অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतविद्या

भारतविद्या

प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन भारताचे सर्वांगीण अध्ययन करणारी ज्ञानशाखा. भारताबाहेरील अनेक विद्वान प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती वगैरेंचे अध्ययन करीत आले आहेत. त्यामुळे भारतविद्येला क्षीण अशी प्राचीन पूर्वपरंपराही आहे. परंतु यूरोपीय विद्वानांना आधुनिक काळात संस्कृत भाषेच्या अस्तित्वाचे ज्ञान झाल्यानंतरच भारतविद्येचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला, असे मानले जाते. १७८४ मध्ये विख्यात इंग्रज भाषापंडित सर विल्यम जोन्स ह्याने कलकत्ता येथे जगातील पहिल्या एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’ असे नाव त्या वेळी ह्या संस्थेला होते. आधुनिक काळातील भारतविद्येचा हा प्रारंभबिंदू होय. भारतविद्येचा जन्म म्हणजे यूरोपमधील विद्वानांच्या दृष्टीने तर एक उत्तेजक घटना होतीच, परंतु भारतीय लोकांना स्वतःची ओळख पटण्याच्या दृष्टीने देखील ती एक महत्वाची घटना होती, असे विख्यात भारतविद्यावंत रा. ना. दांडेकर म्हणतात, ते ऐतिहासिक दृष्ट्या सत्यच आहे. अशा तऱ्हेच्या ह्या विद्येचा अभ्यास भारतात ब्रिटिशांची राजवट स्थापन झाल्यापासून सुरू झाला आहे.

यूरोपीय भाषा व संस्कृत भाषा ह्यांचे एक मोठे कुल असून ते इंडो यूरोपीय असल्याचा शोध लागला. हा शोध विल्यम जोन्सच्या संस्कृताध्ययनामुळे लागला. जगाचा व भारताचा सांस्कृतिक विनिमय प्राचीन व प्रागैतिहासिक काळापासून होत होता, ह्याचे ज्ञान भारतविद्येच्या साधनेमुळे झाले. भारतीय प्राचीन विद्यांचा आणि जगातील प्राचीन विद्यांचा परस्परविनिमय झालेला आहे, ही गोष्ट उघडकीस आली. उदा., दशांकपद्धतीचे अंकगणित व शून्य ही संख्या ही जगाला भारताची अद्वितीय देणगी, हे लक्षात आले आणि प्राचीन बॅबिलनची ज्योतिषविद्या ही ग्रीकांतर्फे भारताला मिळाली, हेही स्पष्ट झाले. ईशान्य, पूर्व आणि अतिपूर्व त्याचप्रमाणे मध्य आशिया आणि पूर्व तुर्कस्तान येथपर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार होऊन तेथील संस्कृतींवर भारतीय संस्कृतीची छाप पडली. पॅसिफिक महासागरातील इंडोनेशिया आणि बाली बेटे येथपर्यंत प्राचीन हिंदू धर्म आणि संस्कृती पसरली, ह्याचाही निर्णय झाला [⟶ बृहद्‌भारत]. ब्राह्मी व खरोष्टी लिपींचे वाचन होऊन लिपींचा इतिहास सिद्ध झाला आणि मौर्यकालापासून ब्रिटिश कालापर्यंतचा सर्वांगीण इतिहास सुसंगत रीतीने मांडला गेला.

पाणिनीय व्याकरणाचे अध्ययन झाल्यामुळे जागतिक भाषाशास्त्रालाही तात्त्विक बैठक मिळाली आणि तुलनात्मक धर्मविद्येची बौद्ध, जैन धर्मांच्या अध्ययनाने विशेष प्रगती झाली.

या क्षेत्रात झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मोजक्या घटनांचा प्रारंभीच निर्देश करणे इष्ट ठरेल. उत्खननामुळे लागलेला सिंधू संस्कृतीचा शोध ही या क्षेत्रातील दूरगामी परिणाम करणारी अशी अत्यंत महत्त्वाची घटना होय. पुण्याच्या भांडारकर संशोधन मंदिराने प्रसिद्ध केलेली महाभारताची चिकित्सक आवृत्ती भारतविद्येच्या क्षेत्रात नवे युग निर्माण करणारी आहे, असे मानले जाते. बडोद्याच्या ओरिएंटल इन्स्टिट्यूट या संस्थेने रामायणाच्या चिकित्सक आवृत्तीचे असेच महत्त्वपूर्ण कार्य १९५१ साली सुरू करून आता पूर्ण केले आहे. ऑल इंडिया काशिराज ट्रस्ट ऑफ वाराणसी, सरस्वती भवन ऑफ वाराणसी आणि मिथिला इन्स्टिट्यूट ऑफ दरभंगा या संस्थांनी वेगवेगळ्या पुराणांच्या चिकित्सक आवृत्त्या काढण्याचे प्रयत्न केले आहेत. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये चालू असलेले ऐतिहासिक तत्त्वांवरील संस्कृत शब्दकोशाचे कार्य असेच युगप्रवर्तक ठरणारे आहे. दीर्घकालपर्यंत लुप्त झालेल्या कौटिलीय अर्थशास्त्राचा व भासाच्या नाटकांचा शोध ह्यादेखील अत्यंत महत्त्वाच्या घटना होत (१९०४; १९०९).

प्राच्यविद्येची शाखा

एका दृष्टीने भारतविद्या हा व्यापक अशा प्राच्यविद्येचाच एक भाग आहे. पूर्व गोलार्धातील देशांच्या संस्कृतींचे अध्ययन करणारी ज्ञानशाखा म्हणजे प्राच्यविद्या होय. आधुनिक काळात पाश्चात्त्य जगाचा पूर्व गोलार्धाशी संबंध आल्यानंतर त्या गोलार्धातील संस्कृतींच्या विविध अंगांचे अध्ययन सुरू झाले. भारताविषयीचे अध्ययन हा या व्यापक अध्ययनाचाच एक भाग ठरत असल्यामुळे भारतविद्या ही प्राच्यविद्येमध्ये अंतर्भूत होते. यूरोपमधील अनेक देशांत आणि अमेरिकेतही अनेक ठिकाणी प्राच्यविद्येचा एक भाग म्हणूनच तिचे अध्यापन होत असते. अर्थात एक स्वतंत्र विषय म्हणूनही जगात अनेक ठिकाणी भारतविद्येचे अध्ययन-अध्यापन चालू आहेच.

पूर्वपरंपरा

प्राचीन काळापासूनच बाह्य जगातील असंख्य लोकांना भारताबद्दल विलक्षण आकर्षण वाटत आले आहे. त्यांपैकी अनेक जणांनी भारताला प्रत्यक्ष भेटीही दिल्या आहेत. कधी व्यापारासाठी, तर कधी धार्मिक हेतूंनी, कधी प्रदेश जिंकण्यासाठी, कधी अध्ययनासाठी, तर कधी आणखी कुठल्या तरी हेतूंनी या लोकांनी शब्दबद्ध केलेले अनुभव प्राचीन भारताचे आकलन होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, तसेच ते भारतविद्येची पूर्वपरंपराही सूचित करणारे आहेत.

ग्रीक, रोमन वगैरे लेखकांनी भारताविषयी दिलेली माहिती आर्. सी. मजुमदार ह्यांनी आपल्या द क्लासिकल अकाउंट्स ऑफ इंडिया (१९६०) या पुस्तकात ग्रथित केली आहे.  हीरॉडोटस (इ. स. पू. पाचवे शतक), मीगॅस्थिनीज (इ. स. पू. ४ थे व ३ रे शतक),  थोरला प्लिनी (इ.स.चे पहिले शतक),  आरिआनॉस (सु. ९५–सु. १७५), जस्टिन (इ.स. चे २ रे/ ३ रे शतक), स्ट्रॅबो,  प्लूटार्क,  एनिअस क्विन्टस, फ्रांटायनस (इ. स. पहिले शतक), डायोडोरस सिक्युलस (इ. स. पू. पहिले शतक) आदींच्या लेखनाचा त्यांनी आढावा घेतला आहे.डॉ. मॅक्-क्रिंडल यांनीही ग्रीक व रोमन लेखकांच्या भारतविषयक लेखनाचा असाच आढावा घेतला आहे.

ॲसिरियन सम्राट सेनॅकरिब (इ. स. पू. ७०५–६८०) याने भारतीय कापसाचा आणि हीरॉडोटस या ग्रीक लेखकाने भारतीय कापूस व साखर यांचा निर्देश केला आहे. अलेक्झांडरबरोबर (इ. स. पू. ४ थे शतक) भारतात आलेल्या अनेकजणांनी भारताविषयी माहिती लिहून ठेवली आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याकडे दूत म्हणून आलेल्या मीगॅस्थिनीज नावाच्या ग्रीक लेखकाने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता. डॉ. इ. ए. श्वॅनबेक ह्यांनी त्याचे काही अंश १८४६ साली प्रसिद्ध केले होते. इ. स. च्या सहाव्या शतकातील कॉस्मास इंडिकोप्लूस्टीझ याने आपल्या तोपोग्राफीया क्रिस्तिआनात (इं. शी. ख्रिश्चन टोपोग्राफी) मलबार, श्रीलंका इ. ठिकाणच्या ख्रिस्ती प्रार्थनामंदिरांची माहिती दिली आहे. ईजिप्तमधील एका अनामिक ग्रीकाने लिहिलेले पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी (इं. शी.) हे पुस्तक प्राचीन भारताचा इतिहास व व्यापार यांच्या अध्ययनाच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. हे पुस्तक प्रथम १३३३ साली प्रकाशित झाले. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत त्याची इंग्रजी, जर्मन व इटालियन भाषांतरे झाली.

ग्रीकांप्रमाणेच अरबी प्रवाशांनीही भारताविषयी बरेच लिहून ठेवले आहे. ६६२ च्या सुमारास सिव्हेरस सिबॉख्त या सीरिअन विद्वानाने हिंदूंच्या संख्या वगैरे उपलब्धींविषयी गौरवाने लिहिले आहे. नवव्या शतकात दशांश पद्धती, औषधिविज्ञान, काही कथा इ. गोष्टी भारतातून अरबांकडे गेल्या. सुलैमान सौदागर या अरब प्रवाशाने नवव्या शतकात लिहून ठेवलेला भारताविषयीचा सिलसिलत-उत-तवारीख हा वृत्तांत लांगलेस ह्याने १८११ साली प्रथम प्रसिद्ध केला. इब्न-अल्-नदिम नावाच्या लेखकाने आपल्या विख्यात अल्-फिहरिश्त (९८८) या पुस्तकात संस्कृत ग्रंथांचे अरबीत भाषांतर करणाऱ्या लेखकांची नावे दिली आहेत. अल्-मसूदी या प्रवाशाला अरबांचा हीरॉडोटस असे म्हणतात.  अल्-बीरूनी (९७३–१०४८) या विख्यात लेखकाने अनेक संस्कृत ग्रंथांचे अरबीत भाषांतर केले. त्याचा इंडिका हा ग्रंथही प्रसिद्ध आहे. इब्न बतूता (१३०४–१३६९) ह्याचे रेहला हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. याखेरीज याकुबी, इब्न रूश्द, इब्नुल फकीह, अब्न झैद सैरफी, अल्-कलकशंदी इत्यादींचे लेखनही उपयुक्त आहे.

भारताच्या इतिहासाचे लेखन करताना चिनी प्रवाशांनी शब्दबद्ध केलेल्या माहितीचा नेहमी आधार घेतला जातो; यावरून त्यांच्या लेखनाचे महत्त्व स्पष्ट होते. तिसऱ्या शतकापासून चिनी विद्वान बौद्ध धर्माच्या अध्ययनासाठी भारतात येऊ लागले. वेगवेगळ्या कालखंडांत किमान १८७ चिनी यात्रेकरूंनी भारताला भेट दिली, असे दिसते. फाहियान हा ३९९ मध्ये येऊन ४१४ मध्ये परतला. हूएनत्संग हा सर्वांत अधिक प्रसिद्ध प्रवासी ६२९ मध्ये येऊन ६४५ मध्ये परतला. इत्सिंग (६३४–७१३) हा ६७३ मध्ये येऊन ६९५ मध्ये परतला. इस्लामच्या आक्रमणानंतर चिनी प्रवाशांची संख्या कमी झाली आणि अकराव्या शतकानंतर प्रामुख्याने व्यापारी हेतूने प्रवास चालू झाला. जपानमध्ये ५५५ मध्ये संस्कृत व बौद्ध धर्म यांच्या अध्ययनाला प्रारंभ झाला. १२३४–१२३६ या काळात बिहारमध्ये असलेल्या धर्मस्वामी नावाच्या तिबेटी भिक्षूने तत्कालीन बिहारची माहिती लिहून ठेवली आहे.

आधुनिक काळात यूरोपीय लोकांनी भारतविद्येचा पाया घालण्यापूर्वीच अनेक यूरोपीयांनी भारतविषयक अध्ययनाचा प्रयत्न केला होता. भारतातील सेंट टॉमस ह्याच्या समाधीला भेट देण्यासाठी ॲल्फ्रेड (८४९–९०१) नावाच्या इंग्रज राजाने दूत पाठविला होता, असे द अँग्लो सॅक्सन-क्रॉनिकलवरून समजते. तेराव्या शतकाच्या शेवटी भारतात आलेल्या  मार्को पोलो या व्हेनिसच्या जव्हेऱ्याने भारतीय रत्नांची माहिती दिली आहे. चौदाव्या शतकात अनेक ख्रिस्ती धर्मप्रचारक, तसेच हिरे, वस्त्रे व मसाले यांचे व्यापारीही भारतात आले. पंधराव्या शतकात वास्को द गामा हा विख्यात असा पोर्तुगीज प्रवासी भारतात आला. सतराव्या शतकात व्यापारी, डॉक्टर, धर्मप्रचारक, सैनिक इ. अनेक प्रकारचे लोक आले. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज इ.च्या अनेक कंपन्या स्थापन झाल्या. या सर्वांची कागदपत्रे भारतीय इतिहासाच्या अध्ययनाला अतिशय उपयुक्त आहेत.

फादर स्टीफन्स (१५४९–१६१९) हा एखाद्या भारतीय भाषेचा सखोल अभ्यास करणारा पहिला यूरोपियन होता. गोव्यात धर्मोपदेशक म्हणून त्याने अनेक वर्षे घालविली. पाद्री एस्तवाँ ह्या नावानेही तो ओळखला जातो. त्याने कोकणीचा अभ्यास केला; तिच्यावर उत्तम प्रभुत्व मिळविले. Arte da Lingoa Canarim हे त्याने लिहिलेले कोकणी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध आहे. दे नोबीली (१५७७–१६५६) या इटालियन गृहस्थाने यूरोपमध्ये पहिल्यांदा बौद्ध वाङ्‌मयाकडे लक्ष वळविले. इटलीच्याच फिलीप्पो सास्सेती या विद्वानाने (१५८१ ते १५८८ या काळात तो गोव्यात होता) संस्कृत व इटालियन यांच्यातील भाषाशास्त्रीय साम्य ओळखले. जाकोमो फेनीशीओ (मृ. १६३२) या दुसऱ्या एका इटालियन गृहस्थाने पुराणांतून व्यक्त झालेल्या भारतीय परंपरेचे विवेचन केले. अब्राहम रॉजेरिअस या डच गृहस्थाने १६५१ साली दक्षिण भारतातील हिंदू धर्माविषयी विस्तृत माहिती देणारे पुस्तक लिहिले. भर्तृहरीच्या शतकांचाही त्यानेच पहिल्यांदा यूरोपला परिचय करून दिला. १७१८ साली फ्रान्समधील बीन्याँ या ग्रंथपालाने अनेक संस्कृत हस्तलिखिते खरेदी करून त्यांचा संग्रह केला. काल्मेत आणि बेश्‌ची यांनी तो वाढविला. पॉन या धर्मगुरूने लॅटिनमध्ये संस्कृतचे पहिले व्याकरण लिहिले, फ्रान्सला अनेक हस्तलिखिते पाठविली आणि अमरकोशाचे भाषांतर केले. कर्दो या ख्रिस्ती धर्मगुरूने १७६६ च्या सुमारास संस्कृत, ग्रीक व लॅटिन भाषांतील साम्य दाखविले. आंक्तील-द्यूपेराँ (१७३१–१८०५) ह्या फ्रेंच प्राच्यविद्याविशारदाने १७५४ च्या सुमारास काही उपनिषदांचे लॅटिनमध्ये भाषांतर केले. अवेस्ता (१७७१) आणि Legislation Orientale (१७७८) हे त्याचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ आहेत. अशा रीतीने १७८४ साली एशियाटिक सोसायटीच्या माध्यमातून भारतविद्येचा पाया घातला जाण्यापूर्वी त्या दिशेने अनेक प्रयत्न चालू होते. अर्थात ते सर्व प्रयत्न केवळ व्यक्तिगत पातळीवरून चाललेले असल्यामुळे त्यांचे स्वरूप फुटकळच होते.

विविध संस्था

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्था सध्या भारतविद्येच्या क्षेत्रात विविध प्रकारचे कार्य करीत आहेत. अभ्यासकांची अधिवेशने, चर्चासत्रे, पंडितपरिषदा, प्रकाशने, ग्रंथालयांची निर्मिती, हस्तलिखितांचे संशोधन, उत्खनन इ. प्रकारची कार्ये केली जात आहेत. इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएण्टॅलिस्ट्स, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ संस्कृत स्टडीज, विश्वसंस्कृत संमेलन आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतात. ऑल इंडिया ओरिएण्टल कॉन्फरन्स, द इंडियन हिस्टरी काँग्रेस, इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस, लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया, नुमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय संस्कृत संस्थान इ. संस्था अखिल भारतीय पातळीवरून काम करतात.

भारतातील केंद्रे

भारताच्या विविध राज्यांतून काम करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत. पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (१९१७), डेक्कन कॉलेज, भारत इतिहास संशोधक मंडळ (१९१०), वैदिक संशोधन मंडळ, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, आनंदाश्रम (१८८८), वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे विद्यापीठांतर्गत प्रगत अध्ययन केंद्र इ. संस्था कार्य करतात. एशियाटिक सोसायटी ऑफ बाँबे, भारतीय विद्याभवन (मुंबई, १९३८), जैन संस्कृतिसंरक्षक संघ (सोलापूर), प्राज्ञपाठशाळा मंडळ (वाई), राजवाडे इतिहास संशोधक मंडळ (धुळे) इ. इतर अनेक संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहेत. ओरिएण्टल रिसर्च इन्स्टिट्यूट (१८९१) ही संस्था म्हैसूरमध्ये काम करते, तिरुपती येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठ (१९६२) आणि श्रीवेंकटेश्वर ओरिएण्टल रिसर्च इन्स्टिट्यूट (१९३९) या संस्था कार्यरत आहेत. हैदराबाद येथील ओरिएण्टल पब्लिकेशन ब्यूरो अँड दैरत-उल-मारिफ (१८८६) आणि उस्मानिया विद्यापीठांतर्गत संस्कृत अकादमी (१९५४), चित्तूर येथील संस्कृत भाषा प्रचारिणी सभा (१९४५) इ. संस्था आंध्रमध्ये आहेत. मद्रासमध्ये अड्यार लायब्ररी अँड रिसर्च सेंटर (१८८६) आणि गव्हर्नमेंट ओरिएण्टल मॅन्यूस्क्रिप्ट्स लायब्ररी या संस्था आहेत. पाँडिचेरी येथे फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ इंडॉलॉजी (१९५५) आणि अरविंद आश्रम यांचे काम चालते. त्रिवेंद्रम येथील केरळ विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ ओरिएण्टल स्टडीज आणि ओरिएण्टल मॅन्यूस्क्रिप्ट्स लायब्ररी या दोन संस्था आहेत. शिवाय, केरळमध्ये त्रिपुनितुर येथे संस्कृत महाविद्यालय आहे. दिल्लीमध्ये अखिल भारतीय संस्कृत साहित्य संमेलन, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (१८८१), इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स, भारतीय विद्या संस्थान (१९५९), इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन कल्चर (१९३४) इ. संस्थांचे काम चालते. उत्तर प्रदेशात अलाहाबाद येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, वृंदावन येथे इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएण्टल फिलॉसफी (१९४९) आणि लखनौ येथे अखिल भारतीय संस्कृत परिषद (१९५१) आहे. वाराणसी येथे बनारस हिंदू विद्यापीठ, ऑल इंडिया काशिराज ट्रस्ट (१९५५), भारतीय ज्ञानपीठ (१९४४), कॉलेज ऑफ इंडॉलॉजी, चौखंबा संस्कृत सेरीज (१८९२), प्राकृत टेक्स्ट सोसायटी इ. अनेक संस्था काम करतात. नलबारी संस्कृत कॉलेज (१९३८) आणि कामरूप संस्कृत संजीवनी सभा (नलबारी पी. ओ. १९१३) या आसाममधील संस्था होत. सुप्रसिद्ध एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल (१७८४), रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर, कलकत्ता संस्कृत कॉलेज इ.संस्था कलकत्त्यामध्ये आहेत. बिहार रिसर्च सोसायटी (पाटणा, १९१५), रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ प्राकृत, जैनॉलॉजी अँड अहिंसा (मुझफरपूर, १९५५), मिथिला इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट-ग्रॅज्युएट स्टडीज अँड रिसर्च इन संस्कृत लर्निंग (दरभंगा, १९५१), जैन सिद्धांत भवन (अर, १९०६) इ. संस्था बिहारातील होत. जम्मू येथे रघुवीर संस्कृत कॉलेज अँड लायब्ररी आहे, तर हिमाचल प्रदेशात संस्कृत शोध संस्थान (सिमला) आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडिक स्टडिज (कुरुक्षेत्र) आणि विश्वेश्वरानंद वैदिक रिसर्च इन्स्टिट्यूट (होशियारपूर, १९०३) या संस्था पंजाबमध्ये असून कालिदासाच्या नावाचे भारतातील एकमेव अध्यासन पंजाब विद्यापीठात (चंदीगढ) आहे. राजस्थानमध्ये डायरेक्टोरेट ऑफ संस्कृत एज्यूकेशन ही विशेष संस्था असून राजस्थान सरकार संस्कृत अकादमी स्थापन करीत आहे. शिवाय, जोधपूर येथे राजस्थान ओरिएण्टल रिसर्च इन्स्टिट्यूट (१९५५) आहे. गुजराथमध्ये ओरिएण्टल इन्स्टिट्यूट (बडोदा, १९१५), प्राकृत टेक्स्ट सोसायटी (अहमदाबाद) आणि श्री द्वारकाधीश संस्कृत अकॅडेमी अँड इंडॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (द्वारका, १९४७) या संस्था आहेत. मध्य प्रदेशात उज्जैन येथे सिंधिया ओरिएण्टल इन्स्टिट्यूट (१९३१) आहे.

भारताबाहेरचे कार्य

यूरोपमधील संस्कृतचे पहिले अध्यासन कॉलेज द फ्रांस या ठिकाणी सुरू झाले आणि १८१४ साली आंत्वान शेझी (१७७३–१८३२) ह्याची, तर १८३२ साली यूजीन ब्यूर्‌नुफ (१८०१–१८५२) याची त्यावर नेमणूक झाली. नंतरच्या काळात यूरोपमध्ये अनेक ठिकाणी संस्कृत वगैरेंची सोय झाली, परंतु एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फ्रान्स हेच या अध्ययनाचे मुख्य केंद्र राहिले. १८५० ते १९२० या भारतविद्येच्या दृष्टीने गौरवशाली अशा कालखंडात अध्ययनामध्ये व्यापक व सर्वांगीण प्रगती झाली आणि या क्षेत्रातील नेतृत्व जर्मनीकडे आले. जर्मनी आणि भारतविद्या यांचे तर एक अतूट नातेच निर्माण झाले आहे. १८०० च्या सुमारास जर्मनीमध्ये भारतविद्येचे अध्ययन सुरू झाले. बॉन विद्यापीठात  आउगुस्ट व्हिल्हेल्म फोन श्लेगेल (१७६७–१८४५) ह्याला १८१८ साली आणि  फ्रांट्स बोप (१७९१–१८६७) ह्याला बर्लिनमध्ये १८२५ साली अध्यासन मिळाले. श्लेगेल ह्याने Indische Bibliothek नावाचे एक जर्नल काढले होते (१८२३–३०). भगवद्‌गीतेचे लॅटिन भाषांतरासह त्याने संपादन केले. तसेच रामायणही संपादिले. बोप ह्याच्या व्याकरण, कोश, महाभारत इ. वरील कामामुळे यूरोपमध्ये संस्कृतचा प्रचार झाला.  माक्स म्यूलर (१८२३–१९००) ह्याने ॠग्वेदाच्या प्रकाशनाचे केलेले कार्य (१८४९–१८७४) ही एक महान उपलब्धी होती. रूडोल्फ फोन रोट (१८२१–१८९५) आणि ओटो फोन बटलिंक (१८१५–१९०४) यांनी १८५२ ते १८७५ या काळात प्रसिद्ध केलेली सेंट पीटर्झबर्ग डिक्शनरी हेही एक अद्वितीय कार्य मानले जाते. वेबर,  हेर्मान याकोबी (१८७०–१९३७), ल्यूड्यर्स, गेल्डनर, पिशेल, ग्रासमान, आल्फ्रेट लूटव्हिख,  फ्रांट्स कीलहोर्न (१८४०–१९०८) इ. अनेक अभ्यासकांनी जर्मनीमधील भारतविद्येचे क्षेत्र समृद्ध केले आहे. दुसऱ्या महायुद्धात अनेक संस्था व ग्रंथालये नष्ट झाली होती. परंतु आता पुन्हा जोमाने भारतविद्येचे अध्ययन सुरू झाले आहे. फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीमध्ये २० विद्यापीठांत संस्कृतचे अध्यापन चालते. जर्मन डेमॉक्रॅटिक रिपब्लिकमध्येही अनेक केंद्रांतून भारतविद्येचे अध्ययन चालू आहे. तेथे वॉल्टर रूबेन ह्याने द्वंद्वात्मक आणि ऐतिहासिक भौतिकवादाला भारतविद्येमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे.

अमेरिकेतील काही विद्यापीठांतून भारतविद्येचे अध्ययन चालते. तसेच, भारतविद्येच्या वा दक्षिण व आग्नेय आशिया यांच्या अभ्यासाच्या अंतर्गत संस्कृतचे अध्ययन चालते. तेथील अध्ययनात प्रारंभी संस्कृत भाषेतील विचारांपेक्षा भाषेकडेच अधिक लक्ष दिले जात होते. तेथे हल्ली भारतविद्येतील विविध शाखांच्या तुलनात्मक अध्ययनाला महत्त्व आले आहे. उदा., तेथे भाषाशास्त्रज्ञ हा समाजशास्त्रीय अध्ययनही करीत असतो, तर समाजशास्त्रज्ञ हा भाषाशास्त्रीय अध्ययनही करीत असतो. रशियामध्ये सु. शंभर वर्षांपूर्वी संस्कृत अध्ययनास प्रारंभ झाला. आय्. पी. मिनायेव्ह, एस्. एफ्. ओल्डेनबुर्ख (१८६३– १९३४) इत्यादींनी या क्षेत्रात महत्त्वाचे काम केले आहे. तेथील भारतविद्या विविध टप्प्यांतून उत्क्रांत झाली आहे. एकोणिसाव्या शतकात भारतविद्येने दृढ असे भाषाशास्त्रीय अधिष्ठान निर्माण केले होते. १९१७ ते १९३५ या कालखंडात मार्क्सवाद-लेनिनवाद हे भारतविषयक समस्यांवरील संशोधनाचे पद्धतिशास्त्रीय अधिष्ठान बनले. १९३५–१९५५ या काळात भारतातील ऐतिहासिक प्रक्रियेविषयीच्या संशोधनात बरीच सुधारणा झाली.

ऑस्ट्रियात सु. १०० वर्षांपूर्वी योहान गेओर्ख ब्यूलर (१८३७–९८) याने भारतविद्येचा पाया घातला. त्यानेच व्हिएन्ना विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएण्टल स्टडीज या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतूनच १९५५ साली इन्स्टिट्यूट ऑफ इंडॉलॉजी ही स्वतंत्र संस्था उदयास आली. या शतकाच्या प्रारंभापासून इन्सब्रुक आणि ग्रात्स या विद्यापीठांतूनही भारतविद्या शिकवली जाते. ऑस्ट्रियामधील सध्याची भारतविद्येची परंपरा प्रा. फ्राउवॉल्नर याने निर्माण केली आहे. सध्या अनेक विद्यापीठांतून इंडो-यूरोपीय आणि तुलनात्मक भाषाशास्त्र यांच्या अंतर्गत एक भाषा म्हणून संस्कृत शिकविली जाते. इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड, केंब्रिज, एडिंबरो आणि लंडन या चार विद्यापीठांतून संस्कृत विषयात पदवी घेता येते. तसेच, तेथे भारतविषयक इतर विषयांचेही अध्ययन चालते. चेकोस्लोव्हाकियात भारतविद्येची परंपरा जुनी आहे. प्राग विद्यापीठातील आउगुस्ट स्लायखर (१८२१–६८), आल्फ्रेट लूटव्हिख (१८३२ –१९१२) आणि जोसेफ झुबाती (१८८५–१९३१) यांनी या परंपरेचा पाया घातला. एकोणिसाव्या शतकात प्रामुख्याने इंडो-यूरोपियन भाषांच्या तुलनात्मक अभ्यासापुरतेच भारतविद्येचे क्षेत्र मर्यादित होते.  मॉरिस विंटरनिट्स (१८६३–१९३७), व्हिंट्सेंट्स लेस्नी (१८८२–१९५३) आणि ओटाकार परटोल्ड (१८८४–१९६५) यांनी ते विस्तृत केले. यूगोस्लाव्हियामध्ये १८७४ पासून संस्कृत शिकविण्याची सोय आहे. झाग्रेब विद्यापीठात १९५९ पासून भारतविद्या शिकविण्याची सोय करण्यात आली आहे. सध्या तेथे हिंदी-क्रेटियन शब्दकोशाचे काम चालू आहे. वॉर्सा येथील वेलेंती स्कोरोकोड माजेवस्की हा पोलंडमधील पहिला संस्कृतज्ञ एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेला. त्याने संस्कृत व पोलिश शब्दांतील साम्याचा अभ्यास केला आणि संस्कृत व्याकरण, साहित्य इ. विषयांवर लेखन केले. १८७२ साली रेव्ह. फ्रान्सिस मालिनॉव्हस्की याने पोलिश भाषेतील पहिले संस्कृत व्याकरण लिहिले. बेर्नहार्ट यूल्ख (१८२५–८६), यान बोदवँ द कोर्तनी, यान रॉझ्व्हाडॉव्ह्‌स्की, यान हानुस्झ, लीऑन मान्‌कोव्हस्की आणि विशेषतः विसाव्या शतकाच्या प्रारंभीचे आंजेइ गॉरोन्स्की हे पोलंडमधील प्रमुख संस्कृत-अभ्यासक होत. स्टॅनिस्लस शेयर हा वॉर्सा येथील भारतविद्याविषयक अध्ययनाचा संघटक होता. सध्या क्रेको आणि वॉर्सा येथील विद्यापीठांतून भारतविद्या या विषयात एम्. ए. ची पदवी घेता येते. संस्कृतची सोय आणखी काही विद्यापीठांतूनही आहे. पोलंडमधील प्राच्यविद्यावंतांचे अधिवेशन बहुधा दरवर्षी भरते. डेव्हिड रॉस्‌न्याइ याने सतराव्या शतकात पंचतंत्राचे एका तुर्की अनुवादावरून हंगेरियन भाषेत भाषांतर केले होते. तेच त्या भाषेतील संस्कृत ग्रंथाचे पहिले भाषांतर होय. हंगेरीमध्ये अठराव्या शतकात भारतविद्येच्या अध्ययनास प्रारंभ झाला. तेथे भारतविद्येचे स्वतंत्र अध्यासन नाही. परंतु बूडापेस्ट विद्यापीठात १८७३ पासून इंडो-यूरोपियन भाषाशास्त्राचा विभाग आहे. ऑरेल स्टाइन (१८६२–१९४३) हा हंगेरीत जन्मलेला भारतविद्यावंत. डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फिलॉलॉजी आहे. फिनलंडमधील हेल्‌सिंकी विद्यापीठात १८३५ पासून संस्कृत भाषा शिकविली जात आहे. स्वीडनमधील स्टॉकहोम, गॉथनबर्ग आणि अप्साला या तीन विद्यापीठांतून भारतविद्येचे अध्ययन चालते. त्यांखेरीज स्टॉकहोम आणि अप्साला येथून स्वीडिश भाषेत, प्राच्यविद्येला वाहिलेली प्रत्येकी एक शोधपत्रिका प्रसिद्ध होते. २८ मार्च १९८१ रोजी फिलाडेल्फिया म्यूझियम ऑफ आर्ट या ठिकाणी संयोजिलेले ‘द मॅनिफेस्टेशन्स ऑफ शिव’ या विषयावरील शिल्पांचे व चित्रांचे प्रदर्शन अत्यंत गाजले. नेदर्लंड्समध्ये वेद, धर्म, संस्कृत व्याकरण व कलेतिहास या विषयांचा प्रामुख्याने अभ्यास होतो. संशोधन, अध्यापन, भाषांतरे, प्रकाशने इत्यादींसाठी संस्था आहेत. भारतविद्यावंतांची दरवर्षी परिषद होते. तिचे अधिवेशन एक वर्ष लायडन येथे आणि एक वर्ष उत्रेक येथे भरते. बेल्जियममध्ये १८४१ पासून संस्कृत अध्यापनाची परंपरा असून तेथे तीन विद्यापीठांतून संस्कृत शिकविले जाते. प्रा. ए. शार्प हे कालिदासविषयक कोश तयार करीत असून त्याचे दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत. इटलीमध्ये भारतविद्येच्या सर्व शाखांमध्ये संशोधन चालू आहे. तेथे सध्या पहिल्या संस्कृत-इटालियन शब्दकोशाचे काम चालू आहे. रूमानियामधील बूकारेस्ट विद्यापीठात आणि स्पेनमधील माद्रिद आणि सालामांका या विद्यापीठांतून संस्कृत अध्ययनाची सोय आहे. कॅनडामध्ये टोरॉटो वगैरे सहा-सात विद्यापीठांतून संस्कृत अध्यापन चालते. तेथे कॅनॅडियन असोशिएशन ऑफ संस्कृत अँड रिलेटेड स्टडीज ही संस्था काम करते. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृतचे अध्यापन व संशोधन चालते.

जपानमधून १८८० च्या सुमारास अनेकजणांना बौद्ध धर्माच्या अध्ययनासाठी यूरोपमध्ये पाठविण्यात आले होते. अशा रीतीने जपानमधील भारतविद्येच्या आधुनिक काळातील अध्ययनाला यूरोपमध्ये सुरुवात झाली. जपानमधील संस्कृतचे पहिले अध्यासन टोकिओच्या इम्पीरियल विद्यापीठात १९०१ साली सुरू झाले. ताकाकुसू हे पहिले प्राध्यापक होते. आता जपानमधील अनेक विद्यापीठांतून भारतविद्येचे अध्ययन चालू आहे. थायलंडच्या सर्व विद्यापीठांतून व महाविद्यालयांतून संस्कृत व पाली शिकविण्याची सोय आहे. तेथे या भाषांचा थाई भाषेबरोबरचा तुलनात्मक अभ्यासही चालतो. तेथील दोन विद्यापीठांतून पदव्युत्तर संस्कृतची सोय आहे. मंगोलियामध्ये प्राचीन काळापासून भारतविद्येचे अध्ययन चालू आहे. प्राचीन मंगोल साहित्यात अनेक संस्कृत शब्द आढळतात. तेराव्या शतकातच ते मंगोल शब्दांशी एकरूप होऊन गेले होते. तेरा-चौदाव्या शतकांत अनेक संस्कृत ग्रंथांचे मंगोल भाषेत भाषांतर झाले. मुळातून नष्ट झालेले काही संस्कृत ग्रंथ भाषांतराच्या स्वरूपात मंगोलियात मिळण्याची शक्यता आहे. बीजिंग विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस ही चीनमधील संस्कृत संशोधनकार्याची दोन प्रमुख केंद्रे होत. श्रीलंकेत तीन विद्यापीठांतून संस्कृत अध्यापनाची सोय आहे. नेपाळमध्ये प्राचीन व मध्य युगांत बहुसंख्य शिलालेख व हस्तलिखिते संस्कृतमधूनच असत. तेथे संस्कृत अध्ययनासाठी खास सोयी आहेत.

ब्राझीलमधील साऊँ पॉउलू या विद्यापीठात ११ ते १३ फेब्रुवारी १९८० या काळात लॅटिन अमेरिकेतील संस्कृतज्ञांची पहिली परिषद भरली होती. तेव्हापासून लॅटिन अमेरिकन असोशिएशन ऑफ संस्कृत स्कॉलर्स ही संस्था कार्यरत झाली आहे. मेक्सिको, युरग्वाय, अर्जेंटिना, पेरू, ब्राझील इ. देशांच्या विद्यापीठांतील संस्कृतज्ञांचा अंतर्भाव त्या संस्थेत आहे. मेक्सिकोमध्ये १५ ते १९ फेब्रुवारी १९८२ या काळात संस्कृत भाषेवरील पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

विविध क्षेत्रांतील कार्याचा आढावा

भारतविद्येच्या क्षेत्रात दीर्घकाळपर्यंत जे प्रचंड कार्य झाले आहे, त्याचा एक अत्यंत स्थूल असा आढावा घेणे, प्रस्तुत नोंदीचे स्वरूप आहे. दीर्घकालपर्यंत लुप्त झालेल्या कौटिलीय अर्थशास्त्राचा त्याचप्रमाणे भासाच्या नाटकांचा शोध यादेखील अत्यंत महत्त्वाच्या घटना होत. भारतविद्येच्या क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणारे जे लेखन वेळोवेळी प्रकाशित झाले आहे, त्यांत दोन ग्रंथांचा विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. रिव्ह्यू ऑफ इंडॉलॉजिकल रिसर्च इन लास्ट सेव्हन्टीफाइव्ह यीयर्स हा चित्रावशास्त्रींच्या अभिनंदनाप्रीत्यर्थ पी. जे. चिन्मुळगुंद आणि वा. वि. मिराशी यांनी संपादित केलेला ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. या ग्रंथात सु. मं. कत्रे, जी. व्ही. देवस्थळी, एम्. जी. माइणकर, अ. मा. घाटगे, भगीरथ मिश्र, शं. गो. तुळपुळे, सी. आर्. शंकरन्, एस्. आर. बालसुब्रह्मण्यम्, शां. भा. देव, पी. एम्. जोशी, व्ही. एस्. अग्रवाल, ह. धी. सांकलिया, व्ही. एन्. मिश्र, एम्. एन्. देशपांडे, एम्. एस्. मते, वा. वि. मिराशी, जे. एन्. बॅनर्जिया, पी. जे. चिन्मुळगुंद, रा. ना. दांडेकर, अजय मित्र शास्त्री, ग. त्र्यं. देशपांडे, व्ही. व्ही. गोखले, आ. ने. उपाध्ये आणि अ. द. पुसाळकर या विद्वानांनी भारतविद्येच्या विविध क्षेत्रांत झालेल्या कार्याचा विस्ताराने आढावा घेतलेला आहे. रा. ना. दांडेकरांनी भारतविद्येच्या क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणारे विपुल लेखन केलेले आहे. त्यांनी युनेस्कोसाठी तयार केलेला एक महत्त्वपूर्ण अहवाल रिसेंट ट्रेंड्स इन इंडॉलॉजी या नावाने प्रसिद्ध झाला असून त्यांनी आपल्या या ग्रंथात भारतविद्येच्या क्षेत्रातील विविध प्रवाहांचे अत्यंत चिकित्सक असे मूल्यमापन केलेले आहे.

वैदिक धर्म व पुराणकथा

हेन्री टॉमस कोलब्रुक (१७६५–१८३७) याने १८०५ मध्ये आपला वेदविषयक लेख प्रकाशित केला आणि वेदावर लेखन करणारा पहिला पाश्चात्त्य विद्वान होण्याचा मान मिळविला. यूरोपमध्ये संस्कृत भाषाभ्यास आणि तुलनात्मक भाषाशास्त्र यांचा पाया घालणाऱ्या फ्रांट्स बोप ह्याने भाषाशास्त्र व व्याकरण या दृष्टींनी वेदांचे अध्ययन केले. तसेच, वेद, रामायण व महाभारत यांच्या काही अंशांचे जर्मन भाषेत भाषांतर केले. बेन्फाय ह्याने सामवेदाची आवृत्ती प्रकाशित केली (१८४८). तिला जोडलेला शब्दकोश हा वैदिक शब्दकोश तयार करण्याच्या दिशेने केलेला पहिला प्रयत्न होता. त्याने ऋग्वेदाचे आंशिक भाषांतरही केले. बोप ह्याचा शिष्य फ्रीड्रिख रोझेन ह्याने लॅटिन भाषांतर व टीपा यांसह समग्र ऋग्वेदसंहिता प्रकाशित करण्याची योजना आखली होती. परंतु त्याच्या अकाली मृत्यूमुळे हे काम अपुरे राहिले. तरीही ही आंशिक आवृत्ती (१८३८) बराच काळपर्यंत यूरोपमधील वैदिक भाषाभ्यासाचे अधिष्ठान म्हणून उपयुक्त ठरली. तसेच, तुलनात्मक पुराणकथाविद्येच्या विकासालाही ती कारणीभूत ठरली.

यूजीन ब्यूरनूफ ह्याच्या पॅरिसमधील वेदविषयक व्याख्यानांनी त्याच्या रोट, माक्स म्यूलर, नेव्हे इ. शिष्यांना प्रेरणा दिली. रोट याचा वेदावराचा प्रबंध (१८४६) युगप्रवर्तक मानला जातो. ऋग्वेदाचे ऐतिहासिक मूल्यमापन करण्याचा खऱ्या अर्थाने पहिला प्रयत्न त्याने केला. ॲडॉल्फ रेन्ये याचा वेदविषयक ग्रंथ (१८५५) म्हणजे वैदिक भाषेचे पहिले चिकित्सक अध्ययन होय. फेलिक्स नेव्हे ह्या ऋभूंच्या पुराणकथेचे चिकित्सक अध्ययन केले. आडाल्‌बेर्ट कून (१८१२–८१) ह्याला तुलनात्मक पुराणकथाविद्येचा अत्यंत उत्साही पुरस्कर्ता मानले जाते. इंडो-यूरोपियन लोकांच्या पुराणकथांचे अध्ययन त्याने केले. त्याच्या मते भारतीय पुराणकथा हे इंडो-युरोपियन पुराणकथेचेच एक रूप आहे. डब्ल्यू. सोन आणि क्रिस्तीआन लासेन (१८००–७६) त्याच्या ऋग्वेदविषयक लेखनावर कून ह्याचा प्रभाव दिसतो. आलब्रेख्त वेबर (१८२५– १९०१) हा संस्कृत व प्राकृतच्या विविध शाखांमधून विपुल लेखन करणारा जर्मन संस्कृतज्ञ होता. वैदिक कथांविषयी त्याने लेखन केले आहे. ऋग्वेदाची पहिली संपूर्ण आवृत्ती प्रकाशित करण्याचे काम टेओडोर आउफ्रेख्ट ह्याने केले (१८६१–६३). माक्स म्यूलर याच्या ऋग्वेद आवृत्तीचा पहिला खंड १८४९ सालीच प्रकाशित झाला होता; परंतु ते काम पूर्ण होण्यास पुढे २५ वर्षे लागली. जर्मनीतील वैदिक अध्ययनावर आउफ्रेख्टच्या आवृत्तीचा मोठा प्रभाव पडला. त्याने ऐतरेय ब्राह्मणाची आवृत्तीही प्रकाशित केली (१८७९). एमील ब्यूरनूफच्या Essai Sur le Veda (१८६३) ह्या ग्रंथात भारतातील धर्म, साहित्य, सामाजिक संघटना इत्यादींचा अभ्यास होता. माक्स म्यूलर ह्याने सायणभाष्यासह ऋग्वेदसंहिता प्रकाशित केली. पाश्चात्त्य सुशिक्षितांच्या मनात वेदांविषयी कुतूहल निर्माण करण्याचे काम त्यानेच केले.

पुराणकथांचा तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या आंजेलो दे गूबेरनातीस (१८४०–१९१३) ह्याने झूऑलॉजिकल मायथॉलॉजी (१८७३) या ग्रंथात इंडो-यूरोपियन पुराणकथांतील प्राण्यांविषयी लेखन केले. निसर्गघटनांचे देवतांमध्ये रूपांतर झाले, असे त्याचे मत होते. जॉन म्यूर ह्याच्या ओरिजिनल संस्कृत टेक्स्ट्स या ग्रंथाचे ५ खंड (१८५८– ७२) प्रसिद्ध झाले असून त्याने पुराणकथांच्या तुलनात्मक अध्ययनाला गौण स्थान दिले होते. ऋग्वेदाचे पहिले समग्र जर्मन भाषांतर आल्‌फ्रेट लूटव्हीख ह्याने ६ खंडांत प्रसिद्ध केले (१८७५). हेर्मान ग्रासमान (१८०९–७७) ह्याने केलेले ऋग्वेदाचे जर्मन भाषांतरही याच सुमारास (१८७६-७७) प्रसिद्ध झाले. फ्रीड्रिख बोलेन्‌सेन ह्याने प्रामुख्याने संस्कृत नाटकांचे संपादन केलेले असले, तरी वैदिक भाषाभ्यासामध्येही त्याने भर घातली आहे. हेर्मान ब्ऱ्यूनॉफर ह्याने आपल्या इराण अंद तुराण (१८८९) या पुस्तकात भारतीय आर्यांचे मूळ स्थान इराण व तुराण असल्याचे मत विविध नावांमधील ध्वनिसाम्यांच्या आधारे मांडले आहे. वैदिक धर्माच्या विवेचनाला एक संपूर्ण पुस्तक (१८७८–८३) वाहणारा पहिला पाश्चात्त्य विद्वान म्हणजे आबेल बेर्गेनी (१८३८–८८) हा होय. त्याने पुराणकथांचा तुलनात्मक अभ्यास बाजूला ठेवून ऋग्वेदाचा स्वतंत्रपणे विचार केला. यज्ञातील कर्मकांड म्हणजे स्वर्गीय घटनांची पुनर्निर्मिती आहे, असे त्याचे मत होते. ए. काएगी ह्याचा ग्रंथ (१८७८-७९), तसेच ए. बार्ट ह्याचा या विषयावरील ग्रंथही (१८७९) महत्त्वाचा आहे. पी. रेग्‌नाउड ह्याने आपल्या ग्रंथात (१८९२) भारतीय आणि पाश्चात्त्य वेदवेत्त्यांनी ऋग्वेदाचे लावलेले अर्थ बाजूला ठेवून नवे अर्थ लावले. वैदिक सूक्तांचा देवतांना आवाहन करणे वा देवतांच्या पुराणकथा सांगणे हा उद्देश नसून यज्ञातील कर्मकांडाचे वर्णन करणे हा उद्देश आहे, असे त्याचे मत होते. ऋग्वेदापासून नंतरच्या संस्कृत वाङ्‌मयापर्यंत एक सलग व अखंड परंपरा नाही, असेही त्याचे मत होते. ई. डब्ल्यू. हॉप्‌किन्झ (१८५७–१९३२) ह्याचा या विषयावरील ग्रंथ रिलिजन्स ऑफ इंडिया (१८९५) या नावाने प्रसिद्ध झाला. हार्डी ह्याचे वैदिक धर्मावरचे पुस्तकही (१८९३) महत्त्वाचे आहे. वैदिक पुराणकथा व वैदिक कर्मकांड यांचा अतूट संबंध होता, असे हिलेब्रान्ट ह्याने आपल्या ग्रंथात (तीन खंड, १८९१, ९९, १९०२; द्वितीय आ., दोन खंड १९२७, २९) मांडले आहे ऋग्वेदाचा बराचसा भाग भारताबाहेर तयार झाला असे त्याला वाटे. बहुतेक देवता म्हणजे निसर्गघटनांचे दैवतीकरण होय, सोम व चंद्र एकच असून वैदिक पुराणकथा चंद्रप्रधान आहे, वैदिक पुराणकथा व कर्मकांड यांच्या आकलनाला मानवशास्त्राची मदत होते इ. मते त्याने मांडली आहेत.

ओल्डेनबुर्ख ह्याचा ग्रंथ (१८९४) वैदिक धर्म व पुराणकथा यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. वैदिक धर्म समजण्याच्या दृष्टीने वैदिक कर्मकांडाला महत्त्व आहे असे त्याला वाटे. अमूर्त देवता, वरुण, इंद्र इ. बाबतींत त्याने अनेक नवी व महत्त्वपूर्ण मते मांडली. वैदिक पुराणकथांविषयीचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ए. ए. मॅक्डॉनल (१८५४–१९३०) ह्याच्या वेदिक मायथॉलॉजी (१८९७) या ग्रंथाचा निर्देश केला पाहिजे.  मॉरिस ब्लूमफील्ड (१८५५–१९२८) ह्याने द रिलिजन ऑफ द वेदाज (१९०८) या ग्रंथात वैदिक धर्माचा ऋग्वेदापासून उपनिषदांपर्यंत कसा विकास झाला, त्याचा वृत्तांत दिला आहे. लेओपोल्ट फोन श्रडर (१८५१–१९२०) ह्याने आपल्या ग्रंथात (१९१४, १६) तुलनात्मक पुराणकथाविद्येचे पुनरुज्जीवन केले. ऋग्वेदातील संवादसूक्तांवरही त्याने लेखन केले.

ऋग्वेदामध्ये पुराणकथा साध्यावस्थेत असल्याचे मत मॉरिस विंटरनिट्स ह्याने आपल्या ग्रंथात (१९०८) मांडले. याउलट पूसँ ह्याने त्याचे हे मत खोडून काढले (१९०९) आणि ऋग्वेदात वैदिक पुराणकथा पूर्णपणे सिद्धावस्थेत असल्याचे मत मांडले. रिचर्ड पिशेल (१८४९–१९०८) आणि कार्ल फ्रीड्रिख गेल्डनर (१८५२–१९२९) ह्यांनी ऋग्वेद हे पूर्णपणे भारतीय साहित्य असल्याचे मत मांडले. यूरोपियन आर्यांच्या साहित्याशी ऋग्वेदाचा संबंध जोडण्यापेक्षा भारतातील उत्तरकालीन साहित्याशी तो जोडावा असे त्यांनी म्हटले. पाश्चात्त्यांपेक्षा सायणाचार्यांचे अर्थ अधिक योग्य, असेही त्यांनी मानले. स्टेन कॉनॉव्ह (१८६७–१९४८) ह्या नॉर्वेजियन भारतविद्यावंताने आपल्या द आर्यन गॉड्‌स ऑफ द मिटानी पीपल (१९२१) या पुस्तकात निसर्गवाद नाकारला. डब्ल्यू. कॅलंड ह्याने यात्वात्मक कर्मकांडाकडे लक्ष वेधले. एच्. डी. ग्रिझवल्ड ह्याचे द रिलिजन ऑफ द ऋग्वेद हे पुस्तक वैदिक पुराणकथांचा उत्तम रीतीने परिचय करून देणारे आहे. योहानेस हेर्टेल ह्याने वैदिक पुराणकथा अग्निप्रधान असल्याचे मानले. रूडॉल्फ ऑटो ह्याने वैदिक धर्म व पुराणकथा यांच्याकडे भाषाभ्यासक व भारतविद्यावंत म्हणून न पाहता मानसशास्त्र व धर्मातील उत्क्रांती या दृष्टींनी पाहिले. जे. प्रझिलूस्की ह्याने वैदिक पुराणकथांतील आर्येतर भागाकडे लक्ष वेधण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. वरुण हा ऑस्ट्रो-एशियाटिक लोकांकडून आर्यांनी घेतला, असे त्याने मानले. अदिती, आश्विनीकुमार, विष्णू इ. मध्येही त्याने आर्येतर अंश पाहिले आहेत.  ए. बी. कीथ (१८७९–१९४४) ह्याने वैदिक धर्म व पुराणकथा या विषयांवर अत्यंत विपुल आणि विस्तृत लेखन केले आहे. द रिलिजन अँड फिलॉसफी ऑफ द वेद अँड उपनिषद्स या ग्रंथात (दोन खंड, १९२५) त्याने त्या काळापर्यंत झालेल्या त्या विषयांवरील सर्व लेखनाचा आढावा घेतला आहे. परंतु त्याने स्वतःची नवी मते विशेष मांडली नाहीत. जे. शार्‌पांत्ये हा निर्सगवादविरोधी होता. इंद्र, आश्विनीकुमार इत्यादींना तो ऐतिहासिक व्यक्ती माने. हाइन्रिख ल्यूड्यर्स ह्याने वरुण ह्या पुस्तकात (दोन खंड, १९५१, १९५९) वरुणाविषयी विवेचन केले आहे. बेती हाइमान याच्या मते प्रारंभी वरुण हा स्वतंत्र देव नव्हता, तो फक्त ऋताचे साधन होता.

झॉर्झ द्युमेझिल ह्याने आर्यांच्या देवांची नैतिक, सैनिक व आर्थिक अशा तीन गटांत विभागणी केली आहे. लुई रनू ह्याचे रिलिजन्स ऑफ इंडिया हे पुस्तक १९५३ साली लंडन येथून प्रसिद्ध झाले. यान गोंडा हा वेदांविषयी कीथप्रमाणेच विपुल लेखन करणारा लेखक. शिवाय त्याच्या मते ऋग्वेदाचे पूर्ण ज्ञान होण्यासाठी आदिम मानवाच्या संस्कृतीचे आकलन होणे आवश्यक आहे. वैदिक कालखंडात धर्म आणि यातू यांचा अविभाज्य संबंध होता, असे त्याने ठामपणे मांडले आहे. त्याने ॲस्पेक्टस ऑफ अर्ली विष्णुइझम (१९५४) या आपल्या पुस्तकात ऋग्वेदात दुय्यम असलेला विष्णू नंतर प्रमुख देव कसा झाला, याचे व तत्संबद्ध अनेक विषयांचे विवेचन केले आहे.

भाषाशास्त्र

सतराव्या शतकात पाश्चात्त्यांना संस्कृतचा शोध लागल्यानंतर आणि पुढे बंगालच्या एशियाटिक सोसायटीची स्थापना झाल्यापासून भारत ही वैज्ञानिक भाषाशास्त्राची जन्मभूमी मानली जाऊ लागली. त्यानंतर जर्मनीमध्ये बोप ह्याने आणि डेन्मार्कमध्ये रास्क ह्याने तुलनात्मक व्याकरणाच्या संप्रदायाचा पाया घातला. प्रातिशाख्य, शिक्षा व पाणिनीचे व्याकरण यूरोपीय भाषांच्या अभ्यासासाठी महत्वपूर्ण बनले. एकोणिसाव्या शतकात तुलनात्मक भाषाभ्यास आणि त्याची ऐतिहासिक व्याकरण ही शाखा यूरोपमध्ये स्थिर झाली. फेर्दिनां द सोस्यूर (१८५७ - १९१३) या स्विस विद्वानाने १८८८ साली इंडो यूरोपीय या मूळ भाषेतील आद्यस्वरांच्या व्यवस्थेविषयी प्रबंध मांडला. हा भाषाशास्त्राच्या अध्ययनातील एक महत्वाचा टप्पा होय. गेल्या अर्धशतकात तुलनात्मक व ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या जोडीने वर्णनात्मक, गणिती, मानववंशशास्त्रीय इ. प्रकारच्या भाषाशास्त्राचे अध्ययन चालू झालेले आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन इ. देशांतून भाषाशास्त्राचे विविध संप्रदाय निर्माण झाले आहेत. भारताच्या दृष्टीने डॅन्येल जोन्झ, जे. आर्. फर्थ इत्यादींच्या भोवती केंद्रित झालेला भाषाशास्त्राचा ब्रिटिश संप्रदाय आणि मॉरीस ग्रामों व आंत्वान मेये यांनी सुरू केलेला फ्रेंच संप्रदाय हे अधिक महत्वाचे आहेत. अलीकडे विद्यापीठ अनुदान आयोगाने भाषाशास्त्रीय अध्ययनाला प्रोत्साहन दिलेले आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजनेही या बाबतीत महत्वपूर्ण काम केलेले असून तेथे न्यूयॉर्कच्या रॉकफेलर प्रतिष्ठानाने दिलेल्या अनुदानातून १९५४ पासून चालू असलेल्या भाषाप्रकल्पामुळेही या अध्ययनाला गती आलेली आहे. अनेक भारतीय विद्यापीठांतून भाषाशास्त्राचे विभाग सुरू आहेत. भारतीय भाषाशास्त्राच्या अध्ययनावर गेल्या काही वर्षांत अमेरिकन विद्वानांचा प्रभाव दिसून येत आहे.

भारतात एकोणिसाव्या शतकात जे काम झाले, ते प्रामुख्याने पाश्चात्यांनी केले आहे अथवा त्यांच्या प्रेरणेने झाले आहे. शंभर वर्षांनंतरही सर्वोत्तम मानला जाणारा मोल्सवर्थचा मराठी शब्दकोश ब्रिटिश व भारतीय विद्वानांच्या परस्परसहकार्याचे फलित होय. बिशप काल्डवेल बीम, रूडॉल्फ होर्नले (१८४१ - १९१८) आदींचे एकोणिसाव्या शतकातील कार्य महत्वाचे आहे. रेव्हरंड जॉन विल्सन (१८०४ - ७५) ह्याच्या स्मृत्यर्थ मुंबई विद्यापीठात ‘विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्स’ ही व्याख्यानमाला चालू झाली. तीमध्ये पहिल्या वर्षी (१८७७) रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७ - १९२५) ह्यांनी संस्कृत व प्राकृत भाषांवर सात व्याख्याने दिली होती. इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएन्टॅलिस्ट्सच्या १८८६ च्या व्हिएन्ना येथील अधिवेशनात केलेल्या ठरावाला मान देऊन भारत सरकारने १८९४ साली लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आणि जॉर्ज एब्राहॅम थ्रीअर्सन (१८५१ - १९४१) ह्याची संचालक म्हणून नेमणूक केली. या संस्थेने पहिल्या भाषिक सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल १९२७ साली दिला. त्यात उणिवा असूनही तो पुढच्या सर्व प्रमुख संशोधनाचे उगमस्थान बनला. अशा प्रकारचे सर्वेक्षण त्याआधी जगातील कोणत्याही देशात झाले नव्हते. ग्रीअर्सन ह्याने भारतीय भाषांचे जे वर्गीकरण केले, ते अद्यापही बऱ्याच अंशी मान्य आहे.

प्राचीन इंडो आर्यन भाषेच्या इतिहासाशी संबंधित असा संस्कृत शब्दकोश एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रशियन अकॅडमीने सेंट पीटर्झबर्ग येथे सात खंडात प्रकाशित केला (१८५५ - ७५). तो ओटो बट्‌लिंक आणि रूडोल्फ रोट या दोन जर्मन विद्वानांनी संपादित केला होता. याकोब व्हाकरनागेल ह्याच्या ग्रंथाचे चार खंड प्रकाशित झाले (१८९६, १९०५, १९३० व १९५४). शेवटच्या दोन खंडांचे काम अल्बर्ट डेब्रूनर ह्याने पूर्ण केले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी रिचर्ड पिशेल ह्याचा प्राकृत भाषांच्या व्याकरणावरील युगप्रवर्तक ग्रंथ प्रकाशित झाला. लूटव्हिख व्हिल्हेल्म गायगर (१८५६ - १९४३) ह्याचा पाली भाषेवरचा ग्रंथ १९१६ साली, तर ए. सी. वुल्नर ह्याचा प्राकृत भाषेवरचा ग्रंथ १९१७ साली प्रकाशित झाला. हेर्मान याकोबी, प. ल. वैद्य, आ. ने. उपाध्ये, एल्. आल्सडॉर्फ आणि हिरालाल जैन यांचे अपभ्रंश भाषेच्या संदर्भातील काम महत्वाचे आहे.

हॉपकिन्झ आणि याकोबी यांनी महाकाव्यातील संस्कृतचा, मॉरिस ब्लूमफिल्ड ह्याने जैन संस्कृतचा आणि फ्रँक्लीन एडगर्टन ह्याने बौद्ध संस्कृतचा विशेष अभ्यास केला. अलीकडे बी. जे. संदेसर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जैन संस्कृतचा शब्दकोश प्रसिद्ध केला आहे. टी. के. लद्दू, पां. दा. गुणे, आय्. जे. एस्. तारापोरवाला आणि वि. स. सुकथनकर हे शिष्यवृत्त्यांच्या साहाय्याने यूरोपमध्ये शिक्षण घेतलेले काही भाषाशास्त्रज्ञ होत. यांपैकी बहुतेकजण पहिल्या महायुद्धाच्या थोडेसे आधी भारतात परतले. तारापोरवाला आणि सुनीतिकुमार चतर्जी (१८९० -) यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्ता विद्यापीठात अनेक भाषाभ्यासक तयार झाले. सिद्धेश्वर वर्मा यांनी जवळजवळ अर्धशतकापर्यंत भाषाशास्त्रावर विपुल संशोधन केले. १९१४ साली झ्यूल ब्लॉक (१८८० - १९५३) याचा मराठीवरचा ग्रंथ पूर्ण झाला व १९२० साली तो प्रसिद्ध झाला. भारतीय भाषांच्या ऐतिहासिक अध्ययनाला या पुस्तकाने आदर्श घालून दिला. ब्लॉकपासून प्रेरणा घेऊन सुनीतिकुमार चतर्जी ह्यांनी बंगाली भाषेवर असेच काम केले. टर्नर ह्याने गुजराती, सिंधी व नेपाळीविषयी काम केले. अनेक भारतीय भाषांवरचे स्वतंत्र ग्रंथ यानंतरच्या काळात प्रसिद्ध झाले. ल्यूड्यर्स आणि डब्ल्यू. प्रिन्स ह्यांचे प्राकृत भाषांवरील काम महत्वाचे आहे. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी हिटाइट आणि तोखारियन या इंडो यूरोपीय भाषांचा शोध महत्वाचा ठरला.

पंजाबमध्ये लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली (१९२८). इंडियन लिंग्विस्टिक्स या नावाचे प्रकाशनही त्या संस्थेने सुरू केले.

टर्नर ह्याचा नेपाळी शब्दकोश १९३१ साली प्रकाशित झाला. वॉल्टर व्यूएस्ट, एम्. बी. इमेनीउ आणि टी. बरो यांनी विविध भाषांचे व्युत्पत्तिशास्त्रीय कोश केले. मोनिअर विल्यम्स (१८१९ - ९९), आपटे इत्यादींचे संस्कृत कोश प्रसिद्ध आहेत. मद्रास विद्यापीठ हे भारतीय भाषेचा कोश तयार करणारे पहिले विद्यापीठ होते. तेथे तमिळचा कोश तयार झाला. यानंतर इतर अनेक भारतीय भाषांचे कोश तयार झाले. १८२१ साली स्थापन झालेले डेक्कन कॉलेज १९३४ मध्ये बंद करण्यात आले आणि पाच वर्षांनंतर नव्या स्वरूपात त्याचे पुनरुज्जीवन झाले. ऐतिहासिक तत्त्वांवर आधारलेल्या संस्कृत कोशाचे प्रचंड कार्य सध्या डेक्कन कॉलेजमध्ये होत आहे. डॉ. रघुवीर यांनी १९३१ साली लाहोर येथे इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन कल्चर या संस्थेची स्थापना केली. त्यांचे ग्रेट इंडियन इंग्लिश डिक्शनरी हे एक फार महत्त्वाचे कार्य आहे. डब्ल्यू. एस्. ॲलन ह्याने फोनेटिक्स इन एन्शंट इंडिया (१९५३) या पुस्तकात प्राचीन भारतीय व्याकरणकार व भाषाशास्त्रज्ञ यांच्या कामाचा आढावा घेतला आहे.

हल्ली भाषाशास्त्राचे अध्ययन व्यवहारोपयोगाच्या दृष्टीकोणातून होत आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून झालेला स्वीकार, भाषावार प्रांतरचना, भाषा आयोगाची स्थापना इत्यादींचा भाषाविषयक अभ्यासावर बराच परिणाम झाला आहे. जे. आर्. फर्थ याने पंजाब विद्यापीठात पहिली भाषाशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली होती. सध्या आग्रा आणि अन्नमलई इ. विद्यापीठे तसेच डेक्कन कॉलेज या ठिकाणी प्रायोगिक ध्वनिविचाराच्या प्रयोगशाळा आहेत. भारतीय भाषांचे टंकलेखन सुधारण्यासाठी जे भाषाशास्त्रीय प्रयत्न चालू आहेत, त्यांत डेक्कन कॉलेजचे काम आघाडीवरचे आहे. भारतीय लिपींच्या मुद्रणासाठी डेक्कन कॉलेजने हाती घेतलेला अक्षरविश्लेषणाचा प्रकल्प महत्त्वाचा आहे. अँन्थ्रॉपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, सेन्सस डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इ. संस्थांचे भाषाशास्त्रीय अभ्यासाचे विभाग आहेत. आदिवासींच्या भाषांच्या शास्त्रीय अध्ययनाचे प्रयत्नही चालू आहेत.

वैदिक साहित्य

लूटव्हिख ह्याने १८९३ साली आणि ओल्डनबुर्ख ह्याने १९०५ साली या क्षेत्रातील कामाचा आढावा घेतला होता. रनू ह्याचा बिब्लिऑग्रॅफी वेदिक हा ग्रंथ १९३१ साली प्रकाशित झाला. प्रारंभापासून १९३१ पर्यंतच्या काळात या क्षेत्रात झालेल्या सर्व कामांचा त्यात आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतरच्या कामाचा अद्ययावत आढावा घेणारा दांडेकरांचा वेदिक बिब्लिऑग्रॅफी हा ग्रंथ १९४६ व १९६१ साली दोन खंडांत प्रकाशित झाला आहे.

पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळाने पदपाठ, सायणभाष्य, सूची इत्यादींसह ऋग्वेदाची आवृत्ती प्रकाशित केली आहे. सायणभाष्याखेरीज इतर भाष्येही आता प्रकाशित झाली आहेत. तसेच देशी-परदेशी भाषांतूनऋग्वेदाची अनेक भाषांतरेही झाली आहेत. १८४२ साली जे. स्टीव्हन्सन ह्याने आणि १८४८ साली बेन्फाय ह्याने सामवेद संपादित केला होता. जीवनानंद विद्यासागर यांनी १८९२ साली सायणभाष्यासह सामवेदप्रकाशित केला. रोट आणि व्हिटनी यांनी काढलेली अथर्ववेदाची आवृत्ती (१८५५) लिंडेनाउ ह्याने १९२६ साली सुधारली. पदपाठ, सायणभाष्य इत्यादींसह अथर्ववेदाची प्रथम आवृत्ती एस्. पी. पंडित यांनी प्रकाशित केली (१८९५-९८). श्रडर, महादेवशास्त्री जोशी आदींनी कृष्णयजुर्वेदाच्या विविध शाखांच्या संहिता संपादित केल्या आहेत, तर ग्रिफिथ, देवीचंद इत्यादींनी शुक्लयुजर्वेदाचे इंग्रजी भाषांतर केले आहे.

विविध ब्राह्मणग्रंथांच्या संपादनाचे व भाषांतराचे कामही आता झाले आहे. ब्राह्मणवाङ्‌मयात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या शतपथ ब्राह्मणाचे संपादन वेबर ह्याने १८५५ सालीच केले होते. विविध उपनिषदांची अनेक देशी विदेशी भाषांतून संपादने व भाषांतरे झाली आहेत. या बाबतीत डॉइसेन, ह्यूम, माक्स म्यूलर, हिलेब्रान्ट, रनू, राधाकृष्णन, दफ्तरी, इत्यादींचे काम लक्षणीय आहे. वाईच्या धर्मकोशमंडळाने चार खंडांत प्रसिद्ध केलेले उपनिषतकांड अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आहे. बट्‌लिंक आणि रोट यांनी सात खंडांतील संस्कृत शब्दकोश १८५२-७५ या काळात प्रसिद्ध केला. ग्रासमान याने ऋग्वेदातील शब्दांचा कोश १८७२ साली प्रसिद्ध केला. तर्कवाचस्पती यांचा बावीस भागांतील तर्कवाचस्पत्य हा ग्रंथ १८१३ - ८४ या काळात प्रसिद्ध झाला आहे. पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळाने अत्यंत विस्तृत अशा सप्तखंडात्मक श्रौतकोशाचे कार्य चालविलेले आहे. वाईच्या केवलानंदसरस्वतींचा मीमांसाकोश हा पूर्वमीमांसेवरील सर्वसमावेशक असा कोश आहे. हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र या पां. वा. काणे यांच्या ग्रंथाचे स्वरूप कोशासारखे व्यापक आहे.

वैदिक शब्दांचे कोश, सूची, व्युत्पत्ती इ. क्षेत्रांत पिशेल, गेल्डनर, ओल्डेनबुर्ख, मॅकडॉनेल, लॉइमान, बेर्गेनी, यूलेनबेक, रनू इत्यादींनी महत्वपूर्ण काम केले आहे. द विश्वेश्वरानंद वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने वैदिक शब्दार्थ पारिजात हा वैदिक शब्दांच्या व्युत्पत्तीचा कोश हाती घेतलेला असून त्याचा पहिला भाग १९२९ साली प्रकाशित झाला आहे. व्यंकटसुबय्या, कुमारस्वामी, सुकुमार सेन, वि. का. राजवाडे, पिसानी, गोंडा, शार्‌पांत्ये, ल्यूड्यर्स, द्यूमाँ इत्यादींचे या क्षेत्रातील कार्यही महत्वाचे आहे. ब्लूमफील्ड ह्याचा द वेदिक कॉन्कॉर्डस हा अत्यंत उपयुक्त ग्रंथ १९०६ साली प्रकाशित झाला. वैदिक मंत्रांच्या प्रत्येक ओळीची अकारविल्हे सूची आणि त्यांचे पाठभेद यांचा त्यात अंतर्भाव आहे. विश्वबंधू शास्त्रींचा वैदिक पदानुक्रमकोशही महत्वाचा आहे. मॅक्‌डॉनेल व कीथ यांच्या वेदिक इंडेक्स ऑफ नेम्स अँड सब्जेक्ट्स (१९१२) या महत्वपूर्ण ग्रंथाची नवी आवृत्ती निघाली आहे (१९५८). चित्रावशास्त्रींचा प्राचीन चरित्रकोश आणि हेर्मान याकोबी याचा उपनिषदवाक्यकोशही (१९३१) प्रसिद्ध आहे. व्हिटनी ह्याचे संस्कृत ग्रामर (१८७९), मॅक्‌डॉनेल ह्याचे वेदिक ग्रामर (१९१०) ही वैदिक व्याकरणाच्या दृष्टीने महत्वाची पुस्तके आहेत. रनू, वाकरनागेल, पिसानी, नायसर, गोंडा इत्यादींनी या क्षेत्रात महत्वपूर्ण लेखन केले आहे. ई. व्ही. आर्नल्ड याचे वेदिक मीटर इन् इटस् हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट्स (१९०५) हे पुस्तक वैदिक छंदःशास्त्रावरील सर्वसमावेशक स्वरूपाचे आहे. वैदिक भाषेतील अलंकार वगैरे विषयांवरही विपुल लेखन झाले आहे. वेदांच्या कालखंडाविषयी माक्स म्यूलर, ब्लूमफील्ड, व्हिटनी, मॅक्‌डॉनेल, कीथ, बी. के. घोष, विंटरनिट्स, शं. बा. दीक्षित, लोकमान्य टिळक, याकोबी इ. अनेकांनी लेखन केले आहे.

अभिजात संस्कृत साहित्य

अजूनही संस्कृत भाषेतील प्रचंड साहित्य असंख्य अशा हस्तलिखितांतून विखुरलेले आहे. ब्यूलर, पीटरसन, भांडारकर इ. विद्वानांच्या प्रयत्नांमुळे कलकत्ता, पुणे, बडोदा, मद्रास, त्रिवेंद्रम, बनारस, तंजावर, म्हैसूर इ. ठिकाणी या हस्तलिखितांचे संग्रह व सूची करण्यात आल्या आहेत. आउफ्रेख्ट ह्याने संस्कृत ग्रंथ वगैरेंचा कॅटलॉगस कटॅलॉगोरम केला होता; परंतु डॉ. व्ही. राघवन् यांचा न्यू कॅटलॉगस कॅटलॉगोरम हा विशेष उपयुक्त आणि व्यापक आहे. भारतातील विद्यापीठे व अन्य संस्थांनी संस्कृतमधील विविध ग्रंथ प्रकाशित करण्याचे प्रचंड काम केले आहे.

एम्. बी. इमेनीउ ह्याची वेतालपंचविंशत्तीची आवृत्ती प्रसिद्ध आहे. कीथ आणि डब्ल्यू. नॉर्मन ब्राउन यांचे पंचतंत्रावरचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. विंटरनिट्स वगैरेंचे कथावाङ्‌मयावरील कामही महत्वाचे आहे. एफ्. डब्ल्यू. टॉमस, जी. तूची, सी. डब्ल्यू गर्नर, कीथ, विंटरनिट्स, इ. एच्. जॉन्स्टन, चिंताहरण चक्रवर्ती आदींनी अश्वघोषाविषयी विशेष संशोधन केले आहे. टी. गणपतिशास्त्री यांनी त्रिवेंद्रममधून भासाची नाटके प्रसिद्ध केली (१९१२ - १५). भासाच्या नाटकांचा शोध ही विसाव्या शतकातील भारतविद्येच्या क्षेत्रातील एक अत्यंत महत्वाची घटना होती. विंटरनिट्स, देवधर, सुकथनकर, पिशरोटी, भट, पुसाळकर, मिराशी, दांडेकर वगैरेंनी भासाविषयी विपुल लेखन केले आहे. गद्य - पद्य लेखन करणाऱ्या इतर संस्कृत साहित्यिकांविषयीही प्रचंड संशोधन झाले आहे. जैन व बौद्ध लेखकांनी केलेले संस्कृत लेखन, नाट्यशास्त्र, काव्यशास्त्र इत्यादींवरही भरपूर लेखन झाले आहे. कीथ, विंटरनिट्स, डे आणि दासगुप्ता, सी. कुन्हन राजा, के. के. राजा इत्यादींनी संस्कृत साहित्याचे इतिहासग्रंथ लिहिले आहेत.

प्राकृत साहित्य

प्रारंभीच्या काळात काही संस्कृतज्ञच प्राकृतचा अभ्यास करीत होते. आता मात्र भारतविद्येची स्वतंत्र शाखा म्हणून प्राकृत साहित्याच्या अध्ययनाला महत्व प्राप्त झाले आहे. रिचर्ड पिशेल ह्याने शाकुंतलाच्या बंगाली आवृत्ती (१८७७) पहिल्यांदा नाटकातील प्राकृतकडे लक्ष वेधले. १८८९ साली एस्. पी. पंडितांनी कालिदासाची इतर दोन नाटके प्रसिद्ध केली व त्यांतील प्राकृत भाषांचे स्वरूप स्पष्ट केले. नंतर निघालेल्या मृच्छकटिक, मुद्राराक्षस, रत्नावलि इ. नाटकांच्या आवृत्त्यांमधूनही प्राकृतकडे लक्ष देण्यात आले. राजशेखरकृत कर्पूरमंजरीचे स्टेन कॉनॉव्ह ह्याने केलेले संपादन (१९०१) हा या क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा होय. १९११ साली हिलेब्रान्टने मुद्राराक्षसाची आवृत्ती प्रकाशित केली. भासाची नाटके सापडल्यानंतर प्रिन्स ह्याने मासाज प्राकृत्‌स हा ग्रंथ प्रसिद्ध केला (१९२१). हाइन्रिख ल्यूड्यर्स ह्याने अश्वघोषाच्या नाटकांचे जे अंश प्रकाशित केले, ते प्राकृत बोलींच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होते.

प्राकृत नाटकांच्या संपादनाचे महत्त्वपूर्ण काम आ. ने. उपाध्ये यांनी केले. तोडरमल्ल यांनी महावीरचरित (१९२८), एम्. एम्. घोष यांनी कर्पूरमंजरी (१९३९) व ह. दा. वेलणकरांनी विक्रमोर्वशीय (१९६१) ही नाटके संपादिली. माहाराष्ट्री प्राकृतातील साहित्य पहिल्यांदा ए. वेबर ह्याने गाहासत्तसई मधील ३७० श्लोक प्रकाशित करून (१८७०) आणि नंतर त्या ग्रंथाची समग्र आवृत्ती प्रकाशित करून (१८८१) उजेडात आणले. पी. गोल्डश्मिट ह्याने प्रवरसेनाच्या सेतुबंध नामक प्राकृत महाकाव्याचे पहिले दोन सर्ग प्रकाशित केले. नंतर सीग्‌फ्रीड आणि पॉल यांनी त्याची जर्मन भाषांतरासह पूर्ण आवृत्ती प्रकाशित केली (१८८१-८३). राधागोविंद बसक यांनी त्याची एक उत्कृष्ट आवृत्ती प्रसिद्ध केली आहे (१९५९). सर्वसेनाचे हरिविजय मिराशींनी प्रसिद्ध केले आहे. १८८७ साली एस्. पी. पंडितांनी वाक्‌पतीचे गउडवहो नावाचे ऐतिहासिक काव्य प्रसिद्ध केले. आ. ने. उपाध्ये यांनी दक्षिण भारतातील हस्तलिखितांवरून अनेक प्राकृत काव्ये प्रकाशित केली आहेत.

प्राकृत व्याकरणाच्या क्षेत्रात कौएल ह्याने भामहकृत मनोरमा या टीकेसह वररुचीचा प्राकृतप्रकाश हा ग्रंथ प्रकाशित केला (१८६८). हेमचंद्राच्या शब्दानुशासनावरचा ग्रंथ रिचर्ड पिशेल ह्याने दोन भागांत (१८७७, १८८०) प्रसिद्ध केला. चंड याच्या प्राकृत लक्षणाची आवृत्ती (१८८०), होर्नले ह्याने, तर सिंहराजाच्या प्राकृत रूपावताराची आवृत्ती ई. हल्ट्झश ह्याने १९०९ साली प्रकाशित केली. एस्. पी. व्ही. भट्टनाथस्वामी, ग्रीअर्सन इत्यादींचे प्राकृत व्याकरणावरील कार्य महत्त्वाचे आहे. प्राकृत भाषांच्या व्याकरणांचा इतिहास लिहिण्याचा खऱ्या अर्थाने पहिला प्रयत्न निट्टी-डोल्सी ह्याने केला (१९३८). लासेन, इ. म्यूलर, याकोबी आणि पिशेल यांची प्राकृत व्याकरणावरील पुस्तके महत्त्वाची आहेत. वुल्नर, आर्. श्मिट, प. ल. वैद्य, अ. म. घाटगे, म. अ. मेहेंदळे, सुकुमार सेन इत्यादींनी प्राकृत बोलींविषयी पुस्तके प्रकाशित केली आहेत. ब्यूलर, पिशेल इत्यादींनी प्राकृत कोशांच्या क्षेत्रात महत्वाचे काम केले आहे. १९१३ - २५ या काळात रतलाम येथून अभिधानराजेंद्र हा जैन धर्मातील सप्तखंडात्मक विश्वकोश संस्कृत व प्राकृतमधून प्रकाशित करण्यात आला आहे. पं. हरगोविंद शेठ यांनी १९२३ - २८ या काळात कलकत्त्याहून प्रसिद्ध केलेला प्राकृत भाषांचा कोशही महत्वाचा आहे. तसेच रत्नचंद्र यांचा पंचखंडात्मक अर्धमागधीकोशही (१९२३ - ३२) महत्वाचा आहे. अ. मा. घाटगे व एम्. एन्. घोष यांनी माहाराष्ट्री; विल्यम ईगल क्लार्क, एम्. सहिदुल्ला, झ्यूल ब्लॉक आणि ए. बॅनर्जीशास्त्री यांनी मागधी; ग्रीअर्सन, आ. ने. उपाध्ये वगैरेंनी पैशाची, तर आल्सडॉर्फ याने अर्धमागधी आणि अपभ्रंश या प्राकृत भाषांचे विशेष संशोधन केले आहे.

भारतातील व विदेशातील अनेक ठिकाणांहून जैन धर्माविषयीचे वाङ्‌मय प्रकाशित झाले आहे. याकोबीने भद्रबाहूचे कल्पसूत्र (१८७९) तर होर्नलेने उवासगदसाओ हा ग्रंथ प्रकाशित केला. आचारांगाचा पहिला श्रुतस्कंध डब्ल्यू. शूब्रिंग ह्याने (१९१०), तर सुयगडंग हा ग्रंथ प. ल. वैद्य यांनी प्रकाशित केला (१९२८). वैद्यांनी इतरही अनेक ग्रंथ संपादित केले. १९२२ साली जे. शारपांत्ये ह्याने उत्तरज्झयण नावाचे मूलसूत्र प्रकाशित केले.

ए. वेबर ह्याने जैन धर्मग्रंथांचा आढावा घेतला (१८८३ - ८५). १९२० साली विंटरनिट्सने प्राकृत साहित्याचा पहिला इतिहास लिहिला. एच्. आर. कापडिया, बी. सी. लॉ, जे. सी. जैन वगैरेंनीही प्राकृत साहित्याच्या इतिहासावर लेखन केले आहे.

एस्. पी. पंडित यांनी कुमारपालचरित प्रसिद्ध केले (१९००). मुनी चतुर्विजय आणि पुण्यविजय यांनी वसुदेवहिंडी हा ग्रंथ संपादित केला. आ. ने. उपाध्ये यांनी कुवलयमाला हा ग्रंथ संपादित केला (१९५९).

प्राकृत भाषांतील तत्वज्ञानावरचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. लॉइमान, पं. सुखलाल व बेचरदास, का. वा. अभ्यंकर, ग्लाझेनाप वगैरेंनी लेखन केले आहे. ह. दा. वेलणकरांनी प्राकृत साहित्यातील वृत्तांवर विपुल लेखन केले आहे. हेमचंद्राच्या छंदोनुशासनाची उत्तम आवृत्ती त्यांनी संपादित केली आहे (१९६१). बी. एस्. व्यास यांनी प्राकृतपिंगळ या नावाचा ग्रंथ संपादित केला आहे (१९५९).

प्राकृत भाषांपैकी अपभ्रंश भाषेच्या आधुनिक अध्ययनास सर्वांत उशिरा सुरुवात झाली. पिशेल, याकोबी, दलाल, गुणे, आल्सडॉर्फ, हिरालाल जैन, प. ल. वैद्य वगैरेंचे या क्षेत्रातील काम महत्वपूर्ण आहे.

प्राचीन द्रविड साहित्य

बिशप कॉल्डवेल ह्याच्या मते द्रविड भाषाकुलात नऊ भाषा असून तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मलयाळम् या त्यांपैकी प्रमुख होत. बलुचिस्तानातील ब्राहुई ही भाषा द्रविड भाषाकुलात मोडत असल्याचा शोध लागला आहे. दक्षिणेतील चार प्रमुख भाषांतून रामायण व महाभारत यांवरील काव्ये, भाषांतरे झालेली असून त्यांवर विविध विद्यापीठांतून व संशोधनसंस्थांतून संशोधन चालू आहे. उदा., कंबन (सु. १२ वे शतक), ह्याने लिहिलेल्या तमिळमधील पहिल्या रामायणाची  कंब रामायणाची शब्दसूची करण्याचे काम अन्नमलई विद्यापीठात चालू आहे. तमिळ भाषेतील संगमसाहित्यावर बरेच संशोधन झाले आहे. व्ही. आर्. दीक्षितार यांचे स्टडीज इन तमिळ लिटरेचर अँड हिस्टरी (१९३०) आणि के. नीलकंठशास्त्री यांचे हिस्टरी ऑफ साउथ इंडिया (१९५२) ही पुस्तके या दृष्टीने महत्त्वाची आहेत. मद्रास विद्यापीठाने संगमसाहित्याचा ऐतिहासिक दृष्ट्या आढावा घेण्याचे काम हाती घेतले आहे, तर डेक्कन कॉलेजमधील एस्. वैद्यनाथन् यांनी संगमसाहित्यातील संस्कृत शब्दांचा अभ्यास केला आहे. अन्नमलई विद्यापीठाने संगमसाहित्यातील सर्व शब्दांची सूची तयार केली आहे. याच विद्यापीठात तमिळमधील तंत्र व शैव साहित्यावर संशोधन चालू आहे.

द्रविड भाषांच्या व्याकरणावर पूर्वीपासूनच बरीच पुस्तके झाली आहेत. रेव्ह. कॉल्डवेल ह्यांचे ए कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ द्रविडियनलॅग्वेजिस (१८५६) हे पुस्तक म्हणजे या दिशेने केलेला आधुनिक काळातील बहुधा पहिला प्रयत्न होय.

कामील झ्वेलेबिल ह्याने ‘वन् हंड्रेड यीयर्स ऑफ द्रविडियन कंपॅरेटिव्ह फिलॉलॉजी’ (१९६१) या शोध निबंधात १९५६ पर्यंत द्रविडियन भाषाशास्त्राच्या क्षेत्रात जगभर झालेल्या कामगिरीचा आढावा घेतलेला आहे. अमेरिकेतील बर्कली विद्यापीठ, इंग्लंडमधील ऑक्स्फर्ड विद्यापीठ आणि पुण्यातील डेक्कन कॉलेज ही या क्षेत्रातील आघाडीवरची केंद्रे होत. तमिळ विश्वकोशाचे काम पूर्ण झालेले असून तेलुगू विश्वकोशाचेही काम चालू आहे. अन्नमलई विद्यापीठ साहित्यिकांचा चरित्रकोश तयार करीत आहे. या चारही भाषांचे विविध प्रकारचे कोशही तयार केले जात आहेत. आंध्र विद्यापीठ तेलुगू भाषेचे व्युत्पत्तिकोश तयार करीत आहे. रशियन - तमिळ, फ्रेंच - तमिळ, इंग्लिश - कन्नड इ. प्रकारचे शब्दकोशही तयार होत आहेत. मलाया विद्यापीठ द्रविड विद्येच्या विविध पैलूंची ओळख करून देणारी सूची तयार करीत आहे.

डेक्कन कॉलेजने तमिळ भाषेच्या बोलींचे संशोधन केले आहे. भारत सरकारचा मानववंशशास्त्र विभाग द्रविड भाषा बोलणाऱ्या जमातींचा अभ्यास करीत आहे. द्रविड लोकगीतांचा व लोककथांचा अभ्यास चालू आहे. द्रविड भाषांतील महत्त्वाच्या ग्रंथांचे सूक्ष्मपट करून प्रकाशन केले जात आहे. अन्नमलई विद्यापीठात प्राचीन तमिळ संगीतावर संशोधन होत आहे. विविध राज्यसरकारांबरोबरच अनेक मठही शिष्यवृत्त्या व पारितोषिके देऊन या अध्ययनाला उत्तेजन देत आहेत. पुस्तकांच्या स्वस्त आवृत्त्याही प्रकाशित केल्या जात आहेत. विविध विद्यापीठे व आंध्र साहित्य परिषदेसारख्या संस्था महत्वाचे संशोधनकार्य करीत आहेत. भारतीय विद्यापीठांप्रमाणेच परदेशातील मॉस्को, केंब्रिज इ. विद्यापीठांतूनही द्रविडविद्येवर व्याख्यानमाला होत आहेत.

प्राचीन मराठी साहित्य

म्हाइंभट्टांचे लीळाचरित्र (सु. १२७८) हा मराठीतील पहिला संशोधनपर ग्रंथ म्हणता येईल. एकनाथांनी केलेले ज्ञानेश्वरी चे शुद्धीकरण (१५८४), महीपतीने (१७१५ - ९०) लिहिलेली संतचरित्रे इत्यादींनाही संशोधनेच म्हणावे लागेल. अर्थात, भारतविद्या ही संकल्पना अस्तित्वात येण्यापूर्वी झालेले हे काम आहे. आधुनिक काळात वि. का. राजवाड्यांनी ज्ञानेश्वरी ची चिकित्सक आवृत्ती तयार केली (१९०९), महानुभाव लिपीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी संशोधन केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पांगारकर, शंकरराव देव, द. वा. पोतदार, वि. ल. भावे आदींनी काम केले. देवांनी धुळे येथे समर्थ वागदेवता मंदिर स्थापन केले. तेथे सु. २००० मराठी हस्तलिखिते आहेत. विदर्भात डॉ. वि. भ. कोलते वगैरेंनी महानुभाव पंथाचा विशेष अभ्यास केला. प्रियोळकरांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या मराठी संशोधन मंडळाने संशोधनाचे महत्वपूर्ण काम केले. मुंबईत विशेषतः यूरोपीय धर्मप्रचारकांच्या साहित्याचे संशोधन झाले. राजारामशास्त्री भागवतांनी फादर स्टीफन्स याच्या क्रिस्तपुराणा चा १९०६ सालीच परिचय करून दिला. तंजावर सरस्वती महाल ग्रंथालयाने अनेक प्रकाशने केली. तेथे मराठी हस्तलिखितांचा मोठा संग्रह आहे. राजवाडे संशोधन मंडळ (धुळे), भारत इतिहास संशोधन मंडळ (पुणे) इत्यादींचे संशोधन कार्य चालू आहे.

प्राचीन हिंदी साहित्य

हिंदी साहित्याचा पहिला इतिहास फ्रेंच विद्वान गारसँ द तासी ह्याने १८६८ साली पॅरिस येथे प्रसिद्ध केला. हिंदी साहित्याच्या इतिहासावरील दुसरा ग्रंथ जॉर्ज ए. ग्रीअर्सन ह्याने प्रथम शोधनिबंधाच्या रूपाने व्हिएन्ना येथे १८८६ साली झालेल्या प्राच्यविद्यापरिषदेत वाचला होता. हिंदी साहित्याच्या इतिहासावर आचार्य रामचंद्र शुक्ल, श्यामसुंदर दास, रामकुमार वर्मा, हजारीप्रसाद द्विवेदी, राहुल सांकृत्यायन इत्यादींनी महत्वपूर्ण लेखन केले आहे.

ग्रीअर्सन ह्याने लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया या पुस्तकात विविध भाषांचा व बोलींचा अभ्यास केला (१९०७ - ०८). या ग्रंथाचे स्थान भारतीय भाषांच्या विश्वकोशासारखे आहे. जे. बीम्स ह्याने भारताच्या आधुनिक आर्यभाषांचे तुलनात्मक व्याकरण लिहिले (१८७५), एस्. एच्. केलॉग ह्याने हिंदी भाषेचे व्याकरण लिहिले (१८९३), रूडॉल्फ होर्नले ह्याने गौडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण लिहिले (१८८०).

प्रागितिहास व आद्येतिहास

मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडास प्रागितिहास अशी संज्ञा दिली जाते. ज्या काळाबाबत लिखित स्वरूपातील पुरावा उपलब्ध होतो, तो सर्व कालखंड इतिहास ह्या सदरात मोडतो. ज्या काळात लेखनाची काही पद्धत प्रचलित होती; पण तिचा उलगडा करता आलेला नाही, तो काळ आद्य इतिहास ह्या वर्गात मोडतो. रॉबर्ट ब्रुस फुट ह्याने प्रागैतिहासिक भारतातील विविध वस्तू शोधून त्यांच्या दोन सूची प्रकाशित केल्या होत्या. त्यांच्या प्रेरणेने ए. सी. लोगन ह्याने १९०६ साली पुराणाश्म युगातील तोपावेतो सापडलेल्या पुराव्यांवर एक उत्कृष्ट पुस्तक लिहिले. १९३० साली एल्. ए. कॅमेड ह्याने एम्. सी. बर्किट ह्याच्या सहकार्याने कृष्णाखोऱ्यातील संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित केले. १९३० नंतर हेल्मूट द तेर्रा आणि टी. टी. पॅटर्सन ह्यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर खोरे व उत्तर पंजाबमध्ये संशोधनाची मोहीम झाली. तिच्यामुळे अश्मयुगाविषयी बरीच माहिती मिळाली. त्यानंतर कृष्णस्वामी यांनी मद्रास परिसराचे (१९३८) आणि टॉड ह्याने मुंबईजवळील किनाऱ्याचे (१९३९) अध्ययन केले. एन्. के. बोस व डी. सेन यांनी बंगालमध्ये (१९४८) तर ह. धी. सांकलिया यांचे गुजरात आणि महाराष्ट्र येथे संशोधन सुरू झाले (१९४१). १९४९ साली त्सॉइनर ह्याच्या नेतृत्वाखाली प्रागैतिहासिक काळाचे अध्ययन करण्याची एक मोहीम हाती घेण्यात आली होती. सांकलिया व त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी भारताच्या विविध भागांतून संशोधन केले आहे. बी. बी. लाल यांचे पश्चिम बंगालमधील बरद्वान जिल्ह्यातले संशोधन महत्वाचे आहे.

हडप्पा (सिंधू) संस्कृती निर्माण होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्कृतीविषयीही उत्खननाद्वारे संशोधन केले जात आहे. सी - १४ या कालनिश्चितीच्या पद्धतीची या सर्व संशोधनात मदत होत आहे. सर ऑरेल स्टाइन आणि एच्. हारग्रीव्हझ ह्यांनी बलुचिस्तानमध्ये आणि एन्. जी. मजुमदार यांनी सिंधमध्ये केलेल्या संशोधनाने या संस्कृतींची माहिती उजेडात आली. व्ही. जी. चाइल्ड, स्ट्यूअर्ट पिगट, गॉर्डन, ब्रिगे. रॉस, बी. द. कार्दी ह्यांसारख्यांनी या संस्कृतींचे विशेष अध्ययन केले आहे. कुल्ली, नाल, क्वेट्टा, आम्री इ. संस्कृती या गटात मोडतात.

हडप्पा येथील मुद्रांचे ऐतिहासिक महत्व सर जॉन मार्शल यांनी सर्वप्रथम ओळखले. १९२१ साली रायबहादुर दयाराम साहनी यांनी हडप्पा येथे आणि १९२२ साली आर्. डी. बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडो येथे केलेल्या उत्खननांतून सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय इतिहासाला एक कलाटणीच मिळाली. मार्शल, मॅकी, व्हीलर, गॉर्डन, वॅट्स इत्यादींनी या संस्कृतीवर मौलिक स्वरूपाचे संशोधन केले आहे. ऑरेल स्टाइन, एन्. जी. मजुमदार, एस्. आर्. राव, जे. एम्. नानावटी, पी. पी. पांड्या, ए. घोष, एम्. एन्. देशपांडे यांचेही कार्य महत्वाचे आहे.

हडप्पा येथील (सिंधू) संस्कृती ज्यांनी नष्ट केली, त्यांच्या उत्तरकालीन संस्कृतीला सीमेटरी एच्. कल्चर असे म्हणतात. गॉर्डन चाइल्ड आणि व्हीलर यांनी या संस्कृतीचे लोक आर्य असल्याचे मानले होते. हडप्पा ह्या ठिकाणानंतर झुकर या सिंधमधील स्थानावरून त्या नावाची संस्कृती उपलब्ध झाली आहे. गंगेच्या खोऱ्यातील तांब्याच्या वस्तूंचे बरेच अध्ययन करण्यात आले आहे. पिगट, हाइन गेल्डर्न, लाल आणि गॉर्डन यांचे या क्षेत्रातील संशोधन महत्वाचे आहे. याच प्रदेशात चित्रित राखी मृतपात्रांतून व्यक्त होणारी एक संस्कृती सापडली असून लाल यांनी तिचे विशेष संशोधन केले आहे. राजस्थानात बनास व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात काळी आणि तांबडी मृतपात्रे आढळली. मध्य प्रदेशातील नावडातोडी येथे काही प्राचीन अवशेष मिळाले आहेत. महाराष्ट्रातील प्रवरा नदीच्या काठी जोर्वे येथे काही खापरे सापडली. छोटा नागपूरचे पठार, आसाम, काश्मीर इ. ठिकाणीही उत्खनने झाली आहेत.

प्राचीन भारतीय इतिहास

केवळ सनावळ्या हे आता भारतीय इतिहासाचे स्वरूप राहिलेले नसून भारतीय समाजाचा सर्वांगीण विकास स्पष्ट करणे, हे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे. इतिहासविषयक संशोधनाची बरीच माहिती प्रस्तुत नोंदीच्या इतर विभागांतून आली आहे. त्यामुळे येथे काही मोजक्या घटनांचा निर्देश करावयाचा आहे.

सेक्रिड बुक्स ऑफ द ईस्ट  या ग्रंथमालिकेने भारतविद्येच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी केली आहे. प्राचीन भारतातील साहित्याचा इतिहास अनेक विद्वानांनी लिहिला आहे. माक्स म्यूलर, वेबर, फ्रेझर, मॅकडॉनेल, ओल्डेनबुर्ख, मकहेन्री, पिशेल, फार्कर, विंटरनिट्स आणि वैद्य यांचे ग्रंथ ह्या संदर्भात महत्वपूर्ण आहेत. पार्जिटर ह्याचे द पुराण टेक्स्ट ऑफ द डिनॅस्टीज ऑफ कलि एज (१९१३) आणि एन्शंट इंडियन हिस्टॉरिकल ट्रॅडिशन (१९२२) हे ग्रंथ फार महत्वाचे मानले जातात. प्रधान ह्यांचा द क्रनॉलॉजी ऑफ एन्शंट इंडिया (१९२७) हा ग्रंथही उल्लेखनीय आहे.

भारतीय इतिहासावर काम करणाऱ्या काही पाश्चात्यांची मते पूर्वग्रहदूषित होती. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज येथून प्रसिद्ध झालेले भारताचे इतिहासही याला अपवाद नव्हते. भारतीय विद्वानांच्या लेखनात पाश्चात्यांच्या या वृत्तीवरील प्रतिक्रिया दिसून येते.

भारतीय साहित्याच्या इतिहासावर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांत डे आणि दासगुप्ता यांचा संस्कृत साहित्याचा इतिहास (१९४७), लॉ यांचा पाली साहित्याचा इतिहास (१९३३) वेबर, बारोडिया वगैरेंचे जैन साहित्याचे इतिहास, हजरा, पाटील, दीक्षितार वगैरेंचे पुराणे व उपपुराणे यांवरील संशोधन, दीक्षितार यांचा दक्षिणेतील संगम साहित्याचा इतिहास आणि पां. वा. काणे यांचा धर्मशास्त्राचा इतिहास (१९३० - ६२) ह्यांचा समावेश होतो. आर्यांचे भारतातील आगमन, त्यांचे मूळ स्थान, भारतातील प्रवेशाचा काळ, भारतातील विस्तार, अनार्यांबरोबरचे संबंध इ. बाबतींत विद्वानांमध्ये खूप मतभेद आहेत. महाभारतयुद्धाच्या काळाविषयीही असेच मतभेद आहेत. पुसाळकरांनी मनुवैवस्वताच्या काळापासून प्राचीन भारताच्या इतिहासाचे पाच मुख्य कालखंड पुढीलप्रमाणे मानले आहेत. ययाती कालखंड (इ. स. पू. सु. ३००० - २७५०), मांधातृ कालखंड (इ. स. पू. सु. २७५० ते २५५०), परशुराम कालखंड (इ. स. पू. सु. २२५० ते २३५०), रामचंद्र कालखंड (इ. स. पू. सु. २३५० - १९५०), कृष्णकालखंड (इ. स. पू. सु. १९५० - १४००).

जैन आणि बौद्ध साहित्यांतून ज्यांचे वर्णन आढळते त्या सोळा महाजनपदांवरील संशोधन झाले आहे. लॉ, मेहता, अगरवाल आणि जे. सी. जैन यांचे या विषयावरील काम महत्वपूर्ण आहे. शिशुनाग, नंद आदी राजवंशांतील राजांच्या राज्यकारभारावर बरेच संशोधन झालेले असले, तरी अद्यापि अनेक प्रश्न शिल्लक आहेत. बुद्धाचे महानिर्वाण ही घटना प्राचीन इतिहासाचे कालक्रम ठरविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून संशोधकांच्या मते ही घटना इ. स. पू. सु. ५४३ मध्ये घडून आली. अलेक्झांडरचे आक्रमण ही देखील प्राचीन भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना असून तिच्याविषयी अनेक संशोधकांनी लिहिले आहे. सम्राट अशोकाचे अनेक शिलालेख मिळत असल्यामुळे भारताच्या साऱ्या इतिहासाला एकप्रकारे त्याच्यापासूनच सुरुवात होते.

भांडारकर, मजुमदार, वुल्नर, आदींनी अशोकाविषयी लिहिले आहे. मौर्यानंतर आलेल्या शुंगराजांविषयीही संशोधन झाले आहे. सरकार, मिराशी, प्रझिलूस्की आदींनी सातवाहनांविषयी विशेष संशोधन केले आहे. सातवाहनांचा समग्र इतिहास व राजकारण यांचे विवेचन करणारे अर्ली हिस्टरी ऑफ आंध्र कंट्री  (१९४१) हे गोपालाचारी यांचे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे.

ग्रीक, पार्थियन, सिथीयन या लोकांचा इ. स. पू. पहिल्या शतकापासून भारताशी संबंध आला. या विषयावर तार्न ह्याने लेखन केलेले आहे. ए. के. नारायण यांचे द इंडो-ग्रीक्स (१९५७) हे पुस्तक भारतीय व ग्रीक लोकांच्या संबंधाचे उत्कृष्ट विवेचन करते. सिथीयन लोकांबरोबरच्या संबंधाचे विवेचन व्हॅन, डे, लेव्ही, बॅनर्जी, फ्लीट, रॅप्सन वगैरेंनी करून महत्त्वपूर्ण काम केले आहे. शकांच्या कालक्रमाबाबतच्या प्रश्नांवर जयस्वाल आणि कॉनॉव्ह यांनी लिहिले आहे.

विक्रम व शकसंवताविषयी आळतेकर, भांडारकर, द्विवेदी, मजुमदार आणि सरकार यांनी विशेष लेखन केले आहे. पश्चिमेकडील क्षत्रपांविषयी भगवानलाल इंद्रजी आणि रॅप्सन यांनी लेखन केले आहे. अयंगार, बॅनर्जी, उपाध्याय, दांडेकर, सॅलेटोर, मजुमदार, आळतेकर, दीक्षितार वगैरेंनी गुप्त राजांविषयी लिहिले आहे. अयंगार आणि जगन नाथ यांनी हूणांविषयी तर मजुमदार, आळतेकर व मिराशी यांनी वाकाटकांविषयी लेखन केले आहे. संपूर्णानंद, पणिक्कर, मुखर्जी, वैद्य आणि चतर्जी यांनी हर्षवर्धनाविषयी लेखन केले आहे. गांगुली, वेंकटरमणय्य, प्लीट, शर्मा, आणि राव यांनी चालुक्यांविषयी, तर आळतेकर वगैरेंनी राष्ट्रकूटांविषयी संशोधन केले आहे. बृहदभारताविषयी एम्. ए. स्टाइन, एस्. सी. दास, बी. आर्. चटर्जी, आर्. सी. मजुमदार, पी. के. मुखर्जी, पी. सी. बागची वगैरेंनी संशोधन केले आहे.

गोपालन्, मीनाक्षी आणि फादर हेरास यांनी पल्लवांविषयी, तर शेषअय्यर व वर्मा यांनी चेर राजांविषयी लेखन केले आहे. भारतीय संस्कृतीला दक्षिणेने दिलेल्या योगदानाचा विचार द तमिलस १८०० यीयर्स अगो या ग्रंथात करण्यात आला आहे. मूरायस आणि गाय यांनी कदंबांचा आणि नीलकंठशास्त्रींनी पांड्य व चोलराजांचा इतिहास लिहिला आहे.

प्राचीन भारतीय भूगोल

प्राचीन भारतीय भूगोल ही अध्ययनशाखा फारशी विकसित नाही. १७९३ साली सर विल्यम जोन्स ह्याने प्राचीन भारतीय भौगोलिक शब्दकोश करण्याची योजना आखली होती; पण ती पूर्ण झाली नाही. त्यानंतर सु. दीडशे वर्षांनी डॉ. फोगेल ह्याने बृहदभारताचा भौगोलिक नकाशासंग्रह तयार केला. परंतु प्राचीन भारताचा भौगोलिक शब्दकोश करण्याचा त्याचा संकल्प अपुरा राहिला. भारतीय पुरातत्वशास्त्र, नाणकशास्त्र आणि कलांचा इतिहास यांच्या अध्ययनाचे पितृत्व कनिंगहॅम ह्याच्याकडे जाते. त्याने युआन च्यांग ह्या चिनी प्रवाशाच्या प्रवासवृत्ताच्या आधारे भौगोलिक स्थानांचे विवेचन करणारा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला होता. ग्रीक लेखकांच्या लेखनावरून मॅक् क्रिंडल ह्याने प्राचीन भारताच्या भूगोलाविषयी विपुल लेखन केले आहे. आर्. सी. मजुमदार, सर ऑरेल स्टाइन, पॉल पेल्यो, फ्लीट, सिल्हँ लेवी, फेरां, नीलकंठशास्त्री आदींनी या क्षेत्रात मौलिक कामगिरी केली आहे.

डब्ल्यू. किरफेल ह्याने वेगवेगळ्या तीन ग्रंथांतून (१९२०, १९३१, १९५४) पुराणातील भूगोलाविषयी लेखन केले आहे. नंदो लाल डे यांनी जिऑग्रॅफिकल डिक्शनरी ऑफ एन्शंट अँड मिडिव्हल इंडिया (द्वि. आवृ. १९२७) हा अत्यंत महत्वपूर्ण असा ग्रंथ प्रकाशित केला. बी. सी. लॉ यांचे हिस्टॉरिकल जिऑग्रॅफी ऑफ एन्शंट इंडिया (१९५४), जिऑग्रॅफिकल एसेज इ. ग्रंथ महत्वपूर्ण आहेत. जयचंद्र विद्यालंकार यांचा भारतभूमि और उसके निवासी (१९३०) हा ग्रंथ असाधारण महत्वाचा मानला जातो. जिऑग्रॅफिकल बेसिस ऑफ इंडियन हिस्टरी (१९२६) हे त्यांचे पुस्तकही महत्वाचे आहे. राय कृष्णदास, पार्जिटर, पां. वा. काणे, ह. धी. सांकलिया इत्यादींचे या क्षेत्रातील कामही लक्षणीय आहे. अरबस्तानातील मुस्लिम लेखकांनी भारताविषयी भौगोलिक माहिती विपुल प्रमाणात लिहिली असून डॉ. जी. फेरां ह्याने हे लेखन दोन खंडांमध्ये एकत्रितपणे प्रसिद्ध केले आहे.

ऐतिहासिक पुरातत्वविद्या

१८३४ - ३७ या काळात जेम्स प्रिन्सेप ह्याने ब्राह्मी व खरोष्ठी लिपींचा उलगडा करण्याचे महत्वाचे काम केले. १८६१ साली सरकारने अलेक्झांडर कनिंगहॅम ह्याच्या नेतृत्वाखाली इंडियन आर्किऑलॉजिकल सर्व्हे ही संस्था स्थापन केली. पुढे कनिंगहॅम ह्याने १८६० - ८४ या काळात केलेल्या संशोधनाचा वृत्तांत आर्किऑलॉजिकल रिपोर्टस या नावाने तेवीस खंडांत प्रसिद्ध झाला. कनिंगहॅम ह्याच्या निवृत्तीनंतर (१८८५) शिल्पांच्या व स्मारकांच्या अध्ययनाला महत्व आले. या क्षेत्रात बर्जेस, अलेक्झांडर रे, स्यूएल, इत्यादींनी महत्वाचे संशोधन केले.

सर जॉन मार्शल ह्याने १९०४ साली एन्शंट मॉन्यूमेंट्स प्रिझर्व्हेशन अँक्ट करवून घेतला.

अशोकाचा व अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीचा काळ निश्चित करण्याचे महत्वपूर्ण कार्य झाले. १८८९ साली कॅप्टन ले ह्याने मन्शेरा रॉक एडिक्ट (शैललेख) शोधून काढला. १८९१ साली राइस ह्याने तीन शैललेख (म्हैसूर मायनर रॉक एडिक्टस) शोधून काढले. फ्यूरर ह्याने १८९५ साली निगाली सागर पिलर एडिक्ट (स्तंभलेख) शोधून काढला. त्याने त्याच सुमारास मथुरा येथील एक जैन स्तूप उत्खनन करून काढल्यामुळे जैन धर्माची प्राचीनता स्पष्ट झाली. नंतरच्या संशोधनामुळे मथुरेचे अस्तित्व इ. स. पू. पहिल्या सहस्त्रकात असल्याचे सिद्ध झाले. डब्ल्यू. सी. पेप आणि व्ही. ए. स्मिथ यांनी १८९८ साली बस्ती जिल्ह्यात एक स्तूप शोधून काढला. महावीराचे जन्मस्थान असलेल्या वैशालीची ओळख उत्खननानंतरच पटली. बुद्धाच्या निर्वाणाचे कुशिनगर म्हणजेच कासिआ (जि. देवरिया) येथे १८७६ साली उत्खनन झाले.

नंतरच्या काळात भारतातील असंख्य ठिकाणी उत्खनन करण्यात आले आहे. श्रावस्ती, लौरिया, पाटलिपुत्र, बुलंदीगड, मगधाची राजधानी राजगृह म्हणजेच सध्याचे राजगीर, हस्तिनापूर, कौशाम्बी, वाराणसीजवळील राजघाट, जयपूरजवळील बाय्‌रात, द्वारका, भडोच, उज्जैन, भुवनेश्वरजवळील शिशुपाळगड, तामलूक (जि. मिदनापूर), कलकत्त्याजवळील चंद्रकेतुगड, रत्नागिरी (जि. कटक) नागार्जुनकोंडा, (आंध्र प्र.), धरणीकोटा (जि. गुंतूर), कावेरीपटनम् (जि. तंजावर), कोल्हापूर, नासिक, पाँडिचेरीजवळील अरिकामेडू ही त्यांपैकी काही प्रमुख ठिकाणे होत. या उत्खननांद्वारे भारताच्या इतिहासातील हरवलेले अनेक दुवे शोधून काढण्यात आले आहेत. लोखंडाचा वापर, पशुपालन, शिकार, लिपी, भांडी, दागिने, कला, नाणी, व्यापार, इतर देशांशी संबंध, धर्मकल्पना, राजकीय व आर्थिक जीवन इ. विषयी प्रचंड माहिती या संशोधनामुळे उपलब्ध झाली आहे.

कला व वास्तुशास्त्र

केर्न इन्स्टिट्यूटने लायडन येथून प्रसिद्ध केलेला अँन्युअल बिब्लिऑग्रॅफी ऑफ इंडियन आर्किऑलॉजी (१९२६) हा ग्रंथ या क्षेत्रातील ग्रंथांची तपशीलवार सूची आहे. इंडियन आर्किऑलॉजी - ए रिव्यू या पत्रिकेतून या विषयावरील संशोधन प्रसिद्ध होत असते. तसेच मार्ग (मुंबई), ईस्ट अँड वेस्ट (रोम), ललितकला (नवी दिल्ली), रूपलेखा (नवी दिल्ली), Aritbus Asiae (न्यूयॉर्क) आणि आर्ट अँड लेटर्स (लंडन) या शोधपत्रिकांमधून या क्षेत्रातील संशोधन प्रसिद्ध होत असते. या क्षेत्रात कनिंगहॅम आणि जेम्स बर्जेस यांनी तसेच त्यांचे सहकारी असलेल्या बेग्लर, काउसेन्स, रे, इ. स्मिथ यांनी महत्वपूर्ण असे कार्य केले होते. जे. फर्ग्युसन आणि पी. ब्राउन यांचे वास्तुशास्त्रावरील ग्रंथ महत्वाचे आहेत. विविध प्रकारे चाललेल्या संशोधनामुळे बौद्ध, कुशाण, गुप्त इत्यादींच्या कलेचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. विहार, स्तूप, मठ इत्यादींचा शोध लागला आहे. प्राचीन भारतीय नगरांची संरक्षणव्यवस्था समजली आहे. अजंठा, वेरूळ, पितळखोरा (जि. औरंगाबाद) इ. ठिकाणची लेणी सापडली आहेत.

सरकारच्या आर्किऑलॉजिकल सर्व्हे या विभागाने 'टेंपल सर्व्हे' या नावाने मंदिरांच्या सर्वेक्षणाचा प्रकल्प हाती घेतला. या विभागाने केलेल्या सर्वेक्षणावर आधारित असे अनेक प्रबंध प्रकाशित झाले आहेत. कृष्णदेव ह्यांनी खजुराहोवर (१९५९) आणि के. आर्. श्रीनिवासन् यांनी पल्लवमंदिरांवर (१९५८) लेखन केले. पी. के. आचार्य यांनी मानसाराच्या वास्तुशास्त्रविषयक ग्रंथाचे संपादन व भाषांतर केले (१९२७). त्यांनी हिंदू वास्तुशास्त्रावरील शब्दकोश व विश्वकोशही प्रसिद्ध केला (१९२७). त्यानंतर वास्तुशास्त्रावर जे अनेक ग्रंथ झाले, त्यांपैकी सोमपुरा यांनी संपादित केलेला विश्वकर्मालिखित दीपार्णव हा महत्वाचा ग्रंथ होय. राम राझ यांनी १८३४ सालीच हिंदू वास्तुशास्त्रावर काही निबंध लिहिले होते.

बी. बी. दत्त यांनी टाउन प्लॅनिंग इन एन्शंट इंडिया हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला (१९२५). एम्. ए. ढाकी आणि जे. एम्. नानावटी यांनी गुजरातमधील मंदिरांवर लेखन केले आहे.

क्रॅमरिश ह्याने हिंदू मंदिरांवर द्विखंडात्मक असा एक अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला आहे (१९४६). भारतीय वास्तुकलेवर पाश्चात्यांचा किती प्रभाव आहे, याविषयी भिन्न भिन्न मते असून व्ही. ए. स्मिथ ह्याने ए हिस्टरी ऑफ फाइन आर्टस इन इंडिया अँड सिलोन (१९११) या ग्रंथात अत्यंत समतोल विचार मांडले आहेत. खाजगी घरांच्या रचनेचा आणि युद्धाच्या दृष्टिकोणातून उभारलेल्या वास्तुशिल्पांचाही अभ्यास केला जात आहे.

प्रिन्सिपल्स ऑफ कॉपोझिशन इन इंडियन स्कल्प्चर (१९६२) हे ॲलिस बॉनरचे भारतीय शिल्पशास्त्रावरील पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. एच्. गट्स, सरस्वती, क्रॅमरिश, सी. शिवराममूर्ती, हॅवेल, कुमारस्वामी, त्सिमर इत्यादींचे शिल्पकलेवरील लेखन लक्षणीय आहे.

भाजलेल्या मातीच्या विविध वस्तूंवरून प्राचीन संस्कृतीच्या विविध पैलूंचा उलगडा होतो. सी. सी. दासगुप्ता यांचे या विषयावरील ऑरिजिन अँड एव्हलूशन ऑफ इंडियन क्ले स्कल्प्चर (१९६१) हे उल्लेखनीय असे पुस्तक आहे.

प्रारंभी कामशिल्पांच्या अध्ययनाची उपेक्षा झाली. एवढेच नव्हे, तर या विषयाचा तिरस्कारही करण्यात आला. परंतु आता या बाबतीत संशोधकांचा दृष्टीकोण बदललेला आहे. मार्ग या संशोधनपत्रिकेत १९४८ साली या विषयाचे अत्यंत विस्तृत असे विवेचन करण्यात आले आहे. जूल्यस इव्होला, फाउशे वगैरेंनी कामशिल्पांविषयी महत्त्वपूर्ण लेखन केले आहे.

धातूमधील शिल्पकलेचा आढावा कार यांनी उत्तम रीतीने घेतला असून या विषयावर ओ. सी. गांगोली, सी. शिवराममूर्ती, डी. आर्. थापर, यू. पी. शाह, के. खंडालवाला वगैरेंनी संशोधन केले आहे.

अजंठा, वेरूळ, ऐहोळे, बादामी इ. ठिकाणची चित्रकला शोधून काढण्यात आली आहे. पी. ब्राउन ह्याचा इंडियन पेंटिंग (१९४७) हा ग्रंथ या क्षेत्रातील कामाचा विस्तृत आढावा घेणारा आहे. हॅवेल, क्रॅमरिश, याझदानी, रॉसन यांचेही या विषयावरील लेखन प्रसिद्ध आहे. गॉर्डन, एम्. घोष, पी. मित्र, व्ही. एस्. वाकणकर वगैरेंनी शैलचित्रांवर (रॉक पेंटिंग) लेखन केले आहे.

पुरालेख

भारतात इतिहासग्रंथांचा अभाव आहे; परंतु शिलालेख, ताम्रपट इत्यादींमुळे ही उणीव काही अंशी भरून निघाली आहे आणि विविध राजवंश, कला, धर्म, साहित्य इत्यादींच्या इतिहासलेखनाला खूप मदत झाली आहे. एशियाटिक सोसायटीतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या शोधपत्रिकेच्या पहिल्याच खंडात जनरल कार्‌नॅक ह्याने अरिकेसरीन् नावाच्या शिलाहार राजपुत्राच्या काही ताम्रपटांचा अनुवाद केला. श्री वर्म सूरी नावाच्या जैन मुनींनी वाचलेल्या काही ताम्रपटांचा अर्थ एच्. एच्. विल्सन ह्याने त्याच पत्रिकेच्या पंधराव्या खंडात प्रसिद्ध केला. चार्ल्स विल्किन्झ ह्याने गुप्त लिपीचे आंशिक वाचन केले. मिल, प्रिन्सेप, ट्रॉयर आदींनीही या लिपीतील लेखांचे वाचन केले. विनायकराव औरंगाबादकरांनी काही शिलालेखांचे वाचन केले. जेम्स प्रिन्सेपने ब्राह्मी लिपीतील सर्व अक्षरे प्रथमच उलगडून दाखविली. कनिंगहॅम, होर्नले आदींनी आणखी काही अक्षरे लावली. ब्यूलर ह्याने ब्राह्मी अक्षरांचा शास्त्रशुद्ध असा समग्र तक्ता प्रकाशित केला. यामुळे इतर लिप्यांची अक्षरे ओळखण्याच्या कामाला गती आली. काही राजांच्या नाण्यांवरून एकच मजकूर एका बाजूला ग्रीक व दुसऱ्या बाजूला खरोष्ठी लिपीत होता हे कर्नल मेसन ह्याने दाखवून दिले. हेरास, जी. आर्. हंटर, प्राणनाथ आदींनी हडप्पा, मोहें-जो-दडो इ. ठिकाणच्या मुद्रांवरील लिपी वाचण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अजूनही तो समाधानकारक वाटत नाही. भारतीय पुरालेखविद्येवर एक विस्तृत ग्रंथ ब्यूलर ह्याने प्रकाशित केला आहे. १९१८ साली  गौरीशंकर हीराचंद ओझा यांनी याच प्रकारचा ग्रंथ हिंदीत प्रकाशित केला आहे. कीलहोर्न, देवदत्त रामकृष्ण भांडारकर, एस्. कृष्णस्वामी अयंगार, ल्यूड्यर्स, आर्. स्यूएल आदींनी विविध शोधपत्रिकांमधून प्रसिद्ध झालेल्या असंख्य लेखांच्या सूची प्रकाशित केल्या आहेत. १८९२ साली केवळ याच विषयाला वाहिलेली एपिग्राफिया इंडिका ही शोधपत्रिका उटकमंड येथून प्रसिद्ध होऊ लागली. पुरालेखीय सामग्रीचे पद्धतशीर संकलन करण्याची कल्पना जेम्स प्रिन्सेप ह्याने १८३७ सालीच सूचित केली होती. त्यानुसार अलेक्झांडर कनिंगहॅम, फ्लीट इ. विद्वानांनी कलेक्शन्स ऑफ इंडियन इन्स्क्रिप्शन्स (इं. शी.) हा अनेक खंडात्मक ग्रंथ प्रकाशित केला आहे.

वॉरेन ह्याचे हिंदू पंचांगावरचे कालसंकलित हे पुस्तक १८२५ साली प्रकाशित झाले. जेम्स प्रिन्सेप ह्याने १८३४ साली या विषयावरचे काही तक्ते प्रकाशित केले. कनिंगहॅम ह्याने १८८३ साली, तर याकोबी ह्याने १८९२ - ९३ साली या विषयावरचे आपले लेखन प्रसिद्ध केले. स्वामीकन्नू पिळै यांनी १९२२ साली इंडियन इफिमेरिस नावाचा सप्तखंडात्मक ग्रंथ प्रकाशित केला असून त्यामध्ये इ. स. ७०० ते १७९९ या कालखंडात भारताच्या विविध भागांतून प्रचलित असलेल्या पंचांगांची सर्वांगीण माहिती दिली आहे. विविध विद्वानांनी विक्रमसंवत, शालिवाहन शक इ. कालखंडांचा विविध शिलालेख वगैरेंच्या आधारे अभ्यास केला आहे. देवदत्त भांडारकर, बर्नेल, ब्यूलर, मिराशी, गौरीशंकर ओझा इत्यादींनी अंकांच्या लेखनांचे अध्ययन केले आहे. मौर्य, शुंग, सातवाहन, गुप्त, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, परमार, प्रतीहार, चोल, पांड्य इ. राजवंशांची बरीचशी माहिती या विषयावरील संशोधनाने उपलब्ध झाली आहे. धर्म, साहित्य व कला यांच्या इतिहासलेखनालाही या संशोधनाची मदत झाली आहे. उदा., बीसनगर येथे हीलिओडोरसने उभारलेल्या स्तंभामुळे एका ग्रीकाने भागवत धर्म स्वीकारला होता, हे आपणाला समजले.

प्रतिमाविद्या

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जेम्स प्रिन्सेप ह्याने ब्राह्मी व खरोष्ठी लिपींचा अर्थ लावला आणि त्याद्वारे भारतीय पुरातत्वविद्येचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. परंतु प्रारंभी विद्वानांचे मूर्तीच्या अध्ययनाकडे फारसे लक्ष गेले नव्हते. इ. मूर, व्हान्स केनेडी, जॉन डाउसन, डब्ल्यू. जे. विल्फिन आदींनी हिंदू पुराणकथांवर केलेली कामे मूर्तिकलेच्या अध्ययनाच्या दृष्टीने फारशी महत्वाची नव्हती. भारतातील मूर्तीच्या अध्ययनाचा पहिला महत्वपूर्ण प्रयत्न आल्बेर्ट ग्ऱ्यूनवेडेल ह्याने एक ग्रंथ लिहून (१८९३) केला. ह्या मुळातल्या जर्मन ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर अँग्नेस गिब्सन हिने केले होते. जेम्स बर्जेसने त्यात भर घालून आणि अनेक सुधारणा करून त्याची बुद्धिस्ट आर्ट इन इंडिया या नावाने सुधारित इंग्रजी आवृत्ती १९०१ साली प्रसिद्ध केली. प्रतिमाविद्येच्या संदर्भात दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे फ्रेंच विद्वान आल्फ्रेद फूशे होय. त्याने ग्रंथ, निबंध, व्याख्याने इ. द्वारा आपले संशोधन मांडले.

टी. ए. गोपीनाथराव यांचा एलिमेंट्स ऑफ हिंदू आयकनॉग्रॅफी  हा द्विखंडात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९१४, १९१६). हिंदू प्रतिमाविद्येवरचा हा पहिला महत्वपूर्ण ग्रंथ होय. यात प्रामुख्याने दक्षिणेतील मूर्तीचा विचार केला आहे. एच्. कृष्णशास्त्री व बी. सी. भट्टाचार्य यांचेही ग्रंथ उपयुक्त आहेत. आनंद केंटिश कुमारस्वामी (१८७७ - १९४७) यांचे यक्षाज (१९२८, १९३१) हे दोन भागांतील पुस्तक महत्वाचे आहे. एन्. के. भट्टसाळी यांचे आयकनॉग्रॅफी ऑफ बुद्धिस्ट अँड ब्रॅझनिकल स्कल्प्चर्स इन डाक्का म्यूझिअम (१९२९), ॲलिस गेती हिचे गणेश (१९३६), जी. जोव्हिअन द्यूब्ऱ्यूइलचे आयकनॉग्रॅफी ऑफ साउथ इंडिया (इं. भा.) आणि जे. एन्. बॅनर्जी यांचे द डेव्हलपमेंट ऑफ हिंदू आयकनॉग्रॅफी (दोन आवृत्त्या १९४१, १९५६) ही काही उल्लेखनीय पुस्तके होत.

जेम्स बर्जेस ह्याने दिगंबर जैनांच्या तर हेलन एम्. जॉन्सन यांनी श्वेतांबर जैनांच्या प्रतिमाविद्येवर इंडियन अँटिकेरी या जर्नलमधून लेखन केले. डब्ल्यू. नॉर्मन ब्राउन, बी. सी. भट्टाचार्य, यू. पी. शाह आणि व्ही. एस्. अग्रवाल यांनीही जैन प्रतिमाविद्येवर लेखन केले आहे. बी. टी. भट्टाचार्य यांचा द इंडियन बुद्धिस्ट आयकनॉग्रॅफी (१९२४, सुधारित आवृ. १९५८), वॉल्टर यूजीन क्लार्क याचा द्विखंडात्मक टू लामाइस्टिक पँथिअन्स आणि आनंद केंटिश कुमारस्वामी यांचा एलिमेंट्स ऑफ बुद्धिस्ट आयकनॉग्रॅफी (१९३५) हे बौद्ध प्रतिमाविद्येवरील महत्वाचे ग्रंथ होत. झॉनीन ऑबोयर, मारी तेरेसा द मालमान आणि ओदेते व्हिन्नॉट यांचे ह्या विषयावरचे लेखनही महत्वाचे आहे. काही विद्वानांनी गांधार शैलीच्या प्रतिमाविद्येवर संशोधन केले आहे. वेगवेगळ्या संग्रहालयांतील सूचींमधून बरीच महत्वपूर्ण माहिती आढळते. एन्. जे. क्रोम, जी. कोडेस, एच्. पारमेटिअर, जी. तूची इत्यादींचे इंडोनेशिया, इंडो - चीन, तिबेट इ. देशांतील प्रतिमाविद्येवरचे काम उच्च कोटीचे मानले जाते. कमलेश्वर भट्टाचार्य यांनी कंबोडियामधील हिंदू प्रतिमाविद्येवर ग्रंथ लिहिला आहे (१९६१).

नाणकशास्त्र

१७९० साली प्राचीन भारतीय नाण्यांचे अध्ययन सुरू झाले. त्यानंतर १८२४ मध्ये कर्नल टॉड ह्याने नाण्यांविषयीचा एक लेख प्रकाशित केला. कर्नल व्हेन्चुरा व चार्लस मॅसन यांसारख्या लोकांनीही अनेक नाणी जमविली होती. १८३७ साली विल्सन ह्याने नाण्यांची एक यादी केली. प्रिन्सेप ह्यानेही एक सूची तयार केली. १८४१ साली त्या काळापर्यंत भारतातील नाणकशास्त्राच्या क्षेत्रात झालेल्या कार्याचा अहवाल विल्सन ह्याने तयार केला. इ. टॉमसने १८५८ साली प्रिन्सेपचे एसेज ऑन इंडियन अँटिक्विटिक्स संपादित करून या क्षेत्रात मोलाची भर घातली. अलेक्झांडर कनिंगहॅम ह्याने भारतीय नाण्यांविषयी काही महत्वाचे ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यानेच भारतीय नाणकशास्त्राचा पाया घातला, असे मानले जाते. १८८० - १९०० या कालखंडात नाण्यांच्या संग्रहांच्या अनेक सूची तयार झाल्या. रॉजर्स, गार्डनर, भगवानलाल इंद्रजी, रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांनी या क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले. १८८६ साली एलियटचे कॉइन्स ऑफ सदर्न इंडिया आणि १८९७ साली रॅपसनचे इंडियन कॉइन्स हे ग्रंथ प्रकाशित झाले. व्हिन्सेंट स्मिथ व जॉन अँलन यांनी प्राचीन भारतीय नाण्यांवर महत्वाचे काम केले. त्यांपैकी स्मिथ ह्याने राजकीय इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी नाणकशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला. डॉ. देवदत्त भांडारकरांनी प्राचीन भारतीय नाणकशास्त्रावर १९२१ साली व्याख्याने दिली. आर्. एस्. आर. अयंगार, फादर हेरास, जे. एफ्. फ्लीट, टफ्नेल, एम्. एच्. कृष्ण, टी. देशिकाचारी, के. डी. स्वामिनाथन् आदी विद्वानांचे दक्षिण भारतातील नाण्यांबद्दलचे संशोधन महत्वाचे आहे. दुर्गाप्रसाद, वॉल्श, के. पी. जयस्वाल, व्हाइटहेड इत्यादींनी आहत नाण्यांच्या क्षेत्रात महत्वाचे संशोधन केले आहे. पी. जे. चिन्मुळगुंद, एम्. जी. दीक्षित, जे. एन्. ऊनवाला इत्यादींनी इंडो-ससानियन नाण्यांचा विशेष अभ्यास केला आहे. डब्ल्यू. एलियट, व्हिन्सेंट स्मिथ, कनिंगहॅम, ए. एस्. आळतेकर, पी. जे. चिन्मुळगुंद इत्यादींनी नाण्यांचा धातूंचा विशेष अभ्यास केला आहे.

भारतातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या नाण्यांचा अभ्यास केला. जे. डब्ल्यू लेड्ले आणि  हेन्री टॉमस कोलब्रुक यांनी बंगालमधील सुलतानांच्या नाण्यांचा अभ्यास केला. विल्सन व रॉजर्स यांनी १८४६ व १८८६ साली आदिलशाही सुलतान आणि मलबारचे मुस्लिम राजे यांच्या नाण्यांविषयी शोधनिबंध प्रकाशित केले. जी. पी. टेलर ह्याने गुजराथमधील सुलतानांच्या, तर कॉडरिंग्टन व गिब्ज यांनी १८८० ते १८९० या काळात बहामनी राजांच्या नाण्यांचे अध्ययन केले. सी. जे. रॉजर्स, के. एन्. दीक्षित, राजेंद्रलाल मित्र, सी. आर्. सिंघल, व्ही. एस्. अग्रवाल, आर्. बर्न, एच. ए. शेखानी, एम्. ए. वलीखान, पी. एम्. जोशी इत्यादींचे मोगल व मुस्लिम नाण्यांच्या बाबतींतील संशोधन महत्त्वाचे आहे. याच क्षेत्रात १८७१ साली इ. टॉमस ह्याने लिहिलेला कॉनिकल्स ऑफ द पठाण किंग्ज ऑफ देल्ही हा प्रबंध प्रसिद्ध आहे.

द नुमिस्मॅटिक सप्लीमेंटस्‌ ऑफ द जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही पत्रिका १९०४ साली सुरू झाली. १९१० साली द नुमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था स्थापन झाली. तेव्हापासून त्या संस्थेची संशोधनपत्रिकाही प्रकाशित होऊ लागली. या दोन पत्रिकांमधून अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. द नुमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने केलेले कॉपर्स ऑफ इंडियन कॉइन्स या अनेक खंडात्मक ग्रंथाच्या प्रकाशनाचे काम महत्वपूर्ण आहे.

वैष्णव संप्रदाय

एच्. एच्. विल्सन ह्याचे ए स्केच ऑफ द रिलिजस सेक्ट्स ऑफ द हिंदूज (१८२८, १८३२) हे वैष्णव संप्रदायावरील अगदी प्रारंभीचे लेखन होय. त्यानंतर अर्धशतकाने ए. बार्ट ह्याचा रिलिजन्स ऑफ इंडिया व मोनिअर विल्यम्स ह्याचा रिलिजस थॉट अँड लाइफ इन इंडिया हे ग्रंथ प्रसिद्ध झाले. इ. डब्ल्यू. हॉपकिन्झ ह्याचा द रिलिजन्स ऑफ इंडिया (१८९५) हाही उल्लेखनीय ग्रंथ. एफ्. लॉरिन्सर, जे. म्यूर, रा. गो. भांडारकर, ए. बार्ट, ए. वेबर, जे. केनेडी, कीथ इ. अनेकांनी कृष्ण व भगवद्गीता यांविषयी लेखन केले. ग्रीअर्सन ह्याने भागवत धर्मावर लिहिले. रा. गो. भांडारकरांचा वैष्णविझम, शैक्झिम अँड मायनर रिलिजस सिस्टिम्स  हा प्रथम १९१३ साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ हे या विषयावरील एक अत्यंत मूलभूत व महान योगदान मानले जाते. निकोल मॅक्निकॉल ह्याचा इंडियन थीइझम (१९१५) आणि एच्. सी. रायचौधरी यांचा मटीरिअल्स फॉर द स्टडी ऑफ द अर्ली हिस्टरी ऑफ द वैष्णव सेक्ट (१९२०) हे ग्रंथही महत्वाचे आहेत. चार्लस एलियट ह्याचा हिंदूइझम अँड बुद्धिक्षम लंडन येथून १९२१ साली प्रसिद्ध झाला. जे. गोंडा ह्याने ॲस्पेक्ट्स् ऑफ अर्ली विष्णुइझम हा आपला ग्रंथ १९५४ साली प्रकाशित केला. डी. सी. सरकार, एस्. चट्टोपाध्याय, के. जी. गोस्वामी वगैरेंचेही लेखन प्रसिद्ध आहे भागवतकुमार गोस्वामी यांचा द भक्ति इन एन्शंट इंडिया (१९२२) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

कोलब्रुक ह्याने पंचरात्र पंथाकडे प्रथम लक्ष वेधले. ग्रीअर्सन, एफ्. ओटो श्रडर वगैरेंनीही या विषयावर लिहिले आहे. ए. गोविंदाचार्य स्वामी, विल्सन, बार्ट, मोनिअर विल्यम्स, रा. गो. भांडारकर, बलदेव उपाध्याय वगैरे विद्वानांनी रामानुज, मध्व, निंबार्क, वल्लभ, चैतन्य वगैरेविषयी विविध लेखन केले आहे. आर्. डी. रानडे, बी. पी. बहिरट वगैरेंनी महाराष्ट्रातील वैष्णव पंथाविषयी, तर वि. भि. कोलते वगैरेंनी महानुभाव पंथाविषयी लेखन केले आहे. दक्षिणेतील आळवार संतांविषयीही खूप लेखन प्रसिद्ध झाले आहे.

शैव संप्रदाय

एच्. एच्. विल्सन याने १८६२ साली रिलिजन्स ऑफ इंडिया या ग्रंथात प्रथम या पंथाचा आढावा घेतला. हॉप्किन्झ, मोनिअर विल्यम्स, डब्ल्यू. एच्. साइक्स, सी. पी. ब्राउन, रेव्ह. सी. एग्बर्ट केनेट, डब्ल्यू. सिंप्सन आणि बार्ट यांनीही या विषयांवर काही काम केले होते; परंतु या कालखंडातील काम माहिती जमविण्याच्या स्वरूपाचे होते. या क्षेत्रातील पहिला शिस्तबद्ध प्रयत्न डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या वैष्णविझम, शैविझम अँड मायनर रिलिजस सिस्टिम्स या महान ग्रंथाद्वारे झाला. शैव पंथाचा उगम, विकास इत्यादींचा अभ्यास या पुस्तकात आहे. गोपीनाथ राव, जे. सी. बॅनर्जिया आदींचे कामही महत्त्वाचे आहे. शिव ही देवता वैदिक आहे, ती सिंधू संस्कृतीमधून आली आहे, की द्रविड संस्कृतीतून आली आहे. याविषयी मार्शल, मॉर्टिमर व्हीलर, एस्. चट्टोपाध्याय, कीथ आदींनी भिन्नभिन्न मते मांडली आहेत.

देवदत्त भांडारकर, वा. वि. मिराशी, व्ही. एस्. पाठक, एस्. चट्टोपाध्याय इत्यादींनी पाशुपत शाखेचे; सर भांडारकर, पाठक आणि एस्. चट्टोपाध्याय यांनी कापालिक शाखेचे; ब्यूलर, महामहोपाध्याय कौल, जे. सी. चटर्जी, के. सी. पांडे आदींनी काश्मीरी शैव पंथाचे; सी. जी. ब्राउन, पी. जी. हळकट्टी, वर्थ, फ्लीट, सर भांडारकर आदींनी वीरशैव वा लिंगायत पंथाचे; तर सर भांडारकर, आर्. के. सुब्रह्मण्यम्, सी. व्ही. एन्. अय्यर ह्यांसारख्यांनी तमिळनाडूमधील शैव संप्रदायाचे अध्ययन केले आहे. सर भांडारकर, जे. सी. चटर्जी, दासगुप्ता, के. सी. पांडे वगैरेंनी शैव तत्वज्ञानानुसार महत्वपूर्ण लेखन केले आहे.

शाक्त पंथ

विल्सन, मोनिअर विल्यम्स, बार्ट व हॉपकिन्झ यांनी शाक्त पंथाविषयी प्राथमिक स्वरूपाचे काम केले होते. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकरांनी शक्ती या संकल्पनेचा विकास कसा झाला, याचे विवेचन केले आहे. अर्नेस्ट पेन, मॉरिस विंटरनिट्स, बी. सी. मजुमदार, एन्. एम्. चौधरी, डी. डी. कोसंबी आदींनी महत्वपूर्ण लेखन केले आहे. डॉ. चट्टोपाध्याय यांनी शाक्त पंथाचा विकास वेगवेगळ्या कालखंडांत कसा झाला, ते दर्शविले आहे. शाक्त संप्रदायाशी संबद्ध असे तांत्रिक आचार हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात गेले, की बौद्ध धर्मातून हिंदू धर्मात, तसेच ते परदेशात उत्पन्न झाले की काय याविषयी एच्. पी. शास्त्री, केनेडी, मॅकनिकॉल, बार्ट, पेन, स्पूनर, हॉजसन आदींनी भिन्न भिन्न मते मांडली आहेत. सर जॉन वुड्रॉफ ह्याने तंत्रमार्गावर अनेक ग्रंथ लिहिले. हर्बर्ट व्ही. गंथर ह्याने बौद्ध तंत्रावर आणि मोहनलाल जव्हेरी यांनी जैनतंत्रावर ग्रंथ लिहिले आहेत.

बौद्ध धर्म

बौद्ध धर्माने पाश्चात्यांचे लक्ष भारतविद्येच्या इतर अनेक शाखांच्या आधीच वेधून घेतले होते. १९२८ मध्ये सुरू झालेली द बिब्लिऑग्रॅफी बुद्धिक ही मालिका अत्यंत उत्कृष्ट मानली जात असून तिच्यामध्ये प्रामुख्याने यूरोपीय अभ्यासकांनी बौद्ध धर्मातील सर्व शाखांचे केलेले अध्ययन ग्रथित करण्यात आले आहे. मूळचे पाली व संस्कृत असे अनेक ग्रंथ लुप्त होऊन ते तिबेटी, चिनी इ. भाषांतील भाषांतरांच्या स्वरूपातच राहिल्याने अनेक अभ्यासकांना त्यांचा अभ्यास करता आलेला नाही. अर्थात बौद्ध धर्माची असंख्य संस्कृत हस्तलिखिते नेपाळ, मध्य आशिया, तिबेट, काश्मीर इ. ठिकाणी सापडली आहेत. कौएल, एग्‌लिंग, राजमित्र, बेंडॉल, हरप्रसाद शास्त्री, होर्नले, एफ्. डब्ल्यू. टॉमस, राहुल सांकृत्यायन, आर्. यामाडा इत्यादींनी संस्कृतातील बौद्ध साहित्याच्या महत्वपूर्ण सूची तयार केल्या आहेत.

लंडन येथील पाली टेक्स्ट सोसायटीने पाली साहित्याच्या क्षेत्रात लक्षणीय कार्य केले आहे. भारतात धर्मानंद कोसंबी (१८७६ - १९४७) यांनी पालीच्या चिकित्सक अध्ययनाचा पाया घातला. हार्डी, ओल्डेनबुर्ख, ऱ्हीस डेव्हिड्झ, गायगर आदींनी पालीमधील उपलब्ध साधनांचा अभ्यास केला.

चायनीज बुद्धिस्ट त्रिपिटक आणि तिबेटन बुद्धिस्ट त्रिपिटक हे विश्वकोशात्मक दोन ग्रंथ संस्कृतमधील बौद्ध वाङ्‌मयाच्या संकलनाचे महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. चिनी त्रिपिटकाची आवृत्ती प्रत्येकी हजार पृष्ठांच्या ५५ खंडांत जे. ताकाकुसू आणि के. वाटानाबे यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशित झाली (१९२४ - २९). या आवृत्तीला पुरवणी म्हणून आणखी ३० खंडांची भर घालण्यात आली आहे (१९२९ - ३२). चित्रे, सूची वगैरेंचे १५ खंड जोडून हा १०० खंडांचा ग्रंथ पूर्ण झाला आहे.

चीनमध्ये साम्यवादी सत्ता येण्यापूर्वी बौद्ध धर्माचे संशोधन चीन अध्यात्मविद्या भवन (Chung Kuo Nei hsueh Yuan) ह्यांसारख्या संस्थांतर्फे प्रकाशित होत होते. साम्यवादी सत्तेच्या आगमनानंतर हे कार्य काही प्रमाणात कमी झाले. जपानमध्ये मात्र बी. नांजीओ (मृ. १९२७) ह्याच्या काळापासून बौद्ध धर्मविषयक संशोधन जोराने सुरू आहे. अनेक विद्यापीठांतून व संशोधनसंस्थांतून काम चालू आहे. १९५३ पासून द जॅपनीज असोसिएशन ऑफ इंडियन अँड बुद्धिस्ट स्टडीजतर्फे संशोधनपत्रिका प्रकाशित होते. यू. वोगीहारा, एस्. यामागुची, एच्. नाकामुरा इ. पंडितांनी बौद्ध धर्मविषयक संशोधनाच्या नव्या परंपरा निर्माण केल्या आहेत.

बौद्ध धर्म हा तिबेटी लोकांचा धर्म असला, तरी बौद्ध धर्मावरील बरेचसे आधुनिक संशोधन तिबेटच्या बाहेर झालेले दिसते. याश्के ह्याने प्रथम जर्मन भाषेतून (१८७६) आणि नंतर इंग्लिशमधून (१८८१) तिबेटी शब्दकोश प्रसिद्ध केला. त्यानंतर शरच्चंद्र दास ह्यांनीही एक तिबेटी शब्दकोश प्रसिद्ध केला. (१९०२).

चौदाव्या दलाई लामांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर तिबेटी मठांतील बौद्ध ग्रंथालयांना बरीच झळ पोहोचली. तीतून जे काही वाचले त्याचे रक्षण करण्याच्या ज्या संस्था प्रयत्न करीत आहेत, त्यांपैकी पुढील संस्था प्रमुख होत : गंगटोक येथील इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी, दिल्लीमधील लडाख बौद्धविहार व तिबेट हाउस, पटण्यातील बिहार रिसर्च सोसायटी आणि कलकत्त्यामधील एशियाटिक सोसायटी. जपान, यूरोप आणि अमेरिका येथील अनेक केंद्रांतूनही हे कार्य चालू आहे. सध्या यूरोपीय विद्वान पूर्व आशिया आणि आग्नेय आशियामधील बौद्ध साहित्याचे अध्ययन करीत आहेत. पॅरिस, बर्लिन, लायडन, लंडन, रोम, लेनिनग्राड, वॉशिंग्टन, व्हीन, मॉस्को, गर्टिगेन, म्यूनिक इ. ठिकाणी बौद्ध अध्ययनाची महत्वाची केंद्रे आहेत. सेनारने संपादिलेला महावस्तु (१८८२ - ९७), पूसँसंपादित अभिधर्मकोश (१९२५ - ३१), स्तचेर्‌बात्‌स्की ह्याचा बुद्धिस्ट लॉजिक (१९३० - ३२), तूची ह्याचा तिबेटन पेंटेड स्क्रोल्स (१९४९), एडगर्टनकृत बुद्धिस्ट हायब्रिड संस्कृत ग्रामर अँड डिक्शनरी (१९५३) हे बौद्ध संशोधनातील महत्वपूर्ण ग्रंथ मानले जातात. लेनिनग्राड, पॅरिस, हायडलबर्ग, म्यून्खन, लंडन, ब्रूसेल्स, रोम आणि व्हीन या ठिकाणांहून बौद्ध साहित्य प्रकाशित करणाऱ्या अनेक प्रकाशनमाला आणि संशोधनपत्रिका आहेत.

जी. टरनौअर ह्याने १८३७ साली श्रीलंकेमधून महावंशाची आवृत्ती प्रसिद्ध केली. रवींद्रनाथांच्या विश्वभारतीमध्ये बौद्ध धर्माचे संशोधनकेंद्र निर्माण करण्यात आले. बंगालमध्ये शरच्चंद्र दास, राजेंद्रलाल मित्र, हरप्रसाद शास्त्री, सतीशचंद्र विद्याभूषण इ. विद्वान बौद्ध धर्माचे अध्ययन करीत होते. बनारस, नालंदा, पाटणा, दरभंगा इ. ठिकाणी बौद्ध अध्ययनाची केंद्रे असून १९५७ पासून दिल्ली विद्यापीठात बौद्ध अध्ययनाचे अध्यासन आहे.

पाली त्रिपिटकाची आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. तसेच प. ल. वैद्यांनी बौद्ध संस्कृत ग्रंथांची एक मालिका संपादित केली आहे. डॉ. रघुवीरांनी आपल्या इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन कल्चर या संस्थेमार्फत शतपिटक या नावाने एक व्यापक प्रकल्प हाती घेतला होता. त्यातून तिबेटी व मंगोलियन बौद्ध धर्माविषयी अनेक प्रकाशने झालेली असून वीस खंडांतील तिबेटी संस्कृत शब्दकोशही प्रसिद्ध झाला आहे. पु. वि. बापटसंपादित २१०० यीयर्स ऑफ बुद्धिझम (१९५६) या ग्रंथात गेल्या शतकात भारतात बौद्ध अध्ययनाच्या क्षेत्रात झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे.

जैनविद्या

प्राच्यविद्येच्या क्षेत्रात जैन धर्माच्या व साहित्याच्या खऱ्याखुऱ्या अध्ययनाला काहीशी उशिरा सुरुवात झाली. तरीही भारतविद्येच्या प्रारंभापासूनच विल्सन, टेलर, आउफ्रेख्ट, ब्यूलर, मित्र, कीलहोर्न, याकोबी, बर्नेल, राइस, भांडारकर, वेबर, लॉइमान, काथवटे, पीटर्सन आदींचे या विषयाकडे लक्ष वेधले गेले होते.

एफ्. एल्. पुली ह्याने षड्दर्शनसमुच्चय हा ग्रंथ फ्लॉरेन्समधून १८८७ साली प्रसिद्ध केला. हस्तलिखितांच्या आधारे जैन धर्मग्रंथांचा आढावा घेण्याचे काम पहिल्यांदा ए. वेबर ह्याने केले. ही हस्तलिखिते ब्यूलर ह्याने जर्मनीत पाठविली होती. त्यांतील काही याकोबी, एर्न्स्ट, लॉइमान, होर्नले, बार्नेट इत्यादींनी संपादून प्रसिद्ध केली. काहींचे उत्तम अनुवादही झाले. याकोबी ह्याने जैन धर्माबद्दलचे लोकांचे अनेक पूर्वग्रह दूर करून जैन धर्माच्या अध्ययनाला चालना दिली. डब्ल्यू. शूब्रिंग ह्यान जैन तत्वांचा महत्वपूर्ण आढावा घेणारा एक ग्रंथ जर्मन भाषेत लिहिला. डॉ. कांपूटझ, मा. वा. पटवर्धन, ए. सी. सेन, जे. सी. जैन, ग्लाझेनाप आणि ओटो स्टाइन यांचे कामही जैन धार्मिक वाङ्‌मयाच्या बाबतीत महत्वाचे आहे. ह. दा. वेलणकरांनी जिनरत्नकोश (१९४४) हा महत्वाचा सूचिग्रंथ तयार केला. जैन साहित्याचा आढावा घेणारे अनेक ग्रंथ विविध भारतीय भाषांतून तयार झाले आहेत. गुजरात, ओरिसा, कर्नाटक इ. राज्यांतील जैनधर्मविषयक आढावा घेणारेही अनेक ग्रंथ झाले आहेत.

यू. पी. शहा यांचा स्टडीज इन जैन आर्ट (१९५५) आणि टी. एन्. रामचंद्रन् यांचा जैन मॉन्यूमेंट्स (१९४४) हे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, याकोबी, एस्. सी. घोषाल, ए. चक्रवर्ती, जे. एल्. जैनी, आ. ने. उपाध्ये आदींचे जैन तत्वज्ञानावरचे काम महत्वाचे आहे. पं. सुखलालजी, पं. महेन्द्रकुमारजी वगैरेंचे जैन न्यायशास्त्रावरचे काम महत्वाचे आहे. एफ्. डब्ल्यू. टॉमस याने स्याद्वादमंजरीचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले आहे (१९६०). जैन कर्मसिद्धान्त, अनेकान्तवाद, नैतिक वास्तववाद, योग, मानसशास्त्र, श्रमणांचे जीवन इ. विषयांवर विद्वानांचे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यूरोपच्या ग्रंथालयांतून असलेल्या जैनविद्याविषयक साहित्याची व्यवस्थित नोंदणी ए. ग्वेरिनॉट ह्याने आपल्या ग्रंथात (१९०६) केली आहे. सी. एल्. जैन यांनी जैन बिब्लिऑग्रॅफी (१९४५) या ग्रंथात ग्वेरिनॉट ह्याचे कार्य १९२५ पर्यंत अद्ययावत करून घेतले आहे. हिंदी व गुजराती या भाषांतूनही सूचींचे काही काम झाले आहे.

वैशाली इन्स्टिट्यूट, वैशाली व एल्. डी. इन्स्टिट्यूट ऑफ इंडॉलॉजी, अहमदाबाद यांसारख्या संस्था व काही ग्रंथमाला या क्षेत्रात महत्वाचे काम करीत आहे. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेमध्येही प्राकृत व जैनधर्म यांच्यासाठी एक स्वतंत्र विभाग आहे.

पुराणवाङ्‌मय

वॉरन हेस्टिंग्ज ह्याला पुराणांमध्ये रस होता. विल्यम जोन्स ह्यानेही पुराणांचे महत्व ओळखले होते. विल्फर्ड ह्याने विष्णु आणि भागवतपुराणां वर टिपणे लिहिली. विल्सन आणि ब्यूरनूफ ह्यांना त्या पुराणांवर काम करण्यासाठी ह्या टिपणांचा आधार मिळाला. विल्सन ह्याने विष्णुपुराणा चे पहिले इंग्रजी भाषांतर १८४० मध्ये प्रसिद्ध केले. त्याच वर्षी ब्यूरनूफ याच्या भागवतपुराणाच्या फ्रेंच भाषांतराचा पहिला भाग प्रकाशित झाला. पुढे ते काम हॉवेट बेस्नॉल्ट आणि रूसेल यांनी १८९८ मध्ये पूर्ण केले. पार्जिटर ह्याने मार्कडेयपुराणा चे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. (१८८८-१९०५).

अहमदाबादच्या बी. जे. इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग या संस्थेने भागवतपुराणाची आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने हरिवंशा ची चिकित्सक आवृत्ती तयार केली आहे. वाराणसीच्या ऑल इंडिया काशिराज ट्रस्टने अनेक पुराणांच्या चिकित्सक आवृत्त्यांचे काम हाती घेतले आहे.

पार्जिटर ह्याने पुराण टेक्स्ट ऑफ द डिनॅस्टिज ऑफ द कलीएज (१९१३) हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. किर्फेलच्या दास पुराण पंचलक्षण (१९२७) या ग्रंथाने पुराणांच्या चिकित्सक अभ्यासाचा पाया घातला, असे मानले जाते. जे. डी. एल्. द व्ह्रीस ह्याने विविध पुराणांच्या तुलनात्मक अध्ययनाने श्राद्धकल्पाविषयीचे, तर वॉल्टर रूबेन ह्याने कृष्णचरित्राबद्दलचे निर्णय मांडले आहेत. व्ही. आर्. रामचंद्र दीक्षितार यांचा तीन खंडांतील पुराण इंडेक्स (१९५१) आणि यशपाल टंडन यांचा पुराणविषयसमनुक्रमणिका (१९५२) हे पुराणसूचींच्या क्षेत्रातील महत्वाचे ग्रंथ आहेत.

ज्वालाप्रसाद मिश्र यांचे अष्टादशपुराणदर्पण (हिंदीत), बलदेव उपाध्याय यांचे पुराणविमर्श (हिंदीत), टी. जी. काळे यांचे पुराणनिरीक्षण (मराठीत), दुर्गाशंकर शास्त्री यांचे पुराणविवेचन (गुजरातीत), जी. सी. बोस यांचे पुराणप्रवेश (बंगालीत) ही प्रादेशिक भाषांमधील पुराणविषयक महत्वाची अशी काही पुस्तके होत.

पां. वा. काणे, आर्. सी. हझरा, बी. सी. मजुमदार, हरप्रसाद शास्त्री, कीथ, विंटरनिट्स आदींच्या संशोधनाने पुराणविषयक ज्ञानात बरीच भर घातली आहे. पुराणांतील माहितीच्या आधारे इतिहासाची मांडणी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. अक्षय कुमारीदेवी यांनी बिब्लिऑग्रॅफिकल डिक्शनरी ऑफ पुराणिक पर्सनेजीस हा, तर मंकड यांनी पुराणिक क्रनॉलॉजी (१९५१) हा ग्रंथ लिहिला आहे. पुराणांत निर्दिष्ट असलेली द्वीपे, पर्वत, नद्या इत्यादींच्या संदर्भातही संशोधन झाले आहे.

पुराणांतील विविध अवतार, अवतारांखेरीज गणेशादी देवता, पुराणे व धर्मशास्त्र वगैरे विषयांवरही संशोधकांनी लिहिले आहे. पुसाळकरांचा स्टडीज इन द एपिक्स अँड पुराणाज ऑफ इंडिया (१९५५) हा पुराणवाङ्‌मयाचे सर्वांगीण विवेचन करणारा महत्वाचाग्रंथ आहे. पुराणांच्या अभ्यासाला वाहिलेले पुराण (१९२९) नावाचे एक विख्यात जर्नलही प्रसिद्ध होत असते. मेयर ह्याने आपल्या ग्रंथात पुराणे व स्मृतिग्रंथ यांच्या संबंधावर प्रकाश टाकला आहे. जे. डी. एम्. डेरेट ह्याने पुराणे व धर्मशास्त्राचा व्यवहार विभाग यांच्या संबंधावर लेखन केले आहे. स्टडीज इन द पुराणिक रेकॉर्डस ऑन हिंदू राइट्स अँड कस्टम्स (१९४०) हा हझरांचा ग्रंथ महत्वपूर्ण मानला जातो. विश्वोत्पत्ती, नीतितत्वे, तत्वज्ञान इ. विषयांवर पुराणात आलेल्या विचार कल्पनांचा अनेकांनी परामर्श घेतला आहे. दीक्षितार व पाटील यांनी वायुपुराणातील (१९३३, १९४६), कांटावाला यांनी मत्स्यपुराणातील (१९६४), ग्यानी यांनी अग्निपुराणातील (१९६५) आणि पांडे यांनी हरिवंशातील (१९६०) तत्त्वज्ञानविषयक विचारांचा परामर्श घेतला आहे.

महाभारत  आणि पद्मपुराण यांच्या संबंधावर एल्. हिल्गेन्बर्ग ह्याने (१९३४) तर पद्मपुराण व कालिदास ह्या विषयावर हरदत्त शर्मा यांनी ग्रंथ लिहिले आहेत (१९२५). व्ही. आर्. रामचंद्र दीक्षितार यांनी सम अँस्पेक्ट्स ऑफ द वायुपुराण (१९३३) हा, तर डी. आर्. पाटील यांनी कल्चरल हिस्टरी फ्रॉम द वायुपुराण, (१९४६) हा ग्रंथ लिहिला आहे. भागवतावर असंख्य ग्रंथ व निबंध लिहिले गेले आहेत. व्ही. एस्. अग्रवाल यांनी मार्कंडेयपुराण : एक सांस्कृतिक अध्ययन (हिंदीत, १९६१) हा आणि एस्. डी. ग्यानी यांनी अग्निपुराण : ए स्टडी (१९६५) हा ग्रंथ लिहिला आहे. व्ही. एस्. अग्रवाल यांनी वामनपुराण : ए स्टडी (१९६४) हा ग्रंथ लिहिला आहे, तर मत्स्यपुराणाचे एक इंग्रजी भाषांतर अलाहाबादहून प्रसिद्ध झाले आहे (१९१६). दीक्षितार आणि व्ही. एस्. अग्रवाल यांनी मत्स्यपुराण : ए स्टडी या नावाचे दोन वेगवेगळे ग्रंथ (१९३५, १९६३) प्रसिद्ध केले आहेत. एस्. जी. कांटावाला यांनी कल्चरल हिस्टरी फ्रॉम द मत्स्यपुराण (१९६४) हा ग्रंथ लिहिला आहे. जे. गोंडा ह्याने प्राचीन जावानीज भाषेतील ब्रह्मांड व अगस्त्य या पुराणांकडे लक्ष वेधले आहे. वीणापाणी पांडे यांनी हरिवंशपुराणका सांस्कृतिक विवेचन (१९६०) या ग्रंथात हरिवंशाबद्दल विस्तृत विवेचन केले आहे. उपपुराणांच्या क्षेत्रात आर्. सी. हझरा यांनी विशेष भरीव कामगिरी केली आहे. कलकत्त्याच्या संस्कृत कॉलेजचा स्टडीज इन द उपपुराण हा पंचखंडात्मक प्रकल्पही उल्लेखनीय आहे. दीक्षितार, जगदीशलाल शास्त्री वगैरेंनी पुराणातील राज्यशास्त्रविषयक विचारांचा परामर्श घेतला आहे.आर्. बी. पांड्ये यांनी पुराणविषयानुक्रमणी (१९५७) हा हिंदी ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.

बृहद्‌भारत

भारताबाहेरील अनेक देशांवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे. या प्रभावाचे अध्ययन हाही सध्या भारतविद्येच्या क्षेत्रातील एक महत्वाचा विषय ठरला आहे. कलकत्ता येथे स्थापन झालेली ग्रेटर इंडिया सोसायटी ही संस्था आग्नेय आशियातील भारतीय संस्कृतीचा अभ्यास करीत असते. आर्. सी. मजुमदार आणि के. ए. नीलकंठशास्त्री यांनी या संस्कृतीचा विशेष अभ्यास केला आहे. चीन आणि मध्य आशिया यांच्यावरील भारतीय प्रभावाचा अभ्यास पी. सी. बागची यांनी केला आहे. या विषयाच्या अभ्यासाला वाहिलेल्या सिनो इंडियन स्टडीज ह्या शांतीनिकेतनमधून प्रसिद्ध होणाऱ्या शोधपत्रिकेतून त्यांनी ह्याबाबत महत्वपूर्ण लेखन केले.

पोकॉक याचे इंडिया इन ग्रीस हे पुस्तक १८५६ साली प्रसिद्ध झाले. इ. स. पू. चौदाव्या शतकात बोगाझकई येथे झालेल्या हिटाइट आणि मिटानी यांच्यातील करारामध्ये इंद्र, मित्र, वरुण व नासत्य (अश्विनीकुमार) यांना आवाहन केल्याचे आढळते. यूरोपमधील जिप्सी लोक हे मूळचे भारतीय असल्याचे आता काही अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. पंचतंत्र व हितोपदेश यांच्या कथा भारतातून यूरोपात पोहोचल्या होत्या. बुद्धिबळाचा खेळही भारतातूनच यूरोपात गेल्याचे दिसते.

सेंट्रल एशियन सोसायटी ह्या संस्थेने मध्य आशियावर पडलेल्या भारतीय प्रभावाचे अध्ययन केले आहे. मध्य आशियातून भटक्या टोळ्या भारतात आल्या होत्या. भारतीय इतिहासाच्या अनेक समस्या त्यांच्याशी निगडित आहेत.

पूर्व कोलंबियन संस्कृतीवरही भारत व अन्य काही आशियाई देशांचा प्रभाव पडला होता, असे काही विद्वानांनी दाखवून दिले आहे. १७६१ साली झोझेफ द गीन्य या फ्रेंच विद्वानाने असे दाखवून दिले आहे, की पाचव्या शतकात पाच बौद्ध भिक्षू मेक्सिकोमध्ये प्रवास करीत गेले होते. आलेक्झांडर फोन हंबोल्ट (१७६९ - १८५९) ह्याने एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मध्य अमेरिका आणि भारत यांचे प्राचीन काळातील धर्म, कला इत्यादींमधील आश्चर्यकारक साम्य उजेडात आणले. १९४९ साली हाइन गेल्डेर्न ह्याने पूर्व कोलंबियन संस्कृतीवर हिंदू व बौद्ध धर्माचा प्रभाव पडल्याचे नवे पुरावे दाखविले आहेत. आशियामधील विविध प्रकारची संस्कृती पॅसिफिकच्या मार्गाने मध्य अमेरिकेत गेली असली पाहिजे, असे त्याला वाटते.

वेगवेगळे समाज एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांना एकमेकांविषयी जिज्ञासा वाटणे स्वाभाविकच असते. यूरोपाय विद्वानांनी या जिज्ञासेपोटीच आधुनिक भारतविद्येचा पाया घातला. भारतविद्येच्या विकासाचे विवेचन करताना तिला प्रेरक ठरलेल्या अनेक घटकांची नोंद रा. ना. दांडेकरांनी रिसेंट ट्रेंड्स इन इंडॉलॉजी (१९७८) या आपल्या मौलिक ग्रंथात घेतली आहे.

आपली स्वतःची संस्कृती समृद्ध करण्यासाठी इतर संस्कृतींचे ज्ञान आवश्यक आहे, याची जाणीव पाश्चात्य लोकांना झाली आहे. इतर संस्कृतींच्या अध्ययनासाठी १९४४ साली ब्रिटिश सरकारने स्कारबरो समिती नेमली, ती याच जाणिवेतून. इतर संस्कृतींपेक्षाही भारतीय संस्कृतीविषयी पाश्चात्यांना आकर्षण वाटले, त्याची काही कारणे होती. ईजिप्त, अँसिरिया इ. ठिकाणच्या संस्कृतींचे प्रवाह काळाच्या ओघात खंडित झाले होते; परंतु भारतीय संस्कृतीचा प्रवाह मात्र अखंडपणे वाहत आला आहे. शिवाय भारतात आढळणारे मीमांसा, योग इ. विषय अन्य संस्कृतींपेक्षा खास आगळे असे होते. नव्या संस्कृतीबरोबर संपर्क निर्माण झाला, की नवे प्रश्नही निर्माण होतात आणि ते सोडविण्यासाठी त्या संस्कृतींचे ज्ञान असलेल्या व्यक्तींची गरज भासू लागते. भारतविद्येच्या अध्ययनामागे हीदेखील एक महत्वाची प्रेरणा होतो. शिवाय, हल्ली राजकीय, आर्थिक, लष्करी इ. दृष्टींनी आशियाई लोकांना महत्व प्राप्त झाले असल्यामुळे त्यांचा इतिहास आणि संस्कृती जाणण्याची गरज पाश्चात्यांना जाणवू लागली आहे.

भारतविद्येच्या अध्ययनात, काही वेळा अडथळे निर्माण झाल्याचेही आढळते. पाश्चात्य विद्वान कधीकधी भारतीय संस्कृतीला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात; तिने उसनवारी केल्याचा आरोप करतात आणि तिचा काळ अलीकडे खेचण्याचा प्रयत्न करतात.याची प्रतिक्रिया म्हणून भारतीय विद्वान तिचे आत्यंतिक उदात्तीकरण करतानाही आढळतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतविद्येचे अध्ययन क्षीण झाले होते; परंतु या क्षेत्रातील नव्या कल्पनांची बीजे याच काळात रुजली असे दांडेकरांना वाटते.

भारतविद्येच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांचे विवेचन दांडेकरांनी फार उत्तम रीतीने केले आहे. भारतविद्येची कालक्रमाच्या दृष्टीने लांबी, आशयाच्या दृष्टीने रुंदी आणि पद्धतिशास्त्राच्या (मेथडॉलॉजी) दृष्टीने खोली वाढली आहे, असे त्यांना वाटते. भारतविद्येमध्ये आता फक्त प्राचीन संस्कृतीचा अभ्यास होत नाही, तर भारताच्या वर्तमान जीवनाचेही अध्ययन होत आहे. अभ्यासविषयांची व्याप्तीही वाढली आहे. आध्यात्मिक संस्कृती, भूगोल, आर्थिक परिस्थिती, सामाजिक रचना, मानवशास्त्र, राजकीय विचार, तंत्रशास्त्रे, कला, विदेशांबरोबरचे संबंध, वेदपूर्व भारत, आदिवासी समूह, बृहदभारत इ. विषयांचे अध्ययन होत आहे. थोडक्यात म्हणजे अनेक युगांतून भारताचा सर्वांगीण विकास कसा झाला, याचे अध्ययन केले जात आहे.

पद्धतिशास्त्राच्या बाबतीतही खूप बदल झाला आहे. पाश्चात्य अभ्यासक भारताला प्रत्यक्ष भेट देऊन संशोधन करीत आहेत. भिन्न संस्कृतींचे तुलनात्मक अध्ययन आणि विविध शाखांच्या संयुक्त अध्ययनपद्धतीचे प्रयोग यांना महत्व आले आहे. उदा., एखाद्या भाषेचे भाषाशास्त्रीय अध्ययन करताना ती भाषा बोलणाऱ्यांचे समाजजीवन जाणण्यासाठी समाजशास्त्रीय अध्ययनही महत्वाचे ठरत आहे. व्यक्तिगत स्वरूपात अध्ययन करण्याची प्रवृत्ती मागे पडून सामूहिक प्रयत्नांना महत्व येत आहे. आता इतिहासलेखनाला पुरातत्वविद्येची साथ मिळाली आहे. सांस्कृतिक इतिहासामध्ये धार्मिक व तत्वज्ञानाच्या पैलूंपेक्षा सामाजिक व आर्थिक पैलूंवर भर दिला जात आहे. वैदिक धर्म व पुराणकथा यांच्यापेक्षा वैदिक समाजजीवन विद्वानांचे लक्ष खेचत आहे. मध्ययुगाच्या सीमारेषा, भारतातील सरंजामशाही आणि इस्लामच्या आगमनाचा भारतीय जीवनावरील प्रभाव हे तीन प्रश्न मध्ययुगीन भारताच्या इतिहासलेखनात महत्वपूर्ण बनले आहेत. उत्तर भारत, संस्कृत साहित्य आणि इंडो आर्यन संकल्पना यांच्यावरच दीर्घकाळपर्यंत लक्ष केंद्रित करण्यात आले होते, असा विचार प्रवाह आता निर्माण झाला आहे. आता हे चित्र पालटत आहे. दक्षिण भारताविषयीही आता अधिक शास्त्रशुद्ध असे संशोधन होत आहे. रोमन संस्कृती, अरब जग, आग्नेय आशिया इत्यादींबरोबर भारताचे संबंध प्रस्थापित करण्यात आणि हिंदू संस्कृतीच्या विकासात दक्षिण भारताचा मोठा वाटा आहे, याची ओळख आता पटली आहे.

तसेच आता संस्कृतबरोबरच इतर सर्व भारतीय भाषांकडेही लक्ष दिले जात आहे. वैदिक साहित्याबरोबरच आता अभिजात संस्कृत साहित्याचेही संशोधन होत आहे. भारतविद्येच्या क्षेत्रात आता मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि पुरातत्वविद्या यांचा फार मोठा हातभार लागत आहे. प्रचंड संख्येने मिळालेल्या हस्तलिखितांचे प्रकाशन हे आव्हानात्मक काम असून हे आव्हान स्वीकारले.

प्राचीन भारताचे सर्वात मोठे योगदान भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील आहे. पाश्चात्य देशांत प्रारंभीच्या काळी भारतविद्येचे अध्ययन इंडो-यूरोपियन भाषाभ्यासाचा एक भाग म्हणूनच केले जात होते. अलीकडे हिटाइट भाषेच्या शोधाने तुलनात्मक भाषाभ्यासाला अधिक चालना मिळाली आहे. इंडो-यूरोपियन भाषांच्या इतिहासातील एक नवा दुवा ह्या शोधाने सापडला आहे. १९७५ साली केरळ राज्यातील पंजाल येथे अतिरात्र अग्निचयन या नावाचा सोमयाग वैदिकांच्या आंतरराष्ट्रीय समितिद्वारा आयोजित करण्यात आला होता. भावी अध्यायनासाठी त्याचा दृक्श्राव्य असा समग्र वृत्तांत तयार करण्यात आला आहे.

धार्मिक घटना सामाजिक-आर्थिक इ. दृष्टिकोणांतून स्पष्ट करण्याच्या विचारप्रवाहाला अलीकडच्या काळात बळ येत चालले आहे. उदा., भक्तिसंप्रदाय हा सरंजामशाही तत्त्वज्ञानाला पोषक होता; बौद्ध धर्मामध्ये सामाजिक जाणीव सर्वांत अधिक होती इ. विचार मांडले जात आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास हा चैतन्यवाद व जडवाद यांच्यातील संघर्ष आहे, असे मार्क्सवादी अभ्यासक मानत आहेत. हिंदू ध्रमाचा सर्वसमावेशक व चिकित्सक इतिहास सांगणारा ग्रंथ अद्यापीही झालेला नाही, ही मात्र भारतविद्येच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची उणीव आहे.

संदर्भ :  1. Arberry, A. J. British Orientalists, London, 1943.

2. Aronson, A. Europe Looks at India, Bombay, 1946.

3. Buckland, C. E. Dictionary of Indian Biography, London, 1906.

4. Burnell, A. C. On Some अर्ली References to the Vedas by European Writers; Indian Antiquary, Vol. VIII, 1879.

5. Chatterjee, A.; Burn, Richard, British Contributions to Indian Studies, London, 1944.

6. Chinmulgund, P. J.; Mirashi V. V. Ed.,  Review of Indological Research in Last 75 Years, Pune, 1967.

7. Dandckar, R. N. Vedic Religion and Mythology, Pune, 1965.

8. Dandekar, R. N. “Some Recent German Contributions to Vedic Philology,” V. G. Paranjpe Comm. Vol., Delhi, 1977.

9. Dandeker, R. N. Recent Trends in Indology, Pune, 1978.

10. Dandekar, R. N.; Raghavan, V., Ed., Oriental Studies in India, New Delhi. 1964.

11. Dandekar, R. N.  Exercises in Indology, Delhi, 1981.

12. International Association of Sanskrit Studies, News Bulletin No. 2, Parts I and II; Sanskrit Studies Outside India. Weimar, 1979.

लेखक: श्रा. ह. साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate