অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जो ज्वान्

जो ज्वान्

चिनी भाषेतील एक प्राचीन टीकाग्रंथ. तो जो-च्यव्‌ मींग याने लिहिला. जो ज्वान् (जो याचे भाष्य) ही छवुन्-च्यव्  (वसंत व शरद ऋतूंची बखर) या लू संस्थानच्या इतिहासग्रंथावरील टीका आहे. छवुन्-च्यव्  हा ग्रंथ कन्फ्यूशसने (इ.स.पू. ५५१–४७९) लिहिला, असे मानले जाते. जो-च्यव् हा कन्फ्यूशसचा शिष्य मानला जातो. तथापि त्याच्या आयुष्याविषयी इतर काहीही माहिती उपलब्ध नाही. त्याच्या नावाबद्दलही मतभेद आहेत. काहींच्या मते त्याचे आडनाव ‘जो’ असून, त्याचे नाव ‘च्यव्-मींग’ होते; परंतु इतिहासातील उपलब्ध संदर्भ लक्षात घेता त्याचे आडनाव ‘जो-च्यव्’ असून नाव ‘मींग’ असावे असे वाटते.

छवुन्-च्यव्  ही बखर अत्यंत त्रोटक असल्याने जो-च्यव्‌ने त्यातील प्रसंगांचे आकर्षक व तपशीलवार वर्णन आपल्या टीकाग्रंथात केले आहे. तसेच त्यात मूळ ग्रंथात नसलेल्या काही प्रसंगांची भर घातली आहे. या ग्रंथात भाषणे व संभाषणे यांचाही अंतर्भाव आहे. ‘सत्याचा जय व असत्याचा पराभव’ ही या ग्रंथाची शिकवण आहे. राज्यकर्त्यांनी हा ग्रंथ वाचून त्यापासून बोध घ्यावा, असा लेखकाचा मूळ हेतू दिसतो. त्याची लेखनशैली अत्यंत बहारदार असल्याने, त्याला ‘वन्-जांग जृ जू’ (गद्याचा जनक) असा बहुमानाचा किताब लाभला आहे. जो ज्वान्  या ग्रंथाची गणना चिनी अभिजात वाङ्‌मयात केली जाते. हा ग्रंथ छवुन्-च्यव्वरील टीका नसून, सर्वस्वी वेगळा, स्वतंत्र असा ग्रंथ असावा, असेही एक मत आहे.

लेखक: गि. द.देशिंगकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate