অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गेंजी मोनोगातारी

गेंजी मोनोगातारी

राजपुत्र गेंजी याची कथा असलेली एक श्रेष्ठ जपानी कादंबरी. मुरासाकी शिकिबू (सु. ९७८—सु. १०३१) ही ह्या कादंबरीची लेखिका. कादंबरीच्या उत्तरार्धातील काही भाग मात्र अन्य कोणी लिहिला असावा, असा काही अभ्यासकांचा तर्क आहे. ह्या कादंबरीच्या लेखनकालासंबंधी मतभेद असले, तरी सर्वसाधारणतः १००१ ते १०२२ ह्या कालखंडात तिची रचना झाली असावी.

गेंजी ह्या राजपुत्राच्या जीवनावर आधारलेल्या ह्या कादंबरीची एकूण ५४ प्रकरणे तीन भागांत विभागलेली आहेत. पहिल्या भागात गेंजीचे बालपण, साहसांनी भरलेले त्याचे तरुणपण, त्याची अनेक प्रेमप्रकरणे, एका विशिष्ट परिस्थितीत त्याच्या वाट्याला आलेले अज्ञातवासातील जीवन व त्या अज्ञातवासाची अखेर एवढा कथाभाग आला आहे. दुसऱ्या भागात त्याच्या चाळिसाव्या वाढदिवसापासून त्याच्या निधनापर्यंतचा वृत्तान्त आला आहे. तिसऱ्या भागात त्याच्या मृत्युनंतरच्या घटनांचे वर्णन आहे.

कादंबरीचे संविधानक अत्यंत गुंतागुंतीचे असून त्याची हाताळणी वास्तववादी आहे. मानवी निष्ठा आणि सौंदर्याची ओढ या विशेषांवर त्यात भर दिला आहे. दरबारी वातावरणाची पार्श्वभूमी लाभलेल्या ह्या कादंबरीतील निवेदनाचा सूर संथ, संयत व चिंतनात्मक आहे. ह्या निवेदनाच्या ओघात आलेल्या ७९४ कविता ह्या कादंबरीत सर्वत्र विखुरलेल्या आहेत. परिणामतः सबंध कादंबरीतून गडद भावलय जाणवते.

जपानमध्ये त्या वेळी (हे-आन राजवटीत) सर्व लिखाण चिनी लिपीत आणि चिनी भाषेत होत असे. तथापि स्त्रिया सर्वसाधारणतः अशिक्षित असल्यामुळे त्यांना चिनी येत नसे. तेव्हा त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी चिनी लिपीवर आधारलेली जपानी लिपी शोधून काढली. गेंजी मोनोगातारी  ही त्या लिपीत लिहिलेली पहिली कादंबरी.

ह्या कादंबरीचा उत्तरकालीन जपानी लेखकांवर फार मोठा प्रभाव पडला. तिच्या धर्तीवर अनेक कादंबऱ्या रचण्यात आल्या. याखेरीज तीत असलेल्या अनेक प्रसंगोपप्रसंगांचा उपयोग जपानमधील नो नाट्यप्रकारात करण्यात आला. काही मध्ययुगीन जपानी लेखकांनी तर गेंजीचेच कथानक स्वतःच्या शैलीने सजविण्याचा प्रयत्न केला. गेंजीच्या संविधानकाचा स्वतःच्या साहित्यकृतींसाठी उपयोग करून घेणाऱ्या लेखकांत कोयो ओझाकी व जुन इचिरो ह्यांसारख्या आधुनिक जपानी साहित्यिकांचाही समावेश होतो. गेंजी मोनोगातारीचे इंग्रजी भाषांतर आर्थर वेली ह्यांनी सहा भागांत द टेल ऑफ गेंजी  ह्या नावाने प्रसिद्ध केले आहे. हे भाषांतर पुरे करण्यास त्यांना आठ वर्षे लागली (१९२५—३३).

लेखक: सेन्-इचि (इं.) हिसामात्सु ; अ. र. (म.) कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate