অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कल्पसूत्रे

कल्पसूत्रे

श्रौतसूत्रे, शुल्बसूत्रे, गृह्यसूत्रे आणि धर्मसूत्रे ह्या वाङ्‌मयास ‘कल्पसूत्रे’ ही सर्वसामान्य संज्ञा लाविली जाते. प्राचीन उपनिषदांच्या काळीच कल्पसूत्रे निर्माण होऊ लागली होती. मुंडकोपनिषदात शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष ह्या सहा वेदांगांचा निर्देश केला आहे. कल्प म्हणजे कर्मकांड किंवा धार्मिक क्रियाकलाप.

श्रौतसूत्रे : संहिता आणि ब्राह्मणग्रंथ यांचा विस्तार झाल्यानंतर त्यांच्यातील यज्ञसंस्थेचे सांगोपांग स्वरूप व्यवस्थित स्वरूपात एकत्र, विषयवारीने उपलब्ध व्हावे म्हणून श्रौतसूत्रे निर्माण झाली. संहितांमध्ये व विशेषतः ब्राह्मणग्रंथांमध्ये यज्ञसंस्था सांगोपांग सांगितलेली असली, तरी त्यांत पदोपदी यज्ञातील प्रधान कर्मे व अंगभूत कर्मे ह्यांचे विधान करीत असता आणि असंमत प्रकारची पद्धती अवलंबू नये असे सांगत असता, अर्थवाद विस्ताराने सांगितलेले असतात. अर्थवादात्मक वाक्यांचा पसारा मोठा असतो. यज्ञात म्हणावयाच्या मंत्रांचे अर्थही दिलेले असतात. शब्दांचे व्याकरणदृष्ट्या योग्य किंवा अयोग्य असे व्युत्पत्यर्थ दिलेले असतात. हे सगळे विधिनिषेधव्यतिरिक्त विवेचन वगळून शुद्ध कर्मकांड व कर्मकांडोपयोगी मंत्रांची प्रतीके किंवा सबंध मंत्र हे सगळे श्रौतसूत्रात ग्रथित केलेले असते. प्रत्येक वेदशाखेचे श्रौतसूत्र वेगळे असते. त्या त्या वेदशाखेतील श्रौतसूत्रात त्या त्या वेदाचे मंत्र प्रतीकाच्या द्वारेच निर्दिष्ट केलेले असतात. मंत्राचे प्रतीक म्हणजे आरंभीचे दोन – चार शब्द. हे शब्द ‘इति’कार लावून दाखविले जातात. उदा., ‘इति मंत्रेण’. अन्य वेदशाखेतील मंत्र उद्धृत केलेला असतो. स्वशाखेच्या वेदात न सांगितलेली कर्मांगेही श्रौतसूत्रांत संगृहीत केलेली असतात. श्रौतसूत्रातील यज्ञसंस्था ही गार्हपत्य, दक्षिण व आहवनीय या तीन अग्नींवर अधिष्ठित असते; म्हणजे हे श्रौतयज्ञ वरील तीन अग्नींमध्ये समंत्रक आहुती देऊन व प्रार्थना म्हणून करावयाचे असतात. अग्न्याधान म्हणजे अग्नींची स्थापना, अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, चातुर्मास्य, विविध सोमयाग, पितृमेध, पशुयाग इ. नित्यनैमितिक यज्ञकर्मे आणि काम्येष्टी किंवा काम्ययाग श्रौतसूत्रात प्रतिपादिलेले आहेत. वाजपेय, राजसूय, अश्वमेध, सौत्रामणी आणि सत्रे यांचे प्रतिपादन श्रौतसूत्रात केलेले आहे.

काही श्रौतसूत्रांना शुल्बसूत्र नामक अध्याय जोडलेला असतो. सगळ्याच श्रौतसूत्रांच्या शेवटी शुल्बसूत्र जोडलेले नसते. बौधायन, आपस्तंब व कात्यायन या श्रौतसूत्रांनाच शुल्बसूत्रांचा अध्याय जोडलेला आढळतो. शुल्ब म्हणजे आखण्याची व मोजण्याची दोरी. यज्ञकुंड, यज्ञवेदी व यज्ञमंडप यांची निर्मिती करीत असताना जी मोजमापे घ्यावी लागतात, त्या मोजमापांचे गणित शुल्बसूत्रांत सांगितलेले असते. भारतीय भूमिती व त्रिकोणमिती ह्यांचे प्राथमिक स्वरूप शुल्बसूत्रांमध्ये पहावयास मिळते.

गृह्यसूत्रे : कल्पाचा दुसरा भाग म्हणजे गृह्यसूत्रे होत. ह्यात अग्नित्रयसाध्य नसलेली व एकाग्निसाध्य किंवा गृह्याग्निसाध्य धार्मिक कर्मे सांगितलेली आहेत. उपनयन, समावर्तन, विवाह, गर्भाधान, जातकर्म, नामकरण, अन्नप्राशन, चौल, पंचमहायज्ञ, वास्तूप्रवेश, शूलगव, राजाने करावयाचे हस्त्यारोहण इ. संस्कार, विविध श्राद्धे व अन्य आश्रमकर्मे सांगितलेली असतात. विवाहादी संस्कार हा गृह्यसूत्रांचा मुख्य विषय होय. गृह्यसूत्रांतील बरीचशी कर्मे वेदांत सांगितलेली नाहीत. गृह्यसूत्रांमध्येच अंत्येष्टी म्हणजे अंत्यसंस्कार किंवा मृतसंस्कार आणि इतर अनेक प्रकारची श्राद्धे सांगितलेली आहेत.

धर्मसूत्रे : धर्मसूत्रे हा कल्पसूत्रांचा तिसरा भाग वर्णाश्रमधर्म प्रतिपादणारा आहे. मनुयाज्ञवल्क्यादी स्मृतींच्या पूर्वी झालेले, प्राधान्याने गद्यात्मक सूत्रशैलीत लिहिलेले, हे ग्रंथ आहेत. उपनयन, विवाहादी संस्कार हेही वर्णाश्रमधर्मच होत. परंतु त्यांचे प्रत्यक्ष कर्मकांड धर्मसूत्रांत सांगितलेले नसते. ते गृह्यसूत्रांत असते, तथापि संस्कारांचा अधिकार, काल, कर्मलोपनिमित्तक प्रायश्चित्ते इ. गोष्टी धर्मसूत्रांत येतात. वर्णाश्रमांचे भक्ष्याभक्ष्य इ. संबंधी आचार, विवाहाचे ब्राह्म, दैव इ. प्रकार व त्यासंबंधीचे अधिकार व विधिनिषेध धर्मसूत्रांत प्रतिपादिलेले असतात.

ऋग्वेदाची दोन श्रौतसूत्रे व दोन गृह्यसूत्रे आहेत. ती म्हणजे आश्वलायन श्रौतसूत्र आणि आश्वलायन गृह्यसूत्र, त्याच प्रमाणे शांखायन श्रौतसूत्र आणि शांखायन गृह्यसूत्र. गोतमधर्मसूत्रे ही ऋग्वेदाची आहेत असे म्हणतात; परंतु त्याबद्दल निश्चित असे काही सांगता येत नाही. कृष्णयजुर्वेदाच्या बौधायन व आपस्तंब या शाखांची श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, शुल्बसूत्रे व धर्मसूत्रे उपलब्ध आहेत. आपस्तंब शाखेची धर्मसूत्रे आणि सत्याषाढ वा हिरण्यकेशी धर्मसूत्रे काही पाठभेद वगळल्यास एकच आहेत. कृष्णयजुर्वेदाच्या भारद्वाज व सत्याषाढहिरण्यकेशी यांची श्रौतसूत्रे व आपस्तंब श्रौतसूत्रे यांतील यज्ञसंस्थेचे स्वरूप अगदी समान आहे. यांची गृह्यसूत्रेही समानच आहेत. कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेशी वरील श्रौतसूत्रे अत्यंत जुळणारी आहेत. किंबहुना तैत्तिरीय संहितेचीच ती श्रौतसूत्रे होत, असे म्हणता येईल. वाधूल व वैखानस श्रौतसूत्रे असावीत; तीही तैत्तिरीय संहितेचीच सूत्रे होत. वैखानसाचे गृह्यसूत्रे व धर्मसूत्र हे एकच आहे व ते उपलब्धही झाले आहे. मैत्रायणी संहितेशी संबद्ध असलेली श्रौत, गृह्य व शुल्बसूत्रे मिळाली आहेत, त्यांना ‘मानवसूत्रे’ असे म्हणतात. काठकशाखेशी संबद्ध असलेली काठक गृह्यसूत्रेही प्रसिद्ध झाली आहेत.

शुक्लयजुर्वेदाची कात्यायन श्रौतसूत्रे, पारस्कर गृह्यसूत्रे व कात्यायन शुल्बसूत्रे प्रसिद्ध आहेत. लाट्यायन आणि द्राह्यायण ही श्रौतसूत्रे सामवेदाची असून सामवेदाच्या जैमिनीय शाखेची श्रौतसूत्रे आणि गृह्यसूत्रे मिळतात. गोभिल आणि खादिर गृह्यसूत्रेही सामवेदाची म्हणून प्रसिद्ध आहेत. सामवेदाच्या साहित्यात ‘आर्षेय कल्प’ म्हणजेच मशक कल्पसूत्र अंतर्भूत होते. ह्यात सामगायनाची पद्धती सांगितली आहे.

अथर्ववेदाच्या साहित्यात वैतान श्रौतसूत्र  समाविष्ट झालेले आहे. कौशिकसूत्र हे अथर्ववेदाचे मूळचे खरेखुरे कल्पसूत्र होय. वैतान श्रौतसूत्र ही मागून पडलेली भर असावी. हे इतर वेदांच्या श्रौतसूत्रांची निर्मिती झाल्यानंतर निर्माण झाले आहे. वस्तुतः अथर्ववेदसंहितेतील बहुतेक सर्व कर्मकांडाचे मंत्र ज्या विविध कर्मकांडांशी संबद्ध आहेत, ते कर्मकांड म्हणजे गृह्यकर्मच होय. अथर्ववेदातील बहुतेक सर्व कर्मे एकाग्निसाध्य आहेत. म्हणून कौशिकसूत्र एक प्रकारचे गृह्यसूत्रच होय. अथर्ववेदसंहितेतील मंत्रांचा ज्या ज्या कर्मांत विनियोग करावयाचा ती ती कर्मे ह्या सूत्रात व्यवस्थित रीतीने प्रतिपादिलेली आहेत.

लेखक: लक्ष्मणशास्त्री जोशी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate