অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रतिमावाद

प्रतिमावाद

इंग्लंड व अमेरिकेत १९१२ ते १९१७ च्या दरम्यान उदयास आलेला काव्यसंप्रदाय. हा संप्रदाय म्हणजे शिथिल, भावविवश काव्यरचनेविरुद्ध निर्माण झालेल्या प्रतिक्रियेचा भाग होता. या संप्रदायाची दोन वैशिष्ट्ये होती : एक म्हणजे त्याला पौर्वात्य व पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या काव्यसाहित्यांतून प्रेरणा मिळाली आणि दुसरे म्हणजे त्याचे अध्वर्यू ब्रिटन व अमेरिका या दोन्ही देशांतील होते. प्रतिमवादाची गंगोत्री टी. ई. ह्यूम या ब्रिटिश लेखकाने १९०८ मध्ये मांडलेल्या काव्यविषयक सिद्धांतात सापडते; परंतु संप्रदायाचे ‘इमेजिस्ट्‌स्’ हे नामकरण व त्याच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे (डेस् इमेजिस्टेस्, १९१४) संपादन करण्याचा मान एझरा पाउंड या अमेरीकन कवीकडे जातो. खुद्द ह्यूम, एफ्. एस्. फ्लिंट व रिचर्ड ऑल्डिंगटन हे ब्रिटिश आणि एझरा पाउंड, एच्. डी. (हिल्डा डूलिट्ल) व एमी लोएल हे अमेरिकन कवी या संप्रदायाचे प्रमुख उद्‌गाते होत. सम् इमेजिस्ट पोएट्स या नावाचे तीन संग्रह एमी लोएलच्या संपादनाखाली १९१५, १९१६ व १९१७ मध्ये प्रसिद्ध झाले. कविता संक्षिप्त व बंदिस्त असावी, तीत एक किंवा अधिक कोरीव प्रतिमांखेरीज संदर्भ, अभिप्रायवजा अन्य काही नसावे व पारंपारिक वृत्तांऐवजी स्वनिर्मित व संभाषणात्मक शैलीची लय तिच्यात असावी, ही प्रतिमावादाची मुख्य तत्त्वे. त्यांची बीजे अमेरीकन कवी पो याची काव्यकल्पना, प्रतीकवादी व पार्‌नॅसस (ल पार्नास), ‘तांका’ हे फ्रेंच काव्यसंप्रदाय आणि ‘हाइकू’ हे जपानी तरल काव्यप्रकार व चिनी स्फुटकाव्ये यांत आढळतात. प्रतिमावादाची काव्यविषयक भूमिका एकांगी व मर्यादित असल्यामुळे त्याचा प्रभाव लवकरच ओसरला. तरीही मुमूर्ष स्वच्छंदतावादाविरुद्ध केलेले हे पहिले संघटित बंड इंग्रजी काव्येतिहासात महत्त्वाचे मानले जाते. पारंपारिक वृत्तव्यवस्था झुगारून देण्याचे धाडस व परकीय काव्यविचाराचे प्रवाह इंग्रजीत आणण्याची धडपड ही प्रतिमावाद्यांची कामगिरी मोलाची आहे. टॉमस एलियटचे वस्तुनिष्ठ समीकरण (ऑब्जेक्टिव्ह कोरेलेटिव्ह) हे टिकातत्त्व व नवटीका (न्यू क्रिटिसीझम्) या गाजलेल्या आधुनिक टिकासंप्रदायाचा काव्यविचार या दोहोंवर प्रतिमावादाचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला आहे.

संदर्भ : 1. Coffman, S. K. Imagism, Oklahoma, 1951.

2. Pratt, W. C. Ed. The Imagist Poem; Modern Poetry in Miniature, Dutton, 1963.

लेखक: म. कृ. नाईक

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/9/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate