অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रज्ञापारमिता

प्रज्ञापारमिता

बौद्ध धर्मातील व विशेषतः त्याच्या महायान पंथातील एक महत्त्वाची संज्ञा. प्रज्ञापारमिता (प्रज्ञेचे पूर्णत्व) हा गुण, प्रज्ञापारमिता नावाची सूत्रे वा धर्मग्रंथ आणि प्रज्ञापारमिता नावाची देवी या तीन परस्परसंबद्ध अर्थांनी ही संज्ञा वापरली जाते.

प्रज्ञापारमिता गुण : ‘पारमिता’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘पूर्णता’ किंवा 'पैलतीराला पोहोचल्याची अवस्था’ असा आहे. बोधिसत्त्वाला बुद्ध बनण्यासाठी विशिष्ट गुणांमध्ये पूर्णता वा पारमिता प्राप्त करावी लागते. बौद्धांच्या भिन्नभिन्न संप्रदायांत या पारमितांची संख्या सहा, दहा वा बारा मानण्यात आलेली आहे. धर्मानंद कोसंबी यांनी ‘दान’, ‘शील’, ‘नैष्कर्म्य’, ‘प्रज्ञा’, ‘वीर्य’, ‘क्षान्ति’, ‘सत्य’, ‘अधिष्ठान’, ‘मैत्री’ व ‘उपेक्षा’ अशा दहा पारमिता आपल्या जातककथासंग्रहात (१९७८) दिलेल्या आहेत. प्रज्ञापारमिता ही सर्व पारमितांमध्ये श्रेष्ठ समजली जाते. कारण, प्रज्ञापारमितेमुळेच बोधिसत्त्वाला ‘बोधी’ची प्राप्ती होऊन तो बुद्ध बनतो. ‘शून्यते’चे –म्हणजेच बौद्ध तत्त्वज्ञानानुसार अंतिम सत्याचे–ज्ञान होणे, हे ह्या पारमितेचे स्वरूप होय. प्रज्ञापारमितेची प्राप्ती म्हणजेच मोक्षप्राप्ती होय. भगवद्‌गीतेतील स्थितप्रज्ञाची लक्षणे प्रज्ञापारमितेत अंतर्भूत होतात.

प्रज्ञापारमिता सूत्रे : प्रज्ञापारमिता या नावाची महायान पंथाची सूत्रे असून त्यांमध्ये पारमितांची आणि विशेषतः प्रज्ञापारमिता या गुणाची चर्चा आहे. या सूत्रांशी निगडित विपुल वाङ्‌मय आढळते व ते महायान पंथाचे तत्त्वज्ञान समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. प्रज्ञापारमिता म्हणजे बुद्धाने केलेले द्वितीय धर्मचक्रप्रवर्तन असे काहीजण मानत असत.

इ. स. पू. सु. पहिल्या शतकातच या सूत्रांच्या निर्मितीला प्रारंभ झाला आणि इ. स. सु. १२०० नंतर भारतात या सूत्रवाङ्‌मयाची निर्मिती थांबली. भारतात इ. स. सु. १५० ते इ. स. सु. १२०० पर्यंत या सूत्रांवरचे टीकावाङ्‌मय निर्माण झाले. इतरत्र ते आधुनिक काळापर्यंत निर्माण होत होते. इ. स. ५५० च्या सुमारास जुन्या शैलीतील सूत्रे रचावयाचे काम थांबले आणि इ. स. सु. ६०० नंतर या सूत्रांवर तांत्रिक प्रभाव दिसू लागला, असे विद्वानांचे मत आहे. या काळानंतर पाऊस पाडणे, रोगांच्या साथी दूर करणे इ. हेतूंनी या सूत्रांचा उपयोग केला जाऊ लागला. बौद्ध धर्मातील एका दंतकथेनुसार स्वतः गौतम बुद्धानेच प्रज्ञापारमिता हा ग्रंथ नागांच्या स्वाधीन केला होता आणि तो ग्रंथ समजण्याइतके ज्ञान मानवजातीला जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत नागांनी त्याचे रक्षण करावे, असे त्याने सांगितले होते. पुढे नागार्जुनाने तो ग्रंथ नागलोकातून आणला आणि त्याच्या आधारे महायान पंथाची उभारणी केली. काहीजणांच्या मते नागार्जुनाने स्वतःच ही सूत्रे रचली, तर काहींच्या मते आधीच असलेल्या सूत्रांची व्यवस्थित मांडणी करून त्यांवर भाष्य करण्याचे काम त्याने केले.

एका मतानुसार या सूत्रांची निर्मिती आंध्रमध्ये, तर दुसऱ्या मतानुसार ती वायव्य प्रांत व खोतान प्रांत येथे झाली. कनिष्काच्या काळात ही सूत्रे वायव्य प्रांतात प्रचलित होती. इ. स. ७५० ते १२०० या काळात मगध व बंगालवर राज्य करणाऱ्या पाल राजांनी या सूत्रांचा पुरस्कार केला होता.

पंचविंशतिसाहस्रिका प्रज्ञापारमिता, अष्टसाहस्रिका प्रज्ञापारमिता, वज्रप्रज्ञापारमिता इ. रूपांत ही सूत्रे आहेत. प्रज्ञापारमिताहृदय हा छोटासा ग्रंथही शून्यतेचे तत्त्व स्पष्ट करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. एक अब्ज, एक कोटी व एक लाख श्लोकांची प्रज्ञापारमिता अनुक्रमे गंधर्व, देवता आणि नाग यांच्याकडे अजूनही असल्याच्या दंतकथा आहेत.

इ. स. सु. १७० नंतरच्या काळात चिनी भाषेत प्रज्ञापारमितेची अनेक भाषांतरे झाली. जपानमध्ये इ. स. च्या दहाव्या शतकात पाऊस पडावा म्हणून शिंतो मंदिरातूनही वज्रप्रज्ञापारमितेचे पठण केले जाते असे.

प्रज्ञापारमिता देवी : प्रज्ञापारमिता हा गुण आणि प्रज्ञापारमिता ही सूत्रे या दोहोंचे, पूजेसाठी दैवतीकरण करून महायान बौद्धांनी ‘प्रज्ञापारमिता’ ही एक देवी कल्पिलेली आहे. इ. स. सु. चौथ्या शतकातच हे दैवतीकरण झालेले असले, तरी इ. स. च्या आठव्या शतकापूर्वीच्या मूर्ती सध्या सापडत नाहीत. या देवीच्या एका–बहुधा डाव्या–हातात नेहमी प्रज्ञापारमिता हा ग्रंथ असतो. ती सर्व बुद्धांची माता आहे, असे काही ग्रंथांतून म्हटले आहे. नेपाळ, जपान व कंबोडिया या देशांत तसेच जावा बेटात ती विशेष लोकप्रिय होती. या देवतेचे मूर्तिविज्ञान निष्पन्नयोगावली नावाच्या ग्रंथात दिलेले आहे. ती ‘वज्रधर’ या देवाची शक्ती आहे, असे काही पंथांतून मानले आहे. कंबोडियात (कांपुचियात) ११ मस्तके व २२ हात असलेल्या तिच्या मूर्तीही आढळतात. येथे प्रज्ञापारमितेची मंदिरे बांधण्यात आली होती. साधनमाला या ग्रंथात या देवीच्या पूजाविधीची तपशीलवार माहिती आहे.

संदर्भ : 1. Bhattacharya, Benoytosh, The Indian Buddhist Iconography, Calcutta, 1958.

2. Conze, Edward, TheProjnaparamita Literature, London, 1960.

लेखक: आ. ह.साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate