অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रातिशाख्ये

प्रातिशाख्ये

वेदमंत्राचे उच्चारण शुद्ध व बिनचूक व्हावे, ह्या हेतूने ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून प्राचीन भारतीय विद्वानांनी जी शास्त्रे रचिली, ती ‘शिक्षा’ ह्या नावाने आणि एक वेदांग म्हणून प्रतिष्ठित झाली. ह्या वेदांगातील प्राचीन शिक्षा-ग्रंथ आज उपलब्ध होत नाहीत; तथापि ध्वनिशास्त्रविषयक मान्यता पावलेल्या सर्वसामान्य निष्कर्षांचा आपापल्या वैदिक शाखेनुसार विचार करणारे शास्त्रग्रंथ मिळतात आणि त्यांनाच प्रातिशाख्ये असे म्हणतात. तैत्तिरीय उपनिषदातील तीन वल्लींपैकी पहिल्या शिक्षावल्लीमध्ये दुसऱ्या अनुवाकात शिक्षा म्हणजे वेदमंत्रपठनामध्ये काय काय शिकावे, ह्याचे क्रमवार वर्णन केले आहे. वर्ण, स्वर, मात्रा, बल, साम आणि संतान ह्या सहा गोष्टी शिकताना लक्षात घ्याव्या, असे तेथे म्हटले आहे. वर्ण म्हणजे अकारादि अक्षरे; स्वर म्हणजे उदात्त, अनुदात्त व स्वरित हे तीन; मात्रा म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ व प्लुत; बल म्हणजे उच्चाराची शक्ती किंवा जोम; साम म्हणजे पठनाची सुस्वरता किंवा समता; आणि संतान म्हणजे अखंडित किंवा खंड न पडता पठन.

श्रीज्ञानेंद्रसस्वती ह्यांनी सिद्धान्तकौमुदीवर व्याख्या लिहिताना प्रातिशाख्य ह्या शब्दाची फोड ‘प्रतिशाखं भवम्’ (प्रत्येक वेदशाखेसाठी वेगळे असलेले-पाणिनि सूत्रे ४·३·३९) अशी केलेली आहे. तथापि सध्या उपलब्ध असलेली प्रातिशाख्ये वेदसंहितांच्या शाखावार नसून, प्रत्येक संहितेस अनुसरून आहेत. उदा., ऋग्वेदसंहितेचे ऋक्‌प्रातिशाख्य, तैत्तिरीयसंहितेचे तैत्तिरीयप्रातिशाख्य, वाजसनेयिसंहितेचे वाजसनेयि प्रातिशाख्य, सामवेदाचे ऋक्‌तंत्रव्याकरण, अथर्ववेदाचे अथर्व प्रातिशाख्य. शौनकीया चतुराध्यायिका नावाचे अथर्ववेदाचे दुसरेही एक प्रातिशाख्य प्रसिद्ध आहे. तथापि अथर्ववेदाचे एक अभ्यासक डॉ. सूर्यकांत ह्यांच्या मते अथर्वप्रातिशाख्य हेच सध्याच्या अथर्ववेदाचे प्रातिशाख्य होय; शौनकीया चतुराध्यायिका ही अथर्ववेदाच्या शौनक शाखेची असून त्यांच्या मते सध्याचा अथर्ववेद हा शौनक शाखेचा नाही.

वरील प्रातिशाख्यांपैकी ऋक्‌प्रातिशाख्य हे शौनकाच्या व वाजसनेयि प्रातिशाख्य हे कात्यायनाच्या नावावर मोडते. अन्य प्रातिशाख्यांच्या कर्त्यांची नावे आज अज्ञातच आहेत. प्रातिशाख्यांचा काळ ठामपणे सांगणे कठीण आहे. डॉ. सिद्धेश्वर वर्मा ह्यांच्या मते, तो इ. स. पू. ५०० ते इ. स. पू. १५० असा मानावयास हरकत नाही. ऋक्‌प्रातिशाख्य सर्व प्रातिशाख्यांत जुने आणि ऋक्‌तंत्रव्याकरण शेवटचे मानता येईल.

प्रातिशाख्यांत कोणत्या विषयाचा विचार होतो ह्याविषयी शौनकीया चतुराध्यायिकेत सुरुवातीस पुढील वचन आढळते : चतुर्णां पदजातानां नामाख्यातोपसर्गनिपातानां सन्धपद्यौ गुणौ प्रातिज्ञम् (१·१). याचा अर्थ नाम, आख्यात, उपसर्ग व निपात ह्या चार प्रकारच्या पदांच्या-ती स्वतंत्र पदे असतात तेव्हाच्या आणि त्यांचा संधी होतो तेव्हाच्या-ध्वन्यात्मक गुणांचा अभ्यास हा प्रातिशाख्यांचा विषय. ह्या दृष्टीने प्रातिशाख्यांत मुख्यत्वे दोन गोष्टींची माहिती मिळते. एक वर्णविचार आणि दुसरे पदपाठाचा संहितापाठ करताना होणारे उच्चारविषयक बदल. ह्यांखेरीज काही प्रातिशाख्यांत क्रमपाठ (ऋक्‌प्रातिशाख्य पटल १०; शौनकीया चतुराध्यायिका ४·११० व पुढे), उच्चारणदोष (ऋक्‌प्रातिशाख्य पटल १४) आणि गायत्री इ. छंद (ऋक्‌प्रातिशाख्य पटल १६-१८) ह्यांविषयी पण माहिती आढळते.

वर्णविचाराच्या दृष्टीने पाहता प्रातिशाख्यकारांना वर्णांत असणारा स्वर-व्यंजन भेद तसेच त्यांच्या ताल्वादी उच्चारांचे स्थान आणि जिह्वाग्रादी उच्चारक (करण) ह्या सर्वांची बारीक माहिती होती. ‘अक्षर’ ही कल्पना पण त्यांना अवगत होती. नुसता स्वर किंवा अनुस्वारयुक्त अथवा व्यंजनयुक्त स्वर अक्षर होऊ शकतो (सव्यंजनः सानुस्वारः शुद्धोवापि स्वरोSक्षरम् ऋक्‌प्रातिशाख्य १८·१७); पण नुसते व्यंजन अक्षर होऊ शकत नाही. व्यंजन हे अक्षरांग असल्यामुळे ते मागच्या किंवा पुढच्या स्वराचे अंग बनते. (व्यंजनं स्वराङ्‌गम् तैत्तिरीय प्रातिशाख्य २१·१) ह्याची त्यांना जाणीव होती. प्रातिशाख्यकारांनी ध्वनिशास्त्राला दिलेली सर्वांत महत्त्वाची देणगी म्हणजे त्यांनी ध्यानात घेतलेला घोष व अघोष वर्ण यांतील फरक. मुखातून बाहेर पडणारा वायू कंठ विवृत असेल तर श्वासरूप असतो; पण कंठ संवृत असेल तर त्याला नाद प्राप्त होतो (कण्ठस्य खे विवृते संवृते वा l आपद्यते श्वासतां नादतां वा l ऋक्‌प्रातिशाख्य १३·१; संवृते कण्ठे नादः क्रियते l विवृते श्वासः तैत्तिरीय प्रातिशाख्य २·४-५). ही गोष्ट त्या काळी कुठलेही शास्त्रीय उपकरण उपलब्ध नसताना त्यांनी ओळखली, ही एक आश्चर्य वाटावे अशी घटना आहे.

बऱ्याचशा वर्णांच्या स्थानाविषयी ध्वनिशास्त्राच्या अभ्यासकांचे प्रातिशाख्यकाली ऐकमत्य असल्याचे आढळत असले, तरी काही ठिकाणी भिन्न मतांचा उल्लेख आढळतो. ह व विसर्जनीय हे ऋक्‌प्रातिशाख्यकाराने ‘कंठ्य’ मानले आहेत. परंतु काहींच्या मते ते ‘उरस्य’ असल्याचे त्याने नमूद केले आहे; (१·८). तैत्तिरीय प्रातिशाख्यकाराचे मत ते ‘कंठ्य’ असल्याचेच आहे; पण त्याने नमूद केलेल्या भिन्न मताप्रमाणे ह हा त्याच्या नंतर येणाऱ्या स्वराशी आणि विसर्जनीय हा त्याच्या आधी येणाऱ्या स्वराशी सस्थानी असतो (२·४६-४८). र हा वर्ण ऋक्‌प्रातिशाख्याने दन्तमूलीय मानला आहे; पण काहींच्या मते तो वर्त्स्य आहे (१·१०).

प्रातिशाख्यांचे दुसरे व अतिशय महत्त्वाचे प्रयोजन पदपाठापासून संहितापाठ तयार करताना उच्चारदृष्ट्या जे बदल करायचे असतात, त्यांविषयीचे नियम सांगण्याचे आहे. हे नियम शक्य असेल तर सामान्य स्वरूपाचे असतात किंवा तसे करणे शक्य नसेल तर नियमांची व्याप्ती निश्चितपणे सांगितलेली असते किंवा उदाहरणांचा संग्रह करण्यात येतो. उदा., पदपाठातील ‘मक्षु’ ह्या पदाचा अंत्य स्वर सर्वत्र दीर्घ होतो (संहितापाठ ‘मक्षू’) असा सर्वसाधारण नियम सांगितला आहे, तर ‘अच्छ’ पदाचा अंत्य स्वर संहितापाठात त्यापुढे ‘सुता’ आणि ‘याहि’ ही पदे आली नाहीत, तर दीर्घ होतो असे सांगितले आहे (ऋक्‌प्रातिशाख्य ७·२). मेधातिथी ऋषीच्या सूक्तांत (ऋग्वेद १·१२-१·२४) समासांती ‘वरुण’ व ‘व्रत’ शब्द आल्यास आणि त्यांच्यापुढे स्पर्श किंवा अंतःस्था असल्यास समासांत स्वर ऱ्हस्व होतो (ऋक्‌प्रातिशाख्य ४·३९). जसे ‘इन्द्रावरुणा’ ह्या ऐवजी ‘इन्द्रावरुण’ (ऋग्वेद १·१७·७, ८) किंवा ‘धृतव्रता’ ह्या ऐवजी ‘धृतव्रत’ (ऋग्वेद १·१५·६).

दोन संहितांच्या दोन प्रातिशाख्यांत कित्येकदा उच्चारविषयक भिन्न नियम आढळतात. शौनकीया चतुराध्यायिका सांगते की, पदांती येणारी सर्व व्यंजने द्वित्व पावतात (३·२६). जसे गोधुक्क्, विराट्ट्. ऋक्‌प्रातिशाख्याप्रमाणे पदांती येणारी फक्त ङ् व न् ही अनुनासिके त्यांच्या पूर्वी ऱ्हस्व स्वर आणि नंतर कोणताही स्वर असल्यास द्वित्व पावतात (६·४). जसे की दृङ्ङ् इन्द्रः, अहन्न्, अहिम्. तैत्तिरीय प्रातिशाख्याप्रमाणे उदात्त इ व अनुदात्त इ यांचा प्रश्लेष झाला तर ई हा उदात्त असतो (उदात्तमुदात्तवति १०·१०). जसे दिवीवचक्षुराततम् (तैत्तिरीय संहिता १·३·६·२). परंतु ऋक्‌प्रातिशाख्या (३·७) प्रमाणे तो स्वरित असतो. जसे दिवीवचक्षुराततम् (ऋग्वेद १·२२·२०)

प्रातिशाख्यांत संहितेची व्याख्या ‘संहिता पदप्रकृति:’ (ऋक्‌प्रातिशाख्य २·१) अशी केली आहे. उवटाने ह्याचा अर्थ ‘पदानि प्रकृतिभूतानि यस्याः संहितायाःसा’ असा केला आहे, म्हणजे पदे ही प्रकृती व संहिता ही विकृती झाली. ऋषींनी मूळ मंत्ररचना संहितास्वरूपात केली आणि त्यावरून पदपाठ तयार करण्यात आले अशी वस्तुस्थिती असली, तरी प्रातिशाख्ये ही पदपाठावरून संहितापाठ कसा करावा हे सांगत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने पदपाठ हा प्रकृतिरूप ठरतो.

प्रातिशाख्यांत अधूनमधून समकालीन व पूर्वकालीन शास्त्रज्ञांच्या मतांचा उल्लेख करण्यात येतो. कित्येकदा हा उल्लेख ‘केचित्’, ‘एकेषाम्’ असा सामान्य असतो, तर कित्येकदा ‘वेदमित्र’ (ऋक्‌प्रातिशाख्य १·२१), ‘शाकटायन’ (षाजसनेयिप्रातिशाख्य ४·१९१), ‘शैत्यायन’, ‘कौहलीपुत्र’, ‘भारद्वाज’ (तैत्तिरीय प्रातिशाख्य १७·१, २, ३) असा नावानिशी असतो.

संदर्भ : 1. Allen, W. S. Phonetics in Ancient India, London, 1953.

2. Varma, Siddheshwar, Critical Studies in the Phonetic Observations of Indian Grammarians, Delhi, 1961.

लेखक: म. अ.मेहेंदळे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate