অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी वाङ्मयाचा आदिखंड

मराठी वाङ्मयाचा आदिखंड

लीळाचरित्राची निर्मिती सु. १२७८ मध्ये झाली तेथपासून तो १३५० मध्ये नामदेवांनी समाधी घेतली , तोपर्यंतची वर्षे हा मराठी वाङ्मयाचा आदिखंड होय. वाङ्मयप्रकारांची विविधता व साहित्यगुणांची संपन्नता या दोन्ही दृष्टींनी हा कालखंड अतिशय समृद्ध आहे. महानुभाव व वारकरी या दोन पंथांतील लेखकांनी या प्रारंभकालात मराठी वाङ्मयाला विशिष्ट रूप व वळण दिले. महानुभाव पंथाचा मराठीचा आग्रह अधिक रोकडा आहे, तर वारकरी पंथातील कवींनी मराठीचा अभिमान हळुवारपणे व्यक्त केला आहे. विविधता हा महानुभावांच्या वाङ्मयाचा दुसरा विशेष. त्यांनी पद्याबरोबर गद्यही भरपूर लिहिले. वारकरी पंथातील संतांनी गद्याचा अवलंब केलेला आढळत नाही.

समाजिभिमुख रहावे म्हणून प्रारंभी विशेष आग्रहपूर्वक प्रयत्नशील राहू पाहणारा महानुभाव पंथ एका शतकाच त्या पंथीयांपुरताच मऱ्यादित होऊन गेला. आपले सारे ग्रंथ सांकेतिक लिप्यांत बंद करून ते पंथीयांबरोबर कोणाला वाचावयासही मिळणार नाहीत, इतकी कडेकोट व्यवस्था त्या पंथाने केली. याचा परिणाम असा झाला, की महानुभाव वाङ्मयाचे हे वैभवशाली दालन पुढील पाचसाडेपाचशे वर्षे सर्वसाधारण मराठी भाषिकांना केवळ अज्ञात राहिले. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात महानुभाव पंथाचे तेरा आम्नाय म्हणजे निरनिराळ्या शाखा झाल्या. प्रत्येक आम्नायाच्या लीळाचरित्र व सिद्धांसूत्रपाठाच्या स्वतंत्र संहिता झाल्या  व त्यांवरील स्वतंत्र टीकाग्रंथ झाले.

शार्ङ्गधर भोजने ह्यांचा श्लोकबद्ध तीर्थमालिका व कुमरे आग्नायातील मुनिव्यासकृत गद्य स्थानपोथी हे ग्रंथ भौगोलिक माहिती देणारे या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तीर्थमालिकेत श्रीचक्रधरांचा ज्या तीर्थस्थानांशी संबंध आला, त्यांची माहिती आहे. स्थानपोथीत श्रीचक्रधारांची पावले ज्या ज्या गावांना लागली, अशा सु. अडीचशे गावांची नोंद आहे. लीळाचरित्रातील विविध लीळा केव्हा व कोणत्या ठिकाणी घडल्या हेही मुनिव्यास सांगतात. पं. भीष्माचार्य लासूरकर यांच्या नावावर संस्कृत व मराठी मिळून बत्तीस ग्रंथ असून त्यांमध्ये छंद व व्याकरण यांसारख्या विषयांवरील लेखनही आहे. पण पंधराव्या शतकाच्या प्रारंभापासून महानुभाव पंथातील तेज कमी झाले. वारकरी पंथाचे असे झाले नाही. किंबहुना महाराष्ट्रसंस्कृतीचे संवर्धन आणि परिपोषण करण्यास या पंथाच्या वाङ्मयाने एकोणिसाव्या शतकापर्यंत व त्यानंतरही सर्वाधिक हातभार लावला.

१२७८ पासूनच्या तीसचाळीस वर्षांत निर्माण झालेल्या मराठी वाङ्मयात एक नवेपणाची झळाळी व ताजेपणा आढळतो. गद्य आणि पद्य या दोन प्रकारच्या रचनांतून आढळणारे भाषेचे रूप मात्र एकमेंकापासून फार वेगळे दिसते. गद्याची भाषा तत्कालीन बोलीला जवळ आहे, त्यामुळे बरीचशी बालबोध आहे. काव्याची भाषा उपमादृष्टांतांनी नटलेली, नाना विभ्रम धारण करणारी व कल्पनारम्यतेचे वैभव दाखवणारी आहे. मराठीमध्ये प्रौढ ग्रंथरचनेचा प्रयत्न नव्याने होत आहे हे गद्यामध्ये तात्काल जाणवते, तर काव्यातील भाषावैभव, अलंकारसौंदर्य व कल्पनाविलास संस्कृतमधील अभिजात रचनेशी स्पर्धा करू पाहते. ओवी व अभंग हे जुन्या मराठीतील सर्वांत महत्वाचे दोन छंद या काळात सुप्रतिष्ठित झाले.कथात्मक रचना व टीकापर-विवेचनपर लेखन या दोहोंसाठी ओवीचा अवलंब केला गेला, तर प्राधान्याने भक्तिभावनेच्या विविध छटा दाखवणाऱ्याओ स्फुट रचनेसाठी अभंगाची योजना झाली. अभिव्यक्तिचे हे वळण पुढील पाचशे वर्षे सामान्यपणे कायम राहिले.

 

लेखक : वि.रा. करंदीकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate