অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी बालसाहित्य

स्वातंत्र्यपूर्वकाल

१८०६ ते १८५० (प्रारंभकाल)

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बालवाङमय, स्वतंत्रपणे लिहिलेले, स्वतंत्र ग्रंथरूपात नव्हते. ऋग्वेद, रामायण, महाभारत ते बुद्ध-जैन काळापर्यंतच्या पाच सहा हजार वर्षांतल्या कथा-वाङमयात दर्जेदार प्राणिकथा, कल्पितकथा, अदभुतकथा, लोककथा, बुद्धजातक कथा, जैन कथाकोश कथा, कथासरित्सागरातल्या कथा, पंचतंत्र, हितोपदेशकथा अशा वेळोवेळी भर पडत जाऊन भारतीय कथावाङमय खूप समृद्ध झाले होते.  या सर्व कथांचा हेतू सर्वसामान्य लोकांना मनोरंजनातून नीतिशिक्षण देण्याचा होता.

मुलांचे मन कोवळे, भावनाशील व संस्कारक्षम असल्यामुळे यांतल्या बऱ्यातच कथा मुलांना अधिक उपयुक्त होण्यासारख्या होत्या.  भारतीय कथावाङमयाच्या या विपुल खजिन्यातून मुलांना सांगण्याजोग्या कथा, कहाण्या नेमक्या निवडून मौखिक म्हणजेच कथित बालवाङमयाचे पारंपारिक स्वतंत्र दालन घरोघरीच्या वयस्क स्त्रियांनी मोठ्या कौशल्याने तयार केले होते.

अनेक कल्पक स्त्री-पुरुषांनी वेळोवेळी या कथित वाङमयभांडारात स्वत:च्या कथांची, बालगीतांची भरसुद्धा घातली असणार. ‘चिमणीचे घर होते मेणाचे आणि कावळ्याचे घर होते शेणाचे’ ही पारंपारिक शिशुकथा प्राचीन मराठीत महानुभवांच्या साहित्यात आढळते.  ‘आटपाट नगर होते’ अशी सुरुवात असलेल्या कहाण्या, वेळोवेळी भर पडून, अजूनही व्रतांच्या, सणांच्या निमित्ताने व एरव्हीही सांगितल्या जातात.

परंतु मराठी बालवाङमयाला, एकदम कलाटणी मिळाली ती मुद्रणकलेच्या उदयामुळे.मुद्रणकलेच्या शोधानंतर यूरोपातून भारतात येणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक बायबलचे व ख्रिस्ताचे उपदेशपर साहित्य भारतीय भाषांत छापण्यासाठी भारतात मुद्रणालये काढू लागले; भारतीय भाषांचे टाइप तयार करू लागले. ख्रिस्ती धर्माची माहिती लोकांच्या मातृभाषेतून सांगणे अधिक परिणामकारी होणार होते.

मराठी बालसाहित्याच्या प्रारंभकाळात तंजावरचे राजे सरफोजी यांनी १८०६ साली मराठी भाषिक मुलांसाठी सख्खन पंडित (सारस्वत पंडित असेही म्हणतात) या गृहस्थाकडून इंग्रजीतील इसापनीतीचा मराठीत अनुवाद करविला आणि तो छापविला.  या पुस्तकाचे नाव बालबोध मुक्तावली असे ठेवण्यात आले होते. या पुस्तकाचे विशेष स्वागत झाल्याचे दिसत नाही.

कलकत्त्याजवळील श्रीरामपूर येथे विल्यम कॅरीन वैजनाथशास्त्री कानफाडे ह्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून सिंहासनबत्तिशी आणि हितोपदेश ह्यांचे मराठी अनुवाद करविले. सिंहासनबत्तिशी श्रीरामपूरला छापली. (१८१४) व हितोपदेशही १८१५ मध्ये श्रीरामपूरलाच छापले.ही दोन्ही पुस्तके मोडी लिपीत छापलेली होती.  १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजी सत्तेचा पाया पक्का होऊ लागला.

१८२२ मध्ये मुंबईत हैंदशाळा शाळापुस्तक मंडळी स्थापन झाली. तिचे नेटिव सेक्रेटरी सदाशिव काशीनाथ छत्रे (१७८८ – १८३० ?) ह्यांनी बालांसाठी बाळमित्र – माग पहिला (१८२८), इसप- नीतिकथा (१८२८), वेताळपंचविशी (१८३०), बोधकथा (१८३१) ह्यांसारखी पुस्तके लिहिली. त्यांपैकी बाळमित्र हे एका फ्रेंच ग्रंथावरून तयार केलेल्या बर्‌क्किन्स चिल्ड्रन्स फ्रेंड ह्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. बोधकथा हे ताराचंद दत्त ह्यांच्या प्‍लीजिंग टेल्स ह्या ग्रंथाचे भाषांतर होते. बोधकथा ह्या पुस्तकाचाच दुसरा भाग ð बाळशास्त्री जांभेकर ह्यांनी नीतिकथा ह्या नावाने प्रसिद्ध केला (१८३१). छत्र्यांनी आपल्या पुस्तकांतून सोपी पण आकर्षक भाषा वापरली होती. तसेच त्यांनी केलेली कथांची मांडणी कुतूहलजनक होती. बाळमित्राचा दुसरा भागही गेस्फोर्ड नावाच्या इंग्रज लेखकाने मराठीत आणला (१८३३). १८३७ मध्ये विष्णुशास्त्री बापट ह्यांनी मुलांना नीतिशिक्षण देण्यासाठी नीतिदर्पण तयार केले.मुंबई सरकारचा मुख्य सचिव डब्ल्यू. एच्‌. वॉथेन ह्याने मुळात इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद होय. परंतु नीतिदर्पण मुलांच्या दृष्टीने पाहता थोडे अवघड होते. ‘...मराठी शाळांवर पढणार्‍या मुलांस नीतिज्ञान व्हायाजोगे ग्रंथ फार थोडे आहेत, असा अभिप्राय मनात आणून...’ हा ग्रंथ केल्याचे खुद्द विष्णुशास्त्री बापटांनी म्हटले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातले लिखित बालसाहित्य तसे बाल्यावस्थेतच होते. मौखिक म्हणजे कथित बालसाहित्याला घरोघरच्या आजीबाईनी. सोपी सुटसुटीत भाषा,कुतूहल व औत्सुक्य वाढणारी मांडणी, मनोरंजन किंवा विचारप्रवर्तक प्रसंग व कथा खुलविण्याची हातोटी यांमुळे भरीव केले होते;पण लिखित बालसाहित्य पाहिले तर बोजड भाषा, शैलीचा अभाव, न पेलणारी पृष्ठसंख्या, अवघड कथावस्तू असे दोष दिसतात. या बालसाहित्यावर साहित्यिक लेण्यांचा आवश्यक असणाग साज विशेषता चढू शकला नव्हता. हे अनुवादित होते. मात्र बालसाहित्यलेखनात प्रगतीचे प्रयत्‍न जारीने चालू होते हे निर्विवाद.

१८५१ – १९००

हा मराठी बालसाहित्याचा  विकासकाल. १८४७ मध्ये मेजर ट्रॉमस कँडी (१८०४ – ७७)  ह्याची‘मराठी ट्रॅन्सलेटर व रेफरी’ म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्याने मराठी पुस्तकांची पोथी पद्धतीची प्रौढ भाषा टाळण्याचे प्रयत्‍न केले. इंग्रजी पद्धतीची, तसेच व्याकरणदोषयुक्त वाक्यरचना काढून टाकण्याचा कटाक्ष ठेवला. बालवाङ्‌मयाच्या दृष्टीने हे धोरण उपयुक्त ठरले.विनायक कोंडदेव ओक व हरि कृष्ण दामले(१८५४ – १९१३ ) ह्यांची ह्या धोरणास मदत झाली. विनायक कोंडदेव ओक ह्यांनी कँडीच्या धोरणानुसार शालेय पुस्तके लिहिली. त्यांनी मुलांसाठी बालबोध हे मासिक काढून त्यातून सहज व सोफ्या भाषेत चरित्रे, कविता, निबंध इ. विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले. खर्‍या अर्थाने मराठी बालवाङ्‌मयाचा पाया त्यांनी घातला, असे म्हटले जाते. दामले ह्यांनी मुलांस नवी देणगी (आवृ. २ री, १८९३), सुबोध गोष्टी (भाग १, आवृ. ५ वी, (१९११), (भाग २, आवृ. ४ थी, १९०८), (भाग ३, आवृ. ३री, १९०६), सायंकाळची करमणूक (आवृ. ४ थी, १९१३), इसाप नीति) आवृ.नवी, १९१५) ह्यांसारखी रूपांतरित व स्वरचित पुस्तके लिहिली.

या कालखंडात रामजी गणोजी चौगुले (नारायणबोध, भाग १ ला, १८६०), गोविंदशास्त्री बापट (हरि आणि त्रिंबक, रूपांतर, १८७५), मोरेश्वर गणेश लोंढे (बोधशतक, १८८२), विष्णु जिवाजी पागनीस (जिल्‌ब्लास चरित्र, १८७१), कृष्णशास्त्री आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर, (रासेलस, सॅम्युएल जॉन्सनकृत रासेलस ह्या ग्रंथाचा अनुवाद, १८७३ वगैरेंनी बालसाहित्यात भर घातली.

१९०१ – १९५०

विसाव्या शतकाच्या प्रारंभ वासुदेव गोविंद आपटे(१८७१ – १९३०) यांच्या बालसाहित्यानने चिरस्मरणीय झाला. त्यांनी आपल्या लेखनात बालसाहित्याच्या विविध पैलूंचे सुरेख दर्शन घडवून बालसाहित्याच्या विकासाचा व क्रांतीचा एक नवा टप्पा निर्माम केला. उत्तम बालसाहित्याला प्रत्साहन देण्यासाठी त्यांनी आनंद मासिक काढले ( १९०६ ). रामायणांतल्या सोफ्या गोष्टी (१९०६ ), बालभारत ( आवृ. २री, १९०६ ), महाराष्ट्र देशाचा बालबोध इतिहास ( १९०७ ), बालभागवत (१९०९), वीरांच्या कथा ( १९१० ), लहान मुलांसाठी मैजेच्या गोष्टी ( भाग १ ला, १९११ ), परीस्तानांतल्या गोष्टी, बालमनोरंजन (१९१५), बालविहारमाला ( १९३०) ही व ह्यांसारखी त्यांनी लिहिलेली अन्य पुस्तकेही मुलांना व पालकानांही वाचनात खिळवून ठेवीत.

याच कालखंडात हॅन्स अँडरसन व ग्रिमबंधूच्या काही नावाजलेल्या परीकथा मराठीत अनुवादित किंवा रूपांतरित झाल्या. विष्णू धों. कर्वे ( लहान मुलांकरिता गोष्टी, १९१६), म. का. कारखानीस (अद्‌भुतकथा, भाग १, २, १९२७) ह्यांसारखे बरेच लेखक पुढे आले. बिरबलाच्या चातुर्यकथा आपापली शीर्षके देऊन वेगवेगळ्या लेखकांनी मनोवेधक भाषेत लिहिल्या. ताराबाई मोडक (१८९२ – १९७३), म. का. कारखानीस, शं. ल. थोरात, मा. के. काटदरे, कावेरी कर्वे, देवदत्त नारायण टिळक, दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ दत्तकवी इत्यादींनी बालसाहित्यात शिशुगीते व शिशुकथा यांची स्वतंत्र प्रथा सुरू केली. मराठी लोककथासाहित्यात शिशुकथा भरपूर आहेत. ताराबाईनी आजीबाईच्या गोष्टी ( दोन भाग, १९३९, १९४३)या पुस्तकात त्यांतल्या बर्‍याच कथा एकत्रित केल्या. स्वत:ही शिशुकथा रचल्या; नाटुकली लिहिली. म. का. कारखानिसांच्या सोप्या, पद्दात्मक, अनुप्रासात्मक शिशुकथांनी बालसाहित्यात रंगत भरली. या प्रांतात सरलाताई देवधर ( ताराबाईच्याच शिव्या), शेष नामले यांनीही भरीव कार्य केले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात रेव्ह. ना. वा. टिळक, त्र्यंबक बापूजी ठोमरे ( बालकवी ), श्री. बा. रानडे, सत्यबोध हुदलीकर, मा. के. काटदरे, महादेवशास्त्री जोशी, ह. ना. आपटे, गोपानाथ तळवळकर, ना. ह. आपटे, चिं. वि. जोशी, शरच्चंद्र टोंगो, मायादेवी भालचंद्र, विमला मराठे, भवानीशंकर पंडित, वामनराव चोरघडे, के. नारखेडे, आनंदराव टेकाडे, देवदत्त ना. टिळक, पां. श्री. टिल्लू, भा. रा. तांबे, विठ्ठलराव घाटे, साने गुरूजी, शं. रा. देवळे, ह. भा. वाघोलीकर, व्यं. रा. खंडाळीकर, वि. वि. बोकील, ना. धों. ताम्हनकर, भा. रा. भागवत, भा.म. गोरे, मालतीबाई दांडेकर, ग. ह. पाटील, ना. गं. लिमये, प्रभावती जोशी, वि. म. कुलकर्णी, संजीवनी मराठे, वा. गो. मायदेव, भालचंद्र वैद्य, ना. घ. पाटील आणि इतर अनेकांनी बालसाहित्याचा काव्य व गद्यविभाग नादमधुर सोफ्या शब्दांनी, विषयाच्या सुरेख सुटसुटीत मांडणीने अतिशय आकर्षक तर केलाच, पण संपन्नही केला. आधुनिकतेचे व आगळेपणाचे वळण देणार्‍या बालकवी, भा. रा. तांबे, वामनराव चोरघडे, गोपीनाथ तळवलकर, साने गुरूजी, ताराबाई मोडक, ना. धों. ताम्हणकर भा. रा. भागवत, मालतीबाई दांडेकर अशा काही लेखकांनी तर स्वातंत्र्यपूर्व बालसाहित्यात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ताराबाई मोडकांच्या नदीच्या गोष्टीतील वाक्ये, ‘मी होते डोंगरावर, डोंगराच्या पोटात, थेंब थेंब वहात होते.’ किंवा शेष नामल्यांचे सुंदर बालगीत ‘या या चांदण्यानो अंगणी माझ्या ... सोबत चंद्रा घेऊन या या, चमकत ठुमकत अंगणी या या’ पाहिल्यावर स्वातत्र्यपूर्व काळातले मराठी बालसाहित्य सोपी व मनोवेधक भाषा, मुलांच्या वयानुरूप विषयांची निवड, कल्पनारम्यता या बाबतींत किती भरभर विकास पावत होते व त्या कालखंडातले सर्वच लेखक त्यासाठी किती प्रयत्‍न करीत होते हे लक्षात येते.

बालमासिके

पुणे येथील नॉर्मल स्कूलमध्ये पुणे पाठशालापत्रक नावाचे एक नियतकालिक १८६१ मध्ये निघाले. १८६३ पासून त्याचे नाव बदलून मराठी शालापत्रक असे ते ठेवण्यात आले. कृष्णशास्त्री चिपळूणकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर हे पितापुत्र ह्या मासिकाचे काही काळ संपादक होते. १८७५ मध्ये मासिक सरकारी अवकृपेमुळे बंद पडले. चिपळूणकर पितापुत्रांच्या मृत्यूनंतर, १८९० मध्ये ह्या मासिकाचे पुनरूज्‍जीवन करण्यात आले. ह्या मासिकाने लहान मुले व विद्यार्थी ह्यांना उपयुक्त असा गोष्टी, चरित्रे इ. बराच मजकूर प्रसिद्ध केला. दुसरे मासिक बालबोध मेवा ( १८७३). कथाकवितांच्या द्वारा चांगल्या वाचनाची गोडी मुलांना लागावी म्हणून हे सुरू करण्यात आले होते. रेव्ह. इ. एच्‌. ह्यूम, एमिली बिसेल, देवदत्त ना. टिळक, वत्सलाबाई घाटे आदींनी वेळोवेळी त्याच्या संयादनात भाग घेतला. १८८१ मध्ये विनायक कोंडदेव ओकांनी बालबोध हे मासिक काढले. मुलांसाठी गोष्टी, गाणी, ज्ञान, मौज इ. देणे हा वा. गो. आपटे ह्यांच्या आनंदाचा हेतू. महाराष्ट्राच्या बालसृष्टीत ह्या मासिकाने मोठा आनंद निर्माण केला. लोकप्रियतेत त्याने शालापत्रकालाही मागे टाकले.

विविध साहित्याची मेजवानी मुलांना त्याने दिली. आपटे यांच्या नंतर गोपीनाथ तळवलकरांनीही आनंद अतिशय समर्थपणे चालवला. कोकणात, मालवणसारख्या खेडेगावी पारूजी नारायण मिसाळ यांनी बालसन्मित्र मासिक काढले; आपल्या बालसन्मित्र मालेतर्फे विविध प्रकारचे विपुल साहित्य बालवाचकांना दिले. १९१८ मध्ये शंकर बळवंत सहस्त्रबुद्धे यांनी बालोद्यान ह्या सचित्र मासिकाचे प्रकाशन सुरू केले. आजच्या लोकप्रिय चित्रकथांची ( कॉमिक्स) झलक बालोद्यानमध्ये आढळते. या मासिकाची भाषा तर बालसुलभ, अगदी सुटसुटीत आणि गोड; पण थोड्या वर्षानीच ते बंद झाले. मग १९२७ मध्ये दोन मासिके उद्‍यास आली. नागपूरचे बाळकृष्ण रामचंद्र मोडकसंपादित मुलांचे मासिक व मुंबईच्या का. रा. पालवणकरांचे खेळगडी. हे खेळगडी अतिशय खेळकरपणे मुलांच्या माहितीत भर घालगारे, विविध प्रकारांनी मुलांचे मनोरंजन करणारे. १९५० मध्ये ते बंद झाले. १९४७ मध्ये वीरेंद्र अढिया यांनी कुमार मासिक सुरू केले. १९५० मध्ये तेही बंद झाले.

बालनाट्य

१८९९ मध्ये पन्हाळगडाचा किल्लेदार हे नाटुकले किरांतानी लिहिले. राम गणेश गडकर्‍यांचे ‘सकाळचा अभ्यास’ हे प्रहसनही प्रसिद्ध झाले होते. आनंदातून वा. गो. आपटे यांनीही संवाद लिहिले होते. अत्र्यांचे गुरूदक्षिणा (१९३०) हे बालनाट्यही उल्लेखनीय आहे. केवळ मुलांनी किंवा केवळ मुलींनी करण्याजोगी नाटुकली गरजपरत्वे लिहिली गेली. ना. धों. ताम्हनकर, स. अ. शुल्क, चिं. आ. मुंडले यांनी नाटुकली लिहिली.

दिवाकरांच्या नाट्यछटाही मुले हौसेने करीत. के. गो. पंडितांनीही संवाद व नाट्यछटा लिहिल्या. वि. द. घाट्यांनी नाट्यरूप महाराष्ट्र (१९२६) लिहून चांगल्या ऐतिहासिक बालनाट्याला प्रारंभ केला. १९५५-५६ पर्यत शालेय समारंभाच्या निमित्ताने, मोठ्यांच्या नाटकांतले किंवा मुद्दाम लिहिलेले, मुलांना योग्य असे प्रवेश वा नाटिका निवडण्यात येत. गणेशोत्सवाच्या मेळ्यांसाठी संवाद, नाटुकली मद्दाम लिहिली जात. उदा., पुरूषोत्तम दारव्हेकरांची सुंदर बालनाट्ये. दिवसेंदिवस, संवादातली वाक्ये मुलांना सहज बोलता येतील अशी छोटी बनली. पुष्कळ मुलांना काम मिळेल अशी नाटुकली लिहिली जाऊ लागली.

स्वातंत्र्यपूर्व बालसाहित्यात एकोणिसाव्या शतकातले बालसाहित्य बहुतांशाने परकीय कुबड्यांच्या आधाराने वाटचाल करीत होते. पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातले स्वातंत्र्यपूर्व बालसाहित्य, काव्य, कथा, कादंबरिका, नाट्य, मासिके या सर्वच प्रांतांत स्वतंत्र कल्पना; नादमधुर, सोपी भाषा; कुशल मांडणी व आकर्षक शैलीने नटलेले; मनोरंजन व स्वतंत्रपणे वाटचाल करणारे बनले होते.

स्वातंत्र्योत्तर काळातील बालसाहित्य

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्योत्तर काळात खूप पुढे आलेल्या लेखकांपैकी काही स्वातंत्र्यापूर्वीही लिहीत होतेच.

साने गुरूजी ( १८९९- १९५० ) ह्यांचे साहित्य स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात लिहिले गेले.तथापि त्यांचे साहित्य विशेष लक्षवेधी ठरले ते स्वातंत्र्योत्तर काळात. ‘गोड गोष्टी’ ह्या त्यांचा कथाकादंबरिकांच्या मालेत प्रसिद्ध झालेल्या नदी शेवटी सागराला मिळेल ( १९४२ ), दु:खी ( १९४२ ), मनूबाबा ( १९४२ ), बेबी सरोजा ( १९४३ ), करूणा देवी ( १९४३ ); तसेच आपण सारे भाऊ ( १९४७ ), गोप्या ( १९४७ ), दुर्दैवी ( १९४७ ), मिरी (१९४७ )इ. पुस्तकांनी थोरामोठ्यांचे मन हेलावून टाकले. ओघवत्या, सहजसोफ्या भाषेने व शौलीने इतर काहीच्या लेखनावरही छाप टाकली.

भा. रा. भागवतदेखील स्वातंत्र्यपूर्वकाळापासून लिहीत असले, तरी त्यांच्या झ्यूल व्हेर्नच्या कथांच्या अनुवादांनी त्यांची मुलांशी दाट गट्टी जमली, ती स्वातंत्र्यानंतर, झ्यूल व्हेर्नच्या शास्त्रीय व चमत्कृतिपूर्ण कथांना भारतीय वातावरणात बेमालूम बसवून भागवतांनी पुष्कळ कादंबर्‍या लिहिल्या आहेत. चंद्रावर स्वारी, सूर्यावर स्वारी, मुक्‍काम शेडेनक्षत्र वगैरेसारख्या शास्त्रीय चमत्कृतींच्या कादंबर्‍यांनी व ‘फास्टर फेणे’ च्या साहस कादंबर्‍यांनी भागवत हे मुलांचे फार लाडके लेखक बनले आहेत. मालतीबाई दांडेकरांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या अनेक कादंबरिकांनी, कथांनी व नाटुकल्यांनी मराठी बालसाहित्यात मोलाची भर घातली आहे. माईच्या गोष्टी ( २ भाग, १९४४, १९४९ ); जलराज्यातल्या जमती ( २ भाग, १९४८ ), चिनी गुलाब ( १९४९ ) वगैरे त्यांची अनेक पुस्तके मुलांची आवडती आहेत. यांव्यतिरिक्त मालतीबाईनी, बालसाहित्याची रूपरेखा ( १९६४ ) हे मौलिक, अभ्यासपूर्ण पुस्तक लिहून बालसाहित्याच्या विकासाचा संपूर्ण मागोवा घेतला आहे. या पुस्तकामुळे बालसाहित्य छापले जाऊ लागल्यापासून त्याच्या प्रकृतीत, भाषेत, कल्पनाविष्कारात व शैलीत वेळोवेळी कसा फरक होत गेला, हे ध्यानी येते.

भा. द. खेर ( ऐतिहासिक गुजगोष्टी – साहा. रा. आ. जोशी, १९४९ ), वामनराव चोरघडे ( चंपाराणी, १९४४; प्रभावती, १९४५ ), गोपीनाथ तळवलकर ( गृहरत्न, आवृ. २री, १९४५; नवी गृहरत्ने, १९४८ ), के नारखेडे ( मधुराणी, १९४८ ),गो.नी. दांडेकर ( आईची देणगी, ६ भाग, १९४५ – ४८ ; सिवबाचे शिलेदार १९४९ ), विष्णू नरहर गोंधळेकर ( ज्ञान व मौज, १४ भाग ), नी. शं. नवरे ( दिग्विजयी रघुराजा, १९४४ ), ह.भा. वाघोळीकर ( सागरकन्या, १९४४; सोनेरी पक्षी, १९४४), महादेवशास्त्री जोशी ( आईच्या आठवणी ३ भाग, १९४७- ४८; गुणमंदिर, १९५० ), श्री. बा. रानडे ( तिबूनानांचा रेडिओ, १९४४ ), ग. म. वैद्य ( करवंदे, १९४५ ), गंगाधर गाडगीळ ( लखूची रोजनिशी ) ( १९४८ ), भालचंद्र रानडे ( इटुकल्या मिटुकल्या गोष्टी, १९४३ ), वि. वि. बोकील ( कुंतीचा घास, १९४७; मीनाघ्या गोष्टी, १९४९ ), शरच्चंद्र टोंगो, ( झेलम, १९४४ ), यदुनाथ थत्ते ( वाळवंटातले झरे, १९५० ), श्री. शं. खानवेलकर ( चन्दू, २ भाग, १९४३, १९४६ ), ना. ध. पाटील ( मानवतेचे पुजारी – थोरांची चरित्रे, ३ भाग, १९५० ), सुरेश शर्मा ( टारझन ), देवदत्त ना. टिळक ( वेणू वेडगावात, इ. ), द. के. बर्वे ( शंभू आणि शारी, १९४२,गुलछबू१९४४). ताराबाई मोडक ( गंपूदादांचा लाकडदंड्या, १९४४; सवाई विक्रम, १९४४ ); कावेरी कर्वे ( चिंगी, १९४२ ); पिरोजबाई आनंदकर ( किशोर कथा, १९४२; बालबहिर्जी, १९४७ ); चारूशीला गुप्ते ( बाजीप्रभू देशपांडे ) या व इतर अनेक साहित्यिकांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, साहसाच्या व शौर्याच्या छोट्यामोठ्या कथा, तसेच कादंबरिका स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात लिहून मुलांना आनंद दिला; भारतीय संस्कृतीची ओळखही करून दिली.

स्वातंत्र्योत्तर कालात केंद्रशासित एन. सी. ई. आर्‌. टी. ( शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणार्थ राष्ट्रीय समिती ) तर्फे दरवर्षी बालसाहित्यस्पर्धा सुरू झाल्या. राज्यपुरस्कारही दिले जाऊ लागले. या स्पर्धानी अनेक उत्साही साहित्यिकांचे लक्ष वेधले. नव्या व जुन्या बर्‍याच साहित्यिकांनी वेळोवेळी भाग घतला. स्वकल्पित सुंदर पुस्तके लिहून बर्‍याच लेखकले खिकांनी पुरस्कार मिळविले; आणि ते विशेष प्रकाशात आले. लीलावती भागवत, सुमति पायगांवकर, राजा मंगळवेढेकर, भा. रा. भागवत, शं. रा. देवळे, वि. स. गवाणकर, लीलाधर हेगडे, ग. ह. पाटील. ना. गो. शुल्क, मा. गो. काटकर, सुधाकर प्रभू, आशा गवाणकर, श्यामला शिरोळकर, निर्मला देशपांडे, विंदा करंदीकर, आशा भाजेकर वगैरे मंडळी यांत आहेत. या साहित्यिकांपैकी काहींनी तर ( भा. रा. भागवत, सुमति पायगांवकर, सुधाकर प्रभू, विंदा करंदीकर वगैरे ) पुन्हा पुरस्कार मिळविले.

सरकारी स्पर्धाचे काही महत्त्वाचे फायदे म्हणजे बालसाहित्याची सुरेख मजकुराची व सुंदर चित्रांची दर्जेदार पुस्तके पुष्कळ प्रमाणात प्रसिद्ध होऊ लागली. बरेच नवे लेखक उद्‍याला आले. काही खाजगी संस्थांनीही स्पर्धाचा उपक्रम सुरू केला. १९६५ पर्यत मुलांचे व त्यांच्या पालकांचे लक्ष बालसाहित्याच्या पुस्तकांकडे खूपच आकर्षिले गेले. पुस्तकांचा मजकूर, टाइप, आकार, सजावट यांत सौंदर्यदृष्टी व मुलांचे वय लक्षून पुष्कळ फरक केले गेले.

दिल्लीत १९५७ मध्ये नॅशनल बुक ट्रस्ट ही संस्था स्थापन झाली. नेहरू बालपुस्तकालयही दिल्लीत प्रस्थापित झाले होते. या संस्थांनी मोठाली व खूप रंगीत चित्रांची, ठळक टाइपांची चित्तवेधक पुस्तके काढून बालसाहित्यात भरपूर आकर्षण निर्माण केले. नॅशनल बुक ट्रस्टच्या विविध पुस्तकांत प्राण्यांची पक्ष्यांची माहिती, वेगवेगळ्या भाषांतील काही गमतीदार लोककथा, परदेशीय कथांचे अनुवाद व काही स्वतंत्र कथा असे सुरेख साहित्य आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात काही खाजगी प्रकाशकांनी रूपांतरित किंवा अनुवादित कथा – कादंबरिकांच्या प्रकाशनाला सुरुवात केली. त्यातून टारझन ( सुरेश शर्मा ), गुप्त खजिना ( ट्रेझर आयलंड, ह. भा. वाघोळीकर ), धाडसी चंदू ( टॉमसॉयर, गंगाधर गाडगीळ ), शाळकरी मुले ( वित्या माल्येव, स. बा. हुदलीकर ), पळवलेला पोर ( किडनॅप्‌ड, श्रोत्री), सुलेमानचा खजिना ( किंग सॉलोमन्स माइन्स, मालतीबाई दांडेकर ) अशी केवढी तरी, बेतशीर पृष्ठसंख्येची, मनोरंजक, चांगली पुस्तके लिहिली गेली. भा. रा. भागवतांनी तर इयूल व्हेर्नची केवढी तरी कथानेक मोठ्या कौशल्याने रूपांतरित करून मराठी बालसाहित्याला भरीव देणगी दिली आहे. सुमति पायगावकरांनी हॅन्स अँडरसनच्या परीकथा ( भाग १ ते १६ ) व ग्रीमच्या परीकथा ( भाग १ ते १० ) अनुवादित करून बालसाहित्यात मोलाची भर टाकली आहे. शिवाय त्यांनी सोनपंखी कावळोबांच्या जमती, बदकताईंचा कॅक कॅक, मिनीची बाहुली, रानगावची आगगाडी, स्वप्नरेखा, चाफ्याची फुले, पोपटदादाचे लग्‍न अशी ( पुरस्कार विजेती ) स्वकल्पित, स्वतंत्र पुस्तकेदेखील अनेक लिहिली.

स्वातंत्र्योत्तर गद्य बालसाहित्याला आजपर्यत पुढील काही जुन्यानव्या मंडळींनी संपन्न केले आहे. ताराबाई मोडक, कमलाबाई टिळक, यदुनाथ थत्ते, सरोजिनी बाबर, शैलजा राजे, सविता जाजोदिया, सरिता पदकी, शांता शेळके, सरला देवधर, वि. म. कुलकर्णी, बा. रा. मोडक, बा. वा. फाटक, शं. ल. थोरात, ग. ल. ठोकळ, अंबादास अग्‍निहोत्री, वि. स. गवाणकर, राजा मंगळवेढेकर, भालबा केळकर, ना. वा. कोगेकर, रा. वि. सोवनी, वि. स. सुखटणकर, अमरेंद्र गाडगीळ, वि. कृ. क्षेत्रिय, सरोजिनी कमतनूकर, दि. नी.देशपांडे, आकाशानंद, ह. रा. पाटील, मा. गो. कुलकर्णी, व्यंकटेश वकील, दत्ता टोळ, मु. शं. देशपांडे, मा. गो. काटकर, ब. मो. पुरंदरे, म. वि. गोखले, आनंद घाटुगुडे, साधना कामत, अनुताई वाघ, कुमुदिनी रांगणेकर, गिरिजा कीर, लीला बावडेकर, मालती निमखेडकर, शकुंतला बोरगांवकर, तारा वैशंपायन, तारा कुलकर्णी, विजया वाड, न. दि. दुगल अशी केवढी तरी नावे देता येतील.

या लेखकांपैकी काहीचे लेखन अनुवाद-रूपांतराच्या स्वरूपाचे, तर काहींचे स्वतंत्र आहे. त्यात पौराणिक, अद्‌भुत व परीकथा; भारतीय व परदेशीय लोककथा; भारताच्या ऐतिहासिक कथा; शौर्य व साहस कथा; विज्ञानकथा; चरित्रे, सामाजिक कथा अशी भरपूर विविघताही आहे.

मात्र याच कालावधीत असेही काही लेखक पुढे आले, की ज्यांच्या लेखनात मुलांना योग्य विषयही नाहीत नि मुलांनुरूप भाषांही नाही. नादपूर्ण शब्दांसाठी अर्थहीन अनुप्रासात्मक शब्द जोडून एका वाक्याच्या छापील चार पाच ओळी होतील अशा बोजड भाषेत कथावस्तूंची मांडणी असते. मोठा टाइप व थोडी पाने एवढीच जमेची बाजू. अद्‌भुत किंवा परीकथा असल्यास राक्षसाच्या भल्या बायकोने दिलेल्या जादूच्या अंगठीने किंवा परीच्या जादूच्या पिसाने बालनायक पटापट सर्व काही करू शकतो. बालकथांमागील मर्माचा या लेखकांनी अभ्यासच केलेला नसतो.

पण एकंदरीत पाहता बालसाहित्याच्या गद्य लेखकांनी, स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या कथावस्तूंना मनोरंजक वर्णने, चित्तवेधक प्रसंग, सुटसुटीत छोटी वाक्ये, सोपी भाषा आणि आकर्षक शैली ह्यांचा सुरेख साहित्यिक साज चढवुन मराठी बालसाहित्य खूपच मनोहर, लक्षवेधी, दर्जेदार केले आहे.

बालसाहित्यातील पद्यविभाग

साने गुरूजी, वा. गो. मायदेव, भवानीशंकर पंडित, ताराबाई मोडक, गोपीनाथ तळवलकर, शेष नामले, ग. ह. पाटील, संजीवनी मराठे, शांता शेळके, वगैरे मंडळी स्वातंत्र्यपूर्वकाळाचा उंबरठा ओलांडून उत्तरकाळात आली. बालकाव्य सोफ्या शब्दातले, नादमधुर, मुलांच्या विश्वातल्या विषयांवर, पण छोटेच असले तर मुलांना किती आवडते हे बालकवी, रे. टिळक व दत्त कवींनी पूर्वीच पटवून दिले होते. मायदेव, शांता शेळके, ग. ह. पाटील, राजा मंगळवेढे ह्यांनी लिहिलेल्या कविता गोड नि मुलांना सहज समजतील अशा आहेत. पुढील काही ओळीवरून बालकाव्याच्या प्रवाहाला हळूहळू कसे वळण मिळाले ते लक्षात येते.

‘थेंबा थेंबा थांब थांब, दोरी तुझी लांब लांब; आकाशाला पोचली, तिथे कशी खोचली –(पाऊस–ताराबाई मोडक ).

‘कधी कधी मज वाटे जावे उंच ढगांच्यावर’, दो हातांनी रविचंद्रांचे हलवावे झुंबर ( संजीवनी मराठे ).

‘सदाकदा पहाल तेव्हा चिंतू आपला चिंतातूर-आभाळाला नाही खांब, चंद्र राहतो लांबलांब, समुद्राला नाही झाकण, कोण करील चांदण्याची राखण ? ( राजा मंगळवेढेकर ).

चिउताई चिउताई ! कायरे चिमणा ? हा बघ आणलाय मोत्याचा दाणा . पण ठेवायचा कुठे ? त्यात काय मोठं? बांधू या घरटं ! ( लीलावती भागवत ).

आई जरा ऐक माझं, आताच खाऊ देऊन टाक, दादा लवकर येणार नाही, नको पाहूस त्याची वाट. आई जरा ऐक माझं, आज शाळेत नाही जात, पोट जरा दुखतय माझं, तुलाही सोबत हवी घरात ! ( सुमति पायगांवकर ).

बालकाव्यांचा ओघ कल्पनाजगतातून रोजच्या विषयांकडे, वास्तव जगाकडे नि अवघडाकडून सोप्याकडे वळला, हे उपर्युक्त रचनांवरून दिसून येईल. रोज दिसणारी निसर्गदृश्ये, घडणारे प्रसंग यांतला गोडावा मुलांना दाखवण्याचा कवींनी अधिक प्रयत्‍न केला आहे. बालकाव्याच्या प्रातांत ताराबाई मोडक, संजीवनी मराठे, शांता शेळके, लीलावती भागवत, सुमति पायगांवकर, सरिता पदकी, सरला देवधर, सरोजिनी बाबर, मंदा बोडस, वंदना विटणकर, शिरीष पै, तारा वैशंपायन, तारा परांजपे, वृंदा लिमये, विजया वाड, डॉ. वि.म. कुलकर्णी, सूर्यकांत खांडेकर, मा. गो. काटकर, ग. दि. माडगूळकर, राजा मंगळवेढेकर, ग. ह. पाटील, ना. गो. शुल्क, शरद मुठे, विंदा करंदीकर मंगेश पाडगांवकर, आनंद घाटुगडे, महावीर जोंधळे यांनी मनोरंजक, सोफ्या, छोट्या, सुंदर कविता नि गोड बालगीते लिहून बालसाहित्याचा काव्यविभाग खूपच फुलवला. ‘सांग सांग भोलानाथ’ ( मंगेश पाडगांवकर ), नि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ ( ग. दि. माडगूळकर ) ही गीते कोण विसरू शकेल?

बालनाट्य

जवळ जवल १९५५-५६ पर्यत शालेय कार्यक्रम, इतर उत्सव व आंतरशालेय नाट्यस्पर्धात मोठ्यांच्या नाटकांतील प्रवेश किंवा काही बालनाट्ये करणे ही प्रथा बहुतांशाने चालू होती. पुरूषोत्तम दारव्हेकरांनी आपल्या ‘रंजन कला मंदिर’ संस्थेतर्फे त्यांच्या गणपतीच्या मेळ्यांतील संवाद व नाटुकल्यांना हळूहळू व्यावसायिक रंगभूमीला योग्य असे रूप द्यायला सुरूवात केली. सई परांजपे यांनीही मुलांना गंमत वाटेल अशी छोटी नाटुकली लिहायला सुरूवात केली. त्यांनी प्रत्तेनगरी, शेपटीचा शाप, झाली काय गंमत इ. बरीच गंमतीदार नाटुकली लिहून मुलांना खरीखुरी बालनाट्ये सादर केली.

यामुळे बालनाट्यात दोन प्रवाह सुरू झाले. व्यावसायिक बालरंगभूमीसाठी मोठ्या माणसांनी कामे केलेली दोन-अडीच तासांची दोन-तीन अंकी मोठी नाटके आणि शालेय रंगभूमीसाठी, मुलांनी कामे करण्याजोगी सई परंजपे ह्यांच्या नाटुकल्यांसारखी छोटी नाटके. छोट्या नाटुकल्यांत मुलांना सहज उच्चारता येतील असे शब्द, पेलतील अशी नेटकी वाक्ये, जास्त मुलांना भाग घेता येईल अशी कथावस्तू व निखळ मनोरंजनातून जमल्यास, एखाद्या सुंदर गुणाचे दर्शन या गोष्टी प्रमुख असत व आहेतही. याच सुमाराची पु. ल. देशपांडे यांची  नवे गोकुळ व वयं मोठं खोटम्‌ही नाटुकली या दृष्टीने फारच सुरेख आहेत विजय तेडुंलकरांनीही चांभारचौकशीचे नाटक, बाबा हरवले आहेत, राजा राणीला घाम हवा वगैरे पाउण ते एक तासाची सुंदर बालनाट्ये लिहिली आहेत. ‘अविष्कार’ तर्फे सुलभा देशपांडे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे बरेच प्रयोग केले. राजाने चोरले पिठले, पोपट गेला उडून, शशी नि मयूरीला हवा मोत्याचा हार ही सुमती पायगांवकरांची छोटी नाटुकलीदेखील गाजली.

सुधा करमरकरांनी १९५९ साली लिट्‌ल थिएटर ( ‘बालरंगभूमी’) ही व्यावसायिक बालनाट्यसंस्था मुंबईला स्थापन केली. आजपर्यत मधुमंजिरी, अल्लादीन आणि जादूचा दिवा, अलीबाबा आणि चाळीस चोर, चिनी बदाम, हं हं आणि हं हं हं, सिंड्रेला यांसारखी कलात्मक किंवा भव्य नेपथ्यरचनेची, रंगतदार नि दर्जेदार, दोन अडीच तासांची नाटके करून मुलांना खूप आनंद दिला. यांतली काही नाटके स्वत: सुधाताईनी, तर काही दारव्हेकर, दिनकर नीलकंठ देशपांडे, रत्नाकर मतकरी वगैरेंनी लिहिली आहेत.

रत्नाकर मतकरींनी १९६१ मध्ये मुंबईला ‘बालनाट्य’ ही व्यावसायिक बालनाट्यसंस्था स्थापली. नेपथ्य शक्य तितके सुटसुटीत व प्रतीकात्मक करण्याकडे मतकरींचा कल आहे. त्यांची मोठ्यांनी कामे केलेली, दोन-अडीच तासांची निम्मा शिम्मा राक्षस, इंद्राचे आसन नारदाची शेंडी, राक्षसराज झिंदाबाद, गाणारी मैना, अलबत्या गलबत्या, अचाटगावची अफाट मावशी वगैरे नाटके खूप यशस्वी ठरली आहेत.

वंदना विटणकरांनीही बालनाट्ये लिहिली आहेत. पाच-सहा वर्षापूर्वी त्यांचे रॉबिनहूड हे अडीच तासांचे मोठ्यांनी छोट्यांसाठी केलेले व्यावसायिक नाटक खूपच यशस्वी झाले होते. वंदना थीएटर्स या त्यांच्या संस्थेने केलेले बजरबट्‌टू हे नाटकही गमतीदार आहे.

पुण्याला श्रीधर राजगुरूसंचालित ‘शिशुरंजन’ ही संस्थाही बालनाट्याचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन हे सर्व काम मोठ्या उत्साहात करीत असते. मुलांनी स्वत:ची मंडळे काढून किंवा शाळेत करण्याजोगी छोटी गमतीदार नाटके मालतीबाई दांडेकर व भालबा केळकर ह्यांनी फार सुरेख लिहिली आहेत. मुलांयोग्य विषय निवडून, त्यांना सुलभ जाईल अशा सुटसुटीत भाषेत कुतूहलपूर्ण किंवा गमतीशीर प्रसंगांवरील नाटुकली लिहिण्याचा पुष्कळ साहित्यिक अलीकडे प्रयत्‍न करीत आहेत. या प्रयत्‍नांमुळे मोठ्यांची नाटके करावी लागण्याच्या व शब्दावडंबराच्या दुरवस्थेतून आता मुलांची सुटका झाली आहे.

बालमासिके

स्वातंत्र्यापूर्वीची शालापत्रक, आनंद, मुलांचे मासिक ही बालसाहित्याची मन:पूर्वक सेवा करणारी मासिके. स्वातंत्र्योत्तर काळात काही वर्षानंतर शालापत्रक मात्र बंद झाले. १९४७ साली वीरेंद्र अढिया यांनी कुमार मासिक काढले आणि १९५१ मध्ये भा. रा. भागवतांनी बालमित्र मासिक काढले. दोन्ही मासिके चांगली असूनही आर्थिक तोट्यामुळे पुढे बंद पडली. यानंतर वि. वा. शिरवाडकरांनी कुमार नावाचेच मासिक काढले. अमरेंद्र गाडगीळांनी गोकुळ मासिक काढले. मराठी पाठ्यपुस्तक मंडळातर्फे किशोर हे रंगीबेरंगी चित्रांचे, बर्‍याच मजकुराचे मासिक सुरू झाले. आनंद, कुमार, मुलांचे मासिक आणि किशोर ही मासिके अजूनही आपले सुरेख साहित्य बालवाचकांना नेमाने देऊन मनोरंजनातून संस्कृतिसंवर्धनालही हातभार लावत आहेत. काही मोठ्यांची मासिके दिवाळीसाठी मुलांकरिता पुरवण्याही काढतात. प्रेस्टिज प्रकाशाने मुलांसाठी चालविलेल्या बिरबल, टारझन, क्रीडांगण ह्या नियतकालिकांतून मुलांना भरपूर चातुर्यकथा, साहसकथा आणि खेळांच्या कथा व माहिती मिळत गेली. वृत्तपत्रांची ‘रविवार पुरवणी’ व काही साप्ताहिकांची मुलांची पाने ही मुलांच्या मनोरंजनासाठी मजेदार गोष्टी, गीते, कोडी वगैरे देत असतात.

चित्रकथा

तर्‍हेतर्‍हेच्या छोट्या रम्यकथा, खाली अर्थसूचक वाक्ये व वर ठळक चित्रे देऊन मुलांना आकर्षून घेत असतात. ‘ कॉमिक्स’ नावाची ही स्वतंत्र छोटी पुस्तके बर्‍याच मुलांना आवडतात. सोप्या सूचक वाक्यांमुळे मुलांत वाचनाची आवड उत्रन्न करण्यास कित्येकदा हा उपक्रम उपयोगी ठरतो

एकंदरीत पाहाता, स्वातंत्र्योत्तर बालसाहित्य त्याच्या विविध शाखांत, आधीपेक्षा अधिक कल्पनारम्य, सोपे, शैलीदार, विचारप्रवर्तक, ज्ञानलक्षी, विज्ञानोन्मुख व मनोरंजक तर झाले आहेच; पण विपुलही होत आहे.

 

लेखिका :  सुमति पायगावकर

माहिती स्रोत :  मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate