অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भविसयत्तकहा

भविसयत्तकहा

अपभ्रंश भाषेत रचिलेले एक महाकाव्य. भविष्यदत्तकथा हे त्यच्या नावाचे संस्कृत रुप.  धनपाल (दहावे शतक) हा त्याचा कर्ता. ह्या महाकाव्य कथा लौकिक स्वरुपाची आहे. भविसयत्त ( भविष्यदत्त ) हा एक वैश्यपुत्र ह्या महाकाव्याचा नायक. गजपुर येथील धनपालनामक व्यपाऱ्याचा हा पुत्र. आपला सावत्र भाऊ बंधुदत्त ह्याच्याबरोबर तो व्यापारासाठी कंचनद्वीप येथे जाण्यास निघतो. जलप्रवासात त्यांची नौका मार्ग चुकून मैनाकद्वीप येथे येते. बंधुदत्त भविष्यदत्ताला विश्वासघाताने तेथेच एका जंगलात सोडून आपल्या व्यापारी मित्रांबरोबर पुढे निधून जोतो. एकाकी भविष्यदत्त भ्रमंती करीत एका उजाड अशा नगरात येऊन पोहोचतो. तेथील जिनमंदिरात जाऊन भविष्यदत्त चंद्रप्रभजिनाची पुजा करतो. ह्याच नगरात त्याला एक सुंदर स्त्री भेटते. एके काळी समृद्ध असलेले हे शहर कोणा राक्षसाने उजाड करुन टाकल्याची माहिती भविष्यदत्ताला तिच्याकडुन समजते. पुढे हा राक्षस प्रकट होतो व त्या सुंदरीचा भविष्यदत्ताशी विवाह लावुन देतो. त्यांनंतर भविष्यदत्त आपली पत्नी आणि अमाप संपत्ती घेऊन घरी येतो. बंधुदत्ताला मात्र व्यापारात अपयश येऊन विपन्नावस्था प्राप्त झालेली असते. पण भविष्यदत्त त्याच्याशी प्रेमाने वागतो. त्यानंतर संधी मिळताच बंधुदत्त पुन्हा एकदा आपल्या भावाला धोका देतो. ह्या खेपेस तो त्याला सागरतीरावर सोडुन त्याची संपत्ती व पत्नी घेऊन गजपुरास येतो आणि भावजयीशी लग्न करण्याचा घाट घालतो. परंतु भविष्यदत्त एका यक्षाच्या मदतीने गजपुरास येऊन पोहोचतो आणि राजाकडे फिर्याद करुन आपली पत्नी व संपत्ती परत मिळवतो. नंतर गजपुरची राजकन्या सुमित्र आणि भविष्यदत्ताची पत्नी प्राप्त करुन घेण्यासाठी पोदनपूरचा राजा गजपूरच्या राजाशी युद्ध करतो. ह्या युद्धात भविष्यदत्त आपल्या पराक्रंमाने त्या राजाचा पराभव करतो. त्यामुळे गजपुरचा राजा प्रसन्न होऊन भविष्यदत्ताला आपली कन्या देता आणि त्याला युवराज म्हणून घोषित करतो. पुढे गजपूरचा तो राजा होतो. कथेच्या अखेरीस राजा भविष्यदत्ताला विमलबुद्धी नावाचा एक मुनी भेटतो. भविष्यदत्ताला त्याच्याकडून स्वतःचा पूर्वजन्मवृत्तांत समजतो. ह्यानंतर भविष्यदत्त विरक्त होतो आणि आपल्या पुत्रास राज्याभिषेक करुन तपश्चर्येस जातो. भविष्यदत्ताला आयुष्यात जे यश आणि मोठेपण मिळालेले असते, ते त्याच्या आईने केलेल्या श्रुतिपंचमीव्रतामुळे, त्या व्रताचे माहात्म्य ही कथा सांगते.

ह्या महाकाव्याची भाषा प्रसन्न व ओघवती आहे. कवीच्या संस्कृतप्रकृत साहित्याच्या व्यासंगाचा प्रत्यय ह्या महाकाव्यातून येतो. कथेची रचना कवीने कौशल्यपूर्ण रीतीने केलेली असून भविष्यदत्ताचा समुद्रप्रवास , मैनाकव्दीपातील उजाड नगरी इ. वर्णने जिवंत व प्रत्ययकारी आहेत. हेर्मान याकोबी यांनी १९१८ मध्ये रोमन लिपीत तसेच दलाल व गुणे यांनी १९२३ मध्ये देवनागरी लिपीत या ग्रंथाचे संपादन केले आहे.

संदर्भ : १. दलाल, सी. डी.; गुणे, पी. डी. भविसयत्तकहा, १९२३.

२. याकोबी, हेर्मान, भविसयत्तकह, म्यूनशेन, १९१८.

लेखक: ग. वा. तगारे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate