অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुट्टनीमत

कुट्टनीमत

कुट्टनीमत  किंवा कुट्टिनीमत (कुंटिणीचा उपदेश) हा संस्कृत भाषेतील एक उत्तम उपदेशपर आणि कामपुरुषार्थविषयक पद्यात्मक ग्रंथ दामोदर गुप्त या पंडिताने इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या अखेरीस लिहिला. दामोदर गुप्त हा काश्मीरचा राजा जयापीड याचा मुख्य मंत्री होता. क्वचित शंभलीमत  असेही नाव या ग्रंथास दिलेले आढळते. हा साद्यंत ग्रंथ आर्या या एकाच वृत्तात रचला असून त्यात १,०५९ आर्या आहेत. कार्याकार्यनिरूपण अथवा उपदेश करणे हे या ग्रंथाचे उद्दिष्ट असल्याने भोज व हेमचंद्र हे संस्कृत साहित्यशास्त्रकार कुट्टनीमत  या ग्रंथाचा ‘निदर्शन’ या कथाप्रकारात समावेश करतात. वेश्याकर्माचा कामशास्त्रीय उपदेश या ग्रंथात अत्यंत काव्यात्म रीतीने केला असल्याने या ग्रंथाला ‘शास्त्रकाव्य’ या सदरातही घालता येईल. वेश्येने श्रीमंत राजपुत्रादी कामुकांपुढे खऱ्या प्रेमाचे नाटक कसे करावे, त्यांची हृदये जिंकण्यासाठी कोणकोणते उपाय योजावेत, कामुक वशीकरण साधनांचा प्रयोग कसा करावा, नाना कामविलासांनी त्यांची मने कशी आकृष्ट करावीत, त्यांच्या धनाचा अपहार करण्याचे आपले मनोगत तिने कसे साधावे आणि त्यांना लुबाडल्यावर त्यांचा कसा त्याग करावा यांसंबंधी कुंटिणीने वेश्येला केलेला उपदेश मुख्यत्वे या ग्रंथात आहे. प्रसंगोपात्त ग्रंथकाराने वीर, करुण इ. रसांचा परिपोष केला असून काशी, पाटलिपुत्र इ. नगरे, अबुद पर्वत, वसंत व वर्षा ॠतू इत्यादिकांची महाकाव्यात शोभतील, अशी वर्णनेही त्याने केली आहेत. या ग्रंथातील काही भाग शृंगारसाने ओथंबलेला आहे. एका भागात श्रीहर्षाच्या रत्नावलि  नाटिकेतील अंकाच्या प्रत्यक्ष प्रयोगाचे वर्णन कवीने केले आहे, ते वाङमयीन इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. काही पश्चिमी पंडितांच्या मते हा ग्रंथ वेश्याव्यवहारविषयक असल्याने अश्लील वाङ्‌मयात मोडतो. परंतु त्यांचे हे मत ग्राह्य नाही. कारण हा ग्रंथ नैतिक अधःपाताकडे ओढून नेणारा नव्हे. ग्रंथकाराने स्वतःच काव्यप्रयोजन सांगितले आहे, की विट, वेश्या, धूर्त, कुंटिणी या काव्याच्या पाठकांची वंचना करू शकणार नाहीत. (कुट्टनीमत, १,०५९). या ग्रंथातील पद्ये मम्मट, रुय्यकादी साहित्यशास्त्रकारांनी आपल्या ग्रंथांत उदाहरणे म्हणून उद्‌धृत केली आहेत. या ग्रंथातील अनेक ठिकाणची रसनिर्भर वर्णने पाहता दामोदर गुप्त हा महाकवी या पदवीस पात्र आहे, असे म्हणावयास हरकत नाही.

कुट्टनीमताची संहिता दुर्गाप्रसाद यांनी संपादित केली असून ती निर्णयसागर प्रेसने १८८७ मध्ये प्रसिद्ध केली. तिच्यातील आर्यासंख्या फक्त ९२७ आहे. दुसरी एक संहिता तनसुखराम त्रिपाठी यांच्या रसदीपिका  या टीकेसह १९२४ साली प्रसिद्ध झालेली आहे.

लेखक: वा. म. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate