অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गीतगोविंद

गीतगोविंद

जयदेव (बारावे शतक) कवीचे विख्यात संस्कृत काव्य. ह्याचे बारा सर्ग आहेत. ह्या काव्यात रागतालबद्ध अशा चोवीस गीतांच्या द्वारा गोविंदाचे (श्रीकृष्णाचे) स्तवन केले आहे. ह्या गीतांना कवी ‘प्रबंध’ असे म्हणतो. त्यांनाच अष्टपद्या असेही म्हणतात. ही गीते नृत्यासह गावयाची आहेत. प्रत्येक प्रबंधाच्या आरंभी व नंतर विविध वृत्तांतील सुरस श्लोक आहेत. राधाकृष्णांचे प्रेम-विरह-मीलन हा या काव्याचा विषय; तथापि त्यात सलग असे कथानक नाही. गोविंद, राधा आणि राधेची सखी अशा तीन व्यक्तिरेखा ह्या काव्यात आहेत. राधेची सखी दूतीचे काम करते, नायकनायिकांच्या अवस्था एकमेंकास कळविते आणि शेवटी त्यांचे मीलन घडवून आणते.

गीतगोविंदात राधाकृष्णांच्या प्रणयलीला अत्यंत काव्यमय भाषेत रंगविल्या आहेत. विप्रलंभ आणि संभोग अशा दोन्ही प्रकारच्या शृंगाराचा उत्कट परिपोष त्यात आढळतो. मधुरा भक्तीची बीजे ह्या काव्यात असावीत.

शृंगाराच्या आवरणाखाली जयदेवाने गूढ आध्यात्मिक अर्थ ध्वनित केला असून राधा व कृष्ण हे अनुक्रमे जीवात्मा आणि परमात्मा ह्यांवरील रूपक होय, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असा आध्यात्मिक अर्थ लावण्यास अनुकूल ठरणारे काही उल्लेख ह्या काव्यात आढळत असले, तरी एकंदरीने पाहता राधाकृष्णाचे प्रेम हे स्त्री-पुरुष प्रेमाचेच प्रतीक होय, असा सर्वसामान्य समज आहे.

गोपनाट्य, भावनाट्य, उत्कटनाट्य अशा एखाद्या नाट्यप्रकारात हे काव्य बसविण्याचा प्रयत्न सर विल्यम जोन्स आदी पाश्चात्त्य पंडितांनी केला आहे. तथापि अशा कोणत्याही प्रकारात हे काव्य काटेकोरपणे बसत नाही. निवेदन, वर्णन, भाषण, गीत इत्यादींचा उचित वापर करून जयदेवाने ह्या काव्याला एक आगळेच रूप दिले आहे. जयदेवानंतरच्या साहित्यशास्त्रकारांनी ह्या काव्याच्या पृथगात्म स्वरूपाचा विचार केल्याचे दिसत नाही.

ह्या काव्यविषयाचा निश्चित मूलाधार दाखविणे कठीण आहे. त्यास ब्रह्मषैवर्तपुराणातील राधाकृष्ण कथेचा काहीसा आधार असावा. तसेच श्रीमद्‌भागवतपुराणातील कृष्णगोपींच्या रासलीलांवरूनही जयदेवाने स्फूर्ती घेतली असल्याचा संभव आहे. गीतगोविंदातील अष्टपदी रचनेवर तत्कालीन अपभ्रंश काव्यशैलीचा गाढ परिणाम जाणवतो.

गीतराघव, गीतगौरीपति  इ.अनेक काव्ये गीतगोविंदाच्या अनुकरणाने लिहिली गेली. आलंकारिकांनी उदाहरणादाखल त्यातील अवतरणे दिलेली आहेत. तसेच त्यावर सु. ४० टीका लिहिण्यात आल्या. अनेक यूरोपीय आणि भारतीय भाषांतून ह्या काव्याचे अनुवाद झाले आहेत. गीतगोविंदाची इंग्रजी भाषांतरे सर विल्यम जोन्स (कलेक्टेड वर्क्स, १८०७ मध्ये अंतर्भूत) आणि एडविन आर्नल्ड (द इंडियन साँग ऑफ साँग्ज, १८७५) ह्यांनी केली आहेत. दत्तात्रेय अनंत आपटे ह्यांनी गीतगोविंदाचे मराठी भाषांतर पंडित जयदेवकृत सार्थ गीतगोविंद  काव्य किंवा राधामाधवविलास  ह्या नावाने केले आहे. (दुसरी आवृ. १९२८)

संदर्भ : १. कुलकर्णी, वा. म. गीतगोविन्द (मानाङ्‌काच्या टिप्पणिकेसह), अहमदाबाद, १९६५.

२. तेलंग, मं. रा.; पणशीकर, वा. ल. संपा. गीतगोविन्दकाव्यम्  (कुम्भनृपतीच्या रसिकप्रिया  व

शंकरमिश्राच्या रसमंजरी  ह्या दोन व्याख्यांसह), मुंबई, १९२३.

लेखक: वा. म. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate