অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रादेशिक वाङ्‌मय

प्रस्तावना

एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील वातावरणाचे, रीतीरिवाजांचे, बोलीभाषेच्या धाटणीचे, लोकांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे, उद्योगधंद्याचे, व्यापार-उदिमांचे आणि एकंदरीत जीवनपद्धतीचे प्रत्ययकारी दर्शन घडविणारे वाङ्‌मय म्हणजे प्रादेशिक वाङ्‌मय. कादंबरी वाङ्‌मयात, प्रादेशिक कादंबरी हा एक प्रस्थापित उपप्रकार मानला जातो. प्रादेशिक वाङ्‌मयाची प्रत्ययकारिता केवळ वातावरणनिर्मितीपुरतीच मर्यादित असत नाही. विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या आयुष्याची रीत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मूस त्या प्रदेशाच्या नानाविध वैशिष्ट्यांनी कशी वेगळी बनलेली असते तसेच निसर्गाचा, भूप्रदेश-वैशिष्ट्याचा आणि जीवनपद्धतीचा संबंध कसा अतूट असतो, याचे दर्शन प्रादेशिक वाङ्‌मयात घडते, असे मानले जाते.

इंग्रजी प्रादेशिक वाङ्‌मय

इंग्रजी कादंबरी- वाङ्‌मयात टॉमस हार्डी या कादंबरीकाराने इंग्लंडमधील ‘वेसेक्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशातील जीवनाचे चित्रण करणारी एक कांदबरीमालिका निर्माण केली. ही मालिका म्हणजे प्रादेशिक वाङ्‌मयाचे एक ठळक उदाहरण होय. त्या भागातला सुंदर निसर्ग, लहरी हवामान, खडकाळ समुद्रकिनारा, त्या मातीत जन्मलेल्या व सर्वार्थाने या मातीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांचे असंख्य तपशील हार्डीने आपल्या कादंबरीमालिकेत आस्थेवाईक सूक्ष्मपणाने टिपले आहेत. त्याच्या निर्सगवर्णनातील अभिजात काव्यमयता बाजूला ठेवली, तरी त्याच्या अचूक निरीक्षणशक्तीचा पडताळा जागोजागी येतो. दुसरे ठळक उदाहरण आर्नल्ड बेनेट या विसाव्या शतकातील सुरुवातीच्या काळातील इंग्रजी कादंबरीकाराचे. त्याचे स्ट्रॅटफर्ड या औद्योगिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या शहरी भागातील, ‘पंचनगरे’ (फाइव्ह टाउन्स) नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसराचे चित्रण करणारी कादंबरीमालिका लिहिली. इंग्रजी प्रादेशिक कादंबरीच्या संदर्भात शार्लट ब्राँटी हिच्या शर्ली या कादंबरीचा व जॉर्ज एलियट हिच्या वॉरिकशरमधील जीवनासंबंधीच्या कादंबऱ्याचाही उल्लेख केला जातो. प्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार विल्यम फॉक्‌नर याने परिसर व प्रवृत्ती यांतील अभेद साकार करणाऱ्या आपल्या कादंबऱ्यांतून ‘यॉक्नपटाफा’ या काल्पनिक नावाचा मिसिसिपी राज्यात एक परगणा निर्माण केला आहे, त्याचप्रमाणे जेम्स जॉइस या आयरिश लेखकाने आपल्या कथाकादंबऱ्यांतून डब्लिन शहरातील जीवनाचे इतके साद्यंत वर्णन दिले आहे की, ते डब्लिन गाईड लिहिणाऱ्यांनाही मार्गदर्शक ठरले आहे. जेम्स जॉइसप्रमाणेच जे. एम्. सिंग याचाही उल्लेख येणे उचित ठरते, कारण याच्या नाटकांतून पश्चिम आयर्लंडमधील प्रादेशिक जीवन प्रभावीपणे चित्रीत झाले आहे. एखादी कादंबरी प्रादेशिक ठरविताना कादंबरीचे प्रमुख घटक, कथा, पात्रे, प्रसंग व वातावरण इ. त्या प्रदेशामुळे किती व कशी संस्कारित होतात याचा विचार प्रमुख असतो.

मराठी प्रादेशिक वाङ्‌मय

मराठीत प्रादेशिक साहित्य मुख्यतः कोकणासंबंधीचे आहे. गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, चि. त्र्यं. खानोलकर, बाळकृष्ण प्रभुदेसाई, मं. वि. कोल्हटकर इ. साहित्यिकांनी कोकणातील माती व माणसे यांचे अतूट नाते दिग्दर्शित करणारे साहित्य निर्माण केले आहे. गो. नी. दांडेकर यांची पडघवली व श्री. ना. पेंडसे यांची गारंबीचा बापू या कादंबऱ्या व चि. त्र्यं. खानोलकरांची चानी ही दीर्घ कथा यांमध्ये कोकणातील जीवनाचे यथार्थ दर्शन घडते. मात्र देशावरील भूभागाची वैशिष्ट्ये दिग्दर्शित करणारे ललित साहित्य तुलनेने कमी आहे. या संदर्भात व्यंकटेश माडगूळकरांचा उल्लेख ठळकपणे करावा लागतो. त्यांच्या माणदेशी माणसे या पुस्तकात व्यक्तिचित्रणातून माणदेशच्या उपेक्षित जीवनाचे अभिजात चित्रण आढळते. व्यंकटेश माडगूळकरांचीच बनगरवाडी, शंकर पाटलांची टारफुला, आनंद यादव यांची गोतावळा त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांची फकीरा व इतर कादंबऱ्या यांसारख्या ग्रामीण जीवनाच्या अस्सल चित्रणाला वाहिलेल्या कादंबऱ्यांतूनही प्रदेशविशिष्ट निसर्गाची व जीवनशैलीची द्योतक अशी वर्णने आढळतात.

काही प्रादेशिक ललित साहित्य इतके गुणवान असते, की त्यात प्रादेशिक जीवनाची वैशिष्ट्ये ओलांडून व्यापक मानवी जीवनाच्या मर्माला स्पर्श केलेला असतो. माडगूळकरांमध्ये ते सामर्थ्य आहे. तसेच ते पेंडश्यांच्या गारंबीचा बापूमध्येही आहे. काही प्रादेशिक साहित्यकृतींत मात्र केवळ प्रादेशिकतेचा पातळ मुलामाच असतो.

विदर्भ प्रादेशिक साहित्य

विदर्भातील निसर्ग, वातावरण व जीवनपद्धती यांचे प्रभावी चित्रण करणारी विदर्भातील खास प्रादेशिक साहित्यकृती म्हणून उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी उल्लेखनीय आहे. याखेरीज शेळके यांचीच बाईविना बुवा, बाजीराव पाटील यांची भंडारवाडी, गो. नी. दांडेकर यांची पूर्णामायची लेकरं व काहीअंशी मृण्मयी, मनोहर तल्हार यांची माणूस या कादंबऱ्याही प्रादेशिक साहित्यकृती म्हणून महत्त्वाच्या आहेत. बाजीराव पाटील, मो. दा. देशमुख व उद्धव शेळके यांच्या कथांतूनही विदर्भाची प्रादेशिक अस्मिता आढळते. पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे वऱ्हाडी मान्सं हे नाटकही या संदर्भात लक्षात घेण्याजोगे आहे. याशिवाय भाऊ मांडवकर, ना. रा. शेंडे, वामनराव चोरघडे यांनीही काही प्रमाणात वैदर्भीय प्रादेशिक वाङ्‌मयाच्या निर्मितीला हातभार लावला आहे.

लेखक: म. द.हातकणंगलेकर; व. कृ.वऱ्हाडपांडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate