অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कामशास्त्र

कामशास्त्र

धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती हे ध्येय अडीच हजार वर्षांपूर्वीपासून भारतीय विचारवंतांनी समाजापुढे ठेविले आहे. अर्थवेदातील कामसूक्तात ‘काम’ ही विश्वाची निर्मिती करणारी आदिदेवता होय, असे म्हटले आहे (१९⋅५२⋅१). ऋग्वेदातही अशाच प्रकारचा उल्लेख आहे (१०⋅१२९⋅४). त्यांनी कामविचार निषिद्ध मानला नाही. ‘धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ’ (धर्माशी अविरूद्ध काम, हे भरतश्रेष्ठा, माझी विभूती आहे), हे श्रीकृष्णाचे गीतेतील वचन सुप्रसिद्धच आहे. प्राचीन काळी काम या पुरुषार्थाविषयी अनेक ग्रंथ लिहिले गेले असल्याचे वात्स्यायनाच्या कामसूत्रावरून कळते. कामशास्त्राच्या उत्पत्तीविषयी वात्स्यायनाने ग्रंथारंभी एक आख्यायिका सांगितली आहे. ब्रह्मदेवाने त्रिवर्गविषयक विशालकाय शास्त्र निर्माण केले. या शास्त्रातून महादेवाचा सेवक नंदी याने १००० अध्यायांचे ‘कामसूत्र’ निराळे काढले. त्याचा संक्षेप उद्दालकपुत्र श्वेतकेतूने ५०० अध्यायांत केला. या संक्षेपाचाही संक्षेप पांचालदेशवासी बाभ्रव्याने सात ‌अधिकरणांत व १५०  अध्यायांत केला. यांतील वैशिक नावाचे अधिकरण पाटलिपुत्र नगरात राहणाऱ्या गणिकांच्या आज्ञेला अनुसरून दत्तकाचार्याने निराळष करून स्वतंत्रपणे रचले. तसेच चारायण, सुवर्णनाभ, घोटकमुख, गोनर्दीय, गोणिकापुत्र आणि कुचुमार या सहा आचार्यांनी क्रमश: साधारण, सांप्रयोगिक, कन्यासंप्रयुक्तक, भार्याधिकारिक, पारदारिक व औपनि‌षदिक ही सहा अधिकरणे स्वमतप्रदर्शनार्थ स्वतंत्रपणेच रचली. कामशास्त्राचे असे वेगवेगळे विभाग झाल्याने हे शास्त्र अध्ययन-अध्यापनास गैरसौयीचे ठरून लुप्तप्राय झाले. नंदीचे ‘कामसूत्र’ फारच विशाल व म्हणून अजिबातच लुप्त झाले. बाभ्रव्याचा ग्रंथ विशाल आणि अध्ययनास कठीण होता, तसेच दत्तकादी आचार्यांनी कामशास्त्राच्या केवळ उपांगांवरच आपापले ग्रंथ लिहिलेले होते, म्हणून वात्स्यायनाने या शास्त्रातील सर्व विषयांचा अभ्यास करून व ते संक्षेपाने संकलित करून कामसूत्र या नावाने लोकांपुढे ठेविले. स्वत:च्या ग्रंथाला प्रामाण्य प्राप्त व्हावे, यासाठी वात्स्यायनाने इतर दार्शनिक व शास्त्रीय ग्रंथांच्या संप्रदायास अनुसरून नंदी आणि प्रजापतीपर्यंत परंपरा भिडविण्याचा प्रयत्न केला असावा. श्वेतकेतून समाजस्थैर्याच्या उद्देशाने सर्वप्रथम स्त्रीपुरुषसंबंधावर निर्बंध घातला, ही गोष्ट महाभारताच्या आदिपर्वात आली आहे (१२२.१०). बाभ्रव्यादिकांची मते कामसूत्रात उद्‌धृत केली आहेत, त्यावरून वात्स्यायनाला ते ग्रंथ उपलब्ध होते ही गोष्ट सिद्ध होते. हे प्राचीन ग्रंथ नितांत गोपनीय मानले गेल्यामुळे, तसेच वात्स्यायनाच्या आटोपशीर व लोकप्रिय अशा कामसूत्राच्या प्रचारामुळे नष्ट झाले असावेत. कामसूत्रावर जयमंगला या यशोधराच्या टीकेखेरीज भास्कर वगैरेंच्या वृत्तिवजा टिप्पण्या उपलब्ध आहेत. भरताच्या नाट्यशास्त्रात कामशास्त्रातील वेश्यावृते, नायक-नायिका, रमणींचे हावभाव, दूती इ. विषय समाविष्ट झाले आहेत व साहित्यशास्त्रविषयक अनेक उत्तरकालीन ग्रंथांत ते कमीअधिक प्रमाणात आले आहेत. कामसूत्रानंतरचा महत्त्वाचा असा या ‌शास्त्रावरील ग्रंथ म्हणजे दामोदरगुप्ताने आठव्या शतकात लिहिलेला ⇨ कुट्टनीमत हा होय. त्यानंतर सु. दहाव्या शतकात पद्मश्री नावाच्या एका बौद्ध भिक्षूने नागरसर्वस्व हा ग्रंथ लिहिला. यात विविध रत्नपरीक्षांसारखे थोडे काही नवीन विषय आले आहेत. महेश्वराचे म्हणून काही श्लोक यात उद्‌धृत केले आहेत. शांकर कामतंत्राचा पण यात उल्लेख आहे. हा कामतंत्र ग्रंथ महेश्वराचाच असावा. नागरसर्वस्वावर जगज्योतिर्मल्लाने सतराव्या शतकात एक ‌टीका लिहिली आहे. कामसूत्रानंतरचा विशेष प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे कोक्कोक किंवा कोकनामक विद्वानाने बाराव्या शतकापूर्वी लिहिलेला रतिरहस्य हा ग्रंथ होय. याच्या‌वर दीपिका नावाची टीका कांचीनाथने लिहिली आहे. रतिरहस्य हा ग्रंथ कोकशास्त्र नावानेच जास्त प्रसिद्ध आहे. पुढे तर ‘कोकशास्त्र’ हे सामान्यनाम होऊन ते कामशास्त्रावरील ग्रंथांस लावण्यात येऊ लागले. नंदिकेश्वर, गोणिकापुत्र व वात्स्यायन यांच्या आधारे आपण रतिरहस्य लिहिले, असे कोकाने म्हटले आहे. हा ग्रंथ पद्यात्मक आणि आटोपशीर असल्याने नंतरच्या संस्कृत टीकाकारांनी त्याचा भरपूर उपयोग केला आहे. ज्योतिरीश्वर कविशेखराने तेराव्या अथवा चौदाव्या शतकात पंचसायक हा ग्रंथ लिहिला. हा संक्षिप्त व पद्यात्मक असून त्यातील पद्ये सुगम व सुबोध आहेत. गोणिकापुत्र मूलदेव, बाभ्रव्य, नंदिकेश्वर, रंतिदेव व क्षेमेंद्र यांचे ग्रंथ पाहून आपण हा ग्रंथ लिहिला, असे ग्रंथकाराने म्हटले आहे. कंदर्पचूडामणी हा वात्स्यायनाच्या गद्य कामसूत्राचा आर्यावृत्तातील पद्यात्मक अवतार होय. त्यावर ग्रंथकार म्हणून वीरभद्र ह्या वाघेल घराण्यातील राजाचे नाव आहे; परंतु या ग्रंथातील मंगलपर श्लोकांवरून दरबारी असलेल्या एखाद्या कवीने वीरभद्राचे कौतुक पूर्ण करण्यासाठी हा ग्रंथ रचला असावा, असे दिसते. यानंतरचा उल्लेखनीय ग्रंथ कल्याणमल्लाने सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिलेला अनंगरंग हो होय. लोदी घराण्यातील लाडखानच्या कुतूहलपूर्तीसाठी कवीने तो लिहिला आहे. कामशास्त्रातील नेहमीचेच विषय त्यात आले आहेत. हा ग्रंथ सकारण अथवा अकारण पुष्कळ प्रसिद्धी पावला आहे. जयदेवाची रतिमंजरी ही उल्लेखनीय आहे. तीत साठचे पद्मे आहेत. हा जयदेव प्रसिद्ध जयदेव कवीहून वेगळाच आहे. याशिवाय अनेक प्रकाशित अथवा अप्रकाशित ग्रंथ या शास्त्रावर लिहिले गेले आहेत. व्यासजनार्दनकृत कामप्रबोध, महाराज देवराजकृत रतिरत्नप्र‌दीपिका, दंडीविरचित नर्मकेलिकौतुकसंवाद इत्यादिकांचा समावेश अशा ग्रंथांत होतो. परंतु हे ग्रंथ अत्यंत अर्वाचीन व किरकोळ स्वरूपाचे आहेत. काम हा चतुर्विध पुरुषार्थांपैकी एक होय, असे प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीने मानले; त्याचा प्रभाव भारतीय ललित साहित्य व ललित कला यांवर पडला; शृंगाररसप्रधान महाकाव्ये व खंडकाव्ये निर्माण झाली; भारतीय मूर्तिकारांनी खजुराहो, कोनारक, विजयानगर इ. ठिकाणच्या दैवतप्रासादकलेत मिथुनाची संभोगचित्रे आकर्षक रीतीने निर्माण केली.

लेखक: वा. म. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate