অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुराणकथांचे विषय

पुराणकथांचे विषय

विश्वातील अक्षरशः कोणताही विषय पुराणकथांनी वर्ज्य मानलेला नसल्यामुळे त्यांचे स्वरूप विश्वव्यापक असते. अर्थातच काही प्रधान विषयांवरील कथा सार्वत्रिक असतात, तर काही विषयांवरील कथा या स्थानिक असतात. जगभर आढळणार्‍या पुराणकथांतील विषयांची व्यापकता ध्यानात यावी आणि त्यांचे मुख्य विषय कोणते असतात हे स्पष्ट व्हावे, यासाठी काही मुख्य विषयांवरील पुराणकथांची उदाहरणे पुढे दिली आहेत.

विश्व, देवदेवता, मानव, पशुपक्षी, पृथ्वी, समुद्र, पर्वत, नदी, सरोवर इत्यादींची निर्मिती कशी झाली, याविषयीच्या कथा बहुतेक सर्व समाजांतून आढळतात. पुरुषसूक्तातील कथा ही या प्रकारचीच होय. शून्यातून, जलातून वा अंड्यातून जग निर्माण झाले; एखाद्या देवाने, पक्ष्याने वा आणखी कोणीतरी ते निर्माण केले; मूळच्या एखाद्या देवदांपत्यापासून पुढचे सर्व देव निर्माण झाले; चिखल, खडक, धूळ इत्यादींपासून मानवाची निर्मिती झाली; देवतेचे अश्रू वा घाम यांपासून नद्या निर्माण झाल्या इ. अर्थाच्या असंख्य पुराणकथा आढळतात. विश्व आणि त्यातील विविध पदार्थ आता ज्या अवस्थेत आहेत, त्या अवस्थेत ते पूर्वी अस्तित्वात नव्हते,विशिष्ट व्यक्ती व घटना यांच्यामुळे ते अस्तित्वात येऊन त्यांना सध्याची अवस्था प्राप्त झाली, असा या सर्व कथांचा  आशय असतो. एका ग्रीक कथेनुसार प्रॉमीथिअसने जमीन व पाणी यांच्यापासून किंवा स्वतःच्या अश्रूपासून पहिले मानवशरीर निर्माण केले आणि अथीनाने त्यात प्राण भरले. एका चिनी कथेनुसार जेड या सर्वश्रेष्ठ देवाने मानवजात निर्माण केली. त्याने मातीच्या मानवी मूर्ती तयार करून त्या उन्हात वाळत ठेवल्या होत्या. त्याच वेळी पाऊस आल्याने काही मूर्ती भिजल्या व बिघडल्या. भिजून बिघडलेल्या मूर्ती म्हणजे पृथ्वीवरचे आजारी लोक आणि न भिजलेल्या मूर्ती म्हणजे आरोग्यसंपन्न लोक, असे मानले जाते.

जलप्रलय, अग्निप्रलय इ. मार्गांनी आधी जगाचा नाश होऊन पुन्हा नवी निर्मिती झाल्याच्या कथा जगात सगळीकडे आढळतात. मानवांनी केलेल्या पापांबद्दल शिक्षा म्हणून देवाने प्रलय घडविला, असे काही वेळा मानले जाते. जुने झालेले जग सामर्थ्यहीन बनलेले असते, त्याच्यामध्ये नवे चैतन्य निर्माण करण्यासाठी त्याचा एकदा नाश होऊन पुन्हा नवी निर्मिती घडणे आवश्यक आहे, अशी धारणा काही वेळा प्रलयकल्पनेमागे असते. प्रलयामुळे प्रचंड नाश होत असला, तरी सर्व पदार्थांची प्रातिनिधिक बीजे त्या प्रलयातून वाचलेली असतात व त्यांच्यापासून पुन्हा निर्मिती होते. भारतातील मनुमत्स्यकथा ही प्रलयकथा म्हणून प्रसिद्ध आहे. याच प्रकारच्या प्रलयकथा ग्रीक, हिब्रू, अमेरिकन इंडियन इ. विविध लोकांत आढळतात.

(आदम व ईव्ह यांचे अध:पतन:मायकेल अँजेलो, सिस्टाइन चॅपेल.)भारतीय प्रलयकल्पना इतिहासाच्या चक्राकार गतीवर अधिष्ठित आहे. अव्यक्त विश्व व्यक्त वृद्धिंगत होते आणि नंतर क्षीण होऊन प्रलयाच्या रूपाने अव्यक्तात लीन होते, अशी ही इतिहासाची चक्राकार गती आहे. अव्यक्तात लीन झाल्यावर पुन्हा व्यक्त होणे व पुन्हा अव्यक्तात लीन होणे हा क्रम म्हणजेच प्रलय, उत्पत्ती आणि पुन्हा प्रलय हा चक्राकार क्रम सदैव चालू राहतो.  सेमिटिक परंपरेतील यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांनी मात्र इतिहासाच्या सरळ रेषेतील आकृतिबंध स्वीकारलेला असून त्यांच्या मते निर्मिती, मानवाचा अधःपात, प्रेषितांचे आगमन, भविष्यात अखेरचा निवाडा आणि त्यानंतर पुण्यवंतांना शाश्वत स्वर्ग व पाप्यांना शाश्वत नरक असा क्रम घडणार आहे. सरळ रेषेच्या या आकृतिबंधात चक्राकार क्रमाला वाव नाही.

इतिहासाचा चक्राकार आकृतिबंध स्वीकारताना भारतीयांनी युगे, कल्प व मन्वंतरे अशा स्वरूपात कालविभागणी केली आहे. इतर संस्कृतींमधूनही युगांच्या कल्पना व कालविषयक पुराणकथा आढळतात.कालविषयक पुराणकथांप्रमाणेच स्थलविषयक पुराणकथाही असतात आणि त्या वैश्विक भूगोल मांडण्याचा प्रयत्न करतात. पृथ्वी, द्युलोक, अंतरिक्ष इ . विविध लोकांत या विश्वाची विभागणी केलेली आढळते.

प्राचीन काळी सुवर्णयुग असताना चिरतारुण्य, अमरत्व, देवांशी संभाषण यांसारखी अनेक सुखे उपभोगणारा मानव अहंकार, ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन, स्त्रीचा मोह, सैतानाच्या सल्ल्याप्रमाणे वागणे, निषिद्ध कर्म करणे, निष्काळजीपणा, मूर्खपणा, कलह, दुष्टता इ. कारणांनी अधःपतित झाला आणि तेव्हापासून या जगात मृत्यू, रोगराई इ. दुःखांना प्रारंभ झाला, अशा अर्थाच्या कथा जगात सर्वत्र आढळतात. जोपर्यंत एखादा देव मानवात रहात होता, तोपर्यंत मानव सुखी होता. परंतु तो रागावून निघून गेल्यावर मानव दुःखी झाला, अशाही कथा आढळतात. अंदमानी लोकांच्या मते पुलुगा, ईजिप्ती लोकांच्या मते रा आणि दक्षिण ऑस्ट्रेलियन लोकांच्या मते मुंगन हे देव पृथ्वीवरून निघून गेल्यामुळे मानव दुःख भोगू लागला. अधःपतित लोकांना देव प्रलयवादी मार्गांनी शासन करतो, असे मानले जाई.

सापाच्या सांगण्यावरून देवाची आज्ञा मोडून ज्ञानवृक्षाचे फळ खाल्ल्यामुळे आदम व ईव्ह या आद्य मानवी दांपत्याचा अधःपात झाल्याची बायबलच्या ‘जुन्या करारा’तील कथा प्रसिद्ध आहे. देवाने मानवांना निर्माण केल्यावर त्यांना ‘अमर रहाल’, असे सांगितले होते. परंतु माणसांच्या चुकीमुळे त्यांचे अमरत्व लुप्त झाले, अशा अर्थाच्या कथा आढळतात. यांखेरीज, लोकांनी देवाला मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे देवाने त्यांचे अमरत्व कात टाकणार्‍या प्राण्यांना दिले; प्रॉमीथिअसने फसवल्यामुळे रागावलेल्या झ्यूसने पँडोरा या देवीला मानवात पाठविले व तिने भांड्यावरील झाकण काढल्यामुळे त्यातील दुष्ट शक्ती मानवात शिरल्या; देवाने मानवाला पेटीतून  अमरता देताना पेटी उघडू नकोस म्हणून सांगितले होते; परंतु त्याच्या पत्नीने पेटी उघडल्यामुळे मृत्यू झाला, ईश्वराऐवजी सैतानाला विश्वनिर्माता मानल्यामुळे त्याचा अधःपात झाला इ. असंख्य कथा आढळतात.

याउलट, एखाद्या मानवाने मृत्यूला जिंकले, अशा अर्थाच्या कथाही आढळतात. यमाकडे जाऊन आणि मृत्यूचे रहस्य जाणून परत आलेल्या नचिकेताची वैदिक कथा प्रसिद्ध आहे. सावित्रीने मृत सत्यवानाला यमाकडून परत आणले, ही कथाही विख्यात आहे. पॉटॉक या वीराने पत्नीच्या प्रेताबरोबर खड्ड्यात उतरून मृत्युदूत असलेल्या सापाचे मस्तक तोडले आणि पत्नीसह परत येऊन दीर्घायुष्य भोगले, अशी एक स्लाव कथा आहे. एका ग्रीक कथेनुसार सिसिपस या वीराने मृत्यूनंतर माझी अंत्यक्रिया करू नकोस, असे पत्नीला सांगितले होते. मृत्यूनंतर पाताळात गेल्यावर एका क्षणासाठी परत जाऊन येतो, अशी थाप मारून तो परत आला आणि नंतर त्याने पाताळात जावयाचे नाकारले. फिन्नो-उग्रिक पुराणकथेतील वैनामोइनेन हा वीर मृत्युलोकात जाऊन परत आला होता.

आकाश ही माता व पृथ्वी हा पिता मानणार्‍या ईजिप्ती कथेचा अपवाद वगळता, जगात इतर बहुतेक सर्व ठिकाणी पृथ्वी ही माता व स्वर्ग वा आकाश हा पिता मानलेला आहे. त्यांच्या विवाहाच्या कथा व उत्सव आढळतात. या बाबतीत अनेक ठिकाणी आढळणारी एक गोष्ट म्हणजे आलिंगनबद्ध असलेल्या या मातापित्यांना कोणीतरी जबरदस्तीने अलग केले, ही कल्पना होय. हिटाइट लोकांत करवत वा सुरीने त्यांना अलग केल्याची कथा होती. आलिंगनबद्ध असलेले वरचे विशाल पुरुषजलतत्त्व आणि खालचे स्त्रीजलतत्त्व यांना येहोवा या ईश्वराने अलग केले, अशी हिब्रू कथा आहे. बॅबिलोनियातील मार्डुकने तैमातचे दोन भाग केले, याचा अर्थ तिला वर असलेल्या अप्सू या जलदेवापासून अलग केले. रंगी हा आकाशदेव पपा या पृथ्वीदेवीशी आलिंगनबद्ध असल्यामुळे मधले देव वगैरे चिरडले जाऊ लागले, म्हणून देवांनी त्यांना अलग केले, अशी कथा न्यूझीलंडमध्ये होती. गेब (पृथ्वी) आणि नट (आकाश) आलिंगनबद्ध असताना शू या त्यांच्या पित्याने त्यांना अलग केले, अशी ईजिप्ती कथा आहे.

सुफलतेच्या देवतांविषयी विविध प्रकारच्या कथा आढळतात. भारतातील लिंगपूजा विख्यातच आहे. ईजिप्तीमध्ये सुफलतेचा देव मिन हा नेहमी उत्थितलिंग अवस्थेत दाखविला जात असे. ईजिप्तीमधील ख्नुम हा दुसरा एक सुफलतेचा देव मातांच्या उदरांत गर्भाला आकार देण्याचे काम करतो, असे मानले जाई. अमेरिकेतील माया संस्कृतीत आक्त हा देव मातांच्या गर्भांत मुलांना आकार देतो, असे मानतात.

देवतांच्या दोन पिढ्यांचा संघर्ष दाखविणार्‍या कथा ग्रीस, बॅबिलोनिया इ. ठिकाणी आढळतात. ग्रीक कथेनुसार यूरानस या आकाशदेवाला आपल्या मुलांचे भय वाटल्यामुळे त्याने त्यांना जन्मल्याबरोबर जमिनीत लपवले. नंतर जीआ (पृथ्वी) या त्याच्या पत्नीने दिलेला कोयता घेऊन त्याचा पुत्र क्रोनस याने वडिलांचे जननेंद्रिय तोडले. पुढे, आपल्या मुलांपैकी एकजण आपली सत्ता घेणार आहे, या भविष्यवाणीमुळे क्रोनसने आपल्या मुलांना गिळून टाकण्यास सुरुवात केली. परंतु रीया या त्याच्या पत्नीने  वाचविलेल्या झ्यूस या त्याच्या पुत्राने शेवटी त्याचा पराभव केला. ट्यूटॉनिक कथेत देव व त्यांचे पूर्वज जायंट यांचे युद्ध आढळते.

आद्यपिता अप्सू आणि आद्यमाता तैमात यांच्यापासून निर्माण झालेल्या देवांशी तैमातने युद्ध केले, तेव्हा मार्डुक या देवाने तिला ठार मारून तिच्या देहाचे दोन तुकडे केले, अशी बॅबिलोनियन कथा आहे. नोआचा पुत्र हॅम अथवा हॅमचा पुत्र कॅनॉन याने नोआ याला नपुंसक बनविले, अशी हिब्रू कथा आहे. कुमार्बीने आपल्या दातांनी आपला पिता अनू याचे जननेंद्रिय तोडल्याची आणि अनूनेही अलालू या आपल्या पित्याला स्वर्गातून हाकलल्याची कथा हिटाइट लोकांत होती. पुढे तेशुब या पुत्राने कुमार्बीचेही राज्य हिरावून घेतले.यांपैकी बर्‍याच कथांतून पित्याला वा अन्य देवाला नपुसंक बनविल्याची वर्णने आहेत. ईजिप्ती कथेत सेतने ओसायरिसचे तुकडे केल्यावर इसिसने ते जुळविले, परंतु त्याचे लिंग तेवढे एका खेकड्याने खाल्ल्यामुळे सापडले नाही, असे वर्णन आहे. वरुणाला नपुंसकत्व आले होते, अशा अर्थाची एक वैदिक कथा आहे.

मारलेल्या व बळी म्हणून अर्पिलेल्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरापासून विश्वाची निर्मिती झाली, अशा अर्थाच्या अनेक कथा  आहेत. यज्ञात बळी दिलेल्या पुरुषाच्या शरीरापासून विविध सृष्टी निर्माण झाली, अशी कथा ऋग्वेदातील पुरुषसूक्तात आहे. जपानी कथेनुसार अग्निदेव जन्मला तेव्हा त्याची आई ईझॅनमी मेली आणि तिची ओकारी व मलमूत्र यांपासून काही देव निर्माण झाले. अग्निदेवाचा पिता ईझॅनगी याने रागाने मुलाचा शिरच्छेद केला आणि त्याच्या रक्ताच्या थेंबापासून आठ आणि शरीराच्या भागापासून आठ देवता निर्माण झाल्या. ट्यूटॉनिक कथेनुसार देवांनी इमीर या जायंटला मारले. त्याच्या रक्ताने पोकळी भरली व समुद्र बनला. त्याच्या मांसापासून पृथ्वी, हाडांपासून पर्वत, केसांपासून वृक्ष आणि कवटीपासून स्वर्ग बनला. ग्रीक कथेनुसार क्रोनसने वडिलांचे जननेंद्रिय तोडले, तेव्हा रक्ताच्या थेंबापासून फ्यूरीझ नावाचे जायंट आणि मीलिआ नावाच्या निंफ्स जन्मल्या. तसेच, समुद्रात टाकलेल्या भागापासून पांढरा फेस निर्माण झाला आणि त्यापासून ॲफ्रोडाइटी  ही देवी निर्माण झाली. तैमातच्या देहाच्या दोन तुकड्यापासून स्वर्ग व पृथ्वी निर्माण झाल्याची बॅबिलोनियन कथा आहे. एका ट्यूटॉनिक कथेनुसार ओडिन या देवाने स्वतःच्या भाल्याने स्वतःला जखमा करून दिव्य वृक्षाला टांगून घेतले आणि या आत्मबलिदानातून त्याला नवजीवन प्राप्त झाले.

चोरून वा अन्य मार्गाने पृथ्वीवर अग्नी (व इतर काही पदार्थ) कसा आणला गेला, याविषयीही अनेक कथा आहेत. ग्रीक कथेनुसार यज्ञातील कोणता भाग देवांना द्यावा, हे ठरविण्यासाठी एकदा देव व मानव यांची सभा भरली होती. निवाडा करताना प्रॉमीथिअसने फसवणूक केल्याचे ध्यानात येताच झ्यूसने पृथ्वीवरील मानवांचा अग्नी अडवून ठेवला; परंतु प्रॉमीथिअसने तो चोरून पुन्हा मानवात आणला. स्वर्गातून, अधोलोकातून वा साप, कांगारू इत्यादींकडून चोरून, जबरदस्तीने वा युक्तीने अग्नी आणल्याच्या व कित्येकदा तो पुन्हा गमावला गेल्याच्या कथा न्यूझीलंड वगैरे ठिकाणी आहेत. कधी एखाद्या पक्ष्याने, तर कधी एखाद्या वीराने अग्नी आणलेला असतो. सोमादी पदार्थ स्वर्गातून आणले, अशा अर्थाच्या कथाही आढळतात. गरुडाने स्वर्गातून अमृत आणले, अशी हिंदू कथा आहे. सुलभप्रसूतिकारक वनस्पती स्वर्गातून आणण्यासाठी एटना या वीराने गरुडाची मदत घेतली, अशी एक बॅबिलोनियन कथा आहे. सुटुंग या जायंटकडे असलेले कवित्वाचे पेय ओडिन या देवाने गरुड बनून पळवून आणले, अशी ट्यूटॉनिक कथा आहे. पारिजातक वृक्ष देवांकडून आणला, अशी हिंदूंची कथा आहे. काही वृक्ष अधोलोकातून आणले, काही वृक्षांचे बीज सूर्य व चंद्रावरून आले इ. कथा मध्य बोर्निओमध्ये आढळतात.

पशू हा मानवांचा पूर्वज आहे, मृतात्मे पशूंमध्येच प्रवेश करतात, नवजात बालकाचा आत्मा पक्ष्याच्या रूपात असतो, मानवाचा एक आत्मा शरीराबाहेर पशूत वा पक्ष्यात राहतो इ. समजुतींवर आधारलेल्या अनेक पुराणकथा असतात. अर्धे रूप मानवी व अर्धे रूप पाशवी असलेले अनेक प्राणी पुराणकथांतून आढळतात. दुष्ट वा हितकारक ड्रॅगन, तीन डोकी असलेला कुत्रा, राखेतून उठणारा फीनिक्स, सात सात फणा असलेला नाग, पंख असलेला सर्प, आठ पायांचा ऑक्टोपस इ अनेक विचित्र पशू पुराणकथांतून आढळतात. पशूंची उत्पत्ती वा त्यांचे विशिष्ट रूप यांविषयी अनेक कथा आहेत. हत्ती, कासव, बेडूक, बैल इ. प्राण्यांच्या आधारामुळे पृथ्वी स्थिर झाली आहे, अशा अर्थाच्या कथा सर्वत्र आढळतात. माशी, डास इ. चावल्यामुळे वा अन्य कारणाने या प्राण्यांनी हालचाल केली म्हणजे भूकंप होतो, असे मानले जाते. सर्पाविषयीच्या अनेक कथा असून काही ठिकाणी सर्पदंशामुळे स्त्रियांच्या ऋतुस्रावाचा प्रारंभ झाला, अशी कथा आढळते. देवांची गरुडादी वाहने पशुपक्ष्याच्या रूपात कल्पिलेली आढळतात. ईजिप्तीमध्ये बैल, पक्षी, मेंढा इत्यादींमध्ये ओसायरिसचा आत्मा अवतरलेला आहे, असे मानत. एपिस हा बैल तेथे अत्यंत पवित्र मानला जाई. देवाने स्वर्गीय अग्नीच्या रूपात एका कालवडीशी समागम केला आणि मग तो एपिस या बैलाच्या रूपाने स्वतःच तिच्या उदरी प्रकट झाला, असे मानले जाई.

पाण्यात बुडविणार्‍या दुष्ट जलशक्तींविषयी कथा असतात. वृद्ध पुरुष वा नग्न स्त्री बनून लोकांना पाण्यात ओढून नेणार्‍या व्होड्यानोई नावाच्या जलशक्ती स्लाव लोक मानतात. पाण्यात बुडून मेलेली युवती रुझाल्का बनते आणि ती लोकांना भुरळ पाडून वा जबरदस्तीने पाण्यात ओढून नेते, असे सर्व स्लाव मानतात. जपानी लोकांनीही पाण्यात ओढून नेणार्‍या देवतांची कल्पना केलेली आहे.

वर मुळे व खाली फांद्या असलेला हिंदूंचा अश्वत्थ हा संसारवृक्ष, ज्याच्याखाली बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले तो बोधिवृक्ष, देवस्वरूप बनलेला वैदिक सोम, पारशांचा हओम इ. वृक्ष-वनस्पतींना पुराणकथांत महत्त्वाचे स्थान आहे. बोर्निओतील पुराणकथांत वर मुळे व पृथ्वीकडे फांद्या असून स्वर्ग व पृथ्वी यांना जोडणारा एक प्रचंड वृक्ष  कल्पिलेला आहे . ट्यूटॉन लोकातील निर्मितीविषयक  एका कथेनुसार हे विश्व म्हणजे यग्ड्रॅसिल नावाचा एक प्रचंड वृक्ष होय.त्यांच्या फांद्या आकाशात आणि मूळ अधोलोकात आहे. जर्मन लोकांच्या घराला झाडांच्या बुध्यांचा आधार असे. त्यामुळे विश्वालाही झाडाचा आधार आहे, असे ते मानत असत. बायबलमधील ज्ञानवृक्षाच्या फळाची कथा प्रसिद्धच आहे. नद्या,जलाशय इत्यादींचे दैवतीकरण करण्याची पद्धतही सर्वत्र आढळते. भारतात गंगा, यमुना, नर्मदा इत्यादींच्या बाबतीत हे सर्वत्र आढळते. भारतात ज्याप्रमाणे गंगा स्वर्गातून आल्याचे मानले जाते, त्याप्रमाणे  नाईल नदी ही ‘नन’ या आद्य समुद्रात उगम पावते, असे ईजिप्तमध्ये मानले जात होते.

देवादिकांजवळ स्वतःच्या वा इतरांच्या शरीराचे पशू, पक्षी, दगड इत्यादींमध्ये रूपांतर करण्याचे सामर्थ्य असते. अशा समजुतीवर आधारलेल्या पुराणकथा जगात सर्वत्र आढळतात. पतीच्या शापाने अहल्या शिळा बनली होती. पांडूने मृगाचे रूप घेऊन प्रणयक्रीडा केली होती. कोकिळ पक्ष्याचे रूप घेऊन आपल्या हेरा या बहिणीकडे गेलेला झ्यूस थंडीने गारठलेला पाहून हेराने त्याला छातीशी धरले आणि त्याने आपले मूळ रूप प्रकट करून तिच्याशी विवाह केला. डीमीटरने पोसायडनला चुकविण्यासाठी घोडीचे रूप घेतले; परंतु त्याने घोड्याचे रूप घेऊन तिच्याशी संबंध केला. झ्यूसनेही बैल बनून तिला फसवले.

सूर्य वा इतर कोणता तरी देव रागावून लपल्याच्या कथा अनेक ठिकाणी आढळतात. हिटाइट कथेतील सुफलतेचा देव तेलिपिनू एकदा रागवला आणि पृथ्वीवरून निघून गेला. काहींच्या मते तो सूर्यदेव वा दुसरा कोणता तरी देव होता. तो निघून गेल्यावर दुष्काळ पडून उपासमार होऊ लागली. प्राण्यांमध्ये गर्भधारणा होईना आणि आधीच झाली असल्यास प्रसूती होणे अशक्य झाले. सूर्याने पाठविलेला गरुड त्याला आणण्यात अयशस्वी झाला; परंतु एका मधमाशीने त्याला परत आणले. जपानी कथेतील अमतेरसू ही सूर्यदेवी एकदा सुसनॉ या भावाच्या भीतीने दडून बसली व अंधार झाला. ही कथा म्हणजे ग्रहण अथवा हिवाळ्याचा प्रारंभ यावरील रूपक असावे, असे म्हटले  जाते. रा या सूर्यदेवाचा डोळा पळवून नेल्याची आणि तो अन्होर या देवाने परत आणल्याची कथा ईजिप्तमध्ये होती. रा हा देव लोकांवर चिडून स्वर्गात निघून गेला, अशीही कथा तेथे आहे. वैदिक वाङ्‌मयात अग्निदेवता लपल्याची कथा आहे. इश्तार ही बॅबिलोनियन देवता मृतलोकात गेल्यानंतर पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांचे लैंगिक जीवन संपुष्टात आले आणि शेवटी ईआ या देवतेने दूत पाठवून तिला परत आणले.

राजा, वीरपुरुष, ऋषिमुनी वा एखादा वंश यांची निर्मिती चंद्र वा सूर्य यांच्यापासून झाल्याच्या कथा अनेक ठिकाणी आढळतात. सूर्य हा रामाच्या रघुवंशातील पूर्वज होता. भारतात सोमवंशही प्रख्यात होता. ईजिप्तमध्ये फेअरो राजाला त्याची प्रजा सूर्यदेव मानत असे. तो प्रत्यक्ष रीत्या सूर्याचा पुत्र असल्याचे मानले जाई.  ह्यात राजाच्या पत्नीशी स्वतः सूर्यदेव रा समागम करतो आणि त्यांचा पुत्रच पुढचा राजा बनतो, अशी परंपरा होती. अमेरिकेतील इंका हे लोक इन्तीपासून म्हणजे सूर्यापासून आपला वंश सुरू झाला, असे मानतात. ग्वातेमालामध्ये सूर्य व चंद्र यांना आजोबा व आजी आणि सूर्यपुत्र इतझमन याला संस्कृतिनिर्माता म्हटले जाई. जपानमध्ये अमतेरसू ही सूर्यदेवी काही मानववंशांची पूर्वज मानली जाई.

ग्रहतार्‍यांविषयी विविध प्रकारच्या कथा आढळतात. चंद्रसूर्य त्या दांपत्याने भांडताना एकमेकांना जखमी केल्यावर लज्जित झालेला सूर्य हा पती लोकांनी आपल्याकडे पाहू नये म्हणून तेजस्वी बनला, परंतु पत्नीने मात्र आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला नाही; लोकांना रात्री झोपता यावे म्हणून चंद्राने तेजाचा त्याग केला; चंद्र या सूर्यपत्नीने पुरुषांचे काही रहस्य ऐकल्यामुळे सूर्य रागावला व भिऊन पळणार्‍या पत्नीचा पाठलाग करू लागला; सूर्य अदृश्य दोरीला टांगलेला आहे; आकाशगंगा म्हणजे आकाशसर्प, आत्म्यांचा मार्ग किंवा म्हशींच्या स्पर्धेमुळे उडालेली धूळ होय; तारे म्हणजे पक्षी, ध्रवादी मृत व्यक्ती वा आकाशस्थ लोकांच्या शेकोट्या होत; आपापली मुले खावयाची असे ठरविल्यावर सूर्य या स्त्रीने आपली मुले खाल्ली; परंतु चंद्र या स्त्रीने ती लपवून ठेवली इ. पुराणकथा आढळतात. चंद्रकलेच्या पुराणकथा, नाशानंतरचे पुनर्जीवन सूचित करतात. चंद्र व सूर्य यांच्यावर कोणत्या तरी प्राण्याने वा राहुकेतूसारख्या एखाद्या राक्षसाने हल्ला केल्यामुळे ग्रहणे होतात, असे मानले जाते. त्या प्राण्याला हाकलून देण्यासाठी नगारे वाजविणे, गोंगाट करणे वा त्याच्या अंगावर कुत्री सोडणे इ. प्रकार केले जातात. खेकडा, साप, पक्षी, ड्रॅगन, लांडगा इत्यादींमुळे ग्रहणे होतात, या अर्थाच्या कथा विविध लोकांत आढळतात.

दिशांचे रक्षण करण्यार्‍या दिक्‌पालांची कल्पना अनेक ठिकाणी आढळते. भारतात पूर्वेचा इंद्र, उत्तरेकडचा कुबेर, आग्नेय दिशेचा अग्नी इ. प्रकारे  अष्टदिक्‌पाल मानले आहेत. जपानातील बौद्ध पुराणकथांत चार दिशांचे धृतराष्ट्रादी चार दिक्‌पाल मानले आहेत. ईजिप्तमध्ये न्यायदानाच्या वेळी ओसायरिसच्या  पुढे  उभे  असलेले  व मृतांचे रक्षक असलेले होरसचे पुत्र हे चार दिशांचेही रक्षक मानले जात. मेक्सिकन लोकांनीही चार दिशांचे चार देव मानले आहेत. अमेरिकेतील अल्गाँक्वियन लोकांनीही चार दिशांना चार देवता मानल्या होत्या.

गर्भस्थ अथवा नवजात अवस्थेतच विशेष कृत्ये करणार्‍या व्यक्तींच्या काही कथा आढळतात. याकोब व ईसॉ हे जुळे  भाऊ तसेच झराह व पीरेझ हे जुळे भाऊ गर्भातच एकमेकांशी भांडत होते, अशी हिब्रू कथा आहे. हर्मीझने जन्मलेल्या दिवशीच पाळण्यातून जाऊन अपोलोच्या ५० गायी पळविल्या, अशी ग्रीक कथा आहे. हिब्रू कथेनुसार अब्राहम जन्मल्यावर पहिल्या दहा-वीस दिवसांत मोठा होऊन चालू-बोलू लागला. लीहच्या गर्भातील मुलाचे ईश्वराने दिनाह या मुलीत रूपांतर केले, अशी हिब्रू कथा आहे. देवकीच्या गर्भातील बलरामाला कंसापासून वाचविण्यासाठी रोहिणीच्या गर्भात नेण्यात आले, अशी हिंदू कथा आहे. शक्राच्या आज्ञेवरून देवनंदेच्या गर्भातील महावीराला सिद्धार्थाची पत्नी त्रिशला हिच्या गर्भात नेण्यात आले, अशी जैन कथा आहे.

एखाद्या भविष्यवाणीमुळे नवजात मुलाची हत्या वा त्याग करण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु त्यातून ते मूल वाचते व त्याच्या आयुष्यात काही  विशेष घटना घडतात, अशा अर्थाच्या अनेक कथा आहेत. हिब्रू कथेत अब्राहमच्या जन्माच्या वेळी धूमकेतू दिसल्यामुळे तो निमरोद या राजाचे साम्राज्य घेईल, अशी भविष्यवाणी झाली. राजाने त्याला ठार मारावयाचे ठरविल्याने तेराह यी अब्राहमच्या पित्याने एका गुलाम स्त्रीचा मुलगा राजाच्या स्वाधीन केला आणि अब्राहमला गुहेत ठेवून वाचवले. ईडिपस हा आपल्या वडिलांना ठार मारेल अशी भविष्यवाणी असल्यामुळे जन्मल्याबरोबर त्याचा त्याग करण्यात आला, अशी ग्रीक कथा आहे. कृष्ण, येशू इत्यादींच्या कथाही अशा प्रकारच्या आहे.

प्रारंभी एखाद्या देवतेचे विशेषण म्हणून वापरलेला शब्द नंतरच्या काळात स्वतंत्र देवतेचा वाचक बनल्याच्या घटना अनेक पुराणकथांत आढळतात. रोमन ज्यूपिटरचे विशेषण असलेला टर्मिनस हा नंतर सीमांचा देव बनला. हाथर या ईजिप्ती देवीला सामर्थ्यशाली या अर्थाचे सेख्मेत हे विशेषण देण्यात आले आणि नंतर सेख्मेत ही स्वतंत्र देवी बनली. सविता हे प्रारंभी वैदिक सूर्यदेवतेचे विशेषण होते; परंतु नंतर सविता हा स्वतंत्र देव बनला.

अनेक ठिकाणी नरमांसभक्षणाच्या कथा आढळतात. क्रोनस या ग्रीक देवाने आपली मुले खाल्ली होती. पॉलिनीशियामध्ये तेन व इतर देव नरभक्षक मानले आहेत. पारशी कथेनुसार आद्य मानवी दांपत्य माश्या आणि माश्योई यांनी आपली दोन मुले खाऊन टाकली. हे त्यांचे अधःपतन मानले जाते. याच प्रकारच्या कथा फिजी, न्यूझीलंड इ. ठिकाणीही आढळतात.स्वर्ग व पृथ्वी यांमध्ये पूल वा शिडी यांचे अस्तित्व मानणार्‍या अनेक कथा आहेत. स्वर्ग व पृथ्वी यांच्यातील पुलावरून पूर्वी देवांची ये-जा चालत असे; परंतु एकदा देव झोपलेले असताना तो समुद्रात पडला, अशी जपानी कथा आहे. इंद्रधनुष्य म्हणजे पूल, अशा अर्थाच्या कथा अनेक ठिकाणी आढळतात.

पोलंड, बल्गेरिया, रशिया इ. अनेक देशांतून हंसींच्या रूपात आढळणार्‍या तरुणींच्या कथा आढळतात. वैदिक वाङ्‌मयतील उर्वशीने व तिच्या सख्यांनी पक्षिणीचे रूप घेतल्याच्या कथा आढळतात. नागकन्या, मत्स्यकन्या इ. रूपांतील तरुणींच्या कथाही आढळतात. अर्धे रूप मानवी व अर्धे रूप मानवेतर प्राण्यांचे असे या व्यक्तींचे स्वरूप असते. त्यांना इच्छेनुसार दोन्हीपैकी कोणत्याही एका प्राण्याचे रूप घेता येते, असेही मानले जाते.याखेरीज संस्कृतिनिर्माते महापुरुष, पराक्रमी वीर व वीरांगना, महान राजे, संत, तपस्वी, धर्मसंस्थापक इत्यादींविषयी अनेक पुराणकथा तयार होतात. दिवस-रात्र, उन्हाळा-हिवाळा, चंद्राच्या कला इ. कालिक अवस्थांविषयी अनेक कथा असतात. पुनर्जन्म, पूर्वजन्माचे स्मरण, मृत्यूनंतरचे जीवन, स्वर्ग-नरक, देवदूत, पितर, पिशाचे, अप्सरा, योगी चित्‌शक्ती, राक्षस, दैत्य, ड्रॅगन, पर्वत, विविध आचार, रूढी इ. असंख्य विषयांवर पुराणकथा असतात.

अशा प्रकारे, पुराणकथांच्या विविध विषयांचा अभ्यास केल्यानंतर सहजच ध्यानात येते, की जगातीलवेगवेगळ्या लोकांनी निर्माण केलेल्या पुराणकथांमध्ये विलक्षण समानता आढळते. व्यापार, आक्रमण, दुष्काळ इ. उद्देशांनी वा कारणांनी लोक सदैव देशांतर करीत असतात. अशा प्रसंगी दोन भिन्न संस्कृतींतील लोक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे एका समाजाच्या कथा दुसरा समाज उचलतो किंवा निदान एका समाजाच्या कथांचा दुसर्‍याच्या कथांवर परिणाम होतो, हे या समानतेचे एक कारण होय. ग्रीस व रोम, ग्रीस व ईजिप्त, यूरोपातील विविध राष्ट्रे इ. देशांत असा परस्परसंबंध आला होता. रोमन लोकांनी ग्रीक पुराणकथा मोठ्या प्रमाणात उचलल्या, हे या प्रकारचे विख्यात उदाहरण होय. याउलट, एकाच समाजाची विभागणी होऊन त्याचे  वेगवेगळे समूह वेगवेगळ्या देशांत जाऊन स्थिरावले, तरी त्यांच्या मूळ पुराणकथा एकच असल्यामुळे त्यांच्या उत्तर-कालीन पुराणकथांतही समानतेचा दुवा राहतोच. उदा., इंडो-यूरोपियन लोकांच्या काही टोळ्या यूरोपमध्ये व काही इराणमार्गे भारतात आल्या असल्यामुळे यूरोपियन व भारतीय वैदिक पुराणकथांमध्ये साम्य आढळते. म्हणूनच, माक्स म्यूलरने तुलनात्मक भाषाशास्त्राच्या आधारे ‘तुलनात्मक पुराणकथाविद्या’ या विषयाचा पाया घातला.

त्याच्या मते, वैदिक पुराणकथांचे अध्ययन अलगपणे न करता, जर इंडो-यूरोपियन पुराणकथांचे एक अविभाज्य अंग म्हणून केले, तर त्या अधिक चांगल्या रीतीने आकलन करता येतात. आडाल्‌बेर्ट कून, टेओडोर बेन्फाय, आल्ब्रेख्त वेबर, आंजेलो दे गूबेगनातीस इत्यादींचाही तुलनात्मक पुराणकथाविद्येवर विशेष भर होता. द्यौस् म्हणजे झ्यूस, वरुण म्हणजे यूरानस, उषस् म्हणजे ईऑस इ. अक्षरशः असंख्य समीकरणे मांडण्यात आली आहेत. काही अभ्यासक शब्दांच्या समान व्युत्पत्तीवरून समानता दाखवतात, तर झॉर्झ द्युमेझिलसारखे काहीजण देवतांच्या समान स्वरूपावरून त्यांच्यातील मूळचे ऐक्य शोधण्याचा प्रयत्न करतात.

उदा., त्याने रोमन मातर मातुताचे उषेबरोबर आणि फॉर्च्यूना प्रायमिजेनिआचे अदितीबरोबर साम्य दाखवले आहे; परंतु माक्य म्यूलर, कून इत्यादींनी या बाबतीत अतिरेक केल्यामुळे अनेकांनी अशा तुलनेला विरोधही केला. उदा.,आल्फ्रेट हिलेब्रान्टचा तुलनात्मक पुराणकथाविद्येवर विश्वास नव्हता. जॉन मुरनेही ती दुय्यम मानली होती. इंडो-यूरोपियन पुराणकथांप्रमाणेच इंडो-इराणियन कथांचीही स्थिती आहे. उदा., वैदिक पुराणकथांतील असुर, मित्र, सोम इत्यादींचे अवेस्तात अनुक्रमे अहुर, मिथ्र, हओम इ. प्रकारे रूपांतर आढळते. इंद्र हा वैदिक देव मात्र अवेस्तात दैत्य मानलेला आहे. अवेस्तानुसार देव हा शब्द दैत्य या अर्थाचाच आहे. इतर देशांतील पुराणकथांमध्येही अशा तुलना झाल्याचे आढळते.

परंतु काही वेळा ज्या दोन समाजांत समान पुराणकथा आढळतात त्यांच्यातील भौगोलिक अंतर इतके प्रचंड असते, की त्या दोन समाजांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने वर  सांगितलेल्या पद्धतीचा संबंध आला असण्याची शक्यता नसते. उदा., ईजिप्त आणि पॉलिनीशियामधील लोकांचा परस्परसंबंध आला असण्याची शक्यता दिसत नसूनही त्यांच्या काही पुराणकथा समान आहेत. या समानतेचे कारण मात्र मानसशास्त्र व समाजशास्त्र यांच्या आधारे शोधावे लागते.

दूरदूर  राहणार्‍या व परस्परांशी मुळीच संबंध नसलेल्या लोकांचीही एखाद्या विशिष्ट परिस्थितीविषयीची प्रतिक्रिया  समान असू शकते. उदा., ज्या लाकडांच्या घर्षणामुळे अग्नी निर्माण होतो, ती लाकडेच प्रथम त्याच्या भक्ष्यस्थानी पडत असल्यामुळे भारतीयांनी त्याला मातृभक्षक मानले आणि त्याने जन्मल्याबरोबर आईला जाळले. असे जपानी लोकांनी मानले. सूर्य-चंद्र, त्यांचे उदयास्त, ग्रहणे, भूकंप इत्यादींविषयीच्या समान पुराणकथा या दूरदूरच्या लोकांची मने एकाच पद्धतीने कार्य करीत असल्याच्या द्योतक ठरतात.

संदर्भ  : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.

2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.

3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.

4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.

5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.

6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.

7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922

8. Gray, L. H. Ed. The Mythology of all  Races, 13 Vols., Boston 1925-36.

9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.

10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.

11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.

12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.

13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.

14.  Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.

15.  Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.

16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.

17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.

18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth  ,London 1963.

19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.

20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.

21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends, 4. Vols., London, 1976-78.

लेखक: आ. इ. साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate