অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भट्टिकाव्य

भट्टिकाव्य

या संस्कृत काव्याचे मूळ नाव रावणवध होय. त्याचा कर्ता भट्टी. त्याच्या नावावरून भट्टिकाव्य म्हणूनच हे काव्य विशेषेकरून ओळखले जाते. ४९५ ते ६४१ ह्या कालखंडात केव्हा तरी भट्टी हा होऊन गेला असावा. वलभीच्या श्रीधरसेनाच्या राजवटीत भट्टीने हे काव्य रचिले, हे दर्शविणारा उल्लेख ह्या काव्याच्या अखेरीस आहे. भट्टिकाव्याचे बावीस सर्ग आणि १,६२५ श्लोक असून ते प्रकीर्ण, अधिकार, प्रसन्न आणि तिडन्त अशा चार कांडांमध्ये विभागले आहे. या काव्यावर सर्वात प्राचीन अशा जयमंगलेसह एकूण तेरा टीका उपलब्ध आहेत. यावरून त्याची लोकप्रियता दिसते. काव्याचा विषय रामचरित्र असून त्यात रामजन्मापासून रामाच्या पट्टभिपेकापर्यतचे प्रसंग आलेले आहेत.

रामकथा हा जरी काव्याचा विषय असला, तरी काव्याचे प्रयोजन व्याकरण आणि काव्यशास्त्र यांच्या नियमांची सविस्तर उदाहरणे देणे हे आहे. ही उदाहरणे कथेमध्येचे गुंफिलेली आहेत. व्याकरणकाव्यशास्त्रांच्या काव्यबाह्य भारामुळे विचार, भावनिर्भरता, शैलीदारपणा आणि कवित्व यांना स्वाभाविकतःच क्षुल्लक स्थान मिळालेले आहे. त्यामुळे उच्च अभिरुचीच्या दृष्टीने काव्याचा दर्जा साधारणच म्हणावा लागेल. स्वतः कवीनेच प्रस्तुत काव्य अल्पमतींसाठी नसून पंडितांसाठीच असल्याचे सरतेशेवटी सूचित केले आहे. असे असले, तरी भट्टीची वाक्यरचन मात्र साधी, सरळ आणि दीर्घसमासविरहित आहे. ह्या काव्याचे १८ ते २२ हे पाच सर्ग जर्मन भाषेत अनुवादिले गेले आहेत (१८३७).

उत्तरकालात भट्टिकाव्याची परंपरा चालविणारी पुढील काव्ये उल्लेखनीय आहेतः भौमकाचे (हा भट्टभीम, भूम वा भूमक ह्या नावांनीही ओळखला जातो.) रावणार्जुनीय, हलायुधाचे कविरहस्य, वासुदेवकवीचे वासुदेवविजय, नारायणकवीने धातुकाव्य आणि हेमचंद्राचे कुमारपालचरित. क्षेमेन्द्राने अशा काव्यांना 'शास्त्रकाव्य' म्हटलेले आहे.

संदर्भः Dasagupta, S. N.; De, S. K. A History of Sanskrit Literature, Classical Period, Calcutta, 1962.

लेखक: अरविंद मंगरूळकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/19/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate