অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुराणकथा (माइथॉलजी)

पुराणकथा (माइथॉलजी)

आदिम व प्रगत अशा सर्व धार्मिक समाजांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निश्चितपणे आढळणारी विशिष्ट प्रकारची पवित्र कथा. पुराणकथांमधील विषयांच्या आत्यंतिक विविधतेमुळे त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांचा निर्देश करणारी म्हणजेच सर्वसमावेशक अशी व्याख्या करणे हे जवळजवळ अशक्य आहे; परंतु साधारणपणे असे म्हणता येते, की विश्वातील म्हणजे आकाश, अंतरिक्ष व पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, मानव इत्यादिकांच्या जीवनातील घडामोडी कशा झाल्या व होतात किंवा कालचक्र व ऋतुचक्रानुसार विश्वातील विविध पदार्थांच्या नानाविध अवस्था कशा अस्तित्वात आल्या व येतात यासंबंधी, त्याचप्रमाणे निसर्गातील परंतु निसर्गनियंत्रण अशा अलौकिक शक्तींची विविध रूपे, चरित्रे, विग्रह व लीला यांच्यासंबंधी धार्मिक श्रद्धेने केलेले निवेदन म्हणजे पुराणकथा होय. या संदर्भात धर्माची कर्मकांडादी अंगे, यातुक्रिया व तत्संबंधी अलौकिक शक्ती यांचा महिमा वा माहात्म्य सांदितलेले असते; हेही पुराणंकथेत अंतर्भूत होते. धर्मनिष्ठ लोकांना पुराणकथा  ही श्रद्धेय आणि पवित्र वाटते; परंतु वास्तववादी, वैज्ञानिक वा विवेकवादी दृष्टीने पुराणकथा म्हणजे केवळ कल्पनाविलास असतो. पुराणकथेस दैवतकथा, पुराकथा, दिव्यकथा किंवा मिथ्यकथा असेही म्हणतात.

येथे ‘पुराणकथा’ हा शब्द इंग्रजीतील ‘मिथ’ या शब्दाचा प्रतिशब्द म्हणून घेतलेला आहे. हिंदूंच्या पुराणातील कथा असा मर्यादित अर्थ येथे अभिप्रेत नाही. पुराणकथा ह्या केवळ हिंदूंपुरत्या मर्यादित नाहीत. कारण पुराणकथा हे सर्वच धर्मांचे अंग असते. व्यापक अर्थाने पुराणकथा हे कमीजास्त प्रमाणात अखिल मानवी संस्कृतींचे एक अंग आहे. पुराणकथानिर्मितीची प्रवृत्ती ही सार्वत्रिक आणि सार्वकालिक असून ती मानवाची एक गरज आहे, असेही आजपर्यंतच्या पुराणकथांच्या  इतिहासावरून काही तत्तवेत्त्यांचे मत झाले आहे; परंतु विवेकवाद, वस्तुवाद वा वैज्ञानिक दृष्टिकोन हा मानवी संस्कृतीवरील पुराणकथेची पकड कमी करण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजीमध्ये पुराणकथासमुच्चय व पुराणकथाविद्या (पुराणकथांचा शास्त्रीय व ऐतिहासिक अभ्यास) या अर्थांनी ‘मिथ’ या शब्दापासून बनलेला ‘माइथॉलजी’ हा स्वतंत्र शब्द वापरला जातो. प्रस्तुत संदर्भात मात्र पुराणकथा ही एकच संज्ञा पुराणकथा, पुराणकथासमुच्चय आणि पुराणकथाविद्या या तीनही अर्थांची वाचक म्हणून वापरलेली आहे.

पुराणकथांच्या स्वरूपाची समग्र चर्चा करावयास प्रारंभ करताना आधी पुराणकथेची काही महत्त्वाची उदाहरणे पाहणे योग्य ठरेल. अर्थातच केवळ दोन-तीन उदाहरणांवरून पुराणकथांची सर्व वौशिष्ट्ये कळणे शक्य नाही; तथापि प्रारंभी पुराणकथेची सूचक अशी सामान्य रूपरेषा आपल्यासमोर असावी. उदा., विश्वोत्पत्तीच्या काही पुराणकथा. वैदिक हिंदू, यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम या मोठ्या विद्यमान धर्मांतील विश्वोत्पत्तीच्या वा धर्मोत्पत्तीच्या पुराणकथा या संदर्भात लक्षात घ्याव्यात. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात (१०.९०) आलेली पुराणकथा अशी : देवांनी केलेल्या आद्य यज्ञात पुरुषाची आहुती देण्यात आली, त्या पुरुषाच्या मनापासून चंद्र, डोळ्यांपासून सूर्य, मुखापासून इंद्र व अग्नी, प्राणापासून वायू, नाभीपासून अंतरिक्ष, मस्तकापासून तारकागणांनी भरलेले आकाश (द्युलोक), पायांपासून भूमी आणि कानांपासून दिशा निर्माण झाल्या. तो पुरुष पुन्हा प्रकट झाला. त्याचे मुख म्हणजे ब्राह्मण, त्याचे बाहू म्हणजे क्षत्रिय, त्याच्या मांड्या म्हणजे वैश्य आणि त्याचे पाय म्हणजे शुद्र होत. देवांनी यज्ञाच्या योगाने यज्ञपुरुषाची पूजा केली.

त्या यज्ञातील आचार हेच प्रथमधर्म ठरले. याचे तात्पर्य असे, की ते आचार उत्तरकालीन मानवांच्या दृष्टीने अनुकरणीय पूर्वोदाहरण ठरले. बायबलच्या ‘जुन्या करारा’ त म्हटले आहे, की ईश्वराने शून्यातून मनुष्याकरिता सृष्टी निर्माण करून नंतर मनुष्य निर्माण केला. जो पहिला मनुष्य निर्माण केला त्याची बरगडी कापून तिच्यापासून स्त्री निर्माण केली. कालांतराने मोझेसला देवाने धर्माच्या नियमांचा उपदेश केला. बायबलच्या ‘नव्या करारा’ त म्हटले आहे, की देवाने आपला प्रिय पुत्र येशू याला मानवाने पापापासून तारण करण्याकरिता पृथ्वीवर पाठविले. या देवपुत्राने सर्व मानवजातीला पापापासून मुक्त करण्याकरिता आत्मयज्ञ केला. इस्लाम धर्मामध्ये अशी कथा सांगतात, की मुहंमदला देवाचा उपदेश ऐकू आला, तो उपदेश म्हणजेच कुराण हा धर्मग्रंथ होय.

संदर्भ  : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.

2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.

3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.

4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.

5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.

6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.

7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922

8. Gray, L. H. Ed. The Mythology of all  Races, 13 Vols., Boston 1925-36.

9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.

10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.

11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.

12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.

13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.

14.  Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.

15.  Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.

16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.

17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.

18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth  ,London 1963.

19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.

20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.

21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends,  4. Vols., London, 1976-78.

लेखक: आ. इ. साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/14/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate