অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्तररामचरित

उत्तररामचरित

भवभूतीचे संस्कृत नाटक. उत्तररामचरिताच्या सात अंकांत रामकथेचा उत्तरार्ध भवभूतीने रंगविला आहे. ध्येयनिष्ठेच्या आहारी जाऊन रामाने केलेला सीतात्याग, शंबूकवधासाठी रामाचे पंचवटीत आगमन, सीतेचा प्राणत्यागाचा प्रयत्‍न, भागीरथीने तिचे प्राण वाचवून जलात प्रसूत झालेल्या तिच्या जुळ्या पुत्रांचे वाल्मीकीच्या हातून करविलेले संगोपन, नंतर बारा वर्षांनी मुलांच्या वाढदिवसाचे धार्मिक कर्तव्य करण्यासाठी सीतेचे पंचवटीत आगमन, वनवासातील राम-सीतेची सखी वासंती हिची रामाशी भेट, तिच्या कठोर छेडण्यामुळे तसेच परिचित प्रसंगांच्या आठवणींनी उफाळून आलेला रामाचा शोक आणि त्यातून रामाच्या अनन्य प्रेमाची साक्ष मिळून सीतापरित्यागाच्या दुःखाचा झालेला परिहार, अश्वमेधीय घोड्याच्या रक्षणार्थ आलेल्या चंद्रकेतूचे लवाशी झालेले प्रलयंकर युद्ध, रामाने घडवून आणलेली शांती, सर्व वडीलधाऱ्या मंडळींचे वाल्मीकि-आश्रमात मीलन, त्यांच्या रामाबद्दलच्या प्रतिक्रिया, रामाची लव-कुशांशी भेट, वाल्मीकीच्या नाटकाचा अयोध्येच्या प्रजाजनांपुढे प्रयोग आणि शेवटी राम-सीतेचे पुनर्मीलन, असा नाट्यकथेचा विकासक्रम आहे.

रामायणातील कथेत भवभूतीने केलेले बदल तसेच नाटकासाठी निर्मिलेले प्रसंग व पात्रे केवळ नाट्यसौकर्यासाठी नाहीत. सीतात्यागापासून राम-सीतेच्या पुनर्मीलनापर्यंतची वाटचाल केवळ काव्याला कलाटणी देऊन नाटकाचा सुखान्त साधावा म्हणून झाली नसून एका नव्या सूत्रात सर्व घटना गुंफण्यासाठी झालेली आहे. या रचनेत प्रत्येक दुव्याला नाट्यप्रयोजन आहे. ऋष्यशृंगाच्या बारा वर्षांच्या यज्ञसत्रात वसिष्ठ, अरुंधती, राजमाता गुंतल्याने एकाकी पडलेल्या रामाचा ध्येयनिष्ठ पण ऐकांतिक निर्णय जणू अपरिहार्य बनतो. रामाची वासंतीशी अकल्पित भेट आणि याचवेळी सहेतुकपणे घडलेले अदृश्य सीतेचे आगमन या नाट्ययोगाने प्रजेपासून झाकून ठेवलेल्या रामाच्या अगाध मनाचे दर्शन घडते आणि सीतेलाही रामाची वेदना, त्याचे प्रेम आणि त्याच्या निर्णयाची मनोभूमी कळून येते. पुढील घटनांत सर्व थोर मंडळी वाल्मीकि-आश्रमात एकत्र आणण्याचे नाट्याकौशल्य तर आहेच, पण त्यांच्या रामाबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त होण्यासाठी ही नाट्ययोजना आहे, हेही स्पष्ट आहे. लव-कुशांच्या भेटीत अधीर आशेचे नाट्य आहे आणि या भेटीतूनच सीता जिवंत असल्याचा विश्वास रामाला वाटतो. त्यानंतर वाल्मीकीने रामकथेवर रचिलेले ‘गर्भनाटक’ आणि भरतमुनींनी देवादी प्रेक्षकांच्या समवेत; अयोध्येच्या प्रजाजनांना गंगातीरावर मुद्दाम उभारलेल्या भव्य मंडपात आणून अप्सरांकरवी त्याचा केलेला प्रयोग म्हणजे कल्पक रचनेचा विलासच. या नाट्याने सीतेच्या शुद्धीची ग्वाही मिळून नाट्यदृष्ट्या तरी राम-सीता एकत्र येतात.

संविधानकाची कलात्मक गुंफण हे उत्तररामचरिताचे एक मोठे यश, तसे काव्यमय सूचक वातावरणाची निर्मिती, हे दुसरे. पहिल्या अंकातील चित्रदर्शनाच्या निमित्ताने राम-सीतेच्या अद्वैत-प्रेमाचे दर्शन आणि आगामी विरहाची सूचना, दुसऱ्या-तिसऱ्या अंकांत निसर्ग, मयूर, गजशावक इत्यादींच्या वर्णनांतून बारा वर्षे उलटल्याच्या काव्यमय सूचना, दंडकारण्याच्या आणि संगमाच्या चित्रात दिसणारे निसर्गाचे गंभीर-भीषण रूप, लव-चंद्रकेतूंच्या संग्रामातील प्रलयंकारी वीरभाव, आश्रमातील बटूंचा निरागस दंगा ही वर्णने आणि अदृश्य सीता आणि राम, लव आणि चंद्रकेतू, कुश-लव आणि राम यांच्या भेटीतील नाट्यछलित आणि त्याभोवती गुंफलेलेमनोभाव यांनी उत्तररामचरिताची कलात्मकता अधिक गहिरी केली आहे. भावनांचे बारकावे धाग्या-धाग्यांनी उलगडून दाखविण्याचे भवभूतीचे काव्यकौशल्य इथे बहराला आले आहे. लोकोत्तर रामाच्या लोकोत्तर शोकाचीअभिव्यक्ती करताना त्याच्या भाषेने विलक्षण सामर्थ्य दाखविले आहे.

प्रेमाचे अद्वैत साधलेल्या रामाने पत्‍नीचा त्याग कसा करावा? प्रजानुरंजनासाठी राजकर्तव्य म्हणून हे झाले असे मानले, तरी लोकमत आणि अनुरंजन म्हणजे तरी काय? अशी व्दिविध समस्या उत्तररामचरितात आहे. नाट्यकथेची ही दुहेरी वीण लक्षात घेतल्यावाचून भवभूतीच्या समग्र नाट्यरचनेचा अर्थच लागणार नाही. रामसीतेचे एकमेकांवरील प्रेम निरपवाद आहे; म्हणून त्यांचे हृदयमीलन तिसऱ्या अंकातच होते; परंतु लोकमताचा ऐकांतिक आदर करणाऱ्या रामाला, राजा हा प्रजेचा खुषमस्कऱ्या नसून एक निष्ठुर पण निःपक्षपाती न्यायाधीश असतो, अशी जाणीव जनकाचा क्रोध आणि लवाचा निर्व्याज उपहास यांमुळे होते. गर्भनाटकाने जनमताची लाज उघडी पडते. एवढे झाल्यावरच नाटक संपते. उत्तररामचरित हे केवळ दांपत्यप्रेमाचे किंवा प्रेमाच्या आदर्शाचे नाटक नव्हे. पतिपत्‍नीची अगाध प्रेमनिष्ठा आणि कर्तव्याचा अन्वयार्थ हा उत्तररामचरिताचा कलात्मक आशय होय.

भवभूतीच्या लेखनातील वस्तू किंवा भाव यांचे अतिरिक्त वर्णन, व्यक्तिदर्शनापेक्षा रसदर्शनावर भर, बोलक्या संवादांपेक्षा अवडंबरी भाषा, पुनरुक्ती, आत्मप्रौढी इ. दोष टीकाकारांनी या नाटकातही दाखविले आहेत. परंतु रामकथेवर नव्या अर्थाचा उदात्त साज चढवून जे नाट्यकाव्य भवभूतीने निर्मिले त्याची श्रेष्ठता त्यामुळे कमी होत नाही.

संदर्भ : मिराशी, वा. वि. भवभूति, मुंबई, १९६८.

लेखक: गो. के.  भट

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate