অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी लोकसाहित्य

मराठी लोकसाहित्य

  1. अशी स्त्रीची अवस्था होते.
  2. सवतीवर मुलगी देणाऱ्या बापाला तीव्रपणे निषेध केलेला आहे
  3. पत्नीला निष्कारण पीडा देणाऱ्या पतीचाही स्त्रिया निषेध करतात
  4. काही गीतांमध्ये जगण्या-मरण्याबद्दलचा तात्त्विक विचार अगदी सहजपणे येऊन जातो
  5. आदिवासींच्या लोकगीतांमध्ये निसर्गाचे रसिकतेने केलेले निरीक्षण आढळते. लाक्षणिक शैलीने नटलेल्या ह्या गीतांत त्याच शब्दांची पुनरावृत्ती करून प्रासानुप्रासांचे संगीत निर्माण केलेले दिसते. उदा.,
  6. आदिवासींना फुलांची फार आवड. कानांवर फुलांचे झुबके ठेवण्याची हौस पुरुषांना विशेष असते. कोणत्या रानात फुले मिळतील; कुठे मिळणार नाहीत, हे सांगणारी गीते आहेत :
  7. शिमग्याच्या सणात डांगी स्त्री-पुरुष रंग खेळतात त्याचे एक गाणे असे
  8. सोनकोळ्यांचे मल्लारी देवाचे गीत प्रसिद्ध आहे
  9. महादेव कोळ्यांच्या लग्नगीतांत खालील गीतासारखी अनेक गीते गातात

मराठी शाब्द लोकसाहित्याचे म्हणजे लोकवाङ्‌मयाचे कहाण्या, लोककथा, म्हणी व वाक्‌प्रचार, उखाणे व कोडी इ. प्रकार गद्य विभागामध्ये येतात. ओव्या, गीते, खेळांची गाणी  यांची आवड प्रमुख्याने स्त्रियांमध्ये आढळते. विविध प्रसंगी, उदा., जात्यावर बसून दळण दळत असताना, तसेच झोपाळ्यावर बसून झोके घेत असताना स्त्रिया ज्या ओव्या गातात त्यांतून त्यांच्या समजुती, चालीरीती, वैयक्तिक सुखदुःखे आणि एकूणच स्त्रीजीवनातील अनेक बारकावे यांचे प्रभआवी दर्शन होते. ओव्यांचा फार मोठा भाग कौटुंबिक ओव्यांनी सजलेला असून त्यांतून सासर-माहेर यांबद्दलचा जिव्हाळा व्यक्त झाला आहे.  उदा.,

पिवळा पितांबर मला पुशितो सारा गाव

पिता दौलत राजस म्या ग लुटीला बाजीराव

माडीवर ग माडी सये सासर मामाजीची

उभी राहून पहाते मी लंका तिथून म्हायाराची

काळी चंद्रकळा निरी पडली शंभर

लेक कुणाची तालीवार

अशा हौसेमौजेच्या गोष्टी करणाऱ्या ओव्यांबरोबरच मातृप्रेम, बंधुप्रेम, जातकुळीचा अभिमान, देवावरील भक्ती इ. भावनांचा आविष्कारही ओव्यांतून प्रभावीपणे प्रकट झाला आहे. जात्याच्या साथीवर महाराष्ट्रातील खेड्यांमधून अद्यापही ओव्या म्हटल्या जातात. तसेच चैत्रगौरी, नागपंचमी, गर्भाधान, डोहाळे यांच्या निमित्ताने झोपाळ्यावरील गाणी म्हणण्याची प्रथा अजूनही महाराष्ट्रामध्ये आढळते. केवळ पुरुषांनी जोपासलेला असा एक ओव्यांचा प्रकार म्हणजे धनगरी ओव्या. त्यांचे दोन प्रकार आहेत. धनगर आपल्या शेळ्या रात्री शेतात बसवतात त्यावेळी ज्यो ओव्या म्हणतात, तो एक प्रकार. मल्हारी-मार्तंड, मंगाई अशा दक्षिण महाराष्ट्रातल्या पूज्य दैवतांसंबंधीच्या ह्या ओव्या आहेत. दुसऱ्या प्रकारच्या ओव्या ह्या काही जत्रांच्या वेळी म्हटल्या जातात. उदा., पदुबाईची जत्रा आणि तुळजापुरची जत्रा. त्या त्या जत्रेशी संबंधित असलेल्या दैवतांना जागृत करण्यासाठी ह्या ओव्या म्हटल्या जातात.

नाच ग घुमा । कशी मी नाचू ।।

- हे सूप नाचवीत म्हटले जाणारे स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचे गीतही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

या गावच्या त्या गावच्या । सोनार नाही आला ।।

माझ्या बाळाला। वाळा नाही दिला।।

कशी मी नाचू

- ह्या गीतात सोनाराप्रमाणेच इतरही व्यावसायिकांचे उल्लेख येतात. हा विविध व्यवसायांची माहिती सांगणारा त्यातील भाग बारा वैत्यांची (बलुत्यांची) कल्पना देऊ शकेल असा आहे. प्रत्येक व्यवसायातील माणूस कारागीर म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात कसा येत गेला त्याचे सुंदर चित्रण या गीतातून झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतमळ्यांतून कामे करताना विहिरीच्या मोटेवरील अनेक समुदायिक गीते रचली. देवाबद्दलचा भक्तिभाव व सांस्कृतिक मनोभाव व्यक्त करणारी गाणी मोठ्या प्रमाणात आहेत. श्रीकृष्णाची गाणी लोकगीतांच्या खजिन्यात पुष्कळ आढळतात. याशिवाय नाविक गीते, कोळ्या-माळ्यांची गाणी इ. रचनाही आढळते. लोकगीतांमध्ये मानवी  मनाचे ऋणानुबंध जिव्हाळ्याने गुंफलेले आढळतात.

मराठी लोकसाहित्यात जन्म, विवाह, मृत्यू ह्यांसंबंधीची गीते आहेत. जन्मसंबंधीची गीते डोहाळ्यांपासून अंगाई गीतांपर्यंतच्या अनेक अवस्थांतरांचे चित्रण करतात. स्त्रीगीतांत स्त्री-वेदनेचा उद्‌गार असलेली गीते विशेष लक्षणीय आहेत. स्त्रीच्या वेदनेची कळ किती खोल आहे आणि तिचा परिसर किती व्यापक आहे, ह्याची कल्पना अशा गीतांतून येते. गर्भार सीतेचा त्याग करून तिला वनात सोडणाऱ्या रामाबद्दल कोण्या साध्याभोळ्या, अनक्षर, ग्रामीण स्त्रीने एका ओवीत काढलेले उद्‌गार उदाहरणादाखल देता येतील :

राम म्हणून राम नाही सीताच्या तोलाचा ।

हिरकनी सीताबाई राम हालक्या दिलाचा ।।

पुरुषाच्या जातीला विंद्रावणाची उपमा देण्यात आली आहे. विंद्रावण किंवा इंद्रावण म्हणजे एक जंगली कडू फळ असते. पण ते दिसायला गोंडस असते. ह्या फसव्या जीव लावल्यामुळे

जीवाला जीव देऊन पाहिला ।

पाण्यातला गोटा अंगी कोरडा राहिला ।।

अशी स्त्रीची अवस्था होते.

कावळ्यानं कोटं केल. बाभूळवनामंदी ।

पुरुषाला माया थोडी, नारी उमज मनामंदी ।।

सवतीवर मुलगी देणाऱ्या बापाला तीव्रपणे निषेध केलेला आहे

लेकीचा जल्म जशी तांदुळाची गोणी ।

बाप विकून झाले वाणी ।।

पत्नीला निष्कारण पीडा देणाऱ्या पतीचाही स्त्रिया निषेध करतात

माऊलीच्या पोटी लेक जन्मला तरवड ।

लोकाच्या लेकराची त्यानं मांडली परवड ।।

आई आणि बहिण ह्यांचा निषेध मात्र आढळत नाही. सासर आणि त्यातल्या त्यात सासू हे निषेधाचे मोठे लक्ष्य आहे.

भारतातल्या अन्य पारंपारिक स्त्रियांप्रमाणेच मराठी स्त्रियांनाही आपले मन मोकळे करता येईल, अशा जागा जवळजवळ नाहीतच. माहेरचे कौतुक सासरी केलेले रुचत नाही आणि सासरचा त्रास माहेरी सांगणे हा मर्यादाभंग ठरतो. अशी स्त्री मग जाते, उखळ, मुसळ, पाणवठा अशा आपल्या श्रमाशी अभिन्न असलेल्या निर्जीव वस्तूंनाच आपले सखे-सवंगडी बनवून त्यांच्यापाशी मन मोकळे करते.

काही गीतांमध्ये जगण्या-मरण्याबद्दलचा तात्त्विक विचार अगदी सहजपणे येऊन जातो

शेजारणीबाई नको म्हणूस माझं माझं ।

नदीच्या पलीकडे जागा साडेतीन गज ।।

एकूणच भारतीय समाज प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. अशा समाजातील जीवन कुटुंबकेंद्री असते. ह्या व्यवस्थेतील श्रद्धांची आणि संकेतांची अनेक रुपे मराठी स्त्रीगीतांतून दिसतात. ह्या व्यवस्थेत कष्टांचा गौरव केला जातो. काम करणारी स्त्री सद्‌गुणी ठरते. त्यात तिला धन्यताही वाटते. इथल्या सर्वसामान्य माणसाचे ग्रामजीवन फारसे संपन्न नाही. पण ‘सोन्याचा करंडा बाई मोत्यानं गुंफिला’ असे स्वप्नरंजन खूप आहे.

दळण-कांडण, सडा-सारवण, शेताशिवारातली कामे, बाळाला जोजवणे ही मातृकर्तव्ये, कधी झिम्मा-फुगडीसारख्या निमित्ताने क्रीडागीते, फेराची गाणी, व्रतवैकल्यांशी संबंधित गीते असा स्त्रीगीतांचा पसारा बराच आहे. स्त्रीगीतांचा बराचसा भाग जात्यावरच्या ओव्यांनी व्यापलेला आहे. कृतिसंबद्धता हे लोकगीतांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य जात्यावरच्या ओव्यांतून विशेषत्वाने प्रत्यायाला येते. उदा.,

जात्या तू ईसवरा नको मला जड जाऊ ।

वयाच्या दुधाचा सया पहातात आनुभावु ।।

जात्याला ईश्वर म्हणताना आईच्या दुधामुळे बळ आल्याचा सार्थ अभिमान आढळतो. हे गाणे जात्यावर दळणाच्या कामाशीच बांधलेले आहे.जात्यावरच्या ओव्यांची चाल बहुधा शांत, संथ असते. गाणारीचा आवाजही फारसा चढा नसतो. कारण दळताना छातीवर ताण पडतो. दळण भरडा असले, तर उंच पट्टी आणि गतिमान चाल येते. हे सर्व जात्याच्या पाळ्याच्या गतीवर अवलंबून असते. दळता-कांडतानाची गाणी ही स्त्रीमनाच्या भआवभावनांची आत्मगत रुपे असतात. एखाद्या मंत्रासारखी ती एकाग्रतेने म्हटली जातात.

पारंपारिक व्यवस्थेत स्त्रीचे सारे आयुष्यच सासर - माहेराशी बांधलेले असते. तेव्हा तिथल्या माणसांभोवती भिरभिरणारे मनच गीतरुप घेते. माहेरची माणसे अधिक जवळची. आई, वडील, बहीण, भाऊ त्यांत अग्रक्रमाने येतात. स्त्रीमनात असलेला आईविषयीचा आदर तसेच कन्याजन्माचे कौतुकही स्त्रीगीतांतून आढळते. ‘लेकापरीस लेक कशानं झाली उणी ?’ असा प्रश्नही विचारलेला दिसतो. आई आणि बहीण ह्यांच्याबद्दल चुकूनही निषेध नाही. आदिम स्त्रीप्रधान संस्कृती आणि आर्यपूर्व मातृप्रधान समाजव्यवस्था ह्यांचे हे अवशेष असावेत, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

स्त्रियांनी रचिलेली काही लोकपुराणेही मराठीत आहेत. सीतेच्या जीवनावरचे अंकुशपुराण हे ह्याचे एक उल्लेखनीय उदाहरण. दक्षयज्ञात उडी घेणारी उमा-पार्वती, त्याचप्रमाणे द्रौपदी, सावित्री ह्यांच्याही पुराणकथा स्त्रियांनी रचिलेल्या आहेत.लग्नसमारंभ, हळदीकुंकू इ. समारंभांच्या निमित्ताने स्त्रिया पतीचे नाव उखाण्यांमधून घेतात. पतीपत्नींनी  एकमेकांचे नाव रोखठोक घेतले, तर त्यांचे आयुष्य कमी होते, ही ह्या उखाण्यांमागची भआवना आहे. ह्या उखाण्यांचे विविध प्रकार आढळतात. पतीचे नाव उखाण्यामधून घेताना, त्यामध्ये सुखी संसाराचे वर्णन कलात्मकतेने केलेले आढळते. खेड्यातील स्त्रियांचा उखाण अनेकदा लांबलचक असतो. त्यातून सुखी संसाराचे चित्र मोठ्या खुबीने गोवलेले आढळते. सुशिक्षित किंवा शहरी स्त्रियांचा उखाणा लहान असतो. उदा.,

कमळाच्या फुलावर बसले पक्षी ... रावांच नांव घेते चंद्र-सूर्य आहेत साक्षी.

स्त्रियांच्या उखाण्यांखेरीज पुरुषांचेही उखाणे आढळतात. उदा., ‘मी होतो मळ्यात, सपान पडलं खळ्यात न् नवरत्नांचा हार कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात’- हा उखाणा घालून एखादा शेतकरी बायकोच्या नावाचा उल्लेखही न करता ती सध्या कोल्हापूरला गेली आहे, हे सांगून टाकतो. फुगडी खेळताना उखाणे घालण्याची प्रथा आहे. एकमेंकींना प्रश्नोत्तरेही केली जातात. उदा.,

अरंड्यावर करंडा, करंड्यावर मोर

माझ्यासंग फुगडी खेळती चंद्राची कोर

पहिली : केळं बाई केळं. राजेरी केळं

एवढी मोठी झालीस तरी, लग्न नाही केलं ?

दुसरी : कोरा कागद, काळी शाई

माझ्या लग्नाची तुला ग काय घाई ?

“पांढरं वावर काळं बी, चतुर म्हणतो पेरीन मी ” अशी कोडी टाकून त्याचे उत्तर ‘लेखक’ असे देऊन शिक्षणाबरोबर लेखनाचेही महत्त्व पटवून दिले आहे.

मराठी लोककथांतून राजा-राण्यांच्या कथा अतिशय लोकप्रिय झाल्या. राजाच्या दोन राण्यांमधील आवडते-नावडतेपणा आणि नावडतीच्या लेकाने गाजविलेले धाडसी जीवन मराठी लोककथांमध्ये बहारीने रंगविलेले आहे. कर्तबगारीतून येणारे मोठेपण अत्यावश्यक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या कथांतून आढळतो. ‘कावळ्याचे घर शेणाचे, चिमणीचे घर मेणाचे’ ही कथा महाराष्ट्रात महानुभव कालापासून रुढ असून अद्यापही तिची लोकप्रियता टिकून आहे. निरनिराळ्या चांगल्या कल्पना कथेच्या निमित्ताने लोकांच्या कानावर घालून लोककथांच्या द्वारा पूर्वी सामाजिक नीतिशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात अआसे. मराठी लोककथेतील आवडीचा विषय म्हणजे गरीब व कर्तबगार मंडळींना आकस्मिक भेटणारा देव आणि त्याने घडविलेले अद्‌भुतरम्य दर्शन. संकटात सापडलेल्या माणसाची देवाने येऊन सुटका करावयाची, हे कथांत हमखास आढळते.

लोककथांची जोपासना ही प्रामुख्याने खेड्यातील शेतकरी कुटुंबांमध्ये होत असल्याने जनावरांच्या जीवनातील अद्‌भुत‌ चमत्कार, धनी व जनावरे यांचे परस्परांवरील प्रेम, पशुपक्ष्यांची मानवाशी झालेली मैत्री, त्यांची विलोभनीय कर्तबगारी इ. विषयांनी अनेक लोककथा रंगलेल्या दिसतात. राक्षसाच्या जीवनावरही काही लोककथा आढळून येतात. या कथांची भाषा ओघवती, साधी आणि घरगुती आहे. तिच्यात जिव्हाळा आहे केव्हा केव्हा ती  ओबडधोबड व रांगडी वाटली, तरी तिचे अंतरंग प्रेमळ आहे. सुटसुटीत लहान वाक्ये, वेचक व शेलके शब्द आणि चित्ताकर्षक वर्णनशैली हा मराठी लोककथेचा विशेष आहे. लोककथेचाच दुसरा प्रकार म्हणजे कहाण्या, काहाण्यांमध्ये गोष्टीरुपाने एखादे व्रत सांगून त्याचे माहात्म्य व तात्कालिक फलनिष्पत्ती सांगितलेली असते.

मराठी लोकसाहित्याच्या या सर्वच प्रकारांमधून समाजाचे अंतरंग, समाजाची भावना, लोकांच्या समजुती व चालीरीती, लोकांची  संस्कृती वगैरे गोष्टी निश्चित करता येतात. सहजस्फूर्तीने निर्माण झालेले हे लोकसाहित्य जीवनस्पर्शी असून जनमनाचा कानोसा घेणारे आहे. शब्दांनी साकारलेली दुनिया वाचकांच्या नजरेसमोर उभी करण्याचे सामर्थ्य ह्या साहित्यामध्ये असून, महाराष्ट्राची लौकिक परंपरा मराठी लोकसाहित्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मराठी भाषेतून व्यक्त झाल्याचे आढळते. दु:ख सांगतानादेखील त्यावर सौंदर्याचा मुलामा चढविणारे हे साहित्य आहे. अन्वर्थक उपमा-दृष्टांतांची त्यात खैरात आढळते.

महाराष्ट्रातील विविध भागांतील आदिवासींचेही लोकसाहित्य बरेच आहे. नाचाची गाणी, सणाची गाणी, लग्नाची गाणी अशी आदिवासींची अनेक गीते आहेत. जात्यावरच्या गाण्यांना ते ‘घरटीली’ म्हणतात. पावसाळ्यात पायाला घुंगरू बांधून पुरुष जो नाच करतात, त्याच्या गाण्यांपैकी एक असे :

पानी पड रामाचा रे ।

कुनब्याच्या कामाचा रे ।

पानी पड सिताचा रे ।

कुनब्याच्या हिताचा रे ।

आदिवासींच्या लोकगीतांमध्ये निसर्गाचे रसिकतेने केलेले निरीक्षण आढळते. लाक्षणिक शैलीने नटलेल्या ह्या गीतांत त्याच शब्दांची पुनरावृत्ती करून प्रासानुप्रासांचे संगीत निर्माण केलेले दिसते. उदा.,

तुझी किनार पिवळी दिसं

हारू या जोड जोड या जोड

आडवा धरुं व जोड या जोड

आडवा धरूं व येळ या वा जोड

आडवा धरुं व सर वा जोड …

आदिवासींना फुलांची फार आवड. कानांवर फुलांचे झुबके ठेवण्याची हौस पुरुषांना विशेष असते. कोणत्या रानात फुले मिळतील; कुठे मिळणार नाहीत, हे सांगणारी गीते आहेत :

गाढवीच्या रानाला र फुलं नाही मिळ काना र

मन देहेरच्या रानाला र मन फुलाचा झुबकल काना र

शिमग्याच्या सणात डांगी स्त्री-पुरुष रंग खेळतात त्याचे एक गाणे असे

काळी निळी चोळी त्याला मोत्याला उंजल । मोत्याला उंजल ।

नको हरी रंग टाकू हाक भीजशी र ऽ

नको हरी रंग टाकू तोडा भीजशी र ऽ

नको हरी रंग टाकू नख भीजशी र ऽ

सोनकोळ्यांचे मल्लारी देवाचे गीत प्रसिद्ध आहे

हेऽऽपावलाय् रे देव मल्लारी । पावलाय् रे देव मल्लारी ।

रे पाव माज्या देवा मना मल्लारी ।। १ ।।

देवा तुझी निगाली सवारी मल्लारी  ।। २ ।।. इत्यादी.

महादेव कोळ्यांच्या लग्नगीतांत खालील गीतासारखी अनेक गीते गातात

तळ्यातल्या ग कापूरवेळी       तुह्या तोडील्या तारा

गावदेवाला बोलावण करा       लग्न लावायाला चला

लग्न लावती सुदळ होती         बामण मंगळ                    बोलती                                                                                                तळ्यातल्या ग कापूरवेळी        तुह्या तोडील्या तारा

मारवतीला बोलवण करा      लग्न लावायला चला . . . .

निसर्ग आणि जीवन ह्यांतील त्यांना जाणवऱ्या समस्या त्यांच्या कथांतून प्रतिबिंबित होतात. तसेच आदिवासींच्या कथांमध्ये त्यांच्यातील देवताचार व लोकाचार यांसंबंधी माहिती मिळते. शिकार, ती करताना उद्‌भवलेली संकटे, रोजच्या जीवनातील सुखदु:खांचे प्रसंग, धार्मिक निष्ठा इ. गोष्टी सांगताना या कथांमधून चमत्कार नाट्यमय शैलीने सांगितलेले आढळतात. एखाद्या मध्यवर्ती घटनेभोवती साधीशीच कथा ते गुंफतात. जमातीच्या चालीराती, वेष, अंलकार, जादूटोणा इ. असंख्य विषयांवरील कथांप्रमाणेच मृत्युनंतर प्रेताचे दहन वा दफन कसे करावे, अशा प्रकारचे संस्कारविधी दर्शविणाऱ्या कथाही आढळतात.

संदर्भ : 1. Danieis, C. L.; Stevans, C. M. Ed. Encyclopedia of Superstitions, Folklore, and the Occult Sciences of the World, London, 1971.

2. Dorson, Richard, Ed. Folklore : Selected Essays, Bloomington, 1972.

3. Leach, Maria, Ed. Dictionary of Folklore, Mythology qnd  Legend, New York, 1949.

4. Reaver, J. Russell; Boswell, George W. The Fundamentals of  Folk Literature, London, 1962.

5. Thompson, Stith, Motif-Index of Folk- Literature Bloomington,  1955-58.

६. अग्रवाल, वासुदेवशरण, प्राचीन भारतीय लोकधर्म, अहमदाबाद, १९६४.

७. गोडसे, द. ग. लोकघाटी, मुंबई, १९७९.

८. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. राजवाडे लेखसंग्रह, दिल्ली, १९५८.

९. ठाकुर, रवींद्रनाथ, अनु. व संपा. भागवत, दुर्गा, लोकसाहित्य, मुंबई, १९६७.

१०. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीची क्षितिजे, पुणे, १९७१.

११. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.

१२. ढेरे, रा. चि. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा, पुणे १९९०.

१३. ढेरे, रा. चि. संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध, पुणे, १९७८.

१४. दाते, शं. ग. लोककथा, भाग १ व २, पुणे १९२९.

१५. परांजपे, तारा, आंध्र-महाराष्ट्र : सांस्कृतिक अनुबंध, औरंगाबाद, १९९१.

१६. बाबर, सरोजिनी, संपा. लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति, पुणे, १९६३.

१७. भवाळकर, तारा, लोकनागर रंगभूमी, पुणे १९८९.

१८. भवाळकर, तारा, लोकसंचित, पुणे १९९०.

१९. भवाळकर, तारा, लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, पुणे, १९८६.

२०. भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रुपरेखा, पुणे, १९७७.

२१. मराठे, रा. वि. संपा. गावगाडा शब्दकोश, मुंबई, १९९०.

२२. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, पुणे, १९७५.

२३. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे स्वरुप, औरंगाबाद, १९८९.

२४. मोरजे, गंगाधर, लोकसाहित्य : एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र, पुणे, १९८५.

२५. व्यवहारे, शरद, लोकसाहित्य : उद्‌गम आणि विकास, नागपूर, १९८७.

लेखिका: सरोजिनी बाबर ; तारा भवाळकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate