অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डायोनिशिअस लाँजायनस

डायोनिशिअस लाँजायनस

(इ. स. पहिले शतक). ग्रीक तत्त्वज्ञ व वकृत्वशास्त्र-विशारद. पेरी हुपस्यूस (इं. भा. ऑन द सब्लाइम) या मूळ ग्रीक भाषेतील प्रबंधाचा तो लेखक मानला जातो. मात्र तो डायोनिशिअस, की कॅशिअस लाँजायनस, की केवळ लाँजायनस ह्याविषयी वाद आहेच. म्हणून त्याचा ‘स्युडो-लाँजायनस’ असादेखील उल्लेख करतात. कॅशीअस लाँजायनस इ. स.च्या तिसऱ्या शतकात होउन गेला. पण ऑन द सब्लाइम  हा प्रबंध सिसिलीमधील सिसिलीअस (पहिले शतक) या लेखकाच्या ऑन ऱ्हेटरिक  या ग्रंथाला उत्तर म्हणून लिहिला गेला असल्याने व ऑगस्टनकालीन इतर वक्तृत्व-विशारदांच्या त्यातील उल्लेखांवरून या प्रबंधाचा लेखकदेखील पहिल्या शतकातच (साधारणतः इ. स. ५० मध्ये) होऊन गेला असावा. ऑन द सब्लाइमचे जुन्यात जुने उपलब्ध हस्तलिखित दहाव्या शतकातील आहे. ते मुळ ग्रीकमध्ये रॉबर्टेली याने १५५४ मध्ये छापले. या हस्तलिखिताच्या सूचीमध्ये ‘डायोनिशिअस’ अथवा ‘लाँजायनस’ असा उल्लेख आहे. यावरूनदेखील या प्रबंधाचा लेखक कॅशिअस लाँजायनस नसावा. १५७२ मध्ये या प्रबंधाचे लॅटिन भाषांतर झाले आणि १६६२ मध्ये जॉन हॉलने त्याचे इंग्रजी भाषांतर केले. लाँजायनस ऑन द सब्लाइम  हे डब्ल्यू. रॉबर्ट्‌स याने केलेले भाषांतर (केंब्रिज, १९३५) हे अलीकडचे सर्वपरिचित भाषांतर आहे. या हस्तलिखिताचा निदान एकतृतियांश भाग उपलब्ध नाही. एकूण ४४ प्रकरणे उपलब्ध आहेत. भावनिक उदात्ततेची या प्रबंधातील संकल्पना लाँजायनसच्या पूर्वीदेखील वक्तृत्वशैलीविषयक लेखनात अस्तित्वात होतीच; पण लाँजायनसने ही संकल्पना वक्तृत्वकौशल्यापुरती मर्यादित न ठेवता अधिक व्यापक स्वरूपात, वाङ्‌मयीन महानतेच्या संदर्भात वापरली. रोमन ऑगस्टन काळात तंत्र व शैली यांवर जो फार मोठा भर दिला जात होता, त्याला उत्तर म्हणून जरी हा प्रबंध असला, तरी अखेर तो एका वक्तृत्वविशारदाचाच प्रबंध आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. लाँजायनसने उदात्ततेचे पाच स्त्रोत सांगितले आहेत : (१) महान संकल्पना, (२)उत्स्फूर्त भावना, (३) वाक्यरचनेतील संयोजन, (४) शब्दयोजना (भव्य रूपके, प्रतिमा वगैरे) आणि (५) उदात्त संरचना. यांतील पहिले दोन स्त्रोत हे लेखकाच्या अंगभूत प्रतिभाशक्तीवरच अवलंबून आहेत. वक्तृत्व व काव्य यांत भेद करताना, उदात्त भाषेचा परिणाम श्रोत्यांची मने वळविण्यापेक्षा ब्रह्मानंदाचा अनुभव देण्यात होतो, असे लाँजायनस म्हणतो. साहित्यसमीक्षेतील ब्रह्मानंदाची ही संकल्पना लाँजायनसच्या नावाशीच जोडली गेली आहे. उदात्तता म्हणजे महान आत्म्याचा प्रतिध्वनी, असे उदात्तता या संकल्पनेचे विवेचन करताना लाँजायनस म्हणतो. साहित्यसमीक्षेत लेखकाच्या प्रतिभेला प्रथमच येथे मोठे महत्त्व दिले गेले आहे. स्वच्छंदतावादी वाङ्‌मय व वाङ्‌मयीन समीक्षा यांत लाँजायनसचा हा विचार स्वागतार्ह ठरला. नव-अभिजाततावादी वाङ्‌मयीन संकेत अणि काटेकोर नियम यांना कंटाळलेल्या लेखक-समीक्षकांवर पुढे या विचाराचा प्रभाव पडलेला दिसून येतो. लाँजायनसने सांगितलेले पुढचे तीन स्त्रोत मात्र कलेपेक्षा कौशल्याकडे झुकणारे आहेत. ‘फिगर्स’ या तिसऱ्या साधनाचे विवेचन करताना त्याने अनियमित वाक्यरचनांची उदाहरणे दिली आहेत. विशिष्ट परिणाम साधण्यासाठी नेहमीची वाक्यरचना टाळून लेखकाला जे वाक्य-संयोजन करावे लागते, तेच त्याला येथे अभिप्रेत आहे. शब्दयोजनेत रूपके व प्रतिमा यांचा अंतर्भाव होतो. आपल्या विवेचनात लाँजायनसने होमर, डिमॉस्थिनीझ, सॅफो वगैरेंच्या उत्कृष्ट रचनांचा आधार घेतला आहे. लेखकाची प्रतिमा आणि त्याचे कौशल्य या वाङ्‌मयनिर्मितीच्या दोन तत्त्वांची सांगड घालण्याचा प्रयत्न लाँजायनसने केलेला आहे. महान आत्मिक सामर्थ्याचा प्रतिभासंपन्न लेखकच अभिजात वाङ्‌मय निर्माण करू शकतो, असा विचार त्याने मांडला आहे व तो आजही मानला जातो.

संदर्भ :  1. Henn, T. R. Longinus and English Criticism, London, 1934.

2. Hipple, W. J. Beautiful, the Sublime and the picturesque in Eighteenth Century British Aesthetic theory, Carbondale, lll. 1957.

लेखक: य. शं. कळमकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate