অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाषिक घटक विराम चिन्हांकन

भाषिक घटक विराम चिन्हांकन

कोणत्याही लिपीमध्ये मुख्यतः भाषिक घटकांना दृश्य चिन्हे दिली जातात, मग ते घटक वर्ण किंवा वर्णसमूह असतील (उदा., श, sh; ज्ञ, जपानी लिपीतील का, की, कू, के, को साठी एकेक चिन्ह), पद किंवा पदघटक असतील (उदा., ॐ, &, &c, चिनी लिपीतील ‘ माणूस’ चिन्ह), किंवा अर्थघटक असतील (उदा., ४०, 40, .।।.). मात्र काही लिप्यांतून यांच्या जोडीला विविध चिन्हे पूरक म्हणून कमीअधिक आवश्यक मानली जातात. मग ती उच्चारणभेदक चिन्हे (डायाक्रिटिक) असतील (उदा., फट्‌ मधली पायमोड, हळूऽ मधला द्विखंड, faVade मधला c खालचा सेडिला, हीब्रू किंवा अरबी – फार्सी लिप्यांमधली स्वरचिन्हे), औपचारिक चिन्हे असतील (उदा., स्वास्तिक चिन्ह.),

संदर्भचिन्हे (रेफरन्स मार्क) असतील (उदा., पुनरूक्तिदर्शक ,, डिटो चिन्ह, तळटिपेसाठी * तारकाचिन्ह), किंवा विरामचिन्हे असतील (उदा., संस्कृतमधील वाक्यांती वा चरणांती येणारा एकेरी दंड आणि श्लोकांती येणारा दुहेरी दंड).

मराठी भाषेच्या लेखनात (आणि अर्थात मुद्रणात) आज वापरली जाणारी विरामचिन्हे (पारंपरिक दंड सोडले तर) मुख्यतः इंग्रजी लेकनातील यूरोपीय विरामचिन्हांकनावरून ⇨मेजर टॉमस कँडीच्या (१८०४-७७) पुढाकाराने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर घेतली गेली. सुरुवातीला केवळ स्वल्पविराम, अर्थविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्‌गारचिन्ह (अनुक्रमे, ; . ? !) एवढीच घेतली होती, मागाहून अपूर्णविराम, खंडविराम, अवतरणचिन्ह-जोडी, कंस-जोडी, संयोगीचिन्ह, वियोगीचिन्ह (अनुक्रमे : . . . ‘‘ ’’ ( ) -  ) यांची भर पडली. शब्द वा परिच्छेद तोडण्याची पद्धतही पारंपारिक लेखनात नव्हती. (महानुभाव लेखनातील : हे ‘विसावा’ चिन्ह त्यांच्यापुरते मर्यादित राहिले.) किंबहुना यूरोपीय विरामचिन्हांकन आज केवळ भारतभर नव्हे, तर जगभर प्रसारित दिसते. त्या आधीची जगातील पारंपारिक विरामचिन्हे संस्कृत लेखनाप्रमाणे तुरळकच होती, किंवा जुन्या चिनी लेखनाप्रमाणे त्यांचा पूर्ण अभाव होता.

यूरोपीय विरामचिन्हांकनाची परंपरा : आजची यूरोपीय व्यवस्था मुख्यतः मुद्रणकला प्रस्थापित झाल्यावर आल्दो मानूत्स्यो (१४४९-१५१५) या इटालियन मुद्रकाच्या प्रयत्नामुळे स्थिर झाली. विविध यूरोपीय भाषांतून कमीअधिक फरकाने ती चालू आहे (उदा., जर्मन अवतरणचिन्हे ‘‘ ’’ ऐवजी,, ‘‘अशी असतात). सुरूवातीला , ; : . ? – एवढीच चिन्हे होती; पुढे सतराव्या शतकापर्यत! ‘‘ ’’ – यांची भर पडली. आधीच्या काळाचा विचार करावयाचा तर उत्तरकालीन अभिजात ग्रीक भाषेतील हस्तलिखिते (ग्रंथपाल बायझंटियमचा ॲरिस्टोफेनीस याचे इ. स. पू. २०० च्या सुमारचे प्रयत्न ) आणि अभिजात लॅटिन कोरीव लेख व हस्तलिखिते (सुरूवातीला शब्द, परिच्छेद तोडणे एवढेच होते, नंतर इ. स. चौथ्या शतकापासून विरामचिन्हे) इथपर्यत काही अंशी मागे जाता येते (चिन्हांचे आकार आजचेच होते असे नाही). विरामचिन्हांकनाचे नेमके कार्य काय याबद्दल मतभेद वा संभ्रम दिसून येतो. विरामचिन्हांकन उच्चारणलक्षी (एलोक्यूशनरी) असून कानाला जाणवणारे बल, सूर आणि सीमांकन दाखवते हा एक विचार, तर याउलट ते वाक्यार्थलक्षी (सिंटॅक्टिक/लॉजिकल) असून वाक्याची व्याकरणात आणि तर्कगत मोडणी दाखवते हा दुसरा विचार.

सुरुवातीच्या इंग्लिश मुद्रित वाङ्मयात (सोळावे – सतरावे शतक) शेक्सपिअर आदींची नाटके वा हुकर आदींची धर्मप्रवचने यांत पहिला विचार स्वीकारतात, तर बेकन आदींचे वैचारिक गद्य यांत दुसरा विचार स्वीकारतात हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. दोन्ही पद्धतींमधील नाते उदाहरणांनी स्पष्ट करता येईल:

(१) Looks it not Like the King ? (शेक्सपिअर, हॅम्लेट) महाराजांसारखं तर दिसत नाही ते ? (प्रश्नचिन्हाने चढता सूर आणि प्रश्नार्थी वाक्य दाखवले जाते;  म्हणजे दोन्ही विचार लागू पडतात.)

(२) To be, or not to be : that is the question : जगावं की मरावं : हाच तर सवाल आहे : (यात पहिला म्हणजे वाचिक अभिनयाचा विचार प्रबळ दिसतो. दुसरा विचार स्वीकारला, तर स्वल्पविरामाची गरज नाही व वाक्य संपल्यावर पूर्णविराम का नको असे म्हणावे लागेल. इथे विरामचिन्हे जणू काही रंगसूचनांचे काम करीत आहेत ).

(३) It is as natural to die as to be born; and to a little infant, perhaps, the one is as painful as the other. (फ्रान्सिस बेकन) जन्मणे जितके स्वाभाविक असते तितकेच मरणेही; आणि एखाद्या अर्भकाच्या दृष्टीने, कदाचित, एकाइतकेच दुसरेही क्लेशदायी आहे. [यात अर्धविरामाची योजना आणि स्वल्पविरामांची जोडी यांमागे दुसरा विचार प्रबळ आहे. पहिला विचार स्वीकारला तर अर्धविरामाऐवजी स्वल्पविराम का नको ? जोडीतला एक स्वल्पविराम (उच्चारण लक्षात घेऊन) का गाळू नये?]

नंतर अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत तर्कलक्षी विचार इतका बळावला, की स्वल्पविराम खचाखच टाकण्यात मुद्रक आणि लेखक धन्यता मानू लागले ! फाउलर बंधूंनी आपल्या द किंग्ज इंग्लिश (१९०६) पुस्तकात या अतिरेकी विरामचिन्हांकनाविरुद्ध आवाज उठवला आणि विरामचिन्हांकन अर्थ अस्पष्ट वा संदिग्ध राहू नये एवढ्यापुरतेच ठेवावे हा विचार प्रसृत केला. (त्यांच्या विचारानुसार तिसऱ्या उदाहरणातील दोन्ही स्वल्पविराम बेलाशक गाळावे असे म्हणावे लागेल.) आजही इंग्लंयड-अमेरिकेत विरळ विरामचिन्हांकनच अधिक प्रचलित आहे. कायदेशीर दस्तएवजांत मात्र विरळ विरामचिन्हांकनाचा प्रघात पंधराव्या शतकापासून अव्याहत चालू आहे. (कदाचित संदेहला जागा ठेवणे हेच त्या क्षेत्रातल्या मंडळींना इष्ट वाटत असावे !)

अधिक माहितीसाठी क्लिक करा मराठी विकासपीडिया

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate