অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गाहा सत्तसई

गाहा सत्तसई

महाराष्ट्री प्राकृतातील शृंगारप्रधान गीतांचे एक संकलन. गाथा सप्तशती  हे त्याच्या नावाने संस्कृत रूपही बरेच प्रचारात आहे. गाहा कोस  हे त्याचे मूळ नाव. सप्तशतक  हे ह्या संकलनाचे आणखी एक नाव. त्यांतील प्रत्येक गीताला ‘गाथा’ असे संबोधिले जाते. सातवाहन राजा हाल  (इ.स. पहिले वा दुसरे शतक) ह्याने ह्या गाथा संकलित केलेल्या आहेत.

गाहा सत्तसईचे किमान सहा पाठ आज आपणास उपलब्ध आहेत. संहिता आणि गाथाक्रम ह्या दोन्ही संदर्भांत ह्या पाठांमध्ये भिन्नता आढळते. तथापि ह्या सहाही पाठांना समान अशा फक्त ४३० गाथा आढळतात. ह्या संकलनाच्या मूळ संहितेत पुढे भर पडत गेली आणि इ. स.च्या आठव्या शतकाच्या सुमारासगाहा सत्तसईला सप्तशतीत्व प्राप्त झाले, असे डॉ. वा. वि. मिराशी आणि डॉ. आ. ने. उपाध्ये ह्यांच्यासारख्या विद्वानांचे मत आहे. उपर्युक्त ४३० गाथा हालाच्या मूळ संकलनातील असाव्यात.

हाल हा गाहा सत्तसई चा केवळ संकलक नव्हे. तिच्यातील काही गाथा त्याने स्वतः रचिलेल्या आहेत. प्रत्येक गाथेतील कल्पना स्वयंपूर्ण असून तिची अभिव्यक्ती वेचक आणि सूचक शब्दांत केलेली आहे.

साध्वी, कुलटा, पतिव्रता, वेश्या, स्वकीया, परकीया, संयमशीला, चंचला आदी प्रकारांच्या स्त्रियांच्या मनःस्थितींचे ह्या गाथांतून प्रभावी वर्णन आढळते. प्रेमाच्या विविध अवस्थाही मार्मिकपणे शब्दांकित केलेल्या आहेत. ह्या गाथांतून सुंदर निसर्गचित्रेही वैपुल्याने आढळतात. त्यांशिवाय होलिकोत्सव, मदनोत्सव ह्यांसारखे विशेष प्रसंग; तसेच विविध व्रते, आचारादींची वर्णनेही त्यांतून येतात. प्रणयभावनेच्या विलोभनीय आविष्काराची उदाहरणे म्हणून खालील काही गाथा उद्‌धृत करण्यासारख्या आहेत.

अवलंबिअ-माण-परम्मुहीऍ एंतस्स माणिणि ! पिअस्स ।

पुट्‌ठ-पुलउग्गमो तुह कहेइ संमुहटिठ्‌अं हिअअं ।। १ : ८७ ।।

(हे मानिनी! प्रियकर आल्याबरोबर तू क्रोधाने पाठ फिरवलीस; परंतु तुझ्या पाठीवर उभे राहिलेले रोमांच तुझे हृदय त्याच्या सन्मुख आहे, असे दाखवितात).

केलीअ वि रूसेउं ण तीरए तम्मि चुक्कविणअम्मि ।

जाइअएहिँ व माए! इमेहिँ अवसेहिँ अंगेहिँ ।। २ : ९५ ।।

(आई, त्याला विनय कसा तो माहीतच नाही; तरीही त्याच्यावर थट्टेतसुद्धा मला रागावता येत नाही. दुसऱ्याकडून भीक मागून उसनी आणल्याप्रमाणे माझी गात्रेही माझ्या आधीन राहिलेली नाहीत).

बाण, मम्मट, वाग्भट, विश्वनाथ, गोवर्धन इ. श्रेष्ठ संस्कृत आलंकारिकांनी गाहा सत्तसई ची मुक्तकंठाने प्रशंसा केली असून रस व अलंकार ह्यांची उदाहरणे देण्यासाठी तिच्यातील अनेक गाथांची अवतरणे घेतली आहेत.

गाहा सत्तसई ने अनेक संस्कृत-प्राकृत ग्रंथकार प्रभावित झाले; तिच्या धर्तीवर संस्कृतात आर्यासप्तशती  तयार करण्यात आली; तसेच प्राकृतात वज्‍जालग्ग, गाथासाहस्री, हिंदीत बिहारी सतसई, डिंगलमध्ये सूर्यमल्लाची वीरसतसई  इ. संकलने निर्माण झाली.

स. आ. जोगळेकर ह्यांनी संपादिलेल्या गाहा सत्तसई त (हाल सातवाहनाची गाथा सप्तशती, १९५६) गाथांचा मराठी अनुवादही दिला आहे.

लेखक: ग. वा. तगारे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/15/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate