অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऋग्वेद

ऋग्वेद

ऋग्वेद हे भारतीय व इंडो-यूरोपीय साहित्यातील सर्वांत प्राचीन असे साहित्य होय. ऋग्वेदातील थोडी अतिप्राचीन सूक्ते आर्यांच्या मूलस्थानी म्हणजे उत्तर ध्रुवाकडे रचलेल्या सूक्तांपैकी आहेत, असे लोकमान्य टिळकांसारख्या संशोधकांना वाटते; परंतु बहुतेक सूक्ते ही अफगाणिस्तान ते पंजाब या प्रदेशांत म्हणजे सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवरील प्रदेशांत रचिली गेली, असे अंतर्गत प्रमाणांवरून दिसते. भारताच्या वायव्य प्रदेशापासून दिल्लीपर्यंतचा प्रदेश हा सप्तसिंधुप्रदेश म्हणून निर्दिष्ट केलेला आहे. 'सिंधु' शब्दाचे दोन अर्थ : नदी हा सामान्य अर्थ आणि सिंधू नदी हा विशेषार्थ.

ऋग्वेदाच्या सूक्तरचनांचा काल इ. स. पू. तीन सहस्र वर्षांपूर्वीचा काही विद्वान मानीत असले, तरी साधारणपणे इ. स. पू. चौदाव्या शतकापासून अलीकडे व इ. स. पू. दहाव्या शतकाच्या पलीकडे असा सु. तीनशे ते चारशे वर्षांचा असावा. ह्या बाबतीत बर्‍याच संशोधकांत मतैक्य आहे. हा काळ म्हणजे वैदिक आर्यांचा भारतात प्रवेश झाल्यानंतरचा येथे स्थिरावण्याचा काळ होय. हा काळ इ. स. पू. पंधराव्या शतकाच्या अलीकडचा होय. ही सूक्त निरनिराळ्या ऋषिकुलांमध्ये वंशपरंपरेने रचिली जात होती. ऋग्वेदामधील दोन ते सात ही सहा मंडले ऋषिकुलमंडले होत व हा ऋग्वेदसंहितेचा सर्वांत प्राचीन गाभा मानतात. त्यात सूक्तकार आपल्या पूर्वीच्या सूक्तकारांचाही अनेक वेळा निर्देश करतात. तेथे सूक्तकारांना पूर्व (प्राचीन) व नूतन अशी विशेषणे दिलेली आहेत. ऋग्वेदातील सर्व सूक्तांचा संग्रह म्हणजे संहिता बनविण्याचा प्रयत्‍न, ऋग्वेदकालाच्या उत्तरार्धात सुरू झाला. हा ऋग्वेदसंहितेचा काल ⇨ यजुर्वेद, ⇨ सामवेद व ⇨ अथर्ववेद या वेदांच्या संहिता निर्माण करणाऱ्या कालाच्या पूर्वीचा काल होय. इ. स. पू. सु. एक हजार वर्षांपूर्वी सध्याची, दहा मंडलांची ऋग्वेदसंहिता पूर्ण झाली असावी. इतर वेदसंहिता त्यानंतर सु. दोनशे वर्षांत, म्हणजे इ. स. पू. सु. आठव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत पूर्ण झाल्या असे मानतात. ह्या संहितांमध्ये ऋग्वेदातील शेकडो ऋचा उद्‌धृत केलेल्या आढळतात. त्यांत पाठभेदही आहेत. त्यांची ऋग्वेदसंहितेतील पाठांशी तुलना करता मूळ ऋग्वेदसंहितेतील बहुतेक पाठ अधिक योग्य होत, असेही अभ्यासकांच्या ध्यानात आले आहे.

ऋग्वेदाच्या अनेक शाखांपैकी शाकल शाखेची संहिता ही गेली तीन हजार वर्षे फारसा फरक न होता जशीच्या तशी वैदिकांच्या पठनपरंपरेने शुद्ध स्वरूपात टिकून राहिली आहे. सूत्रकालीन चरणव्यूह ह्या ग्रंथात शाकल, बाष्कल, आश्वलायन, शांखायन व मांडूकेय या ऋग्वेदाच्या पाच शाखा सांगितल्या आहेत. ऋग्वेदाची शांखायन व बाष्कल शाखा अनुसरणारे ब्राह्मण अजून गुजरात वगैरे प्रदेशांत विद्यमान आहेत. त्या दोन्ही शाखांच्या संहितांमध्ये संपूर्ण शाकल शाखाच किंचित पाठभेदाने अंतर्भूत झाली आहे व सूक्तांच्या कर्त्यांच्या नावांमध्ये संहितेत दहा ठिकाणी फरक आहे. शाकल शाखेच्या संहितेत असलेली १,०१७  सूक्ते (ऋचा १०,४७२) शाकल्य ऋषीच्या पदपाठासह आज अध्ययनात आहेत. पदपाठ नसलेली अकरा वालखिल्य सूक्तेही त्यांत मिळविल्यास १,०२८ अशी सूक्तसंख्या होते. ही अकरा वालखिल्य सूक्ते (४९-५९) आठव्या मंडलात पृथकपणे समाविष्ट केली आहेत (मिळून ऋचा १०,५५२). अनेक सूक्तांचे मिळून एक मंडल होते. अशी दहा मंडले म्हणजे दहा सूक्तसंग्रह मिळून ऋग्वेदसंहिता होते. या दहा मंडलांपैकी दोन ते सात ही मंडले प्रत्येकी एकेका ऋषिकुलाची आहेत. मंडल दोन गृत्समद, मंडल तीन विश्वामित्र, मंडल चार वामदेव, मंडल पाच अत्री, मंडल सहा भरद्वाज व मंडल सात वसिष्ठ अशी ही सूक्तकर्त्या कुलांची नावे होत. ही व्यक्तिनामे नसून कुलनामे होत असे म्हणण्याचे कारण वैश्वामित्र, उत्कील, वसुश्रुत, आत्रेय, गय आत्रेय, सुहोत्र भारद्वाज, गर्ग भारद्वाज इ. या सहा मंडलांच्या सूक्तकर्त्यांची विशेष व्यक्तिनामेही कात्यायनीय सर्वानुक्रमणी  व शौनकीय बृहद्देवता  या ग्रंथांत सांगितली आहेत. याच ग्रंथांत सूक्तद्रष्टा म्हणजे सूक्तकर्ता ऋषी, सूक्ताने स्तविलेली देवता व सूक्ताचा छंद वा वृत्त हे दिले आहेत. एकंदरीत ऋग्वेदसंहिता ही शेकडो सूक्तकर्त्यांच्या सूक्तांचा संग्रह आहे.

ही संहिता वा संग्रह तयार करण्याचाही काळ अनेक शतकांचा असावा. प्रथम यज्ञीय उपासनेकरिता त्या त्या ऋषिकुलात यज्ञप्रसंगी किंवा त्या त्या देवतेच्या प्रार्थनाप्रसंगी त्या त्या ऋषिकुलातील व्यक्तींनी सूक्ते रचून कुलपरंपरेने उपासनेकरिता पठनात ठेविली. ही सूक्तरचनेची प्रथमावस्था होय. त्यात जुन्या सूक्तांत नव्या सूक्तांची भर पडत गेली. दुसर्‍या अवस्थेत भिन्नभिन्न ऋषिकुलांनी एकमेकांना आपापला सूक्तसंग्रह शिकविला व हा संग्रह वाढत गेला. दोन ते सात ही मंडले हे सहा संग्रह प्रथम एकत्र झाले. हा ऋग्वेदाचा गाभा होय. त्याला कण्व या ऋषिकुलाचा संग्रह जोडला गेला. म्हणजे कण्वकुलाची पहिल्या मंडलातील सु. २६ सूक्ते आणि इतर सूक्ते मिळून पहिले मंडल आणि कण्वकुलाचे आठवे मंडल यांची भर पडली. नववे मंडल हे केवळ सोमदेवताक मंडल होय. ह्यात सोमयज्ञास आवश्यक असलेलीच सूक्ते आहेत. सोमयज्ञ म्हणजे सोम वनस्पतीच्या रसाची आहुती ज्यात इंद्रादी देवांना मिळते, असा यज्ञ होय. सोमयज्ञ हा वैदिक आर्यांचा भारतात प्रवेश होण्यापूर्वीपासून अनुष्ठिलेला यज्ञ होय. असे म्हणण्याचे कारण इराणी आर्यांच्या यज्ञसंस्थेतही सोमयज्ञ अंतर्भूत आहे.

इराणी आर्य सोम वनस्पतीला 'हओम' असे म्हणत. नवव्या मंडलाच्या सोमसूक्तांचे कर्ते वर निर्देशिलेल्या सहा मंडलांतील सूक्तांच्या कर्त्यांपैकीच आहेत. म्हणून संशोधक असे अनुमान करतात, की ही सूक्ते मुळात मुख्य सहा मंडलांतच अंतर्भूत असावीत व सोयीसाठी सोमसूक्ते निवडून निराळे मंडल तयार केले असावे. दहावे मंडल हे अखेरीस ह्या संहितेत समाविष्ट केले. पहिल्या मंडलात १९१ सूक्ते आहेत व दहाव्या मंडलातही तितकीच सूक्ते आहेत. यावरून हे दहावे मंडल पहिल्या मंडलाच्या समावेशनानंतर अखेरीस समाविष्ट केले, असे अनुमान निघते. दहाव्या मंडलातील काही सूक्ते ऋग्वेदातील प्राचीन सूक्तांइतकीच जुनी असावीत असे त्यांच्या शैलीवरून व विषयांवरून अनुमानिता येत असले, तरी त्यांतील बराचसा भाग नंतरचा असावा. याचे कारण, पहिल्या नऊ मंडलांची शैली, भाषा व विषय यांपेक्षा यातील शैली, भाषा व विषय यांत भेद आहेत. यात मन्यू, श्रद्धा, लक्ष्मी, तार्क्ष्य, रात्री इ. नव्या देवता व प्रजापती, विश्वकर्मा, धाता इ. देवांची वर्णने निराळ्या प्रकारची आहेत. विश्वोत्पत्तीसंबंधी यात अनेक सूक्ते आहेत. विवाह, अंत्यसंस्कार, जीवाची मरणोत्तर गती, राज्याभिषेक, अर्थववेदातील जादूच्या अथवा अभिचाराच्या कर्मकांडाशी संबद्ध मंत्र यात आले आहेत. यक्ष्मनाशन, दुःस्वप्ननाशन, शत्रुनाशन हे विषय त्याची उदाहरणे होत. लभ्, काल, लक्ष्मी, एवम् इ. नवे शब्द यात आले आहेत. देवासः, सत्यासः अशा बहुवचनांच्या ऐवजी देवाः, सत्याः असे बहुवचनी प्रयोग अधिक वेळा यात आले आहेत.

ऋग्वेदाच्या मुख्य संहितेमध्ये मधूनमधून परिशिष्टे जोडलेली दिसतात. ह्या परिशिष्ट सूक्तांना 'खिलसुक्ते' म्हणतात. ही मूळ संहितेचा भाग नव्हेत, असे म्हणण्याचे कारण पदपाठकार शाकल्याने ऋग्वेदातील सर्व ऋचांची पदे पाडून पदपाठ रचिला आहे, त्यात खिलसूक्तांचा पदपाठ अंतर्भूत होत नाही. ही खिलसूक्ते एकंदरीत छत्तीस आहेत. प्रसिद्ध 'श्रीसूक्त' ह्या खिलसूंक्तांपैकीच एक होय.

ऋग्वेद या सामासिक पदातील ऋग् (ऋक्) म्हणजे ऋचा; ऋचा म्हणजेच पद्यात्मक मंत्र. हे पद्य म्हणजे छंदोबद्ध वाक्यरचना. वेदोत्तर साहित्यात अशा रचनेस श्लोक असे म्हणतात. ऋग्वेदातील एकेका सूक्तात तीनपासून छप्पन्नपर्यंतही ऋचा असतात. साधारणपणे दहा-बारा ऋचा असलेली सूक्तेच पुष्कळ आहेत. पद्यबंध म्हणजे छंदस्. एकंदर ऋग्वेदातील छंदांचे पंधरा प्रकार आहेत. त्यांपैकी सात प्रकार मुख्य असून ते वारंवार येतात. गायत्री, अनुष्टुप्, जगती, त्रिष्टुप्, पंक्ती, उष्णिक् व बृहती. गायत्री ही त्रिपदा, अनुष्टुप् चतुष्पदा आणि पंक्ती पंचपदा. कोणत्याही छंदाचे तीन, चार किंवा पाच पाद असतात. प्रत्येक पादात आठ, अकरा किंवा बारा अक्षरे साधारणपणे असतात. गायत्री, अनुष्टुप्, जगती, त्रिष्टुप् या चार छंदांचे सरमिसळ झालेले अन्य छंद आहेत. अशा छंदांपैकी महत्त्वाचा छंद म्हणजे प्रगाथ होय.

गायत्री, अनुष्टुप् व पंक्ती या छंदांच्या सर्व पादांची अक्षरे समान म्हणजे आठ असतात. बाकीचे छंद विषमाक्षर पादांचे असतात. अक्षरनियमांचे उल्लंघन अनेक ठिकाणी झालेले दिसते. अनुष्टुप् हा छंद अधिक व्यवस्थित बनून वेदोत्तर वाङ्‌मयात, उदा., रामायण, महाभारत इ. सर्व संस्कृत साहित्यात प्रमुख बनला आहे. ऋग्वेदात गायत्री ह्या छंदात इतर छंदांपेक्षा जास्तीत जास्त म्हणजे २,४५० ऋचा आहेत. ऋग्वेदाची पहिली ऋचा याच छंदात आहे.

ऋग्वेदसंहिता हे इंडो-यूरोपीय जगातील सर्वांत प्राचीन धार्मिक साहित्य असल्यामुळे त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्‍न पश्चिमी विद्वानांनी गेल्या दीडशे वर्षांत फार कसोशीने केला. ब्राह्मणग्रंथांच्या काळी व सूत्रकाळी ऋग्वेदाचा अर्थ नीट समजणे कठीण झाल्याचे दिसते. ब्राह्मणग्रंथांत ऋग्वेदाच्या काही ऋचांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्‍न दिसतो. सूत्रकालातील अगदी प्राचीन मानलेला ग्रंथ म्हणजे यास्काचे निरुक्त होय. यात ऋग्वेदातील शब्दांचा अर्थ म्हणजे निरुक्ती सांगण्याचा प्रयत्‍न दिसतो. 'निघंटु' नावाचे ऋग्वेद शब्दांचे छोटे संग्रह यास्कापुढे होते. यास्काच्या काळीच ऋग्वेदाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्‍न करणारे सतरा विवेचक होते. त्यांतील एक कौत्सनामक विचेचक ऋग्वेदाला अर्थ नाही, असे म्हणतो. इ. रा. पू. आठव्या शतकाच्या सुमारास, म्हणजे यास्काच्या काळीच ऋग्वेदाचा अर्थ समजणे कठीण झाले हाेते, असे यावरून दिसते. ऋग्वेदाची रचना, भाषेचे व उच्चाराचे नियम, पदांचा व वाक्यांचा अर्थ इ. प्रकारची ऋग्वेदाच्या सर्वांगीण ज्ञानाची साधने म्हणजे षडंग व उपग्रंथ, ब्राह्मणकाळीच तयार होऊ लागले होते.

या सर्वांचा उपयोग करून ऋग्वेदाचा समग्र अर्थ लावणारे ऋग्वेदभाष्य मुख्यतः विजयानगर साम्राज्याचा प्रधानमंत्री माधव याच्या सायण नावाच्या बंधूने लिहिले. त्या भाष्याच्या आधारे ऋग्वेदाचा अर्थ समजून घेण्याचा पश्चिमी विद्वानांनी प्रयत्‍न केल्यानंतर सायणकृत अर्थाबद्दल शंका उत्पन्न होऊ लागल्या. रोट आणि बट्‌लिंक या जर्मन पंडितांना सायणाच्या अर्थाबद्दल असमाधान वाटून त्यांनी ऋग्वेदाच्या भाषेशी निकट असलेली भाषा ज्याची आहे, त्या अवेस्ता  या इराणी आर्यांच्या ग्रंथाचा तुलनात्मक अभ्यास केला. संस्कृत भाषेच्या जवळच्या किंवा दूरच्या भगिनी असलेल्या ग्रीक, लॅटिन इ. इंडो-यूरोपीय भाषांचाही अभ्यास त्याच वेळी सुरू झाला. त्यानंतर जर्मन भाषेत ऋग्वेदाची दोन भाषांतरे वरील संशोधनाच्या आधाराने प्रसिद्ध झाली. ऋग्वेद हा इंडो-भारतीय आर्यांच्या सामाजिक व धार्मिक जीवनाच्या इतिहासाचे अत्यंत प्राचीन असे मुख्य साधन या नात्याने जगात मोठी प्रतिष्ठा पावला.

ऋग्वेदातील काव्याचा सर्वांत मोठा भाग धार्मिक भावकाव्याचा आहे. त्याला अपवाद म्हणजे दहावे मंडल होय. यात व्यावहारिक वा लौकिक जीवनावरची, धार्मिक व यज्ञीय संदर्भ नसलेली अशी अनेक सूक्ते आहेत. धार्मिक सूक्ते ही वैदिक देवतांच्या प्रार्थनेची सूक्ते आहेत. देवतांची शौर्यपूर्ण अद्‌भुत कर्मे, त्यांचा माहिमा व औदार्य यांची भव्य व उदात्त अशी वर्णने त्यांत असून गाई, अश्वादी संपत्तीची, प्रजेची, दीर्घजीवनाची, शत्रूवरील विजयाची व एकंदर वैभवाची प्रार्थना अशा सूक्तांत ऋषी म्हणजे कवी, करीत असतात. सोमयाग व इतर साधे यज्ञ यांच्याशी संबद्ध अशा यात बर्‍याच प्रार्थना आहेत. ब्राह्मणकाली गुंतागुंतीचे झालेले विस्तृत यज्ञ यावेळी फारसे नव्हते. विशेषतः अग्‍नी व सोम या निसर्गदेवतांचा जेथे जेथे संबंध येतो, तेथे तेथे या प्रार्थना यज्ञांग होत, असे लक्षात येते.

ज्या ज्या देवतांचे स्तवन चालते, त्या त्या बहुतेक महत्त्वाच्या देवता म्हणजे निसर्गाचीच व्यक्तिरूप पावलेली दिव्य रूपे होत, असे दिसून येते. या प्रसंगाने आश्चर्यमय, सुंदर व भव्य अशी कल्पनाचित्रे वा प्रतिमासृष्टी कवी उभी करतात. यावरून ऋग्वेदातील सामाजिक जीवन व साहित्य प्राथमिक अवस्थेतून बाहेर पडलेल्या सुसंस्कृत अवस्थेचे आहे, असे दिसते. हे सर्वच काव्य एकाच उच्च पातळीवरचे नाही. पुष्कळ ठिकाणी कंटाळवाणी पुनरावृत्ती व तांत्रिक अनुकरणही दिसते; अनेकदा धार्मिक कर्मकांडाच्या गडद छायाही दिसतात; शाब्दिक कसरतीही बर्‍याच ठिकाणी स्पष्ट दिसतात; परंतु अनेक शतके, पिढ्यान् पिढ्या सूक्ते रचणारे कवी साहित्यिक गुण वा उत्कटता गमावीत नाहीत; याचे कारण आपले स्तोत्र महनीय व विश्वव्यापी स्वर्गस्थ देवांना समाधान व उत्साह देणारे व्हावे, याची जाणीव हे होय. ही जाणीव पुष्कळ सूक्तांच्या अखेरच्या ऋचेत व्यक्त केलेली असते. रथ, सुंदर वस्त्र, प्रियाराधना यांच्या उपमा ते आपल्या सूक्तांस देतात; क्वचित सूक्तरचना ही देवांची देणगी आहे, असेही म्हणतात. वेद हे अपौरुषेय आहेत, असे मात्र कोठेही सूचित केलेले दिसत नाही. कंटाळवाणी पुनरावृत्ती दिसली, तरी त्यामुळे साहित्यिक मूल्याचे तेज कमी होत नाही.

ऋग्वेदातील अनेक महत्त्वाच्या देवता म्हणजे निसर्गशक्तीच कल्पनेने व्यक्तिरूपात परिणत झालेल्या देवता आहेत. निसर्गातील घडामोडी या त्या देवतांच्याच क्रिया होत, असे ते कवी मानतात. निसर्गाबद्दलच्या आश्चर्याने त्यांचे मन प्रभावित होते. एक कवी विचारतो, की आकाशातून सूर्य का गळून पडत नाही? दुसरा विचारतो, की आकाशातील तारे दिवसा कोठे जातात? तिसरा विचारतो, की जगातील सगळ्या नद्या समुद्रात ओसंडतात; परंतु त्यामुळे समुद्र सारखा भरून वर का येत नाही? एकाला आश्चर्य वाटते, की तांबड्या गाईला पांढरेशुभ्र दूध कसे येते? निसर्गातील शक्तींचे नियमित चाललेले व्यापार पाहून ऋग्वेदातील कवींनी या नियमितपणाला 'ऋत' ही संज्ञा दिली आहे. ऋत म्हणजे नियमित मार्गक्रमणा; त्याचाच दुसरा अर्थ नियमितपणे पार पाडावयाचे यज्ञ; त्याचा तिसरा अर्थ योग्य किंवा सत्य कर्म अथवा नीतिनियम.

ऋग्वेदातील कवींना विश्व हे पृथ्वी, अंतरिक्ष व द्यौस् किंवा स्वर्ग या तीन भागांत विभक्त असलेले दिसते. सूर्याचे स्थान द्यौस्; वायू, मेघ व विद्युत् यांचे स्थान अंतरिक्ष होय; अंतरिक्षाला त्यांनी 'समुद्र' असेही म्हटले आहे; मेघांना पर्जन्यधारारूपी दूध देणार्‍या गाईही म्हटले आहे.

वरुण, मित्र, नासत्य (अश्विनीकुमार) इ. ऋग्वेदपूर्वकाळापासूनचे किंवा धाता, विश्वकर्मा, प्रजापती इ. ऋग्वेदकाळाच्या उत्तर कालखंडातील देवता सोडल्यास सूर्य, उषा, अग्‍नी, वायू, पर्जन्य, सविता, सोम इ. देवता या निसर्गशक्तीचेच व्यक्त्यात्मक देवतारूप होय. सर्व देवतांमध्ये सामर्थ्य, ओजस्विता, औदार्य आणि ज्ञानशक्ती हे समान मूलभूत गुण आहेत. काही देवांचे विशेष गुण दुसर्‍या देवांमध्येही आहेत, असे वर्णन येते. उदा., अग्‍नी ह्या देवाच्या ठिकाणी इंद्राचे वृत्रहननाचे सामर्थ्य वर्णिले आहे. कित्येक वेळा इतर देवांचे सर्व गुण व पराक्रम एकाच कोणत्यातरी इष्ट देवात आहेत, अशीही वर्णने सापडतात. उदा., अग्‍नीला उद्देशून कवी म्हणतो- 'जन्माच्या वेळी तू वरुण होतोस, धगधगलास म्हणजे तू मित्र होतोस, हे शक्तिपुत्रा, सर्व देव तुझ्यातच एकत्र सामावलेले आहेत. यज्ञकर्त्याच्या दृष्टीने तू इंद्रही आहेस' (५·३·१). एके ठिकाणी असे म्हटले आहे - 'एकाच 'सत्' ला म्हणजे अस्तित्वाला इंद्र, मित्र, वरुण, दिव्य, सुपर्ण अशा अनेक रीतीने विप्र निर्दिष्ट करतात; त्यालाच अग्‍नी, यम व मातरिश्वा म्हणतात' (१·१६४). अदिती ही देवता सर्वमय किंवा चराचरात्मक आहे, असाही उल्लेख आलेला आहे (१·८९). एकदेवतावाद व विश्वदेवतावाद (चराचरेश्वरवाद) ऋग्वेदामध्ये स्पष्टपणे मांडलेला दिसतो. वेदान्त तत्त्वज्ञानाचा पाया ऋग्वेदातच घातला गेला असे सिद्ध होते. मॅक्स म्यूलरने ऋग्वेदामध्ये इष्टदेवतावाद आहे, असे म्हटले आहे. कोणत्याही एका इष्ट देवतेचे स्तवन करीत असता कित्येक ठिकाणी सूक्तकार इतर सर्व अन्य देवांचा वा त्यांच्या गुणांचा त्या एकाच देवतेत अंतर्भाव करतात, यावरून त्याने हा निष्कर्ष काढला आहे.

ऋग्वेदात देवतांची संख्या एकवीस किंवा तेहतीस अशी सांगितली आहे. पण ही संख्या निश्चित स्वरूपाची नाही. मरुत्, वसू व विश्वेदेव हे तीन देवतासंघ आहेत. इंद्राची २५०, अग्‍नीची २०० आणि सोमाची १०० सूक्ते ऋग्वेदात आहेत. रुद्र-शिव आणि विष्णू हे आधुनिक हिंदू धर्माचे मुख्य देव आहेत; परंतु त्यांची ऋग्वेदात फारच थोडी सूक्ते आहेत (१·४३, ११४, २·३३, १·२२, १५४, १५५, १५६).

(ऋग्वेदातील देवांमध्ये सर्वश्रेष्ठ नैतिक नियमांचा पालनकर्ता देव म्हणजे वरुण होय. वरुणसूक्ते ही काव्यगुण व विश्वचिंतन ह्या दृष्टीने फार मोलाची आहेत (७·८६, ८७, ८८, ८९). वरुण हा विश्वसम्राट म्हणून वर्णिलेला आहे. सूर्य, उषा, पर्जन्य, अग्‍नी व वायू ह्यांची सूक्ते निसर्गाचे अत्यंत उत्कृष्ट काव्य म्हणून नावाजलेली आहेत. इंद्र हा ऋग्वेदातील आर्यांचा सर्वश्रेष्ठ देव होय. ही आदर्श युद्धदेवता आहे. त्याचे पराक्रम व वृत्र ह्या दस्यूशी त्याने केलेला संग्राम व त्याच्यावर मिळविलेला विजय याची उत्साहपूर्ण, आश्चर्यमय वर्णने ऋग्वेदात निरनिराळ्या शैलींत केलेली वाचावयास मिळतात. वरुण हा इंद्र, अग्‍नी, सूर्य व सोम यांच्या मानाने मागे पडलेला देव दिसतो. तो इंडो-इराणी काळातला आहे. ऋग्वेदी-आर्य भातात आल्यानंतर ते दीर्घकाळपर्यंत युद्धव्यवसायात गुंतले होते. त्यामुळे हा युद्धकाळ संपून वैदिक समाज स्थिर शांततेच्या युगात प्रवेश करीपर्यंत इंद्र हाच देवाधिराज ह्या पदवीवर स्थिरावला. ऋग्वेदाचे दहावे मंडल हे या स्थित्यंतराच्या सीमेवरील मंडल आहे. यात देवता कल्पनेला तात्त्विक स्वरूप प्राप्त झाले. धाता, विश्वकर्मा, प्रजापती हे तात्त्विक स्वरूपाचे देव होत. विश्वोत्पत्ती व विश्वधारणा करणारा एकच देव म्हणजे धाता, विश्वकर्मा किंवा प्रजापती होय, असा भाव त्यात व्यक्त झालेला आहे.

गंधर्व व अप्सरा या अलौकिक, देवसमान; परंतु देवांपेक्षा कमी शक्ती असलेल्यांचा निर्देशही ऋग्वेदात आहे. उर्वशी व पुरूरवा यांचा संवाद (१०.९५) हा एका प्रेमकथेचा भाग आहे. ही कथा शतपथब्राह्मणात (११.५.१.१) व महाभारतात अधिक स्पष्ट रूपाने सांगितली आहे. उर्वशीचे दोन मेंढे पुरूरव्याने जपावे व नग्‍न स्थितीत तिच्या दृष्टीस पडू नये, या अटींवर स्वर्गीय उर्वशीने या मनुष्य राजापाशी राहण्याचे मान्य केले; परंतु ती अट त्याच्या हातून पाळली गेली नाही म्हणून उर्वशी त्याला सोडून निघून जाते. राजा तिच्या शोधात असतो. ती एकदम त्याच्यापुढे प्रकट होते. प्रकट झाल्यानंतर त्या दोघांत झालेला हा संवाद आहे. तो तिचे मन वळविण्याचा खूप प्रयत्‍न करतो; परंतु तो फुकट जातो, असे या संवादात दाखविले आहे. कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाचा हाच विषय आहे. यम हा मृतांचा अधिपती देव. यम व त्याची जुळी बहीण यमी यांचाही संवाद (१०·१०) कौशल्याने वर्णिला आहे. यम व यमी ही जुळी भावंडे. यमी वयात आल्यावर उत्कट प्रणयभावनेने त्याच्याशी विवाहबद्ध होण्याची विनवणी करते. बहीण-भावांचे लग्‍न होणे ही निसर्गास अत्यंत अनुरूप अशीच गोष्ट आहे व सविता देवानेच आपणांस एकत्र जन्म दिला आहे, त्यामुळे हे सूचित होते असे ती म्हणते. यम म्हणतो, की हे कर्म निषिद्ध आहे; भाऊ-बहिणींचा संबंध हे पाप आहे. भावाबहिणींची लग्‍ने इंडो-इराणी काळाच्या पहिल्या भागात होत होती; परंतु नंतर भारतात आल्यावर आर्यांनी ती निषिद्ध ठरविली; याचा हा संवादनिदर्शक आहे. वस्तुतः मुळात ही यम-यमीची कथा मनुष्य-जातीच्या उत्पत्तीची कथा असावी, असे काही मानवशास्त्रज्ञांचे मत आहे. त्या कथेला ऋग्वेदात विकृत रूप दिले आहे, असे ते म्हणतात. वरुण आणि अग्‍नी, तसेच अनेक देव व अग्‍नी यांची दोन संवादसूक्ते (१०·५१, ५२) आहेत. त्यांच्यात काव्यगुण पुष्कळ आहेत. अग्‍नी हा देवांकडे आहुती पोहोचवणारा, मानव व देव यांच्यामधला दूत किंवा मध्यस्थ आहे. तो ह्या मध्यस्थीला कंटाळतो; परंतु अखेर देवांच्या सांगण्यावरून यज्ञामधील आपले कर्तव्य पार पाडण्यास तयार हाेतो. एक प्रकारे गूढ असलेला काव्यगुणरहित असा संवाद म्हणजे इंद्र आणि इंद्राणी यांचा होय (१०·८६). यास 'वृषाकपायीसूक्त' म्हणतात. वृषाकपी हा ह्या संवादाचा विषय आहे. वृषाकपी हा कोण, याचा मात्र थांग लागत नाही. हे सूक्त उत्तर ध्रुवाकडील परिस्थितीचे निदर्शक आहे, असा अर्थ लोकमान्य टिळकांनी लावला आहे. काहींच्या मते वृषाकपी म्हणजेच काही वैदिक आर्यांनी नुकताच स्वीकारलेला देव हनुमान होय; तो आर्येतरांचा मूळचा देव; त्याच्या महिम्याबद्दलची साशंक भावना या सूक्तात व्यक्त केली आहे.

इंद्राची दूती देवशुनी (देवांची कुत्री) सरमा व पणी यांचा संवाद (१०·१०८) काव्यमय रूपाने वर्णिला आहे. पणींनी चोरलेल्या देवांच्या गाईंचा शोध सरमेला लागतो. पणी त्या गाई परत देऊ इच्छित नाहीत. सरमेच्या चतुराईने त्या देवांना प्राप्त होतात. हे सगळे संवाद मुळात पद्यमय असले, तरी गद्यपद्यमय नाट्यकथेचे ते भाग असावेत. पद्य तेवढे पाठांतराकरिता जपून ठेवले व गद्य त्या त्या प्रसंगी पद्यांशी सुसंगत रीतीने, उत्स्फूर्तपणे म्हटले जाई, असे अनेक संशोधकांचे मत आहे.

वाचस्पती विश्वकर्मा, हिरण्यगर्भ, भूतपती यांच्यासंबंधीची सूक्ते (१०·८१, ८२, १२१), सृष्टीच्या पूर्वस्थितीचे वर्णन करणारे 'नासदीयसूक्त' (१०·१२९), त्याचप्रमाणे विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणारे 'पुरुषसूक्त' (१०.९०) यांच्या-मध्ये ऋग्वेदकालीन तत्त्वचिंतनाचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. हे तत्त्वचिंतन तर्कशुद्ध मीमांसा नसून कविप्रतिभेचा उदात्त भावनेने झालेला आविष्कार आहे. या सूक्तांच्या जोडीला तीन ऋचांचे 'अघमर्षणसूक्त'ही (१०·१९०) घेण्यास हरकत नाही.

ऋग्वेदकालीन समाजरचना जातिभेदात्मक नव्हती, असे जातींच्या अनुल्लेखावरून मानता येते. ब्रह्म, क्षत्र व  विश असे व्यवसायभेदाने निश्चित होणारे तीन वर्ग ऋग्वेदकाली होते. पौरोहित्य करणारा आणि युद्ध व राज्य करणारा, असे दोन वर्ग समाजात प्रमुख होते. त्यांच्याशिवाय बाकीचे विविध व्यवसाय करणारे लोक म्हणजे विश अथवा सामान्य प्रजा अथवा तिसरा वर्ग होय. दस्यू किंवा दास या संज्ञेने निर्दिष्ट होणारे, काहीसे शत्रुस्थानी असलेले लोक वैदिकांच्या सान्निध्यात होते, असे दिसते. ऋग्वेदाच्या अखेरच्या कालखंडातील पुरुषसूक्तात ब्राह्मण, राजन्य, वैश्य व शूद्र हे एकाच पुरुषाचे अवयव म्हणून ब्राह्मण मुख, राजन्य बाहू, वैश्य जंघा व शूद्र पाय, असे वर्णन आलेले आहे. यावरून सामाजिक वर्गभेद व उच्च-कनिष्ठभाव स्पष्ट दिसू लागला होता, असे दिसते. परंतु एकाच पुरुषाचे अवयव, ह्या कल्पनेमध्ये आर्य व शूद्र असा वंशभेद नसावा, असे सूचित होते. सामाजिक जीवन आशावादी व ऐहिक वैभवाची आकांक्षा बाळगून स्थिरावत होते, असा हा काळ होय. जीवनाचे तत्त्वज्ञान ऐहिक जीवनाला प्राधान्य देणारे होते. ऐहिक जीवनाबद्दल उद्वेग व निवृत्तिमार्गाबद्दल पूज्यभाव ऋग्वेदकालीन समाजात नसला, तरी भारतातील वेदपूर्व संस्कृतीतील समाजात तो होता, असे दिसते.

समाजात निरनिराळी कौशल्ये किंवा व्यवसाय आणि त्या कौशल्यांस अनुसरून निरनिराळी व्रते म्हणजे आचारनियम होते, याचा निर्देश एका सूक्तात (९·११२) आला आहे. हे सूक्त माणसाच्या स्वार्थी वासनांचा उपहास आहे. या सूक्तात चार ऋचा आहेत. प्रत्येक ऋचेच्या शेवटी येणार्‍या 'इन्द्रायेन्दो परि स्रव' म्हणजे हे सोमा, इंद्राकरिता खूप वाहत रहा, या ध्रुपदाचा बाकीच्या वाक्यार्थाशी सरळ संबंध सकृद्दर्शनी दिसत नाही; परंतु तो किंचित विचार केल्यावर उलगडतो, तो असा : माणसांचे विविध व्यवसाय व धारणा असतात. सुताराला मोडलेले (लाकूडकाम), वैद्याला रोगी, पुरोहिताला सोमयाजी, सोनाराला चमकदार हिरे वगैरे जवळ असलेला श्रीमंत, घोड्याला चांगला रथ आणि बेडकाला पाणी पाहिजे असते; सोमा, इंद्राकरिता खूप वाहत रहा. तात्पर्य, देवाकरिता आम्ही झटतो, परंतु खरे पाहता आम्ही सगळे स्वार्थाकरिताच झटत असतो, असे यातून ध्वनित केले आहे. या सूक्ताचा यज्ञकर्माशी किंवा देवतेशी काही संबंध नाही. ती एक स्वतंत्र कविता आहे. 'अक्षसूक्त'ही (१०·३४) असेच लौकिक काव्य आहे. त्यात चौदा ऋचा असून जुगारी आणि अक्ष म्हणजे फासे यांचे दोष व दुष्परिणाम मार्मिक रीतीने दाखविले आहेत. फासे गार असतात पण ते अंगार असतात, असे म्हटले आहे. दिवाळे निघालेल्या जुगार्‍याच्या बायकोकडे दुसरेच जात असतात. शेवटी उपदेश केला आहे, की 'शेती कर. फासे खेळू नकोस, संपत्ती असेल तिथेच गाई आणि बायको रमते, असे सवितादेव मला सांगतो'. 'अन्नदानसूक्ता'त (१०·११७) स्वार्थी, अप्पलपोट्या माणसाची निंदा केली असून स्वार्थीपणा म्हणजे वध होय, असे सांगून अन्नदानाची महती वर्णिली आहे. हे नऊ ऋचांचे सूक्त आहे. या सूक्तास 'भिक्षुसूक्त' म्हणतात; म्हणजे हे भिक्षा मागणार्‍याचे काव्य आहे.

संदर्भ : 1. Macdonell, Arthur A. A History of Sanskrit Literature, Delhi, 1961.

2. Winternitz, M. A History of Indian Literature, Vol. I, Calcutta, 1927.

३. वैदिक-संशोधन-मंडळ, संपा. ऋग्वेद-संहिता, ५ भाग, पुणे, १९३३-५१.

४. सातवळेकर, श्री. दा. संपा. ऋग्वेद-संहिता, औंध,  १९४०.

लेखक: लक्ष्मणशास्त्री जोशी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate