অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्राह्मणे

वैदिक वाङ्मययातील एक महत्त्वाचा भाग. यज्ञसंस्थेचे स्वरूप समजण्यास उपयोगी असे वेद, म्हणून मान्य प्राचीन ग्रंथ. वैदिक वाङ्मयाचे मंत्र आणि ब्राह्मण असे मुख्य दोन भाग होतात. निरनिराळ्या वेदांच्या संहिता मंत्ररूप असून त्यांनाच केवळ वेद म्हणावे असे आर्य समाजाचे स्वामी दयानंद यांचे मत आहे. परंतु मंत्र आणि ब्राह्मण मिळून होणाऱ्या वाङ्मयास वेद म्हणावे, असे प्राचीन कल्पसूत्रकारांनी सांगितले आहे. वेदांमध्ये ब्राह्मण हा शब्द नपुंसकलिंगी वापरला असेल, तेव्हा त्याचा अर्थ मन्त्रव्यतिरिक्त वैदिक गद्य वाङ्मय असा होतो. यज्ञकर्माचे एखाद्या मुद्द्यावर केलेले विवेचन, असे ब्राह्मण या शब्दाचे लक्षण होय. ब्रह्म म्हणजे मंत्र वा यज्ञ. मंत्र व यज्ञ यांसंबंधी विवेचन करणारे गद्य वाङ्मय म्हणजे ब्राह्मण.

ब्राह्मणग्रंथ हे मुख्यतः यज्ञांचे विवेचन करणारे ग्रंथ आहेत. वेदांच्या मंत्रसंहितामध्ये निरनिराळ्या देवतांना उद्देशून सांगितलेल्या मंत्रांचा विनियोग यज्ञकर्मांत कसा करावयाचा हे ब्राह्मणग्रंथांत सांगितलेले असते. हे सांगत असताना मंत्रांचा अर्थ त्या त्या कर्माला कसा जुळणारा आहे हे दाखवून दिले आहे. अशा ठिकाणी वेदमंत्रांचा अर्थ सांगितला असल्यामुळे त्यांना संहितांवरील प्राचीन टीकाग्रंथ असेही म्हटले जाते. ब्राह्मणग्रंथांमध्ये निरनिराळ्या यज्ञांचे सांगोपांग विवेचन असल्याने प्राचीन यज्ञसंस्थेचा अभ्यास करण्यास ब्राह्मणग्रंथ हे एक अमोल साधन झाले आहे.

ब्राह्मणग्रंथ हे मन्त्रांच्या संहितांनंतर तयार झाले असावे, तरी त्यांचा कालनिर्णय करणे कठिण आहे. प्राचीन परंपरेप्रमाणे हे ग्रंथ अपौरुषेय वाङ्मयातच येतात. तथापि भाषाशास्त्र, ज्योतिष, भूगर्भशास्त्र इ. शास्त्रांचा आधार घेऊन ब्राह्मणग्रंथांचा कालनिर्णय करण्याचा प्रयत्न आधुनिक संशोधकांनी केला आहे. माक्स म्यूलरने ब्राह्मणांचा काळ इ. स. पू. ८००-६०० असा मानला आहे. बऱ्याच पाश्चात्य संशोधकांनी हे मत मानले आहे. परंतु हे मत भाषाशास्त्रावर आधारित असल्याने ते विवाद्य ठरते. कारण ठराविक कालखंडाने बोलीभाषेत परिवर्तन घडत असले, तरी हा सिद्धांत ग्रांथिक व शास्त्रीय भाषेच्या बाबतीत स्वीकारणे योग्य नाही, असा युक्तिवाद यासंबंधी केला गेला आहे. ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन वेदांचा कालनिर्णय ठरविण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केला. ‘एता ह वै प्राच्यै दिशो न च्यवन्ते’ (कृत्तिकानक्षत्र पूर्व दिशेकडून केव्हाही विचलित होत नाही). हे शतपथ ब्राह्मणातील (२.१.२) वाक्य व यज्ञांच्या संदर्भात येणारी यासारखी वाक्ये यांचा विचार करून ब्राह्मणग्रंथांचा काळ इ. स. पू. २००० असल्याचे अनेक संशोधकांनी सिद्ध केले आहे.

या काळात ऋग्वेदकालीन आर्य संस्कृतीचे केंद्र प्राचीन भारताच्या मध्य देशात आले होते असे दिसते. या ठिकाणी असलेल्या कुरू, पांचाल, उशीनर इ. अनेक राज्यांचे उल्लेख ब्राह्मणग्रंथांत आढळतात. अश्वमेघासारख्या यज्ञांच्या संदर्भत अनेक राजे व पुरोहित यांची नावे ब्राह्मणग्रंथांत आली आहेत. विदेहाचा राजा जनक आणि याज्ञवल्क्य यांच्या संबंधीच्या अनेक कथा शतपथ ब्राह्मणात आल्या आहेत. ऐतरेय ब्राह्मणातील राज्याभिषेकाच्या वर्णनात अनेक राज्यांचा उल्लेख आहे. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांबरोबरच सदानीरा, काम्पील, परिचक्रा इ. नगरांचाही निर्देश ब्राह्मणग्रंथात आहे. यावरून या ग्रंथांची रचना मध्य देशात झाली असावी, असे दिसून येते.

ब्राह्मणग्रंथांचे स्वरूप संहितांहून भिन्न आहे. संहितांतील भाषा, तिचे व्याकरण, स्वर, संधी, पदे वगैरे गोष्टींचा अभ्यास करण्यास प्रातिशाख्ये, शिक्षा, निरुक्त यांसारखे ग्रंथ उपलब्ध आहेत. पण ब्राह्मणग्रंथांच्या अभ्यासास मात्र अशी साधने नसल्याने त्यांचा अभ्यास कठिण झाला आहे. या ग्रंथांच्या अभ्यासाकडे पाश्चात्य विद्वानांनी फारसे लक्ष दिलेले नाही. माक्स म्यूलरने ब्राह्मणग्रंथांवर टीका करताना म्हटले आहे, की ‘भारतीय वाङ्मयाच्या अभ्यासकांना ब्राह्मणग्रंथ कितीही आकर्षक वाटत असले, तरी सर्वसामान्यांना ते अगदी नीरस वाटतात. या ग्रंथांतील पुष्कळसा भाग म्हणजे नुसती बडबड आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे पारमार्थिक बडबड आहे. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात ब्राह्मणांचे केवढे स्थान आहे, हे ज्याला प्रथमतःच समजले नाही त्याला पुरती दहा पाने वाचून झाली नाहीत, तोच पुस्तक मिटवून ठेवावे असे वाटू लागते.’ परंतु ब्राह्मणग्रंथांचे अध्ययन, समाजजीवन, यज्ञसंस्था, धर्मशास्त्र इ. अनेक विषयांचे यथार्थ ज्ञान होण्यास उपयोगी पडणारे आहे. त्यासाठी यज्ञसंस्थेचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे.

ब्राह्मणांचे विषय

ब्राह्मणग्रंथांत मुख्य विषय यज्ञ हा आहे. हे यज्ञ कोणते? किती प्रकारचे? कोणी करावे? केव्हा करावे? इ. अनेक विषयांची माहिती ब्राह्मणग्रंथांत आली आहे. यज्ञांचे विधान करणाऱ्या वाक्यांना विधिवाक्ये म्हणतात. कर्म करीत असताना काही गोष्टींचा निषेध केलेला असतो. उदा., खोटे बोलू नये, मांसभक्षण करू नये. अशा वाक्यांना निषेधवाक्ये म्हणतात. पण या वाक्यांबरोबर अर्थवाद या नावाने ओळखला जाणारा पुष्कळ मोठा भाग ब्राह्मणग्रंथांत आढळतो. अर्थवाद म्हणजे विधेय कर्माची स्तुती किंवा निषिद्ध कर्माची निंदा. या अर्थवाद भागात कथा, आख्याने, शब्दांच्या व्युत्पत्ती इ. विषय येतात. जैमिनीसूत्रांवर (२.१.८) भाष्य करताना शबराचार्यांनी हेतू, व्युत्पत्ती, निषिद्ध कर्मांची निंदा, कर्तव्यकर्मांची स्तुती, संशय, विधी, दुसऱ्याने केलेल्या कर्माचे प्रतिपादन, पूर्वीच्या कथा, निश्चय आणि उपमान असे दहा विषय ब्राह्मणग्रंथांत येतात, असे म्हटले जाते.

ब्राह्मणग्रंथांत सांगितलेले यज्ञ करण्याचा अधिकार ज्याने अग्निहोत्र धारण केले असेल, अशा मनुष्यासच प्राप्त होतो. त्यासाठी प्रथम वेदाध्ययनपूर्व अग्निहोत्र घ्यावे लागते. या यज्ञांचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे मुख्यतः तीन प्रकार आहेत. अग्निहोत्रहोम, दर्शपूर्णमास हे नित्य यज्ञ होत; एखादे कारण घडल्यास त्या निमित्ताने जे यज्ञ करतात ते नैमित्तिक यज्ञ होत आणि वेगवेगळ्या इच्छा मनात धरून विशिष्ट फलाच्या उद्देशाने केले जाणारे यज्ञ ते काम्य होत. याशिवाय ब्राह्मणग्रंथांत सोमयाग, राजसूय, अश्वमेध, सत्रे इ. अनेक प्रकारचे मोठे यज्ञ सांगितले आहेत. या यज्ञांचे अनुष्ठान करण्यास अनेकांचे साहाय्य घ्यावे लागते. साधनसामग्री पुष्कळ लागते. त्यामुळे अशा श्रौतयज्ञांची अनुष्ठाने आधुनिक काळात क्वचितच होतात. काही यज्ञ सर्वत्रैवर्णिकांना समान आहेत; काही प्रत्येक वर्णास निराळे सांगितले आहेत तसेच निषादस्थपती, रथकार इ. शुद्रांना काही यज्ञ सांगितले आहेत. यज्ञ हा प्राचीन भारताच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक इ. अनेक गोष्टींचा केंद्रबिंदू होता. त्यामुळेच यज्ञांच्या अनुषंगाने अनेक गोष्टींचा विचार ब्राह्मणग्रंथांत केलेला आहे.

ब्राह्मणग्रंथांत अनेक कथा सांगितल्या आहेत. त्यांतील काही कथा मनोरंजक आहेत; तर काही कथांतून प्राचीन काळचा इतिहासही समजून येतो. यज्ञातील एखाद्या विदीचे वर्णन करताना कथा सांगितलेली असते. शतपथ ब्राह्मणात (११.५.१) अग्निमंथाचे विधान करताना पुरुरवस व उर्वशी यांचे आख्यान झाले आहे. राजसूयाच्या संदर्भात आलेली ऐतरेय ब्राह्मणातील (७.१८) शुनःशेपाची कथा प्रसिद्ध आहे. एका सोमयागाचे विधान करताना जैमिनी ब्राह्मणात (२.४३८) सरमा आणि पणी यांची कथा आली आहे. दर्शपूर्णमासयागातील एका विधीचे विवेचन करताना शतपथ ब्राह्मणात (१.४.५.८) मन व वाणी यांची कथा आहे. ती अशी : मन एकदा वाणीला म्हणाले, की ‘माझ्या कृतीचे तू अनुकरण करतेस म्हणून मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे’. यावर वाणी म्हणाली, ‘की तुला जे कळते ते मी कळविते, प्रकट करते म्हणून मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे’. त्या दोघांचा वाद मिटेना म्हणून ती दोघे प्रजापतीकडे गेली. प्रजापतीने मनाच्या बाजूने निकाल दिला. वाणी रागावली. ती प्रजापतीला म्हणाली, की ‘तुझ्या हवीसंबंधीचे मंत्र मी उच्चारणार नाही,’ म्हणून प्रजापतीला द्यावयाच्या आहुतीच्या वेळी असलेले मंत्र मनात म्हणतात. याचप्रमाणे देव व असुर यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्याही कथा ब्राह्मणग्रंथांत आलेल्या आहेत.

ब्राह्मणग्रंथांतील यज्ञविषयक माहिती आणि कथा आख्याने यांच्या आधारे प्राचीन भारतातील सामाजिक व राजकीय स्थितीसंबंधाने पुष्कळ माहिती मिळते. त्याकाळी चातुर्वर्ण्य मानले जात असले, तरी ते मुख्यतः उद्योगावरून व कामाच्या विभागणीवरून ओळखले जात होते. त्यात कडकपणा नव्हता. यज्ञांच्या संदर्भात ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यात एकात्मता आढळून येते. राजसूय, अश्वमेघ यांसारख्या यज्ञांमध्ये समाजातील सर्व लोकांना सहभागी होता येत असे. यज्ञ करणाऱ्या प्रतीदर्श, सांजर्थ, श्रौतर्ष, देवभाग इ. राजांचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात (२.४.४) आढळतो. स्त्रियांनाही यज्ञात समान भाग मिळत होता. पत्नीशिवाय केलेला यज्ञ हा यज्ञच नव्हे असे तैत्तिरीय ब्राह्मणात (३.३.३.१) म्हटले आहे. एकपत्नीत्व रूढ असले तरी राजाला अनेक स्त्रियांबरोबर विवाह करण्याची परवानगी असे. शिक्षणाची संधी सर्वांना मिळत असे. ब्राह्मणग्रंथांच्या अभ्यासा वरून त्यावेळच्या लोकांची राहणी, आहार, वेषभूषा, करमणूक इ. अनेक विषयांची माहिती मिळते.

भारतीय तत्त्वज्ञानाचे मूलाधार ग्रंथ म्हणजे उपनिषदे होत. पण उपनिषदांतील तत्वज्ञान ब्राह्मणग्रंथांतून निर्माण झालेले आहे. यज्ञांचे विधान सांगताना ‘य एवं वेद’ (जो अशा प्रकारे ज्ञान करून घेतो) हे वाक्य ब्राह्मणग्रंथांत वारंवार आले आहे. म्हणजे प्रत्यक्ष यज्ञ न करता अर्थाज्ञानपूर्वक त्या त्या यज्ञविषयक भागाचे चिंतन केल्यास योग्य असे फळ मिळवता येते. उपनिषदांतील अनेक विचार ब्राह्मणग्रंथांतील यज्ञांच्या पृष्ठभूमीवर मांडलेले आहे. तत्वज्ञानाप्रमाणे मीमांसा, व्याकरण, ज्योतिष, वैद्यक, गणित, रसायन, शेती, वनस्पतिशास्त्र इ. अनेक शास्त्रांच्या प्राथमिक स्वरूपाची माहिती ब्राह्मणग्रंथांवरून मिळू शकते.

निरनिराळ्या वेदांची ब्राह्मणे: निरनिराळ्या वेदशाखांचे ब्राह्मणग्रंथ उपलब्ध असून त्यात यज्ञात भाग घेणाऱ्या ऋत्विजांच्या कामाची माहिती सांगितलेली आहे. ऋग्वेदातील मंत्र म्हणण्याचे काम होता नावाच्या ऋत्विजाकडे असते अर्थात त्याने ते मंत्र केव्हा म्हणावे यासंबंधीचे विधान ऐतरेय आणि कौषीतकी या ऋग्वेदाच्या ब्राह्मणग्रंथांत केलेले आहे. अध्वर्यू हा यजुर्वेदातील मंत्र म्हणतो, तर उद्गाता हा सामवेदातील मंत्रांवर सामगान करतो. म्हणून त्यांच्या कामांची माहिती त्या त्या ब्राह्मणग्रंथांत सांगितलेली आहे. अथर्ववेदातील काही मंत्र म्हणून काम करणाऱ्या ब्रह्मा या ऋत्विजाच्या कर्माची माहिती गोपथ ब्राह्मणात आहे.

ऐतरेय ब्राह्मण

हे ब्राह्मण ऋग्वेदाचे असून महीदास ऐतरेय हा या ब्राह्मणाचा ऋषी समजला जातो. यात चाळीस अध्याय असून त्यांत सोमयाग, गवामयन, द्वादशाह, अग्निहोत्र व राजसूय या यज्ञांची माहिती आहे. मुख्यतः होता या ऋत्विजाने यज्ञांत ऋग्वेदातील कोणती सूत्रे म्हणावी याचे विधान यात आहे. याची भाषा गद्य आहे. अलंकारांनी युक्त आहे. अनेक ठिकाणी मंत्राचा अर्थ कर्माला कसा जुळणार आहे हेही सांगितले आहे. यात अनेक कथा आलेल्या आहेत.

कौषीतकी ब्राह्मण

हेही ऋग्वेदाचे ब्राह्मण आहे. यास शांखायन ब्राह्मण असेही म्हणतात. काहींच्या मते हे दोन ब्राह्मणग्रंथ वेगवेगळे असावे. यात ऐतरेयाप्रमाणेच सर्व विषय आले आहेत. अग्निहोत्र, प्रायश्चित्ते यांसंबंधीची अधिक माहिती आहे.

तैत्तिरीय ब्राह्मण

कृष्णयुजर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेचे हे ब्राह्मण आहे. याची तीन कांडे असून त्यांत विविध यज्ञांचे विवेचन करणारा गद्य भाग आहे. त्याचप्रमाणे यात काही मंत्रही आलेले आहेत. अध्वर्यू या नावाच्या ऋत्विजाने यज्ञात करावयाच्या अनेक विधींचे विवेचन यात असल्याने याचा विस्तार मोठा आहे. अग्‍न्याधान, गवामयन, वाजपेय, सौत्रामणी, सव, काठकचयने इ. अनेक विषयांची माहिती यात सांगितलेली आहे.

शतपथ ब्राह्मण

शुक्लयजुर्वेदाच्या माध्यन्दिन व काण्व अशा दोन्ही शाखांची ब्राह्मणे या एकाच नावाने प्रसिद्ध आहेत. तथापि त्यांत फारच थोडा फरक आहे. या ब्राह्मणाचा ऋषी याज्ञवल्क्य आहे. या माध्यन्दिन शाखीय ब्राह्मणाची चौदा कांडे असून पहिल्या नऊ कांडांत शुक्लयजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेतील मंत्रांचा यज्ञांच्या क्रमाने विनियोग सांगितला आहे. त्यांत दर्शपूर्णमास, चातुर्मास्य, सोमयाग, चयने वगैरे यज्ञांचे तपशिलवार विवेचन आहे. विधींच्या अनुषंगाने अनेक कथा या ब्राह्मणांत आल्या आहेत. दहाव्या कांडात शांडिल्याने सांगितलेले अग्‍निरहस्य आहे. अकरा ते चौदा या कांडांत उपनयन, ब्रह्मचरित्रते, पितृमेध, प्रवर्ग्य असे अन्य विषय आहेत. चौदावे कांड आरण्यक म्हणून प्रसिद्ध असून त्यांतील शेवटच्या सहा अध्यायांना बृहदारण्यकोपनिषद असे म्हणतात.

तांड्य ब्राह्मण

हे सामवेदाचे प्रसिद्ध ब्राह्मण आहे. यात पंचवीस अध्याय असल्यामुळे यास पंचविंश ब्राह्मण असेही म्हणतात. यामध्ये उद्गाता नावाच्या ऋत्विजाने वेगवेगळ्या यज्ञांत म्हणावयाच्या सामांची माहिती दिली आहे. सामांचे अनेक प्रकार यात उल्लेखिले असून त्यांवर आधारित असे अनेक सोमयाग सांगितलेले आहेत. यात सामांच्या उत्पत्तिकथा, दैवतकथा आहेत. या ब्राह्मणात व्रात्यस्तोमासंबंधीची माहिती आली आहे.

या ब्राह्मणाशिवाय सामवेदाशी संबंधित असे आठ ब्राह्मणग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांची नावे अशी : षड्विंश ब्राह्मण, समाविधान ब्राह्मण, दैवत ब्राह्मण, मंत्र ब्राह्मण, वंश ब्राह्मण, आर्षेय ब्राह्मण, संदितोपनिषद ब्राह्मण व छंदोग ब्राह्मण. या ब्राह्मणग्रंथांमध्ये यज्ञविषयासंबंधी फारच थोडी माहिती आहे. शिवाय हे ब्राह्मणग्रंथ लहान आहेत. सामवेदाच्या जैमिनी शाखेचे जैमिनीय ब्राह्मण असून त्यात विपुल कथा आलेल्या आहेत. यास तलवकार ब्राह्मण असेही म्हणतात.

गोपथ ब्राह्मण

अथर्ववेदाशी संबंधित असे हे एकमेव ब्राह्मण आहे. हे ब्राह्मण बरेचसे अर्वाचीन समजले जाते. ब्रह्मा या ऋत्विजाने करावयाच्या कर्मान विधान यात आहे. पूर्व गोपथ व उत्तर गोपथ असे याचे दोन भाग आहेत. यात श्रौतयज्ञाबरोबर उपनयनादी संस्कार, पाकयज्ञ, बलिहरण यांसारख्या काही स्मार्त कर्मांचेही विवेचन आहे. अंग, मगध, कुरू, पांचाल इ. देशांची नावे यात आहेत. गोपथ या नावाचा कोणी  एक ऋषी असावा असे मानले जाते. व्युत्पत्तिशास्त्र व भाषाशास्त्र या दृष्टीने हे ब्राह्मण महत्त्वाचे आहे.

संदर्भ : 1. Devasthali, G. V.Religion and Mythology of the Brahmanas, Vol. 1., Poona, 1965.

2. Winternitz, M. History of Indian Literature, Vol. 1, Calcutta, 1927.

३. उपाध्याय, बलदेव, वैदिक साहित्य और संस्कृति, वाराणसी, १९५८.

४. भिडे, वि. वि. ब्राह्मणकालीन समाजदर्शन, पुणे, १९७४.

लेखक: वि. वि. भिडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate