অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्रजबुली साहित्य

ब्रजबुली साहित्य

ब्रजबुली हे एका विशिष्ट वैष्णव भावकवितांच्या प्रकाराला व त्याच्या शुद्ध वाङमयीन भाषेला दिलेले नाव आहे. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांच्या दरम्यान ब्रजबुलीत वैष्णवांनी भावगीते रचली. ब्रजबुली वब्रज भाषा यांचा गोंधळ टाळणे आवश्यक आहे.बंगाली,असमिया व उडिया [ ओडिया भाषा] या भाषांचे भरपूर मिश्रण असलेलीमैथिली भाषा ही ब्रजबुलीचा आधार. शिवायहिंदी व ब्रज भाषा यांचाही थोडाबहुत बाह्य प्रभाव या भाषेवर दिसतो. या भाषांच्या आवर्जून केलेल्या संमिश्रणामुळेच ब्रजबुलीला व तिच्यातील काव्याला एक लोभस सौंदर्य, भावपूर्णता व नादमाधुर्य प्राप्त झाले आहे. ब्रजवासी राधाकृष्ण या दिव्य प्रेमी युगुलाच्या संभाषणाची भाषा हीच होती, या भाबड्या समजुतीने तिला ‘ब्रजबुली’ असे नाव मिळाले. या गीतांत राधाकृष्णांच्या पूर्वराग, अभिसार, मान, मानभंजन, विरह, मिलन इ. अवस्थांचे शृंगाररसपूर्ण वर्णन आहे. तसेच चैतन्यांच्या स्तवनाची गीतेही आहेत. त्यांत मुख्यतः शृंगाराला व भक्तिरसाला प्राधान्य आहे.

मिथिलेला संस्कृत भाषा-साहित्याच्या अभ्यासासाठी येणारे अनेक असमिया, ओडिया व विशेषतः बंगाली विद्यावंत तरूण, शुद्ध मैथिलीत रचिलेल्याविद्यापतींच्या उत्कट वैष्णव भावगीतांनी मोहित झाले असावेत व त्यांचेच अनुकरण करून आणि मैथिलीत इतर भाषांचे मिश्रण करून त्यांनी स्वतः काव्ये रचली असावीत. परंतु बंगालमध्येचैतन्य महाप्रभू (सु. १४८५ – १५३३) आणि आसाममध्येशंकरदेव (सु. १४४९ – सु. १५६९) यांच्या उदयाबरोबरच ब्रजबुलीचा सुनिश्चित वाङमयप्रकार म्हणून परिपोष झाला. उपलब्ध ब्रजबुली कवितांपैकी सगळ्यात जुन्या कविता म्हणजे यशोराजखान यांनी १४९३ ते १५१९ ह्या दरम्यान बंगालमध्ये, १५१० पूर्वी रामानंद राय (पंधरावे-सोळावे शतक) यांनी ओरिसात आणि महान संतकवी शंकरदेव यांनी आसामामध्ये केलेल्या रचना म्हणता येतील. मात्र ब्रजबुली वाङ्मकय आसामात व ओरिसात कधीच विपुल प्रमाणात निर्माण झाले नाही. पण बंगालमध्ये ते अतिशय लोकप्रिय व समृद्ध झाले. सु. सतराव्या शतकापासून रचिलेल्या चारशे कवींच्या सु. पाच हजार कविता संगृहीत केल्या आहेत. त्यात काही वैष्णवपंथी मुस्लिम कवींचाही समावेश आहे. इ. स. सोळाव्या ते अठराव्या शतकांतील इतर उल्लेखनीय कवी म्हणजे मुरारिगुप्त, लोचन, ज्ञानदास,बलराम दास (सु. १४७० – सु. १५४०), अनन्त,चंडीदास बडू (१४१७ ? – १४७७ ?),नरोत्तम दास (सु. १५२८ – सु. १६११)

गोविंददास कविराज (१५३५ – १६१३, सर्वश्रेष्ठ ब्रजबुली कवी), नसील मामूद आणिआलाओल सैयद (१६०७ – ८०) हे होत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत बंगालमध्ये ब्रजबुली वाङंमय सतत निर्माण होत राहिले. या शतकाच्या अखेरीस काही आंग्लविद्याविभूषित तरुणांनी त्याचे पुनरुज्जीवन केले, मात्र त्यात कृत्रिमता आढळते. हे पुनरूज्जीवन करणाऱ्यांत प्रमुख म्हणून जनमेजय मित्र व प्रसिद्ध कादंबरीकारबंकिमचंद्र चतर्जी (१८३८ – ९४) उल्लेखनीय आहेत.

रविंद्रनाथ टागोर (१८६१-१९४१) यांनी १८८४-८५ मध्ये ‘भानुसिंह ठाकुर’ या टोपणनावाने वीस ब्रजबुली भावकवितांचा संग्रह प्रसिद्ध केला. त्यांची गणना ब्रजबुलीतील काही सर्वश्रेष्ठ कवींमध्ये करावी लागते. बंगालमध्ये अजूनही प्रसंगपरत्वे ब्रजबुली काव्ये रचिली जातात.

संदर्भ :  1. Sea, Sukumar, A history of Brajbuli Literature, Calcutta, 1935.

2. तिवारी, रामपूजन, ब्रजबुली साहित्य, पाटणा, १९६०.

3. तोमर, कणिता. ब्रजभाषा और ब्रजबुलि साहित्य, वाराणसी, १९६४.

लेखक/ लेखिका: नीलमाधव सेन ; उषा रानडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate