অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कंबन

कंबन

(सु.१२वेशतक).तमिळ मधील कंबरामायण (रामावतारम्‌असाही पर्याय) ह्या प्रख्यात महाकाव्याचा कर्ता.त्याचा काल नवव्या शतकाचा असावा,असेही एक मत आहे.त्याच्याविषयी अनेक आख्यायिका रूढ आहेत.आपल्यारामायणात त्याने तिरुवण्णैनल्लूर गावातील शडैयप्पवळ्ळल ह्या दानशूर व्यक्तीच्या अनेक वेळा केलेल्या उल्लेखांवरून कंबन त्याचा आश्रित असावा,असे म्हटले जाते.कंबनचे वडील आदित्तन हे तिरुवळुंदूर येथील कालिमंदिरात पुरोहित होते.चोल व पांड्य राजांच्या दरबारांतही तो गेला होता.आपल्या काव्यात त्याने ⇨नम्माळवाराची प्रशंसा केली आहे;तथापि त्याच्या काव्यात सांप्रदायिक विशिष्टता नाही; म्हणूनच वैष्णव व शैव ह्या दोनही संप्रदायांत त्याच्यारामायणाबाबत कमालीचा आदर आहे.

वाल्मीकि रामायणा च्या आधारे आपले महाकाव्य रचल्याचे कंबन जरी मान्य करीत असला,तरी या प्रतिभावंताच्यारामायणात रचनेची स्वतंत्रता आढळते. मूळ कथाभागास फारसा धक्का न लावता त्याने तमिळ पार्श्वभूमीस अनुसरून त्याची पुनर्निर्मिती केली. त्यात त्याने आदर्श राज्याचे (रामराज्याचे) चित्र रंगविले असून,ज्ञानोपासनेस अतिशय महत्त्व दिले आहे. त्याचे वर्णनकौशल्य व कथनकौशल्य अप्रतिम आहे. नाट्यमय प्रसंग निर्माण करण्यात तो कुशल होता. मुख्य कथावस्तू तीच ठेवून उपकथानकांत तो अनेक बदल करतो आणि नवीन प्रसंगांची कौशल्यपूर्ण योजना करतो. त्याच्या व्यक्तिरेखांतून मानवी स्वभावाची व विचारविकारांची सखोल जाण दिसून येते.

तमिळ भाषेवर त्याचे असामान्य प्रभुत्व असून त्याच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांची एकरूपता सहजपणे साधलेली आहे.तमिळ भाषेतील काव्यक्षमतेचा परमोत्कर्ष त्याचा या महाकाव्यात आहे. त्यावेळी नव्यानेच प्रचारात आलेल्या‘ विरुत्तम्‌’ म्हणजे छंदोबद्ध काव्याची रचना त्याने केली. वैदिक छंदांप्रमाणे प्राचीन ‘संघम्‌साहित्या’ त ‘आशिरियप्पा’,‘कलिप्पा’,‘वंजिप्पा’ आणि ‘वॅण्पा’ हे चार छंद होते. कंबनने या विविध छंदांना अत्यंत ललित आणि श्रवणमधुर रूप दिले.

तमिळ साहित्यात कंबनचे स्थान अत्यंत उच्च असून त्याला ‘कविचक्रवर्ती’ म्हणून संबोधिले जाते. त्याच्या रामायणामुळे पूर्वकालीन सर्व महाकाव्ये निष्प्रभ बनली आणि पुढील चार-पाचशे वर्षांचा काळ ह्या युगप्रवर्तक कवीच्या नावावरून ‘कंबन-काळ’ म्हणून तमिळ साहित्यात ओळखला जाऊ लागला.कंबरामायणाची लोकप्रियता वाढत्या प्रमाणात आजही टिकून असून त्याचे इंग्रजी व हिंदी भाषांतही अनुवाद झाले आहेत. केवळ तमिळ साहित्यातच नव्हे तर जागतिक साहित्यातहीकंबरामायणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. कंबननंतर होऊन गेलेल्या एका अनामिक कवीचे एक चार ओळींचे पद्य उपलब्ध असून, त्यात त्याने कंबनच्या मृत्युबाबत म्हटले आहे, की ‘आज कदाचित लक्ष्मी प्रसन्न होईल आणि धरतीमाताही; विद्येची देवता सरस्वती हिला मात्र वैधव्य आल्याचे दुःख होईल’.

रामायणा  शिवाय कंबननेशठकोपर अंदादि, सरस्वती अंदादि, एर्‌-ए‍ॅळुपदु, शिलै-ए‍ॅळुपदु  आणि तिरुक्कै-विळक्कम्‌  हे लहान काव्यग्रंथही लिहिले आहेत.

लेखक: मु. (इं.) वरदराजन्‌ ; भा. ग. (म.) सुर्वे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate