्स्यानो (आंजेलो आंब्रोजीनी, (१४५४–१४९४) आणि याकोपो सान्नाद्झारो (१४५८ ?–१५३०) ह्यांचा समावेश होतो. आल्बोर्ती हा जसा साहित्यिक, तसा श्रेष्ठ वास्तुकार, शिल्पकार, चित्रकार, संगीतकार, वैज्ञानिक आणि गणितज्ञ होता. एका अर्थाने लिओनार्दो दा व्हींचीचा हा पूर्वावतार होय. त्याच्या इटालियनमधील लेखनात Della famiglia (इं. शी. ऑफ द फॅमिली) हा चार भागांत रचिलेला ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ म्हणजे आल्बेर्ती कुटुंबातील मंडळींचे विविध विषयांवरील संभाषण आहे. पहिल्या खंडात शिक्षणविषयक मौलिक विचार आले असून दुसऱ्यात विवाहविषयक चर्चा आहे. गृहकृत्ये आणि गृहव्यवस्था ह्या विषयास तिसरा खंड वाहिलेला आहे आणि चौथ्यात मैत्रीसंबंधीचे विचार आहेत. चित्रकला आणि शिल्पकला ह्यांवरही त्याने लेखन केले असून त्यांतील दृष्टिकोण खास प्रबोधनकालीन असा आहे. आल्बेर्तीने इटालियन काव्यरचनेची एक स्पर्धा आयोजित केली होती. तिला 'Certame coronario' (काँटेस्ट फॉर द क्राउन) असे म्हणत. दर्जेदार विषय पेलण्याची ताकद इटालियन भाषेत खासच आहे, हे सिद्ध करणे हा ह्यामागील हेतू होता. ह्या स्पर्धेतील कविता फार मोलाच्या नव्हत्या; तथापि अभिजात लॅटिन छंदांत इटालियन कविता रचण्याचा प्रयत्‍न तीत दिसून आला.

पोलित्स्यानोने काही उत्कृष्ट प्रेमगीते लिहिली; तसेच ऑर्फीअस आणि यूरिडिसी ह्या युगुलावर आधारित असे Orfeo हे इटालियनमधील पहिले लौकिक नाटक लिहिले (१४८०) त्याचा गाभा संपूर्णतः पेगन (प्राचीन ग्रीक-रोमनांचा बहुदेवतावादी धर्म) आहे. जूल्यानो मेदीचीच्या सन्मानार्थ लिहिलेले Stanze per la giostra (इं. शी. स्टँझाज फॉर द टूर्नामेंट) हे काव्यही श्रेष्ठ दर्जाचे आहे. पोलित्स्यानो हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी होय.

पोलित्स्यानोला राजाश्रय देणारा फ्लॉरेन्सचा राजा लोरेंझो दे मेदीची (१४४९–१४९२) हा स्वतः कवी होता. दान्ते आणि पीत्रार्क ह्यांच्या अनुकरणाने त्याने काही प्रेमकविता लिहिल्या. शारीरिक प्रीती, निसर्गप्रेम आणि पुराणकथांशी निगडित असलेली प्रतिमासृष्टी ही त्याच्या काव्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. त्याने धार्मिक विषयावरील एक नाटकही लिहिले होते. त्याच्या साहित्यसेवेच्या तुलनेने इटालियन लेखकांना त्याने दिलेला आश्रय आणि इटालियन साहित्य-संस्कृतिविषयक त्याची आस्था विशेष मोलाची आहे.

याकोपो सान्नाद्झारोने पीत्रार्कच्या धर्तीवर काही सुनीते, तसेच काही विनोदी एकभाषिते लिहिले. तथापि त्याची ख्याती मुख्यतः Arcadia (१५०४) ह्या त्याच्या रोमान्सवर अधिष्ठित आहे. संपन्न गद्यशैलीत लिहिलेल्या ह्या रोमान्समध्ये मेंढपाळांचे जीवन चित्रित केले आहे. त्यात काही गीतेही आहेत. पुढील शतकातील अनेकांना हा रोमान्स आदर्शवत ठरला. सुप्रसिद्ध इंग्रज कवी एडमंड स्पेन्सर (१५५२?–१५९९) आणि फिलिप सिडनी (१५५४–१५८६) ह्यांच्यावर त्याचा फार मोठा प्रभाव आढळून येतो.

ह्याच शतकात लूईजी पूल्‌ची (१४३२–१४८४) आणि मात्तेओ बोयार्दो (१४४१–१४९४) ह्या दोन कवींनी अनुक्रमे Morgante (१४८२) आणि Orlando Innamorato (१५२६, १५३१) ही शिलेदारी साहसांवर आधारलेली महाकाव्ये लिहून रम्याद्‌भुत महाकाव्यांचा एक नवाच प्रकार उदयास आणला. त्याशिवाय बोयार्दोने लिहिलेल्या काही गीतांचा समावेश ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ गीतांत केला जातो. लिओनार्दो दा व्हींची ह्याने वैज्ञानिक विषयांवर केलेले लेखनही उल्लेखनीय आहे.

लेखक : अ. र.कुलकर्णी, ; राजेंद्र सिंह आहलूवालिया, (इं.) द. स. शिरोडकर, (म.)

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 12/7/2019

© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate