অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कामंदकीय नीतिसार

कामंदकीय नीतिसार

कामंदक किंवा कामंदकी ह्याचा राजनीतिविषयक एक प्राचीन ग्रंथ. कामंदकाच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याच्या ग्रंथरचनेचा काळ ७०० ते ७५०च्या दरम्यान असावा, असे विंटरनिट्‌ससारख्या विद्वानांचे मत आहे. ह्या ग्रंथाच्या रचनेसाठी कौटिलीय अर्थशास्त्राचा मुख्य आधार घेतलेला आहे. हा ग्रंथ पद्यमय असून त्याचे एकूण वीस सर्ग आहेत.

पहिल्या सर्गात राजाच्या इंद्रियनियंत्रणासंबंधीचे विचार आहेत. दुसऱ्या सर्गात शास्त्रविभाग, वर्णाश्रमव्यवस्था व दंडमाहात्म्य आले आहे. राजाच्या सदाचाराचे नियम तिसर्‍या सर्गात आढळतात. चौथा सर्ग राज्याच्या सात अंगांच्या विवेचनास वाहिलेला आहे. पाचव्यात राजा आणि राजसेवक ह्यांच्या परस्परवर्तनासंबंधी विचार आले आहेत. राज्यातील दुष्टांचा निग्रह, धर्म व अधर्म ह्यांच्या व्याख्या ह्यांचा परामर्श सहाव्या सर्गात घेतलेला असून राजपुत्रापासून व अन्य संकटांपासून संरक्षण करण्यासाठी कोणती दक्षता घ्यायला हवी, हे सातव्या सर्गात सांगितले आहे. विदेश नीती हा विषय आठ ते अकरा ह्या सर्गांत आलेला आहे.  शत्रुराज्ये, मित्रराज्ये आणि उदासीन राज्ये यांच्या मंडलांचे विभाजन आणि वर्गीकरण येथे केले आहे. त्याचप्रमाणे संधी म्हणजे तह आणि विग्रह म्हणजे युद्ध केव्हा व कसे करावेत; तसेच साम, दान, दंड व भेद ह्या चार उपायांचा अवलंब केव्हा व कसा करावा, ह्याचे विवेचन आलेले आहे. मंत्र्यांशी सल्लामसलत म्हणजे मंत्रणा, हा बाराव्या सर्गाचा विषय. तेराव्या सर्गात दूतयोजनेविषयी विचार आहेत. उत्साह आणि प्रयत्नवाद ह्यांची प्रशंसा, राजाची अनेक कर्तव्ये, राज्यांगावरील आपत्ती ह्यांसारख्या विषयांचा ऊहापोह चौदाव्या सर्गात आहे. सात प्रकारच्या राजदोषांचा म्हणजे व्यसनांचा विचार पंधराव्या सर्गात येतो. विदेशावरील आक्रमण आणि आक्रमणपद्धती ह्यांचे विवेचन सोळाव्या सर्गात आहे, तर शत्रूच्या राज्यात सैन्यसंचालन करणे आणि शिबिरे बांधणे ह्यासंबंधी तसेच शुभाशुभ शकुनांसंबंधी विचार सतराव्या सर्गात येतात. अठराव्या सर्गात शत्रूच्या संदर्भात साम, दान, इ.चार किंवा सात उपायांचा प्रयोग कसा करावा, हे सांगितले आहे. आक्रमणाच्या संदर्भात दंड अथवा युद्ध हा अखेरचा उपाय योजताना सैन्याच्या बलाबलाचा विचार कसा करावा, हे एकोणिसाव्या सर्गात सांगितले आहे. गजदल, अश्वदल, रथदल व पायदळ ह्यांची कामे, स्थाने, रचना आणि समोरासमोर होणारा संग्राम ह्यांचा परामर्श विसाव्या सर्गात घेतलेला आहे.

नीतिसाराची रचना करीत असताना कामंदकाने कौटिलीय अर्थशास्त्राखेरीज आज अज्ञात असलेल्या, राजनीतिविषयक इतरही काही ग्रंथांचा उपयोग करून घेतला असावा. भवभूतीच्या मालतीमाधव ह्या नाटकातील कामंदकी हे मुत्सद्‌दी स्त्रीपात्र त्याला कामंदकावरून सुचले असावे.

राजेंद्रलाल मित्र ह्यांनी हा ग्रंथ Bibliotheca Indica मध्ये प्रसिद्ध केला (१८४९—१८८४). गणपती शास्त्री ह्यांनी तो ‘त्रिवेंद्रम संस्कृत सीरीझ’ मध्ये शंकराचार्य ह्यांच्या जयमंगला ह्या टीकेसह प्रसिद्ध केला (१९१२). मन्मथनाथ दत्त ह्यांनी त्याचे इंग्रजीत भाषांतर केलेले असून (१८९६) फोर्मिची ह्यांनी त्याचा इटालियन भाषेत अनुवाद केला आहे (१८९४—१९०४). बलिद्वीपातील कविभाषेतही ह्याचा अनुवाद आढळतो. पुण्याच्या ‘आनंदाश्रम’ ह्या संस्थेने कामंदकीयनीतिसारावरील जयमंगला व उपाध्यायनिरपेक्षा अशा दोन टीका (सात सर्गांपर्यंतच) प्रसिद्ध केल्या आहेत.

लेखक: लक्ष्मणशास्त्री जोशी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate