অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मनुचरित्र

मनुचरित्र

विजयानगर येथील कृष्णदेवरायाच्या राजवटीतील अष्टदिग्गाजांपैकी सर्वश्रेष्ठ कवी अल्लसानी पेददनाकृत मनुचरित्रमु वा स्वारोचिप मनुसंभवमु हा तेलगूतील अपूर्व आणि सर्वोत्कृष्ट असा काव्यग्रंथ आहे. या ग्रंथाच्या ताडपत्रावरील सहा पूर्ण प्रती आणि एक अपूर्ण प्रत तसेच कागदावरील दोन हस्तलिखित प्रती मद्रासच्या प्राच्य हस्तलिखित ग्रंथालयात उपलब्ध आहेत. कागदावरील एका प्रतीवर अप्पय्यशास्त्राची टीकाही आहे.

महाकवी पेद्ना‌ने हा ग्रंथ कृष्णदेवरायालाच अपूर्ण केला आहे. त्यावरून त्याची रचना १५०९ ते १५३० या काळात झाली असली पाहिजे.सी.पी. ब्राऊनने १८६२ मध्ये मनुचरित्राची सटीक आवृत्ती प्रसिध्द केली. तथापि बुलुस वेंकटरमणय्या यांनी प्रसिध्द केलेली सटीक आवृत्तीच प्रमाणभूत मानली जाते. अलीकडे आंध्र प्रदेश साहित्य अकादेमीनेही एक स्वस्त आवृत्ती प्रकाशित केली आहे.

आर्यावर्तातील वरूणा नदीकाठी असलेल्या अरूणास्पद नगरीत प्रवर नामक सच्चरित्र, विद्वान आणि आतिथ्यशील ब्राम्हण राहत असे. एके दिवशी एका तपस्वी अतिथीने प्रवराला हिमालययात्रा करण्यास सांगितले आणि ती संकल्पमात्रेकरून विनायास होण्यासाठी त्याच्या पायाला एक दिव्य लेपही लावला. त्यायोगे तो कोठेही इच्छित स्थळी सहज जाऊ शके. हिमालयात तो इष्टस्थळी पोहचताच हिमस्पर्शाने लेप नाहीसा झाला. तेथे त्याला वरूधिनी नामक गंधर्वकन्या भेटली. तिने त्याच्यावर मोहित होऊन त्याला शीलभ्रष्ट करण्याचा आटोकाट पण विफल प्रयत्न केला. संयमी प्रवर अग्निदेवतेच्या साहाय्याने घरी परतला इकडे वरूधिनीने पूर्वी अव्हेरिलेल्या एका गंधर्वयुकाने ही संधी साधली आणि तो प्रवरवेषाने तिच्या सहवासात अनेक वर्ष राहिला. त्यांना स्वरोचि नावाचा पुत्र झाला. तरूण स्वरोचीचे पुढे तीन विवाह झाले. त्यांपैकी वनदेवीपासून मनूला जन्मला. ब्रम्हदेवाने त्याच्यावर सृष्टीचे शासन सोपविले. काव्याच्या शेवटी मनूचे दशावतारस्तोत्र आहे.स्वारोचिष मनुसंमवमूची ही कथा संस्कृत मार्कडेय पुराणातून आणि भारताच्या तेलुगू मार्कडेय पुराणातून घेतली आहे. भारनाच्या तेलुगू मार्कडेय पुराणात ही कथा १५० कडव्यांत वर्णिली असली तरी पेददनाने तिचा विस्तार ६ सर्गात व ६०० कडव्यांत केला आहे. तसेच प्रबंधकाव्याची सर्व गुणवैशिष्ट्ये त्याने त्यात आणली आहेत.

पेद्‌दनाच्या या ग्रंथप्रकाराला तेलुगूत प्रबंध हे नाव आहे .संस्कृत सर्गबंध महाकाव्याची आणि प्रबंधाची लक्षणे सामान्यतः एकच आहेत. या दृष्टीने मनुचरित्र हा अपूर्व आणि अत्यत्कृष्ठ असा तेलुगी प्रबंध होय. रम्य कल्पना, सजीव पात्रे, संवादरचनाचातुर्य आणि नाट्यमयता यांमुळे हा प्रबंध सर्वागंसुंदर झाला आहे, यात संशय नाही. या प्रबंधाचे मूळ नाव स्वारोचिप मनुसंमषमु असे आहे आणि तेच योग्यही आहे. कारण त्यात मनूचे चरित्र असे निवेदिलेले नाही, तर स्वारोचिष मनूच्या जन्मापर्यंतचाच कथाभाग आला आहे. गृहस्थाश्रमाचे महत्व व प्रयोजन या काव्याद्वारे कवीने प्रतिपादले आहे.

मनुचरित्र हा तेलुगूतील पहिला यशस्वी आणि अनेक बाबतीत आदर्श असा प्रबंध होय. याच्या विदग्ध आणि सुश्लिष्ट शैलीचे अनुकरण फार थोड्या कवींना करता आले. कृष्णदेवरायापासून आजवरच्या सर्वच रसिकांपर्यंत अनेकांनी त्याची प्रशंसा केली आहे.

मनुचरित्रावर तेलुगूत पुढील समीक्षापर ग्रंथ लिहिले गेले: (१) अल्लसानिवारि अल्लिक जिगिविगि (विश्वनाथ सत्यनारायण), (२) पदहारप शताब्दपु प्रबंधवाडमयमु (डॉ.पी दुर्गय्या), (३) प्रबंध साहित्य विकासमु  (डॉ. के .व्ही.आर.नरसिंहम), (४) मनुचरित्र ह्रदयाविष्करणमु (जे. शेषाद्रिशर्मा), (५) मनुचरित्राचा मूलाधार-मार्कडेय पुराण(जी.व्ही. सुब्रहम्ण्यम).

साधुपल्ली चंद्रशेखरशास्त्री यांनी मनुचरित्राचा कन्नडमध्ये अनुवाद केला आहे, तर कुटिमद्दी शेषशर्मा यांनी या ग्रंथाचा संस्कृत भाषेत अनुवाद केला आहे.

लेखक: व्यं.द. टिळक

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/6/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate