অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डॅनिश साहित्य

रूनिक लिपीत कोरलेल्या सु. २५० प्राचीन गद्य-पद्य शिलालेखांतून डॅनिश साहित्याचे आदिरूप पहावयास मिळते, ८०० ते ११०० या कालखंडातील ह्या शिलालेखांत महायोद्धे, राजे, धर्मोपदेशक ह्यांसारख्या श्रेष्ठांच्या निधनोत्तर कोरलेले गौरवपर समाधिलेख मुख्यत्वेकरून आहेत. प्रत्यक्ष स्तुती करण्याएवजी ती सूचित करण्याची प्रवृत्ती त्यात आढळते. ह्या शिलालेखांतील पद्य निर्यमक आणि अनुप्रासयुक्त आहे. राजा हाराल (दहावे शतक) ह्याने आपल्या मातापित्यांच्या स्मरणार्थ जटलंडमधील जेलिंग येथे एका भव्य शिलेवर कोरवून घेतलेला एक लेख उपलब्ध झालेला आहे. ह्या लेखाबरोबरच ख्रिस्ताचे एक चित्रही ह्या शिलेवर कोरण्यात आलेले आहे. स्कँडिनेव्हियामधील हे सर्वांत प्राचीन ख्रिस्तचित्र. राजा हारालनेच डॅनिश लोकांना ख्रिस्ती केल्याचा उल्लेख ह्या शिलालेखात आढळतो. डेन्मार्क राजाच्या प्रस्थापनेचा उल्लेखही त्यात आहे.

मध्ययुग

ख्रिस्ती धर्मप्रसाराबरोबर डेन्मार्कमध्ये लॅटिनचे महत्त्व वाढले आणि तीत साहित्यनिर्मितीही होऊ लागली. सॅक्सो ग्रॅमटिकस  (बाराव्या शतकाचा मध्य–तेराव्या शतकाचा आरंभ) ह्या डॅनिश इतिहासकाराने लिहिलेला Gesta Danorum  हा डेन्मार्कचा ११८५ पर्यंतचा इतिहास ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहे. ११८५ ते १२२२ ह्या कालखंडात तो लिहिला गेला. सोळा खंडांच्या ह्या इतिहासग्रंथातील पहिले नऊ खंड स्कँडिनेव्हियन आख्यायिका, वीरगीते, अद्‌भुतरम्य सागा ह्यांसारख्या सामग्रीवर मुख्यतः आधारलेले असून आख्यायिकीय स्वरूपाच्या सु. ६० डॅनिश राजांची माहिती त्यांत आलेली आहे. लॅटिन भाषेवरील सॅक्सोचे प्रभुत्व आणि त्याची प्रभावी निवेदनशैली ह्या ग्रंथातून प्रत्ययास येते. डेन्मार्कला दीर्घ परंपरा व इतिहास आहे, हे दाखवून देण्याचा सॅक्सोचा प्रयत्न होता. एकोणीसाव्या शतकात डॅनिश स्वच्छंदतावाद्यांवर सॅक्सोचा फार मोठा प्रभाव पडला. हा ग्रंथ म्हणजे डेन्मार्कने जागतिक साहित्यात घातलेली पहिली मोलाची भर होय. अन्य उल्लेखनीय लॅटिन साहित्यकृतींत स्व्हेन अगेसॉन ह्याचा Historia regum Daniae Compendiosa  ह्या इतिहासग्रंथाचा व डॅनिश आर्चबिशप आनर्स सनेसॉन (सु. ११६७ – १२२८) ह्याच्या Hexaemeron ह्या धर्मकाव्याचा अंतर्भाव होतो. स्व्हेन अगेसॉनचा इतिहासग्रंथ सॅक्सोच्या Gesta Danorum  इतका विख्यात नसला, तरी तो त्याच्या आधीचा होय. डेन्मार्कचा संक्षिप्त इतिहास त्यात दिलेला आहे.

मध्ययुगीन डॅनिश जीवनाची काही कल्पना स्केनिया, जटलंड, झीलंड ह्या ठिकाणी प्रचलित असलेल्या विधीसंहितांमधून येते. ह्या विधिसंहिता डॅनिशमध्ये लिहिलेल्या आहेत, ही बाब लक्षणीय आहे. १४९५ मध्ये Rimkroniken –डेन्मार्कचा पद्यबद्ध इतिहास–हे डॅनिशमधील पहिले मुद्रित पुस्तक प्रकाशित झाले. स्तोत्रे, वीरगीते अशी काही डॅनिश काव्यरचनाही उपलब्ध आहे. मध्ययुगीन डॅनिश वीरगीतांची रचना साधी, सोपी असली तरी त्यांतून सांगितलेल्या कथा हृदयस्पर्शी आहेत. अशी एकूण ५३९ विरगीते त्यांच्या ३,००० पाठांतून मिळतात. १५९१ मध्ये त्यांची पहिली मुद्रितावृत्ती निघाली.

धर्म सुधारणा आणि प्रबोधन

सोळाव्या शतकाच्या आरंभी ल्युथरने चालविलेल्या ख्रिस्ती धर्मसुधारणेच्या चळवळीचे वारे डेन्मार्कमध्ये वाहू लागले. रोमन कॅथलिक चर्चच्या विरुद्ध आणि बाजूने, अशी विविध पुस्तपत्रे लिहिली गेली. ह्या शतकाच्या पूर्वार्धातच ल्युथरच्या विचारांचा विजय डेन्मार्कमध्ये झाला. त्याबरोबरच डेन्मार्कमध्ये मध्ययुगाचा अंत होऊन यूरोपीय मानवतावादाच्या व प्रबोधनाच्या प्रेरणा प्रभावशाली होत गेल्या. क्रिस्टयेन पीअडर्सन (१४८० ?–१५५४) ह्याने बायबलच्या ‘नव्या करारा’चा आणि मार्टिन ल्यूथरच्या पुस्तपत्रांचा डॅनिश अनुवाद केला; सॅक्सोकृत Gesta Danorum च्या पहिल्या मुद्रितावृत्तीचे संपादन केले. १५५० मध्ये बायबलचा डॅनिश अनुवाद प्रसिद्ध झाला. त्याच्या अनुवादकांतही पीअडर्सनचा समावेश होता. नीअल्स हेमिंग्‌सेन (१५१५–१६००) ह्याने केलेल्या धर्मशास्त्रविषयक लेखनाला ल्युथरपंथीयांत फार मोठे प्रामाण्य प्राप्त झाले होते. आनर्स सरेन्‌सेन व्हेडेल (१५४२–१६१६) ह्याने सॅक्सोचा इतिहासग्रंथ डॅनिशमध्ये आणला; डॅनिश वीरगीतांचे पहिले संकलन संपादिले.

सोळाव्या शतकाच्या आरंभापासूनच डॅनिशमध्ये अद्‌भुत व सदाचार-नाटके ( मिरॅकल अँड मोरॅलिटी प्लेज), प्रहसने असे विविध प्रकारचे नाट्यलेखन होऊ लागले होते. Ludus de Sancto Canuto (सु. १५३०, इं. शी. सेंट कॅन्यूट्स प्ले) हे सदाचार-नाटक आणि Karrig Nidding  ( इं. शी. द मायझर्‌ली रास्कल) हे प्रहसन विशेष उल्लेखनीय होय. ह्या शतकातील बरीचशी कविता धार्मिक वा वादप्रवण अशी आहे. सतराव्या शतकात आनर्स आर्रेबो (१५८७–१६३७) आणि टॉमस किंगो (१६३४–१७०३) हे दोन महत्त्वाचे कवी उदयाला आले. आरेंबोने गीयोम द्यूबार्तास ह्या फ्रेंच कवीच्या La semaine (१५७८) ह्या काव्याचे Hexaemeron (१६६१) ह्या नावाने सुंदर डॅनिश रूपांतर केले. किंगोने श्रेष्ठ दर्जाची धार्मिक कविता लिहिली. त्याच्या उत्कृष्ट स्तोत्रांतून जगाबद्दल आसक्ती आणि विरक्ती अशा दोन्ही भाववृत्तींचा प्रत्यय येतो. त्याच्या कवितेतून व्यक्त होणारे मन ऐहिकतेला पारखे नसले, तरी त्यात खोलवर रुजलेली धर्मभावना आहे. विशुद्ध आनंद केवळ ईश्वरच देऊ शकेल, ही जाणीव त्याची कविता प्रभावीपणे व्यक्त करते.

अठरावे शतक

ह्या शतकाचा पूर्वार्ध विवेकवादाचा. साहित्यात हा विवेकवाद अभिजाततावादी आदर्शांच्या आग्रहातून आविष्कृत झाला. डॅनिश अभिजाततावादी साहित्यिकांपुढे फ्रेंचमधील अभिजात साहित्यकृतींचा आदर्श होता.  लुद्व्ही हॉल्बर्ग  (१६८४–१७५४) हा ह्या शतकातील श्रेष्ठ नाटककार. डॅनिश रंगभूमीसाठी त्याने ३२ सुखात्मिका लिहिल्या. केवळ डेन्मार्कमध्येच नव्हे, तर संपूर्ण स्कँडिनेव्हियात अभिजाततावादी सुखात्मिका स्थिरपद करण्याचे श्रेय त्याचे आहे. काही उपरोधिका, राजकीय निबंध आणि इतिहासग्रंथही त्याने लिहिले.  हान्स आडॉल्फ ब्रोर्सन  (१६९४–१७६४) ह्याने धार्मिक कवितेला नवचैतन्य प्राप्त करून दिले. जर्मन पायटिझमचा (सनातनी सिद्धांतनिष्ठेपेक्षा व्यक्तिगत उत्कट धर्मशीलतेवर भर देणारा एक ल्युथरन पंथ) त्याच्यावर प्रभाव होतो.  इव्हाल योआनेस  (१७४३–८१) हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ भावकवी. डॅनिश स्वच्छंदतावादाचा तो अग्रदूत मानला जातो. स्कँडिनेव्हियन मिथ्यकथा, सागा, वीरगीते ह्यांच्या सृष्टीत तो रमला. आपल्या उत्कृष्ट ओडरचनेने त्याने ‘ओड’ ह्या काव्य प्रकारास नवे सामर्थ्य प्राप्त करून दिले. त्याने लिहिलेल्या ‘किंग ख्रिश्चन स्टूड बाय द लॉफ्टी मास्ट’ (इ. अर्थ) ह्या गीतास डेन्मार्कचे राष्ट्रगीत होण्याचा बहुमान लाभला. इव्हालने उत्कृष्ट शोकात्मिकाही लिहिल्या. Balders Dod  (१७७४–७५, इं. भा. द डेथ ऑफ बाल्डर, १८८९) आणि Rolf Krage (१७७०) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय शोकात्मिका. युहान हॅर्मान व्हेसेल (१७४२–८५) ह्या नॉवेजियनानेही डॅनिश साहित्यात काही लक्षणीय भर घातली. श्रेष्ठ विनोदबुद्धी असलेला हा लेखक होता. लव्ह विदाउट स्टॉकिंग्ज (इं. अर्थ, १७७२) हे फ्रेंच शोकात्मिकेचे त्याने केलेले मार्मिक विडंबन विख्यात आहे. व्हेसेल हा फ्रेंच साहित्याचा एक चाहता होता; तथापी डॅनिश रंगभूमीवर फ्रेंच शोकात्मिकांचे चालू असलेले अनुकरण त्याला विडंबनार्ह वाटत होते. पद्याच्या माध्यमातून त्याने काही विनोदी कथाही लिहिल्या. त्यांच्या पद्यघाटावर लाफाँतेन ह्या फ्रेंच बोधकथाकाराचा ( फॅब्यूलिस्ट) प्रभाव जाणवतो.  येन्स बागेसेन (१७६४–१८२६) ह्या कवीची काव्यशैली विक्षिप्त होती. Labyrinten (१७९२ – ९३, इं. शी. द लॅबिरिंथ) ह्या नावाने त्याने संपन्न प्रवासवर्णने लिहिली. डॅनिश गद्याला त्याने लवचिकपणा प्राप्त करून दिला.

एकोणिसावे शतक

ह्या शतकारंभी लूटव्हिख टीक, होफ्‌मान, नोव्हालिस ह्यांसारख्या जर्मन साहित्यिकांच्या प्रभावातून डॅनिश साहित्यात स्वच्छंदतावाद अवतरला; तथापि गटे आणि शिलर ह्यांच्या अभिजात साहित्यकृतींचा एक प्रभावस्त्रोत त्यात आढळतो.  आडाम गॉटलॉब अलेनश्लेअगर  (१७७९ – १८५०) हा डॅनिश स्वच्छंदतावादी संप्रदायाचा नेता. काव्य आणि नाटकांतून त्याची प्रतिभा सारख्याच सामर्थ्याने प्रकटली. परीकथेचे वातावरण असलेले अल्लादिन हे त्याच्या विख्यात नाट्यकृतींपैकी एक होय. एकूण डॅनिश स्वच्छंदतावादी साहित्यातील एक प्रमुख साहित्यकृती म्हणूनही ह्या नाटकाचे स्थान वरचे आहे. नॉर्डिक आख्यायिकांवर आधारलेल्या नाट्यकृतीही त्याने लिहिल्या. Nordiske Digte (१८०७, इं. शी. नॉर्दर्न पोएम्स) ह्या त्याच्या काव्यसंग्रहातून त्याने स्कँडिनेव्हियन मिथ्यकथांचे कलात्मक पुनरुज्जीवन केले. केवळ साहित्यातच नव्हे; तर इतिहास, शिक्षण, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र आदी क्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा  नीकोलाय फ्रीद्रिक सेव्हेरीन ग्रुंटव्हिग  (१७८३–१८७२) ह्याने उमटविला. त्याच्या सुंदर स्तोत्रांनी आणि गीतांनी डॅनिश साहित्यात त्याचे नाव चिरस्थायी केले आहे. भक्तिसंपन्न धार्मिकता व उत्कट देशभक्ती त्याच्या कवितेतून प्रत्ययास येते. प्राचीन स्कँडिनेव्हियाबद्दल त्यालाही आकर्षण होते.  रास्मुस क्रिस्त्यान रास्क  (१७८७–१८३२) ह्या डॅनिश भाषाशास्त्रज्ञाचे कर्तृत्वही ह्याच शतकातील.

आपल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांतून बेर्नहार्ट इंगेमान (१७८९–१८६२) ह्याने मध्ययुगीन डेन्मार्कचे चित्र रंगविले, राष्ट्राभिमान चेतविला. Morgen og Aftensange (१८३९, इं. शी. मॉर्निंग अँड ईव्हनिंग साँग्ज) ह्या नावाने त्याने लिहिलेली साधी, सुंदर धार्मिक गीतेही प्रसिद्ध आहेत. स्वच्छंदतावादाच्या प्रभावकालातही वास्तववादाचा स्त्रोत डॅनिश साहित्यात आणून सोडण्याचे श्रेय  स्टीअन स्टीअन्सन ब्लीकर (१७८२ – १८४८) आणि  पाउल मार्टिन मोलर (१७९४–१८३८) ह्या दोन साहित्यिकांकडे जाते. ब्लीकरने जटलंडमधील सर्वसामान्यांचे चित्रण आपल्या कथांतून केले, तर मोलरने समकालीन जीवनावरील पहिली कादंबरी (इं. शी. अड्व्हेंचर्स ऑफ अ डॅनिश स्ट्यूडंड, १८२४) लिहिली. तथापि १८३० नंतरच्या डॅनिश साहित्यात  युहान लूद्व्ही हाय्‌बेर्ग  (१७९१–१८६०) ह्या नाटककाराने डॅनिश साहित्याभिरुचीवर आपला प्रभाव पाडला. फ्रेंचमधील ‘व्होड्व्हील’ हा संगीत-नृत्यप्रधान नाट्यप्रकार डॅनिश रंगभूमीवर आणून डॅनिश नाटकाला त्याने नवे चैतन्य देण्याचा प्रयत्न केला. ‘द फेअरी हिल’आणि ‘डे ऑफ द सेव्हन स्लीपर्स’ ह्या इंग्रजी शीर्षकार्थांच्या नाट्यकृतींतून त्याने स्वप्न-वास्तवांच्या जगांचे परिणामकारक दर्शन घडविले आहे. श्रेष्ठ समीक्षक म्हणूनही हायबेर्गचा लौकिक होता. त्याच्या समीक्षेवर हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे. हेन्रिक हेर्ट्‌स (१७९७–१८७०) ह्याने काही सुखात्मिका आणि स्वच्छंदतावादी वळणाची गंभीर नाटके लिहिले. क्रीस्त्यान व्हिंटर (१७९६–१८७६) आणि एमिल ऑरेस्ट्रूप (१८००–५६) ह्या दोन कवींची वृत्ती सौंदर्यान्वेषी होती. प्रेम आणि निसर्ग हे त्यांच्या कवितांचे प्रमुख विषय. Hjortens Flugt (१८५५, इं. शी. द फ्लाइट ऑफ द स्टॅग) हे व्हिंटरचे कथाकाव्य त्याच्या महत्त्वाच्या कृतींत अंतर्भूत आहे. ह्या कथाकाव्यास मध्युगीन झीलंडची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ऑरेस्ट्रूपने उत्कृष्ट शृंगारिक कविता लिहिल्या.  फ्रीड्रिक पालुडानम्यूलर (१८०९–७६) ह्या कवीवर प्रथम बायरनचा प्रभाव होता; तथापि पुढे तो कठोर नीतिवादी झाला. बायबल हे त्याचे स्फूर्तिस्थान ठरले. आदम होमो  (१८४२– ४९) ही त्याची सर्वश्रेष्ठ साहित्यकृती. बारा सर्गांच्या ह्या आपल्या महाकाव्यात त्याने एकोणिसाव्या शतकाच्या प्रथमार्धातील डॅनिश जीवनाचे औपरोधिक चित्रण केलेले आहे. डेन्मार्कचा जगद्विख्यात परीकथाकार  हॅन्स क्रिश्चन अँडरसन (१८०५–७५) ह्याचे कर्तृत्व ह्याच काळातले. पशु, पक्षी, झाडे, फुले व अचेतन वस्तूही त्याने आपल्या परीकथांतून बोलक्या केल्या. त्या कथांतील कल्पनारम्य जग बालमनाची पकड घेते, तर त्यांतून सहजपणे उलगडत जाणारे मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्यांची मोहिनी प्रौढांवर पडते. जगातील विविध भाषांतून अँडरसनचे कथाविश्व अनुवादरूपाने साकारलेले आहे. Mit Lives Eventyr (१८५५, इं. भा. द स्टोरी ऑफ माय लाइफ, १८७१) ह्या नावाने त्याने लिहिलेल्या स्वतःच्या आयुष्यातील आठवणीही वाचनीय आहेत. जिवंत शैलीने नटलेली काही प्रवासवर्णनेही त्याने लिहिली. अँडरसनने केलेले कादंबरीलेखन मात्र फारसे महत्त्वाचे नाही. आधुनिक तत्त्वज्ञानातील  अस्तित्ववाद ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचारसरणीचा आद्य प्रवर्तक मानला जाणारा सरेन किर्केगॉर (१८१३–५५) ह्याने लिहिलेल्या कथा-कादंबऱ्यांतूनही त्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यय येतो. Enten-Eller (१८४३, इं. भा. ईदर -ऑर, १९४४) आणि Stadier paa Livets vej  (१८४५, इं. भा. स्टेजिस ऑन लाइफ्‌स वे, १९४०) ह्या त्याच्या दोन उल्लेखनीय तात्त्विक कादंबऱ्या.  मायर आरॉन गोल्डश्मिट (१८१९–८७) हा ज्यू कादंबरीकार. डॅनिश ज्यू आणि डॅनिश समाजातील अन्य लोक ह्यांच्यातील दुराव्याचे चित्रण त्याने द ज्यू ऑफ डेन्मार्क (मूळ कृती, १८४५, इं, भा. १८५२) ह्या कादंबरीत परिणामकारकपणे केले आहे. त्याच्या बहुतेक कथा-कादंबऱ्यांना ज्यूंच्या जीवनाची पार्श्वभूमी आहे.

डॅनिश साहित्यात १८७० च्या सुमारास वास्तववादाची लाट आली. गीऑर ब्रांडेस (१८४२–१९२७) हा ह्या नव्या संप्रदायाचा नेता. स्वप्नात गुंतून पडण्याऐवजी साहित्याने वास्तावाभिमुख व्हावे; तसेच साहित्याने प्रगमनशीलतेची सेवा करावी; प्रतिक्रियावादी वृत्तीना जोपासू नये, असा विचार ब्रांडेसने दिला. १८७१ मध्ये त्याने दिलेली विचारप्रवर्तक व्याख्याने (इं. शी. मेन करंट्स इन नाइंटिंथ सेंच्युरी लिटरेचर) १८७२ ते १८९० ह्या कालखंडात प्रसिद्ध झाली. डेन्मार्कच्या धार्मिक-नैतिक परंपरांचीही त्याने कठोर समीक्षा केली. ब्रांडेसने बौद्धिक जीवनाच्या विविध क्षेत्रांत विवेकाचे महत्त्व किती मोठे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्राचीन स्कँडिनेव्हियात आधुनिक साहित्यसमीक्षेचा त्याने पाया घातला. येन्स पीअटर याकॉपसन  (१८४७–८५) हा ब्रांडेसच्या प्रभावाखालील साहित्यिकांपैकी प्रमुख होय. Niels Lyhne (१८८०) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबरीत स्वप्नवास्तवातील विरोधाची समस्या मांडली आहे. Marie Grubbe (१८७६) ही त्याची कादंबरी निसर्गवादी वळणाची आहे.  हॉल्गर ड्राखमान (१८४६–१९०८) ह्याच्यावर आरंभी ब्रांडेसचा प्रभाव होता; तथापि पुढे तो ब्रांडेसचा कडवा विरोधक झाला. ड्राखमानला समुद्राचे आणि समुद्राशी निकटचे नाते असलेल्या दर्यावर्द्यांचे–कोळ्यांचे आकर्षण होते. त्याच्या लेखानातूनही ते प्रतिबिंबित झालेले आहे. गीऑर ब्रांडेसचा बंधू ईअडव्हार्ड ब्रांडेस ह्याने आपल्या नाट्यकृतींतून प्रासंगिक विषय मांडले.

विसावे शतक

ह्या शतकारंभीच युहानेस येन्सन  (१८७३–१९५०) हा एक वेगळ्या प्रवृत्तीचा कवी-कादंबरीकार उदयास आला. डार्विनच्या उत्क्रांतिवादाने तो भारलेला होता. Den Lange Rejse (६ खंड, १९०८–२२, इं. भा. द लाँग जर्नी, ३ खंड, १९२२) ह्या कादंबरीत हा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. मानवजातीच्या विकासावस्था तीत त्याने चित्रित केलेल्या आहेत. बुक ऑफ जेनेसिसची जागा घेण्याचा हा धीट प्रयत्न होता. प्रादेशिकता हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. त्याच्या Himmerlands Historier (१८९८, इं. शी. हिमरलांड स्टोरीज) मध्ये जटलंडमधील आख्यायिका-परंपरांचा त्याने परिणामकारक उपयोग करून घेतला. येन्सनला १९४४ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. जेप्पे आकजीर (१८६६–१९३०) आणि योआनेस स्कजोल्डबोर्ग (१८६१–१९३६) हे आणखी दोन प्रादेशिक साहित्यिक. आकजीर हा कवी-कादंबरीकार. जटलंडच्या कृषकांचे जीवन त्याने रंगविले. कवी म्हणून आज तो प्रामुख्याने ओळखला जातो. स्कजोल्डबोर्गच्या कादंबऱ्यांतून आपली परिस्थिती सुधारण्यासाठी छोट्या शेतकऱ्यांची चाललेली धडपड प्रत्ययकारीपणे चित्रित झालेली आहे.  निक्सो  (१८६९–१९५४) हा कादंबरीकार आंतरराष्ट्रीय साम्यवादाचा पुरस्कर्ता. दारिद्र्याशी झगडणारी माणसे त्याने रंगविली. Pelle Erobreren (१९०६–१०, इं. भा. पेल्ले द काँकरर, १९१३–१६) आणि Ditte Menneskebarn (१९१७–२१, इं. भा. डॉटर ऑफ मॅन, १९२०–२३) ह्या दोन कादंबऱ्यांवर त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. पेल्ले द काँकरर मध्ये एका राजकीय पुढाऱ्याची कथा सांगितली आहे. डेन्मार्कमधील समाजवादी चळवळीचे ते एक गद्यमहाकाव्यच होय. डॉटर ऑफ मॅन मध्ये एका मुलीचे हृदयस्पर्शी, करुण जीवन सशब्द केलेले आहे. हान्स कर्क (१८९८–१९६२) ह्याची Fiskerne (१९२८, इं. शी. द फिशरमेन) हि कादंबरी सामाजिक वास्तववादाचे लक्षणीय उदाहरण होय. जटलंडमधील एका कोळी कुटुंबातच कर्कचा जन्म झालेला होता. कोळीजीवनाचे जिवंत चित्रण ह्या कादंबरीत त्याने केले आहे.

सोफुस शँडॉर्फ (१८३६–१९०१) ह्याने कथा-कादंबऱ्या लिहिल्या.  हेन्रिक पॉनटॉपिडान  (१८५७ – १९४३) हा डेन्मार्कचा एक श्रेष्ठ कादंबरीकार. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि नैतिक समस्या त्याने आपल्या कादंबऱ्यांतून मांडल्या. Det forjaettede Land (१८९१–९५, इं. भा. द प्रॉमिस्ड लँड, १८९६), Lykke-Per (१८९८–१९०४, इं. शी. लकी पीटर) ह्यांसारख्या त्याच्या कादंबऱ्या तत्कालीन डेन्मार्कचे परिणामकारक चित्र उभे करतात.  हॅर्मान बांग (१८५७–१९१२) हा आणखी एक श्रेष्ठ डॅनिश कादंबरीकार. वरवर नाट्यशून्य वाटणाऱ्या सर्वसामान्यांच्या जीवनातील दुःखे त्याने उकलून दाखविली; एकाकी माणसांचे भेदक चित्रण केले. Ved Vejen (१८८६, इं. शी. बिसाइड द ट्रॅक), De uden Faedreland (१९०६, इं. भा. डिनाइड अ कंट्री, १९२७) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. डॅनिश साहित्यातील संस्कारवादाचा (इंप्रेशनिझम) तो महत्त्वाचा प्रतिनिधी. कार्ल गेल्लेरूप (१८५७ –१९१९) ह्या कादंबरीकारावर प्रथम गिऑर ब्रांडेसचा प्रभाव होता ; तथापि त्यातून लवकरच मुक्त होऊन तो जर्मन चीद्वादाकडे वळला. शिलर, शोपेनहौअर ह्यांच्याप्रमाणेच बौद्ध धर्मानेही तो प्रभावी झाला. En Idealist (१८७८) आणि Manernes Laerling ह्या त्याच्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांपैकी काही होत. उपर्युक्त हेन्रिक पॉनटॉपिडान आणि गेल्लेरूप ह्या दोघांना १९१७ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.

डॅनिश कवितेत १८९० नंतर प्रतिकवादाचा प्रभाव जाणवू लागला. ‘अव्यक्ताला प्रतिकरूपे व्यक्त करणे’, हे ह्या प्रतिकवाद्यांचे उद्दिष्ट होते. युहानेस यर्जेनसेन  (१८६६–१९५६) हा ह्या प्रतीकवाद्यांचा नेता होता. धर्मभावनेचा व निसर्गप्रेमाचा हळुवार आविष्कार त्याच्या कवितांत आढळतो. ‘द टॉवर’ ह्या इंग्रजी शीर्षकार्थाच्या नियतकालिकांतून त्याने आपले विचार व्यक्त केले. यर्जेनसेन हा एक श्रेष्ठ भावकवी तर होताच, तथापि रोमन कॅथलिक पंथाचा स्वीकार केल्यानंतर त्याने लिहिलेली संतचरित्रेही मोलाची आहेत. असिसीचा सेंट फ्रान्सिस, सिएनाची सेंट कॅथरीन आणि सेंट ब्रिजेट ही त्याने लिहिलेली उल्लेखनीय संतचरित्रे. Mit Livs Legende  (१९१६ –१८, इं. शी. द लेजंड ऑफ माय लाइफ) हे त्याचे आत्मचरित्रही वाचनीय आहे. व्हीको स्टुगेनबर्ग (१८६३–१९०५), सोफुस क्लाउसन (१८६५–१९३१) आणि हेल्गे रोदे (१८७०–१९३७) हे प्रतीकवादी काव्यसंप्रदायातील अन्य काही कवी. निवृत्तीची एक उदास भावना व्हीकोच्या कवितेत अभिव्यक्त झाली आहे, तर क्लाउसनच्या कवितेतून चराचरेश्वरवादी निसर्गप्रेम प्रत्ययास येते. रोदे गूढवादी होता.

हेरडची व्यक्तिरेखा निर्मिताना शेक्सपिअरने निर्माण केलेल्या भव्य व्यक्तीरेखा मुंकच्या डोळ्यासमोर असल्याचे जाणवते. हिटलर, मुसोलिनी ह्यांच्यावरही मुंकने नाटके लिहिली. हुकूमशाहांबद्दल मुंकला काही काळ सहानुभूती वाटत होती; परंतु पुढे मात्र त्याचा भ्रमनिरास झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने डेन्मार्क ताब्यात आणल्यानंतर मुंकला नाझींच्या हातूनच मृत्यू आला. क्येल आबेल (१९०१–६१) ह्याने फॅसिझम, बुर्झ्वा मनोवृत्ती, बुद्धिवाद्यांची आणि व्यक्तिवाद्यांची निष्क्रियता ह्यांवर आपल्या नाटकांतून टीका केली आहे. Melodien der blev vaek (१९३५, इं. भा. द मेलडी दॅट गॉट लॉस्ट, १९३९) हे त्याच्या विशेष उल्लेखनीय नाटकांपैकी एक होय.  कार्ल सोया  (१८९६ –   ) हा आणखी एक महत्त्वपूर्ण नाटककार. ‘फ्रागमेंट्स ऑफ अ पॅटर्न’, ‘टू थ्रेड्स’, ‘थर्टी यीअर्स रिप्रीव्ह’ व ‘फ्री चॉइस’ ह्या इंग्रज शीर्षकार्थांच्या चार नाटकांसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. त्यांपैकी पहिली तीन ‘ब्लाइंड मॅन्स बफ’ (इंग्रजी शीर्षकार्थ) ह्या नाट्यत्रयीत अंतर्भूत असून प्राचीन ग्रीक नाटकांच्या संकेतानुसार चौथे नाटक ही एक विरूपिका आहे. सोयाने ह्या नाटकांत इब्सेनप्रमाणेच समस्यांचे केवळ दर्शन घडविले आहे; त्या सोडविण्याचे मार्ग सुचविलेले नाहीत. Min Farmors Hus  (१९४३, इं. भा. ग्रँडमदर्स हाउस, १९६६) ही त्याची एक श्रेष्ठ कादंबरी. सोयाने चांगले कथालेखनही केले आहे.

टॉम क्रिस्टेनसेन (१८९३ – ), नीस पेटर्सेन (१८९७ –१९४३) आणि  याकोप पालुडान  (१८९६ –   ) हे १९२० नंतरचे श्रेष्ठ डॅनिश साहित्यिक होत. क्रिस्टेनसेन व पेटर्सेन हे दोघे कवी -कादंबरीकार. पालुडान हा कादंबरीकार आणि निबंधकार. पहिल्या महायुद्धात डेन्मार्क तटस्थ होते; तथापि ह्या जागतिक युद्धाचा परिणाम डॅनिश साहित्यिकांवर झाल्यावाचून राहिला नाही. युद्धाने उद्ध्वस्त केलेल्या श्रद्धा आणि घडवून आणलेला भ्रमनिरास ह्या तिघांच्याही लेखनात दिसतो.

कारेन ब्लिकसेन ( १८८५ –१९६२) हिने यशस्वी कथालेखिका म्हणून लौकिक मिळविला. सेव्हन गॉथिक टेल्स हा तिचा पहिला कथासंग्रह इंग्रजीत होता. पुढे तिनेच त्याचे डॅनिशमध्ये भाषांतर केले. त्यानंतरचे तिचे दोन कथासंग्रह एकाच वेळी, इंग्रजी आणि डॅनिश भाषांत प्रसिद्ध झाले. सूक्ष्म उपरोध आणि सफाईदार, लालित्यपूर्ण शैली ही तिच्या कथालेखनाची वैशिष्ट्ये होत.

पहिल्या महायुद्धानंतरच्या काही नाटककारांवर जर्मन अभिव्यक्तिवाद्यांचा प्रभाव पडलेला होता. स्व्हेन क्लाउसेन (१८९३–१९६१) व स्व्हेंड बोरबेर्ग (१८८८–१९४७) ह्या दोन नाटककारांचा त्यांत समावेश होतो. तथापि  काई मुंक (१८९८–१९४४) ह्या नाटककाराने भव्य शेक्सपिअरिअन नाट्यपरंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्याचे En Idealist (१९२८,इं भा. हेरड द किंग, १९५५) हे नाटक त्या दृष्टीने उल्लेखनीय.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात काव्यातून अस्वस्थ मनाने ईश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारे काही भावकवी उदयास आले. Heretica ह्या नावाच्या नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत. टुर्कील ब्यर्नव्हिग (१९१८ –) व ओल वाय्‌व्हेल (१९२१ –) ह्यांचा त्यांत अंतर्भाव होतो. अशा भावकवींच्या कवितांतून जाणवणारी अस्वस्थता  हॅन्स क्रिश्चन ब्रॅनर (१९०३ –६६) आणि मार्टिन आल्फ्रेड हान्सेन (१९०९–५५) ह्यांच्या कादंबऱ्यांतूनही प्रत्ययास येते. ब्रॅनरची Rutteren (१९४९, इं. भा. द रायडिंग मास्तर, १९५१) आणि हान्सेनची Logneren (१९५०, इं. भा. द लायर, १९५४) ह्या दोन कादंबऱ्या त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. पॉल ला कूर (१९०२–५६) हा एक भावकवी. तथापि त्याने लिहिलेल्या फ्रँग्‌मेंट्स ऑफ अ डायरी (१९४८) ह्या इंग्रजी शीर्षकार्थाच्या छोट्याशा पुस्तकातून त्याच्या समर्थ गद्यलेखनाची प्रचीती येते. मानवाच्या अस्तित्वात परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती कवितेत आहे, असे तो आत्मविश्वासाने सांगतो. मानवातील आदिम, रानवट प्रवृत्तींपासून कविता मानवाचे संरक्षण करते, ही त्याची श्रद्धा.

१९५५ च्या सुमारास डॅनिश साहित्यात व्यस्ततावादी प्रवृत्ती येऊ लागल्या. किर्केगॉर, हायडेग्गर आणि काफ्का ह्यांचा प्रभावही गोचर होऊ लागला. व्हिली सरेन्सन (१९२९ –) ह्याच्या कल्पनारंजित कथांतून तसेच त्याच्या तात्त्विक व साहित्यसमीक्षात्मक लेखांतून त्याने आधुनिक काळात पालकाच्या भूमिकेतून व्यक्तींवर राज्यसंस्थादींकडून लादल्या जाणाऱ्या आणि व्यक्तीला वास्तव जगापासून दूर नेणाऱ्या विविध बंधनांचा निषेध केला; व्यक्तित्वशून्यता आणि दूरस्थता ह्या समस्यांतून आधुनिक माणसाला कसे मुक्त होता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केला; कला-साहित्य ही मोक्षाची साधने आहेत असे सांगितले.

क्लाऊस रिफ्‌बजेर्ग (१९३१–) हा एक गतिमान आणि चतुरस्र साहित्यिक. कविता, कथा-कादंबऱ्या, नाटके, समीक्षा, चित्रपट इ. अनेक माध्यमांना त्याने आपल्या आविष्काराचे वाहन बनविले. आत्मप्रीतीच्या खडकावर आधुनिक कवीचे तारू अनेकदा फुटते, अशी त्याची धारणा आहे. १९६० मध्ये १६ सदस्यांची ‘डॅनिश अकादमी’ स्थापन करण्यात आली. व्हिली सरेन्सन आणि क्लाऊस रिफ्‌बजेर्ग हे तिचे अनुक्रमे १९६५ व १९६७ मध्ये सदस्य झाले.

संदर्भ : Mitchell, P. H. A History of Danish Literature, Copenhegen, 1957.

लेखक: बिलेस्कॉव्ह एफ्‌. जे. यान्सेन; अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate