অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मणिमेखलै

मणिमेखलै

प्राचीन तमिळ साहित्याच्या तिसऱ्या संघम् काळातील एक प्रख्यात महाकाव्य. तमिळ पंचमहाकाव्यांत त्याची गणना होते. शित्तले शात्तनार ह्या कवीने ते रचले. मणिमेखलैच्या रचनेला काल शिलप्पधिकारम्‌च्या थोड्या नंतरचा, पण पल्लव साम्राज्यस्थापनेच्या (इ. स. तिसरे शतक) थोडा आधीचा म्हणजे इ. स. सु. दुसरे शतक असावा, असे अभ्यासक मानतात. या काव्यात तिरूक्कुरळमधील एक अवतरण उद्‍घृत केले असल्यामुळे हे काव्य तिरूक्कुरळनंतरचे म्हणजे पहिल्या शतकानंतरचे ठरते. शात्तनार हा मदुरा येथील रहिवासी असून तो धान्याचा व्यापारी होता. मदुरेच्या तिसऱ्या संघम्‍चा तो एक प्रमुख सदस्य – कवीही होता. धर्माने तो बौद्ध होता. मणिमेखलैच्या रचनेची प्रेरणा मुख्यत्वे धार्मिक आहे.

शिलप्पधिकारम्‍चा कर्ता  इळंगो अडिगळ व शात्तनार हे समकालीन तर होतेच; पण एकमेकांशी त्यांची मैत्रीही होती. इळंगो अडिगळने आपले  शिलप्पधिकारम् हे महाकाव्य शात्तनारला वाचून दाखविले होते. शिलप्पधिकारम्‌चा नायक कोवलन् आणि उपनायिका माधवी यांची कन्या मणिमेखलै हिच्या जीवनावर शात्तनारने आपले काव्य रचले असल्याने ते कथाभागाच्या दृष्टीने शिलप्पधिकारम्‌चाच उत्तरार्ध म्हटले जाते. या दृष्टीने ही दोन महाकाव्ये तमिळमध्ये ‘जुळी महाकाव्ये’ समजले जातात.

म. म.  स्वामिनाथ अय्यर यांच्या अपार प्रयासाने तमिळ पंचमहाकाव्यांतील शिलप्पधिकारम्,मणिमेखलै व जीवकचिंतामणि ही महाकाव्ये उपलब्ध झाली. त्यांचे व्यवस्थित संपादन होऊन ती आता प्रसिद्धही झाली आहेत. शेवटची दोन वळैयापदि व कुंडलकेशी ही महाकाव्ये मात्र आजतरी उपलब्ध नाहीत.

मणिमेखलैमध्ये बौद्ध धर्मतत्त्वांचा आविष्कार झालेला आढळतो. शात्तनार हा केवळ तमिळ विद्वानच नव्हता, तर तो संस्कृत भाषेत व तर्कशास्त्रातही पारंगत होता. मणिमेखलै हे त्याचे महाकाव्य ३० सर्गांत विभागलेले असून त्यात एकूण ४,८५७ पंक्ती आहेत. या महाकाव्याचे कथानक थोडक्यात असे : निरपराध कोवलन्च्या हत्येची वार्ता कळल्यावर माधवी बौद्ध भिक्षुणी बनली व आपली कन्या मणिमेखलैसही तिने तपस्येचा मार्ग दाखवला. एके दिवशी मणिमेखलै आपल्या मातेची सखी सुधामती हिच्यासमवेत उपवनात फुले आणण्यास गेली असता मणिमेखलैवर आधीपासूनच आसक्त असलेला चोल राजपुत्र उदयकुमार अचानक त्या उपवनात आला. सुधामतीने मणिमेखलैस जवळच्या पर्णकुटीत लपविले आणि राजपुत्रास मणिमेखलै तपस्विनी असल्याने तिला ऐहिक सुखात रूची नाही, तपोबलामुळे तिच्या ठायी शाप देण्याचे सामर्थ्य आहे इ. उपदेश करून त्याला परत जाण्यास सांगितले. राजपुत्र तेथून निघून गेला. मणिमेखलैचे रक्षण करण्यासाठी साक्षात मणिमेखलै नावाची देवीच तेथे अवतीर्ण झाली होती. ही देवी कोवलन्‍ची कुल देवता. कोवलन्‍च्या एका पूर्वजास ह्या देवीने समुद्रात बुडत असताना वाचवले होते. मणिमखलै देवतेच्या कृपेची स्मृती म्हणून माधवीने आपल्या कन्येचेही नाव मणिमेखलै असेच ठेवले होते. देवीने मणिमेखलैस निद्रिस्त करून अंतराळमार्गे मणिपल्लव बेटावर नेले, तेथे जाग आल्यावर मणिमेखलैस बौद्ध पीठिकेचे दर्शन झाले. बेटावर एक गोमुखाकृती सरोवर होते. दरवर्षी बुद्ध जयंतीस त्या सरोवरातून अमृत सुरभी नावीचे एक दैवी अक्षयपात्र निघत असे. मणिमेखलैच्या तपोबलाने ते अक्षयपात्र तिला लाभले. त्या अक्षयपात्रातील अन्न कधीही संपत नसे. हे पात्र घेऊन ती कावेरीपटनम् येथे परत आली आणि तेथील भुकेलेल्या गोरगरिबांना अन्नदान करून तृप्त करू लागली. राजपुत्र उदयकुमारपासून आपले रक्षण करण्यासाठी तिने एका विद्याधरीचे रूप घेतले व ती धर्मशाळेत राहू लागली. तरीही राजपुत्राने तिला ओळखले व एके रात्री तो तिला भेटायला गेला. याच रात्री कांचन नावाच्या विद्याधराने (मणिमेखलैस आपली पत्‍नी विद्याधरी कायचंडिका समजून) मणिमेखलैकडे विषयवासनेने अंध होऊन आलेल्या राजपुत्रास ठार मारले. पुत्राच्या मृत्यूने राजाराणीस अपार दुःख झाले व त्यांनी मणिमेखलैचा विविध प्रकारे छळ सुरू केला. त्यावेळी प्रख्यात वयोवृद्ध व त्रिकालज्ञ बौद्धाचार्य अरवण अडिगळ हे राणीकडे गेले व जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या तर संसारातील नित्य व स्वाभाविकच गोष्टी होत, असा उपदेश तिला केला. राणीचा राग त्यामुळे शांत झाला आणि तिने मणिमेखलैस मुक्त केले. यावेळी कांचीत भीषण दुष्काळ पडला होता. अरवण अडिगळ, माधवी, सुधामती तेथे मदतीसाठी गेले. मणिमेखलैही आपले अक्षयपात्र घेऊन कांचीस गेली. तेथे तिने एक बौद्ध पीठ स्थापले आणि दुष्काळग्रस्तांना अनेक दिवस अन्नदान करून तृप्त केले. नंतर तिने अरवण अडिगळ यांच्याकडे जाऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व भवबंधातून मुक्त होण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.

या महाकाव्याची प्रेरणा मुख्यत्वे धार्मिक म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार करणे ही आहे. बौद्ध तत्त्वज्ञान व पुराणकथांचे अनेक निर्देश त्यात येतात; त्याचप्रमाणे तात्त्विक व धार्मिक वादविवादही त्यात आढळतात. महाकाव्याचे सर्व विशेष त्यात असून शात्तनारच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन सर्वत्र घडते. बौद्धेतर धर्मीयांबाबत कवीने काहीशा बोचऱ्या विनोदाचाही अवलंब त्यात केला आहे. त्याच्या उपमाही अतिशय समर्पक आहेत. सामान्य माणसासही गहन तात्त्विक प्रमेये सहज आकलन होतील अशा प्रकारे दार्शनिक विचारांचे काव्यमय स्पष्टीकरण त्यात आढळते. तमिळ पंचमहाकाव्यांत त्याला मानाचे स्थान आहे.

शिलप्पधिकारम् व मणिमेखलै ह्या दोन महाकाव्यांच्या रचना घाटात अनुक्रमे कावुंती – मातलन् व अरवण अडिगळ या तीन माहात्म्यांच्या व्यक्तिरेखा अत्यंत महत्त्वपूर्ण होत. ग्रीक नाटकांत ‘कोरस’ चे जे महत्त्वपूर्ण स्थान आहे, तसेच स्थान या माहात्म्यांच्या व्यक्तिरेखांना या महाकाव्यांत आहे. या दोन्ही महाकाव्यांतील सर्वच व्यक्तींना ह्या माहात्म्यांमुळे नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. अरवण अडिगळची व्यक्तिरेखा तर मातलन्पेक्षाही अधिक उदात्त आहे. त्यांना महाकाव्यातील सर्वच व्यक्तिरेखांचे – त्यांच्या गतजन्मांचेही – इत्थंभूत ज्ञान आहे. कथेच्या आरंभापासून तो अंतापर्यंत ते सर्वच घटनांचे ’साक्षी’ आहेत. भूत, वर्तमान व भविष्याच्या स्पष्टीकरणासाठी सर्वच पात्रे त्यांचा शब्द प्रमाण मानतात. ह्या व्यक्तिरेखेमुळे वाचकांच्या मनात एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो व रचनेत संक्षेपही साधला जातो. त्यांच्या वचनांना सूत्रमयता व सुभाषितता प्राप्त होते. तमिळ साहित्यात मणिमेखलैचे स्थान अनन्यसाधारण असे आहे.

लेखक: भा. ग. सुर्वे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate