অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भावगीत

भावगीत

एक काव्यप्रकार. काव्याशयाच्या अंगाने कवीची आत्मनिष्ठा व भावोत्कटता आणि अभिव्यक्तीच्या अंगाने गेयता वा लयबद्धता ही या काव्यप्रकाराची प्रमुख लक्षणे स्थूलमानाने मानता येतील. इंग्रजीतील 'लिरिक' या प्रकाराला भावगीत ही संज्ञा मराठी काव्यक्षेत्रात  रविकिरण मंडळाने रूढ केली. तथापि आता 'भावकविता' ही संज्ञा अधिक प्रचलित आहे. 'लायर' या वीणासदृश वाद्याच्या साथीवर गावयाची कविता, या मुळातील ग्रीक अर्थाच्या आधारे सिद्ध केलेल्या 'वैणिक' (अथवा वीणाकाव्य) तसेच 'गीतिका', 'गीतक' इ. संज्ञांचाही अधूनमधून क्वचित उपयोग करण्यात आला; पण नंतर त्या बाद झाल्या. कारण इंग्रजीतील या काव्यप्रकारातही गीतगुणाला फारसे प्राधान्य नाही. ग्रीकांनी महाकाव्यासारखी कथानात्मक कविता आणि नाटकात योजिलेली कविता यांपासून 'लिरिक' हा प्रकार वेगळा काढला होता. इंग्रजीत या प्रकाराबरोबरच वैचारिक, वर्णनात्मक, उपहासात्मक दीर्घकविता हेही प्रकार आहेत. ते सगळे वगळले, तरीही त्या भाषेतील लिरिकची व्याप्ती फार मोठी आहे. त्यात विविध उपप्रकारही आहेत. उदा.,  सुनीत (सॉनेट);  विलापिका (एलेजी);  ओड (उद्देशिका); अंत्ययात्रागीत (डर्ज) इत्यादी. त्यामुळे भावगीत हा प्रकार अतिव्यापक व लवचिक ठरतो. इंग्रजीपैकी काही प्रकार मराठीतही आले. विष्णू मोरेश्‍वर महाजनी यांनी इंग्रजीतील भावकवितांची मराठीत भाषांतरे केली. केशवसुतप्रणीत आधुनिक कवितेला इंग्रजी लिरिकने प्रेरणा दिली. त्यानंतर केशवसुतांचा कालखंड, तांबे-रविकरिण मंडळाचा कालखंड, नवकवितेचा कालखंड अशा विविध टप्प्यांवर लक्षणीय भावकविता प्रचंड प्रमाणावर निर्माण झाली. त्या प्रकारची वेगवेगळी रूपे व परिमाणे तिच्यात प्रतिबिंबित झाली.

इंग्रजीतील स्वच्छंदतावादी भावकवितेत सामान्यतः भावनेच्या उत्कटपणावर विशेष भर असतो. त्या कवितेच्या प्रभावामुळे मराठीतही, नवकवितेचा उद्य होण्यापूर्वी, भावना हे अशा कवितेचे केंद्र मानण्याची प्रथा होती. ती या काव्यप्रकाराचा अकारण संकोच करते. एखादी भाववृत्ती किंवा मानसिक अवस्था हीदेखील भावकवितेच्या केंद्रस्थानी असू शकते. इतकेच नव्हे तर, एखादा विचार किंवा तो विकसित होण्याची क्रियासुद्धा त्यात येऊ शकते. मात्र तो विचार उपरा किंवा केवळ तात्विक न राहता कवीच्या आंतरिक जीवनाचा एक अंगभूत घटक बनून यावा लागतो. तो कवीला भावणे महत्त्वाचे. भावना आणि विचार यांत तसे द्वैत नाही. उत्तम कवितेमध्ये ते एकरूपच असतात. तसेच त्या दोहोंतील संघर्ष, अथवा भावनेतील किंवा विचारातील अंतर्गत संघर्ष यांतूनही कविता निर्माण होते. मात्र हे सर्व कवीच्या व्यक्तिमत्त्वाशी गाढपणे निगडित असले पाहिजे. म्हणूनच आत्माविष्कार हे भावकवितेचे प्रमुख लक्षण मानले जाते.

ही आत्माविष्काराची कल्पनासुद्धा अधिकाधिक लवचिक होत आली आहे. ज्यावरून कवीच्या आत्मचरित्राची अटकळ बांधता येईल अशा वैयक्तिक अनुभवांचे, भावनांचे व विचारांचे चित्रण आणि प्रथमपुरूषी लेखन यांच्यापुरताच आत्मविष्कार मर्यादित नसतो. तो सर्वस्वी कल्पित प्रसंग, पार्श्वभूमी अथवा अन्य व्यक्ती यांच्याद्वारेही व्यक्त होतो, कारण कवीचे व्यक्तिमत्व हे अनेकपदरी असू शकते आणि प्रतिमाबळाने तो विरोधी प्रकृतीच्या माणसांशीही संवाद साधू शकतो. हे  नाट्यगीतासारख्या प्रकारात विशेषेकरून घडताना दिसते. 'भावकवितेतून कवी आपले व्यक्तिमत्त्व प्रकट करत नाही, तर तो त्यापासून मुक्त होतो' हा टी, एस्. एलियटचा विचार अलीकडच्या काळात बराच मान्यता पावला आहे. भावकविती ही संपुर्णपणे 'स्व-केद्रिंत' असते, या फार काळ लोकप्रिय असलेल्या स्वच्छंदतावाद्यांच्या विचारसरणीविरूद्धची ही प्रतिक्रया आहे.

भावकवितेचे अनेक प्रकार संभवतात. त्यांतील काही आशयाच्या, तर काही रचनेच्या वैशिष्ट्यातून सिद्ध झाले आहेत. हलक्याफुलक्या भावनेपासून ते अध्यात्‍मापर्यंत भावकवितेच्या आशयाची व्याप्ती संभवते. समकालीन जीवनावरील टीका, उपहास, उपरोध याचांही त्यात काही वेळा समावेश असतो. आशयात उत्कटता, उत्स्फूर्तता, अर्थपूर्णता असावी व कविता एकसूत्री असावी, ही अपेक्षा असते. अन्य काव्यप्रकारांतही, उत्तम कवितेच्या गाभ्याशी भावकविताच असते. किंबहुना काव्य म्हणजेच भावकविता, असाही विचार मांडला गेला आहे.

भावकविता लांबीने सामान्यतः लहान असते, पण ते तिचे लक्षण समजणे चुकीचे ठरेल. सामान्यतः आशयाची उत्कटता पसरट लेखनात विखरून जाते. भावकवितेच्या रूपक-प्रतिमादींच्या भाषेत स्वभावतःच संक्षेप असतो. पण कित्येक चांगल्या भावकविता दीर्घ आहेत आणि त्यांचा आशय ती लांबी सहजपणे पेलतो, हेही लक्षात घेतले पाहिजे.

सगळीच भावकविता गेय-म्हणजे संगीताच्या प्रचलित चौकटीत बसणारी नसते, मुक्तच्छंदासारख्या वरकरणी गद्यप्राय आणि सैल वाटणाऱ्या रचनेतही अंतर्गत संगीत असते. लय आणि नाद यातूंन ते सूक्ष्मपणे लहरत असते. कवितेतील संगीताविषयीच्या सांकेतिक कल्पना बाजूला ठेवून, तरल संवेदनक्षमतेने या विविधस्वरूपी भावकवितेचा आस्वाद घेतल्यास हे प्रकर्षाने जाणवते.

भावगीत-गायन : असे असले तरी, परंपरागत भावकवितेचे गेयता हे प्रधान लक्षण मानले गेले आहे. मराठी भावकवितेला संगीताच्या अंगानेही समृद्ध परंपरा आहे.

महाराष्ट्रातील भावगीत-गायनाची परंपरा सु. पन्नास वर्षांची म्हणता येईल. भावगीताच्या पठणापेक्षा अथवा ते म्हणण्यापेक्षा गायन हवे, असे रविकिरण मंडळाच्या काळानंरत जास्त करून वाटू लागले. ह्याच सुमारास मराठी नाट्यसंगीताचा अस्त होऊ लागला होता. आकाशवाणी उदयास येत होती आणि ध्वनिमुद्रिकांचा प्रसार जोरात झाला होता. अशा सिस्थीत प्रथमतः जे. एल्. रानडे (१९०५- ), जी. एन्. जोशी (१९०९- ), लीला लिमये प्रभृतींनी रागसंगीताची कास पूर्णपणे न सोडता कविता चालीवर म्हणावयाची, तसेच ती काव्य म्हणूनही भावस्पर्शी राहील, याची खबरदारी घ्यायची, असे धोरण ठेवले व ' भावपदे ' रूढ झाली. दत्त कवी (१८७५-९९) आपल्या कविता हार्मोनियम, सतार, तबला या वाद्यांच्या साथीवर गात असल्याचे उल्लेख सापडतात. संजीवनी मराठे व सोपानदेव चौधरी हेही आपल्या कविता सुरेल आवाजात गात असत. भावगीत-गायनातील पुढचा टप्पा गजानन वाटवे, बबनराव नावडीकर, गोविंद कुरवाळीकर, अशोक जोगळेकर, राम पेठे, विश्वास काळे, दत्ता वाळवेकर, माणिक वर्मा, ज्योत्‍स्‍ना भोळे, मालती पांडे इ. अनेक गायक-गायिकांचा. भावगीत गायनाचा हा सुवर्णकाळ म्हणता येईल. याच सुमारास उदयास आलेल्या  सुधीर फडके यांनी पुढे संगीतदिग्दर्शक व भावगीत-गायक म्हणून प्रंचड लोकप्रियता संपादन केली. ह्या गायकांनी काव्यावर तर भर दिलाच; पण रागसंगीताच्या कक्षा ओलांडून नवनव्या चाली शोधल्या. संगीतरचना अधिक मुक्त झाली व वाद्यांचा वापरही मुबलक झाला.  केशवराव भोळे यांनी अनेक प्रसिद्ध भावगीतांना चाली दिल्या. तसेच मैफलीमध्ये काव्यगायन करून त्यांस अधिक लोकप्रियता मिळवून दिली. चालींची विविधता, स्वनरंगही (वाद्यांच्या ध्वनिधर्मांतील वेगळेपणामुळे) विपुल आणि प्रसारणमाध्यामांची भरपूर मदत यामुळे भावगीतांनी १९५०-५५ पर्यंतचा जमाना गाजविला.

अलीकडच्या काळात लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, सुमन कल्यानपूर, अरून दाते इत्यादींनी भावगीत-गायनांच्या परंपरेत समृद्ध भर घातली आहे.

संदर्भ :1. Drinkwater, John, The Lyric, 1916.

२. जोशी, जी. एन्. स्वरगंगेच्या तीरी, मुंबई, १९७७.

३. रविकिरण मंडळ, संपा, काव्यविचार, पुणे, १९२४.

४. वाटवे, गजानन, गगनी उगवला सायंतारा, पुणे, १९७१.

लेखक: विजया राजाध्यक्ष; अशोक रानडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate