অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इटालियन साहित्य विसावे शतक

इटालियन साहित्य विसावे शतक

 

नवजागृतीच्या चळवळीने बाळगलेले एकात्म इटलीचे स्वप्न १८७० मध्ये साकार झाले. इटलीने विसाव्या शतकात दोन महायुद्धांचा अनुभव घेतला आणि फॅसिस्ट राजवटही पाहिली. महायुद्धांच्या आणि फॅसिझमच्या प्रभावकाळात इटालियन वाङ्‌‌मयाला प्रतिकूल स्थितीला तोंड द्यावे लागले. तथापि युद्धोत्तर काळातील इटालियन साहित्याने – विशेषतः कथात्मक साहित्य आणि काव्य ह्या क्षेत्रांत– महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आपल्या परंपरेच्या मूलस्रोतापासून दूर न होता इटालियन साहित्याने आधुनिक यूरोपीय साहित्याच्या प्रवाहात मोलाची भर घातली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक साहित्यिक ह्या शतकात उदयास आले आहेत आणि जगातील नामवंत समीक्षकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे.
विसाव्या शतकाच्या आरंभीचा विख्यात कवी, कादंबरीकार आणि नाटककार ग्राब्रिएले  दान्नून्त्स्यो (१८६३–१९३८) हा होय. आज त्याचा प्रभाव विशेष उरलेला नसला, तरी त्याच्या हयातीत त्याने बरीच कीर्ती मिळविली. कार्दूत्‌‌ची, स्विन्‌‌बर्न, नीत्शे आणि समकालीन रशियन कादंबरीकार ह्यांचा वैविध्यपूर्ण परिणाम दान्नून्त्स्योच्या लेखनावर झालेला होता व त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संकुल झाले होते. याचे प्रतिबिंब त्याच्या कवितेत उमटलेले आढळते. लैंगिकता आणि इंद्रियजन्य सुखे ह्यांच्या विचारांनी भारलेले मन, नैतिक बंधने झुगारून देण्याची प्रवृत्ती, मृत्यू, हिंसा आणि पशुता ह्यांबद्दलची ओढ आणि हे सारे आविष्कृत करणारा एक आदिम, आक्रमक सूर त्याच्या काव्यात आणि नाट्यकृतींत आढळतो. त्याची उत्कृष्ट भावकविता Laudi (१९३९) ह्या नावाने संगृहीत झालेली आहे. La figlia di Jorio (१९०४) हे त्याचे सर्वोत्कृष्ट नाटक. त्याच्या बऱ्याचशा कादंबऱ्यांतून सामाजिक भ्रष्टाचाराचे वातावरण आढळते. II trionfo della morte (१८९४, इं. भा. द ट्रायंफ ऑफ डेथ, १८९८) ही त्याची एक विशेष उल्लेखनीय कादंबरी. तिच्यावर नीत्शेच्या तत्त्वज्ञानाचा परिणाम जाणवतो.
दान्नून्त्स्योनंतरच्या काही तरूण कवींच्या भाववृत्तीवर नैराश्याची गडद झाक दिसून येते. उराशी बाळगलेली मूल्ये कोसळत चालल्याची जाणीव, तीमधून येणारा एक प्रकारचा रितेपणा आणि तरीही काहीतरी नवे घडविण्याची ओढ त्यांच्या काव्यातून आढळते. नवजागृतीच्या तेजस्वी चळवळीचे अखेरचे पर्व संपल्यानंतर उरलेल्या संधिप्रकाशात हे कवी वावरत होते. त्यामुळेच त्यांना ‘संधिप्रकाशातील कवी’ असे म्हणले गेले. ग्वीदो गोझ्झानो (१८८३–१९१६) हा ह्या संप्रदायातील प्रमुख कवी. Colloqui आणि L'amica di nonna Spreranza (इं. शी. द फ्रेंड ऑफ ग्रँडमदर स्पेरांझा) ह्या त्याच्या श्रेष्ठ काव्याकृती. सेर्जीओ कोराझ्झीनी (१८८७–१९०७), मारीनो मोरेत्ती (१८८५– ) आणि फाउस्तो मारीआ मारतीनी (१८८६–१९३१) हे ह्या संप्रदायातील इतर कवी होत. फिलीप्पो तोम्माझो मारीनेत्ती (१८७६–१९४४) ह्याने विसाव्या शतकाच्या आरंभी नवकालवाद (फ्यूचरिझम) ह्या साहित्य-कला संप्रदायाची उभारणी केली (१९०९). प्रचलित सौंदर्यमूल्यांना क्रांतिकारक धक्के देण्याची त्याची घोषणा होती. वैज्ञानिक आणि उद्योगप्रधान संस्कृतीला साजेशी गतिमानता कला-साहित्यात आणली पाहिजे असा त्याचा आग्रह होता. शब्दाची स्वायत्तता त्याने मोलाची मानली. ठराविक वाक्यरचनेच्या कोंडीतून कविता मूक्त व्हायला हवी, अशी त्याची धारणा होती. धैर्य, औद्धत्य आणि बंडखोरी हे कवितेचे आवश्यक घटक आहेत, असे त्याला वाटत होते. मारीनेत्तीची Zang-tumb-tuuum ही दीर्घ कविता आणि आदेंगो सोप्फीची ह्याचा Bif §Zft 18 हा काव्यासंग्रह नवकालवादी कवितेच्या संदर्भात विशेष उल्लेखनीय होय. अभिव्यक्तीचे अनेक धीट प्रयोग ह्या संप्रदायातील कवींनी केले. तथापि एकंदरीने साहित्यापेक्षा ललित कलांच्या क्षेत्रातच हा संप्रदाय विशेष प्रभावी ठरला.
पारंपरिक काव्यरचनेपेक्षा वेगळी वाट शोधण्याचा आणखी एक उल्लेखनीय प्रयोग फॅसिस्ट राजवटीच्या काळात झाला. हा ‘संप्रदाय एर्मेतिझ्मो’ ह्या नावाने ओळखला जातो. हा संप्रदाय फ्रेंच प्रतीकवाद्यांच्या प्रभावाने निर्माण झाला होता. विशुद्ध कविता हे ह्या संप्रदायातील कवींचे उद्दिष्ट. नेमक्या अभिव्यक्तीसाठी योग्य शब्द निवडणे आणि कवीच्या अभिप्रेत अर्थाहून वेगळ्या अर्थच्छटांपासून त्याला अलग करणे, ही ह्या काव्यरचनेची मुख्या प्रक्रिया. एखाद्या हवाबंद वस्तूसारखा आशय बंदिस्त ठेवण्याच्या ह्या प्रवृत्तीमुळेच ह्या संप्रदायास ‘एर्मेतिझ्मो’ अथवा ‘हर्मेटिक संप्रदाय’ असे नावे प्राप्त झाले. तुकट अभिव्यक्ती, असाधारण अलिप्तता आणि तीव्र उदासीनता ही ह्या संप्रदायातील काव्याची वैशिष्ट्ये. जुझेप्पे उंगारेत्ती (१८८८– ), दीनो कांपाना (१८८५–१९३२),  साल्व्हातोरे क्‍वाझीमोदो (१९०१– ), ऊंबेर्तो साबा (१८८३–१९५७), लिओनार्दो सिनिस्गाल्ली (१९०८– ) एऊजेन्यो मोंताले (१८९६– ) हे ह्या संप्रदायातील काही प्रमुख कवी. साल्व्हातोरे क्वाझीमोदा ह्यास १९५९ मध्ये नोबेल पारितोषिकाचा बहुमान प्राप्त झाला.
नाटकाच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ नाटककार म्हणून  लूईजी पीरांदेल्‍लो (१८६७–१९३६) मान्यता पावला. त्याच्या अनेक नाट्यकृतींपैकी Sei personaggi in cerca d'un autore (१९२१, इं. भा. सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथर, १९२३) ही विख्यात आहे. नाटककाराच्या शोधात सहा पात्रं ह्या नावाने त्याचा मराठी अनुवाद माधव वाटवे ह्यांनी केला आहे (१९६८). आधुनिक जगात वावरणाऱ्या माणसाची मानसिक अस्वस्थता, आपल्या अंतःविश्वाचा बाह्य जगाशी सुसंवाद साधण्यासाठी त्याची चाललेली धडपड आणि त्याला जाणवणारे कंटाळवाणे एकाकीपण आपल्या नाट्यकृतींतून दाखविण्यात पीरांदेल्लो यशस्वी झाला आहे. नाटक ह्या साहित्यप्रकाराकडे वळण्यापूर्वी पीरांदेल्लोने कथा-कांदबऱ्या लिहिल्या होत्या. II fu Mattia Pascal (१९०४, इं भा. द लेट मात्तीआ पास्कल, १९२३) ही कादंबरी आणि La giara सारख्या (इं. शी. द जार) अनेक लघुकथा कीर्ती पावल्या आहेत. पीरांदेल्लोला १९३४ चे नोबेल पारितोषिक मिळाले.
विसाव्या शतकातील आरंभीच्या काळात आघाडीचे कादंबरीकार म्हणून ⇨ ग्रात्स्या देलेद्दा (१८७१?–१९३६) आणि ईतालो झ्वेअव्हो (१८६१–१९२८) ह्यांची नावे उल्लेखनीय आहेत. ग्रात्स्या देलेद्दा ही १९२६ ची नोबेल पारितोषिक विजेती. सार्डिनिया बेटाची पार्श्वभूमी तिच्या अनेक कादंबऱ्यांत घेतलेली आढळून येते. आपल्या व्यक्तिरेखांच्या अंतर्जीवनावर तिचे लक्ष विशेष केंद्रित झालेले दिसते. समकालीन लेखकांना जाणवणारे नैराश्य तिच्या कादंबऱ्यांतूनही प्रगट झालेले आहे. Elias Portolu (१९०३) ही तिची सर्वश्रेष्ठ कादंबरी. La coscienza di Zeno (१९२३, इं. भा. द कन्फेशन्स ऑफ झीनो, १९३०) ही ईतालो झ्वेअव्होची सर्वोत्कृष्ट कादंबरी. सूक्ष्म मनोविश्लेषण हे त्याच्या कादंबरीलेखनाचे वैशिष्ट्य. त्याच्या लेखनस्वभावाचे नाते जेम्स जॉइस आणि प्रूस्त ह्या साहित्यिकांशी जोडण्यात येते. रिक्कार्दो बाच्चेल्ली (१८९१– ) ह्याने ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या II diavolo al pontelungo (१९२७, इ. भा. द डेव्हिल अ‍ॅट द लाँग ब्रिज, १९२९) आणि II mulino del Po (३ खंड, १९३८–१९४०, इं. भा. द मिल ऑन द पो, २ खंड, १९५२) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. द मिल ऑन द पो ह्या कादंबरीत १८१५ ते १९२१ पर्यंतच्या इटालियन जीवनाचा आलेख आढळतो. ह्या कादंबरीमुळे इटालियन संस्कृतीचा उद्‍‍गाता म्हणून मांझोनीइतके महत्त्वाचे स्थान बाच्चेल्लीला प्राप्त झाले. जोव्हान्नी पापीनी (१८८१–१९५६) ह्याच्या Un uomo finito (१९१२, इ. भा. अ मॅन–फिनिश्ड, १९२४) ह्या आत्मचरित्रास जागतिक कीर्ती लाभली.Fontamara (१९३३) आणि Pane e vino (१९३७, इं. भा. ब्रेड अँड वाइन) ह्या ईन्यात्स्यो सीलोने (१९००– ) ह्याच्या दोन प्रसिद्ध कादंबऱ्या. ईन्यात्स्यो राजकीय अज्ञातवासात वावरत असल्यामुळे इटलीबाहेरील वाचकांस त्या आधी परिचित झाल्या. फॅसिस्ट राजवटीविरुद्ध दिलेला लढा हा ह्या दोन्ही कादंबऱ्यांचा विषय. दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ कथात्मक साहित्याच्या दृष्टीने विशेष सर्जनशील ठरला. महायुद्धाचा प्रत्यक्ष अनुभव इटलीने घेतलेला असल्यामुळे युद्धकालीन जीवनाच्या व्यथा, युद्धोत्तर काळातील नव्या वातावरणाची जाणीव आणि नव्या जीवनाच्या आकांक्षा ह्या कथात्मक साहित्यातून व्यक्त होऊ लागल्या.
एलीओ व्हित्तोरीनी (१९०८–१९६६) आणि चेझारे पावेसे (१९०८—१९५०) ह्यांच्या अनुक्रमे Conversazione in Sicilia (इं. भा. कॉन्व्हर्सेशन इन सिसिली, १९४९) आणि Paesi tuoi  ह्या दोन कादंबऱ्या १९४१ मध्ये प्रसिद्ध झाल्या आणि इटालियन कादंबरीने विकासाचा एक नवा टप्पा गाठला. युद्धोत्तर काळात इटलीत प्रभावशाली ठरलेल्या नव-वास्तववादाला ह्या दोन कादंबऱ्या बऱ्याचशा प्रेरक ठरला. ह्या नव-वास्तववादाची बीजे एकोणिसाव्या शतकातील इटालियन वास्तववादातच आढळतात. साधी, अकृत्रिम शैली आणि सूक्ष्म मनोविश्लेषण ही ह्या संप्रदायातील कथा-कादंबऱ्यांची मुख्य वैशिष्ट्ये. La spiaggia (१९४२), Feria d'agosto (१९४६), II compagno (१९४७, इं. भा. द कॉम्रेड, १९४९) आणि La luna ei falo (१९५०, इं. भा. द मून अँड द बॉनफायर, १९५२) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. सर्वंकष राजकीय सत्तेमुळे होणारा संस्कृतीचा विध्वंस, त्यामुळे आयुष्यात जाणवणारी हेतुशून्यता आणि दारुण भ्रमनिरास ह्यांचे परिणामकारक चित्र त्याच्या कादंबऱ्यांतून उभे राहते. फॅसिस्ट राजवटीचे विदारक मूल्यमापन व्हित्तोरीनीच्या कादंबऱ्यांतून आढळते. Le donne di Messina (१९४९, इं. भा. विमेन ऑन द रोड, १९६१), La Garibaldina ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या.
ह्या दोन कादंबरीकारांनंतर व्हास्को प्रातोलीनी (१९१३– ) याचा उल्लेख आवश्यक आहे. Cronache di poveri amanti (१९४७, इ. भा. अटेल ऑफ पुअर लव्हर्स, १९४९) ही त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी. फ्‍लॉरेन्समधील श्रमिकांच्या जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण तीत आहे.
कार्लो लेव्ही (१९०२– ),  आल्बेर्तो मोराव्हीआ (१९०७– ) आणि ईतालो काल्व्हीनो हे आणखी काही नामवंत साहित्यिक. Cristo si e fermato a Eboli (१९४६, इं. भा. ख्राइस्ट स्टॉप्ड अ‍ॅट एबोली, १९४७) ह्या कादंबरीत कार्लो लेव्हीने एका जिल्ह्यातील जीवनाचे चित्र रेखाटले आहे.  ह्या कादंबरीतील सामाजिक आणि राजकीय अंतःसूर स्पष्ट आहेत. तसेच तीमधील काही भाग आत्मचरित्रात्मकही आहे.
आल्बेर्तो मोराव्हीआ हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कथा-कादंबरीकार आहे. La Romana (१९४७. इं. भा. द वूमन ऑफ रोम, १९४९) ही त्याची विख्यात कादंबरी. वेश्याजीवनात अधःपतित झालेल्या एका स्त्रीच्या जीवनाचे प्रखर वास्तववादी चित्रण तीत आहे. मोराव्हीआच्या एकूण लेखनात मानवी मनाच्या व्यापारांविषयी एक मूलगामी कुतूहल आढळून येते. त्याच्या निरीक्षणाचे क्षेत्रही उत्तरोत्तर सखोल आणि व्यापक होत गेले आहे.
युद्धोत्तर काळातील इटालियन लेखकांचा इतर यूरोपीय साहित्याशी आणि अमेरिकन साहित्याशी निकटचा संपर्क आला. कार्लो एमील्यो गाद्दा (१८९३– ) ह्याची Quer pasticciaccio ... सारखी (१९५७) कादंबरी जेम्स जॉइसचा प्रभाव दर्शविते, तर दीनो बझ्झातीच्या कथांवर काफ्काचा परिणाम जाणवतो.
तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि समीक्षा ह्या क्षेत्रांत बेनीदेत्तो क्रोचेचे (१८६६–१९५२) नाव सर्वाधिक महत्त्वाचे आहे. इटालियन बौद्धिक जीवनास एक आधुनिक द्दष्टी देण्याचा प्रयत्‍न त्याने केला. हे कार्य त्याने मुख्यतः La Critica (१९०३–१९४४) ह्या आपल्या द्वैमासिकातून केले. La filosofia dello spirito (४ खंड, १९०२–१९१२, इं. शी. फिलॉसॉफी ऑफ स्पिरिट) ह्या त्याच्या ग्रंथाने समकालीन वैचारिक विश्वात क्रांती घडवून आणली. ह्या ग्रंथात त्याने कलेच्या आणि अंतःप्रज्ञेच्या निकट संबंधांवर भर दिला आहे. विसाव्या शतकात इटलीमध्ये प्रत्यक्षार्थवादाविरुद्ध जी प्रतिक्रिया घडून आली तिचे नेतृत्व क्रोचेने केले. तो चिद्‌‌वादी होता. जागतिक कीर्तीच्या समीकरणांत क्रोचेचे नाव अंतर्भूत आहे. त्याच्या विचारांनी अनेक समीक्षक प्रभावित झाले. जोव्हान्नी जेंतीले (१८७५–१९४४) ह्याने क्रोचेच्याच चिद्‌‌वादी विचारांचा पाठपुरावा केला. तथापि केवल चिद्‌‌वादाचे समर्थन करताना राजकीय संदर्भात त्याने सर्वंकष सत्तेचा पुरस्कार केला. La filosofia dell' arte (१९३१, इं. शी. फिलॉसॉफी ऑफ आर्ट) हा त्याचा ग्रंथ महत्त्वाचा आहे. जूझेप्पे आंतॉन्यो बोर्जेसे (१८८२–१९५२), रेनातो सेर्रा (१८८४–१९१५), लूईजी रूसो (१८९२–१९६१), फ्रांचेस्को फ्लोरा (१८९१– ), कार्लोबो, मारीओ प्राझ (१८९६– ), मारीओ फूबीनी (१९००– ) हे आणखी काही उल्लेखनीय समीक्षक होत.
बोर्जेसेने आपल्या II corriere della sera (इं. शी. द ईव्हनिंग पोस्ट) ह्या दैनिकातून आल्बेर्तो मोराव्हीआसारख्या अनेक श्रेष्ठ साहित्यिकांचा परामर्श घेतला. सेर्रा हा क्रोचेचा एक समर्थ विरोधक. लूईजी रूसो ह्याने Storia della critica contemporanea (१९३५–१९४२, इं. शी. हिस्टरी ऑफ कंटेंपररी क्रिटिसिझम) लिहून इटलीतील आधुनिक समीक्षासिद्धांताचा परिचय करून दिला. फ्रांचेस्को फ्लोरा आणि कार्लो बो ह्यांनी वन्याजुन्या इटालियन साहित्यिकांचे मूल्यमापन केले. मारीओ प्राझ ह्याने क्रोचेच्या सौंदर्यशास्त्रावर टीका केली. La carne, la morte e il diavolo nella letteratura romantica (इं. भा. द रोमँटिक अ‍ॅगनी) हा त्याचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. काही कादंबऱ्यांतून आणि कवितांतून आढळणाऱ्या युरोपच्या र्‍हासाचे अभ्यासपूर्ण चित्र त्याने त्यात उभे केले आहे. मारीओ फूबीनी हा आजचा प्रमुख इटालियन समीक्षक असून तो क्रोचेच्या विचारांचे पुनर्मूल्यांकन करीत आहे. वाङ्‌‌मयकृतीच्या शब्दकळेचा तिच्या निर्मितिकाळाच्या संदर्भात चिकित्सकपणे विचार करणाऱ्या समीक्षासंप्रदायात व्हीत्तॉर्यो ब्रांका ह्याचा अंतर्भाव होतो.
फॅसिस्ट राजवटीच्या काळातील तात्पुरत्या पीछेहाटीनंतर इटालियन साहित्य पुन्हा नव्या जोमाने आणि ताज्या सर्जनशील सामर्थ्याने वाटचाल करीत आहे.
लेखक : अ. र.कुलकर्णी; राजेंद्र सिंह आहलूवालिया(इं.), द. स.शिरोडकर (म.)
संदर्भ : 1. Burckhardt, Jacob: Trans. Middlemore, S. G. C. The Civilisation of the Renaissance in Italy, London, 1951.
2. De Sanctis, Francesco, A History of Italian Literature, New York, 1960.
3. Pacifici, S. A Guide to Contemporary Italian Literature, New York, 1962.
4. Whitfield, J. H. A Short History of Italian Literature, Gloucester (Massachusetts), 1960.
5. Wilkins, E. H. A History of Italian Literature. Cambridge (Massachusetts), 1954.

 

अंतिम सुधारित : 3/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate