অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परीकथा

परीकथा

सर्वसामान्य परीचे अद्भुतरम्य, चमत्कृतिपूर्ण व स्वप्नरंजनात्मक कल्पनाविश्व ज्यात साकार झालेले असते, असा बालवाडङमयातील एक लोकप्रिय कथाप्रकार. पर म्हणजे पंख असलेली ती परी. परी हा शब्द मूळ फार्सी असून तो इराणी प्रवाशांद्वारे इसवीसनाच्या प्रारंभी भारतात आला. फार्सीतल्या परीला मोराचे पंख, घोड्याचे शरीर व मानवी आकर्षक चेहरा कल्पिलेला असे. भारतीय पुराणातील अप्सरांच्या वर्णनानुसार पुढे भारतीय परी दिसण्यात, एखाद्या छोट्या, अत्यंत नाजूक व मोहक राजकन्येसारखी पण मनोहर पंख असलेली अशी कल्पली गेली. परीला ‘फेअरी’ असा इंग्रजी शब्द आहे. त्याचे मूळ लॅटिन ‘fata’ (रोम न देवतानिदर्शक) या शब्दात सापडते. या शब्दाचे जुने फ्रेंच रूप ‘faerie’ असून त्याचा अर्थ जादू, भुरळ वा चेटूक असा आहे.

जगात परीला सामान्यपणे मानवसदृश्य, सचेतन, अदभुत शक्ती असलेली, चांगल्या मुलांवर माया करणारी अशी कल्पिली आहे. जागतिक परिकथावाङ्मयात पऱ्‍यांची अनेकविध रूपे वर्णिली आहेत. त्यात सुष्ट पऱ्‍या आहेत, तशाच दुष्ट पऱ्‍याही आहेत. आंग्ल परी ही बहुधा उपकारकर्त्या, मातेसारख्या प्रेमळ रूपात भेटते. आयरिश परी छोटी, नाचणारी, मिस्किल असते. फ्रेंच ‘fee’ ही बहुधा सुंदर युवती असते; तर जर्मन परी वृद्ध, समजुतदार व शहाणी. स्पॅनिश ‘fada’ ही भुरळ घालणारी परी. ती कधीकधी दुष्ट व कुरूपही असते. इटालियन ‘fata’ ही अशारिरी नियतीचे रूप धारण करते. अशा भिन्नभिन्न परीरूपांमुळे देशोदोशीच्या परीकथांची रूपेही भिन्नभिन्न व वैशिष्ट्यपूर्ण बनली आहेत. परीकथांतून पऱ्‍यांचे त्यांच्या विशिष्ट निवासस्थानांवरून पाडलेले प्रकारही दृष्टोत्पत्तीस येतात. उदा., जलपरी, हिमपरी, वायुपरी, वनपरी इत्यादी. परीकथांमध्ये या पऱ्‍यांच्या अदभुतरम्य कृतींचे व आश्चर्यजनक जादूमय विश्वाचे दर्शन घडते. परीकथा विशेषकरून लहान मुलांना फार आवडतात; कारण त्या मनोरंजन करतात. शिवाय मुलांना प्रत्यक्षात जे हवेहवेसे वाटते पण मिळत नाही, ते एखादी परी त्यांना त्यांच्या स्वप्नसृष्टीत मिळवून देते. त्या दृष्टीने परीकथेतील स्वप्नरंजन रम्य व सुखद असते.

तथापि ‘परीकथा’ ही संज्ञा कित्येकदा काहीशा सैलपणाने व व्यापक अर्थानेही वापरली जाते. काही परीकथांमध्ये निर्जीव वस्तूंना सचेतन रूप दिले जाते, तर काही कथांमध्ये पशुपक्ष्यांना मानवी व्यक्तिमत्त्व कल्पिलेले असते. त्यामुळे कित्येकदा परीकथा या परीविनाही अवतरू शकतात. कार्लो कोल्लॉदीचा 'पिनोकिओ' हा लाकडी बाहुला जादू होऊन सचेतन होऊ शकतो; पारंपारिक रशियन कथेतील ‘स्नेगुर्का’ ही हिमपुतळी सचेतन होऊन खऱ्‍याखुऱ्‍या छोट्या मुलीसारखी वागते. ⇨हॅन्स किश्चन अँडरसनचे ‘अग्ली डकलिंग’ म्हणजे बदकाचे कुरूप पिलू आणि इतर पात्रे विचार करू शकतात; तसेच एकमेकांशी मानवी भाषेत बोलू शकतात. शार्ल पेरोच्या ‘सिंड्रेला’ ला प्रेमळ परी व प्राणी मदत करतात. म्हणजे पऱ्‍यांची अदभूत शक्ती अशी विविध रूपांत प्रगट होते. म्हणून या सर्व परीकथाच म्हणता येतील. परीकथांतील मध्यवर्ती प्रसंग गुंतागुंतीचे असले, तरी सामान्यतः शेवट आनंददायी असतो. क्वचित वेगळा असतो. परीकथेतून बहुधा चांगल्याचाच जय होतो आणि वाईटाचा नाश होतो, हे दाखविले जाते.

मुलांचे मन हळवे व संस्कारक्षम असते. त्या दृष्टीने ज्यांचा व्यापक अर्थाने परिकथांमध्ये अंतर्भाव होऊ शकेल, अशा पंचतंत्र, हितोपदेशक, ईसापच्या नीतीकथा त्यांच्या मनावर हलकेच व वेळीच सुसंस्कार करू शकतात. त्यांना व्यवहारज्ञान देऊन चांगल्या वागणुकीचे मार्गदर्शन करू शकतात. समर्थ परीकथा आपल्या कल्पनाविश्वात लहानांइतकेच मोठ्यांनाही गुंगवू शकतात. शिवाय काही परीकथांमागील मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान प्रौढांना आकर्षित करते. उदा., अँडरसनच्या ‘द स्नो क्वीन’ (म. भा. ‘हिमराणी’), ‘द लिट्ल मरमेड’ (म.भा. ‘छोटी सागरबाला’) यांसारख्या परीकथा. परीकथांचा उगम कळणे दुरापास्त आहे. पाषाणयुगातही अदभुतरम्य लोककथांच्या साध्या रूपात परीकथा सांगितल्या जात. इ. स. पू. २००० वर्षापूर्वी ईजिप्तच्या पुरातन कबरींच्या उत्खननात परीकथा लिहिलेले पपायरसचे अवशेष सापडले. जगातील वेगवेगळ्या देशांतील मूळ रहिवाशांतही त्या होत्या व आहेत.

पंधराव्या शतकापर्यंत–मुद्रणकलेच्या शोधाआधी–अतिउष्म्याच्या, अतिवृष्टीच्या किंवा अतिहिमाच्या प्रदेशांत लोकांना नाईलाजाने जेव्हा घरातच बसून राहावे लागे, तेव्हा मोरंजनार्थ घरातली अनुभवी प्रौढ माणसे इतरांना तऱ्‍हेतऱ्‍हेच्या लोककथा सांगत. या मौखिक परंपरेतूनच परीकथा जतन केल्या गेल्या व त्यांचा प्रसारही झाला. त्यातून रंजनाबरोबरच नैतिक व सांस्कृतिक मूल्येही जतन केली गेली. चांगले व वाईट यांतला तसेच सुष्ट शक्तींतला फरक दाखविण्यासाठी सुष्ट शक्ती सुंदर, मानवसदृश, सदगुणी व प्रेमळ दाखविल्या जात. दुष्ट शक्ती कुरूप, राक्षसी, हिडीस, दुर्गुणी व क्रूर दाखविल्या जात. यातूनच परीकथांतील पऱ्‍या (फेअरीज), चांगले किंवा खोडकर टिल्ले (एल्व्ह्ज), काळे बुट्टे (मॅनीकिन्स), प्रेमळ खुजे (ड्वार्फस), दैत्य (डेव्हिल्स), राक्षस (जायंट्स), ज्वालामुखी भुजंग (ड्रॅगन्स) इ. पात्रे निर्माण झाली.

परीकथांच्या प्रसारामध्ये लोकांच्या देशांतराचा, भ्रमणाचा वाटाही मोठा आहे. वेगवेगळ्या देशांतील लोक व्यापारधंद्यानिमित्ताने परदेशी जात, तेव्हा तिथेही मनोरंजनार्थ आपापल्या देशांतील लोककथा ल परीकथा सांगत. कालांराने त्यांतील काही परीकथा निरनिरळ्या देशांत जे रूपभेद आढळतात. त्यांचे मूळ या प्रसारात आहे. ‘सिंड्रेला’ ची कथा किंवा ‘द वुल्फ अँड द सेव्हन लिट्ल किड्स’ (म. भा. ‘शेळीबाईची सात पिले’) ही कथा काही फरक होऊन जर्मनीत, रशियात तसेच भारतातही आढळते.

अर्वाचीन परीकथांतील छोट्या पऱ्‍यांची व टिल्लियांची स्पष्ट रूपातली निर्मिती मूळ नॉर्वेतील होय. तिथल्या प्राचीन ख्रिस्तपूर्व देवदेवतांची माहिती आइसलँडिक एल्डर एड्डा या ग्रंथातील पद्यमय मिथ्यकथांतून मिळते. त्यांत ‘एल्व्हज’ आहेत. वसंत ऋतूच्या बहाराची, फुलांची व संगीताची देवता ‘फ्रिया’ ही पऱ्‍यांचीही देवता होती. त्यांतले चांगले टिल्ले गोरेपान. लोभसवाणे. लहान मुलांएवढे, प्रेमळ, बुद्धिमान व दिवाचर आहेत. वाईट टिल्ले सावळे किंवा काळेकभिन्न, बुट्टे, करूप, लांबचलांब नाकांचे, चोरटे, द्वाड व निशाचर आहेत. चांगल्या टिल्ल्यांना कालांतराने पऱ्‍यांचे रूप लाभले व वाईट टिल्ले वेताळ, पिशाच यांच्या रूपांत वा चोरट्या, लुच्च्या, काळ्या बुट्ट्यांच्या रूपांत राहिले.

पंधराव्या शतकातील मुद्रणकलेच्या शोधानंतर, सोळाव्या शतकात जोव्हान्नी फ्रांचेस्को स्ट्रापारॉला या इटालियन लेखकाने La piacevoli notti (इं. भा. फसाशस नाइट्स) हा परीकथासंग्रह १५५० मध्ये व्हेनिस येथे छापला व पुस्तकरूपात परीकथा प्रसिद्ध करण्याचा पहिला  मान मिळविला. त्या संग्रहात १५५३ मध्ये त्याने आणखी काही परीकथा अंतर्भूत केल्या. त्याच्या ७३ कथांमध्ये ‘पुस इन बूटस’ व ‘ब्यूटी अँड द बीस्ट’ यांसारख्या प्रख्यात परीकथांचा समावेश होतो. परीसाहित्याचा हा पहिला टप्पा होय. सतराव्या शतकात शेक्सपिअरनेही मिडसमर नाइट्स ड्रीम व टेपेस्ट या नाटकांसाठी परीकथात्मक कथानके घेतली. पहिल्या नाटकातील ओबेरॉन हा पऱ्‍यांचा राजा म्हणून रंगवला आहे, तर दुसऱ्‍या नाटकातील एरिअल हे पात्र परीजगातीलच आहे. सतराव्या शतकातच फ्रान्सच्या शार्ल पेरो (१६२८–१७०३) याने बऱ्‍याच इटालियन परीकथांची फ्रेंच रूपांतरे केली. त्याने स्ट्रापारॉलाच्या अनेक कथांची पुनर्रचना केली. काही स्वतः लिहिल्या. तसेच त्यांना योग्य वातावरणाची जोड देऊन त्या आकर्षक केल्या. Contes de ma Mere l'Oye (इं. भा. टेल्स ऑफ मदर गूस) हा त्याचा परीकथासंग्रह प्रसिद्ध आहे. याच काळात मादाम याच काळात मादाम द अल नॉय या फ्रेंच लेखिकेने काही सुरेख परीकथा लिहिल्या. परीसाहित्याचा हा दुसरा टप्पा होय.

अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जर्मनीतील याकोप ग्रिम व व्हिल्हेल्म ग्रिम या बंधूंनी शक्य तितक्या जर्मन व इतरही लोककथांचे संशोधन-संकलन केले. त्यांतून परीकथा निवडून त्या योग्य पार्श्वभूमीवर नीट लिहून काढल्या. तसेच त्या सोपी भाषा व सरळ मांडणी यांनी आकर्षक केल्या. Kinderund Hausmaerchen  (३ खंड, इं. भा. ग्रिम्स फेअरी टेल्स) हा त्यांचा परीकथासंग्रह. याच काळात हॅन्स अँडरसनने (१८०५–७५) नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क आणि इतर यूरोपीय देशांतील पुष्कळशा परीकथांची खुबीदार पुनर्रचना केली. अनेक परीकथा त्याने स्वतः लिहिल्या. त्यांना ओघवती व चटकदार भाषा, मनोरम निसर्गवर्णने, कल्पनाविलास, प्रसंगांची कौशल्यपूर्ण गुंफण यांनी सजवून परीकथा हा एक वेगळा व स्वतंत्र असा साहित्यप्रकारच त्याने निर्माण केला. परीकथांच्या वाटचालीतील हा तिसरा व फार महत्त्वाचा टप्पा आहे.

याच काळात अलिक्सांदर अफनास्येव्ह (१८२६–७१) या लेखकाने रशियन परीकथा रशियन फोक टेल्स (१८६०) या संग्रहाद्वारे प्रसिद्ध केल्या. इतर यूरोपीय कथांशी त्यांचे साम्य आढळते. याच सुमारास आयर्लंडमधील फ्रान्सिस ब्राउन या अंध लेखिकेने स्वरचित रम्य परीकथांचे बरेच संग्रह प्रसिद्ध केले. यांत ग्रॅनिज वंडपफुल चेअर हा कथासंग्रह फार लोकप्रिय ठरला. याच सुमारास  पेटर आस्ब्यर्नसेन व यर्जन मो या नॉर्वेजियन मित्रद्वयांनी अनेक नॉर्वे-जियन लोककथा जमवून प्रसिद्ध केल्या (१८४१–४४). आस्ब्यर्नसेन याने स्वतंत्रपणे लिहिलेल्या परीकथा Norske huldreeventyr og folkesagn (२ खंड, १८४५–४८, इं. शी. नॉर्वेजियन फेअरी टेल्स अँड फोकलोअर) या संग्रहात अंतर्भूत आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील चार्लस डॉजसन या गणितज्ञाने ल्यूइस कॅरल या टोपणनावाने ॲलिसेस ॲड्व्हेंचर्स इन वंडरलँड ही दीर्घकथा लिहून परीकथांच्या जगात एक आश्चर्य निर्माण केले (१८६५). याच वेळी सस्किन, चार्लस डिकिन्झ, ऑस्कर वाईल्ड व अमेरिकेतील नाथॅनेल हॉथॉर्न व नोएल हॅरिस यांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक परीकथा लिहिल्या. नोएल हॅरिसच्या अंकल रेमस या निग्रो पात्राच्या तोंडी घातलेल्या ससा-कोल्ह्याच्या परीकथा आगळ्या धर्तीच्या व सुरेख आहेत.

सर जेम्स बॅरी या इंग्लिश नाटककाराने पीटर पॅनसारखी परीनाटके लिहून परिकथेच्या साहित्यप्रकारात फार मोलाची भर टाकली. या साहित्यप्रकाराच्या वाटचालीचा हा चौथा टप्पा म्हणावा लागेल. बॅरीचाच मित्र अँड्रू लँग या विद्वान लेखक-पत्रकाराने सर्व जगातील वैशिष्टयपूर्ण परीकथा समवून व त्या पुन्हा लिहून त्यांचे ब्लू फेअरीबुक, यलो फेअरीबुक असे कितीतरी संग्रह ‘अँड्रू लँग कलेक्शन’ तर्फे प्रसिद्ध केले. परिकथांच्या वाटचालीचा हाही महत्त्वाचा व पाचवा टप्पा आहे. थोडक्यात, परीकथा या साहित्यप्रकाराचे रोपटे एकोणीसाव्या शतकात जोम धरू लागले व त्याच शतकात त्याचा बहरेलाला वृक्षही झाला.

विसाव्या शतकातही नवे परीकथाकार तर निर्माण झालेच; पण या साहित्यप्रकारालाही नवनवी क्षितिजे लाभत गेली. अमेरिकेतील वॉल्ट डिझ्नीने व्यंगचित्रांच्या माध्यमातून खास मुलांसाठी चित्रपट निर्माण केले. त्यांतून परिकथांतील वर्णने, प्रसंग, वातावरण व पात्रे अगदी प्रत्यक्ष पाहत असल्याचा, पात्रांचे बोलणे स्वतः ऐकत असल्याचा वेगळाच आनंद मुलांना मिळू लागला. त्यायोगे परीकथासाहित्य अधिक संपन्न झाले. अलीकडील बऱ्‍याच परीकथांच्या पुस्तकातील चित्रे कळसूत्री बाहुल्यांच्या पद्धतीची किंवा त्यातील आशयाशी सुसंवादी, परीविश्वानुरूप अदभुतरम्य काढली जातात, हेही स्वागतार्ह आहे. विविध तऱ्‍हेची चित्रपुस्तके (पॉप-आउट बुक्स आणि कॉमिक्स) चित्रासोबतच्या नेटक्या सूचक वाक्यांमुळे थोडक्यात पण संपूर्ण परीकथा मुलांच्या नजरेपुढे उभी करतात. परीकथांना लाभलेले हेही एक नवे क्षितिज आहे. परीकथासाहित्याच्या वाटचालीचा हा एक नवा व समृद्ध टप्पा आहे व त्यावरून भावी काळातील परीकथेच्या विकासाच्या दिशा समजून येतात.

मराठी साहित्यात स्वतंत्र परीकथांची निर्मिती फारशी उल्लेखनीय नसली, तरी जागतिक कीर्तीच्या श्रेष्ठ परीकथाकारांच्या परीकथांचे उत्तमोत्तम अनुवाद उपलब्ध आहेत. त्यांत सुमती पायगावकरांच्या हॅन्स अँडरसनाच्या परीकथा (१६ भाग) व देवीदास बागुलांच्या कॅरेल चॅपेकच्या सहा परीकथा या उल्लेखनीय आहेत.

लेखिका: सुमती पायगावकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate