অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य

प्रास्ताविक

या लेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून साधारणपणे १९८० पर्यंतचा आढावा घेतलेला आहे. या आढाव्यात ‘प्राचीन मराठी साहित्य’ असा पूर्वविभाग असून, त्यात प्रारंभापासून इ.स. सु. १८१८ पर्यंतच्या मराठी साहित्याचे विवेचन केलेले आहे. लेखाच्या दुसऱ्यात भागात अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतलेला आहे. त्यात काव्य, नाटक, कादंबरी , कथा, विनोद, लघुनिबंध, प्रवासवर्णने, बालसाहित्य चरित्रे-आत्मचरित्रे, निबंध, समीक्षा, व्याकरणग्रंथ, संधोधनपर (वाङ्मयीन) साहित्य, इतिहासलेखन, शास्त्रीय साहित्य अशा उपविषयांखाली वेगवेगळ्या लेखकांनी, त्या त्या प्रकारातील वाङ्मयाचा परामर्श घेतला आहे. बृहन्महाराष्ट्रातील साहित्यसंस्था असाही एक उपविषय त्यानंतर घेतलेला आहे.

‘दलित साहित्य’ अशी स्वतंत्र नोंद असून जिज्ञासूंना ती विश्वकोशाच्या सातव्या खंडात पाहता येईल. ‘लोकसाहित्य’ अशी विश्वकोशात स्वतंत्र नोंद असून त्या नोंदीत मराठी लोकसाहित्याचा आढावा जिज्ञासूंना पाहावयास मिळेल. काव्य, नाटक, कादंबरी आदी प्रमुख साहित्यप्रकारांबरोबरच शास्त्रीय वाङ्मय, इतिहासवाङ्मय, व्याकरणग्रंथ यांसारखी मराठी वाङ्मयाची इतरही काही क्षेत्रे वाचकांनी परिचित व्हावीत, या दृष्टीने या लेखाची मांडणी केलेली आहे. विश्वकोशात काव्य, नाटक, कादंबरी, कथा, विनोद यांसारख्या साहित्यप्रकारांवर स्वतंत्र नोंदी अकारविल्हे यथास्थळ दिलेल्या असून ह्या साहित्याप्रकारांच्या घाटांसंबंधीचे विवेचन, तसेच त्याच्याशी संबंधित असे, मराठी साहित्यातील योग्य ते निर्देश अशा नोंदीतून जिज्ञासू वाचकाला पहावयास मिळतील. ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत यांसारख्या महत्वाच्या रचनांवरही स्वतंत्र नोंदी यथास्थळ दिलेल्या आहेत. मराठी वाङ्मयासंबंधीची-विशेषत: लेखक आणि साहित्यकृती यांसंबंधीची अधिक माहिती, जिज्ञासूंना या प्रकारच्या स्वतंत्र नोंदीत, उपलब्ध होऊ शकेल.

महत्वाच्या सर्व प्राचीन-अर्वाचीन लेखकांवर विश्वकोशात असलेल्या स्वतंत्र नोंदी, अकारविल्हे त्या त्या खंडात पहावयास मिळतील. उदा., ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, मर्ढेकर यांसारखे कवी; किर्लोस्कर, देवल, गडकरी, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर इ. नाटककार; ह.ना.आपटे, ना.सी.फडके , वि.स. खांडेक, विश्राम बेडेकर यांसारखे कादंबरीकार; त्याचप्रमाणे वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळणारे महत्वाचे साहित्यिक यांवर स्वतंत्र नोंदी आहेत. महानुभाव, वारकरी यांसारख्या पंथांवरही स्वतंत्र नोंदी आहेत. बखरवाङ्मय, आख्यानक कविता, शाहिरी वाङ्मय, लावणी, पोवाडा यांसारख्या खास मराठी अशा विषयांवरही स्वतंत्र नोंदी विश्वकोशात यथास्थळ दिल्या आहेत.

काव्यनाटकादी महत्वाचे साहित्यप्रकार; स्वच्छंदतावाद, वास्तववाद यांसारख्याकालवाङ्मयीन संप्रदाय; रसिसिद्धात, ध्वनिसिद्धान्त संस्कृत साहित्य शास्त्रातील संकल्पना; सौंदर्यशास्त्र, साहित्यसमीक्षा, पाठचिकित्सा तसेच महत्वाचे अन्य वाङ्मयीन विषय (उदा., भावविरेचन, काव्यन्याय इ.), वाङ्मयीन चळवळी (उदा., रविकिरण मंडळ), वाङ्मयीन संस्था (उदा., साहित्य संस्कृति मंडळ, भारतीय ज्ञानपीठ इ.) व संमेलने (उदा., मराठी साहित्य संमेलने) यांवरही विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. प्रस्तुत लेखात मराठीतील काही महत्वाच्या ग्रंथांचे निर्देश आलेले आहेतच, त्याशिवाय काही निवडक संदर्भग्रंथ लेखाच्या शेवटी, प्राचीन व अर्वाचीन अशी विभागणी करून दिलेले आहेत.

प्राचीन मराठी साहित्य

प्रारंभ ते इ.स. सु. १८१८ : मराठी वाङ्मयाचा मूलस्त्रोत स्त्रीगीते, अन्य लोकगीते, कथा-कहाण्या अशा प्रकारच्या अलिखित लोकसाहित्यात दिसून येतो. अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिला गेलेला ज्योतिपरत्नमाला हा मराठीतील पहिला ग्रंथ होय, असे मत राजवाड्यांनी व्यक्त केले; पण त्याची भाषा उत्तरकालीन वाटते. सन ११८८ मध्ये लिहिला गेलेला⇨मुकुंदराजांचा विवेकसिंधु हा मराठीतील पहिला ग्रंथ, असे एक मत आहे; पण त्या ग्रंथाचा नेमका काळ निश्चित करण्याचा प्रयत्न करताना ग्रंथातील शकसंवत्सरांचा मेळ बसत नाही, असे दिसून येते. एकनाथ-मुक्तेश्वरांसारखे कवी मराठीतील या आदिकवीचा उल्लेखही करीत नाहीत आणि विवेकसिंधूतील मराठीचे स्वरूपही उत्तरकालीन वाटते, असे महत्वाचे आक्षेप या मतावर घेतले गेले आहेत.

या आक्षेपांत तथ्य आहे.या ओवीबद्घ ग्रंथाची अठरा प्रकरणे असून त्याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. यात शांकरवेदान्त स्पष्ट केला असून काव्यात्मकतेपेक्षा तत्त्वप्रतिपादनावर कवीचा भर अधिक आहे. ब्रह्मविद्येचा ‘सुकाळु हो देयावा’ हा ग्रंथाचा हेतू. यातील तत्त्व विवेचनाची गंभीर पातळीही त्याला मराठीतील आद्यग्रंथ मानण्याच्या आड येते; काही विद्वानांच्या मते विरोधीच ठरते. निर्विवाद पुराव्यानेच बोलावयाचे असेल, तर सु. १२७८ मध्ये⇨म्हाइंभट्टांनी (मृ.सु. १३००) संकलित केलेले लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ म्हणता येईल. हा गद्य आहे हा त्याचा एक विशेष आहे.

म्हाइंभट्टांचे लीळाचरित्र: धर्म हा लोकाभिमुख असावा, असा एक नवा विचार दहाव्या-अकराव्या शतकाच्या सुमारास भारतामध्ये सर्वत्र निर्माण झालेला दिसतो. केवळ उच्चवर्णियांनाच समजणारासंस्कृतमधील धर्मविचार सर्वसामान्यांच्या भाषेत आणला पाहिजे, ही प्रेरणा यातून निर्माण झाली व ती अर्वाचीन देशभाषांतील वाङ्मयाच्या निर्मितीस कारण ठरवी. बाराव्या शतकात महाराष्ट्रामध्ये महानुभाव व वारकरी हे प्रभावशाली संप्रदाय उदयाला आले. नाथपंथाचा प्रवेश तर येथे त्याच्याही आधी झाला होता. मराठीच्या प्रारंभकालातील वाङ्मय या तीन पंथांच्या अनुयायांकडून लिहिले गेले. यातील अग्रदूताचा मान महानुभाव लेखकांकडे जातो. त्या पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर आणि संघटक नागदेवाचार्य यांनी आपल्या पंथाच्या अनुयायांनी सर्वत्र मराठीचाच वापर केला पाहिजे, असा आग्रह धरला होता. मराठी ही या पंथाची धर्मभाषाच झाली. स्वत: चक्रधर व नागदेवाचार्य यांनी कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही; पण त्यांच्या प्रेरणेतून या पंथाच्या अनुयायांकडून मात्र विपुल ग्रंथरचना झाली.

महींद्र व्यास उर्फ म्हाइंभट्ट ह्यांनी संकलित केलेला लीळाचरित्र हा या पंथातील पहिला ग्रंथ होय. चक्रधरांच्या महानिऱ्याणानंतर त्यांच्या आठवणी ऊर्फ लीळा लिहून काढण्याची प्रेरणा म्हाइंभट्टास झाली. नागदेवाचाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली गावोगाव फिरून त्यांनी एकूण १,५०९ लीळा गोळा केल्या. त्यांचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग केले. पैठणला येऊन लोकांना उपदेश करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी चक्रधर एकाकी भ्रमण करीत होते. त्या काळातील काही आठवणी त्यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितल्या होत्या. त्या एकत्र करून त्याला ‘एकांक’ असे नाव देण्यात आले. असे या ग्रंथाचे अखेर तीन भाग झाले. संकलनकार या दृष्टीने म्हाइंभट्टांनी केलेली कामगिरी केवळ अपूर्व म्हणावी अशी आहे.

यातील प्रत्येक लीळा त्या त्या संबंधित व्यक्तीकडून मिळवलेली आहे आणि त्यातील बारीकसारीक तपशील अचूकपणाने टिपण्यात आले आहेत. शंका उत्पन्न झाली, तेव्हा ती शंका किंवा मतभेद आढळला तेथे तो मतभेद नोंदलेला आहे. प्रत्येक लीळा नागदेवाचाऱ्याकडून तपासून घेण्यात आली आहे. चक्रधर हे साक्षात परमेश्वराचे अवतार, तेव्हा त्यांचे उदगार जसेच्या तसे नोंदले जातील. असा प्रयत्न कसोशीने करण्यात आला आहे. वास्तव वर्णने, आकर्षक शब्दचित्रे, नाट्यपूर्ण संवाद हे या ग्रंथाचे डोळ्यांत भरणारे विशेष आहेत. येथे वर्णिलेले प्रसंग दररोज घडणारे असे आहेत; पण त्या साध्यासाध्या प्रसंगांतून प्रकट होणारी व्यक्तिचित्रे व समाजचित्रे अतिशय जिवंत व बोलकी आहेत. वाक्ये छोटी आहेत, शब्द नित्याच्या वापरातील आहेत. भाषा सजवण्याचा कोणताही प्रयत्न येथे केलेला नाही. मराठीमधील या पहिल्या ग्रंथातील अभिव्यक्ती सहज व अकृत्रिम अशी आहे. लीळाचरित्र हा मराठीतील आद्य चरित्रग्रंथही आहे.

ऋद्धिपूरला राहणारे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू ऊर्फ गुंडम राऊळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभट्टांनी गोळा केल्या व त्यांतून ३२५ लीळांचा ऋद्धिपुरलीळा (ऋद्धिपूरचरित्र हेही एक पऱ्यायी नाव) ऊर्फ गोविंदप्रभुचरित्र (सु. १२८८) हा ग्रंथ सिद्ध झाला. लीळाचरित्राची सारी वैशिष्ट्ये त्यांच्या या ग्रंथातही उतरली आहेत. श्रीकृष्ण, दत्तात्रेय व गोविंदप्रभूंचे गुरू चांगदेव राऊळ ह्यांच्या कथा चक्रधर आपल्या शिष्यांना सांगत असत, त्या एकत्र करून म्हाइंभट्टांनी त्यांचीही चरित्रे सिद्ध केली आहेत. पण ती पुराणांच्या थाटाची आहेत. नागदेवाचाऱ्याच्या निऱ्याणानंतर त्यांच्या आठवणी संग्रहित करणारे स्मृतिस्थळ हे मुळात नरेंद्र व परशराम यांनी सिद्ध केले (सु. १३१२) असे म्हटले जाते. त्यामध्ये नागदेवाचाऱ्याच्या बरोबर म्हाइंभट्ट, केसोबास आदी इतर शिष्यांच्या कथाही आल्या आहेत. लीळाचरित्र, ऋद्धिपुरलीळा व स्मृतिस्थळ हे मराठी वाङ्मयाच्या प्रारंभकाळात सिद्ध झालेले तीन चरित्रग्रंथ होत. थोर पुरुषांच्या आठवणी गोळा करून सत्याशी संपूर्ण इमान राखणारी अशी चरित्रे सिद्ध करण्याची ही प्रथा मराठीत पुढे चालू राहिली असती, तर मराठी वाङ्मयाचे हे दालन अपार समृद्ध झाले असते.

सिद्धांन्तसूत्रपाठ व दृष्टान्तपाठ

संकलनाच्या या पद्धतीने व लीळाचरित्राच्या आधाराने आणखी दोन महत्वाचे ग्रंथ तयार झाले.यांचे कर्तृत्व केशवराज सूरि (?-१३१६ ?) यांच्याकडे जाते. केसोबास, केशवराज किंवा केशिराज व्यास व मुनी केशिराज ह्या नावांनीही हा ओळखला जातो. लीळाचरित्रामध्ये चक्रधरांची सूत्रे आली आहेत व त्यांतून महानुभावांचे तत्वज्ञान व आचारधर्म प्रकट झाला आहे. अशी एकूण १,६०९ सूत्रे गोळा करून व त्यांचे लक्षणपाठ, आचारमालिका व विचारमालिका असे त्रिविध वर्गीकरण करून केशिराजांनी ⇨सिद्धांतसूत्रपाठ (सु. १२८०) हा ग्रंथ तयार केला. महानुभाव पंथात हा ग्रंथ फार पवित्र मानला जातो. दृष्टांतपाठ हा त्यांचा दुसरा ग्रंथ. हाही १२८० च्या आसपासचा. शिष्यांना उपदेश करतेवेळी आपला विचार स्पष्ट व्हावा म्हणून चक्रधर एखादी व्यावहारिक कथा दृष्टांतादाखल सांगत असत.

असे एकूण ११४ दृष्टांत केशिराजांनी एकत्र केले व त्यांचा दृष्टांतपाठ हा ग्रंथ तयार केला. प्रथम चक्रधरांनी सांगितलेले सूत्र, मग त्यासाठी त्यांनी दिलेला दृष्टांत आणि त्यानंतर त्या दोहोंतील परस्परसंबंध स्पष्ट करणारे केशिराजांचे दार्ष्टान्तिक अशी या ग्रंथाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. गद्यग्रंथांच्या या नामावळीत आणखी एका महत्वाच्या ग्रंथाचा उल्लेख करावयास हवा. तो म्हणजे बाइदेवबास (व्यास) (मृ. १३०९) यांचा पूजावसर. चक्रधरांची दिनचऱ्या वर्णन करणाऱ्याह या ग्रंथात त्यांच्या बारीकसारीक हालचालींची नोंद असल्याने पंथीयांना हा विशेष पूज्य झाला आहे.

साती ग्रंथ

गद्याप्रमाणेच पद्यवाङ्मयाही महानुभावांनी निर्माण केलेले आहे आणि त्यांतील विषयांची व प्रकारांची विविधता गद्यापेक्षाही डोळ्यांत भरणारी आहे.⇨साती ग्रंथ या नावाचा या पद्यवाङ्मयातील एक महत्वाचा गट आहे. हे सारे ओवीबद्ध ग्रंथ आहेत. दामोदरपंडितांचे वछाहरण (सु. १३१६), नरेंद्रांचे रुक्मिणीस्वयंवर (१२९२), भास्करभट्ट बोरीकरांचा शिशुपालवध (१३१२) व उद्भवगीता (१३१३), पं, विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध (१४१८), रवळो व्यासांचे सह्याद्रिवर्णन (१३५३) आणि नारो बहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन (१४१८) असे हे सात ग्रंथ महानुभाव पंथात ‘साती ग्रंथ या’ नावाने प्रसिद्ध आहेत. या सातांपैकी चार ग्रंथांचा विषय श्रीकृष्णचरित्र हा आहे, तर उरलेल्या तिहींमध्ये भगवद्गीता, दत्तात्रयचरित्र व क्षेत्रमाहात्म्य हे विषय आहेत. सैह्याद्रिवर्णन व ऋद्धिपूरवर्णन या दोहोंमध्ये स्थलवर्णनाला महत्वाचे स्थान आहे.

नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर हे स्वयंवरकाव्य असल्याने त्यात शृंगाराला साहजिकच महत्व आहे; पण शिशुपालवधामधील मूळ विषय वीररसाचा असूनही त्यात शृंगाराल अधिक महत्व मिळाले आहे. वछाहरणामध्ये श्रीकृष्णाचे श्रेष्ठत्व सांगणारी एक कथा आहे. ही तीन काव्ये कथाकाव्ये आहेत. प्रसंगवर्णन व व्यक्तिदर्शन यांना त्यांत वाव आहे. भागवताच्या एकादशस्कंधामधील तत्वज्ञान हा उद्भवगीतेचा विषय आहे; पण भास्करभट्टांची ही रचना मूळ ग्रंथाच्या मानाने फार छोटी आहे. भागवत अद्वैतपर मानले जाते. महानुभाव पंथ द्वैती आहे, त्याती तत्वज्ञानाची परिभाषाही निराळी आहे. आपल्या पंथाचे विशिष्ट तत्वज्ञान भागवताच्या आधारे भास्करभट्ट कसे मांडतात हे पाहू गेले तर विशेष समाधान होत नाही. ज्ञानप्रबोधमध्ये गीतेतील केवळ पाच श्लोकांचे विवरण आहे. सैह्याद्रिवर्णन व ऋद्धिपूरवर्णन यांमध्ये मूळ विषयाबरोबरच भक्तीला विशेष स्थान मिळाले आहे.

ओवीबद्ध रचना व आख्यानकाव्याला शोभावा इतपत विस्तार एवढेच साम्य व सात ग्रंथांमध्ये आहे. महानुभाव पंथामध्ये याच सात ग्रंथांना विशेष मान्यता का लाभावी व त्यांचा स्वतंत्र गट का कल्पिला जावा याचा उलगडा होत नाही. वाङ्मयीन दृष्टीने विचार केला, तर या सर्व कवींत नरेंद्र सर्वश्रेष्ठ ठरतात. त्यांचा काव्यरचनेतील हेतूही केवळ वाङ्मयीन आहे. आपण कवी आहोत याचा त्यांना अभिमान आहे आणि त्या अभिमानाला शोभेल अशी त्यांची रचना आहे. खरीखुरी कलावंताची दृष्टी असणारा हा मराठीतील पहिला कवी होय. रुक्मिणीस्वयंवर हे मराठीतील पहिले शृंगारपर आख्यानकाव्य. या कथेवर पुढे अनेकांनी रचना केली आहे, पण नरेंद्रांची सर कोणाला येत नाही. आकर्षक वर्णनशैली व रमणीय कल्पनाविलास हे नरेंद्राचे विशेष आहेत. त्यांचे सरस उपमादृष्टांत काही स्थळी ज्ञानेश्वरांशी नाते सांगतात. त्या मानाने भास्करभट्ट किंवा दामोदरभट्ट यांची शैली उणी पडते. उरलेल्या कवींची रचना ठाकठीक म्हणावी अशी आहे.

काव्यदृष्टीनेच विचार करावयाचा झाला, तर या साती ग्रंथांच्या बाहेर असणार्या् दोन रचना अधिक महत्वाच्या आहेत. केशवराज सूरींचे मूर्तिप्रकाश हे काव्य गुणदृष्ट्या नरेंद्राच्या रुक्मिणीस्वयंवराच्या खालोखाल येते. चक्रधरांच्या मूर्तीचे, त्यांच्या अवतारित्वाचे व विविध गुणांचे वर्णन हा या काव्याचा विषय आहे. कवीच्या चक्रधरांविषयीच्या असीम श्रद्धाभावामुळे हे काव्य उत्कट उतरले आहेच, पण त्या उत्कटतेला वाचा फोडण्यास तितकीच समर्थ अशी शैलीही केशिरांजाजवळ आहे. दुसरी रचना स्फुट आहे व ती म्हणजे महदंबेचे (सु. १२२८-सु. १३०३) धवळे. याच्या पूर्वार्धात ८३ कडवी आहेत. उत्तरार्धाची ६५ कडवी सर्वस्वी तिची नसावीत. या धवळ्यांची रचना केवळ गोविंदप्रभूंच्या आग्रहावरून व स्फूर्तीच्या आकस्मिक आविर्भावासरशी महदंबेने केली आहे (सु. १२८६).

लग्नाच्या प्रसंगी वराला उद्देशून म्हणावयाची ही गीते आहेत. ‘धवळा’ हा एक वृत्तप्रकार असावा, असाही एक तर्क आहे. भावनेची उत्कटता व आत्मपरता या दृष्टीने अर्वाचीन काळातील भावगीतासारखे या गीतांचे स्वरूप आहे. त्यांची भाषा व त्यांतील भावमाधुरी स्त्रीसहज अशी आहे. श्रीकृष्णरुक्मिणीविवाहविषयक ही मराठीतील पहिली रचना होय. ११० अभंगांचे एक मातृकीरुक्मिणीस्वयंवर महदंबेच्या नावावर आहे, पण त्याला धवळ्यांचे यश लाभले नाही. महदंबा ही मराठीतील पहिली कवयित्री होय.महानुभाव वाङ्मय: आठवणी, दिनचऱ्या, स्थलवर्णन, व्यक्तिवर्णन, कथात्मक, भावगीतसदृश, तात्विक व विवेचनपर अशी विविध प्रकारची रचना महानुभवांनी केली आहे. गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारांतील हे लेखन आहे. गद्यातील विविधता विषयांची नाही, तर वाङ्मयप्रकारांची आहे. त्या सर्व रचनेत चक्रधरांचे चरित्र व शिकवणूक हाच विषय प्राधान्याने आहे. पद्यवाङ्मयातील विविधता, आशय व अभिव्यक्ती अशी दोन्ही प्रकारची आहे.

बहुतेक गद्यग्रंथ संकलनात्मक आहेत; पद्यग्रंथ ही मात्र स्वतंत्र निर्मिती आहे. श्रुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरूढी आणि वर्तमान असे गद्यग्रंथांचे एक वर्गीकरण महानुभाव पंथात केले जाते, पण ते वाङ्मयीन दृष्टीने केलेले नाही. श्रुती’ म्हणजे चक्रधरांच्या सूत्रांची संकलने; ‘स्मृती’ म्हणजे नागदेवाचाऱ्याची वचने. त्यानंतरचा आचार्यवचनांना वृद्धाचार म्हणतात. त्यानंतरचा विचार म्हणजे मार्गरूढी होय. नंतरचे साहित्य म्हणजे ‘वर्तमान’. पद्यग्रंथांतील साती ग्रंथ या गटालाही तसे खास वाङ्मयीन निराळेपण नाही. गद्यवाङ्मयात वास्तवता, सहजता, नाट्यपूर्णता, परिणामकारकता हे गुण जाणवतात, तर लालित्य, अलंकारप्रचुरता, कल्पनारम्यता, भावनोत्कटता हे विशेष पद्यग्रंथांत आढळतात. गद्यामध्ये भाषेचा जिवंतपणा व ठसठशीतपणा आहे, तर पद्यामध्ये रसरशीतपणा व चैतन्यपूर्णता आहे.हयग्रीव व्यास ह्या महानुभाव पंडिताने भागवताच्या दशमस्कंधावरील टीका गद्यराजस्तोत्र ह्या नावाने लिहिली. ती २७९ श्लोक आहेत. त्यांतील काही श्लोकांची निर्यमक रचना लक्षणीय आहे.

महासंत ज्ञानेश्वर

वारकरी संप्रदायातील पहिलेच व सर्वश्रेष्ठ संत म्हणजे ज्ञानेश्वर (१२७५-१२९६). ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६). ज्ञानदेव, त्यांचे जीवन, वाङ्मय आणि व्यक्तिमत्व हे सारेच केवळ लोकोत्तर आहे. ज्ञानदेवांच्या चरित्राबद्दल अनेक वाद आहेत. त्यांतील वाङ्मयाशी संबंधित असा महत्वाचा वाद म्हणजे गीतेवर टीका लिहिणारे ज्ञानेश्वर आणि अभंगरचना करणारे ज्ञानेश्वर या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात, हा होय. या वादाचा अखेरचा निर्णय अद्याप झालेला नाही; मात्र ज्ञानदेवांच्या नावावरील बरेच अभंग त्यांचे नसावेत. भावार्थदीपिका ऊर्फ⇨ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेवपासष्टी आणि काही अभंग एवढी रचना निर्विवादपणे ज्ञानदेवांची आहे. त्याशिवाय उत्तरगीत, प्राकृतगीता, पंचीकरण, शुकाष्टक, योगवसिष्ठ अशी सु. पंचवीस प्रकरणे ज्ञानदेवांची म्हणून सांगितली जातात, पण अंतर्गत पुराव्यांवरून असे म्हणता येते, की ही रचना ज्ञानदेवांची नाही.

भावार्थदीपिका ऊर्फ ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील टीका आहे. ओवीसंख्या सु. नऊ हजार आहे. या ग्रंथाच्या संहितेचा प्रश्नही अद्याप निकालात निघालेला नाही. त्याची रचना नेवासे येथी झाली, हा उल्लेख त्या ग्रंथातच आहे. पुढे त्यात अनेक अपपाठ शिरले म्हणून एकनाथांनी त्याची शुद्ध प्रत तयार केली (१५८४). या ग्रंथाची एकनाथपूर्व-कालातील विश्वसनीय प्रत अद्याप मिळालेली नाही. ज्ञानदेवांनी आपली टीका रुक्ष शास्त्रीय पद्धतीने लिहिलेली नाही. तत्त्वज्ञानातील सिद्धांत ते उत्तम प्रकारे जाणतात आणि त्यांनी भाष्यकारांना वाटही पुसली आहे; पण आपली टीका त्यांनी तर्ककर्कश होऊ दिलेली नाही. ही टीका म्हणजे मराठी साहित्याचे एक अनमोल लेणे आहे.

आपल्या सौंदऱ्याने ती रसिकाला वेड लावते, नास्तिकालाही तिच्या रमणीयतेचा वेध लागतो. यातील ओवी छोटी व नेटकी आहे, शब्दयोजना नेमकी व चातुर्यपूर्ण आहे, त्यामध्ये काव्य आणि तत्वज्ञान ही केवळ एकरूप होऊन गेली आहेत. अध्यात्मातील सिद्धांताबाबत ज्ञानदेवांची वृत्ती अनाग्रही आहे. नाथपंथातील अद्वयसिद्धांताचा व हठयोगातीली कुंडलिनीजागृतींचा मोठाच ठसा त्यांच्यावर आहे, पण त्यांची दृष्टी समन्वयाची आहे. ज्ञान आणि कर्म, कर्म आणि संन्यास, संन्यास आणि भक्ती, भक्ती आणि अद्वैत, अद्वैत आणि योग, योग आणि वेदान्त अशी अनेक द्वंव्दे येथे निर्द्वंव्दात पोहोचली आहेत. यथील तत्वज्ञानविचार जितका सुबोध तितकाच रमणीय आहे. येथे अतींद्रिय अध्यात्म साक्षात अनुभवाचे इंद्रियोगचर रूप धारण करून उभे राहिले आहे.

आपली ही टीका शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवील हा आपला उदगार ज्ञानदेवांनी सार्थ करून दाखवला आहे. त्यांचा हा ग्रंथ शांतरसाचा उत्कृष्ट आविष्कार आहे. यातील सरस प्रास्ताविके, उचित उपसंहार, वेधक शब्दचित्रे, समर्पक उपमादृष्टांत, मराठी भाषेविषयीचे प्रेम, गाढ तत्वज्ञानविचार, अद्वैतानुभवाची प्रत्ययकारी वर्णने, विनय आणि आत्मविश्वास यांचे मधुर मीलन, ज्ञानदेवांच्या उदात्त व्यक्तिमत्वाचे मनोहर दर्शन, त्यांची आध्यात्मिकता व सर्वसामान्यांविषयीची करुणा यांपैकी कोणते वैशिष्ट्य अधिक श्रेष्ठ मानावे याचा संभ्रम पडावा अशी ही एक अनन्यसाधारण साहित्यकृती आहे. साहित्याचा हा एक तेजस्वी मानदंड मराठी सारस्वताच्या प्रारंभकालात उभा ठाकला आहे आणि पुढच्या काळातील अनेक श्रेष्ठ संतकवींनी याच्या प्रकाशात वाटचाल करण्यात धन्यता मानली आहे.

अद्वैताचा अनुभव हाच ज्याचा एकमेव विषय आहे, असा अमृतानुभव हा सु. आठशे ओव्यांचा स्वतंत्र ग्रंथ (हा अनुभवामृत ह्या नावानेही ओळखला जातो.) आपले गुरू श्रीनिवृत्तिनाथ यांच्या आज्ञेने ज्ञानदेवांनी आपल्या गीताटीकेनंतर लिहिला. काव्य आणि तत्वज्ञान या दोन्हीं दृष्टींनी हा ज्ञानेश्वरीच्याही वरची पातळी गाठतो असा रसिकांचा व तत्ववेत्त्यांचा अभिप्राय आहे. योगी चांगदेवांनी कोरे पत्र पाठवले, त्याला उत्तर देण्याच्या निमित्ताने पासष्ट ओव्यांचे एक अद्वैतानुभूतिपर काव्य ज्ञानदेवांनी लिहिले, ते चांगदेवपासष्टी म्हणून प्रसिद्ध आहे. अथांग आकाशाचे छोटेसे प्रतिबिंब एखाद्या लहानशा जलाशयात पडलेले दिसावे व त्याचा आपल्या मनाला त्या बिंबरूप आकाशाहूनही अधिक मोह पडावा, तशी या चांगदेवपासष्टीतील आविष्काराची गुणवत्ता आहे.

विठ्ठलसंप्रदायाशी संपर्क आल्यावर ज्ञानदेवांनी अभंग लिहिले असावेत. त्यांच्या नावावरील बऱ्याकच अभंगांचे कर्तृत्व संशयित आहे. तथापि काही अभंगांतून ज्ञानदेवांच्या अनुभवाची उत्कटता व रचनेची कोवळीक आढळते. योगपर व आत्मानुभवपर अभंग, गौळणी आणि विराण्या यांत ते विशेषत्वाने जाणवते. त्यातील हरिपाठाचे अभंग हा छोटा गट वारकऱ्याणच्या नित्यपाठात आहे. एवढी अलौकीक रचना ज्ञानदेवांनी केवळ एकवीस-बावीस वर्षाच्या आयुष्यात केली हा देखील एक चमत्कारच.जगाच्या वाङ्मयातही असे उदाहरण अपवादानेच असावे. वारकरी संप्रदायात ज्ञानदेवांना ‘माउली’ मानतात. ज्ञानेश्वरी हा त्या पंथाचा जणू धर्मग्रंथच आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या शब्दांमध्ये त्यांचे भागवतधर्मातील कार्य वर्णिले जाते. मराठी साहित्याच्या संदर्भातही ते उदगार सार्थ आहेत.

नामदेव आणि इतर संत

ज्ञानदेवांचे समकालीन, काहीसे निराळे व्यक्तिमत्व असलेले, पण तितकेच कर्तृत्ववान असे दुसरे संत म्हणजे ⇨नामदेव (१२७०-१३५०). त्यांच्या चरित्रातही अनेक वादस्थळे आहेत आणि त्यांच्या नावावर असलेल्या अभंगापैकी नेमके किती अभंग त्यांचे आहेत, हे ठरवणे दुरापास्त आहे; पण ‘भक्त शिरोमणी’ म्हणून त्यांची असलेली ख्याती वादातीत आहे. नामदेवांनी भक्तीचा, पंढरीचा व विठ्ठलाचा झेंडा पंजाबपर्यंत नेला. तिकडील त्यांची मंदिरे आणि शिखांच्या ग्रंथसाहेबात अंतर्भत केली गेलेली त्यांची पद्ये याची साक्ष देत आहेत. ते वारकरी पंथाचे आद्य प्रचारक होते, तसे कीर्तनाचेही प्रवर्तक होते.

त्यांच्या अभंगवाणीत भक्तीची स्निग्धता व उत्कटता ओतप्रोत भरून राहिलेली आहे. सहजसुलभ भाषा आणि भक्तिभावनेच्या अनेकानेक छटा हे त्यांच्या वाणीचे विशेष आहेत. जे अभंग सामान्यत: नामदेवांचे मानले जातात, त्यांत ‘आदि’, तीर्थावळी आणि समाध अशा तीन प्रकरणांचे ज्ञानेश्वरचरित्र आहे. त्या आधारे ते ज्ञानेश्वरांचे आद्य चरित्रकार मानले जातात. परंतु ही तीन प्रकरणे खरोखरीच नामदेवांनी लिहिली किंवा काय, ह्याबद्दल रा.चि. ढेरे ह्यांच्यासारख्या संशोधकांना शंका आहे. समाधिप्रसंगाचे वर्णन मात्र अतिशय उत्कट व ह्रदयाला पीठ पाडणारे आहे.

ज्ञानदेव व नामदेव या दोघांच्या प्रभावामुळ भक्तिगंगेचा प्रवाह महाराष्ट्रात अठरापगड जातींमध्ये पोचला व एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाहीच निर्माण झाली अनेक जातींच्या संतांनी अभंगरचना केली व तीद्वारा भक्तीचा व विठ्ठलाचा महिमा गायिला. बद्धावस्थेपासून तो साक्षात्काराच्या अवस्थेपर्यंतच्या पारमार्थिक प्रवासातील आपले अनुभव या संतांनी आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहेत, त्यामुळे त्यांत आत्मपरता यावी, हे स्वाभाविक आहे. नाममाहात्म्य, पंढरीचा महिमा, श्रीकृष्णाचे बालपण असे इतरही काही विषय या अभंगांतून येतात. निवृत्तिनाथ, सोपान व मुक्ताबाई या ज्ञानदेवांच्या भावंडांची रचना आहेच. पण चांगा वटेश्वर ( १३२५), विसोबा खेचर (- १३०९), नरहरी सोनार (१२६७-?), सावता माळी (१२५०?- ९५), परिसा भागवत, नामदेवांची दासी जनाबाई (१३५०) व इतर कुटुंबीय, जगमित्र नागा, जोगा परमानंद, संत चोखामेळा आणि इतर अनेक संत व भक्त यांनी या काळातील अभंगवाङ्मयाचे हे दालन समृद्ध केले आहे. चांगा वटेश्वर ह⇨चांगदेव व वटेश चांगा ह्या नावांनीही ओळखला जातो.

त्याच्या अभंगांत रूपकयोजनेवर विशेष भर आहे. मोतियाचे पाणी रांजण भरिला’ हा त्याचा अभंग प्रसिद्ध आहे. विसोबा खेचर हा व्यापारी. व्यापारी लोकांत त्याच्या काळी नंदभाषा प्रचलित होती. तिचा उपयोग त्याने आपल्या अभंगांत केलेला आहे. गोरा ऊर्फ गोरोबा कुंभाराचे आज फक्त वीस अभंग मिळतात. एक थोर आध्यात्मिक अधिकारी-पुरुष म्हणून त्याचा तत्कालीन संतांत लौकील होता. नक्की नरहरी सोनाराचे म्हणता येतील असे आठ-दहाच अभंग उपलब्ध आहेत, तर सावता माळ्याचे पाचपंचवीस. परिसा भागवत ह्याने नामदेवांचे शिष्यत्व पतकरले होते. ‘कवित्वापरिस कवित्व आगळे पै आहे...’ असा त्याचा नामदेवांवरचा एक मार्मिक अभंग मिळतो. जनाबाईने सु. साडेतीनशे अभंग लिहिले आहेत. जगमित्र नागा ह्याच्या अभंग-पदांतून चमत्कृतीची आवड जाणवते. चोखामेळ्याची ‘जोहार मायबाप जोहार’ ही रचना प्रसिद्ध आहे. या सर्वांच्या रचनेचा मूळ गाभा एकच आहे. त्या त्या कवीच्या भिन्न व्यक्तिमत्वानुसार व सामाजिक स्तरानुसार त्याच्या रचनेत अभिव्यक्तीचा काही निराळेपणा जाणवतो. जनाबाई व चोखामेळा या दोघांची रचना त्या दृष्टीने विशेष लक्षणीय आहे.

संदर्भ : प्राचीन मराठी साहित्य :

१. आजगावकर, ज. र. महाराष्ट्र – कवि चरित्र, ८ खंड, मुंबई, १९०७ – २७.

२. आजगावकर, ज. र.महाराष्ट्र संत कवयित्री, मुंबई, १९३९.

३. इर्लेकर, सुहासिनी, यादवकालीन मराठी काव्यसमीक्षा, औरंगाबाद, १९७९.

४. कानेटकर, शं. के. काव्य – कला भाग १ ला, पुणे, १९३६.

५. कुलकर्णी, श्री. रं. प्राचीन मराठी गद्य : प्रेरणा व परंपरा, मुंबई, १९७०.

६. केतकर, श्री. व्यं. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण, पुणे, १९२८.

७. केळकर, य. न. मराठी शाहीर आणि शाहिरी वाड्‍मय, पुणे, १९७४.

८. कोलते, वि. भि. महानुभाव संशोधन, पुणे, १९६८.

९. खानोलकर, गं. दे. संपा. मराठी वाङ्‌मयकोश, खंड – १ मुंबई, १९७७.

१०. ग्रामोपाध्ये, गं. ब. संतकाव्यसमालोचन, पुणे, १९३९ .

११. जोग, रा. श्री. संपा. मराठी वाङ्‌मयाचा इतिहास, खंड ३ ( १६८० ते १८०० ), पुणे, १९७३.

१२. जोग, रा. श्री. मराठी वाड्‍मयभिरूचीचे विहंगमावलोकन, पुणे, १९५९.

१३. जोशी, प्र. न. मराठी वाङ्‌मयाचा इतिहास, खंड १ , पुणे, १९७८.

१४. जोशी, वसंत स. महानुभाव पंथ. पुणे, १९७२.

१५.  ढेरे, रा. चिं. चक्रपाणि : आद्य मराठी वाङ्‌मयाची सामाजिक पार्श्वभूमी, पुणे, १९७७.

१६. ढेरे, रा. चिं. प्राचीन मराठीच्या नवधारा, कोल्हापूर, १९७२.

१७. ढेरे, रा. चिं. मुसलमान मराठी संतकवी, पुणे, १९६७.

१८. ढेरे, रा. चिं. श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पुणे, १९८४.

१९. तुळपुळे, शं. गो. पाच संतकवी, पुणे, १९४८.

२०. तुळपुळे, शं. गो. महानुभाव पंथ आणि त्याचे वाड्‍मय, पुणे, १९७६.

२१. देशपांडे, अ. ना. मराठी वाङ्‌मयकोश ( प्राचीनखंड ), नागपूर, १९७४.

२२, देशपांडे , अ. ना. प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास, भाग १ ते ५, १९६६- ८२ .

२३. देशपांडे , यशंवंत खुशाल, महानुभावीय मराठी वाड्‍मय, यवतमाळ, १९२५.

२४. देशामुख, मा. गो. मराठीचे साहित्यशास्त्र, पुणे, १९४०.

२५. धोंड, भ. वा. मर्‍हाटी लावणी, मुंबई, १९५६.

२६. पंगु, दत्तात्रय सीताराम, प्राचीन मराठी कविपंचक, कोल्हापूर, १९४४.

२७. पांगारकर, ल. रा. मराठी वाड्‍मयाचा इतिहास, ३ खंड, मुंबई, १९३२, १९३५ , १९३९.

२८. पिंगे, श्री. म. युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा, औरंगाबाद, १९६०.

२९. पेंडसे, शं. दा. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, नागपूर, १९५१.

३०. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, ( आवृ. ६ वी ), खंड १ , मुंबई, १९८२.

३१. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, ( आवृ. ६ वी ), खंड २, पुरवणी, तुळपुळे, शं. गो. मुंबई, १९८३.

३२. भिडे, बाळकृष्ण अनंत, मराठी भाषेचा व वाड्‍मयाचा इतिहास ( मानभाव अखेर ) , पुणे, १९३३.

३३. मालशे, स. गं. संपा. मराठी वाड्‍मयाचा इतिहास, खंड -२, भाग पहिला, ( १३५० ते १६८० ), पुणे, १९८२.

३४. मालशे, स. गं. संपा. मराठी वाड्ऍमयाचा इतिहास, खंड – २, भाग दुसरा, ( १३५० ते १६८० ), पुणे, १९८२.

३५. मोरजे, गं. ना. मराठी लावणी वाड्‍मय, पुणे, १९७४.

३६. रानडे, रा. द. अनु. गजेद्रगडकर, कृ. वे. मराठी संतवाङ्‌मयातील परमार्थ मागे, २ भाग, मुंबई, १९६३; १९६५.

३७. वर्दे, श्री. म. मराठी कवितेचा उप:काल किंवा मराठी शाहीर, मुंबई, १९३० .

३८ वाटवे, के. ना. प्राचीन मराठी शाहीर, मुंबई, १९३०.

३९. वाटवे, के ना. प्राचीन मराठी शाहीर, मुंबई, १९३०.

४०. वाटवे, के. ना. प्राचीन मराठी पंडिती काव्य, पुणे, १९६४.

४१. संकपाळ, बापूजी, बखरवाड्‍मय : उद्‍गम आणि विकास, पुणे, १९८२.

४२ . सरदार, गं. बा. संतवाङ्‌मयाची सामाजिक फलश्रुती, पुणे, १९५०.

४३. सुठणकर, वा. रं. महाराष्ट्रीय संतमंडळाचे ऐतिहासिक कार्य, बेळगाव, १९४८.

४४. हेरवाडकर, र. वि. मराठी बखर, पुणे, १९५७.

लेखक: वि.रा. करंदीकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate