অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्रिस्टान उंड इसोल्ट

ट्रिस्टान उंड इसोल्ट

मध्ययुगीन जर्मन कवी गोट्फ्रीट फोन श्ट्रासबुर्ग (तेरावे शतक) ह्याने रचिलेले महाकाव्य. रचनाकाल सु. १२१०. हे महाकाव्य गोट्‌फ्रीट पूर्ण करू शकला नाही. त्याच्या निधनोत्तर उल्‍रिख फोन ट्यूर्हाइम आणि हाइन्रिख फोन फ्रायबेर्ख ह्या दोन कवींनी ते पूर्ण केले. ट्रिस्टान आणि इसोल्ट ह्या प्रेमी युगुलाची शोकात्मिका ह्या महाकाव्यातून परिणामकारकपणे उभी केलेली आहे. कॉर्नवॉलचा राजा मार्क ह्याचा ट्रिस्टान हा युद्धनिपुण भाचा. मार्कचे त्याच्यावर खूप प्रेम असते. तो त्याला सरदारकी देतो आणि ट्रिस्टानही आपल्या पराक्रमाने राजाला संतुष्ट करतो. आयर्लंडच्या राजाने लादलेल्या जाचक खंडणीतून कॉर्नवॉलला तो मुक्त करतो; त्यासाठी त्या राजाचा शूर मेहूणा मोरोल्ड ह्याच्याशी युद्ध करून तो त्याला ठार मारतो. तथापि ह्या युद्धात ट्रिस्टानला एक गंभीर जखम होते. ती जखम आयर्लंडची राणी बरी करू शकेल, असे समजल्यावरून ट्रिस्टान आयर्लंडला जातो; तेथे वेषांतर करून चारणाच्या रूपात वावरतो व आयर्लंडच्या राणीकडून आपली जखम बरी करून घेतो. आयर्लंडची राजकन्या इसोल्ट हिच्याशी त्याचा परिचय होतो. इसोल्टला त्याच्याविषयी आस्था निर्माण होते. इकडे कॉर्नवॉलमधील दरबारी मंडळींच्या मनात ट्रिस्टानबद्दलचा मत्सर वाढीला लागतो. मार्कनंतर ट्रिस्टान गादीवर येऊ नये, म्हणून ते मार्कला विवाह करण्यास उद्युक्त करतात. मार्कचा विवाह इसोल्टशीच व्हावा, असे ठरते व बोलणी करण्यासाठी राजाचा प्रतिनिधी म्हणून ट्रिस्टान आयर्लंडला जातो. चारणाच्या रूपात आपल्याला भेटलेला तरुण हाच, हे इसोल्ट ओळखते व त्याच्यावर अनुरक्त होते. परंतु ह्यानेच आपला मामा मोरोल्ड ह्याला ठार केल्याचे तिला समजताच ती त्याचा सूड घेण्याचा विचार करते; तथापि तिची आई हे घडू देत नाही. पुढे इसोल्ट-मार्क ह्यांच्या विवाहास मान्यता मिळते व इसोल्टला घेऊन ट्रिस्टान कॉर्नवॉलला निघतो. वधूवरांसाठी इसोल्टच्या आईने एक प्रीतिपेय तयार केलेले असते. प्रवासात मद्य समजून त्याचे प्राशन ट्रिस्टान आणि इसोल्ट ह्यांच्याकडून केले जाते. परिणामतः ती परस्परांशी प्रेमबद्ध होतात. इसोल्टचा मार्कशी विवाह झाल्यानंतरही हे संबंध चालूच राहतात. ते उघडकीस येऊ नयेत ह्यासाठी अनेक युक्त्याप्रयुक्त्या ते योजतात. तथापि अखेरीस मार्कला ते समजतेच. परिणामतः ट्रिस्टानला कॉर्नवॉलबाहेर जावे लागते. तो अ‍ॅरंडलच्या ड्युककडे येतो आणि त्या ड्यूकच्या मुलीशी विवाह करतो. ह्या मुलीचे नावही इसोल्ट असेच असते. तथापि हे लग्न केवळ नावापुरते राहते; कारण ट्रिस्टान ह्या दुसऱ्या इसोल्टला पत्नीसारखे वागवीतच नाही. पुढे विष लावलेल्या हत्याराने ट्रिस्टान जखमी होतो. अशा जखमा बऱ्या करण्याची विद्या त्याच्या प्रेयसीला, कॉर्नेवॉलच्या इसोल्टला, अवगत असते आणि तिला बोलावून घेतल्याशिवाय ट्रिस्टानचे प्राण वाचणे शक्य नसते. कॉर्नेवॉलच्या इसोल्टला ब्रिटनीला येण्याचे आवाहन केले जाते. ती आली, तर तिला आणावयास गेलेल्या गलबतावर पांढरा ध्वज फडकवावा, आली नाही तर काळा; असे ठरते. कॉर्नेवॉलची इसोल्ट येते; तथापि ती ट्रिस्टानला भेटण्यापूर्वीच ट्रिस्टानची मत्सरग्रस्त पत्नी गलबतावर काळा ध्वज फडकतो आहे, असे ट्रिस्टानला खोटेच सांगते. निराश मनःस्थितीत ट्रिस्टान मरण पावतो. कॉर्नवॉलच्या इसोल्टला हे समजताच तीही दुःखातिरेकाने प्राण सोडते.

ट्रिस्टानची कथा मूळची केल्टिक. तिच्यावरून तॉमा (टॉमस) नावाच्या एका अँग्लो-नॉर्मन कवीने रचिलेल्या काव्याधारे गोट्फ्रीटने आपले काव्य रचिले. तथापि शैली, व्यक्तिरेखन, तात्त्विक भाष्य इ. अनेक बाबतींत त्याच्या स्वतंत्र आणि श्रेष्ठ प्रतिभेचा ठसा प्रत्ययास येतो. मध्ययुगीन जर्मन महाकाव्यांचे कलापरिणतरूप ह्या महाकाव्यात दिसते. प्रेमाच्या संकुल स्वरूपाचा सखोल शोध गोट्‌फ्रीटने त्यातून घेतला; प्रेमार्पित मनांची मोठी जाणकारी दाखविली. गोट्फ्रीटच्या आधी आइलहार्ट फोन ओबेर्गे ह्यानेही ट्रिस्टानच्या कथेवर एक महाकाव्य लिहिले होते. तथापि गोट्‌फ्रीट त्याचा कोठेही उल्लेख करीत नाही. ट्रिस्टानच्या कथेवरील महाकाव्यांत गोट्‌फ्रीटचे हे महाकाव्य श्रेष्ठ समजले जाते.

लेखक: अ. र.कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate