অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इतिवृत्तअ (क्रॉनिकल)

इतिवृत्तअ (क्रॉनिकल)

महत्त्वपूर्ण प्राकृतिक व ऐतिहासिक घटनांची कालक्रमानुसार केलेली नोंदणी. इतिहासलेखन आणि इतिवृत्त यांची आधारसामग्री एकच असली, तरी या दोन लेखनप्रकारांत फरक आहे. इतिवृत्ते जुन्या काळात निर्माण झाली असून त्यांत मुख्यतः सर्वसाधारण वाचकांसाठी सरळ व वस्तुनिष्ठ भूमिकेवरून रचनाकाराला ठळक ठळक वाटणाऱ्या घटना कालनिर्देशासह संकलित केलेल्या असतात. म्हणूनच इतिवृत्ते इतिहासाच्या सांगाड्यासारखी असून त्यांत भाष्य किंवा मीमांसा यांचा प्रायः अभाव असतो. इतिहासलेखन ही एक इतिवृत्ताचीच परिणत अवस्था म्हणावयास हरकत नाही. त्यात घटनांच्या नोंदीशिवाय त्यांवरील भाष्य किंवा मीमांसाही केलेली आढळते. तथापि इतिवृत्तांना विशिष्ट प्रकारचे महत्त्व लाभलेले असते. विशेषतः मूळची कागदपत्रे उपलब्ध नसतील, तर इतिवृत्तांतील मजकूर तात्पुरता ग्राह्य मानण्यात येतो.

प्राचीन काळी प्रतिवार्षिक वृत्तांत असलेली इतिवृत्ते तयार करीत असत. चीनमधील वासंतिक किंवा शारदीय इतिवृत्ते किंवा रोममधील अधिकाऱ्यांची नावे तथा गतवर्षीय घटनांची नोंद असलेली अ‍ॅनल्स मॅझिमी  ही प्रतिवार्षिक इतिवृत्तेच होत. याच धर्तीवर ईजिप्शियन, अ‍ॅसिरियन, बॅबिलोनियन, फिनिशियन यांसारख्या प्राचीन संस्कृतींत पंचांगे, राज्यारोहण-दिन अथवा महत्त्वाचे वर्धापनदिन यासंबंधीच्या याद्या, वंशावळी इ. तयार केलेली आढळतात. त्यांतच त्यांनी प्रसंगोपात्त घडलेल्या असाधारण व अद्‌भुतरम्य घटनांचीही नोंद करून ठेवलेली आहे. अशी इतिवृत्ते बहुधा प्रतिवर्षी तयार करण्यात येत असत. बायबलमधील जुन्या कराराचे दोन भाग म्हणजे इतिवृत्तेच असून हिब्रू भाषेत ते एकत्र केलेले आहेत. त्यांत वंशावळी, डेव्हिड व सॉलोमन यांच्या कारकीर्दीचा आणि ज्युडाच्या राज्याचा इतिहास असे तीन विभाग आढळतात. हिब्रू भाषेतील अशाच एका इव्हेंट्स ऑफ द टाइम  या नावाच्या इतिवृत्ताचे सेंट जेरोमीने लॅटिनमध्ये भाषांतर केले असून त्याला त्याने प्रथमतःच क्रोनिकॉन हे नाव दिलेले आढळते. सेंट जेरोमीचे प्रस्तुत भाषांतरच पुढील इतिवृत्तलेखकांना आदर्शभूत ठरले. बाराव्या शतकानंतर यूरोपीय प्रबोधनकाळाच्या आसपास इतिवृत्तलेखन सर्व यूरोपीय भाषांतून होऊ लागले. मठवासीयांप्रमाणेच सामान्य लोकांनीही हा लेखनप्रकार हाताळल्याचे दिसून येते. इतिवृत्तांची रचना गद्याप्रमाणेच पद्यांतूनही केली जाई. क्रॉनिकल ऑफ द मोरीया  हे इतिवृत्त कोण्यातरी अज्ञात इसमाने चौदाव्या शतकात लिहिले असून त्यात ग्रीक पद्ये आढळतात. या इतिवृत्ताची फ्रेंच, इटालियन इ. भाषांत भाषांतरेही झालेली आहेत.

इतिवृत्तलेखक बहुधा आपल्या आधारसामग्रीचा निर्देश करीत नाहीत. परंपरेने चालत आलेल्या आख्यायिकांचाच व पुष्कळदा ऐकीव माहितीचा ते आपल्या लेखनात उपयोग करून घेतात. असे करताना त्या त्या घटनांमागील सत्यासत्याची शहानिशा ते करीत नाहीत. तसेच तत्कालीन घटनांची महत्त्वसापेक्षतेनुसार निवड न करता प्रमुख घटनांच्या वर्णनात निरर्थक, विक्षिप्त व गौण घटनांचीही पूर्णपणे सरमिसळ करून टाकतात.

इतिवृत्तांत शैलीदृष्ट्या कृत्रिमतेचा पूर्णपणे अभाव असतो. ती वाङ्‌मयीन दृष्टीनेही मनोरंजक व आकर्षक ठरतात. भारतात अशी इतिवृत्ते झाली आहेत. कल्हणाची राजतरंगिणी  अंशतः इतिवृत्तच आहे. मुसलमानी व मराठी काळांत बरीच इतिवृत्ते तयार झाली. हफ्तकुर्सी, मआसिर-इ-आलमगीरी, दिल्ली क्रॉनिकल, जेधे व शिवकालीन इतर शकावल्या, पंतप्रधान यांच्या दोन शकावल्या इ. याच सदरात मोडतात.

लेखक: चंद्रहास जोशी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/13/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate